प्रसाद आणि वीणा हताश होऊन बसलेले इतकी सगळी तयारी झालेली पत्रिका पण वाटल्या, नातेवाईकांसाठी रुम्स बुक केल्या. लग्न अगदी आठ दिवसांवर आलेलं आणि आता सर्वांना फोन करून सांगायचं येऊ नका लग्न मोडलेय म्हणून! एका सर्वसामान्य कुटुंबाला हा धक्का पचवणं कठीणच होतं. हाच निर्णय घेणे आवश्यक होते पण तरीही मनावर मणभर वजन ठेवल्यासारखं वाटतंय हेच खरं!
तनिष्का एमबीए करून व्यवस्थित सेटल झाली तेव्हा कुठल्याशा वेबसाईटवरच लग्नासाठी नाव नोंदणी केली रितसर! कित्येक महिने मग पटलेली स्थळं शॉर्टलिस्ट करायची आणि त्यावर सल्लामसलत करायची, असा त्या कुटुंबाचा कार्यक्रमच झालेला. एकुलती एक मुलगी शक्यतो गावातच दिली तर बरं हाही विचार होताच. त्यामुळे त्या दृष्टीने नावं काढली जात होती.
"हा बघ, हा बरा वाटतोय का?" वीणा म्हणाली.
"नको का बाई, कित्ती उंच आहे हा? मान मोडून जाईल वरती बघून बघून त्याच्याकडे!"
" चल काहीतरी बोलू नको"
"बर हा बघ, "
"हं बरा आहे ग पण नोकरी खूप छान नाही वाटत!"
"हे बघ, हा तर वाटतोय ना बरा ? तुझ्या तोलामोलाची नोकरी पण आहे नी दिसायला पण बरा आहे म्हणजे , तुझ्या आधी क्रायटेरियात बसणारा आहे."
" ए थट्टा कसली आता कसली करतेस ग ममा, आयुष्याचा जोडीदार निवडायचा म्हणजे थोडी चूझी असायला हव ना?"
"मी कुठे काय म्हणते ?जरा आपली तुझी मस्करी!" दोघी मजेत चर्चा करत होत्या.
अशी दोन-चार स्थळें शेवटी फायनल केली दोघींनी बसून आणि ती प्रसादला दाखवली. त्यातलंच एक हे स्थळ! मुलगा चांगला शिकलेला, नोकरी पण चांगल्या ठिकाणी होती. कौटुंबिक पार्श्वभूमीही उत्तम, वडील कोणत्या तरी खासगी कंपनीत उच्च पदावर होते नोकरीला. आई गृहिणी होती. सगळं कसं चौकटीत बसणारं. छोटं कुटुंब मुलाला एक लग्न झालेली मोठी बहीण होती, तीही अमेरिकेत. त्यामुळे या स्थळाचा विचार अगदी मनात पक्का झाला. म्हणजे यांच्या बाजूने होकार होता आता त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या वेळेनुसार भेटण्याचा कार्यक्रम ठेवायचा होता. त्यांनाही पसंत पडलं तरच पुढची बोलणी!
मग प्रसादने त्यांच्याशी फोनवर बोलून त्यांची वेळ घेतली. भेटी चा कार्यक्रम ठरला त्यांच्याच घरी, त्याप्रमाणे हे तिघे त्यांच्या घरी आले. घरही छान होते त्यांचं. छान मोठ्ठा हॉल, त्याला लागून असलेली बाल्कनी. डाईनिंग, छानसं सुसज्य स्वयंपाकघर. आणि ३ बेडरूम्स. अगदी छान.
थोडावेळ ओळखी वगैरे झाल्यावर तनिष्का आणि तो मुलगा, संकेत दोघं फिरायला जाऊन आले. तास दोन तासाने परतले, दोघेही खुशीत होते. त्यांना दोघांना खुशीत बघून याहि सर्वांच्या डोक्यावरचं ओझं उतरलं. हो असे बघण्याचे ४-२ कार्यक्रम झालेले दोघांचेही. पण हात रिकामेच होते . शेवटी आता ही दोघं एकमेकांना पसंत आहेत म्हटल्यावर सगळेच अगदी रेलॅक्स झाले.
दोन्हीकडचा होकार असल्यामुळे रीतसर सारे सोपस्कार घर पाहणं वगैरे झाले थोड्या दिवसांनी लग्नाची तारीख ठरवली, अर्थात त्यासाठी आधी मंगल कार्यालयं पालथी घातली. कारण आजकाल लग्न त्यांच्या सोयीनुसार करावी लागतात ना! लग्न पहावं करून म्हणतात ते काही उगीच नाही. एक समस्या सोडवली पसंतीची , कि दुसरी कार्यालय पाहण्याची, ते दोन्ही बाजूंना पसंत पडण्याची! तारखा, खरेदी, आमंत्रणं ! तशी तारीख ६-७महिन्यानंतरची निघाली कार्यालयाच्या उपलब्धतेनुसार!
" हेही एक बरंच झालं, कारण तेवढाच वेळ या मुलांनाही मिळेल एकमेकांना ओळखण्याचा, काय बरोबर ना?" संकेतचे बाबा म्हणाले.
"आधीच जरा स्वभावाची ओळख झालेली बरी दोघांना एकमेकांच्या, उगाच त्रास नको नंतर हे खरच!" प्रसादने त्यांचीच री ओढली.
"आणि हो आपल्यालाही सवड मिळेल तयारीला थोडी" इती वीणा .
"अहो नातेवाईकांना सुट्ट्यांसाठी आताच सांगून ठेवायला हवं, आणि लेकीला तर पहिल्यांदा, अमेरिकेतून येणार ती, त्यामुळे तिला व्यवस्थित प्लॅनिंग करता येईल. "संकेताची आई म्हणाली.
"सगळं अगदी छान आहे हो, माणसं घर, मुलगा!" वीणा दिपालीला म्हणजे प्रसादच्या वहिनीला सांगत होती. तसच आईलाही सांगितलं तिने सविस्तर. सगळे अगदी आनंदात होते. विशेषतः वीणाची आई! नातीच लग्न म्हणून!
सहा महिने कसे भराभर गेले. लग्नाची वेळ जवळ येऊन ठेपली संकेत आणि तनिष्का एकमेकाला विकएन्डला भेटत होते. व्हॉट्सऍप वर रोज व्हिडिओ कॉलहि होत होता. कधी कॉफी, कधी डिनर असं शनिवार रविवार चालू असायचं. कारण इतर दिवशी फारसा वेळच मिळायचा नाही दोघांना! एका शहरात राहत असले तरी खूप लांब राहायचे आणि कामाच्या ठिकाणी यायला जायला खूप वेळही लागायचा. तसं टाईट शेड्यूल होतं दोघांचं.
"आज भेटतेस का?" संकेतने सक्काळी सक्काळीच फोन करून तनिष्काला विचारलं,"आज रात्री मस्त डिनरला जाऊ तिथूनच पिक्चर टाकू, नवा लागलाय दीपिकाचा!"
"आज? आज नको रे, ऐक ना, मला आज ना करणच्या वाढदिवसाला जायचंय. सगळी गॅंग येणार आहे तिथे. धमाल करायची आहे." तनिष्का म्हणाली.
"कोण हा करण?"
"अरे कॉलेजात होता माझ्या, मागच्याच आठवड्यात आलाय यूएसवरून तीन वर्षांनी! त्याचा वाढदिवस साजरा करणारे आम्ही सगळे."
"त्याचा वाढदिवस महत्त्वाचा आणि मी नाही का?"
"असं उगाच काहीतरी बोलू नकोस हा, चल निघते मी आता, ऑफिसातून डायरेक्ट जायचंय, त्यामुळे तयारी करायचीय मला.चल बाय, उद्या करते फोन." म्हणून तीने फोन ठेवला.
असाच एकदा अचानक संकेत संध्याकाळी ऑफिसात आला. तर ही एका कलीगबरोबर तिथंच गप्पा मारत होती काहीतरी.
"अरे आत्ता इथे कसा?"
"का येऊ नये का?"
"नाही, तसं नाही रे, एकदम इथे पहिले तुला म्हणून विचारलं. बाय द वे, हा निरंजन, माझा कलीग.हा संकेत माझा होणारा नवरा!"
संकेत निरंजनचं निरीक्षण करत होता ते पाहून तनिष्कालाच कसंतरी झालं. तिने पटकन तिकडून निघण्याचा निर्णय घेतला. "चल बाय निरंजन,"
निरंजन संकेतपेक्षा दिसायला नक्कीच उजवा होता. हँडसम, सावळा असला तरी फीचर्स एकदम शार्प होते त्याचे त्यामुळे एकदम रुबाबदार दिसायचा.
"काय पाहत होतास त्याच्याकडे एवढा? बापरे त्याच्या लक्षात आलं नाही म्हणून बरं!"
"खास आहे का तो?"
" ए चिल्ल! अरे लग्न झालेय त्याचं, आणि बायको पण सुंदर आहे त्याची." एवढं बोलून ती निघाली त्याच्याबरोबर.
खरं तर तिच्यासाठी फ्रेंड्स, कलिग्स हे सारे लिंगभेदाच्या पलीकडे होते. अशाच वातावरणात लहानपणापासून ती वाढलेली. त्यामुळे मित्र किंवा मैत्रिणी काय दोन्ही सारखेच होते तिला. त्यामुळे व्यक्तिमत्वात एक मोकळेपणा येतो आणि मुख्य म्हणजे मतं उदार होतात. जास्त फुलतं व्यक्तिमत्व असं तिच्या ममा आणि बाबाचं मत होतं, त्यामुळे स्त्री, पुरुष, जात, धर्म, भाषा अशा संकुचित भिंती कधी घालून घेतल्या नाहीत तिच्याभोवती. अतिशय स्वच्छ निर्मळ अशी नाती तिला त्यामुळे जपता येत होती. संकेतच्या विचित्र प्रश्नाने तीच्या मनात एक बारीकशी कळ उठली.
असंच एकदा ते दोघं डिनरला गेलेले असताना कुणाचा तरी फोन आला.
"अरे तू काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. जास्त विचार करू नको. येते उद्या तुला भेटायला., मग बोलू सविस्तर आणि हो काळजी घे स्वतःची. कधीही रात्री वाटलं तर फोन कर. चल झोप आता"
"कोण होता?"
"अरे फिरोज! त्याच्या जॉबचा प्रॉब्लेम झालाय आणि त्याच्या बहिणीचं लग्न आहे पुढच्या महिन्यात. त्यामुळं त्याला खूप टेन्शन आलंय त्याला. "
"मग तू काय करणार आहेस? आणि कोणत्याही वेळी फोन करेल का तो?" संकेत विचारत होता. त्याचे ते तसं विचारणं तिला खटकलं. वाटलं लग्नानंतरही हा असाच राहिला तर? पझेसिव्ह असेल तर समजून घेता येईलही पण संशय घेणार असेल तर? बापरे तिच्या अंगावर सर्र्कन काटाच आला.
ती थोडी सावध झाली. लग्नाला अजून महिना होता कपडे, दागिने खरेदी, इ. झालेली पत्रिकापण छापून आलेल्या. बाहेरच्या गावच्या पाठवूनही झालेल्या. त्यामुळे तिला जरा टेन्शन आलेलं. निवड चुकली तर नाही ना आपली?
आताशी मम्माशी पण संकेत बद्दल बोलताना तितकासा उत्साह नसायचा तिच्यात. त्याच्याविषयी बोलायचे ती शक्यतो ती टाळायचीच. पूर्वीसारखी उत्साही राहिलेली नाही लग्नाबद्दल, असं वीणालाही जाणवायला लागलेलं. काय बरं कारण असेल? आपल्या लेकीच्या वागण्यात झालेला हा बदल तिच्या चाणाक्ष नजरेने बरोब्बर टिपलेला. ती स्वतःहून काही बोलणार नाही, सांगणार नाही. पण आपल्यालाच जरा बारीक लक्ष ठेवायला हवं हे जाणवलं तिला. ती काहीबाही कारणानं तिच्याकडून संकेत बद्दल काढून घ्यायची. ती जे काही सांगायची त्यावरून तिच्याहि मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली.
असंच एकादा तिच्यासमोर संकेतचा फोन आला.
"अरे भाऊ नाहीये ना मला, त्यामुळे रितेशच उभारणार मागे. त्याच्याच सोबत होते काल. पण तू कुठे पाहिलस? आणि मला का नाही बोलायलास? ...... मग काय झालं? यायचंस ना? .... एवढं काय त्यात? ........ .... अरे पण दिसला कसा नाहीस मला?.... इतका वेळ होतास तिथे??? कमल आहे तुझी........ चल काहीतरी बोलू नकोस.... चल ठेवते फोन." फोन ठेवल्यावर तिचा चेहरा जरा विचित्र झाला, दुखावल्या सारखा.
"काय गं तनू , काय झालं? काय म्हणतो?"
"तसं काही नाही ग,काल मी आणि रितेश बसलो होतो मॉलमध्ये तिकडे आलेला म्हणे हा, आणि आम्ही बसलो होतो तिथं! यायचं ना मग! तर म्हणे तुला आवडेल की नाही म्हणून नाही आलो. उगाच कशाला डिस्टर्ब करा म्हणून.! काय फालतूपणा आहे हा? मला राग येईल म्हणे! माझा बॉयफ्रेंड आहे का रितेश? आणि हा काय माझ्यावर पाळतीवर होता की काय? आला का नाही समोर?"
ती तिथून तिच्या रुममध्ये गेली. प्रसाद आल्यावर त्याच्या कानावर हा प्रकार घातला वीणाने. तोही विचारात पडला.
"तुला काय वाटतंय?"
"सिरीयस वाटतय मला!!. वाटतंय तो जर असाच राहिला तर त्रास होईल आपल्या लेकीला!"
"हो ना सवय नाहीये रे तिला असल्या सगळ्या गोष्टींची. कोमेजुन जाईल ती.कुठं जायचं यायचं सगळ्यांवरच बंधनं येतील तिच्या. कुठे जाते काय करते, कुणाशी बोलते साऱ्याचवर! बापरे विचार केला तरी भीती वाटतेय."
"मला वाटतं आपण आधी तिच्याशी बोलू ... मग त्याच्याशी पण बोलायला हवं. भाऊला पण सांगून बघतो. त्याचे आणि वाहिनीचं पण मत घेऊ, बोललं तर पाहिजेच कारण लग्न अगदी पंधरा दिवसावर आलंय."
"हो ना आधीच गोष्टी क्लियर करुन घेतलेल्या बऱ्या नाही का?"
"हो मी आजच बोलावून घेतो भाऊ आणि वहिनीला." प्रसाद म्हणाला,."भाऊ वहिनीचं मत घेऊ आणि पुढच काय ते त्यांच्याशी बोलून ठरवू.
भाऊ वहिनी तातडीने आले. "अरे लग्न अगदी समोर येऊन ठाकलाय, तर लवकर काहीतरी करावं लागणार. मग त्यांनी तनिष्काशी सगळं सविस्तर बोलून घेतलं. मामला गंभीर होताच खास.
"मला वाटतं आपण त्या मंडळीशी बोलायाला हवं. म्हणजे त्याच्या आईबाबांशी, त्याचाशी,."
"काय सांगणार त्यांना? तुमचा मुलगा संशय घेतो म्हणून? बरं नाही दिसत नाही ना तसं?"
"नाही तसे नाही त्यांना कल्पना देऊन बघू, त्यांचं मत घेऊ."
"हं! एकदम नको म्हणायला, पण साधारण काय झाले आहे ते तरी सांगून बघू."
मग प्रसादने त्यांना फोन करून भेटीची वेळ मागितली. आणि सगळे मिळून त्यांच्या घरी गेले. प्रसादने मग त्यांना सविस्तर काय झालंय ते सांगितलं.
"अहो संकेतचा हक्कच नाही का बायको कोणाशी बोलते, काय करते, ते जाणून घेण्याचा?"
"हो ते बरोबर आहे. पण तिची अशी काही स्पेस हवीच ना? लग्न करणार, तर थोडा विश्वास हवाच ना?"भाऊ म्हणाले," आणि प्रत्येक ठिकाणी असा प्रश्न काढत बसला तर कसं जमणार?"
"मला वाटतं संकेतला नवरा म्हणून तास पूर्ण अधिकारच आहे. थोडा कंट्रोल हवाच ना बायकोवर!" म्हणजे त्यांना मान्य होतं म्हणायचं. त्यात काहीच गैर वाटत नव्हतं त्यांना! आजच्या जमान्यातहि किती बुरसटलेले विचार असतात लोकांचे! त्यांचंच जर असं मत आणि विचार असतील तर आपल्या मुलीचे भवितव्य कठीण आहे या घरात! त्याची आईपण गप्प बघत बसलेली. त्यावरून तिला काहीच किंमत नसावी घरात असच वाटत होतं.
"आम्ही कळवतो उद्या काय ते." भाऊ म्हणाले.
"म्हणजे? काय म्हणायचंय तुम्हाला?"
"हेच कि आपण हे संबंध पुढे घेऊन जावेत कि नाही याचा विचार आम्हाला करावा लागेल"
"अहो काय बोलताय तुम्ही? असं कसं करू शकता? लग्न दहा दिवसावर आलंय"
"हो पण झालं नाहीये ना?आणि नाही झालाय तेच चांगलं झालंय असं वाटाय लागलाय आता आम्हाला."
असा काही निर्णय हे लोक घेतील अशी अपेक्षाच केली नव्हती त्यांनी. त्यामुळे जरा गडबडलेच ते.
"मला वाटते तुम्ही जरा अतीच करताय." ते म्हणाले.
"नाही आता हे लग्न होणे नाही बस! इतकाच कळतंय मला." प्रसादने निर्वाणीचं सांगितलं त्याना. आणि सारे तिथून घरी आले.
सगळंच इतके पटापट घडलं कि काहीच कळलं नाही. पण जे झालं ते चांगलंच हे मात्र सर्वानाच पटले.
'आपण लग्न ठरवताना किती बेसिक ठोकताळे बांधतो आणि मग असं काही सिरीयस तरच खोलात जातो नाही का?" भाऊ म्हणाला.
"हो ना! तरी बरं एवढा कालावधी मिळाला त्यामुळे कमीत कमी लग्नापूर्वीच सारं कळलं नाही तर अनर्थच घडता!"
"हो ना मला तर बाबा कल्पनाच करवत नाही काय झालं असतं पोरीचं" तनिष्काला निदान त्याला पारखता आले. लग्न घाईघाईने उरकलं असतं तर भलताच घोळ झाला असता."
" हो ना एवढ्या मोकळ्या वातावरणात वाढलेली आपली लेक लग्नानंतर कोंडवाड्यातच गेली असती कि काय?" वहिनी म्हणाल्या.
"काय झालं असतं याचा विचारच करवत नाही" वीणा म्हणाली. "पण आता लोक काय म्हणतील?" "अगं लोक काय म्हणणारेत? आज बोलतील उद्या विसरतील" प्रसाद म्हणाला.
"आणि आपल्या लेकीचं आयुष्यभराचं नुकसान झालं असतं तर लोक येणार होते का भरून काढायला?" वहिनी म्हणाल्या.
"हो तसं पटतय मलाही."
घरी आल्यावर तनिष्काशी सविस्तर बोलणे झाल, "तुला काय वाटतं बेटा?" भाऊने कनिष्काला विचारलं.
"काका मला काहीच कळत नाहीये पण तो असा संशय नंतरहि घेत राहिला असता तर अवघडच होतं त्यामुळं हेच योग्य झालय असं वाटतंय.
ती थोडी गप्प झाली. तसा अवघडच निर्णय होता तो. "आम्ही आहोत सगळे तुझ्याबरोबर तू नको काळजी करू होईल सगळं नीट फक्त ठामपणे तुझा निर्णय काय ते सांग."
"काका, माझा निर्णय पक्का आहे. पण थोडं टेन्शन आलंय. इतकच."
अशा रीतीने ठरलेलं लग्न रहित केल्याचं सगळ्यांना सांगायचं टेन्शन आलेले घरात, पण मुलीच्या भवितव्याचा विचार करता हा कठोर आणि कटू निर्णय घेणे भागच होतं त्यांना! त्यामुळे त्यांनी सर्वांना फोन करून निर्णय सांगितला. लोकांना खूप प्रश्न पडलेले. प्रश्नाला उत्तर देऊन जीव मेटाकुटीला आलेला होता. काहीना हा आतातायीपणा वाटत होता तर काहींना योग्य निर्णय वाटत होता. पण लोकांना काही वाटो, त्यांच्या लेकीची तरी एका मोठ्या होणाऱ्या कोंडवाड्यातून सुटका झाल्याचे समाधानच होतं. !!!!!!!!!!!!!!
प्रतिक्रिया
28 Feb 2019 - 11:45 am | श्वेता२४
कालानुरुप असेही बदल घडणे आवश्यक आहे.
28 Feb 2019 - 12:53 pm | ज्ञानोबाचे पैजार
याच गोष्टीत जर दोन्ही बाजू उलटपालट केल्या तरी सुध्दा असाच निर्णय झालेला आवडला असता.
पैजारबुवा,
28 Feb 2019 - 1:02 pm | चौथा कोनाडा
छान आहे कथा , आवडली.
जिंदगी मिलेगी ना दोबारा सिनेमातली कल्की आणिअभय देऑल यांची जोडी आठवली .
28 Feb 2019 - 1:43 pm | अभ्या..
हे ईश्वरा...
भरपूर मित्र मैत्रिणी असणार्या सार्या उपवर मुलींना भरपूर मित्र मैत्रिणी असणारे नवरे मुलं मिळोत.
कथेत आलेल्या मुद्द्यावरुन त्यांचे कधी भांडण न होवो.
त्या दोघांच्या मित्र परिवारासोबत ते दोघेही सुखाने नांदोत.
अशी इस्टेट नसणार्यांनाही तसेच जीवनसाथी मिळोत.
काडीचेही अॅडजस्ट करावे लागता सर्वांचे संसार सुखाचे होवोत.
आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहु दे.
.
सौजन्य: (नेहमीचेच)जोशीवाले वडे.
(आमचेकडे सर्व पदार्थ रिफाइन्ड तेलात तळलेले असतात, प्लास्टिक बॅग मिळणार नाही, पेटीएमचा क्युआरकोड काउंटरच्या खालच्या बाजूस लावलेला आहे. उगीच मोबाईलचा कॅमेरा इकडे तिकडे फिरवू नये.)
28 Feb 2019 - 3:03 pm | असंका
काडीचेही अॅडजस्ट न करावे लागता सर्वांचे संसार सुखाचे होवोत.
+1
28 Feb 2019 - 4:57 pm | चौथा कोनाडा
अभ्या@शेठ,
:-)))
2 Mar 2019 - 10:04 pm | मराठी कथालेखक
सौजन्यासकट प्रतिसाद आवडला :)
1 Mar 2019 - 1:28 pm | देशपांडेमामा
कथेतल्या मुलीचा आणि घरच्यांचा कणखरपणा चांगला रंगवला आहे
देश
1 Mar 2019 - 2:42 pm | विनिता००२
हा निर्णय घेणे सोपे नाही. अशा कणखर लोकांचे कौतुक :)
1 Mar 2019 - 6:29 pm | ट्रेड मार्क
काहीही असलं तरी तनिष्काच्या पालकांनी योग्य निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षातही मुलाकडच्यांच्या अवास्तव मागण्या, मुलाचे/ त्याच्या आईवडिलांचे खटकणारे वागणे ई निरीक्षण करण्याची क्षमता आणि योग्य निर्णय घेण्याचे धैर्य सगळ्या मुलींच्या आईवडिलांना येऊ दे अशी सदिच्छा.
दुसरे म्हणजे केवळ ठरलेले लग्न मोडले म्हणून खरे कारण जाणून न घेता पुढे मुलीला नाकारण्यासारखा मूर्खपणा लोकांनी बंद केला पाहिजे. नेहमीच मुलीचा दोष असतो ही मनोवृत्ती बदलली पाहिजे.
2 Mar 2019 - 11:41 am | टर्मीनेटर
कथा आवडली.
तनिष्काच्या पालकांनी घेतलेला निर्णय हा केवळ तिच्याच भल्यासाठी नसून संकेतच्याही भल्यासाठी होता हे कालांतराने लक्षात आल्यावर त्याने नक्कीच ह्या निर्णयासाठी त्यांचे आभार मानले असते. नवरा असो वा बायको, कोणी कितीही आपल्या उदारमतवादी मुक्त विचारांची, निरपेक्ष नात्याची ग्वाही दिली तरी दोघांच्या एकमेकांकडून काही किमान अपेक्षा ह्या असतातच! तनिष्काची जीवनशैली आणि संकेतचा नैसर्गिक स्वभाव ह्या गोष्टींमुळे भविष्यात दोघांची होणारी कुचंबणा टाळण्यासाठी घेतलेला हा निर्णय म्हणूनच मनाला पटला.
2 Mar 2019 - 10:11 pm | मराठी कथालेखक
लेखनशैली आवडली.
कथानक नेहमीचेच वाटले.
इतक्या मोकळ्या वातावरणात वाढलेल्या मुलीला जीवनाचा जोडीदार स्वतःलाच का मिळू शकला नाही याचे आश्चर्य वाटते...तिला एकाही मित्रात जोडीदार दिसू शकला नाही का ?
अवांतर : विंडोज ७ प्रणाली असल्यास मिपावर टंकणे कठीन झाले आहे. फायरफॉल्स ,
इंटरनेट एक्स्प्लोरर,क्रोम सगळे बघून झाले. एक बॅकस्पेस टाकली की सगळा मामला गडबडतो आहे. बॅकस्पेस न टाकता अगदी काळजीपुर्वक टंकावे लागते आहे
2 Mar 2019 - 10:27 pm | चौथा कोनाडा
मला ही हाच अनुभव येत आहे. त्रस्त झालोय या कारणाने .
मजकूर दुसर्या बराहा पॅड वर टंकून इथे चिटाकावत आहे.
3 Mar 2019 - 5:13 pm | चौकटराजा
भुताटकी लेखनाचा मला ही बर्याच वेळा अनुभव येत आहे. मी काही यातला तज्ञ नाही पण सावकाश केले तरच मार्ग आहे यावरून रलागनाराणारायल्;आ..... हे असे टाईप होत आहे .....
3 Mar 2019 - 1:43 am | दादा कोंडके
लेखनशैली चांगली पण प्लॉट गंडलेला आहे. एवढ्या मोकळ्या वातावरणात वाढलेल्या मुलीने डाउन मार्केट अॅरेज मॅरेज करणं कैच्याकै आहे. वर आणि गलेलठ्ठ पगार, कौटुंबिक पार्श्वभूमी, दिसणं, उंची वगैरे गोष्टी खणखणीत वाजवून बघून एका अनुभवावरून लगेच कोंडवाडा वाटणं म्हणजे कद्रुपणा.
3 Mar 2019 - 12:45 pm | चौथा कोनाडा
कैच्याकै धाडसी विधान केलंय. आधुनिक अश्या वातावरणात वाढलेल्या मुलींनी विचारपुर्वक अॅउरेज मॅरेज केलेलं पाहण्यात आलंय. मुली देखिल आजूबाजूची उदाहरणे आणि निष्पत्ती पाहून लग्न करत असतात. त्याला डाउन मार्केट म्हणून डाउन दाखवणं योग्य नाही.
4 Mar 2019 - 1:04 am | दादा कोंडके
आधुनिक आणि 'मोकळ्या' वातावरणात वाढ(व)लेल्या मूलींच्या पिढीच्या दृष्टीकोनातून लिहलय हो. त्यापेक्षा दोनचार ब्लाईंड डेटा कराच्या आणि मग ठरवायचं पुढचं.
4 Mar 2019 - 4:17 pm | चौथा कोनाडा
4 Mar 2019 - 3:07 am | टवाळ कार्टा
असे नस्ते अडचणीचे प्रश्न इथे विचारायचे नस्तात
3 Mar 2019 - 5:16 pm | चौकटराजा
समजा सगळे ओ के आहे पण मुलगा घोरतो,,,,, मुलीला ए सी बाधतो व मुलाला मात्र ए सी पहिजे असे त्रासदायक बाबी पुढे आल्या तर काय करायचे .. ?
5 Mar 2019 - 10:04 am | चिनार
:-) :-)
लग्नानंतरच्या ह्याच समस्या खरंतर जास्त गंभीर असतात.
मुलीला AC बाधतो, बस लागते, ऍसिडिटी होते, अपचन होते वगैरे वगैरे समस्या लग्नाआधी मुलांच्या गावीच नसतात..ह्यापैकी काहीही होत नसलं तरी प्रत्येक स्त्रीला "कसंतरीच होतंय" ही एक वैश्विक वैद्यकीय समस्या असतेच..
मुलांच्या बाबतीत घोरणे वगैरे तरी मुली सहन करून घेतात. पण मुलांचे घरातले गचाळ राहणे, फाटक्या बनियनी घालणे, सकाळी उशिरापर्यंत झोपणे, आंघोळीच्या बाबतीत उदासीन असणे मुलींसाठी नवीन आणि असह्य असते.
लग्नापर्यंतचे दिवस शोना, पिल्लू, लब्यु, मिस्सयु करत निघून जातात. आणि नंतर आपलं २८ वर्षांचं पिल्लू टॉयलेटचा फ्लश सुद्धा नीट करत नाही, वचावचा जेवतो, किळसवाण्या ढेकर देतो ह्या गोष्टी मुलींना मोठ्ठा धक्का देतात. आणि जगातली कुठलीही मोकळी विचारसरणी ह्यावर उत्तर देत नाही.
ह्याबाबतीत एक प्रसिद्ध कोट आहे,
"जर बेडरूममधल्या सगळ्या गोष्टी जोडप्याला हव्याहव्याशा आहेत ह्याचा अर्थ ते जोडपे लग्न झालेले असू शकत नाही"
5 Mar 2019 - 11:57 am | रुपी
टिव्हीचा आवाज आणि मोबाईल मध्ये डोकं घालून बसणं तेवढं राहिलं =)
5 Mar 2019 - 12:51 pm | चिनार
हो ना...ह्या गोष्टी विसरलो..
लग्नानंतर पहिल्यांदा जेंव्हा मुलीचं डोकं, हात,पाय,नाक, डोळे वगैरे काहीही दुखते किंवा मळमळ होते, ऍसिडिटी होते तेंव्हा मुलाची धावपळ पाहण्यासारखी असते..
जगातल्या कुठल्या स्पेशालिस्टला घेऊन येऊ सांग राणी, इथपर्यंत तयारी असते बिचाऱ्याची..
मग काही वर्षांनी घरात क्रोसिन, जेल्युसील वगैरेचा स्टॉक जमलेला असतो. त्यातलं जे पाहिजे ते घे अन झोप गुपचूप असं सांगण्यात येते.
7 Mar 2019 - 12:41 pm | इरसाल
आण्भव काय रे सोताचा ??????
7 Mar 2019 - 2:54 pm | चिनार
हाव..
सोताचा अन सभोवतालचा..
5 Mar 2019 - 6:26 pm | सुबोध खरे
मुलांच्या बाबतीत घोरणे वगैरे तरी मुली सहन करून घेतात. पण मुलांचे घरातले गचाळ राहणे, फाटक्या बनियनी घालणे, सकाळी उशिरापर्यंत झोपणे, आंघोळीच्या बाबतीत उदासीन असणे मुलींसाठी नवीन आणि असह्य असते.
लग्नापर्यंतचे दिवस शोना, पिल्लू, लब्यु, मिस्सयु करत निघून जातात. आणि नंतर आपलं २८ वर्षांचं पिल्लू टॉयलेटचा फ्लश सुद्धा नीट करत नाही, वचावचा जेवतो, किळसवाण्या ढेकर देतो ह्या गोष्टी मुलींना मोठ्ठा धक्का देतात.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरा बायकोनी लग्नाआधी आणि लग्नानंतरसुद्धा आपल्या जोडीदाराच्या कोणत्या गोष्टी खटकतात ते मृदू शब्दात एकमेकांना सांगणे आणि जोडीदाराने त्या ऐकणे आणि त्यावर कार्य करणे हा सहजीवनाचा फार महत्त्वाचा पाया आहे.
मी आहे हि अशी आहे ज्याला मला स्वीकारायचा आहे त्याने स्वीकारावे हा अहंगंड किंवा मी पुरुष आहे मी करतो ते करतो हि वृत्ती जर असेल तर दोघात खटके हे उडणारच.
परस्पर सामंजस्य असणे हे फार महत्त्वाचे आहे.
4 Mar 2019 - 1:04 pm | चित्रगुप्त
'गोष्ट' आणि सर्व प्रतिसाद मजेदार.
चौरांचा ...."समजा सगळे ओ के आहे पण मुलगा घोरतो,,,,, मुलीला ए सी बाधतो व मुलाला मात्र ए सी पहिजे असे त्रासदायक बाबी पुढे आल्या तर काय करायचे .. ?".... हा तर खासच.
यात आणखी "मुलीचा आलोपाथीवर भरवसा, तर मुलाचा होमियोपाथीवर, मुलीला पिझा-बर्गर-कोक प्रिय, तर मुला़ला घरचा गरमागरम चारीठाव स्वयंपाक, सुट्टीच्या दिवशी मुलीला सकाळी अकराला उठून, पिझ्झा मगवून घरात निवांत फेसबुक, सिरीयली बघण्याची आवड, तर मुलाला पहाटे उठून दोन दिवस ट्रेकिंगला जायची ओढ, मुलीला कोथिंबीर आणायलाही गाडी हवी तर मुलगा पाच-सात किलोमीटर पायी जायला तयार..... अश्या अनेक गोष्टी होऊ शकतात. त्या मानाने या गोष्टीतला 'कोंडमारा' अगदीच फुसका वाटला.
4 Mar 2019 - 5:00 pm | चित्रगुप्त
चांगलं लिहिलंस गं स्मिते.
बाकी संकेत थोडक्यात बचावला, असं 'यांचं' मत.
-- बाईसाहेब फुरसुंगीकर.
5 Mar 2019 - 12:11 pm | चौथा कोनाडा
+१
5 Mar 2019 - 12:11 pm | स्मिता दत्ता
सगळ्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद
5 Mar 2019 - 6:18 pm | सुबोध खरे
काही मुलांची(आणि मुलींचीही) अशी वृत्ती असते कि मुलगा ,मुलगी यात एकतर प्रियकर आणि प्रेयसी किंवा भाऊ बहिणीचेच नाते असू शकते. निखळ मैत्री असूच शकत नाही. असा नवरा किंवा बायको जर मिळाली तर दुसऱ्या जोडीदाराची भयंकर घुसमट होऊ शकते. विशेषतः तो/ ती मोकळ्या वातावरणात वाढलेले असतील तर.
मी अतिशय मोकळ्या वातावरणात वाढलो जेथे आम्ही १७ मुलगे आणि १४ मुली एकाच वयाचे होतो. परंतु एकही प्रेमविवाह झाला नाही (आणि तसे झाले असते तरी काही वाईट झाले असते असेही नाही) किंवा कुणीही कुठल्याही मुलीकडून राखी बांधून घेण्याचीही गरज पड्ली नाही.
परंतु मी लष्करात गेलो असता तेथे अनेक उत्तर भारतीय भेटले ज्यांची पहिली प्रतिक्रिया अशीच होती कि कुठल्या मुलीबरोबर "लफडं" केलंस कि नाही. सुरुवातीला ते ऐकणंच मला किळसवाणं वाटत असे नंतर माझे कान निर्ढावले आणि मला काहीच वाटेनासे झाले. कारण उत्तर भारतात सर्वत्र अशीच समजूत असते/ घालून दिली जाते.
मोकळ्या वातावरणातून मुलगी बंदिस्त वृत्तीच्या घरात गेली तर तिचा कोंडमारा नक्कीच होतो. किंवा जर बायको कायम संशय घेणार असेल तर नवऱ्याला समाजात वावरणे फार त्रासदायक होऊ शकते.
तेंव्हा जर जोडीदाराच्या संकुचित वृत्तीबद्दल अशी माहिती लग्ना अगोदर समजली तर लग्न मोडण्यात मला कोणतीही हरकत वाटत नाही.
समाज काय म्हणेल म्हणून आयुष्य कुचंबणेत आणि कुतरओढ करत जगणे याइतका मूर्ख पण दुसरा नसेल.
7 Mar 2019 - 11:29 am | रायनची आई
7 Mar 2019 - 11:29 am | रायनची आई
7 Mar 2019 - 2:49 pm | रायनची आई
7 Mar 2019 - 3:16 pm | अभ्या..
Saving private (pratisad) Rayan (chi aai)
8 Mar 2019 - 1:25 pm | मराठी कथालेखक
कथा म्हणून हे ठीक आहे. पण प्रत्यक्ष आयुष्यात असा निर्णय घेणे कितपत उचित होईल याचा विचार करायला हवा.
या ठिकाणी नोकरी, शिक्षण , उंची, कौटुंबिक पार्श्वभूमी,सांपत्तिक स्थिती, बहिण-भावंडांची संख्या ई ई अनेक निकष मुलीने लावलेले दिसत आहेत. या सगळ्या निकषांवर उतरुन मग एक स्थळ पसंत केले.
मग मुलगा आणि त्याचे कुटूंबिय 'संकुचित विचारांचे' आहे असे म्हणत लग्न मोडले. इथे काही प्रतिसादांतही 'संकुचित विचार' वगैरे शब्दप्रयोग केले आहेत.
मला वाटते यात दुसर्या बाजूनेही विचार करायला हवा. संकेतने तनिष्काबद्दल संशय घेतलेला नाही तर तिच्या मित्रांमुळे तो काहीसा अस्वस्थ झाला आहे इतकंच .. तिचा एखादा रुबाबदार मित्र असणे, एखाद्या मित्राने उशीरा फोन करणे , मित्राच्या वाढदिवसाकरिता संकेतसोबत डिनरला नकार देणे यामुळे त्याच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असू शकते. आपल्यापेक्षा हे मित्र तिला जास्त महत्वाचे /खास वाटत आहेत असे त्याला वाटले असेल तर तो त्याचा एकट्याचा दोष कसा ? व्याहवारिक निकषांत बसल्याने एखाद्या व्यक्तीशी लग्न ठरवणे ही गोष्ट आहे.. पण तिने कधी त्याला 'तू मला खूप आवडतोस" वा "तू माझ्याकरिता खूप खास आणि महत्वाचा आहे" हे शब्दात सांगितले वा कृतीतून तशी जाणिव करुन दिली का ?
या त्याच्या प्रश्नावर
असं उत्तर देण्याऐवजी ती त्याची समजूत घालू शकली असती.
"अर्थातच तू माझ्याकरिता खूप महत्वाचा आहेस ..पण काय करु मित्राचा वाढदिवस वर्षातून एकदा येतो.. आपण आज ऐवजी उद्या गेलो पिक्चर बघायला तर चालू शकेल ना ?" असं काही बोलता आलं असतं... किंवा संकेतलाही ती पार्टीला घेवून गेली असती..पण तिने असं काही केलं नाही.
या गोष्टीचा दुसरा पैलू असा की काही गोष्टी हळूहळू अनुभवाने कळतात , उमजू लागतात. स्त्री -पुरुषाची मैत्री ही अशीच एक गोष्ट आहे. कदाचित संकेत मैत्रिणी नसल्याने त्याला ही गोष्ट नीटशी पचनी पडत नसेल पण याचा अर्थ आयुष्यभर तसाच राहील असे नाही. तो आपल्या "पत्नीचे मित्र" ही गोष्ट हळूहळू समजून घेईल ..अर्थात तोवर बाळगावा लागणारा संयम, अंगी असावा लागणारा समंजसपणा नसेल तर मात्र लग्न मोडणेच इष्ट :)
9 Mar 2019 - 1:00 pm | विनिता००२
हाच संवाद / प्रसंग 'ती' विचारतेय आणि तो मित्राच्या पार्टीला जायचय म्हणून नकार देतोय असा विचार करुन बघा....मग तिने समंजसपणा दाखवायलाच हवा असेच विचार येतील मनात! :)
9 Mar 2019 - 1:10 pm | असंका
मैत्रिणीची पार्टी असेल तर तुलना करता येइल.....
9 Mar 2019 - 8:15 pm | मराठी कथालेखक
बरोबर आहे.
मैत्रिणीची पार्टी असेल तुलना होवू शकते
आणि मुलाकडूनही अशाच समंजसपणाची अपेक्षा केली जाईल.
8 Mar 2019 - 1:39 pm | असंका
हे असं खरंच असतं का हो - समजा मुंबईमध्ये वगैरे?
9 Mar 2019 - 1:20 pm | असंका
तनिष्काचे मित्र-
करण
निरंजन
फिरोज
रितेश
मैत्रिणी-
......
......
......
......
?