माझ्या एका मित्राला अर्थाचे अनर्थ करण्याची खूप वाईट खोड आहे. अर्थात माझाच मित्र तो... माझ्यासारखाच असणार... पण असे करताना मी किमान आजूबाजूचे भान तरी बाळगतो... हा पठ्ठ्या मात्र माझ्याही पुढची पायरी...
परवा सम्याच्या वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये गेलो होतो. त्याच्याकडूनच पार्टी मिळणार म्हटल्यावर मी एका पायावर तयार. बरोबर रव्याही होताच. हॉटेलमध्ये तशी बरीच गर्दी होती. एक मोकळे टेबल पाहून त्यावर जाऊन बसलो. वेटरला पंजाबी डिशेसची ऑर्डर दिली आणि गप्पांची सुरुवात झाली. आमच्या टेबलच्या मागे तीन टेबल एकाला एक जोडून १०/१२ मुलींचा घोळका बसला होता. माझी पाठ त्या मुलींच्या घोळक्याकडे होती आणि माझ्या समोर सम्या आणि रव्या बसले होते. गप्पांच्या नादात सम्याने विषय काढला.
“मिल्या... काल मात्र मजा आली यार... ग्रेट आहेस तू...” तो आदल्या दिवशी मी त्याला ऐकवलेल्या गाण्याबद्दल बोलत होता. सुधीर फडके यांचे “छेडली मी आसावरी” हे गाणे मी त्याला ऐकवले होते. पण रव्याला त्याबद्दल काहीच माहिती नव्हते म्हणून त्याने सम्याला प्रश्न केला.
“काय रे? कसली मजा? मलाही कळू दे की...”
“अरे काल या मिल्याने आसावरी छेडली... जाम मजा आली...”
“च्यायला... काय सांगतोस काय?”
“मग... तुला खोटं वाटलं की काय? मिल्या काय रे ते?”
आता इतक्या अनोळखी लोकांत आपण सुरात गाणे म्हणणे मला योग्य वाटले नाही म्हणून मी फक्त ते गद्यात म्हणून दाखवले.
“छेडिली मी आसावरी, आली उमलून धुंद शर्वरी...”
एकतर इतके जुने आणि त्यातूनही अलंकारिक भाषा वापरलेले गाणे रव्याच्या डोक्यावरून गेले तर त्यात विशेष काय?
“म्हणजे?” रव्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. मी त्याला त्याचा अर्थ सांगणारच होतो पण सम्याने लगेच सुरुवात केली...
“म्हणजे म्हणून काय विचारतोस? याचा अर्थ याने आसवरीला छेडले... तिच्या जवळच ती बेवडी शर्वरी बसलेली होती. याने फक्त आसवरीलाच का छेडले म्हणून ती धुंद झालेली शर्वरी याच्यावर धावून आली.” सम्याच्या चेहऱ्यावर मिश्कील भाव होते. तो बावळट रव्या... त्याला तरी काही अक्कल हवी की नको? सम्याच्या बोलण्यातील मिश्कीलपणा त्याला काहीच समजला नाही.
“आयला मिल्या... तू तर लैच डेंजर यार...” रव्याच्या या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी याचा मी फक्त विचारच करत होतो आणि आमच्या टेबलाजवळ तो सगळा १०/१२ जणींचा घोळका जमा झाला.
“ओ मिस्टर... काय म्हणालात तुम्ही?” त्यातील एकीने माझ्याकडे पाहून विचारणा केली. मलाही वाटले बहुतेक त्यांना सुधीर फडके यांचे हे गाणे माहिती नसावे म्हणून म्हटले...
“छेडिली मी आसावरी, आली उमलून धुंद शर्वरी...” मी फक्त इतके बोलण्याचा अवकाश... आणि त्या सुरु झाल्या...
“हलकट... नीच... तुला लाज नाही वाटत असं बोलायला?” त्यातील एकीने म्हटले आणि मी अचंबित झालो.
“हो ना... असल्या गुंडांना वेळीच ठेचले पाहिजे... वर तोंड करून बोलतोय बघ कसा...” लगेच दुसरीने सुरुवात केली. सम्या आणि रव्या हे पुढे काय होणार ओळखून आधीच बाजूला झाले होते. मी मात्र पूर्णपणे त्यांच्या तावडीत सापडलो होतो. मी बोलायचा प्रयत्न करत होतो पण माझे कुणीच ऐकून घेत नव्हते. इतरही लोकं माझ्या भोवती गोळा झाले. आता आपले हॉस्पिटल टळत नाही हे विचार करून देवाचा धावा सुरु केला.
“आसावरी... लवकर ये... काल ज्याने तुला त्रास दिला त्याला आज आम्ही पकडला आहे... वाजव त्याच्या कानफटात...” एक मुलगी हॉटेलच्या दाराकडे पहात उद्गारली. बहुतेक नवीन कुणी मुलगी आली होती. इतर गर्दी लगेचच बाजूला झाली आणि ती आसावरी माझ्या पुढ्यात येवून उभी राहिली.
“अगं... तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. हा तो पोरगा नाहीये...” तिचे ते वाक्य ऐकले आणि मी देवाचे मनोमन आभार मानले.
“अगं पण हाच आत्ता म्हणाला... छेडिली मी आसावरी म्हणून... आणि हो या शर्वरीला बेवडी सुद्धा म्हणाला याचा मित्र...”
“अहो ताई... खरंच हो... मी अजून पर्यंत कुणालाही छेडलेले नाही हो... माझा मित्र मी त्याला काल ऐकवलेल्या सुधीर फडके यांच्या गाण्याबद्दल बोलत होता... आसावरी हा एक गाण्यातला राग आहे आणि काल मी त्याला तेच ऐकवले.” मी अगदी काकुळतीला येवून त्यांना सांगितले.
“आणि तुमचा मित्र काय म्हणत होता शर्वरी बेवडी आहे म्हणून?” पहिल्या मुलीने विचारले.
“अहो त्या गाण्यात पुढील ओळ आहे. ‘आली उमलून धुंद शर्वरी’. शर्वरीचा अर्थ होतो रात्र. पण माझ्या मित्राला काहीही यातील काहीच कळत नाही. त्याच्या दृष्टीने धुंद म्हणजे मद्यधुंद व्यक्ती आणि शर्वरी हे मुलीचे नाव असते इतकेच त्याला माहित. बरे हेच मी माझ्या दुसऱ्या मित्राला सांगणार त्याच्या आधीच तुम्ही मला गराडा घातला. आणि नंतर कुणी माझे ऐकूनही घेत नव्हते.” मी हे सांगितले आणि सगळ्यांनीच डोक्याला हात मारून घेतला.
“सॉरी... हं... आमची चूक झाली...!!!” इतके बोलून त्या सगळ्या त्यांच्या टेबलवर जाऊन बसल्या. ऑर्डर दिलेली असल्यामुळे आता आम्हालाही तिथून निघणे शक्य नव्हते. मी आपला सम्याला शिव्या घालत होतो अर्थाचा अनर्थ केला म्हणून आणि ते दोघे मात्र फिदीफिदी दात काढत होते. बरे सगळ्यांचे लक्ष आता माझ्याकडेच होते आणि माझ्यात मात्र नजर वर करण्याचीही हिम्मत नव्हती.
आता जर कुणी मला विचारले की बाबारे... प्रारब्ध म्हणजे काय? तर त्याला माझे उत्तर असते... “ज्यावेळेस इतरांच्या कृतीने आपल्याला मार खायची वेळ येते त्याला प्रारब्ध म्हणतात.”
मिलिंद जोशी, नाशिक...
प्रतिक्रिया
4 Sep 2019 - 12:17 am | श्रीरंग_जोशी
लेखनशैली आवडली. मिपावर स्वागत.
4 Sep 2019 - 9:13 am | मिलिंद जोशी
खूप खूप धन्यवाद...
4 Sep 2019 - 9:02 am | राघव
भारी किस्सा! मस्त लेखन!!
4 Sep 2019 - 9:13 am | मिलिंद जोशी
खूप खूप धन्यवाद...
8 Sep 2019 - 11:48 pm | शशिकांत ओक
मैत्रीतील सलगीचे नाम निदेश भावले.
'करे कोणी! भरे कोणी!! '
"याला जीवन ऐसे नाव" !!!