आल्प्समधील भटकंती - पास्टर्झे हिमनदीच्या संगे
"आम्हा दोघांची गावं बाजूबाजूच्या दोन खोर्यांत आहेत, मधून डोंगररांग जाते. इकडून तिकडे जायचं असेल तर हिवाळ्यात बरं पडतं. केबल कारने डोंगर चढायचा आणि स्की करून उतरायचा. उन्हाळ्यात रस्त्याने जायचं म्हणजे वैताग येतो, कारण बराच वळसा पडतो." नवर्याचा ऑस्ट्रियन सहकारी सांगत होता. ही होती माझी ऑस्ट्रियाशी अनेक वर्षांपूर्वी झालेली ओळख. एक देश म्हणून ऑस्ट्रियाबद्दल थोडीफार माहिती होती. अनेक लहान मुलं जिथे चालण्याबरोबरच स्की करायला शिकतात असा हा आल्प्सच्या कुशीतील देश. हिमाच्छादित पर्वत, त्यांच्या अंगाखांद्यांवरून वाहणार्या हिमाच्याच नद्या, असंख्य जलधारा, निवळशंख सरोवरे आणि हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला बोलावणार्या डोंगरवाटा. अशीच एक डोंगरवाट ग्रोसग्लोक्नर शिखराच्या सावलीतून जाते, पास्टर्झे हिमनदीच्या वितळणार्या पाण्याला सोबत करत.
समुद्रसपाटीपासून ३,७९८ मीटर उंच असणारं ग्रोसग्लोक्नर (Grossglockner, जर्मन Großglockner) हे ऑस्ट्रियातील सगळ्यांत उंच शिखर. पिरॅमिडसारखा आकार असलेल्या या शिखराला Glocke (घंटा) या जर्मन शब्दावरून Glockner हे नाव पडलं असावं. हे Groß म्हणजे मोठं शिखर आणि त्याचं जोडशिखर आहे फक्त २८ मीटरने लहान क्लाइनग्लोक्नर (Kleinglockner, Klein म्हणजे लहान). ग्लोक्नर पर्वतांच्या पूर्व उतारावर असलेली पास्टर्झे (Pasterze) हिमनदी ही ऑस्ट्रियातील सगळ्यांत मोठी हिमनदी. या परिसराचं सौंदर्य पाहायला येणार्या पर्यटकांसाठी सुमारे २,४०० मीटर उंचीवर Franz-Josefs-Höhe इथे अनेक सुविधा आहेत. ऑस्ट्रियन सम्राट फ्रान्झ योसेफ यांचं नाव दिलेला हा viewpoint म्हणजे ग्रोसग्लोक्नर होखआल्पेनष्ट्राझं (Großglockner-Hochalpenstraße) या ऑस्ट्रियातील सगळ्यात उंचावरील रस्त्याचं शेवटचं टोक. या रस्त्याचं सुंदर वर्णन स्वाती दिनेश यांनी केलं आहे.
ग्रोसग्लोक्नरच्या परिसरात ट्रेकिंग करण्यासाठी जवळच्या हायलिगेनब्लुट (Heiligenblut) या गावात नवर्याने आणि मी मुक्काम केला होता. आजूबाजूला डोंगर आणि त्यात वसलेलं हे टुमदार गाव. हॉटेलच्या बाल्कनीतून दिसणारं सौंदर्यही भूल पाडणारं होतं.
या गावातून अनेक ट्रेक्सची सुरुवात होते, शिवाय पर्वतावर जाण्यासाठी एक केबल कारही आहे. पण इथलं मुख्य आकर्षण आहे अर्थातच ग्रोसग्लोक्नर! दुपारी हायलिगेनब्लुटला पोहोचल्यावर लगेच फ्रान्झ-योसेफ्स-होहंला जाणारी शेवटची बस होती ती पकडली. पण वातावरण ढगाळ होते. परतीच्या शेवटच्या बसपर्यंत मिळालेल्या अर्ध्यापाऊण तासात ग्रोसग्लोक्नरने काही दर्शन दिलं नाही. बर्फ पांघरलेलं Johannisberg हे शिखर दिसत होतं. ढग, भुरभुरणारा पाऊस आणि पांढरीकरडी हिमनदी असं ते निसर्गाचं रूप हुरहुर लावणारं होतं.
पुन्हा इथे यायचं होतं, पण ते हवा चांगली असेल तर. दुसर्या दिवशीही ढगांनी पाठ सोडली नाही. मग जवळपासचे ट्रेक केले. तिसर्या दिवशी मात्र सकाळी उठल्यावर चुकार ढग, निळं आकाश पाहिलं आणि आधी बसचं वेळापत्रक बघितलं. उन्हाळा असला तरी एवढ्या उंचावर थंडी असणार. त्यामुळे बरोबर वार्यापावसासाठी जॅकेट आणि त्याच्या आत आणखी एक गरम कपड्यांचा लेयर असा जामानिमा आवश्यक होता. खाण्यापिण्याचं सामान सॅकमध्ये भरून भरपेट न्याहारी करून निघालो. बसने जातानाच ग्रोसग्लोक्नरच्या त्रिकोणाने स्वागत केलं. ढगांमधून डोकावून पाहणारं ते टोक पाहून आजचा ट्रेक मस्त होणार असं का कुणास ठाऊक वाटलं खरं!
वाटेतल्या उंच पर्वतांच्या शिखरांवर ढग अडकलेले होते. अंगावर येणार्या त्या पर्वतांच्या मध्ये खोलवर लपलेलं एक धरण दिसलं. पास्टर्झे हिमनदीचं वितळलेलं बर्फाचं पाणी तिथे येऊन साठतं. आम्हाला जो ट्रेक करायचा होता, त्याच्या शेवटच्या टप्प्यात या धरणाला वळसा घेऊन जायचं होतं.
फ्रान्झ-योसेफ्स-होहंला उतरलो, तेव्हा समोर दिसलेलं दृश्य पहिल्या दिवसापेक्षा खूप वेगळं होतं. ढगांनी केलेल्या उदास काळोखाचा मागमूस नव्हता. शुभ्र हिमशिखरं, त्यांच्याशी खेळणारे कापसासारखे शुभ्र ढग आणि वर निळं आकाश! थंडीत हवंहवंसं वाटणारं ऊन अंगावर घेत समोरचा नजारा डोळ्यांत साठवत होतो. तिथेच थांबायचा मोह होत होता. पण असं दुरून काठावरून ते रौद्र सौंदर्य पाहून मन भरणार नव्हतं.
Franz-Josefs-Höhe वरून दिसणारी ढगात गुरफटलेली शिखरं आणि उजवीकडे हिमनदी
ग्रोसग्लोक्नरच्या पायथ्याशी पास्टर्झेच्या मुखाशी सुरू होणारा Gletscherweg Pasterze (Pasterze Glacier trail) हा ट्रेक करायचं आधीच ठरवलं होतं. त्या दिवशी गणेश चतुर्थी होती. 'गणपती बाप्पा मोरया' म्हणून ट्रेकची सुरुवात केली.
ट्रेकच्या पहिल्या भागात तीव्र उतार आहे. त्यातील काही अंतर Großglockner Gletscherbahn (Glacier Railway) ने जाऊन वेळ वाचणार होता. शिवाय २१२ मीटर अंतरात १४४ मीटर उतरणार्या या रेल्वेचा अनुभवही घ्यायचा होता. वरच्या फोटोत उजवीकडे या रेलचं वरचं स्टेशन दिसतंय.
खालच्या स्टेशनला उतरल्यावर बाहेर पडल्यावर उताराचा अंदाज आला. वरच्या अजस्र इमारती, लोकांची गर्दी दूर राहिली होती. त्यांचा मागमूसही दिसत नव्हता. पुन्हा रेल्वेने त्या जगात जायच्या ऐवजी पायी डोंगरांच्या अंगाखांद्यांवर भटकायचं होतं.
कडा उतरून तळाशी असलेल्या हिमनदीपर्यंत उतरायचं होतं. डोंगराच्या उतारात कुठे खोदलेल्या पायर्या होत्या. काही ठिकाणी लाकडी फळ्या ठोकून वाट काढलेली होती. १९६० मध्ये हिमनदीची पातळी इथपर्यंत होती. ती आता बरीच खाली गेली आहे. बर्फाचं वितळलेलं निळसर पाणी आणि आणखी पुढे नदीचं आक्रसत जाणारं मुख दिसत होतं. पाण्याजवळ गेलेली माणसं वरून मुंगीएवढी दिसत होती. म्हणजे अजून आम्हाला बरंच उतरून जायचं होतं. थोडं चालून गेलो आणि डावीकडे जाणारी एक वाट लागली. उजवीकडे पास्टर्झेच्या मुखाकडे जाणारी वाट होती. तिकडे जाऊन परत उलट येण्याऐवजी आम्ही डावीकडे जाणारी वाट धरली.
दगडधोंड्यांतून उतरत असल्यामुळे वेग थोडा मंदावला होता. समोर कुठे खुरटं गवत आणि कुठे दगडांच्या राशींचं नदीपात्र, स्क्रीचा उतार आणि त्यापलीकडे अविचल असे पर्वत! थोड्याच वेळात एका वेगळ्याच जगात प्रवेश केला होता. सुरुवातीला अंगावर येणारी शांतता आता मनात झिरपली होती.
निसर्गाचं राकट रूप पाहत पायाखालची वाट सरत होती. पाण्याच्या पातळीपर्यंत उतरलो होतो. इथे थोडा वेळ थांबायचं ठरवलं. तसंही हातात वेळ होता. भराभर ट्रेक उरकून परत जायचं नव्हतं. येणारेजाणारे ट्रेकर्स 'Grüß Gott!' (जर्मन 'राम राम!') नाहीतर हॅलो म्हणत होते. तेवढंच काय ते बोलणं. बरोबर आणलेली फळं खाऊन पुढे निघालो. मागे वळून पाहिलं तर ग्लेशियर रेल्वेचं खालचं स्टेशन ठिपक्याएवढं दिसत होतं.
पुढे माझ्यासाठी कठीण पॅच लागला. इथे वाट अशी नव्हतीच. दगडधोंड्यांतून वाट काढत जावं लागत होतं.
कठीण भाग संपला. वाटेने एक वळण घेतलं आणि समोरचं दृश्य अचानक बदलून गेलं. हिरव्याकरड्या डोंगरांत पसरलेलं पाणी पाहताना भान हरपून गेलं. फ्रान्झ-योसेफ्स-होहंवर असताना वरून हा Sandersee तलाव इवलासा दिसत होता. पुढचा रस्ता कधी पाण्याच्या कडेने, कुठे डोंगराच्या मधून गेला होता. सोबतीला दोन लाल पट्यांमधे एक पांढरी पट्टी ही ऑस्ट्रियातली डोंगरवाटांची खूण होतीच.
तलावात बराच गाळ भरलेला होता. कडेने वाढलेलं गवत, लहान झाडाझुडपांचा गंध हवेत भरला होता. थोडा चढ लागला. वाट पुन्हा वळली आणि दुसर्या शिखरामागे दडलेल्या ग्रोसग्लोक्नरचं दर्शन झालं. शिखरावर रेंगाळणारे ढग काही क्षणांसाठी दूर झाले आणि दोन्ही ग्लोक्नर शिखरं पाहता आली.
आता वाट जरा रुंद झाली होती. थोडं पुढे तलावावर बांधलेला पूल लागला. कडेला साठलेल्या गाळातून जाण्यासाठी दगड लावून वाट तयार केलेली होती. तळ्यातलं संथ निवांत दिसणारं पाणी त्या पुलाखालच्या उतारावरून पत्थरांमधून रोरावत फेसाळत जात होतं. त्या पाण्याचा अनाहत नाद वातावरणात भरून राहिला होता.
पूल पार केल्यावर थोडी मोकळी जागा लागली. इथे दुसरा ब्रेक घेतला. समोर पसरलेलं पाणी, त्याला बांधून ठेवणारे रौद्रभीषण पहाड, दूर क्षितिजावर दिसणारी गर्द निळी शिखरं मंत्रमुग्ध करत होती. एका बाजूला डोंगरावर टोकाशी होखआल्पेनष्ट्राझं हा रस्ता आणि त्यापुढे पर्यटकांसाठीचा प्लॅट्फॉर्म अंधूक दिसत होता. लवकरच त्या जगात परत जायची वेळ येणार होती. पण तोपर्यंत निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये हरवून जायला काय हरकत होती?
एक उंचवटा चढून गेल्यावर मागची हिमशिखरं नाहीशी झाली आणि पुढच्या वाटेवर दरीत असलेला Margaritzenstausee हा तलाव दिसू लागला. पहिल्या तलावाचं पाणी पुलाखालून जाऊन डोंगरकापारींमधून या धरणात येऊन साठतं. आम्हाला मात्र थोडा वळसा पडणार होता. आता ट्रेक सोपा होता. पायाखालची वाट बर्यापैकी रुंद आणि सपाट होती.
अर्ध्या तलावाला वळसा घालून धरणाच्या भिंतींवरून पुढे जायचं होता. ट्रेकमध्ये सुरुवातीपासून एकापेक्षा एक सुंदर नजारे बघायला मिळाले होते. त्यामानाने हा भाग थोडा एकसुरी वाटला. माणसाच्या अपेक्षा वाढत जातात त्या अशा!
धरणाच्या भिंतींवरून वाट जात होती. पास्टर्झेचा ट्रेल संपत आला होता. समोर हिरव्यानिळ्या डोंगररांगा पसरलेल्या होत्या. मागे पाहावं तर नितळ पाण्यात पडलेलं ग्रोसग्लोक्नरचं प्रतिबिंब खुणावत होतं. तो विलोभनीय परिसर डोळ्यांत साठवत थोडं रेंगाळलो.
धरण मागे राहिलं आणि शेवटचा रस्त्यापर्यंत नेऊन सोडणारा चढ लागला. बरोबर चालणार्या इतर ट्रेकर्सबरोबर आम्हीही नकळत लांबून वळसा घेऊन जाणार्या वाटेला लागलो. या वाटेनं थोडं दमवलंच. एकदाचं Glocknerhaus ला येऊन पोहोचलो. इथून परतीची बस पकडता येणार होती. तिथल्या कॅफेमध्ये उदरभरण केलं.
बाहेर नॅशनल पार्कच्या परिसराबद्दल माहिती लावलेली होती. तिथेच पास्टर्झे ग्लेशिअर ट्रेलचा बोर्डही होता. त्यावर रेखलेल्या मार्गावरून मनाने पुन्हा एकदा फिरून आले. आणि अवघ्या काही तासांत निसर्गाने दाखवलेल्या जादूई रूपाने पुन्हा एकदा स्तिमित केलं...
प्रतिक्रिया
6 Nov 2018 - 1:23 pm | यशोधरा
भन्नाट! असे पहाड आणि दऱ्या खोऱ्या पाहिल्या की धोकटी खांद्यावर मारून प्रवासाला निघावंसं वाटतं!
10 Nov 2018 - 5:27 am | निशाचर
येस्स! घरदार विसरून वारा प्यायलेल्या वासरासारखं उधळावंसं वाटतं.
6 Nov 2018 - 2:02 pm | टर्मीनेटर
खूप छान. फोटो पण लाजवाब आहेत.
6 Nov 2018 - 6:08 pm | सिरुसेरि
सुंदर लेख आणी फोटो .
6 Nov 2018 - 7:57 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त झालेली दिसतेय भटकंती आणि सगळे फोटोपण छान. एखादा देश नीट पहायचा असेल तर तिकडे जाउन राहणे हाच मस्त पर्याय आहे. ८-१० दिवसात धावपळ करत नुसता भोज्जा करुन येणे काही खरे नाही. पण सर्वानाच ती संधी मिळत नाही. तुम्हाला ती मिळाली आणि ती तुम्ही आमच्या बरोबर शेअर केलीत त्याबद्दल धन्यवाद!!
11 Nov 2018 - 2:35 am | निशाचर
खरं आहे. मीही ऑस्ट्रियाला राहत नाही, पण युरोपात असल्याने सहलीसाठी जाणं सहज शक्य होतं. शिवाय स्वित्झर्लंडएवढी महागाई किंवा पर्यटकांची गर्दी नसल्यामुळे आल्प्समध्ये ट्रेकिंगसाठी ऑस्ट्रिया माझा आवडता देश आहे.
11 Nov 2018 - 2:36 am | निशाचर
प्रतिसादासाठी आभार!
6 Nov 2018 - 9:37 pm | तुषार काळभोर
आल्प्स आणि तुमचे फोटो पण...
7 Nov 2018 - 12:57 pm | अनिंद्य
@ निशाचर,
ग्रोसग्लोक्नर ! क्या बात ! केबलकारचा सुखासीन पर्याय डावलून ट्रेक करण्यासाठी निग्रह, फिटनेस आणि थोडा अवखळपणा लागतो. तुम्ही ते जमवता त्याचे कौतुक वाटते.
कभी मेरी तलब कच्चे घड़े पर पार उतरती है
कभी महफ़ूज़ कश्ती में सफ़र करने से डरता हूँ
लेख आवडला.
11 Nov 2018 - 2:48 am | निशाचर
वाह! सुरेख प्रतिसादासाठी आभार!
बाकी निग्रह, फिटनेस वगैरेंच्या माझ्या मर्यादा मला चांगल्याच ठाऊक आहेत :)
7 Nov 2018 - 6:10 pm | सुधीर कांदळकर
मस्त नयनरम्य, नेत्रसुखद वगैरे भटकन्ती आवडली. धन्यवाद.
7 Nov 2018 - 7:45 pm | प्रचेतस
अफाट सुंदर आहे हे.
7 Nov 2018 - 8:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर ट्रेकवर्णन आणि फोटो !
8 Nov 2018 - 6:36 pm | स्वाती दिनेश
वर्णन आणि फोटो दोन्ही आवडले.
आमच्या ग्रोसग्लोकनरस्ट्रासंच्या भटकंतीची आठवण झाली.
स्वाती
11 Nov 2018 - 2:50 am | निशाचर
धन्यवाद! तुमच्या ट्रिपचा उल्लेख मी लेखात केला आहे.
9 Nov 2018 - 11:52 am | मुक्त विहारि
एकूण किती वेळ लागला?
11 Nov 2018 - 5:21 am | निशाचर
ट्रेकला सुमारे साडेतीन तास लागले.
11 Nov 2018 - 10:56 am | मुक्त विहारि
ओके...
धन्यवाद...
11 Nov 2018 - 5:04 am | निशाचर
टर्मीनेटर, सिरुसेरि, पैलवान, सुधीर कांदळकर, प्रचेतस आणि डॉ म्हात्रे, प्रतिसाद आणि प्रोत्साहनासाठी धन्यवाद!
11 Nov 2018 - 5:58 pm | कुमार१
आल्प्स आणि तुमचे फोटो.
पु प्र शु
12 Nov 2018 - 8:26 pm | सविता००१
12 Nov 2018 - 8:26 pm | सविता००१
12 Nov 2018 - 8:26 pm | सविता००१
12 Nov 2018 - 8:52 pm | सविता००१
आणि लिखाण
13 Nov 2018 - 4:46 am | निशाचर
कुमार१ आणि सविता००१, धन्यवाद!
17 Nov 2018 - 1:12 am | जुइ
आल्प्सचे रसभरीत वर्णन कितीही वेळा वाचले तरी प्रत्येक वेळी नवीन भासते. तुम्ही अगदी ओघवत्या शैलीत वर्णन केले आहे. फोटोही अगदी अप्रतिम आहेत.