श्रीगणेश लेखमाला २०१९ - झलक तिसरी!

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in लेखमाला
15 Aug 2019 - 8:32 am

सर्वप्रथम, सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अनेक शुभेच्छा!

एखाद्या रिकाम्या चित्रफलकावर चित्रकर्त्याने हलके हलके रंग भरावेत आणि बघता बघता चित्रफलकाचा नूरच बदलून जावा! आपल्या श्रीगणेश लेखमालेचंसुद्धा काहीसं तसंच झालंय बरं का, मंडळी. ह्या वर्षीच्या लेखमालेची घोषणा झाल्यापासून जसे मिपाकरांकडून वेगळ्या वेगळ्या विषयांवरचे लेख येऊ लागलेत, तशी आपली लेखमाला विविध विषयांवरील लिखाणाने सजू लागली आहे, बघता बघता आकार घेऊ लागली आहे.

तसंही बुद्धिदात्याच्या, विद्येचं वरदान देणाऱ्या देवाच्या पूजेत शब्दफुलं वाहण्यापेक्षा अधिक सयुक्तिक काय असणार?

ganapati-aani-indradhanu

तेव्हा, आज पुन्हा एकदा घेऊन आलोय श्रीगणेश लेखमालेतल्या लेखांची आणखी एक छोटीशी झलक. पाहा बरं, एखादी लेखनशैली ओळखीची वाटते का आणि सांगा, कोणाच्या लेखणीतून उतरले असतील हे शब्द...

१.

रायगडाबद्दल आपल्याला १६८९पर्यंत, म्हणजे झुल्फिकार खानाने रायगड घेतला तोपर्यंतची माहिती विश्वसनीय साधनांत मिळते. १७३३नंतरची, म्हणजे बाजीराव पेशवे आणि प्रतिनिधी यांनी रायगड घेतल्यानंतरची माहिती अस्सल कागदांसकट ‘रायगडावरील शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची आणि इतर व्यवस्था' या शं.ना. जोशी यांनी पेशवे दप्तर चाळून एकत्र केलेल्या पुस्तकात आपल्याला मिळते. 'रायगडची जीवनकथा' या आवळसकरांच्या पुस्तकात पोलादपूरच्या चित्रे शकावलीतली एक नोंद आणि सिद्दीच्या काळातली एक व्यवस्था याचे टिपण आहे. या व्यतिरिक्त रायगडावर १६८९ ते १७३३ या प्रदीर्घ काळात काय झाले हे आपल्याला काही माहीत नाही.

२.

जपे स्पर्शाचं पावित्र्य
असा सोवळा पाऊस
बांध आतुर थेंबांना
धुकं बनला पाऊस

मन इतकं आतुर
झाले विचार फितूर
धुकं धुकं नजरेला
पार क्षितिजापातूर

३.

'मराठी माणूस नाटकवेडा आहे' आणि 'संगीत नाटके हा मराठी रंगभूमीचा देदीप्यमान इतिहास आहे' वगैरे वाक्यं आता झिजून गुळगुळीत झाली. Cliches are there for a reason या न्यायाने त्यात तथ्य आहेच. पण संगीत नाटक हा धंदा होता, त्यावर बालगंधर्व या नटापासून ते जनार्दन नारो शिंगणापूरकर या (काल्पनिक) बोलटापर्यंत अनेकांची चूल पेटत होती, ही जाणीवही असणं गरजेचं आहे. मराठी संगीत नाटकाच्या ‘धंद्यावर’ नेमका झोत टाकणारं सुघड असं लेखन (माझ्या तरी) पाहण्यात नाही. कच्चा माल भरपूर आहे : अनेकांनी आपल्या आठवणी, आत्मचरित्रं लिहून ठेवली आहेत, त्या काळची वर्तमानपत्रं (बर्‍याच अंशी) सुस्थितीत आहेत, काही पत्रव्यवहार आहे, समीक्षाग्रंथ आहेत. योजकत्व घेणारा कोणी पाहिजे.

मिपा श्रीगणेश लेखमाला २०१९

श्रीगणेश लेखमाला

प्रतिक्रिया

स्वातंत्र्यदिनाच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा!

आली का लेटेस्ट झलक?
लेखांश भारीयेत! लेखमालिका प्रकाशित व्हायची वाट पाहते. :)

ज्योति अळवणी's picture

15 Aug 2019 - 5:55 pm | ज्योति अळवणी

ओळखता आलं नाही तरी उत्सुकता वाढते आहे हं

जालिम लोशन's picture

15 Aug 2019 - 5:58 pm | जालिम लोशन

अजुन येवुद्या.

पद्मावति's picture

15 Aug 2019 - 6:02 pm | पद्मावति

मस्तंच.

एखाद्या रिकाम्या चित्रफलकावर चित्रकर्त्याने हलके हलके रंग भरावेत आणि बघता बघता चित्रफलकाचा नूरच बदलून जावा!

हे खुप आवडलं.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Aug 2019 - 8:38 am | ज्ञानोबाचे पैजार

ही झलक आवडली
क्र. १ वल्लीदा किंवा मनो?
पैजारबुवा,

खिलजि's picture

16 Aug 2019 - 4:27 pm | खिलजि

१ दुर्गविहारी

२ मिसळलेला काव्यप्रेमी

दुर्गविहारी's picture

16 Aug 2019 - 4:57 pm | दुर्गविहारी

मी धागा लिहीलेला आहे, पण वरील लिखाण माझे नाही.
माझा धागा येतो का बघू. ;-)

जॉनविक्क's picture

16 Aug 2019 - 4:56 pm | जॉनविक्क

1 प्रचेतस
2 पाभे अथवा खिलजी
3 गवि

यशोधरा's picture

17 Aug 2019 - 10:09 am | यशोधरा

काही जण अभ्यासाला लागलेले दिसतात हं!

तुषार काळभोर's picture

17 Aug 2019 - 12:10 pm | तुषार काळभोर

यावेळी अगदी हटके लेखांची झलक आहे.

यंदाची श्रीगणेश लेखमाला दैदीप्यमान असणार यात शंका नाही!

फारएन्ड's picture

18 Aug 2019 - 5:10 am | फारएन्ड

तिसर्‍या लेखाबद्दल विशेषतः उत्सुकता आहे. पुलंच्या 'बोलट' चा उल्लेख आणि "योजकस्तत्र दुर्लभः" ची आठवण करून देणारा योजक शब्दाचा अत्यंत चपखल वापर - जबरी.

नाखु's picture

18 Aug 2019 - 8:30 am | नाखु

वल्ली किंवा दुर्गविहारी

दुसरी अनंतयात्री अथवा शिवकन्या

तिसरे समजलेच नाही

वाचकांची पत्रेवाला नाखु

अनिंद्य's picture

20 Aug 2019 - 3:58 pm | अनिंद्य

लेखमाला कधी प्रकाशित होणार आहे ?

गणेशोत्सवामध्ये लेखमालिका प्रकाशित होते.