तंबोरा' एक जीवलग - ५

गौरीबाई गोवेकर नवीन's picture
गौरीबाई गोवेकर नवीन in जनातलं, मनातलं
14 Sep 2019 - 8:17 pm

न केलेल्या अभिनयाची गोष्टः

अभिनय ही एक स्वतंत्र कला आहे. एखाद्याला गाता येतं म्हणजे अभिनयही येईलच असं नाही. ़़़जसे गाणे मुळात असायला लागते तसेच अभिनयाचेही आहे. तो रक्तात असावा लागतो. प्रत्यक्षात मात्र अनेक गायक गायिकांनी संगीत रंगभूमीवर अभिनय केला. यशही मिळवलं. परंतु त्यांना प्रारंभी नाटक कंपन्यांमध्ये अभिनयाचे धडे गिरवायला लागलेच. कंपन्यांच्या पदरी अभिनय शिकविण्यासाठी माणसे नेमलेली असत. एखाद्या गायक गायिकेला अभिनयात तयार करून घेण्याची त्यांची जबाबदारी. या शिवाय बुजुर्ग नट अशा गायकांना अभिनयाचे धडे देत. यथावकाश अभिनयात तयार होऊन ती गायिका किंवा गायक सराईतपणे अभिनय करू लागे आणि गाणे अधिक अभिनय याच्या जोरावर प्रसिद्ध होई.

आईनं काही संगीत नाटकात कामे केली पण तिथं ती रमली नाही. अभिनय सुटला. गाणं राहिलं. सुटला म्हणजे जाणिवपूर्वक सोडला तिनं. मलाही नाटकात काम करण्याविषयी आग्रह झाला पण मी ते नाही केलं. आमच्याकडे नारायण गावकर म्हणून एक गुणी गोड गळ्याचे सुरेल गायक येत. ए. पी नारायण या नावानं त्यांनी चित्रपटांना संगीतही दिलेलं आहे. पूर्वी आकाशवाणीवर त्यांची पुष्कळ गाणी लागायची.

"तू चांगली गातेसच तर तू नाटकात काम कर" अभिनय क्षेत्रात येण्याबद्दल ते मला खूप आग्रह करायचे.

ते आले की म्हणायचे " ती पहा...ती पहा नीट ऐक. संगीत रंगभूमी तुला साद घालते आहे. दे तिच्या हाकेला ओ दे आणि नाटकात ये"

मी म्हणायची, " बुवा मला काही तिची साद ऐकू येत नाही हो. मग कसे करायचे? " असे विनोदी बोलणे चालायचे. ते मनाचे निर्मळ होते. अनेकदा ते यायचे. आता ते नाहीत.

एकदा आलेले असताना म्हणाले पहा " एका नवीन संगीत नाटकाची जुळवाजुळव सुरू आहे. त्यात अमुक अमुक गायिका आहे. तू सुद्धा त्यात भूमिका कर" मी म्हटल बुवा संवाद म्हणायला आले की मी गाणं विसरेन आणि माझं पद आलं की पुढचे संवाद विसरेन. कशाला उगाच त्या नाटकाला जन्माआधीच मारून टाकता? शिवाय माझ्या अभिनयानं ते संगीत नाटक विनोदी होईल ते निराळच." असे आमचे संवाद चालायचे.

एकदा महाराष्ट्रातल्या एका प्रसिद्ध ,गुणी आणि नंतर खूप लोकप्रिय झालेल्या विनोदी लेखक, नट, वादक, अनेक कलांमध्ये पारंगत असलेल्या व्यक्तीला ते घेऊन आमच्याकडे आले. माझ्या आवाजात त्यांना एक ठुमरी रेकॉर्ड करून हवी होती. एका नाटकात काही प्रसंगात पार्श्वसंगीत म्हणून वाजविण्यासाठी त्यांना ती हवी होती. घरीच रेकॉर्ड करायची होती. त्यांना चार ओळीच हव्या होत्या पण रेकॉर्ड मात्र पूर्ण ठुमरी करायची होती. तबला, सारंगीचे साथीदार त्यांनी आणले होते. ते लेखक स्वतः उत्तम पेटी वाजवत. सोबत मोठ्या रिळांचा टेपरेकॉर्डर त्यांनी आणलेला होता. घरातल्याच एका खोलीत आम्ही बाहेरच्या आवाजाचा त्रास न होईल अशा बेताने ती रेकॉर्डही केली. ते सर्व आटोपल्यावर नारायण गावकरांनी पुन्हा नाटकाचा विषय काढला. मला अभिनय करायला सांगा अशी ते त्या लेखकांना गळ घालू लागले.

ते लेखक विनोदी होते. म्हणाले, "अहो नारायण गावकर, यांच्या सुरात असलेल्या विजेला मैफिलीचं आकाशच हवं. थेटरातल्या चार भिंतीमध्ये बंदिस्त करून त्या सुरांचा आपटबार कशाला करता?." तुम्हाला त्यांना नाटकात आलेलं पहायचं आहे ना? मग माझ्या एका नाटकातल्या एका स्त्री पात्राला मी यांचं नाव देतो.

खरोखरच पुढे त्यांनी त्यांच्या नाटकातल्या एका भूमिकेला माझं नाव दिल. पुढे मी नारायण गावकरांना म्हणायची, " बघा बुवा गेले की नाही नाटकात मी?"
अशी ही न केलेल्या अभिनयाची गोष्ट. मी नाटकात जरी भूमिका केल्या नाहीत तरी नाट्यसंगीत मात्र गायले. माझ्या मैफिलींमधून अनेक अजरामर नाटकांमधील पदे मी आवर्जुन गात असे. आणि ती श्रोत्यांना अतिशय आवडत असत.

गौरीबाई गोवेकर.

कलालेख

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

14 Sep 2019 - 8:27 pm | विजुभाऊ

छान सुरात चालला आहे लेखन प्रवास.
पुढचे वाचायला उत्कंठा वाटते

फक्त अभिनयही रक्तात असावा लागतो, हे तो थोडया कठीण मार्गाने शिकला.

सिरुसेरि's picture

14 Sep 2019 - 8:45 pm | सिरुसेरि

छान आठवणी . लेखात उल्लेख केलेल्या महाराष्ट्रातील गुणी लोकप्रिय व्यक्तीमत्चाबद्दलचा आदर अजुन वाढला .

जालिम लोशन's picture

14 Sep 2019 - 10:54 pm | जालिम लोशन

छान

"अहो नारायण गावकर, यांच्या सुरात असलेल्या विजेला मैफिलीचं आकाशच हवं. थेटरातल्या चार भिंतीमध्ये बंदिस्त करून त्या सुरांचा आपटबार कशाला करता?."

व्वा!!! हे नेमके भान असणारे आणि आपल्यालाही भानावर ठेवणारे जेष्ठ आता किती उरलेत?

अनिंद्य's picture

15 Sep 2019 - 6:38 pm | अनिंद्य

हा भागही आवडला.
तुमच्या संगीतसाधनेला त्या गुणग्राहक रत्नपारखींची दाद अगदी मार्मिक शब्दात !

सुधीर कांदळकर's picture

16 Sep 2019 - 9:59 am | सुधीर कांदळकर

छान षडज लागला आहे. मागील लेखातला तणाव गेला आहे. बरे वाटले.

धन्यवाद. पुलेशु.

श्वेता२४'s picture

16 Sep 2019 - 2:19 pm | श्वेता२४

पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.

भारी लिहिलंय. मला ती व्यक्ती पु. लं. वाटले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Sep 2019 - 8:28 am | ज्ञानोबाचे पैजार

सुरेख...
अतिशय सुरेख... असे जाणकार लोक भेटायलाही भाग्य लागते.
लिहित रहा
पैजारबुवा,