२०१७ चा हा चित्रपट हिंदीतून बघावयास मिळाला.
सात वर्षाची मुलगी मेरी आणि तिचा मामा फ्रँक यांची ही कथा आहे.
तशीच मेरीची आजी (आईची आई) एव्हलीन , आणि मृत आई डायान यांची ही कथा आहे.
सात वर्षाची ही गोड मुलगी आपल्या मामासोबत राहते आहे. सुमारे सहा-साडेसहा वर्षापुर्वी डायानने फ्रँककडे सोपवत स्वतःला संपवले होते.
मामा , एक बोका आणि शेजारी राहणारी घरमालकीण रोबर्टा हे तिचं विश्व आहे. मेरी तिच्या वयाच्या मुलांपेक्षा खूप वेगळी आहे कारण तिची बुद्धीमत्ता असामान्य आहे. समवयस्क मुले तिला मंद-पकावू वाटतात. त्यामुळे शाळेत जाण्यास ती उत्सुक नाही. तर शाळेत जाण्या आधीच तिचा गणिताचा खूप सारा अभ्यास झालाय.. मोठ मोठी पुस्तकं तिनं वाचली आहेत आणि याच अर्थानं ती 'गिफ्टेड' आहे.
फ्रँकला मात्र मेरीला सामान्य जीवन द्यायचे आहे, तिला सामान्य मुलांप्रमाणे मित्र-मैत्रिणी असाव्यात एक भावविश्व असावं असा त्याचा आग्रह आहे , प्रयत्न आहे आणि हा त्याचा प्रयत्न अनेक प्रसंगातून दिसून येतो. शिवाय डायानचीही आपल्या मुलीबद्दल हीच इच्छा होती याचीही त्याला जाणीव होती.
पण मेरीची असामान्य बुद्धीमत्ता ही तिला वारशाने मिळाली आहे.. आई आणि आजीकडून.. जेव्हा तिची ही असामान्य बुद्धीमत्ता जगासमोर येते तेव्हा आजी एव्हिलीन तिला स्वतःकडे ठेवण्यास उत्सुक होते. त्याकरिता ती फ्रँककडे आग्रह धरते पण तो बधत नाही तेव्हा ती कोर्टाची पायरी चढते.
आई , बहीण आणि भाची यांच्या तुलनेने सामान्य कुवतीचा फ्रँक एक सामान्य आयुष्य जगत असतो. पण भाचीवरचे प्रेम, बहिणीला समजून घेत तिच्या इच्छेचा आदर या कारणांनी तो संयमाने कोर्टकेस लढवतो. तसेच मेरीलाही मामाला सोडून कुठे जायचे नाहीये,
पण दूसरीकडे अतिश्रीमंत अशा एव्हेलिनचे पारडे जड आहे असे वाटू लागते त्यावेळी फ्रँकच्या वकीलामार्फत एका वेगळ्याच तडजोडीचा प्रस्ताव येतो. नाईलाजाने फ्रँक हा प्रस्ताव स्वीकारतो. मात्र काही काळातच त्याला आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येते. त्यावेळी मग चिडून फ्रँक अशी गोष्ट करतो जी मृत डायानच्या इच्छेविरुद्ध आहे. पण मेरीला एव्हिलीनकडून सोडवून आणण्याकरिता ते करणं त्याला भाग पडतं कारण एव्हिलीन ही एक अत्यंत महत्वाकांक्षी स्त्री आहे आणि आपली नात मेरी हिच्यापेक्षा तिला असामान्य बुद्धीमत्तेची मेरीच फक्त दिसते आहे. या मेरीच्याकडून डायानकडून अपुर्ण राहिलेले गणितातले एक मोठे काम (काहीतरी जागतिक दर्जाचे प्रश्न आहे .. ज्याचा अर्थ माझ्या सारख्या अल्पबुद्धीच्या प्रेक्षकाला कळणे शक्य नाही .. तर ते असो) पुर्ण व्हावे याकरिताच तिचा सगळा खटाटोप आहे. हे घडूपर्यंत ती शांत बसणार नाही हे समजल्याने फ्रँक एक रहस्य उघड करतो. त्याचवेळी एव्हिलीन आणि डायानच्या नात्याची अतिशय नकारात्मक बाजू समोर येते. एव्हिलीन भावूक होते पण काही क्षणांपुरतीच.. तिला जे हवं ते तिला मिळालेलं असतं.. इकडे मामा-भाची पुन्हा एकत्र येतात.. शेवट गोड होतो.
मेरीचे पात्र .. मेरी आणि फ्रँक यांच्यातील घट्ट भावबंध ही चित्रपटाची बलस्थाने आहेत.
या चित्रपटात डायानचे पात्र कुठेही दिसत नाही पण ते अतिशय महत्वाचे आहे. एव्हिलीन आणि फ्रँक यांच्यातिल संवादातून कोर्टकेसच्या दरम्यान डायान प्रेक्षकांना समजते.. आणि बहीण भावातले अनोखे बंध समोर येतात..
अतिशय महत्वकांक्षी आणि व्याहवारिक वृत्तीची एव्हिलीन, प्रखर बुद्धीमत्तेची पण भावूक आणि भावविश्व उध्वस्त झालेली डायान , संयंमी व समंजस , प्रेमळ पण ठाम असा फ्रँक , डायान व मेरीबद्दल बेफिकीर असणारा मेरीचा पिता , मेरीला अतिशय जीव लावणारी , तिची काळजी करणारी रॉबर्टा आणि सर्वात महत्वाची --आपण विलक्षण हुशार आहोत याची जाणीव झालेली पण फ्रँकच्या सुचनांचा आदर करणारी , गोड पोरगी मेरी अशी सगळी पात्रे ठळकपणे रेखाटली आहेत.
मनाला स्पर्शणारा असा एक सुंदर चित्रपट आपल्यापैकी अनेकांना आवडू शकेल असे वाटते.
प्रतिक्रिया
29 Apr 2019 - 8:15 am | भंकस बाबा
हा चित्रपट मी पाहिला आहे. चाकोरिबाहेरचे पाहायला ज्याना आवडते त्यांच्यासाठी हा चित्रपट पर्वणी ठरू शकतो.
29 Apr 2019 - 8:18 am | कुमार१
छान परिचय.
29 Apr 2019 - 8:33 am | अभ्या..
प्लॉट तर सुरेख वाटतोय, बघायलाच हवा एकदा निवांत.
-गिफ्टेड
29 Apr 2019 - 11:21 am | एमी
छान ओळख. चित्रपट बघावासा वाटतोय.
29 Apr 2019 - 11:49 am | अन्या बुद्धे
बघितलाय.. फारफार सुंदर सिनेमा
30 Apr 2019 - 4:32 pm | सस्नेह
कथा बांधेसूद वाटते. चित्रपट संधी मिळाल्यावर पाहणार हे नक्की.
30 Apr 2019 - 4:40 pm | मराठी कथालेखक
torrentcounter या साईटवर torrent मिळेल.. seeds कमी आहेत, download खूप बेभरवशाचे आहे..माझ्याकडे अनेक दिवसांनी पुर्ण झाले.. तुम्हाला seeds मिळत नसतील तर मला सांगा मी seed करेन.
30 Apr 2019 - 4:48 pm | mrcoolguynice
अश्या, चाकोरीबाहेरील सुंदर चित्रपटाचे, परीक्षण केले म्हणून धागालेखकास १+