सुषुम्ना
स्क्रीनवर उमटणारे तुझे शब्द
थुई-थुई पिसारू लागताच
भानावर ये.
भगभगत्या भवतालाचा घसाजाळ आवंढा गीळ
नेटाने टंकत जा पुढे
मग दोन रस्ते हाकारू लागतील
पहिला : कातीव-वळणदार-निवांत सावल्यांचा-टाळ्या-जयजयकारांचा-सुबक (दोन्ही बाजूंना वायफळाचे मळे)
दुसरा : सरळसोट-उघडा-बोडका-डोकं वितळवणाऱ्या उन्हाचा (दुर्बोधाच्या खाईत चिरंतन मुक्काम)
भरकटू नकोस ह्या इडा-पिंगला रस्त्यांवर
परज पहार सर्जनाच्या उत्फुल्ल-अधीर-अदम्य-अतृप्तीची
भीड वास्तवाच्या कभिन्न पथ्थराला
तसू तसू बनव
तुझी पायवाट
तुझ्या अस्तित्वाच्या मूलाधारापासून
श्रेयसाच्या सहस्रारापर्यंत
तुला
तेजाळत नेणारी
प्रतिक्रिया
6 Nov 2018 - 8:16 pm | तुषार काळभोर
पण काहीतरी भारी वाचतोय असं वाटत होतं.
7 Nov 2018 - 8:54 am | यशोधरा
वेगळीच.
कविता सुचण्याच्या, स्फुरण्याच्या जाणिवेबद्दल आहे का हे?
7 Nov 2018 - 9:19 am | प्राची अश्विनी
Robert Frost हूनही वेगळा रस्ता.. आवडला..
7 Nov 2018 - 4:58 pm | अनन्त्_यात्री
"And that has made all the difference!"
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
7 Nov 2018 - 5:58 pm | टर्मीनेटर
काहीच कळल नाही...
हा दोष माझाच आहे, शब्द वाचून सरळ काही अर्थबोध होत नसेल तर मी तो समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही,
उगाच शब्दांमागे दडलेले अर्थ शोधणे नाही जमत. त्यामुळेच कदाचित काव्य हा प्रकार आवडत नसावा मला.
7 Nov 2018 - 10:01 pm | मुक्त विहारि
काही समजले नाही...
9 Nov 2018 - 8:39 am | सौन्दर्य
कित्येक वेळा शब्दार्थ कळतात पण भावार्थ समजायला थोडं कठीणच जातं.