चकीत झालात ना ?! पण, हे केवळ सनसनाटी शीर्षक नाही, तर शास्त्रीय सत्य आहे. याचा अर्थ असा नाही की व्यायामशाळेत जाऊन शारीरिक क्षमतेला ताणणारा व्यायाम सरसकट वाईट आहे... व्यायामशाळेत शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला योग्य प्रमाणातला व्यायाम फायदेशीर ठरू शकतो, व तो ठराविक उद्येशांकरिता (उदा: खेळ, प्रतिस्पर्धा,इ) आवश्यकही असतो. मात्र, असा व्यायाम सरसकट आरोग्यपूर्ण दीर्घ जीवनाची हमी देऊ शकत नाही. खडतर व्यायामापेक्षा खूपच सुसह्य असलेल्या कृती, त्यापेक्षा कित्तेक पटींनी जास्त हमी देऊ शकतात. किंबहुना, त्या सोप्या कृती टाळल्यास व्यायामशाळेतल्या खडतर व्यायामाचा फायदा सहज पुसून टाकला जाऊ शकतो.
विश्वास नाही बसत ? हातच्या काकणाला आरसा कशाला. या सत्याचे अनेक पुरावे जगभर पसरलेले आहेत... फक्त, आरोग्यपूर्ण जीवनाच्या संदर्भातले व्यापारी लेख, जाहिराती आणि स्वघोषित आरोग्यसल्लागार यांच्या गदारोळातून आपले डोके बाहेर काढून, जमिनीवरची तथ्ये समतोलपणे पाहणे आवश्यक आहे. तर पाहूया काय आहे वस्तुस्थिती.
मूलभूत आधाररेखा (बेसलाईन) माहिती
जागतिक सरासरी आयुर्मान (The World Factbook, २०१६) : पुरुष : ६८ वर्षे ४ महिने व स्त्रिया : ७२ वर्षे ८ महिने.
भारतीय सरासरी आयुर्मान (आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय, भारत सरकार, २०१५) : पुरुष : ६७.३ वर्षे व स्त्रिया : ६९.६ वर्षे.
नीलप्रदेश (Blue Zones)
जागतिक सरासरीपेक्षा खूप जास्त आयुर्मान आणि खूप जास्त निरोगीपणाचे प्रमाण असणार्या प्रदेशांना नीलप्रदेश (Blue Zones) असे संबोधले जाते. हे प्रदेश तर लेखाच्या शीर्षकातल्या दाव्याचे जितेजागते पुरावे आहेत! तेव्हा, त्यांच्यापासून सुरुवात करूया.
हे नीलप्रदेश जगभर विखुरलेले आहेत. त्या सर्वांमध्ये, भरपूर नैसर्गिक शारीरिक हालचाल हा सामान्य दुवा आहेच. त्याबरोबरच, त्यांचे इतर काही विशेष असे आहेत...
१. सार्डिनिया (इटली) : येथील मुख्यतः शाकाहारी असलेल्या समाजाचा मुख्य व्यवसाय शेळीपालन असून ते दिवसभरात कमीत कमी ८ किमी चालतात. घट्ट कौटुंबिक नातेसंबंध असलेल्या या प्रदेशात वयाचे शतक पार केलेले जगातील सर्वात जास्त पुरुष आहेत. जास्त आयुर्मानाबरोबर सापडणार्या M26 या जनुकनिशाणीचे (जेनेटिक मार्कर) या समाजात प्राबल्य आहे.
२. ओकिनावा (जपान) : या प्रदेशात वयाचे शतक पार केलेल्या जगातील सर्वात जास्त स्त्रिया आहेत. शारीरिक हालचालीबरोबरच, येथील सामाजिक वीण व नातेसंबंध जगतील सर्वात घट्ट असल्याचे मानले जाते.
३. निकोया (कोस्टा रिका) : येथील बहुतांश लोक घराबाहेरचे शारीरिक काम करतात. हे लोक जगतील सर्वात जास्त प्रमाणात नैसर्गिक (अनप्रोसेस्ड) अन्न खातात. "Plan de vida उर्फ guiding life purpose" या नावाच्या आध्यात्मिक विचारसरणीचा प्रभाव असलेल्या या प्रदेशात ९०+ वर्षे जगणे विरळ नाही.
४. लोमा लिंडा (कॅलिफोर्निया, युएसए) : या युएसएमधिल एकुलत्या एका नीलप्रदेशातले लोक सर्वसामान्य अमेरिकन माणसापेक्षा सरासरी १० वर्षे जास्त जगतात. सेवन्थ डे अडवेंटिस्ट (प्रोटेस्टंट) चर्चचे सभासद असलेले हे लोक, मुख्यतः शाकाहारी आहेत आणि प्रक्रिया केलेले अन्न सहसा खात नाहीत.
५. इकारिया (ग्रीस) : हे लोक मुख्यतः (भरपूर फळे, भाज्या, कडधान्य, बटाटे आणि ऑलिव्ह तेल असलेला) भूमध्य सामुद्रिक आहार घेतात. एक तृतियांश इकेरियन जनता नव्वदी पार करते. आपल्या समाजाचा कर्मठ अभिमान त्यांना एकत्र बांधून ठेवत आहे.
यापैकी कोणत्याही प्रदेशात एकही व्यायामशाळा नाही, ते लोक मॅरॅथॉनसाठी सराव करत नाहीत किंवा घरातही काही खास व्यायाम करत नाहीत. त्यांच्यामध्ये न चुकता आढळणारी एक वस्तुस्थिती म्हणजे "सतत हालचाल करत राहणे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग" आहे. मग ती हालचाल बागकाम करणे असो की बाजारहाट करायला चालत जाणे असो की घरातल्या छोट्या मोठ्या कृतीसाठी चालणे असो. त्यांच्या जीवनात हालचाल करण्यासाठी बनवलेल्या साधनांचा अभाव आहे (इथे तुम्हाला टीव्हीचा रिमोट कंट्रोल, १०० मीटरवरच्या वाण्याच्या दुकानातून वस्तू आणायला जाण्यासाठी स्कूटरला मारलेली किक्, इत्यादी गोष्टी आठवणे अपेक्षित आहे :) )
नीलप्रदेश संशोधकांच्या मते "आयुर्मान वाढविण्यामध्ये नित्यक्रमातील नैसर्गिक हालचालीचा सिंहाचा वाटा असतो आणि नीलप्रदेशातील लोकांमध्ये ही सवय सामान्यपणे भरपूर प्रमाणात दिसते (Routine natural movement is one of the most impactful ways to increase your life span, and a common habit among the world’s longest-lived populations).
शास्त्रीय संशोधन
* अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते दर आठवड्याभरात सहा तास चालण्यार्या लोकांमध्ये, (तितकीही शारीरिक हालचाल न करणार्या लोकांपेक्षा,) हृदयरोग, श्वसनाचे आजार व कर्करोग यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असते. किंबहुना, आठवड्यात केवळ दोन तास चालण्याचा व्यायाम करणार्या लोकांतही आयुर्मान वाढल्याचे संशोधनात आढळून आले आहे.
* Karolinska Institute, Sweden या संस्थेला शरीरविज्ञान व वैद्यकशास्त्र (Physiology or Medicine) यांच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी ठरविण्याचा मान दिलेला आहे. तिच्यात काम करणार्या Anders Hansen या वैद्यक व मानसशात्रज्ञाच्या मते दर दिवशी चालण्याने वयोमानाने होणार्या स्मृतिभ्रंशात (dementia) ४०%नी कमी होते. थोडक्यात, चालण्यामुळे शरीराच्या इतर अवयवांबरोबरच मेंदूच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतात.
असे का होते?
हालचाल करून आपले अस्तित्व टिकवणे व ते वर्धित करणे ही प्राणिजीवनाची (आणि अर्थातच मानवी जीवनाची) पायाभूत आवश्यकता आहे. अर्थातच, आपले शरीर व त्याच्या भौतिक व रासायनिक क्रिया हालचालींना मध्यवर्ती धरून लक्षावधी वर्षांच्या कालावधीत हालचालींमुळे व हालचालींसाठी उत्क्रांत झालेल्या आहेत. त्याबाबतीत अयोग्य आणि/अथवा असुरक्षित असलेली उत्परिवर्तने (पक्षी : त्यांच्या संदर्भातले गुणधर्म) नष्ट होतात किंवा अकार्यक्षम अवस्थेत राहतात.
या दीर्घकालीन उत्क्रांतीत, अनैसर्गिक व्यायामांचा आवश्यकता/सहभाग नसल्याने, अर्थातच, मानवी शरीर प्रचंड अनैसर्गिक शारीरिक ताणासाठी बनलेले नाही. शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त ताण देणार्या व्यायामाने त्याला धोका उद्भवू शकतो. अत्यंत शारीरिक ताणाच्या प्रतिस्पर्धांमध्ये भाग घेणार्या खेळाडूंमध्ये शारीरिक इजा होण्याचे प्रमाण जास्त असते ते यामुळेच.
त्याविरुद्ध, आवश्यक नैसर्गिक हालचालींचा दीर्घकालीन अभाव असल्यास, शरीराच्या अवयव व प्रक्रियांना निरोगी राहण्यासाठी आवश्यक उत्तेजनेचा अभाव निर्माण होऊन, शरीराच्या नैसर्गिक कार्यात अडथळे निर्माण होणे स्वाभाविक आहे. यालाच औपचारिक भाषेत "जीवनशैलीतला बदल" व "जीवनशैलीचे आजार" म्हणतो. हे काहीसे असे आहे...
"ज्या उपयोगासाठी गाडी बनवली आहे त्यासाठी तिचा योग्य रितीने वापर केल्यास, ती कमीत कमी वेळा बिघडून, जास्तीत जास्त काळ काम देते. तीच गाडी जर अयोग्य प्रकारे वापरली किंवा बराच काळ बंद ठेवली, तर नादुरुस्तीचे प्रमाण वाढते.
मानवात "हालचालींचा अभाव निर्माण करणार्या साधनांचा शोध आणि उपयोग" १०-१२,००० हजार वर्षांपूर्वी शेतीसंस्कृती अस्तित्वात येऊन माणूस एका जागी स्थिर झाल्यावर सुरू झाला, गेल्या १००-२०० वर्षांत सर्वसामान्य व्यवहारातल्या यांत्रिक उपकरणांच्या वापराने तो अचानक मोठ्या प्रमाणात वाढला, आणि गेल्या काही दशकांतल्या यांत्रिक व संगणकक्रांतीने अनारोग्य निर्माण करण्याइतपत बळावला आहे. १०-१२,००० वर्षे हा मानवी उत्क्रांतीमध्ये नगण्य कालावधी आहे. वापरातील बदलाप्रमाणे शरीराची रचना व कार्यप्रणाली उत्क्रांत होण्यासाठी हा काळ अत्यंत तोकडा आहे. अर्थातच, वापरात झालेल्या बदलांचे (पक्षी : वापराचा अभाव आणि/किंवा गैरवापर) दुष्परिणाम शरीरात दिसायला लागणे अपरिहार्य आहे.
शंभर वर्षांपूर्वी ९०% लोकांना नेहमीचे काम करताना कोणते ना कोणते शारीरिक कष्ट करावे लागत आणि १०% लोक बैठे काम करत असत. आज ते प्रमाण बरोबर उलट झाले आहे. त्यामुळे, आज, विशेषतः सतत टेबलाशी जखडलेल्या कार्यालयीन कामात, सतत हालचाल करणे तितकेसे शक्य होईलच असे नाही. तरीही, सहजपणे शक्य असणारी शारीरिक हालचालही टाळण्याकडे आपला कल असतो. त्यावर नियंत्रण ठेवल्यास, फारसे कष्ट न करता, आरोग्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. यातील मुख्य गोष्ट म्हणजे मानवी शक्ती न वापरता चालणार्या यंत्रांचा उपयोग शक्य तेवढा टाळणे किंवा मर्यादेत ठेवणे. यामुळे, पर्यावरणाचा कमी र्हास करणे आणि स्वतःचे आरोग्य सुधारणे असा दुहेरी फायदा होतो.
या संबंधी फार त्रास न घेता आपण काय करू शकतो?
१. शाळा जवळपास असल्यास, मुलांना पायी चालत शाळेत पोचवणे आणि घरी परत आणणे. यामुळे होणारे फायदे पालक व मुले या दोन्हींमध्ये होतात. शिवाय, मुलांना नकळत आरोग्यदायी सवयी लागतात, हा बोनस आहेच !
२. जवळच्या कामासाठी जाताना पायी अथवा सायकलने जाणे.
३. घरात रिमोट कंट्रोलचा उपयोग शक्यतो टाळणे.
४. घरकामासाठी यांत्रिक उपकरणांचा उपयोग टाळणे अथवा कमीत कमी करणे.
५. दिवसातून कमीत कमी एकदा 'विनाखंड, १५ मिनिटे, वेगाने चालणे'. रमत गमत चालण्यापेक्षा, तेवढेच अंतर, भरभर चालण्याने (ब्रिस्क वॉक) जास्त फायदा होतो. काही कारणाने एका फेरीतच बरेच अंतर चालणे शक्य नसल्यास, (तेवढ्याच दिवस/आठवड्यांच्या मर्यादेत) अनेक वेळेस, थोडे थोडे (५०० ते १००० मीटर्स) अंतर चालून व्यायामाचा वाटा पुरा करणे.
६. कामाच्या टेबलावरून किंवा घरातल्या कोचावरून दर तासाला उठून उभे राहणे व शक्य असल्यास पाच मिनिटे चालणे.
७. कार्यालयातले दुपारचे जेवण कामाच्या टेबलावर न करता, जरासे चालून दुसर्या ठिकाणी करणे. यामुळे हालचाल तर होईलच, पण इतर लोकांशी संवाद होण्याचीही शक्यता निर्माण होईल.
मनापासून विचार केल्यास, सहज नैसर्गिक हालचाल करण्याचे इतर अनेक पर्याय आपल्याला सुचू शकतील.
निष्कर्ष
आपल्या शरीराला उत्तम अवस्थेत दीर्घकाळ व निरोगी अवस्थेत कार्यरत ठेवण्यासाठी, अनैसर्गिक शारीरिक कष्ट घेण्याची गरज नाही. नव्वदी व शतकोत्तर जगणार्या मानवी समुदायांच्या शेकडो वर्षांच्या अनुभवांवरून धडा घ्या... ज्याकरिता आपले शरीर बनले आहे त्या स्वस्त आणि मस्त नैसर्गिक हालचालींकडे जाणीवपूर्वक जास्त लक्ष द्या व फार कष्ट न करता जास्तीत जास्त आयुरारोग्यपूर्ण जीवन जगा.
सर्वांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी अनेक शुभेच्छा !
संदर्भ व अधिक वाचन
https://qz.com/quartzy/1452630/the-healthiest-people-in-the-world-dont-g...
http://time.com/5160475/blue-zones-healthy-long-lives/
https://www.bluezones.com/2016/11/power-9/
http://www.andrewmerle.com/blog/2017/9/10/the-ideal-work-commute-will-ma...
https://www.npr.org/2011/10/19/141514467/small-changes-can-help-you-thri...
https://www.cancer.org/latest-news/study-even-a-little-walking-may-help-...
https://books.google.co.uk/books?id=-DXRDgAAQBAJ&pg=PT164&dq=%22a+daily+...
(क्रमश : )
प्रतिक्रिया
17 Nov 2018 - 3:48 pm | कुमार१
लेख छान हाये वो !
पूर्ण सहमत. माझी जीवनशैली बऱ्यापैकी अशी आहे.व्यायामशाळेत जात नाही ☺️
17 Nov 2018 - 3:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
#metoo ;) =))
धन्यवाद !
17 Nov 2018 - 4:12 pm | बापु देवकर
छान माहिती आहे .
17 Nov 2018 - 4:33 pm | ज्ञानोबाचे पैजार
पहाना.... टीव्हीचा रीमोट वापरण्यासारखा आरोग्यदायी प्रकार नाही. त्याने डोळ्याना आणि हाताच्या बोटांना केवढातरी व्यायाम मिळतो. शिवाय बुध्दीला चालना मिळते ती वेगळीच. प्रत्येक भारतिय दिवसाचे कमितकमी दोन ते तीन तास तरी हा व्यायाम करतोच.
तीच गोष्ट वॉशींग मशीनची. मशीन मधे कपडे टाकणे मशीन सुरु करणे कपडे वाळत घालणे वाळलेले कपडे घड्या करुन लॉड्री बॅगेत ठेवणे व नंतर ते इस्त्री वाल्याला देणे हे करताना शरीराच्या कोणकोणत्या भागांची हलचाल होते ते एकदा तपासुन पहाच.
याशेवाय घरातुन निघताना एसी बंद करणे, लॅच लावणे, लिफ्टची बटणे दाबणे, कारचा एसी सुरु करुन मग ती पार्कींग मधुन बाहेर काढणे व नंतर कार चालवत हापिसात जाणे, कार चालवताना मधे मधे कर्कश्य हॉर्न वाजवणे, पायी चालणार्यांच्या सात पिढ्या नरकात पोचवायची व्यवस्था करणे , दिवसभर ल्यापटॉपचा कळफलक बडवणे, दोन दोन तास चालणार्या मिटींगांना उपस्थित रहाणे, मधुन मधुन चहा किंवा शीतपेय किंवा दोन्ही ढोसणे, क्यानटीनला चालत जाणे आणि भरपेट हादडणे
हे सगळे करत असतानाच दर दोन तासांनी शिगरेटी फुंकणे दर पाच मिनिटांनी मोबाईलर चेपु, कायप्पा आणि मेल चेक करणे आणि त्यांना लाईक देणे, मिपावर प्रतिक्रीया देणे इत्यादी
कामांच्या या प्रचंड यादीत आजकाल झोमॅटो किंवा स्वीगीवर ऑर्डर देणे हे सुध्दा एक अति कष्टदायक काम समाविष्ट झाले आहे.
इतकी सारी हलचाल दिवसभर करणारे आपण भारतिय लोक नक्कीच हेल्दी असणार यात मला काही सुध्दा शंका नाही. म्हणुनच येत्या काही वर्षातच म्हात्रेसरांनी दिलेल्या यादीमधे भारताचे नाव समाविष्ट होईल याची मला खात्री आहे.
पैजारबुवा,
17 Nov 2018 - 6:35 pm | शाम भागवत
प्राण्यांना कधी व्यायाम करताना पाहिले आहेत का? असा प्रश्न डॉ. जगन्नाथ दिक्षीत विचारतात. व्यायाम हा अनैसर्गिक आहे अस सांगून रोज ४५ मिनिटे भरभर चालायला सांगतात. अस आठवड्यातील निदान ५ दिवस करा असही सांगतात.
या सर्वांची कारणमिमांसा आणखीनच स्पष्ट झाली.
डॉ. धन्यवाद.
_/\_
19 Nov 2018 - 3:54 pm | स्वधर्म
त्यांच्या व्हिडीअोत ऐकलेले अाठवते. ते म्हणतात, व्यायाम हा केलाच पाहिजे. रस्त्यावर खडी फोडण्याचे काम करणार्या मजूरालासुध्दा व्यायामाची गरज असते. असे मजूरही ह्रदयविकाराच्या झटक्याने गेलेले अाहेत. माझी काही चूक होते अाहे का?
17 Nov 2018 - 7:15 pm | श्वेता२४
खरच अशी रोजची जीवनशैली सहज अंगिकर्णे अवघड झाले आहे
17 Nov 2018 - 8:06 pm | प्रमोद पानसे
लेख छान माहितीपुर्ण आहे..
17 Nov 2018 - 8:24 pm | विशुमित
कोणत्याच आखाड्यात न जाता आमचे नाना अजून एवढं तरवाट का आहेत याचं गमक या माहितीमुळे समजू लागले आहे.
.....
19 Nov 2018 - 3:34 pm | अनुप ढेरे
माझ्या ८९ वर्ष निरोगी जगलेल्या आजोबांच्या राहणीचा विचार केल्यास (वय ८७-८८ पर्यंत) रोज चालणे, सूर्यनमस्कार आणि नियंत्रित/पारंपारिक आहार हे तीन घटक दिसतात.
19 Nov 2018 - 10:44 pm | अस्वस्थामा
नाना तारवाट आहेत पण तुम्ही मध्येच थांबला बरं का ? ही गोष्ट तेवढी कधी पूर्ण करताय सांगा बघू .. ;)
20 Nov 2018 - 1:41 am | विशुमित
अण्णा अण्णा...!! कसं सांगू तुम्हाला. त्या एच आर वालीने सगळा घोळ केला आहे. ऑफिस मधे जागाच नाही ठेवली मिपावर लिहायला. घरी लिहणं शक्य नाही.
त्यात एवढं मोठं प्रकरण मोबाईल वर लिहणं जिकिरीचे आहे.
...
नाही. तरी पण प्रयत्न करणार आणि काम तडीस नेणार.
17 Nov 2018 - 9:12 pm | कंजूस
लोळणे हा व्यायाम आहे का? लवकर सांगा.
17 Nov 2018 - 9:29 pm | तुषार काळभोर
बरं झालं असा निष्कर्ष कोणीतरी काढला ते!
मला लहानपणापासून व्यायामाचा प्रचंड तिटकारा आहे. अर्थात शारीरिक हालचालींचा अजिबात नाही.
रोज एक किमी अंतरावर बसस्टॉपपर्यंत चालत येणं जाणं होतं. त्याशिवाय कंपनीत कामानिमित्त इकडे तिकडे फिरावं लागतं साधारण दोन किमी.
घरात असल्यावर बसून राहत नाही, काहींना काही काम चालू असतं.
शारीरिक हालचाल केली नाही की मला लै बोअर होतं.
18 Nov 2018 - 1:17 am | चामुंडराय
धन्स डॉ. साहेब, अतिशय उपयुक्त माहिती.
माझ्या सारख्या जिमाळश्याला आणखी एक कारण मिळाले :)
नीट (NEAT) हालचाली केल्या तर वेगळ्या व्यायामाची गरज नाही असे पूर्वी केव्हातरी वाचल्याचे स्मरते.
तेव्हा या नीट वर एकदा नीट लिहाच डॉक्टर.
19 Nov 2018 - 1:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
मराठीला "जिमाळशी" या नवीन शब्दाची भेट दिल्याबद्दल, अभिनंदन ! :)
19 Nov 2018 - 1:58 pm | अनिंद्य
+ १
18 Nov 2018 - 2:02 am | मंजूताई
माहिती चांगली आहे पण एक शंका तुम्ही म्हणताय त्या पध्दतीने जगणारेच लोकं होती पण आयुर्मर्यादा मात्र कमी होती आतापेक्षा. माझ्या पहाण्यात अश्या आठ दहा स्वस्थ व्यक्ती आहेत ज्यांनी ८५ पार केली आहे व विना औषधांच जगताहेत जे कधी व्यायाम शाळेत गेले नाहीत, बस, सायकल, पायांचा वापर केलाय व निसर्ग निगडीत जीवनशैली आहे.पुढच्या दहावीस वर्षानंतर अशी पिढी पाहण्यात येईल का?
18 Nov 2018 - 11:06 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
माहिती चांगली आहे पण एक शंका तुम्ही म्हणताय त्या पध्दतीने जगणारेच लोकं होती पण आयुर्मर्यादा मात्र कमी होती आतापेक्षा.
जीवनशैलीतला "हालचाल" हा एकच भाग या लेखात मांडला आहे. पुढच्या लेखात, आयुर्मानावर प्रभाव पाडणारे इतर घटकांची चर्चा होईल, तेव्हा तुमच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे मिळतील असा अंदाज आहे. त्यानंतर्ही काही प्रश्न उरले तर नि:शंकपणे विचारावे.18 Nov 2018 - 6:21 am | सुधीर कांदळकर
लेख आवडला.
18 Nov 2018 - 7:22 am | ट्रम्प
मी आठवड्यातून किमान पाच दिवस रोजचे 15 की मी सायकल चालवतो , आंतरराष्ट्रीय मानांकानुसार सायकल चालवून प्रत्येक आठवड्यात 150 हार्ट पॉईंट्स प्रत्येक माणसाने कमावले पाहिजेत आणि मी किमान 500 पॉईंट्स कमावतो
18 Nov 2018 - 11:47 am | विजुभाऊ
आदेव
देव आनंद हा सतत कामात मग्न असायचा. त्याने व्यायाम वगैरे कधीच केला नसावा. तरीही त्याच्या समकालीन नटांपेक्षा तो जास्त तजेलदार दिसायचा.
तो शेवटपर्यम्त कार्यमग्न राहिला
18 Nov 2018 - 5:15 pm | रागो
अतिशय उपयुक्त माहिती.
18 Nov 2018 - 7:18 pm | उपयोजक
वि. का. राजवाडे जबरा व्यायाम करायचे.पण ६३ वर्षेच जगले.
19 Nov 2018 - 11:53 am | अनिंद्य
बेश्ट !
जिममध्ये जाऊ नका असे सुचवणाऱ्या सर्व डॉक्टर-संशोधक लोकांचा मी फॅन आहे :-)
लेख आवडला.
(वर आलेला 'जिमाळशी' हा शब्दही फार आवडला.)
पु भा प्र
20 Nov 2018 - 11:09 am | टर्मीनेटर
१००% सहमत :)
डॉक्टर साहेब लेख आवडला, पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे.
19 Nov 2018 - 12:10 pm | मुक्त विहारि
लेख आवडला...
19 Nov 2018 - 12:16 pm | ज्ञानोबाचे पैजार
या वाक्याच्या पार्श्र्वभुमीवर "योगासने" हा नैसर्गीक व्यायाम का अनैसर्गीक?
(शवासनात विषेश प्राविण्य मिळवलेला) पैजारबुवा,
19 Nov 2018 - 1:50 pm | रंगासेठ
माहितीपूर्ण लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.
<<यापैकी कोणत्याही प्रदेशात एकही व्यायामशाळा नाही, ते लोक मॅरॅथॉनसाठी सराव करत नाहीत किंवा घरातही काही खास व्यायाम करत नाहीत. त्यांच्यामध्ये न चुकता आढळणारी एक वस्तुस्थिती म्हणजे "सतत हालचाल करत राहणे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग" आहे.
शंभर वर्षांपूर्वी ९०% लोकांना नेहमीचे काम करताना कोणते ना कोणते शारीरिक कष्ट करावे लागत आणि १०% लोक बैठे काम करत असत.>>
सहमत, आपल्याकडे काही काही वर्षापूर्वी पर्यंत लोक ऑफिस, शाळा, कॉलेज , मंडई ला चालत अथवा सायकल रेटतच जायचे.
अवांतर : उत्क्रांती आणि हालचाल याबद्द्ल अनुमोदन. सध्या "सेपिअन्स" हे पुस्तक वाचतोय, त्यात लेखकाने पण हाच मुद्दा मांडलाय की १००-२०० वर्षातील जीवनशैली मधे झालेले बदल हे लाखो वर्षांच्या मानवी/पृथ्वी जीवनाच्या प्रवासातील फक्त एक थेंब आहे. त्यामुळे तुम्ही नमूद केलय त्याप्रमाणे ठराविक उद्येशांकरिता (उदा: खेळ आणि/प्रतिस्पर्धा) केलेला व्यायाम वगळता नैसर्गिक हालचालींच प्रमाण जर वाढवल तर व्यायामशाळेत जायची गरज पडणार नाही. :-)
19 Nov 2018 - 3:51 pm | स्वधर्म
खालील दोन धागे अाठवले:
https://www.misalpav.com/node/37914 मी आज केलेला व्यायाम...!! ४९६ प्रतिसाद
https://www.misalpav.com/node/38174 मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६ ७२ प्रतिसाद
अापण पहालच किती तुडुंब प्रतिसाद मिळाले अाहेत, व्यायाम करणार्या, करायची ईच्छा असणार्या सदस्यांकडून. तेव्हाच मी माझे वेगळे मत लिहीणार होतो, पण तसे करणे अौचित्याला धरून होणार नाही, म्हणून नाही लिहीले. अत्यंत नियमित व्यायाम करणारे जवळचे नातेवाईक, मित्र अाहेत, पण ते कधीच अाजारी पडत नाहीत, असे काही अाढळले नाही. तसेच व्यायामाच्या प्रोफेशनमध्येही काही मित्र अाहेत, त्यांचे पण तसेच. त्याउलट कसेही वागणारे, व्यसन असलेलेही काही परीचित अाहेत, जे सहसा ठणठणीत अाहेत. व्यायाम व त्यातले व्यवसाय (जीम, योग इ.) हे सुखवस्तू असण्यामुळे निर्माण झालेली, बरीचशी भितीवर अाधारीत मार्केटींग केलेली गोष्ट अाहे, हे मनोमन पटलेले अाहे.
19 Nov 2018 - 4:26 pm | यशोधरा
वाचते आहे. पुढील भागाची वाट पाहते.
19 Nov 2018 - 4:28 pm | स्मिता.
बाळंतपणानंतर वजन कमी करण्यासाठी व्यायामाचे अनेक प्रकार करून पाहिले पण वजनाचा काटा 'हलेल तर शप्पथ' ;)
गेल्या काही महिन्यांपासून नियंत्रित आहार आणि व्यायाम म्हणून वेगाने चालणे सुरू केलेय. वजन हळूहळू कमी होतंय, जिमसारखा थकवा वाटत नाही उलट प्रसन्न वाटतं!
हा स्वानुभव असल्याने लेख अगदी पटला.
19 Nov 2018 - 6:48 pm | माझीही शॅम्पेन
माफ करा पुरेसे डिसकलेमर न टाकता असा अत्यंत एकांगी लेख मिसळपाव वर यावा ह्यची मला आपल्या कडून अपेक्षा नव्हती !!
मुळात दीर्घ आयुष्यमानासाठी केवळ सतत हालचाल हि पुरेशी नाही तर , योग्य आहार , तणाव मुक्त जीवन शैली , हवामान , प्रदूषण , वेगवेगळ्या रोगाशी सामना अश्या अनेकविध गोष्टी वर अवलंबून आहे , केवळ निल प्रदेशातील निष्कर्ष सर्व ठिकाणी कसे काय लागू पडतील ??
तुम्ही जे सुचवलेले "या संबंधी फार त्रास न घेता आपण काय करू शकतो?" च्या खाली सुचवलेल्या गोष्टी एखाद्याने करायचा निर्धार केला तर तुम्ही त्याच्या वाढीव आयुष्मानची जबाबदारी घेणार / छातीठोकपणे खात्री देणार का ?
19 Nov 2018 - 8:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
लेखातला सर्व मजकूर नीट वाचला तर वरचे मत बदलेल असे वाटते. शिवाय, शेवटचे "क्रमश : " नजरेआड झाले असावे असा अंदाज आहे. :)
26 Nov 2018 - 12:44 pm | माझीही शॅम्पेन
सर्व मजकूर नीट वाचलेला आहे , बरेच जणांना इथे तुमचा लेख आवडला असला तरी मी माझ्या मतावर ठाम आहे , ह्या मताचा क्रमशः संबंध नाही
मुळात ज्या प्रकारची जीवन शैली आजूबाजूला आहे त्यात हालचाल कमी होते म्हणून लोक जिम लावतात , पूर्वी आखाड्यात जायचे !! आणि म्हणून शीर्षक सुद्धा दिशाभूल करणार आहे
पुढील लेखासाठी शुभेच्छा
26 Nov 2018 - 1:25 pm | अथांग आकाश
बरेच जणांना इथे तुमचा लेख आवडला असला तरी मी माझ्या मतावर ठाम आहे >>>
लेख आवडलेल्या बऱ्याच जणांमध्ये माझाही समावेश आहे, त्यामुळे हा लेखन प्रपंच! तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात हि गोष्ट देखील चांगली आहे! पूर्वी आखाड्यात जाणाऱ्या लोकांमध्ये सर्वसामान्य लोक होते कि कुस्ती खेळणारे पैलवान टाईप लोक होते या विषयीचे तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल!
जाता जाता: सर्व मजकूर नीट वाचलेला आहे अशी सुरुवात केल्यावर, लेखातील मजकुराशी सुसंगत असलेले शिर्षक तुम्हाला दिशाभूल करणारे का वाटले त्यावरही प्रकाश टाकावा हि विनंती!
26 Nov 2018 - 3:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
शीर्षकाला विरोध करण्यापूर्वी, शीर्षकातला सर्व मजकूर एकत्रितपणे व लेखाचा पहिला परिच्छेद नीट पाहणे योग्य होईल, असे परत सुचवतो. शिवाय, शीर्षकाला विरोध म्हणजे, "जिममध्ये गेल्याशिवाय शरिराला पुरेसा व्यायाम होऊ शकत नाही" असे मत होते, ते मत शास्त्रिय नाही, इतकेच इथे नोंदवतो. मी शीर्षक व लेखात काय लिहिले आहे त्यांचे संदर्भ दिलेले आहेत, इकडेही लक्ष वेधत आहे.
मुळात ज्या प्रकारची जीवन शैली आजूबाजूला आहे त्यात हालचाल कमी होते म्हणून लोक जिम लावतात , पूर्वी आखाड्यात जायचे !!
नक्की ?!
१. जीवनशैली :
जीवनशैली स्वयंभूपणे होत नाही / आस्तित्वात येत नाही / असत नाही... ती आपोआप होणारी किंवा अनैच्छिक गोष्ट नसते. आपण घेतलेल्या निर्णयांबरहुकूम केलेल्या कृतींमुळे जीवनशैली ऐच्छिकरित्या आस्तित्वात येते... आपली जीवनशैली आपण आस्तित्वात आणतो. त्यामुळे, आपणच बनवलेल्या/स्वीकारलेल्या जीवनशैलीसाठी, आजूबाजूच्या परिस्थितीला, इतरांना किंवा इतर घटकांना दोष देणे बरोबर नाही... तसे करणे आपली जबाबदारी दुसर्यावर ढकलण्यासारखे (पक्षी : बेजबाबदारपणाचे) होईल.
खुल्या मनाने, स्वतःचे आणि आजूबाजूचे, नीट निरिक्षण केले तर सहजपणे कळते की, "मुद्दाम करावी लागणारीच नव्हे तर नेहमीच्या व्यवहारात सहजशक्य असलेली हालचालही कमी प्रमाणात करण्याकडे (होण्याकडे नव्हे) ज्या लोकांचा कल वाढला आहे त्यांची जीवनशैली चुकीची बनली आहे." आणि हेच जीवनशैली आजारांचे एक प्रमुख कारण आहे.
स्वतःच्या मूळ दोषांकडे दुर्लक्ष करून, आपल्या जीवनशैलीबद्दल इतर घटकांना दोष देणे, योग्य नव्हे. लहानपणापासून (किंवा, "देर आये दुरुस्त आये या न्यायाने", जेव्हा खर्या वस्तूस्थितीचे ज्ञान होईल तेव्हापासून) अंगिकारलेल्या आणि पूर्ण जीवनभर सतत आचरणात आणाव्या अश्या, आरोग्यदायी सवयींना, "आरोग्याला पूरक जीवनशैली" म्हणता येईल. ती "मानसिक व शारिरीक" सवय बनल्यास, दीर्घकालीन मानसिक व शारिरीक फायदे देते.
ज्यांना जिममधले व्यायाम करायचे आहेत त्यांनी ते जरूर करावे. मात्र, ते चुकीच्या जीवनशैलीवरचा उतारा आहेत अश्या भ्रमात नक्कीच राहू नये.
२. आखाडा, जीम आणि त्यांचा उपयोग करणारी माणसे :
तुमचे विधान तपासण्यासाठी "पूर्वीच्या काळात एकूण लोकसंखेपैकी किती टक्के लोक आखाड्यात जात होते?" आणि "आजच्या काळातही एकूण लोकसंखेपैकी किती टक्के लोक जिममध्ये जात आहेत!"... हे पाहणे आवश्यक आहे.
यासंबंधात, आपल्या राहत्या गाव/शहर/उपनगर यांची एकूण किती लोकसंख्या आहे/होती (किमान, आपल्या आजूबाजूस असलेल्यांपैकी रँडमली १०० लोक निवडून) त्यापैकी किती टक्के लोक आखाड्यामध्ये/जिममध्ये नियमितपणे जात होते/जात आहेत, हे पाहिले तरीही, ते खूपच रोचक व माहितीवर्धक ठरेल. :)
भारताची आजच्या घडीची लोकसंख्या सुमारे १३३ कोटी आहे. भारतातील सर्व 'आखाडे+जीम' यांची क्षमता (कपॅसिटी) किती असेल बरे ?
तुमचे स्वतंत्र ठाम मत असण्याच्या लोकशाही हक्काचा आदर आहेच. मात्र, एखादी गोष्ट ठामपणे सांगताना (किंवा तिला विरोध करताना) वास्तव पुराव्यांचा पाठिंबा असल्यास बरे असते... केवळ वैयक्तिक ठाम समज पुरेसा नसतो... हे मात्र जरूर नमूद करावेसे वाटते.
असो, तुमच्या विचारांना वाचून हा विषय अजून थोड्या विस्ताराने लिहिण्याची गरज आहे असे वाटते. जराशी सवड झाली की पुढचा/चे लेख लिहेनच. तेव्हाही तुमचे अमुल्य मत अपेक्षित आहे... कारण, वादे वादे जायते तत्वबोध:।
19 Nov 2018 - 7:19 pm | Nitin Palkar
माहितीपूर्ण लेख.... नेहमी प्रमाणेच.
19 Nov 2018 - 11:53 pm | डँबिस००७
नेहमी प्रमाणेच जबरदस्त लेख आणी
माहितीपूर्ण लेख !!
20 Nov 2018 - 11:00 am | सुबोध खरे
एक फार मोठा गैरसमज -- जो व्यायामशाळेत (हे जरा डाऊन मार्केट वाटत असेल तर "जिम" म्हणू या) जाऊन केला "तोच" खरा व्यायाम बाकी सर्व भंपक
जिम मध्ये जाणारे बहुतांश( ९०% +) लोक. सकाळी एकदाच ३०-४५ मिनिटे घाम काढेपर्यंत व्यायाम करतात आणि त्या नंतर एकदा आपल्या संगणकावर ठोला मारून बसले कि उठतच नाहीत.
शिवाय आपण ३०-४५ मिनिटे व्यायाम करतो आहे त्यामुळे आता अजून काय करायला पाहिजे? अथवा अजून काही करायची गरजच नाही असे समर्थन करताना आढळतात.
आपण दिवसात एकदाच सकाळी दाबून खाल्ले तर ते "उपाय"कारक आहे का "अपाय"कारक आहे याचा विचार त्याच माणसाने करायचा आहे.
हा सांगोपांग विचार केला तर त्यात आपल्याला उत्तर मिळेलच.
डॉक्टर साहेबांच्या लेखातच वाक्ये मी उद्धृत करतो आहे.
खडतर व्यायामापेक्षा खूपच सुसह्य असलेल्या कृती, त्यापेक्षा कित्तेक पटींनी जास्त हमी देऊ शकतात. किंबहुना, त्या सोप्या कृती टाळल्यास व्यायामशाळेतल्या खडतर व्यायामाचा फायदा सहज पुसून टाकला जाऊ शकतो.
हे नीलप्रदेश जगभर विखुरलेले आहेत. त्या सर्वांमध्ये, भरपूर नैसर्गिक शारीरिक हालचाल हा सामान्य दुवा आहेच.
त्यांच्यामध्ये न चुकता आढळणारी एक वस्तुस्थिती म्हणजे "सतत हालचाल करत राहणे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग" आहे.
आवश्यक नैसर्गिक हालचालींचा दीर्घकालीन अभाव असल्यास, शरीराच्या अवयव व प्रक्रियांना निरोगी राहण्यासाठी आवश्यक उत्तेजनेचा अभाव निर्माण होऊन, शरीराच्या नैसर्गिक कार्यात अडथळे निर्माण होणे स्वाभाविक आहे
सहजपणे शक्य असणारी शारीरिक हालचालही टाळण्याकडे आपला कल असतो. त्यावर नियंत्रण ठेवल्यास, फारसे कष्ट न करता, आरोग्यासाठी खूप फायदा होऊ शकतो.
अधिक काय लिहिणे __/\__
20 Nov 2018 - 1:49 pm | Ganesh Dwarkana...
डॉकटर साहेब, खूप छान माहिती !!
आमचा कामानिमित्त रोज सकाळी ८-१० च्या दरम्यान आणि संध्याकाळी ५-८ च्या दरम्यान ठाणे रेल्वे स्टेशन वरून लोकल चेंज करताना आपोआप "चांगला व्यायाम" होतो.
बाकी सायकल रोज १०-१५ किमी आहेच
20 Nov 2018 - 3:21 pm | सस्नेह
लेखातल्या शब्दाशब्दाशी सहमत !
डोळ्यासमोर घडलेली दोन उदाहरणे
एका परिचितांचा १६ वर्षाचा मुलगा जिमला जाऊ लागला . आईवडील डॉक्टर. जिम जॉईन करून सुमारे दीड महिन्यांनी एकदा संध्याकाळी जिमवरून आला आणि ऐअकडे दूध मागितले. आई दूध गरम करून घेऊन आली तर हा टेबलपशी खुर्चीवर बसल्या जागीच लुढकलेला . जागीच हार्ट फेल !
आणखी एक माझ्या ऑफिसमधील हाताखाली काम करणारा २७ वर्षाचा मुलगा. शेतकरी कुटुंबातील, शेतावर राबून दणकट हाडपेर झालेला. दोन महिन्यापासून जिमला जाऊ लागला होता. एक दिवशी लग्नघरात जेवला आणि उलटी झाली. घरी गेला तरी उलटीची भावना थांबेना. काही वेळाने श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि छातीत दुखू लागले. दवाखान्यात नेले. अॅडमिट केले आणि पाच मिनिटात बेडवरच सीव्हिअर हार्ट अॅटॅक आला. तिथेच गेला.
जिम जॉईन करण्याशी याचा नक्कीच संबंध असावा.
20 Nov 2018 - 4:28 pm | स्मिता.
बरेच लोक अतिउत्साहाच्या भरात आणि जिममधल्या इतरांना बघून नवीन असतांनाच खूप जास्त व्यायाम करतात. कदाचित त्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येत असावा... हा माझा अंदाज! मी डाॅक्टर नाही, डाॅक्टर्स नक्की सांगतिलच.
20 Nov 2018 - 5:43 pm | mrcoolguynice
नवीनच "जिममध्ये जाऊन केलेला व्यायाम", हा आधीच्याच वजनाने ओव्हरलोडेड असलेल्या उंटाच्या पाठीवरील, "शेवटची काडी"
असू शकेल काय ?
20 Nov 2018 - 6:25 pm | गामा पैलवान
स्नेहांकिता,
मला हे दोन्ही पावडरचे बळी वाटताहेत. मात्र अपुऱ्या माहितीमुळे मी निष्कर्ष काढणार नाही. पण एकंदरीत पहिल्याचं वय आणि दुसऱ्याची पार्श्वभूमी पहाता कोणीतरी केलेल्या पावडरच्या आग्रहास फशी पडलेले दिसतात.
आ.न.,
-गा.पै.
20 Nov 2018 - 9:20 pm | नाखु
खुराकाचे धागे,सल्ले (दिवसातून दोन वेळा,दोन तासांनी वारंवार) अगदी न्यूनगंड निर्माण झाला होता,(दोन्ही अशक्य,नामुमकीन वगैरे वगैरे)
पण हा वैचारिक व शारीरिक "चाल"ना देणारा उपाय जमणेबल दिसतोय.
मध्यममार्गी पादचारी वाचकांची पत्रेवाला नाखु
22 Nov 2018 - 9:48 pm | मदनबाण
लेखाचे शिर्षक वाचुनच समाधान झाले ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Na Ja (Official Video) :- Pav Dharia
26 Nov 2018 - 2:26 pm | जेडी
आवडला लेख, सहज शक्य आहे चालणे
16 Dec 2018 - 5:21 pm | नजदीककुमार जवळकर
मस्त लेख ! दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत ..