सांप्रत काळ मोठा कठीण आहे.
सध्या भारतात आणि जगात आर्थिक मंदीच आगमन झालं आहे की ही फक्त सुरुवात आहे यावर अनेक असलेले आणि नसलेले अर्थतज्ञ डोकेफोड (एकमेकांचे) करत आहेत. पण रिकाम्या वेळात फालतू पिक्चर बघणे ह्या उद्योगात गेल्या काही वर्षात प्रचंड मंदी आहे. वास्तव वगैरे पिक्चर यायला लागल्यापासून तर काही करिअर हे जवळपास नष्ट झाले आहेत. हे बघून अस्मादिकांना प्रचंड हळहळ वाटत आहे.
त्यापैकीच एक म्हणजे कुठल्याही जुन्या सिनेमामध्ये मुख्य गुंडाचे साथीदार, म्हणजे ‘असिस्टंट गुंड’ हे करिअर. गेल्या कित्येक सिनेमांमध्ये हे कोरस गुंड गायबच झाले आहेत. एक काळ ह्या पंटर लोकांनी खूप गाजवला. कारण त्यांच्याशिवाय हिरोईन ही हिरोला पटतच नसे. गाणं म्हणून, उडया मारून, गिफ्ट देऊन काही हिरोईन पटत नाही तेव्हा हेच गुंड अतिशय उदार मनाने हिरोच्या मदतीला येत. मग सामाजिक भावनेने हिरो कसाही असला तरी त्याच्या हातचा मार खात आणि मग खऱ्या अर्थाने प्रेमकथा सुरू होई. बरं ह्याच लोकांना प्रचंड मारपीट केल्यानंतरच त्या हिरॉईनचा बाप लग्नाला हो म्हणे.
त्यावेळी हिरोला हिरो का म्हणायचं? असा प्रश्न मला पडायचा. तसं बघायला गेलं तर ह्या लोकांच्या बाबतीत मला खूप प्रश्न पडायचे जसं की, हे गुंड म्हणून करिअर करावं असं ह्या लोकांना का वाटत असेल? ह्यांची मुलं शाळेत तुझे वडील काय करतात ह्या प्रश्नाला काय उत्तर देत असतील? म्हणजे बघा ना, ना स्वतःची ओळख ना पैसे काहीच मिळत नाही. बर मुख्य काम काय तर मार खाणे. म्हणजे सुरुवातीचे ५ -१० मिनिटं काय तो रुबाब दाखवता येतो तो पण म्हातारी माणसं, बायका वगैरे लोकांवर. एकदा का हिरो म्हणणारा तो माणूस आला की मग हे संख्येने कितीही असले तरी ह्यांची धुलाई ठरलेली. इज्जतीचा फुल फालुदा.
हे दिसायला कितीही सांड, खुंखार असले तरी मिथुन आणि रजनीकांत (ह्या दोघांवर कुठलीही निगेटिव्ह कॉमेंट खपवून घेतली जाणार नाही) सारख्या लोकांच्या शर्टाची इन तर सोडाच केसांचा भांग देखील ह्यांना मोडता येत नाही. इतकंच काय मिथुन तर नेहमीच ह्यांना एकत्र येऊन मला हाणून दाखवा असंच आव्हान देताना दिसतो. थोड्या वेळापूर्वीच मिथुनपेक्षा सुदृढ अशा म्हाताऱ्याला ह्यांनी दम दिलेला असतो. रजनीकांत तर ह्यांना उघड उघड डुक्कर म्हणतो (पक्षी: बेटा, झुंड मे तो सुंवर आते है, शेर हमेशा अकेला आता है!) ही अशी मानहानी तर मार्केटिंगच्या लोकांची देखील होत नाही.
ह्यांचा बॉस ह्यांना कधीही, कुठलीही ट्रेनिंग देत नाही. ह्यांच्या बंदुका देखील काही कामाच्या नसतात. किडनॅप वगैरे कामासाठी सुद्धा ह्यांना एकदम भुक्कड गाड्या दिल्या जातात. कुठलाही युनिफॉर्म, identity कार्ड ह्यांच्याकडे नसतं. कामाची जागा सुद्धा किती भयानक बोरिंग असते. सगळीकडे फक्त रिकामी खोकी, पोती, ड्रम, मडकी, क्वचित प्रसंगी पाण्याचे जार ठेवलेले असतात. ते नेमके कशासाठी ठेवलेले असतात हे ते चुकून देखील आपल्या बॉसला विचारत नाहीत.
चुकून कधी गब्बरसिंग सारखा बॉस असला तर हिरॉईनचा डान्स पाहायला मिळतो, तो सुद्धा पूर्णपणे पाहता येत नाही. कारण बॉसच बाटल्या फोडायला लावतो नाहीतर मग हिरो कडमडतो. खूपदा तर फुलाहुन कोमल असं जिचं वर्णन हिरोने केलेलं असतं ती सुद्धा ह्यांच्यावर हात धुवून घेते. ह्यांचा खूप मार खाऊन झाल्यावरच पोलीस येतात आणि परत ह्यांनाच घेऊन जातात. ह्यांना पकडणारे हवालदार देखील अतिशय मरतुकडे असतात. कॉमेडियन सुद्धा ह्यांना हाणून घेतात.
एकंदरीत ह्यांना कुठलेही perks मिळत नाहीत. ह्यांच्या जमातीपैकी फक्त सांबा ह्याच करिअर चांगलं म्हणता येईल असं झालं. बाकी सगळे निनावीच राहिले आहेत. ह्या लोकांची मेडिक्लेम पॉलिसी देखील ह्यांचे बॉस काढत नाहीत, इतके ह्यांचे हाल होतात. कामाचा भाग म्हणून काही वेळेस ह्यांना ज्येष्ठ नागरिकांना देखील उचलून आणावे लागते. बॉसच्या घरच्या पार्ट्यांना देखील ह्यांना कधीच बोलावत नाहीत. कारण हे जिथे जातील तिथे राडेच होतात. खूपदा ह्यांचे बॉस दाट जंगलात अड्डा बनवतात त्यावेळेस ह्यांना कुटुंबापासून दूर राहावे लागते. मुलं, बायका काय करत असतील हे देखील समजू शकत नाही.
थोडक्यात काय तर कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता आणि हे गुंड सारखेच असतात. त्यांची कधीच प्रगती होत नाही. कार्यकर्त्यांचा जन्म सतरंज्या उचलण्यात आणि ह्यांचा जन्म मार खाण्यात जातो. त्यामुळे कार्यकर्त्याच करिअर जर नष्ट होत असेल तर ह्या गुंड लोकांच करिअर सुद्धा एक दिवस असच संपणार. नव्या जमान्यात नवे करिअर असतील असं म्हणतात, ही गोष्ट नेमकी ह्यांच्या मुळावरच आली आहे कारण जिथे ह्यांच्या बॉसची नोकरी राहिली नाही तिथे ह्यांच दुसरं काय होणार? शेवटी राजकारणात बळी हा कार्यकर्त्यांचा जातो हेच खरं!
अमोल कुलकर्णी
प्रतिक्रिया
22 Aug 2019 - 2:54 pm | महासंग्राम
लेख मस्त वाटतो आहे पण परिच्छेद तेव्हढे पडायला पाहिजे होते वाचायला त्रास होतोय, सासं कडून करून घ्या तेव्हढं
22 Aug 2019 - 4:35 pm | चौथा कोनाडा
+१ सहमत
23 Aug 2019 - 10:32 pm | kool.amol
केले आहेत परिच्छेद. आता थोडं वाचनीय होईल
24 Aug 2019 - 1:07 pm | चौथा कोनाडा
+१
22 Aug 2019 - 3:02 pm | जॉनविक्क
कालाय तस्मय नमः
22 Aug 2019 - 3:18 pm | जालिम लोशन
टाईमपास!
22 Aug 2019 - 4:49 pm | nishapari
कामाची जागा सुद्धा किती भयानक बोरिंग असते. सगळीकडे फक्त रिकामी खोकी, पोती, ड्रम, मडकी, क्वचित प्रसंगी पाण्याचे जार ठेवलेले असतात.
लगेच डोळ्यापुढे हे सगळं असलेलं गोदाम तरळून गेलं ... मस्त लिहिलं आहे :)
22 Aug 2019 - 5:31 pm | चौथा कोनाडा
भारी लिहिलंय, कुल.अमोल ! _/\_
याचं विनोदी सादरीकरण / स्टॅण्डप कॉमेडी सारखं सादर करता येईल !
(परिच्छेद दिले असते तर "सहज वाचनीय" झाले असते, पुढच्या धाग्यावेळी ही सुधारणा झालेली पहायला आवडेल )
27 Aug 2019 - 5:12 pm | kool.amol
तुमची कल्पना मला खरंच आवडली. स्टँड अप कॉमेडी हा प्रकार मी अजूनपर्यंत केलेला नाही. पण मला करायला नक्कीच आवडेल. मी आवडीने पाहतो हे performances. मी औरंगाबादला राहतो तिथे असे कार्यक्रम फारसे होत नाहीत. त्यामुळे हे करायचं कुठे?आणि कसं?
22 Aug 2019 - 9:21 pm | नाखु
छान जमला आहे पण सगळेच जण फक्त मारखाऊ राहिले नाहीत, बरेच असे आजूबाजूच्या उजव्या डाव्या हातांनी पुढे महत्वाच्या भुमिका साकारल्या आहेत.
शरद सक्सेना,अमरीश पुरी,गोगा कपूर,सुधीर,तेज सप्रू, ही काही उदाहरणे.
पिटातला प्रेक्षक सिनेमावाला नाखु
24 Aug 2019 - 9:55 am | ज्ञानोबाचे पैजार
यात नवाउद्दीन सिद्दीकी सुध्दा अॅडवा,
सरफरोश मधल्य एका प्रसंगात, एक मिनिटा पे़क्षा कमी काळ, आमिर खान समोर थरथरत उभा रहाण्याचे काम करताना तो दिसतो
पैजारबुवा,
23 Aug 2019 - 12:00 am | पिवळा डांबिस
इथे तर फुटलो, :)
23 Aug 2019 - 12:45 pm | उपयोजक
जमलंय !!!!
23 Aug 2019 - 4:33 pm | किल्लेदार
हा हा हा !!! चांगलं झालंय ...
23 Aug 2019 - 4:39 pm | धनावडे
मस्त लिहलय....
24 Aug 2019 - 6:58 pm | फारएन्ड
आवडले :)
24 Aug 2019 - 10:18 pm | बबन ताम्बे
खूप मस्त लेख.
अजून एक जमात आहे. हिरो व हिरोईन कॉलेजला असेल तर त्यांचे मित्र आणि मैत्रिणी. बिचाऱ्यांना एक डायलॉग देत नाहीत.
हिरो कशात तरी पहिला आला की हे.. असे ओरडून हिरोला खांद्यावर घेऊन नाचायचे काम असते किंवा हिरोईनच्या बरोबर वह्या घेऊन चालायचे असते.
नाही म्हणायला कर्मा पिक्चरमध्ये डॉ. डयांग (अनुपम खेर) च्या अड्ड्यातून श्रीदेवीसकट सगळे कैदी सुटतात तेव्हा आख्या जंगलात श्रीदेवी आणि एक सरदार कैदी दोघेच पळताना दाखवलेत. पण तेंव्हा सुद्धा त्या सरदाराला बिचाऱ्याला भेनजी जलदी भाग जाओ असाच डायलॉग दिलाय ☺
24 Aug 2019 - 10:28 pm | पद्मावति
मस्तं खुसखुशीत लेख :)
24 Aug 2019 - 11:58 pm | ज्योति अळवणी
मस्त जमलंय.
25 Aug 2019 - 7:07 pm | kool.amol
आपण दिलेल्या प्रतिक्रिया, सूचना याबद्दल सर्वांचे आभार. परिच्छेद करण्याची सूचना छान होती, संपादकांनी देखील माझ्या विनंतीनुसार हे परिच्छेद करून दिले. चित्रपट हा आपल्या सर्वांचा आवडीचा विषय. सहज विरंगुळा म्हणून मी माझी निरीक्षणं लिहिली. बहुतेकांना ती आवडली. छान वाटलं. परत एकदा खूप खूप आभार.
25 Aug 2019 - 7:20 pm | पाषाणभेद
मस्त.
एक विचारावेसे वाटते. असे किती टक्केवारीने लोक असतील ज्यांना असले जुने चित्रपट पुन्हा पहावेसे वाटतात?
थेटरचा जमाना तर गेला पण असले चित्रपट पुन्हा थेटरमध्ये लागले तर किती पहायला येतील?
27 Aug 2019 - 5:08 pm | kool.amol
खूप आहेत. मला वाटतं आपण सर्वांनी नकळत्या वयात म्हणा किंवा लहान वयात म्हणा हे चित्रपट पाहिले, त्यांचा चांगलाच ठसा आपल्या मनावर आहे. कालांतराने आपली ह्या कलेविषयी रुची वाढली, समज वाढली त्यामुळे हे चित्रपट आपण परत परत पाहतो, पण यावेळेस आपण समीक्षक म्हणून असतो प्रेक्षक म्हणून नव्हे. ह्या अशा डोळसपणे पाहण्यातून आपल्याला त्याच चित्रपटांमधून दरवेळेस काहीतरी नवीन गवसतं.
1 Sep 2019 - 11:36 pm | kunal lade
1 Sep 2019 - 11:37 pm | kunal lade
1 Sep 2019 - 11:37 pm | kunal lade