अटक मटक, सारण चटक!

सविता००१'s picture
सविता००१ in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

अटक मटक, सारण चटक!

दोस्तहो, दिवाळीतलं गोग्गोड खाताना मध्येच काही चटकदार हवं असं वाटतंय ना? मग आता मी देतेय दोन पाककृती. आता दिवाळी म्हटलं की कॅलरी, व्यायाम, वजन असले शब्द ऐकले की पापच लागणार बरं का. त्यामुळे या पाककृती दिवाळी पेश्शल आहेत. (म्हणजे थोडक्यात तळलेल्या आहेत) नाहीतरी सध्या तेला-तुपाच्या कढया असतीलच ओट्यावर. तर पहा करून. एक आहे चीझी मिरची वडा आणि दुसरी चीझी मॅट/लहरिया सामोसा. यात पाककृती दोन असल्या, तरीही मी सारण मात्र एकच वापरलं आहे. मला मिरची वडा करून पाहायचा होता, म्हणून सारण केलंच होतं आणि लहरिया/मॅट सामोसा करता येतो का तेही पाहायचं होतं. त्यामुळे मी दुसरं नेहमीचं सामोशाचं सारण केलंच नाही. पण त्यामुळे घरचे आणि ज्यांना टेस्ट करायला दिला असे दारचे सगळेच खूश झालेत. तर आता पाहू पहिली पाककृती -

१. चीझी मिरची वडा:
मिरची वडा हा जोधपूरमध्ये अगदी फेमस आहे. मग मी यात काय केलंय? तर फक्त सारण बदलून मज्जा आणली आहे.

साहित्य - भावनगरी मिरच्या १ पाव, प्रत्येकी १ कांदा, ढब्बू / सिमला मिरची, टोमॅटो, ५० ग्रॅम स्वीट कॉर्न, ८-१० लसणीच्या पाकळ्या, २ हिरच्या मिरच्या, पनीर २ इंच चौकोनी तुकडा, चीज हवं तेवढं, ओरॅगॅनो आणि चिली फ्लेक्स - आवडीनुसार, मैदा २ टेबलस्पून , आवश्यकतेनुसार पाणी, मीठ, ब्रेड क्रंब्स आणि तळण्यासाठी तेल. हुश्श.

कृती - भावनगरी मिरच्या आतून साफ करून घ्याव्या. देठ मात्र तसंच ठेवायचं. सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्यायच्या. त्यात टोमॅटो चिरताना गर आणि बिया घ्यायच्या नाहीत.

एका पॅनमध्ये चमचाभर तेल घेऊन त्यात हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण, कांदा घालून परता. कांदा नेहमीसारखा गोल्डन ब्राउन वगैरेची आवश्यकता नाही. थोडासा मऊ झाला की बास. त्यात मक्याचे दाणे आणि शिमला मिरची घालून परत थोडे परता. ओरॅगॅनो आणि चिली फ्लेक्स घाला. चवीनुसार मीठ घाला. सारण तयार. हे पूर्ण गार झालं की त्यात किसलेलं पनीर आणि चीज, चिरलेला टोमॅटो घाला.
साहित्य - .

सारण - .

आता मैद्यात पाणी मिसळून त्याची घट्टसर पेस्ट करा. त्यातही चिमूटभर मीठ आणि थोडे चिली फ्लेक्स घाला.
कढईत तेल तापत ठेवा. प्रत्येक मिरचीत हे सारण घट्ट दाबून भरा.
सारण भरलेल्या मिरच्या - .

ही मिरची आधी मैद्याच्या पेस्टमध्ये घोळवून ब्रेड क्रम्समध्ये घोळवा. ही मिरची बाहेरून खूप गुळगुळीत असते, त्यामुळे परत ती पेस्टमध्ये बुडवून परत बेडच्या चुर्‍यात घोळवा. तळा आणि टोमॅटो केचपबरोबर खा.

नेहमीचंच सारण न भरता दुसरं सारण वापरल्याने याची टेस्ट आणखी छान लागते.
मूळ रेसिपी मागे कधीतरी नेटवर पाहिली होती. आता त्यात घरातल्यांच्या आवडीनुसार हवा तसा बदल करून हा मिरची वडा केला आहे. पाहा तुम्हाला कसा वाटतो ते.

.

पाककृती २ - चीझी मॅट /लहरिया सामोसा

साहित्य -
सामोशाच्या आवरणासाठी - २०० ग्रॅम मैदा, २ टेबलस्पून तेल, चवीपुरतं मीठ, चिमूटभर ओवा, आवश्यकतेनुसार पाणी.
सारणसाठी - वरीलप्रमाणेच, म्हणजे प्रत्येकी १ कांदा, ढब्बू / सिमला मिरची, टोमॅटो, ५० ग्रॅम स्वीट कॉर्न, ८-१० लसणीच्या पाकळ्या, २ हिरच्या मिरच्या,पनीर २ इंच चौकोनी तुकडा, चीज हवे तेवढे, ओरॅगॅनो आणि चिली फ्लेक्स - आवडीनुसार, तळण्यासाठी तेल.

कृती - पहिल्यांदा मैद्यात कडकडीत तेलाचे मोहन घाला. हे मिश्रण चमच्याने एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ आणि ओवा घालून चांगले एकत्र करून घ्या. मैदा थोडा रवाळ दिसू लागतो आणि मुटका होतो सहज मुठीत घेतला तर. असं झालं म्हणजे आपलं मोहन नीट आहे आणि सामोसा नक्की खुसखुशीत होणार. आता त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर गोळा मळून अर्धा तास झाकून ठेवा. वर दिल्याप्रमाणे सारण करून घ्या.

आता मॅट सामोसा करताना मैद्याची मोठ्या लिंबाच्या आकाराची गोळी घेऊन तिची लांबट पोळी लाटा. ती मधून कापून मग अधिक + असा आकार होइल असे तिचे दोन भाग एकावर एक ठेवा. मध्ये सारण घाला आणि एका बाजूची घडी त्यावर नीट बसवा. गरज लागली तर पाण्याचं बोट फिरवा, म्हणजे नीट चिकटेल. तशीच दुसरीही बाजू चिकटवा. उरलेल्या दोन बाजूंना सुरीने चिरा पाडा आणि एकदा एका बाजूची पट्टी मध्यभागावर बसवा आणि नंतर दुसर्‍या बाजूची पट्टी त्यावर आडवी बसवा. अशा तर्‍हेने त्या सामोशाचं चटईसारखं डिझाइन तयार होईल. हा झाला मॅट सामोसा.

मी खाली सर्वसाधारण कल्पना यावी म्हणून एक कोलाज देतेय. आत मॅट सामोसा आणि लहरिया सामोसा दोन्ही कसे केले ते आहे.

.

लहरिया सामोसा करताना पहिल्यांदा अशीच लांब पोळी लाटून तिचे मधून दोन भाग करायचे. एका भागाला अशाच चिरा द्यायच्या आणि त्यावर दुसरा प्लेन भाग पाण्याने नीट चिकटवायचा. आता नेहमीच्या सामोशासारखा त्याला आकार देऊन सारण भरा आणि चिकटवा. या सामोशाला वरून आडव्या पट्ट्यांचं डिझाइन दिसतं. हा लहरिया सामोसा.

.

आता हे सामोसे नेहमीप्रमाणेच तेल तापवून घेऊन मग मंद आचेवर सावकाश तळा.

मॅट/लहरिया सामोसा तयार आहे.

.

अतिशय खुसखुशीत आणि सुंदर सामोसे झाले हे. यात सारण वेगळं असल्याने नेहमीच्या पुदिना चटणी किंवा चिंचगुळाच्या चटणीबरोबर न देता टोमॅटो केचपबरोबरच दिलं मी.

आमच्या घरात तरी मिरची वडा छान झाला की सामोसा यावर दोन तट पडलेत. तुम्ही पाहा आता तुम्हाला कसं वाटतंय ते.

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

6 Nov 2018 - 10:37 am | टर्मीनेटर

दोन्ही पाकृ. आवडल्या.
खाऊन बघितल्या नसल्या तरी 'चीझी मिरची वडा' दोघांत जास्त आवडेल असा अंदाज आहे :)

नूतन सावंत's picture

6 Nov 2018 - 11:08 am | नूतन सावंत

त्या भरलेल्या मिरच्या कसल्या किलर दिसताहेत.व्हेज निर्चीवड झकास आहे,प। मला समोसा आवडला.थफी मूग डाळ किंवा मोडवलेले मूग घातले तर वनमील डिश मबानू ही वापरता येईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Nov 2018 - 11:27 am | डॉ सुहास म्हात्रे

दोन्ही पाकृ मस्तं आहेत. फोटो बघूनच गट्टम कराव्याश्या वाटतात !

स्वाती दिनेश's picture

6 Nov 2018 - 11:41 am | स्वाती दिनेश

मस्त मस्त दिसत आहेत ग दोन्ही.. दिवाळी फराळ करता करता उघडला धागा तरी तों पा सु :)
स्वाती

हे सगळं भारी वगैरे आहेच, ते ठीकच, पण खायला कधी म्हणे बोलवतेस? वो मुद्दे की बात बोलो पयले!

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 1:42 pm | तुषार काळभोर

वडा अन समोसा दोन्ही एकदम मस्त!

स्मिता.'s picture

6 Nov 2018 - 5:18 pm | स्मिता.

दोन्ही पाकृ मस्तच पण मिरचीवडा पाहून तोंपासु.

अभ्या..'s picture

6 Nov 2018 - 5:27 pm | अभ्या..

दोन्ही भारी आहेत.
आंध्रा भजीचं व्हॅल्यु अ‍ॅडिशन आवडलं.
मॅट समोशाचं टेक्शचर अप्रतिम.
.
प्रेझेंटेशन आणि फोटोग्राफी छानच.

सस्नेह's picture

6 Nov 2018 - 7:07 pm | सस्नेह

काय फोटो !!
फराळ फिका झाला की बघून :)

मुक्त विहारि's picture

6 Nov 2018 - 10:44 pm | मुक्त विहारि

एखाद्या शनिवारी निवांत पणे करून खायला पाहिजे.

विजुभाऊ's picture

7 Nov 2018 - 6:42 am | विजुभाऊ

आहाहा

मस्तच! दोन्ही प्रकार जबरदस्त आहेत.

मिरची वडा मी पारंपरिक पद्धतीचा करुन पाहिलाय. पण हे समोसे अगदीच नाविन्यपूर्ण दिसत आहेत!

असेच सारण भरुन बनवलेला कटोरी चाट सारखा प्रकार मी एकदा खाल्ला होता आणि खूप आवडला होता, त्यामुळे हे समोसेही मस्तच लागत असणार. :)

अनिंद्य's picture

9 Nov 2018 - 1:01 pm | अनिंद्य

@ सविता००१ ,

मिरचीबड्यांबद्दल थोडा प्युरिस्ट आहे म्हणून हे सारण वापरणार नाही कदाचित, पण लहरीया समोसामध्ये एकदम धावेल ! म्हणून मी समोसा गटात :-)

मॅट व्हिव समोसा - सारण आणि डिझाईन दोन्ही नाविन्यपूर्ण आहे.

हे गिफ्ट माझ्याकडून !

सविता००१'s picture

9 Nov 2018 - 1:08 pm | सविता००१

आता हे पण पहाते सामोसे

सविता००१'s picture

9 Nov 2018 - 1:08 pm | सविता००१

आता हे पण पहाते सामोसे

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2018 - 1:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त पाकृ.

समोसे खाण्याइतकेच दिसायलाही रोचक आहेत !

जुइ's picture

10 Nov 2018 - 11:24 pm | जुइ

अफलातून पाकृ आहेत दोन्हीही. सामोसे खायला तुझ्याकडेच यावे लागेल. फोटोही खासचं!

पद्मावति's picture

11 Nov 2018 - 2:30 am | पद्मावति

आहाहा....दोन्ही प्रकार केवळ अफलातुन. क्लास्स!

फ्रेनी's picture

11 Nov 2018 - 9:50 am | फ्रेनी

दोन्ही प्रकार भारी