InShort 2 - Little Hands (शॉर्ट-फिल्म)

मनिष's picture
मनिष in जनातलं, मनातलं
14 Sep 2019 - 10:19 am

Little Hands (२०१३) ही शॉर्ट-फिल्म बघूनच जर पुढचे वाचले तर जास्त मजा येईल, त्यामुळे शॉर्ट-फिल्म आधी बघावी ही विनंती.

चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे असे म्हटले जाते, त्याचा पुरेपूर अनुभव घ्यायचा असेल तर लिटल हँडस् ही शॉर्ट-फिल्म अवश्य बघावी. जेमतेम ८ मिनिटांचीच फिल्म आहे, पण त्यात एकाही कलाकाराचा चेहराही फारसा दिसत नाही, facial expressions तर दूरच राहिले. तरीही सांगायची ती छोटीशीच गोष्ट दिग्दर्शकाने परिणामकारकरित्या सांगितली आहे.

रोहिन रवींद्रन नायर ह्या FTII च्या प्रतिभावान विद्यार्थ्याने ह्या शॉर्ट-फिल्मचे लेखन, पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे, एवढेच काय, तर छायांकन आणि संकलनही त्याचेच आहे. स्मिता पाटील डॉक्युमेंट्री आणि शॉर्ट-फिल्म फेस्टीव्हल मध्ये दुसरे, इस्टोनियात आंतरराष्ट्रीय शॉर्ट-फिल्म फेस्टीव्हलमध्ये 'Most Original Approach' आणि इतर अनेक पारितोषिके, आंतरराष्ट्रीय शॉर्ट-फिल्म फेस्टीव्हलमध्ये सिलेक्शन असे अनेक सन्मान ह्या शॉर्ट-फिल्मने मिळवले आहेत.

Little Hands ही गोष्ट आहे ती दिल्लीतल्या एका शाळेत सहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची, गणिताचा पेपर लिहितांनाची. खास करून ही गोष्ट आहे जोबिन जॉर्ज (अभिजित मजुमदार) आणि सिद्धार्थ पटेल (अर्जुन दास) ह्यांची. जोबिनला बरीच गणितं सोडवता येत नाही, तो उगाचंच काहितरी लिहितो, खोडतो आणि वेळ काढतो आहे. जमलंच तर एखादा मित्र, एखादी मैत्रिण मदत करते का ह्याचीही सावधपणे चाचपणी करतोय. बरेच जण त्याला झिडकारतात, शिवाय कडक शिक्षिकेची करडी नजर मुलांवर असतेच. तिचाही चेहरा फारसा न दाखवता, हाताची घडी, चालणे अशा देहबोलीतून ही कठोर, शिस्तप्रिय शिक्षिका (शीला सेबॅस्टियन) दिग्दर्शकाने आणि अभिनेत्रीने छान रंगवली आहे. जोबिनचा वैताग, निष्काळजीपणा त्याच्या खोडतांना फाटलेल्या पेपरमधून दिसत रहातो. शेवटी हिरमुसलेल्या जोबिनला मदत करायला सिद्धार्थ तयार होतो. त्याच्या मदतीने जोबिन लपून-छपून, पण भराभर कॉपी करू लागतो.

दिग्दर्शक रोहिन रवींद्रन ह्याचे प्राविण्य छायांकनात (cinematography) आहे, त्याने गाजलेल्या सॅक्रेड गेम्सचेही छायांकन केले आहे. त्याचा हा स्पार्क Little Hands मध्येही दिसतोच, त्याने क्रेडीटमध्ये नमूद केले आहे, तेंव्हा DSLR कॅमेराही भाड्यानेच घेतला असावा. एकही चेहरा न दाखवता फक्त पेपर लिहिणारे हात आणि काही योग्य अँगल्स निवडून त्याने अफलातून काम केले आहे. मला त्याचा हा निर्णय हाच ह्या फिल्मचा मास्टरस्ट्रोक वाटतो. तसेच काही संवाद नसल्यामुळे पार्श्वसंगीत महत्वाचे आहे, आणि सर्व सरस चित्रपटांप्रमाणेच ह्या शॉर्ट-फिल्ममधेही संगीतावर बारकाईने काम केलेले जाणवते. ह्यात संकलनाचाही भाग आहेच, पण परिक्षेचा तणाव, वेळेचा दबाव, विद्यार्थ्यांचा ताण, शिक्षिकेचा करारीपणा हे सगळे कौशल्याने पार्श्वसंगीतातून हर्षित जैन आपल्या नेणीवेपर्यंत पोहोचवतो. इतर फिल्मपेक्षा ह्या शॉर्ट-फिल्ममधे पार्श्वसंगीताचा आवाज जास्त खणखणीत आहे, पण तोच नेमकेपणे ह्या फिल्मचा मूड पकडतो, आणि संवाद नसल्यामुळे खुलवतो देखील.

जोबिन आता सिद्धार्थच्या मदतीने पेपरात भराभर गणितं सोडवतो आहे. परिक्षेचा ताण जाणवत राहतो, आणि शिक्षिकेची करडी नजर भिरभिरत राहते. आता शिक्षिका त्यांना पकडेल का? शिक्षा करेल का? ह्या प्रश्नांंनी आपल्याही छातीत धाकधूक होत रहाते. शेवटच्या एक मिनिटात, क्लायमॅक्सला दिग्दर्शक रोहिन एकदम धक्का देतो, आपणही नकळत चुकचुकतो पण लगेचच लेखक, दिग्दर्शकाला गवसलेले कथेचे मर्म आपल्यालाही जाणवते. कॉपी करणार्‍या छोट्या हातांच्यामागील छोट्या, निरागस मनाचा चांगुलपणा दिग्दर्शक रोहिन थेट आपल्या मनात रेखाटतो, अगदी खोडता येणार नाही असा.

एखादा अवलिया चित्रकार आपल्यासमोरच काहीतरी वेगळ्याच प्रेरणेने कॅनव्हासवर भराभर रंग चढवतो, आपण पहात असलो तरी कॅनव्हासवर नेमके काय बनते आहे ह्याचा अंदाज काही आपल्याला लागत नाही, मग शेवटी ब्रशच्या अखेरच्या एखाद-दोन फटकार्‍यांतच संपुर्ण कलाकृती जिवंत होऊन आपल्यासमोर साकारते. आत्तापर्यंत पाहिलेल्या रंगांच्या फटकार्‍यांचा अर्थ उमजतो आणि नकळतच आपल्या तोंडून दाद निघून जाते. Little Hands ही फिल्म पहिल्यांदा पहातांना शेवटी अशीच एक दाद माझ्याही तोंडून निघून गेली होती. एखादी फिल्म, कथा भावते म्हणजे अजून वेगळे काय होते?

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

14 Sep 2019 - 11:27 am | यशोधरा

मस्त फिल्म, आवडली!

ज्योति अळवणी's picture

14 Sep 2019 - 12:37 pm | ज्योति अळवणी

अप्रतिम concept

खूप आवडली फिल्म

ज्ञान's picture

14 Sep 2019 - 1:11 pm | ज्ञान

अप्र्तीम

सर्वच प्रतिसादकांना धन्यवाद.

बहुतेक आपण सगळेच वेगवेगळे चित्रपट आवडीने पाहतो, त्याविषयी बोलतो, लिहितो. त्यामानाने शॉर्ट-फिल्म दुर्लक्षितच राहतात, बहुतेक होतकरू दिग्दर्शक पुर्ण लांबीच्या चित्रपटाकडे वळण्याअगोदर शॉर्ट-फिल्म बनवतात, स्वतःच्या कलेच्या जाणिवा दाखवण्यासाठी. ह्यात फारशी आर्थिक गणितं नसतात (यू-ट्युबवर पैसे मिळू शकतात, पण त्यासाठी इतर मार्ग आहेत) तरीही ते सुरेख आशय काही मिनिटांच्या शॉर्ट-फिल्ममध्ये दाखवतात. आफ्टरग्लो सारख्या फिल्मस् तर कित्येक पुर्ण लांबीच्या चित्रपटांपेक्षाही जास्त आशयघन असतात. मला स्वतःला शॉर्ट-फिल्मस् खूप आवडतात, अशाच काही आवडलेल्या शॉर्ट-फिल्मस्बद्दल इथे नियमित लिहायची इच्छा आहे. आठवड्याला (शक्यतो) एका फिल्मविषयी लिहीन आणि अशा निदान ८-१० फिल्मस् विषयी लिहायची इच्छा आहे.

कित्येकवेळा शेकडोंनी वाचने, पण तुरळक प्रतिक्रिया बघून लिहावे की नाही असा संभ्रम पडतो. तुमच्या प्रतिक्रियांनी हुरूप वाढेल, सुचनांचीही मदत होईल.

यशोधरा's picture

15 Sep 2019 - 1:32 pm | यशोधरा

मी म्हणते लिही. खूप लिखित प्रतिसाद नसले तरी जरूर लिहावंस. मी फिल्मस् बघतेय, तू लिहिलेलं वाचतेय आणि प्रतिसादही देतेय.

ह्या फिल्म्स माझ्यापर्यंत पोचवल्याबद्दल मनापासून आभार.

नि३सोलपुरकर's picture

16 Sep 2019 - 11:30 am | नि३सोलपुरकर

आवडली!

धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

16 Sep 2019 - 11:58 am | सुधीर कांदळकर

या दृष्टीने सुंदर, अस्सल आणि अभिनव कल्पना. पण या लघुपटातून चुकीचा संदेश जातो. हे मात्र दिग्दर्शकाला बदलता आले असते. समाजाचे नियम आम्हाला असामान्यांना लागू होत नाहींत ही बेपर्वा वृत्ती. या प्रभावी माध्यमाची शक्ती हे कलावंत जाणत नाहीत हे फार वाईट.

जॉनविक्क's picture

16 Sep 2019 - 12:28 pm | जॉनविक्क

समाजाचे नियम आम्हाला असामान्यांना लागू होत नाहींत ही बेपर्वा वृत्ती.

बेपर्वा वृत्ती असणारे सगळेच असामान्य नसतात हे खरेच, परंतू बहुतांश असामान्य समाजाचे नियम मोडूनच तयार होतात. ज्याचा सामान्यांनी बाउ करायचा प्रश्नच उपस्थित होत नाही.

मस्त मस्त

सुमो's picture

23 Oct 2019 - 4:13 pm | सुमो

काढून टाका.....

कित्येकवेळा शेकडोंनी वाचने, पण तुरळक प्रतिक्रिया बघून लिहावे की नाही असा संभ्रम पडतो.

शेकडो वाचक आहेत हेच महत्वाचं. लेखन जमत नाही हो काही जणांना. प्रतिक्रिया तुरळक असतीलही पण आपलं लेखन शेकडो लोक वाचतात हे किती छान असतं.

तेव्हा लिहिते रहा असा आग्रह करतो.

(आजतागायत एकही लेख न लिहिलेला) सुमो.

प्रोत्साहनासाठी धन्यवाद. ही फिल्म आवडली असेल तर आवर्जून Afterglow पहावी अशी विनंती करतो.