प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते ...
पुरुष जरा मूर्खच असतात की काय कोण जाणे? पण आव काय आणतात, जणू काही साऱ्या जगाचे ज्ञान यांनाच आहे! आणि स्वतःबद्दल किती फाजील आत्मविश्वास? जरा दोन-तीन मुलींनी यांच्याकडे एकदादोनदा हसून पाहिले की हे एकदम आकाशात! अविनाशने मला प्रपोज करावे? मला.. आसावरी देशमुखला?
माझे समाजातील स्थान काय? त्याचे काय? माझे बाबा बँकेत एवढे मोठे ऑफिसर! पाषाणला आमचा खूप मोठा बंगला आहे. आई नूतन विद्यालयात मुख्याध्यापिका आणि मी त्यांची एकुलती एक मुलगी! कॉम्प्युटर इंजीनिअर आणि एका खूप मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी. काही दिवसांपूर्वीच एका प्रोजेक्टसाठी मी अमेरिकेला सहा महिन्यासाठी जाऊन आले. (माझे बॉस माझ्या कामावर खूप खूश आहेत, बरे का!) आणि दिसायला तर मी लाखात एक! (असे माझ्या मैत्रिणी नाइलाजाने म्हणतात!) खरे म्हणजे माझा स्वच्छ गोरा रंग, निळे डोळे आणि सोनेरी केस लोकांच्या अगदी डोळ्यात भरतात. आता माझा बांधा थोडा नाजूकच आहे आणि मला चश्मा आहे हे खरे, पण मला ते शोभूनच दिसते. (आणि माझ्या बाबांचेही तेच मत आहे.) नाहीतरी आजकाल स्लिम दिसण्याची फॅशनच आहे. आणि मी तशी सर्व बाबतीत आधुनिक आहे. आणि लेन्स घातल्या की झाले! मग मी अगदी ऐश्वर्या रायसारखी दिसते... आता आपण स्वतःच तसे म्हणू नये म्हणून मी चारचौघात तसे सांगत नाही, पण माझ्या खूप मित्रांच्या डोळ्यात मला तसे जाणवते. माझा बालपणापासूनचा मित्र, हा अविनाश इनामदार मात्र मला म्हणतो,
“आसावरी, तू कुणासारखी नाहीस. तुझ्यासारखी तूच एकमेव आहेस!”
त्याला मी खूप आवडते. मलाही तो आवडतो, पण तो जरा.. जरा म्हणजे काय, खूपच मध्यमवर्गीय मानसिकतेचा आहे! त्याने मला प्रपोज करावे? आम्ही शाळेत एकत्र होतो. कॉलेजमध्येसुद्धा एकत्रच होतो. पण तो आमच्या हाय क्लास ग्रूपमध्ये फिट होत नसे. त्याचा सदानकदा अभ्यास आणि बुद्धिबळ. आमच्या कॉलेजचा सर्वात हुशार मुलगा होता तो आणि तो कॉलेजचा बुद्धिबळ चॅम्पिअनसुद्धा होता तो. फायनल परीक्षेत तो पहिला आला. न येईल तर काय? सदानकदा अभ्यासात बुडालेला असायचा.
त्याच्या उलट माझा (होय, माझाच तो!) मोहन सबनीस. एकदम रुबाबदार आणि बिनधास्त! टेनिस काय सुरेख खेळायचा. गोरापान आणि बलदंड. अभ्यासात काही खास हुशार नव्हता तो, पण सगळ्या मुली मरायच्या त्याच्यावर. मी त्याची खास मैत्रीण. कॉलेजला दांड्या मारून आम्ही कॅन्टीनमध्ये किंवा टेनिस ग्राउंडवर पडीक असायचो. सगळ्या कॉलेजमध्ये आमचे कपल प्रसिद्ध होते. आम्ही लग्न करणार असे सगळे म्हणत. आमचे तसे काही बोलणे झाले नव्हते, पण बहुतेक त्याने आणि मीसुद्धा तसे गृहीत धरले होते. आता मीच जर हो म्हणायला तयार होते, तर तो तर एका पायावर तयार असणार ना?
कॉलेजनंतर मला मस्त नोकरी लागली. मला परदेशीसुद्धा जायचा चान्स होता. थोडे जग फिरून येऊ मग लग्नाचा विचार करू, असे मी बाबांना सांगितले. त्यांनी जरा नाखुशीनेच होकार दिला. मोहनलाही बंगलोरला नोकरी लागली. त्याच्या वडिलांची तिथेच स्वतःची कंपनी होती, त्यामुळे मोहन तिकडे गेला. त्याच वेळी माझे सिंगापूरला ट्रेनिंग होते. त्यामुळे आमची त्या वेळी भेट झाली नाही. पण आम्ही चॅटवर बऱ्याच वेळा भेटत होतो. मधून मधून काही ना काही निमित्त करून तो मला फोनही करायचा. तो माझ्या प्रेमात आकंठ बुडलाय याबद्दल मला शंका नव्हती.
त्यातच माझे अमेरिकेत प्रोजेक्ट आले. आमचे चॅट आणि फोन थोडे कमी झाले. मोहन मला मधून मधून फोन करतच होता. पण मी म्हणते ते काही खोटे नाही! पुरुषांना जरा अक्कल कमीच असते. मोहन लग्नाविषयी मात्र काहीच बोलत नव्हता. खरे म्हणजे या बाबतीत पुरुषांनी पुढाकार घ्यायला नको का? आता भारतात परत आले की मी त्याला भेटायला बंगलोरला जाणारच!
शेवटी एकदाची मी भारतात परत आले. दुसर्या दिवशी संध्याकाळी अविनाश आमच्या घरी हजर. मी इकडे बंगलोरला केव्हा जायचे याचे प्लॅनिंग करत होते, आणि हा अचानक कसा काय आला?
“अरे, तू कसा आलास? तुला मी आल्याचे कळले वाटते?” मी त्याचे स्वागत केले. तो माझा चांगला बालपणापासून मित्र! घरातले सगळे त्याला महितीचे.
“मी बाबांच्या संपर्कात होतो की! तुझ्याशी चॅट करायचा मी प्रयत्न केला, पण नाही जमले. तू नेमकी तेव्हा मिटिंगमध्ये होतीस. मग मला जर्मनीला जावे लागले.” अरविंद म्हणाला.
“अरे वा, जर्मनी का? तू कशावर काम करतोयस सध्या?” मला हा भेटल्याचा आनंद झाला होता. पण माझ्या डोक्यात बंगलोर!
“मी सध्या रोबोटिक्सवर काम करतोय. मी भारतात एक महिनाच आहे. परत जर्मनी!” तो खूपच वरच्या लेव्हलवर काम करत होता! मला जरा असूयाच वाटली. मग आमचे माझ्या प्रोजेक्टबद्दल बोलणे सुरू झाले. पण मला जरा तो अस्वस्थच वाटला. मी विचारले त्याला,
“काही प्रॉब्लेम आहे का? तू जरा अस्वस्थ वाटतो आहेस.”
“मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचे आहे. आपण कॉफी प्यायला कॉफी डेमध्ये जाऊ या का?”
आता याचा काय प्रॉब्लेम आहे कुणास ठाऊक? पण त्याला नाही म्हणणे मला जड गेले. मग आम्ही कॉफी प्यायला गेलो.
तिथेसुद्धा हा काहीतरी भलत्याच विषयावर बोलत होता! माझी अमेरिका ट्रीप कशी झाली? तिथे मी काय काय पाहिले वगैरे वगैरे!
शेवटी मीच त्याला विचारले, “अरे, तुला काहीतरी महत्त्वाचे बोलायचे होते ना? काय कुणाच्या प्रेमात वगैरे पडला नाहीस ना?”
अविनाश एकदम गंभीर झाला. मग थोड्या वेळाने म्हणाला,
“थोडेसे तसेच काहीतरी! तुला माझ्या मनातले कसे काय कळते कुणास ठाऊक?”
“अरे, आपण लहानपणापासून ओळखतो एकमेकांना! तेवढे तर कळायलाच पाहिजे ना?” मी विचारले.
“तुला राग येईल का, या विचाराने मी गेली अनेक वर्षे तुला काही बोललो नव्हतो. मला तुझी मैत्री गमवायची नाही. पण मला वाटते मी जर हे बोललो नाही, तर तुला फसवल्यासारखे होईल. गेली कितीतरी वर्षांपासून मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो आहे. मी किती वेळा तुला हे आडून आडून सांगायचा प्रयत्न केला, पण तुला ते समजले नाही. शेवटी आज मी ठरवले, तुला स्पष्ट सागायचे.
आता मी नोकरीत स्थिर झालो आहे. माझी कंपनी मला आता काही वर्षांसाठी जर्मनीत पाठवणार आहे! मला तू माझी जीवनसाथी म्हणून हवी आहेस! माझ्याशी लग्न करशील? मी तुला खूप सुखात ठेवीन!” अविनाशने हे सगळे एका दमात सांगितले. मला काहीही बोलायला वेळ न देता!
मी जे म्हणते ना की पुरुषांना जरा कमी कळते, ते हेच! अविनाश खूप चांगला मुलगा आहे, हुशार आहे, काळासावळा असला तरी स्मार्ट आहे. त्याच्याशी लग्न करणारी मुलगी खूप सुखी होईल यात शंका नाही! पण याने चक्क मला प्रपोज करायचे? आमच्या स्टेटसमध्ये किती फरक आहे! माझे बाबा बँकेत खूप मोठे अधिकारी आणि याचे बाबा कुठल्यातरी कंपनीत कारकून आहेत. हेच मी मघाशी सांगत होते!
“अविनाश, आपली चांगली मैत्री आहे रे! पण तू मला या दृष्टीने पाहतोस याची मला कल्पना नव्हती. मला तू अगदी धक्का दिलास. तुझ्यात काहीच वाईट नाही, पण मी तुला माझा भावी नवरा या दृष्टीतून कधीच पहिले नाही. मला माफ कर, पण you are not my type! माझ्या जोडीदाराबद्दल खूप वेगळ्या कल्पना आहेत”. मी अगदी स्पष्टच सांगितले त्याला. या मध्यमवर्गीय लोकांशी जरा स्पष्टच बोललेले बरे असते.
“आणि तुला माहीतच आहे की मी मोहन सबनीसवर प्रेम करते!” मी त्याला सांगितले. त्याचा चेहरा एकदम पडला. मला वाईट वाटले, पण काय करणार? माझ्या आयुष्याचा प्रश्न होता!
“मोहन सबनीस? तो छचोर मुलगा? मी तुला त्याच्याबरोबर बऱ्याच वेळा पहिले आहे. पण तशा त्याच्या बरोबर बऱ्याच मुली असायच्या. तुम्ही लग्न करणार आहात?” अविनाश म्हणाला.
एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला चांगला म्हणेल तर जगबुडी होईल ना?
“अविनाश! तू माझ्या भावी नवऱ्याबद्दल बोलतोयस याचे भान ठेव. त्याच्याबद्दल मला काहीही ऐकायचे नाही. आणि तुझ्यासारख्या त्याच्यावर जळणाऱ्या माणसाकडून तर अजिबात नाही!”
“हे बघ आसावरी! तू जरी मला नकार दिला असलास, तरी तुझे भले व्हावे असेच मला वाटते. म्हणून मी तसे म्हणालो. तो तुला खरेच योग्य नाही. मी त्याला चांगला ओळखतो. तो फक्त पैशावर प्रेम करतो. तू पुन्हा विचार कर!” अविनाश म्हणाला.
“मग काय तू मला योग्य आहेस? मला या विषयावर आता काहीही बोलायचे नाही. मी निघाले, गुड बाय!” असे रागात बोलून मी तिथून निघून आले. येताना मी रिक्षाने आले. अविनाश मला सोडतो म्हणत होता, पण मी त्याला नकार देऊन हट्टाने रिक्षाने घरी आले. रात्री जेवतानाही माझा राग गेला नव्हता.
बाबांनी मला विचारलेसुद्धा!
“आसावरी बेटा! आज कुणावर रागावली आहेस?”
बाबांना लगेच कळते मी कुणावर तरी रागावले आहे ते. आई मात्र शांत असते. तिला माहीत आहे. मला लगेच राग येतो आणि लगेच जातोही.
“मला नाही सांगायचे! पण मला एक-दोन दिवसात माझ्या एका मित्राला, म्हणजे मोहन सबनीसला भेटायला बंगलोरला जायचे आहे. मला आता चारपाच दिवस सुट्टी आहे. मित्राला भेटेन, बंगलोरसुद्धा थोडेसे पाहून येईन.” मी निक्षून सांगितले.
बाबांनी मला सांगून बघितले की आत्ताच तू अमेरिकेतून आली आहेस, दमली असशील, थोडे दिवस विश्रांती घे! पण मी त्यांना म्हणाले कि मी जाणार म्हणजे जाणार.
“ठीक आहे. Crown Plaza हॉटेल आमचे खातेदार आहेत. मी तुझे विमानाचे तिकीट काढतो आणि हॉटेलचे बुकिंगही करतो.” बाबा म्हणाले.
मी लगेच मोहनला फोन केला. मी बंगलोरला येणार आहे, माझ्या काही कामासाठी येणार आहे आणि आपण नक्की भेटू या असे त्याला सांगितले. मुद्दाम त्याला भेटायला येणार आहे, असे मी त्याला सांगितले नाही. हे पुरुष लगेच हरबऱ्याच्या झाडावर चढून बसतात.
मोहनला खूप आश्चर्य वाटले. आनंदही झाला.
“तू येत आहेस, हे खूप मस्त आहे! मलाही तुला भेटायची खूप उत्सुकता आहे. मलासुद्धा तुला एक मस्त बातमी द्यायची आहे” मोहन म्हणाला. पण काय बातमी आहे हे सांगितले नाही. प्रत्यक्ष भेटल्यावर सांगतो म्हणाला. ह्याने काय आमचा साखरपुडा वगैरे ठरवला की काय? त्याला असे काहीतरी धक्कादायक करायची फार हौस होती. स्वारीची सवय अजून गेलेली दिसत नव्हती.
दोन दिवसांनी मी बंगलोरला पोहोचले. त्या दिवशी मी पूर्ण आराम केला. मोहन दुसऱ्या दिवशी ब्रेकफस्टलाच येतो म्हणाला. खरेच, किती अधीर असतात हे पुरुष!
दुसऱ्या दिवशी सकाळी restaurantमध्ये मी जाऊन बसले, तर याचा पत्ता नाही. चक्क पंधरा मिनिटे उशिरा आला. पण काय खलास दिसत होता तो! त्याला शोभून दिसणारा गर्द निळ्या रंगाचा टीशर्ट आणि त्याची बेफिकीर वृत्ती दाखवणारी फेडेड जीन्स. त्याच्या गोऱ्यापान रंगला अगदी शोभून दिसणारा त्याचा पोषाख मला खूप आवडला. डोळ्यावर गॉगल्स आणि त्याचे ते थोडेसे अस्ताव्यस्त केस. मी त्याच्या प्रेमात पडले ते उगीच नाही!
आपल्या रुबाबदार चालीने तो टेबलापाशी आला. गॉगल्स काढून त्याने आपल्या काळ्याभोर डोळ्यांनी मला नखशिखांत न्याहाळून बघितले. मी त्याच्या गहिऱ्या डोळ्यात जणू बुडून त्याच्याकडे क्षणभर पाहतच राहिले. त्याला बहुतेक मला तिथेच मिठीत घ्यायचे होते ,पण सभोवतीचे लोक बघून त्याने आपला हात पुढे केला.
“हॅल्लो आसावरी! काय क्यूट दिसते आहेस!”
मी त्याचा हात हातात घेतला. त्याच्या हाताचा ऊबदार आणि मऊ स्पर्श! माझे सर्व शरीर रोमांचित झाले. त्याचीही बहुतेक हीच स्थिती झाली असावी. आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहत खाली बसलो. मग कितीतरी वेळ आम्ही वेगवेगळ्या विषयावर बोलत होतो. शेवटी मीच धीर करून विचारले,
“अरे, तू काही तरी महत्त्वाची बातमी मला देणार होतास ना?”
“येस, येस! तुला हे ऐकून खूप आनंद होईल की मी लग्न करतोय! येस शेवटी लग्नाच्या बेडीत अडकायचे ठरवले आहे!” मोहनचे हे शब्द माझ्या कानात कोणी तरी कडकडीत तेल टाकावे असे घुसले.
मला एक-दोन मिनिटे काहीच कळे ना हा काय म्हणतोय?.... मी अशी सुन्न बसलेली असतानाच त्याने माझे दोन्ही खांदे धरून जोरात हलवले.
“काय, धक्का बसला ना? पण ते सत्य आहे! It is a fact!” मोहन म्हणाला.
“मोहन, is this a joke?” मी कशीबशी म्हणाले.
“अगं, खरच नाही. मी खरच लग्न करतोय!”
“कोण आहे ही लकी मुलगी?” मी जरा घुश्शातच विचारले. पण ते काही त्याच्या लक्षात आले नाही.
“अगं, आमच्या बाबाच्या मित्राची मुलगी आहे. त्यांची अमेरिकेत मोठी software कंपनी आहे. चार -पाच देशांत त्यांच्या branches आहेत. लग्नानंतर मी अमेरिकेतच सेटल होणार. अगं आसावरी, त्यांच्याकडे स्वतःचे विमान आहे! मुलगीही हुशार आहे. तिने MBA केले आहे आणि ती त्यांच्या कंपनीतच काम करते. काही वर्षांत मला त्यांचे बाबा CEO करून घेणार आहेत!!
...I am so thrilled!....” मोहन त्या मुलीचे खूप काहीतरी कौतुक सांगत होता. तिचे फोटो दाखवत होता. (खूप जाड आणि त्याला अजिबात शोभणारी नव्हती ती!) तो आपले खूप काहीतरी प्लॅन्स सांगत होता, पण माझे त्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. मला इतकेच समजले की त्या मुलीचे बाबा खूप श्रीमंत आहेत आणि याला सर्व काही ऐश्वर्य अगदी सहज मिळणार आहे. का कोण जाणे, मला अविनाशचे शब्द आठवले - “.....तो तुला खरच योग्य नाही. मी त्याला चांगला ओळखतो. तो फक्त पैशावर प्रेम करतो. तू पुन्हा विचार कर!”...
थोड्या वेळाने आम्ही ब्रेकफस्ट संपवला. मी काय खाल्ले किंवा मोहन काय बोलत होता याकडे माझे काहीही लक्ष नव्हते. मला सारखे रडू येत होते, पण या हलकट माणसासमोर रडून मला माझी शोभा करायची नव्हती. शेवटी माझा निरोप घेऊन तो निघाला.
“लग्नाला नक्की ये बर का मी आपल्या सगळ्या gangला बोलावणार आहे!” असे म्हणून तो निघून गेला. त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे हताशपणे पाहत मी तशीच बसून राहिले. माझे भविष्यच माझ्याकडे पाठ करून निघून चालले आहे, असे मला वाटायला लागले. मग इतका वेळ थांबवून ठेवलेले अश्रू घळाघळा माझ्या डोळ्यातून वाहायला लागले. सभोवती अनेक लोक आहेत आणि ते आपल्याकडे पाहत आहेत, हे माहीत असूनसुद्धा मी माझे अश्रू थांबवू शकले नाही. शेवटी मी माझ्या पर्समधून रुमाल काढला आणि त्या मागे माझा चेहरा लपवला.
इतकी मुले माझ्या मागे आहेत आणि हा मला झिडकारून जाऊ कसा शकतो? पुरुषांना अक्कल नसते तेच खरे!
मी अशी किती वेळ रडत होते कुणास ठाऊक? माझ्या टेबलाजवळ कुणीतरी उभे आहे असे मला वाटले, म्हणून मी समोर पहिले तर माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसेना. माझ्यासमोर गंभीर चेहऱ्याने अविनाश उभा होता. माझ्या समोरच्या खुर्चीवर बसत त्याने माझा हात आपल्या हातात घेतला आणि माझ्याकडे आपुलकीने पाहत तो म्हणाला,
“आसावरी, तू का रडते आहेस? काय झाले? मला सांगशील का?”
“तू इथे काय करतो आहेस?” मी अजून थोडी, गोंधळलेल्या अवस्थेतच होते.
“सांगतो नंतर. तुला रडायला काय झाले ते सांग!” अविनाश म्हणाला.
मी त्याला मोहनचे लग्न ठरल्याचे सांगितले. तो काय काय म्हणाला हे सांगताना परत मला रडू कोसळले.
“ठीक आहे. मला समजले. मला वाटते आपण तुझ्या रूमवर जाऊ. इथले सगळे लोक तुझ्याकडे पाहायला लागले आहेत. चल, ऊठ!” अविनाश म्हणाला. आम्ही रूमवर पोहोचलो. मी बेडवर थोडा वेळ शांतपणे पडून राहिले. पण मला लगेच परत रडू यायला लागले. अविनाश माझ्या बेडच्या शेजारच्या खुर्चीवर बसून माझ्याकडे मोठ्या आपुलकीने पाहत होता. त्याने माझा हात हातात घेतला आणि तो काहीही न बोलता तसाच बसून राहिला. आम्ही दोघेही काहीही न बोलता तसेच बराच वेळ बसून राहिलो. शेवटी काही वेळाने माझ्या अश्रूंचा ओघ कमी झाला.
“तुला काही कॉफी वगैरे हवी आहे का?” अविनाश म्हणाला. मी न बोलता फक्त नकारार्थी मान हलवली.
“तू इथे कसा आलास हे नाही सांगितलेस?” मी म्हणाले.
“तू मोहनला भेटायला जाणार हे ऐकल्यावर मला तुझी काळजी वाटायला लागली. मग तुझ्या बाबांनी मला तू या हॉटेलमध्ये आहेस म्हणून सांगितले. मग मी लगेच इथे आलो. मी restaurantमध्ये तुम्हाला दिसणार नाही अशा जागी बसून होतो. पण तू रडायला लागलीस आणि मला राहवले नाही आणि मी तुझ्यापाशी आलो.”
अगदी शाळेपासून हा असा आहे. कायम माझी काळजी करणारा.. . माझ्या एकदम लक्षात आले की माझा हात अजून त्याच्या हातात होता. मी हळूच तो काढून घेतला.
आम्ही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखत होतो. एकमेकांचा स्पर्श मला नवीन नव्हता. पण का कोण जाणे, मला त्याचा हा स्पर्श खूप हवाहवासा वाटायला लागला होता. मी त्याच्याकडे हळूच बघितले. त्याचे काळेभोर आणि गहिरे डोळे माझ्याकडेच बघत होते. एकदम शांत आणि जणू माझ्या अंतरंगाचे ठाव घेणारे! मला माझी आई रात्री देवापुढे समई लावते, त्याच्या ज्योतीची आठवण झाली. मला एकदम शांत आणि प्रसन्न वाटले. माझे मन मोहनबरोबर त्याची तुलना करू लागले. मोहनसारख्या उथळ आणि दिखाऊ माणसाच्या प्रेमात मी पडले, याची मला लाज वाटायला लागली. पण ते खरेच प्रेम होते का? का क्षणिक आकर्षण?
पण अविनाश किती समंजस आणि सालस मुलगा आहे. मला लहानपणापासून तो आवडतो, पण आत्ता मात्र मला तो खूप म्हणजे खूपच आवडायला लागला. आपण एखाद्याच्या प्रेमात कधी पडतो तो क्षण सांगता येतो का? मला मात्र तो क्षण अगदी स्पष्टपणे जाणवला. हाच तो क्षण! बाप रे! मी याच्या प्रेमात वगैरे पडले की काय? छे! काहीतरीच काय? माझ्या आणि त्याच्यामधील स्टेटस differenceचे काय? मग मी त्याला थोड्या गमतीत म्हणाले,
“अविनाश, तू माझ्यासाठी इथे आलास आणि मला आधार दिलास याबद्दल मी तुझी खरीच आभारी आहे! पण यामुळे मी तुला होकार देईन आणि तुझ्या गळ्यात पडेन असे तुला वाटत असेल, तर तसे काही नाही बरे का! हो, गैरसमज नकोत.” हे वाक्य मी म्हणाले आणि माझी मलाच एकदम लाज वाटली. माझ्या जिभेला मेले हाडच नाही.
अविनाशचा चेहरा एकदम कसातरीच झाला. मघाशी मला दिसलेल्या त्याच्या डोळ्यातल्या ज्योती एकदम विझल्यासारख्या झाल्या. तो एकदम ताडकन उभा राहिला,
“आसावरी! माझे तुझ्यावर प्रेम आहे हे मी तुला स्पष्टच सांगितले आहे! लपवून नाही ठेवले! आणि तुझा नकार माझ्या लक्षात आहे. मी विसरलो नाही तो, कधीही विसरणार नाही. मी इथे आलो ते आपल्या मैत्रीखातर आलो. मला आपली मैत्री हवी आहे आणि ती मला पुरेशी आहे. मी आता इथून जावे हे उत्तम. मी रूम नंबर ३०५मध्ये आहे. तुला माझी गरज नसणारच आहे, पण तरीही काही हवे असेल तर मला फोन कर.” असे म्हणून तो माझ्या रूममधून निघून गेला.
“अरे थांब! मी जरा गंमत केली तुझी....” मी त्याला सांगायचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तो निघूनही गेला होता. त्याने ते ऐकले की नाही कोण जाणे? नाहीच बहुधा!
मला स्वतःचा खूप राग आला. मी अशी कशी वागले त्याच्याशी? आणि हासुद्धा इतका मूर्ख कसा? त्याला एवढासा जोक समजू नये? मग माझ्या लक्षात आले की अविनाश माझ्या नकाराने तो दाखवतो त्यापेक्षा जास्त दुखावला गेला आहे. आता हा प्रेमाबद्दल तोंडातून ब्र सुद्धा काढणार नाही. त्याचा हट्टी आणि स्वाभिमानी स्वभाव मला पूर्ण माहीत होता. आता मी काय करू? माझ्या मनात उमलणाऱ्या त्याच्यावरच्या प्रेमाचे मी काय करू?
सौंदर्यदेवता आसावरी बाईसाहेब, आता तुम्हालाच अविनाशच्या मागे जावे लागणार! आता मलाच त्याला प्रपोज करायला लागणार की काय? असा प्रश्न मी मलाच विचारला. माझ्या अंतर्मनाने मग माझ्याच प्रश्नाचे उत्तर दिले. होय बाईसाहेब! आता करा त्याला प्रपोज! विचारा त्याला माझ्याशी लग्न करशील का म्हणून! अगदी नाक वर करून म्हणाला होतात ना त्याला, you are not my type म्हणून?
विचारीन! अगदी आत्ता जाऊन विचारीन! झाली माझ्याकडून अविनाशला ओळखण्यात चूक! नाहीतरी प्रेमात सगळे क्षम्य असे म्हणतात ना?
पण मी लगेच काही गेले नाही. मी या गोष्टीवर खूप विचार केला. शेवटी मी संध्याकाळी अविनाशला फोन केला. मग मी त्याच्या रूमवर गेले. तो सकाळी पुण्याला परत जाणार होता. त्याची तयारी चालली होती. एकदम उदास दिसत होता तो. मी आत गेले आणि रूमचे दार बंद केले. (हे ते सांकेतिक का काहीतरी म्हणतात तसे तर नसेल?)
“अविनाश, मला माहीत आहे मी तुला खूप दुखावले आहे. मला खरेच माफ कर. मला तुझी थोडी गंमत करायची होती. मी खूप खूप चुकले. तू मला माफ करू शकशील का?” मी कशीबशी त्याला म्हणाले. मी त्याचा हात माझ्या हातात घेतला आणि त्या स्पर्शाबरोबर माझ्या डोळ्यातून परत अश्रुधारा सुरू झाल्या.
“आसावरी, please तू रडू नकोस. मला खूप वाईट वाटले, रागही आला. पण तू आता माफी मागितलीस ना? माझ्या मनात आता काही नाही!” तो मनापासून म्हणाला.
“मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू?” मी अविनाशला विचारले.
“विचार की! तुला माझी काही मदत हवी आहे का?”
“नाही, मदत नाही. मला सांग, तू आता जर्मनीमध्ये राहायला जाणार ना?”
“हो. काही वर्षे तरी मला जायला लागणार!”
“मग तिथे जेव्हा आपण घर करू, तेव्हा मी कुत्रा पाळला तर तुला चालेल का?” मी मोठ्या निरागसपणे विचारले.
“म्हणजे?” अविनाशने गोंधळून विचारले.
“म्हणजे काय! तू एवढा हुशार आणि तुला समजत नाही?......अरे, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. हीच आता खरी वेळ आहे तू मला परत प्रपोज करायची आणि या वेळी मी हो म्हणायची!” मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले. माझ्या अविनाशच्या डोळ्यातल्या त्या ज्योती पुन्हा चमकायला लागल्या! त्याने मला हळूच जवळ ओढले आणि तो माझ्या कानात म्हणाला,
“काय म्हणालीस, परत सांग!”
“मी म्हणाले की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आणि ही वेळ बोलायची नाही!”
आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत केव्हा गेलो हे आम्हाला समजलेच नाही!
पुरुष खरेच मूर्ख असतात. पण आम्ही बायकासुद्धा काही पुरुषांपेक्षा कमी नसतो, हेच खरे.
प्रतिक्रिया
6 Nov 2018 - 11:09 pm | तुषार काळभोर
अगदी हातात दोनशे पानी दिवाळी अंक घेऊन वाचल्याचा फील देणारी कथा!!
6 Nov 2018 - 4:03 pm | Jayant Naik
आपली परंपरा का सोडा ? त्याला नवे रूप द्या ...म्हणून जरा वेगळा प्रयास.
6 Nov 2018 - 4:57 pm | टर्मीनेटर
कथा आवडली.
6 Nov 2018 - 5:01 pm | पद्मावति
आवडली. फील गूड, प्रसन्न कथा.
7 Nov 2018 - 2:46 pm | यशोधरा
खुसखुशीत कथा!
7 Nov 2018 - 3:38 pm | मुक्त विहारि
कथा आवडली.
7 Nov 2018 - 5:05 pm | फुटूवाला
मधेच एकदा अविनाश चा अरविंद झालाय...
7 Nov 2018 - 5:35 pm | सविता००१
मस्त आहे कथा. आवडली
7 Nov 2018 - 10:43 pm | मित्रहो
सुंदर कथा
अपेक्षित शेवट असला तरी तो ज्याप्रकारे येतो ते छान आहे.
8 Nov 2018 - 6:17 am | Sanjay Uwach
नेहमीचीच,पण साधी सरळ कथा, आपल्या खुमासदार शैलीने छान रंगवली आहे त्याची खरोखर दाद दिली पाहिजे. लिहीत रहा. कथा आवडली.
8 Nov 2018 - 7:57 am | बाजीप्रभू
छान लिहिता तुम्ही... दिवाळीच्या शुभेच्छा!!
8 Nov 2018 - 2:44 pm | विजुभाऊ
साधी सरळ कथा आवडली.
8 Nov 2018 - 5:30 pm | नाखु
आनंदी शेवट असलेल्या कथा वाचतोय असा भास असतानासुद्धा आवडली.
याच धर्तीवर शहाणी सकाळ नावाची शन्नांची एक कथा आहे,ती मला प्रचंड आवडते
8 Nov 2018 - 6:18 pm | palambar
छान कथा, लाडावलेली मुलगी डोळ्यासमोर उभी राहिली.
8 Nov 2018 - 7:23 pm | गामा पैलवान
जयंत नाईक,
अगदी ना.सी.फडके आठवले! :-)
आ.न.,
-गा.पै.
9 Nov 2018 - 8:48 am | Jayant Naik
येवढ्या मोठ्या माणसाशी माझी तुलना नको. खरे म्हणजे मी माझ्या पद्धतीने लिहितो . आपल्या प्रतिसादाबद्दल खूप आभार .
9 Nov 2018 - 10:10 am | शशिकांत ओक
बायकांची वन अपमनशिप भावली...
8 Nov 2018 - 9:13 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर कथा !
9 Nov 2018 - 12:03 am | उपाशी बोका
आता अशाच प्रकारची ही कथा पण वाचा.
9 Nov 2018 - 8:45 am | Jayant Naik
कथा आवडली . कथेचा वेग भन्नाट आहे.
9 Nov 2018 - 8:45 am | Jayant Naik
कथा आवडली . कथेचा वेग भन्नाट आहे.
12 Nov 2018 - 12:29 pm | दुर्गविहारी
कथा आवडली पण एकुणच अपेक्षित वळणाने गेली. पण प्रयत्न चांगला आहे. पु.ले.शु.
12 Nov 2018 - 6:07 pm | Ganesh Dwarkana...
कथा खूपच छान आहे सुरुवातीपासून अगदी शेवट प्रयन्त न थांबता वाचली. अविनाश, आसावरीला मुतोड जवाब देईल असे वाटले होते, असो ...कथा आवडली
18 Nov 2018 - 4:01 pm | एमी
छान.
आता पुढचा भाग येऊद्या.
सात वर्षांच्या खाजेनंतर:
आसावरीची कभी अलविदा ना कहना मधली राणी झालेली असते, मोहनचा ब्रोकबॅक माऊंटन मधला जेक गिलेनहल झालेला असतो वगैरे ;)
20 Nov 2018 - 3:52 pm | नूतन
कथा आवडली.
अपेक्षित शेवट असला तरी छान आहे.
20 Nov 2018 - 4:29 pm | Jayant Naik
सर्व मिपाकरांना माझी कथा वाचून अभिप्राय दिल्याबद्दल आभार. कथेत काही उणे अधिक असणारच . पुढच्या कथेच्या वेळी सुधारणा करायचा जरूर प्रयत्न करेन.
5 Jan 2019 - 2:06 pm | बबन ताम्बे
खूप छान कथा. आवडली .
11 Jan 2019 - 9:39 pm | Jayant Naik
वाचकांना कथा आवडली मग लेखकाला आणखी काय हवे.
5 Jan 2019 - 2:50 pm | शाम भागवत
कथा आवडली. मस्तच आहे. कोणीही चुकीच्या मार्गाने जात असता, काही कारणाने योग्य मार्गावर आला की डोळे भरून येतात. मग हा प्रकार गोष्टीत का असेना.
11 Jan 2019 - 9:43 pm | Jayant Naik
आपले म्हणणे योग्य आहे ..पण आज काल योग्य मार्गावर चालणे म्हणजे भाबडे पण आहे असे अनेकांना वाटते. मग कथा अपेक्षित शेवटाकडे जाते आहे असा आक्षेप पण होतो. असू द्या. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
6 Jan 2019 - 5:43 pm | चन्दाराजा
सुन्दर कथा मजा आलि
11 Jan 2019 - 9:43 pm | Jayant Naik
आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला.
12 May 2023 - 6:04 pm | चौथा कोनाडा
छान कथा. आवडली.
💖
टिपिकल प्रेम त्रिकोण, पण लेखन शैली सुंदर असल्याने रंगत गेली.
सतत "स्टेटस"चा विचार करणारी आसावरी कशी बदलते याचं छान चित्रण केलंय !