धर्म, विज्ञान आणि दुय्यम सत्ये

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जनातलं, मनातलं
26 Apr 2019 - 12:28 pm

आजचा विषय मांडणं (किमान माझ्यासाठी तरी) गुंतागुंतीचं आहे सो हे लिखाण गोंधळाचं वाटू शकेल. समजून घ्या.

शिक्षित समाजाकडून 'धर्म' ही टाकाऊ गोष्ट आहे. विज्ञान हाच आजचा धर्म आहे.' या अर्थाची विधानं केलेली पहायला मिळतात. माझ्या मते हे विज्ञानाच्या मर्यादांंकडे कानाडोळा केल्याने आणि धर्माची मूलभूत गरज लक्षात न घेतल्याने होत आहे. (इथे कोणताही विशिष्ट धर्म अभिप्रेत नाही. धर्म ही संकल्पना असं म्हणायचं आहे.) असं मला का वाटतं याकडे नन्तर येतो. आधी अन्य काही गोष्टींचा विचार करू.

आपलं विचारविश्व पाश्चात्त्याकडून उसनं घेतलेलं असल्याने आणि ऐहिक सोयीसाठी राबवायची गोष्ट मानल्याने कदाचित, परफेक्ट सायन्सेसना (भौतिक, रसायन, जीव) आणि वाणिज्य शाखेला, मानव्यशास्त्रांंपेक्षा (फिलॉसॉफी, सायकॉलॉजी, भाषा) जास्त मान (कृतीतून दिसणारा) आहे. त्यामुळे शिक्षित लोकांमध्ये 'विज्ञान हाच आजचा धर्म' मानणारे अधिक. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांना ऑब्जेक्टिव्ह उत्तरं देणं हे शास्त्राचं काम आहे आणि सब्जेक्टिव्ह प्रश्नांना दिशादर्शक उत्तरं देणं हे मानव्यशास्त्राचं काम आहे.

आता आपण जो मुद्दा अर्धवट सोडून दिलाय तिकडे परत येऊ. विज्ञान आपल्याला बंदूक कशी चालते? क्ष जाडीची य वस्तू भेदायला किती वेगाने गोळी जायला हवी? नेम कसा धरतात? वगैरे प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल, नव्हे देतेच. पण मी बंदूक चालवावी का? कोणत्या कारणाने चालवावी? कोणत्या परिस्थितीत चालवावी? ते कधी चूक किंवा बरोबर ठरेल? या प्रश्नासाठी विज्ञानाकडे उत्तरं नाहीत. ही विज्ञानाची मर्यादा आहे. जगताना माणसाला जितकी पहिल्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात तितकीच, किंबहुना अधिक या दुसऱ्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात. जी, चूकीची वा बरोबर, विज्ञान देऊच शकत नाही, जी धर्म देतो, म्हणून माणसाला धर्माची गरज असते.

ती योग्य उत्तरं जिथून मिळतील तिथून मिळवली पाहिजेत. मग ती मानव्यशास्त्र असतील किंवा धर्मग्रन्थ.

तत्कालीन गरज (कालबाह्यता), इतक्यावर्षांचा प्रभाव, काळाच्या ओघात त्यात मिसळलेल्या हीन गोष्टींनी घेतलेलं पवित्र रूप, दांभिकता वगैरे गोष्टी लक्षात घेऊन त्यांची वारंवार मशागत व्हायला हवी. आणि ते होण्यासाठी मानव्यशास्त्रांचं महत्व समाजाला पटून तसा मान समाजाकडून मिळायला हवा. विज्ञान ही amoral बाब आहे. चांगलं वा वाईट दोन्ही नाही. Its just a tool. बिचारं विज्ञान जे करूच शकत नाही ती जबाबदारी त्यावर टाकणे आणि जे ते करू शकतं त्या धर्माला रद्दबातल ठरवणे हे दोन्ही त्यासाठी टाळायला हवं. अर्थात धर्माला देखील अद्ययावत होणं, मिसळलेल्या कुप्रथा सोडून देणं, कालबाह्य गोष्टी फक्त इतिहासाच्या पुस्तकात उरतील हे पाहणं वगैरे जबाबदाऱ्या उचलाव्या लागतील.

प्राणिसृष्टीच्या शीर्षस्थानी माणूस आहे. तुलनेने गाठलेला प्रगतीचा पल्ला 'तुलनाच नाही' इतका मोठा आहे. याची कारणं तपासताना असं लक्षात येतं की विकसित मेंदूमुळे आलेली निसर्गाचे नियम समजून घेणं आणि त्याचा वापर आपल्या सुखासाठी फायद्यासाठी करून घ्यायची माणसाची क्षमता (विज्ञान) हे तर निर्विवादच आहे पण जोडीने अजून एक क्षमता आहे जी अन्य प्राण्यात नाही. ती क्षमता म्हणजे निसर्ग नियमासोबतच स्वयंभू असे स्वतःचे नियम घडवणं, आणि एकत्रित विश्वास आणि व्यवहाराच्या माध्यमातून, ज्याला आपण 'दुय्यम सत्य' म्हणू, अशाप्रकारची सत्य जन्माला घालणं आणि जोपासणं.

दुय्यम सत्यांंचा प्रभाव आणि कार्यक्षेत्र पाहता अचंबित व्हायला होतं. विशिष्ट प्रकारच्या उच्चारांची मालिका करून शब्द, वाक्य, भाषा जन्माला घालणं असो, वा विशिष्ट खुणांना अक्षरं म्हणून लिपी तयार करणं असो. कुटुंब, गाव, राज्य, प्रदेश वगैरे संकल्पना व त्या अनुशंगाने निष्ठा तयार करणं असो वा चामड्याच्या/कागदाच्या तुकड्यांना विशिष्ट प्रकारे मूल्य देऊन चलन निर्माण करणं असो. एक सामान्य चिंपांझी आणि एक सामान्य माणूस यांच्या मारामारीचा निकाल काय लागेल याचा विचार देखील करायला नको. निर्विवाद विजय चिंपांझी. पण तसंच 100 चिंपांझी आणि 100 माणसं यांच्या लढाईत निर्णय काय होईल याचाही विचार करायची गरज नाही.. कारण भाषा, संघ सारखी दुय्यम सत्य वापरून माणूस वरचढ ठरेल.

भाषा, लिपी, लोकशाही, चलन, स्वातंत्र्य ही सारी माणसाने जन्माला घातलेल्या दुय्यम सत्याची उदाहरणं आहेत. आज जर एखाद्या माकडाने दुसऱ्या माकडाला झाडाच्या सालीचा तुकडा दिला आणि त्याच्याकडची केळी मागितली तर 'वेडा आहे का मी? या सालीच्या तुकड्याने काय पोट भरणार का? निसर्गाच्या नियमाने याला काडीची किंमत नाही. मी काय माणूस आहे सालीचा तुकडा घेऊन केळी द्यायला?' असं काहीतरी उत्तर मिळेल.

सांगायचा मुद्दा असा की अशी दुय्यम सत्य जन्माला घालणं हे माणसाचं बलस्थान आहे. कुठलीही संकल्पना 'ती विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारी नाही' या कारणाने नाकारणे ही मोठी चूक ठरेल. दुय्यम सत्य गरज आणि उपयुक्तता या सारख्या निकषावर स्वीकारली/नाकारली/बदलली जायला हवी. विज्ञानाचे निकष लावूनच संकल्पना स्विकारायच्या ही मानसिकता म्हणजे फक्त माणसालाच मिळालेलं हे वरदान विवेक न वापरता स्वतःहून त्यागण्यासारखं आहे.

--अनुप

धर्मविज्ञान

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

26 Apr 2019 - 3:06 pm | आनन्दा

तुम्ही लिहिताय छान!

Rajesh188's picture

26 Apr 2019 - 3:39 pm | Rajesh188

तुमचे लिखाण समतोल आहे .
विज्ञान आणि धर्म ह्यात कोणालाच कमी न लेखता योग्य समतोल राखला आहे .
पूर्वग्रह दूषित लिखाणाच्या मानाने तुमचे लेखन उत्तम आहे

जालिम लोशन's picture

26 Apr 2019 - 3:46 pm | जालिम लोशन

अत्युत्तम

मराठी कथालेखक's picture

26 Apr 2019 - 3:47 pm | मराठी कथालेखक

पण मी बंदूक चालवावी का? कोणत्या कारणाने चालवावी? कोणत्या परिस्थितीत चालवावी? ते कधी चूक किंवा बरोबर ठरेल?

या उत्तरांकरता न्यायव्यवस्था आहे, घटना आणि कायदे आहेत, नियमावली आहे.
विज्ञान राज्यघटना व कायदे हाच आजचा धर्म आहे.
असो. एकंदरीत विविध मुद्यांच्या अनुषंगाने धर्माचा आढावा घेणं गरजेचं वाटतं. या विषयात एक स्वतंत्र लेख लिहिण्याचा विचार माझ्या मनात आहे पण आळशीपणा आड येतो :)

गामा पैलवान's picture

26 Apr 2019 - 7:31 pm | गामा पैलवान

मराठी कथालेखक,

धर्म म्हणजे कर्तव्य व मर्यादांचा सुसंगत संगम. कायदे वा राज्यघटना हे कर्तव्याची आंतरिक जाणीव कधीच जोपासू शकणार नाहीत. त्याकरिता प्रबोधनाचा मार्ग अनुसरावा लागतो. त्यामुळे धर्म हा नेहमी प्रबोधनस्वरूपच राहील.

आ.न.,
-गा.पै.

मराठी कथालेखक's picture

26 Apr 2019 - 7:59 pm | मराठी कथालेखक

काही प्रमाणात मान्य... म्हणजे धर्म हा दिशादर्शनाचे काम करतो किंवा त्याने तसे करणे अपेक्षित आहेच. "मी कोण आहे , मला काय करायचे आहे, काय नाही करायचे" ई प्रश्नांत धर्माने मार्गदर्शन करणे वा धर्माचे मार्गदर्शन अनुसरणे अपेक्षित आहे. पण हे मार्गदर्शन घेण्याचे प्र्माण हळूहळू कमी होत जाणार ...
हे थोडक्यात लिहिलंय.. पुन्हा विस्ताराने लिहीन.

राज्यघटनेचा संबंध फक्त शासन व्यवस्था कशी असावी इथपर्यंत च आहे .
पण धर्माचा संबंध जीवन कसे जगावे आणि जगताना कोणती नीतिमूल्ये पाळावीत असा विशाल आहे

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Apr 2019 - 7:34 pm | राजेंद्र मेहेंदळे

एकदम चोक्कस!!

पहिले वस्तुविनिमयाद्वारे व्यवहार करणारे लोक रुपया पैशात व्यवहार करु लागले, मग चेक /डिमांड ड्राफ्ट आले . मग ऑनलाईन ट्रान्स्फर, मग पेटी एम, गुगल पे आणि कहर म्हणजे बिटकॉईन सारख्या दुय्यम,तिय्यम आणि काय काय यम सत्यामुळे तर हजारो लोक भिकेला लागले.

असे म्हणतात की देशात जेव्हढा पैसा असतो त्यातील काही टक्केच चलनाच्या रुपात छापला जातो आणि बाजारात फिरताना दिसतो. पण या सगळ्या दुय्यम सत्यामुळे आता पैसा नक्की कशाला म्हणायचे हेच समजेनासे झालेय.

वामन देशमुख's picture

26 Apr 2019 - 7:50 pm | वामन देशमुख

खूप छान लिहीलंय, एकदम अरूण जोशींची आठवण झाली.

अन्या बुद्धे's picture

26 Apr 2019 - 10:17 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद मंडळी!

मुख्यतः जगाकडे विज्ञानाचा किंवा धर्माचा यापैकी एकच चश्मा लावून बघितलं पाहिजे अशी सक्ती असल्यागत एकांगी विचार होताना दिसतात. विज्ञानाच्या बाबतीत नैसर्गिक सत्याचे आकलन जसे सुधारत जाते तसे शास्त्रात बदल घडणे ओघाने सुरू असते. परंतु धर्म नैसर्गिक सत्य नसल्याने तो वारंवार काल परिस्थिती मानाने बदलावा लागतो. बदलासाठी मानवात असलेलं अंगभूत जडत्व या प्रक्रियेआड येतं. त्रिकालाबाधित मार्गदर्शक तत्व फार कमी असतात. पण म्हणून धर्म मोडीत काढणे चूक वाटते. Throwing away the kid along with dirty water म्हणतात तसली चूक.

टीप: इथे धर्म म्हणजे कोणताही प्रस्थापित धर्म अभिप्रेत नाही. वैज्ञानिक नियमापलीकडली सगळी मार्गदर्शक तत्वे यात अंतर्भूत आहेत. मग ते वेद, झेंद अवेस्ता, राज्यघटना, तत्वज्ञान असं काहीही असेल.. प्रस्थापित धर्माबद्दलच बोलायचं तर तुलनेने सर्वधर्मापैकी त्यातल्यात्यात सहिष्णू आणि बदलाला अनुकूल धर्म बेटर मानावा लागेल.

रविकिरण फडके's picture

26 Apr 2019 - 11:07 pm | रविकिरण फडके

"सो हे लिखाण गोंधळाचं वाटू शकेल."

'त्यामुळे' किंवा 'म्हणून' अशांऐवजी त्याच अर्थाचा 'सो' हा इंग्लिश शब्द वापरून जे धेडगुजरी मराठी आजकाल बोलले/ वापरले जाते ते आपण मिपावर न वापरणे इष्ट (असे मला वाटते).

गामा पैलवान's picture

27 Apr 2019 - 1:25 am | गामा पैलवान

अनुमोदन आहे.
-गा.पै.

अन्या बुद्धे's picture

27 Apr 2019 - 9:59 am | अन्या बुद्धे

नोटेड..
नोंद घेतली आहे.. धन्यवाद!

असंका's picture

27 Apr 2019 - 10:27 am | असंका

:D

गामा पैलवान's picture

27 Apr 2019 - 1:54 am | गामा पैलवान

अन्या बुद्धे,

लेख साधारणत: पटला. फक्त परफेक्ट सायन्स नावाचा काही पदार्थ अस्तित्वात नसतो. कारण की अनिश्चितता हा सृष्टीचा मूलभूत नियम आहे.

असो.

विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यात फरक आहे का? लेखात दोन्ही संज्ञा समानार्थी योजलेल्या वाटताहेत.

आ.न.,
-गा.पै.

अन्या बुद्धे's picture

27 Apr 2019 - 10:01 am | अन्या बुद्धे

विज्ञान म्हणजे absolute science आणि तंत्रज्ञान म्हणजे applied science असं म्हणता येईल.

गामा पैलवान's picture

27 Apr 2019 - 1:54 pm | गामा पैलवान

अन्या बुद्धे,

applied science ( = उपयोजी ज्ञान ) म्हणजे तंत्रज्ञान हे कळतं. पण absolute ( = निरपेक्ष ) ज्ञान म्हणजे नक्की काय? आपल्या ज्या स्थूल धारणा आहेत त्या सूक्ष्म म्हणजे quantum पातळीवर निरर्थक ठरतात. म्हणून माझ्या मते निरपेक्ष ज्ञान इंद्रियांच्या सहाय्याने मिळवता येत नाही.

आ.न.,
-गा.पै.

पण मी बंदूक चालवावी का? कोणत्या कारणाने चालवावी? कोणत्या परिस्थितीत चालवावी? ते कधी चूक किंवा बरोबर ठरेल? या प्रश्नासाठी विज्ञानाकडे उत्तरं नाहीत.

या प्रश्नांची उत्तरे धर्माकडेही नाही. धर्माची संस्थापणा प्रामुख्याने माणूस या सामाजिक प्राण्यास एकमेकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ उपदेश किंवा मार्गदर्शन , किमान मुल्ये असावित या हेतूने केली असावी. विज्ञान हे शास्त्र उपलब्ध आणि नव्याने निर्माण केल्या गेलेल्या किंवा करायच्या रचनेच्या स्पष्टीकरणासाठी आहे.

दुय्यम सत्य जन्माला घालणं हे माणसाचं बलस्थान आहे
जे जन्माला घातल ते सत्यच असत त्यात प्रथम ,दुय्यम अस काही नसते .

लेख आवडला .