खाली डोकं वर पाय!

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

खाली डोकं वर पाय!

.
आम्हाला आल्प्सच्या डोंगरमाळांमधल्या छोट्या, टुमदार गावातून, दर्‍यातून फिरायला, राहायला आवडतं. साल्झबुर्ग, तिरोल प्रांतात अशी अनेक सुंदर खेडी आहेत.
असंच एकदा इस्टरची जोडून सुटी आली असताना तिरोलमधल्या कुठल्या तरी प्रदेशात जाऊ या असं आम्ही ठरवलं. तिरोल हा इटालीची उत्तरेकडची बाजू आणि ऑस्ट्रियाच्या पश्चिमेकडचा आल्प्सच्या डोंगरमाळांमध्ये वसलेला जवळजवळ २६००० चौ.कि.मी.चा फार सुंदर आणि अगदी ऐतिहासिक प्रदेश! त्यातल्याच वीरबेर्ग ह्या श्वाझ जिल्ह्यातल्या अगदी डोंगराच्या खांद्यावर वसलेल्या एका लहानशा गावातल्या रेजिना हॉटेलमध्ये आम्ही बुकिंग केलं. फ्रँकफर्टहून त्या प्रदेशात पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सात वाजायला आले. ह्या अशा चिमुकल्या खेड्यांमध्ये, डोंगरातल्या गावांमध्ये सातच्या सुमाराला सगळे आपापल्या घरात मुलाबाळांबरोबर संध्याकाळचा वेळ एकत्र घालवत असतात. त्यामुळे दुकानं, मॉल्स सहाच्या सुमारालाच बंद होतात. अगदी दूध, दही जरी हवं असेल, तरी पेट्रोल पंपावरच्या लहानशा दुकानांचा आधार घ्यावा लागतो ह्याची कल्पना असल्याने वीरबेर्गमध्ये शिरत असताना पायथ्याशी असलेल्या एका चिनी उपाहारगृहाकडे आम्ही मोर्चा वळवला आणि 'चिनी आमटीभात' खाऊन घाट चढायला सुरुवात केली.. हवेत छान गारवा होता आणि इस्टरचा सुमार असला तरी डोंगरात भरपूर बर्फही होता. अटकर वळणांवळणांचा घाट चढून एका पठारावर आलो. आता उजव्या बाजूला दरीमधली छोटी घरं होती, तर समोर पसरलेला विशाल आल्प्स! माउंटन फेसिंग बाजू पाहिजे असं सांगायला हवं बरं, असं एकमेकांना बजावत हॉटेल रेजिनामध्ये आत शिरलो, तर "सगळं हॉटेल डोंगरातच आहे" असं मंद हसत सांगत स्वागतिकेने आमच्या हातात किल्ल्या ठेवल्या. दुसर्‍या मजल्यावरच्या आमच्या खोलीत शिरलो. मोठ्ठा प्रशस्त व्हरांडा असलेली मागच्या बाजूची खोली बघून पुढच्या बाजूची खोली का नाही दिली ह्या बयेने, असं बडबडतच मी व्हरांड्यात जाणारं दार उघडलं, तर काय? खरंच तो व्हरांडाच डोंगराच्या खांद्यावर होता आणि बाजूच्या खिडकीतून पाहिलं तर समोर पसरलेला आल्प्स! रिसेप्शनवरची बया बरोबर बोलली रे.. सगळं हॉटेलच डोंगरात आहे! आता दिवसभराच्या प्रवासाचा थकवा हळूहळू जाणवायला लागला होता. रफी, किशोरची गाणी ऐकत मग कधी झोपी गेलो समजलं नाही.
.
.
प्रसन्न सकाळी उठून कॉफीचा मोठ्ठा मग भरून घेऊन व्हरांड्यात आले. त्या विशाल डोंगरावर चमकणारा बर्फ बघताना डोळेही चमकू लागले. भटकायला जायचा उत्साह आला. भराभर आटपून , रेजिनाचा भरपेट नाश्ता करून आम्ही बाहेर पडलो. गाडीने एक-दोन वळणं घेतली असतील नसतील, तर 'हाउस ष्टेट कोफ' म्हणजे 'अपसाइड डाउन हाउस 'अशी पाटी दर्शवणारे बाण दिसायला लागले, म्हणून कुतूहलाने तिकडे आमची गाडी वळली, तर कोपर्‍यावर खरंचच एक टुमदार घराच्या दर्शनी भागात 'हाउस ष्टेट कोफ' अशी मोठ्ठी पाटी आणि कुतूहल चाळवेल अशा बेताने खाली डोकं वर पाय करून असलेलं ते घर दिसलं. साहजिकच नकळत पार्किंगमध्ये आमची गाडी स्थिरावली. काउंटरवर तिकिटं काढून आम्ही त्या घराच्या अंगणात आलो, तर चक्क एक दुमजली घर शीर्षासनात उभं होतं.
.
..
.
चार-पाच पायर्‍या चढून आत आल्यावर आपल्याला सरळ उभं राहण्यासाठी किती कसरत करावी लागते आहे ते समजतं. आत शिरताच उजव्या बाजूच्या गराजमध्ये दिसते ती फोक्सवागन बीट्ल, पण ती छ्ताला वटवाघळासारखी चिकटली आहे. आत शिरताच बैठकीच्या खोलीतल्या सगळ्या वस्तू छताला उलट्या चिकटलेल्या.. सोफा, कपाट, वॉल युनिट, सेंटर टेबल सगळं छताला चिकटलेलं. बुद्धिबळाचा पट छ्ताला चिकटून मांडला आहे आणि तो खेळण्यासाठी खुर्च्याही सज्ज आहेत.
एका कोपर्‍यातला फिशटँक आणि त्यात पोहत असलेल उलटे मासे बघता बघता आपण आत शिरतो, तर फ्रीज, कुकिंग रेंज, टेबल, खुर्च्या, मायक्रोव्हेव, स्वयंपाकघरातली कपाटं आणि त्या कपाटातल्या कपबशा, भांडी, पातेली अशा वस्तूही सगळ्या उलट्या ..
जिना चढून वर जाताना वाकुल्या दाखवणारं उलट्या काट्यांचं घड्याळ दिसतं. वरच्या मजल्यावर असलेला शयनकक्ष, त्यातील पलंग, पलीकडची मुलांची खोली, तिच्यातली सगळी खेळणी उलटी छताला चिकटली आहेत. मोत्या किवा वाघ्या कुत्र्याचं आसनही छताला आहे, शिवणयंत्र, वॉशिंग मशीन, अगदी कपडे वाळत घालायचा स्टँडही छताला चिकटून उलटा लटकला आहे. नळही उलटे आहेत. एवढंच नव्हे, तर अगदी टॉयलेटपासून सर्वच गोष्टींनी, सर्वच वस्तूंनी आपली मितीच बदलली आहे. वळचणीचं पाणी आढ्याला जाताना पाहताना आपलंही डोकं गरगरून आता ते उलटं होतं की काय, असं वाटून आपण घराबाहेर येतो.
.
.
.
.
.
.
.
.
बाहेरच्या अंगणात घराभोवती फेरी मारली की अगदी बारीकसारीक वस्तूंचा विचार केलेला आहे हे समजतं. खिडक्यांच्या कड्या, दरवाज्यांच्या बिजागर्‍या, व्हरांड्याचे कठडे, बाहेरच्या अंगणातले शोभिवंत पुतळे सारं काही उलटं! बाल्कनीतल्या कुंड्यांपासून झाडांना पाणी घालायच्या नळीपर्यंत सगळ्यांना शीर्षासनात ठेवलं आहे.
ह्या असल्या भन्नाट घराच्या भन्नाट कल्पनेचा जन्म दोन मित्रांच्या बिअर टेबलवरच्या गप्पांमधून झाला. क्लाउडियस गोलोस आणि सेबास्टिन मिकिसिक ह्या हॅम्बुर्गमध्ये वाढलेल्या दोन पोलिश आर्किटेक्ट मित्रांच्या डोक्यात ही भन्नाट कल्पना बिअरचे प्याले रिचवताना आली. आपण ट्रासनहाइडंमध्ये एक दुमजली उलटं घर बांधू या असा विचार त्यांनी केला आणि मग ही चंद्रलोकातली कल्पना सत्यात उतरवण्यासाठी दोघांनी चंग बांधला. अनेक महिने, वर्षं गेली, पण ही कल्पना सत्यात उतरण्यासाठी मात्र २००६ साल उजाडलं. बांधकाम खात्यातून मंजुरी घेणं, छताला ६% इन्क्लिनेशन असलेल्या ह्या घरात येणार्‍या मंडळींच्या सुरक्षिततेची हमी अधिकार्‍यांना पटवून देणं ह्यासारख्या अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. दोन वर्षांच्या अविरत परिश्रमांनंतर सप्टेंबर २००८मध्ये हे त्यांच्या स्वप्नातलं घर उभं राहिलं आणि तेथे येणार्‍या लोकांसाठीचे आकर्षण केंद्र बनलं. ह्यावरून स्फूर्ती घेऊन २०१२मध्ये इरेक ग्लोवाकी आणि मारेक रोझान्स्की ह्या दोन आर्किटेक्ट मित्रांनी आठ महिन्यांच्या कष्टातून टेर्फन्स्मधल्या ह्या घराला ५ मे २०१२ रोजी शीर्षासनात उभं केलं आणि ह्या जादूई, परिकथेतल्या घराची निर्मिती केली. काहीतरी वेगळं, हटके पर्यटकांना आकर्षित करून घेता येईल हाच त्यामागचा उद्देश!
पण एक मात्र आहे, ह्या नवलाईच्या घरात आपण वय विसरून रमतो. सान-थोर सारे जण ह्या स्वप्नवत खाली डोकं वर पाय करून बसलेल्या मंतरलेल्या घरातून बाहेर येतात, पण एक मन मात्र त्या जादूमध्ये गुंतून पडलेलं असतं..
(काही प्र.चित्रं आंजावरून घेतली आहेत.)

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

वेगळ्याच ठिकाणाची ओळख करून दिलीस. मस्त लिहिलं आहेस. आवडलं.

सविता००१'s picture

6 Nov 2018 - 1:34 pm | सविता००१

कसलं मस्त आहे हे.. पहायला मिळायला हवं. मस्त लिहिलं आहेस स्वातीताई

गुल्लू दादा's picture

6 Nov 2018 - 6:00 pm | गुल्लू दादा

चित्र बघून या स्थळाला भेट देण्याची खूप इच्छा झाली. धन्यवाद...!

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 8:41 pm | तुषार काळभोर

अद्भुत!!

राघव's picture

1 Dec 2018 - 12:48 pm | राघव

खरंच अद्भुत!! कल्पनाच कसली भारीये! आवडले. धन्यू!!

पद्मावति's picture

6 Nov 2018 - 8:44 pm | पद्मावति

चित्र बघून या स्थळाला भेट देण्याची खूप इच्छा झाली. अगदी, अगदी. मस्तं लेख स्वाती.

टर्मीनेटर's picture

6 Nov 2018 - 10:44 pm | टर्मीनेटर

कसलं चमत्कारिक घर बांधलय. फोटो बघूनही गरगरायला लागलं.
अजब गोष्टीची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

6 Nov 2018 - 11:34 pm | मुक्त विहारि

जत्रेतले, बारीक-जाड, करणारे आरसे बघीतले होते. त्या आरशांची आठवण झाली.

सुधीर कांदळकर's picture

7 Nov 2018 - 7:03 pm | सुधीर कांदळकर

मस्त. मजा आली. धन्यवाद.

प्रमोद देर्देकर's picture

8 Nov 2018 - 8:09 am | प्रमोद देर्देकर

अगदी नवीन गोष्टींची ओळख झाली .
पण मग छताला असलेले पंखे झुंबर लाईट यांना खाली जागा द्यायला हवी होती. ते काही दिसत नाही.

अनिंद्य's picture

12 Nov 2018 - 11:40 am | अनिंद्य

@ स्वाती दिनेश,

हाउस ष्टेट कोफ - हे शीर्षासन आवडले.
---- भन्नाट कल्पनेचा जन्म दोन मित्रांच्या बिअर टेबलवरच्या गप्पांमधून ..... हे ही आवडले :-)

दुर्गविहारी's picture

12 Nov 2018 - 11:44 am | दुर्गविहारी

अगदी हटके ठिकाणाची ओळख करून दिलीत. या घराचे फोटो बघीतले होते. तुमच्यामुळे सविस्तर ओळख झाली.
बाकी त्या घरात पाली होत्या का हो? आणि त्या पायात फिरत होत्या का? ह.घ्या.हे वे. सां.न.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2018 - 11:14 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर अनवट जागा ! भेट द्यायची तीव्र इच्छा होतेय !

नंदन's picture

14 Nov 2018 - 1:14 am | नंदन

छोटेखानी प्रवासवर्णन आवडलं - शब्दशः चक्रावून टाकणारं घर आहे! आल्प्सचे फोटोही खासच.

निशाचर's picture

14 Nov 2018 - 4:03 am | निशाचर

लेख आवडला.

जुइ's picture

18 Nov 2018 - 6:37 am | जुइ

अतिशय सुंदर वर्णन केले आहे. 'हाउस ष्टेट कोफ' येथील सर्व फोटो लॅपटॉपचा स्क्रीन उलटा करून पाहण्यात मजा आली! हाउस ष्टेट कोफ' इतक्या मोठ्या प्रमाणावर नाही पण असेच काहीसे कॅलिफोर्नियातील मिस्टरी स्पॉट येथे पाहायला मिळते.

अनिंद्य's picture

19 Nov 2018 - 11:25 am | अनिंद्य

व्हिएन्नाचे Erwin Wurm 'हाऊस अटॅक' पण असेच, पण त्याला फक्त Conceptual Art म्हणता येईल. हे ष्टेट कोफ भारी आहे, खरोखरीचे खाली डोके वर पाय.

चित्रगुप्त's picture

1 Dec 2018 - 1:46 pm | चित्रगुप्त

खूपच छान. वाचून हा सर्व प्रदेश बघायला हवा असे वाटले. साल्स्झबुर्गात मोझार्टचे घर वगैरे काही आहे का ?

स्वाती दिनेश's picture

6 Dec 2018 - 8:19 am | स्वाती दिनेश

आहे ना, साल्झबुर्ग मध्ये मोझार्ट चे घर .. जिथे तो जन्मला व राहिला अशी दोन्ही घरे आहेत . तिथे त्याच्या स्मृती जपल्या आहेत, पण हे ठिकाण साल्झबुर्ग पासून दूर आहे.
स्वाती

ऐकाव ते नवलच. किती डोक चालवाव लागल असेल त्यांना प्रत्येक गोष्ट उलटी करताना. खुप छान नविन माहिती मिळाली स्वाती.