समाजात अनेक जण विविध क्षेत्रांत पारंगत असतात. त्यातले काहीजण त्यांच्या कामात चांगले यश मिळवतात. त्यानुसार त्यांची दखल विविध माध्यमांतून घेतली जाते. गौरव, सत्कार, पुरस्कार अशा अनेक प्रकारे त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. त्यामुळे या व्यक्तींना एक वलय प्राप्त होते.
आता थोडे सामान्य पातळीवर येऊ. आपल्या रोजच्या पाहण्यातही काहीजण आपला कामधंदा सोडून अन्य क्षेत्रांत झोकून काम करत असतात. त्यातले काहीजण तर त्या कामातून कुठलाही आर्थिक वा अन्य लाभ मिळत नसतानाही ते मन लावून करीत असतात. अशा कार्याला कुणी समाजसेवा म्हणेल तर कुणी 'लष्कराच्या भाकऱ्या' म्हणेल.
अशा अनेकांचे कार्य खरोखर समाजोपयोगी असते. तरीसुद्धा त्याबद्दल त्यांच्या वाट्याला जाहीर आदरसत्कार वगैरे येत नाही. अर्थात त्यांना त्याचे काही सोयरसुतक नसते. केवळ निष्ठेने ते काम करीत असतात. आपल्याही परिचयाच्या अशा व्यक्ती नक्की असतील. या धाग्यावर आपण त्यांची थोडक्यात माहिती लिहावी असे मी आवाहन करतो. लिहिताना असे लोक निवडा की त्यांची कधी जाहीर दखल घेतली जात नाही. थोडक्यात ते तुमच्याआमच्यातलेच आहेत पण काहीतरी विशेष करताहेत, अगदी निस्वार्थी भावनेने. कामाचे स्वरूप कितीही 'लहान' भासले तरी त्यातून होणारा सामाजिक लाभ लक्षात घ्यावा.
या प्रकारच्या संकलनातून आपल्यालाही काही प्रेरणा मिळावी हा या आवाहनाचा हेतू. नमुन्यादाखल मी एका उदाहरणाने सुरवात करतो.
…….
यवतमाळ येथील प्रा. अनंत पांडे यांचा हा पहा अनोखा उपक्रम ! ते सार्वजनिक वीज-बचतीचे खूप छान काम करतात. दरवर्षी जून महिन्यात तेथे पहाटे ५ लाच लख्ख उजेड असतो. पण, रस्त्यावरील दिवे मात्र सकाळी ७ पर्यंत चालू असायचे. त्यांना ही उधळपट्टी पाहवेना. त्यांनी सरकारी लोकांकडून त्या दिव्यांची खांबावरील सर्व बटणे माहित करून घेतली. आता ते ५ ला व्यायामाला सायकलने बाहेर पडताना ते सर्व दिवे बंद करत जातात. या महिन्यातही अजून दिवस मोठाच असल्याने त्यांचे काम चालू आहे. गेल्या १० वर्षांपासून ते हे काम नेटाने करताहेत.
आता त्यांच्या या कामावर सरकारी बाबू पण खूश कारण परस्पर काम होतंय ना !
पांडेंना मनापासून सलाम !
….
तर मग येउद्यात अशी अनेक उदाहरणे.
धन्यवाद !
प्रतिक्रिया
24 Jul 2019 - 12:46 pm | ज्ञानोबाचे पैजार
अनंत पांडे खरेच चांगले काम करत आहेत.
त्यांचे अभिनंदन आणि तुमचे आभार.
पैजारबुवा,
24 Jul 2019 - 12:52 pm | vcdatrange
#रंगपेटी
मिलिंदकाका पगारे - बहुराष्ट्रीय कंपनीतुन केमिकल इंजिनिअर पदाहुन रिटायर झाल्यावर केवळ हौशेपोटी प्लास्टिक प्रदुषणावर जनजागृती करतायेत. स्वत:च्या खर्चाने प्रोजेक्टर, लॅपटॉप, माईक, स्पिकर घेवुन बोलावतील तिथे जावुन प्लास्टिकचा विधायक वापर, विल्हेवाट पद्घती, घन कचरा व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करतात. शाळा, कॉलेजेस, शासकीय/गैरशासकीय आस्थापनात स्वत: पुढाकार घेवुन हा विषय लोकांच्या पचनी पाडतात. .
गेल्या महिन्याभरापासुन यमराजाचा वेष धारण करुन वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळण्याचा आग्रह धरतायेत. मागच्याच आठवड्यात झी २४ तासने बातमीही केलीय त्यांच्यावर. कालच त्यांचा फोन होता तेव्हा सांगत होते की पुढचे दहा दिवस छत्तीसगड प्रदुषण नियंत्रण मंडळाने शासकीय दौरा ठेवलाय त्यांचा. .
24 Jul 2019 - 1:27 pm | Rajesh188
आपल्या मुळे कोणाला त्रास होवू नये ह्याची काळजी घेणे हे मूळ चांगलं काम आहे .
उपनगरीय गाडी मध्ये काही लोकं मी बघितली .सीएसटी आणि चर्चगेट ही शेवटची स्थानक आहेत तिथे ट्रेन पोचली की सर्व पंखे काही लोक बंद करतात .
आणि हे बघून मलाच लाज वाटली मग मी सुद्धा ट्रेन मधून
उतरताना पंखा बंद करतो .
पावूस असेल तर ज्या खिडक्या ओपन आहेत त्या बंद करतो हेतू सीट पावसात ओल्या होवू नयेत
24 Jul 2019 - 2:31 pm | हेमंतकुमार
कामाचे क्षेत्र कुठलेही असू द्या. उदा. शिक्षण, सेवा, स्वच्छता, आरोग्य, पुनर्वसन…..
येउद्यात असेच परिचय.
28 Jul 2019 - 12:11 am | मुक्त विहारि
तुषार नातू , दारू आणि इतर व्यसने सोडायला मदत करतात.
सागर रेड्डी, अनाथ मुलांना शिक्षण घ्यायला मदत करतात.
दोघांनीही पुस्तके लिहिली आहेत..(अनुक्रमे) ...नशायात्रा आणि सागर रेड्डी. ...नाम तो सुना होगा, दोघेही फेसबुकवर आहेत.
तुषार नातू लगेच रिप्लाय देतात....
28 Jul 2019 - 12:26 am | Rajesh188
मुंबई मध्ये मलबार हील ला एक व्यक्ती मी रोज बघतो .
श्रीमंत व्यक्ती नक्की असेल .
रोज सर्व गरीब लोकांसाठी नाष्टा,फळ,आणि चहा हे सर्व अत्यंत प्रेमाने पुरवते .
वागण्यात कोणताच गर्व नाही अगदी आग्रह करून सर्व वाट सरूना सेवा देते .
हो आणि रोज कितीही लोक असुध्यात .
त्यानंतर त्या सर्व परिसरात फिरून कुत्र्यांनी जी विष्टा केलेली असते ती स्वतः ती व्यक्ती उचलते.
एकदा तर मी त्या व्यक्तीला bmc कर्मचाऱ्यांना मदत करताना सुद्धा bagital आहे .
28 Jul 2019 - 8:09 am | हेमंतकुमार
छान उदाहरणे, धन्यवाद !
29 Jul 2019 - 2:45 pm | जगप्रवासी
रोज ट्रेन मधून कार्यालयात जाताना प्रथम दर्जाच्या डब्ब्यात एक प्रोफेसर "विद्या दानं, श्रेष्ठ दानं" म्हणत पैसे मागताना दिसायचे. आणि पैसे मागताना ना लाज ना संकोच, वर्तमानपत्रात आलेले त्यांच्यावरचे लेख देखील दाखवायचे. बऱ्याच वर्तमानपत्रांनी त्यांची दखल घेऊन लेख लिहिले आहेत. त्यांचं नाव आहे संदीप देसाई.
29 Jul 2019 - 3:21 pm | हेमंतकुमार
नक्की समाजकार्य कोणाचे आहे ते समजले नाही. जरा स्पष्ट करणार का ?
29 Jul 2019 - 3:44 pm | जगप्रवासी
प्राध्यापक संदीप देसाई हे ट्रेनमध्ये एका हातात ऍक्रेलिकचा पारदर्शक डब्बा आणि दुसऱ्या हातात वर्तमानपत्रातील त्यांच्यावरचे लेख दाखवत पैसे मागतात. त्या पैशांतून त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा महाराष्ट्र, गुजरात आणि बिहार मध्ये चालू केल्या आहेत. ट्रेन मध्ये असे पैसे मागण्यावरून त्यांच्यावर केस देखील दाखल झाली आहे. हि माहिती खालील लिंक वर वाचू शकता. जेव्हा जेव्हा हे ट्रेन मध्ये भेटले तेव्हा तेव्हा त्यांच्या सोबत गप्पा मारल्यात, त्यांची कार्याची माहिती घेतली आणि माझ्या परीने नेहमीच त्यांना थोडेसे पैसे दिले आहेत.
https://www.thebetterindia.com/121081/mumbai-professor-sandeep-desai-shl...
29 Jul 2019 - 5:01 pm | हेमंतकुमार
आता समजले.
31 Jul 2019 - 6:49 pm | हेमंतकुमार
पुण्यातील सदाशिव मालशे (उर्फ हरिओम) यांचा हा उपक्रम :
बऱ्याच जणांना चांगल्या कामासाठी व्यक्ती/संस्था यांना देणगी द्यायची असते. पण ज्यांना आपण देणगी देणार आहोत त्याचा पुढे विनियोग योग्य प्रकारे होईल का, अशी धास्तीही असते. मालशे यांचेकडे विश्वासार्ह अशा संस्थांची /व्यक्तींची यादी आहे. जर आपण त्यापैकी एखादी निवडली तर देणगीचा धनादेश ते स्वतः संबंधित ठिकाणी पोचवतात. अर्थातच ते हे काम विनामूल्य आणि आवडीने करतात.
1 Aug 2019 - 3:33 pm | सुधीर कांदळकर
रा. ठाणे. पिशवींत पांच पेनें आणि पांच कंपासपेट्या असतात. ठाण्याच्या नाखवा हायस्कूलची इमारत रस्त्याला खेटून आहे. तिथे उभे असतात. परीक्षार्थींना मदत द्यायच्या उद्देशाने. कोण परीक्षार्थी विसरून आलाच तर त्याला द्यायला. दोन उदाहरणे देतो:
रस्त्यालगतच्या वर्गांत काय चाललें आहे तें रस्त्यावर ऐकूं येतें. एकदां रस्त्यानें जातांना घरीं जातांना सरांना वर्गांतून मोठ्यानें दरडावण्याचा आवाज आला. सरांनी सहज डोकावून पाहिलें. एक परीक्षार्थी प्रवेशिका अर्थात हॉल तिकीट घरीं विसरून आला होता. पर्यवेक्षक त्याला दमांत घेत होते. केंद्रप्रमुखांना भेटून, आपलें सामाजिक वजन वापरून लगेच सरांनी शाळेचा शिपाई घेऊन त्या परीक्षार्थीच्या घरीं जाऊन प्रवेशिका आणून दिली.
एक साठपासष्टीची गरीब, निरक्षर महिला उभी. परीक्षा सुरुं झाल्याचा टोला पडला आणि या महिलेचा बांध फुटला. तिला रडूं आवरेना. तिच्याजवळ जाऊन तिला त्यांनीं विचारलें कीं काय झालें. तिचा मूकबधिर नातू परीक्षा द्यायला गेला होता. त्याला पर्यवेक्षकांच्या सूचना, वेळ देणार्या घंटेचा आवाज ऐकूं येणार नाहीं. म्हणून ती चिंताग्रस्त. तिला घेऊन ते शाळेंत गेले. केंद्रप्रमुखांना भेटले. ते सरांना ओळखत होते. त्यांना परिस्थिति कथन केली आणि त्या मूकबधिर मुलाला पर्यवेक्षकांनी तसेंच आजूबाजूच्या परीक्षार्थींनीं योग्य ती मदत दिली. नातू उत्तीर्ण झाल्यावर ती आवर्जून सरांच्या पाया पडायला घेऊन आली.
31 Aug 2019 - 7:03 pm | सुबोध खरे
आमची आई ( मुख्याध्यापिका होती) दर वर्षी एस एस सी च्या पहिल्या परीक्षेला आवर्जून स्वतः हजर राहत असे. कारण हमखास एखादा विद्यार्थी आपले हॉल तिकीट विसरून येत असे. मग आई स्वतःच्या जबाबदारीवर पर्यवेक्षकांना विनंती करून त्या मुलाला परीक्षेला बसू देत असे आणि शाळेच्या चपराशाला त्या मुलाच्या घरी पाठवून त्याचे हॉल तिकीट मागवून घेत असे.
याशिवाय ज्या विषयाची परीक्षा असे त्या विषयाच्या शिक्षकांना त्या दिवशी परीक्षा केंद्रात पाठवत असे. कारण शाळांत परीक्षा मंडळाची एखाद्या प्रश्नात गडबड झाली तर त्या विषयाचे शिक्षक शाळेतीलच नव्हे तर केंद्रात हजर असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नांची उकल करून देऊ शकत असत.
आज आई निवृत्त होऊन १७ वर्षे झाली तरी कुठून कुठून विद्यार्थी तिला व्हॉट्स ऍप किंवा फोन वर धन्यवाद देताना आढळतात.
31 Aug 2019 - 8:36 pm | हेमंतकुमार
शिक्षणक्षेत्रातील वरील दोन्ही उदाहरणे चांगली व अनुकरणीय आहेत.
धन्यवाद !
28 Aug 2019 - 12:27 pm | हेमंतकुमार
पण एक असामान्य कृती केलेल्या स्त्रीचा परिचय या स्वतंत्र धाग्यावर :
https://misalpav.com/node/45166
28 Aug 2019 - 11:29 pm | मायमराठी
मुंबई व लोकल सोडून खूप वर्षे झाली. लख्ख लक्षात अनेक राहिलेल्या माणसांमध्ये एक अनोळखी व्यक्ती मनांत कोरली गेली आहे. शेवटच्या लोकलने डोंबिवलीपर्यंत येताना ती शक्यतो ठाण्याला डब्यात चढायची. पांढरा झब्बालेंगा, दोन्ही हातात दोन मोठ्या कापडी पिशव्या. रापलेला वर्ण, केस साथ सोडत आलेले, कमालीचं जादुई स्मित झळकणारा प्रेमळ चेहरा, वय पन्नाशीच्या घरात. पिशव्यांमध्ये पाण्याच्या बाटल्या, खिशांत औषधाच्या गोळ्या ( डोकेदुखी, सर्दी,ताप वगैरे वगैरे) . अदबीने, विनयाने सर्वांना प्रेमाने विचारणार," किसी मेरे भाई को पानी चाहिए, ये लो पानी, पीओ और आरामसे ओ जाओ । किसी को दवा चाहिए? ..."
समजा पाणी संपलं तर ओशाळून तो नाही सांगायचा व उद्या नक्की देईन असं वचन देऊन पुढच्या डब्यात औषध।विचारायला जायचा. हे सर्व वाटावाटी बरं का. विकणं नव्हे. आणि हो ...तो बिस्लेरी चा जमाना नव्हता, नुकतंच ते फॅड येऊ घातलं होतं. त्याच्याबद्दल नेमकी माहिती मिळालीच नाही. एक मात्र नक्की रात्री एक दीडच्या सुमारास थकलेली, पिचलेली मनं व शरीरं घेऊन घराकडे निघालेली आम्ही माणसं त्या दूतासमोर सगळं सगळं विसरायचो आणि त्याच्या पुढे पुढे जाणाऱ्या परोपकारी देहाकडे एक टक बघत रहायचो. त्याच्याकडून पाणी वा गोळी घेवो ना घेवो पण फुकटची पण खूप महाग अशी कृतज्ञता नक्की उरांत घेऊन जायचो.
29 Aug 2019 - 7:00 am | हेमंतकुमार
>>> +११११
31 Aug 2019 - 11:07 am | जॉनविक्क
5 Sep 2019 - 8:39 am | सुधीर कांदळकर
झाली. श्री व सौ. मेहता. आमची ओळख नाही. मी यांना एकदाच भेटलो आहे. यांच्या एकुलत्या एका कन्येने काही वर्षांपूर्वी ९वीच्या परीक्षेत गुण स्वतःच्या अपेक्षेपेक्षा कमी मिळाले म्हणून आत्महत्त्या केली होती. घाऊक बाजारात त्यांचे दुकान आहे. आता दुकान भाड्याने देऊन स्वतःचा व्यवसाय पूर्णपणे बंद करून समाजसेवा करतात. कुठेही आत्महत्त्येचा प्रयत्न झाला की हे जोडपे त्यांच्या घरी जाऊन घरच्यांचे आणि प्रयत्न करणारा/री जिवंत असेल तर त्याचे/तिचे समुपदेशन करतात.
आत्महत्त्या करणार्या व्यक्तींचे अगोदर वागणे बदलते. नंतर त्या व्यक्ती अध्यात्म वा तत्वज्ञानावर सूचक बोलू लागतात. ही धोक्याची घंटा निकटवर्तियांनी, परिचितांनी ओळखावी आणि आत्महत्त्या टाळाव्यात म्हणून ते सभा घेऊन समाजजागृती देखील करतात. त्यांच्या या कार्याचे मोल करतां येणार नाही.
5 Sep 2019 - 9:33 am | हेमंतकुमार
त्यांना मनापासून प्रणाम ! मोलाचे कार्य.
5 Sep 2019 - 9:36 am | हेमंतकुमार
त्यांना मनापासून प्रणाम ! मोलाचे कार्य.