हलेल तर शप्पथ..
डिस्क्लेमर - कृपया हलके घ्यावं. हे लेखन पूर्णपणे काल्पनिक आहे.
काय गं बाई करायचं आता या वजनाच्या काट्याचं? जर्रा म्हणून हलत नाहीये जागचा. बिघडलाय की काय कोण जाणे. फेकूनच देणारे आता मी तो. काय म्हणालात? वजनाचा काटा नाही गं ... तू हल म्हणून? कळतात बरं का टोमणे. काय काय केलं मी विच्चारू नका.
आधी ठरवलं की फिरायलाच जाऊ या. अगदी पहाटे उठून. मग काय, एकदा ठरवलं की ठरवलं. आधी दुपारचं जागरण होणार, त्याची पर्वा न करता शॉपिंगला गेले. का म्हणजे? अहो, फिरायला जायचं म्हणजे २-४ कम्फर्टेबल ड्रेसेस, त्यावर मॅचिंग बूट वगैरे नको का? शिवाय ते स्मार्ट फोन मध्ये गूगल फिट, पेडोमीटर, रनकीपर असं सग्गळं काही डाउनलोड करूनच ठेवलं. हो, अडायला नकोच बाई. १०००० पावलं चालणार म्हणजे चालणार.
मग उठले दुसर्या दिवशी पहाटे. इतकी सुरेख पहाट.. पटापट आवरलं आणि पडले बाहेर. नवीन ड्रेसमध्ये इतकी सुरेख दिसत होते मी.. आणि अगदी पटापट चालत निघाले मी. एक डोळा त्या पेडोमीटरवर आणि दुसरा डोळा.. मी मॉर्निंग वॉक घ्यायला बाहेर पडलेय हे सोसायटीत किती लोक पाहताहेत यावर ठेवलेला. पण काय आळशी लोक हो! सहा वाजले तरी अंथरुणातच डाराडूर झोपलेले. मी गेलेच पण. तास झाला, सव्वा तास झाला तरी हा मेला पेडोमीटर दाखवेचना १०००० पावलं झाली म्हणून. मी म्हटलं, आत्तापर्यंत चांगली २५००० तरी झालीच असतील. हाच चुकला असेल. मग सरळ घरी आले तर नवरा म्हणालाच.. हे काय, पहिल्याच दिवशी लगेच आलीस? ५००० पावलं तरी गेलीस का? सासूबाई लगेच फिसकन हसल्या. पाहिलंत ना कसं एखाद्याचं मानसिक खच्चीकरण करतात घरातलेच लोक? मी काही हरत नाही एवढ्यातेवढ्याने.
दुसर्या दिवशी दुसरा ड्रेस, दुसरे बूट घालून गेले तर काय, कॉलेजमधली मैत्रीण कित्ती दिवसांनी भेटली. बसले मी मग तिथेच गप्पा मारत. इतक्या दिवसांनी मैत्रीण भेटली, मग नको का बोलायला? चांगले दोन तास गप्पा मारल्या आणि मग कसं बाई फिरणार? आले घरी. शेवटी ऑफिससुद्धा असतंच ना. परत घरी यांना हसायला कारण मिळालंच. तिसर्या दिवशी गेले आणि खरंच चालून, दमून आले घरी. अशी काही घामाघूम झाले होते. आल्यावर आरशात पाहिलं आणि म्हटलं, नक्कीच एखादा सेंटीमीटर कमी झाला असणार आपला. असला उत्साह वाढला ना माझा, तर त्याच दिवशी संध्याकाळी नेमका नणंदेचा फोन. आम्ही येतोय गं ४-५ दिवस. झालं! आता करा यांची उस्तवारी. कसे गेले ते ५-६ दिवस... काही एक कळलं नाही. मग एवढी दमून गेले की जाऊ म्हटलं एखाद्या आठवड्याने फिरायला. तशी मी आता एवढ्या कामाने झालीच असेन थोडीशी बारीक. सासूबाईंना म्हणाले तर म्हणतात कशा, "अगं, बारीक कसली, एक आठवडा पाहुणे म्हणून सुट्टी घेतलीस ती चांगलीच पावलीये तुला. गाल बघ कसे छान वर आलेत." अरे देवा!हे काय झालं वेगळंच? सरळ वजनाच्या काट्यावर उभी राहिले तर काय? तो आपला ढिम्मच. जर्रा हलेल तर शप्पथ. मग चिडून मी फिरणं सोडूनच दिलं.
मग त्यानंतर असाच एकदा योग क्लास लावला मी. आयुष्यात इतके आळोखे-पिळोखे एका तासात दिले नव्हते मी. पण मस्त वाटलं. आणि त्याच खुशीत ऑफिसमध्ये मस्त कामाला सुरुवात केली. आता अगदी करीना नाही झाली माझी, तरी ५-६ इंच तर होणारच कमी. खातरीच झाली हो माझी. लंच टाइमपर्यंत नीट राहिले हो आणि मग असं काही अंग धरून आलं की बास. सगळ्या अंगात ठणकाच फक्त. बरं, इतका त्रास होतोय मला, तर घरच्यांना माझी टिंगल करायला आणखी एक कारणच मिळालं हो. मग रागारागात झोपले तशीच तर दुसर्या दिवशी उठवतंय कुठे? जाऊ दे बाई.. प्रत्येकाला योग जमेल असं थोडंच आहे? मग जिमलाच जाऊ म्हटलं. त्याची तीच तर्हा. किती ते अंग दुखावं? मग झुंबा डान्स झाला. तिथे तेच. घरातलं आवरताना नाचतच असते मी. परत पैसे घालून कुठे नाचा? एका महिन्यात झालं परत आपलं नेट सर्फिंग चालू. मग वेगवेगळे घरातल्या घरात धावायचे, चालायचे, नाचायचे असे सगळे व्हिडिओ पाहून प्रत्येकी २-२ दिवस करून सोडून दिले. प्रत्येक वेळी वाटे हो मला, की आता नक्की होणार माझं वजन कमी. किती सिन्सिअर आहे मी माहीत आहे? प्रत्येक वेळी मी प्रत्येक प्रयत्न किती मनापासून केला.. पण हा वजनाचा काटा हलेल तर शप्पथ. मग सायकलिंग आणि स्विमिंगसुद्धा करून झालं. पण अहो, हे झालं की काय भूक लागत होती मला.. कधी एकदा खातेय असं व्हायचं. त्यामुळे परत शिव्या वजनाच्या काट्यालाच.
मग म्हटलं, हे व्यायामाचं फॅड काही माझ्यासारख्या नाजुकाचं कामच नाही. मग सरळ शोधलं - व्यायामावाचून वजन कमी करा. फक्त एक गोळी घ्यायची जेवणानंतर. कामच फत्ते. आणल्या की लग्गेच मी या गोळ्या. ४ दिवस घेतल्या आणि नंतर अशी काही गरगरून चक्कर आली म्हणता.. घरातच पडले म्हणून बरंय. नाहीतर गाडीवरून पडले असते, तर गाडीला किती लागलं याचीच चिंता केली असती आमच्या घरातल्यांनी. मी म्हणून निभावतेय हो.. बरं, तर पॉइंटाचा मुद्दा असा की गोळ्याही गेल्या कचर्याच्या बादलीत. मग त्या पावडरी आणल्या. सकाळी घ्यायच्या. नंतर आणल्या त्या जेवणाआधी घ्यायच्या, त्यानंतरच्या जेवणाऐवजी घ्यायच्या. पण हा वजनाचा काटा.. आहे तिथ्थेच मेला.
नंतर मग कॅबेज डाएट, जी.एम. डाएट असंही काय काय केलं बाई. पण सगळं मुसळ केरात. वजनाचा काटा जर्रा हलेल तर शप्पथ.
मग पहाटे उठून मध-लिंबू-पाणी सुरू केलं., तर आला खोकला मला. मग डॉक्टरांकडे जाण्याऐवजी मी सरळ हे घेणंच बंद केलं. थांबला खोकला. तशी मी पहिल्यापासूनच धोरणी. मग मध्ये एकदा जिरं-मेथीदाणे खाऊन झाले. पण हा मेला वजनाचा काटा.. हलेल तर शप्पथ.
आता तेवढ्यात आली आमची ऋजुता. किती बाई गुणाची. साक्षात करीनाला झीरो फिगरची केली तिने. शिवाय तूप, तेल, पोहे, बटाटा, केळी, आंबे सगळं खाऊन. कसली हुशार आहे. शिवाय दर दोन तासांनी खायचं... म्हणजे मज्जाच की. उपासमार नकोच. पटकन जाऊन तिची पुस्तकं आणली. लगेच फळफळावळ, सुकामेवा, चिक्क्या असं काय काय आणलं. हो, प्रत्येक दोन तासांनी व्हरायटी नको का? शिवाय वीक एंडला बर्गर, चीज, फ्राईज सगळं खायचंच की. हे बेस्ट. हे खाऊन नक्की मी वजन कमी करणारच अशी घोषणा केली मी घरात. सगळे हल्ली फक्त माना हलवतात. कर बाई हवं ते. मग मीही आता फक्त सांगितलं. तेही नाही सांगितलं असं नको व्हायला ना. आता हे डाएट अगदीच मस्त. त्यामुळे महिनाभर अगदी छान छान लाड केले स्वतःचे. आणि आता ऐकलंय बरं का मी ऋजुताचं असं स्वतःला सांगत वजनाच्या काट्यावर उभी काय राहिले.. परमेश्वरा, ही जमीन मला पोटात घेईल तर बरं, असं वाटलं हो.. चक्क २ किलोंनी वजन आणखीन वाढलं. काय हा मेला वजनाचा काटा.. हलेल तर शप्पथ. जा बाई, आता या ऋजुताची पुस्तकंही माळ्यावरच.
मग आले डॉ. दीक्षित. म्हटलं चला, दोनदा तर दोनदा. पण पंचावन्न मिनिटं आहेत ना? मग काय. शिवाय पथ्य काहीच नाही. हवं ते खा. नाहीतरी बटाटेवडे, सामोसे, काय सुरेख पदार्थ आहेत. एकच तर जन्म आपला. किती छान सल्ले देतात ना! आणि शिवाय मध्ये ताकही प्या. ते तर आवडतंच मला. मग काय, लगेच ते सुरू. एक दिवस बरा गेला. तर दुसर्या दिवशी ऑफिसमध्ये एकाची सेंड ऑफ पार्टी. म्हटलं काय होतंय एका दिवसाने? आज खाऊ आणि उद्यापासून मात्र जोमात सुरू आपलं डाएट. तर दुसर्या दिवशी आमची किटी पार्टी. तरी म्हटलं आपण दीड महिन्याचं टार्गेट घेतलंय ना.. ते उद्यापासून करू. आणखीन कमी खाऊ. पण काय सांगू अहो.. रोज काही ना काही कारणाने आपलं अध्येमध्ये खायला घालणारच लोक. नाही म्हणून त्यांना कसं दुखावणार ना? त्यामुळे हाही प्लॅन फुकटच गेला हो. आणि किती म्हटलं तरी दोनदाच जेवायचं ही कल्पनाच झेपेना हो मला. आधीपासून आमच्याकडे किनई अगदी चारी ठाव नीट स्वयंपाक असतो बरं. खात्यापित्या घरचे नको का दिसायला आपण? उगीच पाप्याचं पितर नाही बाई आमच्यात कुणी. झालं. दीक्षितांच्या प्लॅनचेसुद्धा बारा वाजवलेच मी.
आणि वजनाचा काटा? ते काय सांगूच का? अहो, हलेल तर शप्पथ..!
प्रतिक्रिया
7 Nov 2018 - 12:59 am | पद्मावति
:) मस्तं खुसखुशीत लेख.
7 Nov 2018 - 9:23 am | प्राची अश्विनी
नाव वाचून कळेना पटकन.;)
छान लिहिलंय.
7 Nov 2018 - 9:29 am | यशोधरा
खी, खी, खु, खू!! =))
7 Nov 2018 - 12:35 pm | टर्मीनेटर
मजेशीर लेख आवडला. बटाटयाची चाळ मधल्या उपासाची आठवण आली :)
7 Nov 2018 - 4:15 pm | नूतन सावंत
हलला बाही तर बरंय, मोडलाच तर काय घ्या!.
हघेहेवेसांलान.
7 Nov 2018 - 10:12 pm | मुक्त विहारि
एकदम खूसखूशीत लेख...
आवडला...
9 Nov 2018 - 11:49 am | कुमार१
… काटा कधीतरी हलावा यासाठी सर्व इच्छुकांना शुभेच्छा!
9 Nov 2018 - 11:57 am | अभ्या..
त्या काट्याच्या डिस्प्लेवर लावायला एक स्टीकर करुन घे फिक्स आणि आवडत्या वजनाचे. टेन्शन नको
9 Nov 2018 - 12:31 pm | अनिंद्य
:-) :-)
काटा हलेना काटा डुलेना
चाफा बोलेना .....च्या चालीवर
9 Nov 2018 - 1:26 pm | Sanjay Uwach
खूपच सुंदर लीहाले आहे.म्हणतात ना,
आशा लोकांच्या पासुन सावध रहा जे आपल्याला लठ्ठ (ढोबळे) बनवतात.
वजन मोजायचा काटा,आरसा ,फोटो आणि हडकुळे मित्र
9 Nov 2018 - 1:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं, खुसखुशीत लेखन ! :)
9 Nov 2018 - 1:45 pm | चांदणे संदीप
ही ही ही
लेख आवडला!
Sandy
10 Nov 2018 - 5:20 am | चामुंडराय
एकच उपाय, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण कमी झालं तरच काटा डावीकडे हलण्याची शक्यता आहे.
वजन कमी करण्याचे विविध प्रयत्न करून थकलेला चामुंडराय.
धागा छानच हेवेसांनलगे.
10 Nov 2018 - 7:01 pm | लौंगी मिरची
मजा आली वाचताना , क्रिस्पी च एकदम ;)
11 Nov 2018 - 6:39 pm | वन
मस्तं खुसखुशीत लेख !
12 Nov 2018 - 5:18 pm | स्वाती दिनेश
चकली सारखा खुसखुशीत लेख! मजा आली ..
स्वाती
13 Nov 2018 - 2:16 pm | मित्रहो
मस्तं खुसखुशीत लेख ! मजा आली वाचताना
14 Nov 2018 - 3:58 pm | दुर्गविहारी
मस्तच धागा. पण दिक्षीतांचाही उपयोग झाला नाही हे पटले नाही. ह.घ्या. हे. वे.सां. न.
14 Nov 2018 - 5:48 pm | स्मिता.
दिवाळीच्या फराळासारखंच (त्यामुळे माझ्या वजनाचा काटा 'उजवीकडे' :( हललाय ) खुशखुशीत लिहिलंय! प्रत्येक वाक्य वाचतांना 'अगदी-अगदी' म्हणत होते मनात ;)
30 Nov 2018 - 1:18 pm | पियुशा
हा हा हा मस्त !!!
9 Dec 2018 - 12:40 pm | निओ
हा हा ...मस्तच लिहिलंय.
17 Dec 2018 - 8:43 am | चित्रगुप्त
अगदी अस्सेच अनुभव आलेले आहेत... वजन जिथल्या तिथे.
1 Sep 2019 - 11:02 pm | kunal lade
छान मजा आली वाचायला...