मराठीत आज ‘वाचायला’ म्हणाल तर चिक्कार लेखन उपलब्ध आहे. त्यासाठी मायबोली, मिपा, ऐसी यांसारख्या संस्थळांकडेच जायला हवं असं नाही, तर फेसबुकवरही बरंच चांगलं मराठी लेखन अस्तित्वात आहे. याचं श्रेय कोणाला द्यावं हा जरा वादाचा विषय आहे. पण साधारण वीस वर्षांपूर्वी जो साहित्यव्यवहार मूठभर नियतकालिकं आणि पसाभर प्रकाशकांपुरता सीमित होता, त्याचा विस्तार झाला हे मात्र निर्विवाद.
लेखनाचा विस्तार झाला, तरीही हे लेखन ज्या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकतं, ज्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचू शकतं, त्याचा मात्र संकोच होताना दिसतो आहे.
रात्रंदिन गळणार्या दूरदर्शन वाहिनीपासून सुरुवात केलेलं झी मराठी हळूहळू हातपाय पसरतं आहे. गाण्यांचे कार्यक्रम, नाटकं, चित्रपट, इतकंच काय - वधुवरसूचक मंडळ, गतवर्षी आलेला दिवाळी अंक आणि यंदा आलेला गणेशोत्सव अंक. झी मराठीचा अश्वमेध वारू थांबायचं नाव घेत नाही. काही वर्षांनी "मराठी संस्कृती म्हणजे झी मराठी दाखवतात ते" असं मत रूढ झाल्यास नवल वाटायला नको! (यात असूयेचा भाग नसून झी मराठीच्या आडाख्यांचं कौतुकच आहे.)
त्याचबरोबर मराठी नियतकालिकं अखेरचा श्वास टाकत आहेत. गेल्या वर्षी ‘अंतर्नाद’ बंद झालं. काही दिवसांपूर्वी ‘साहित्य सूची’ बंद होणार असल्याची बातमी (फेसबुकवर! आणखी कुठे!) वाचली.
म्हणजे - वाढत्या लेखनाबरोबर अभिव्यक्तीच्या मंचांचा संकोच होताना दिसतो आहे. काही वर्षांनी मराठी वाचायचं असेल तर फेसबुक किंवा झी मराठी यांशिवाय पर्याय राहणार नाही. अंकातला शैलेन्द्र यांचा 'प्रसारमाध्यमे - एका बदलाचा प्रवास' हा लेख या संदर्भात अवश्य वाचावा.
अशा स्थितीत मिपासारख्या मुक्त मंचाचं मूल्य आपण जाणलं पाहिजे. टोकदार पेनाने अधोरेखित केलं पाहिजे. मिपाबाह्य लोकांच्या मिपाविरोधी प्रतिक्रिया "मिपा? हॅहॅहॅ..." ते "आमच्या वेळचं मिपा राहिलं नाही" (ज्याला खफवर प्रेमाने ‘पुमिराना कॉम्प्लेक्स’ म्हणतात) अशा काहीही असतात. त्यांना सांगावंसं वाटतं, अरे बाबांनो, मिपा आहे हे लक्षात घ्या!
***
यंदाच्या दिवाळी अंकातल्या लेखनात विशेष लक्ष वेधून घ्यावं अशी आहेत प्रवासवर्णनं. क्रोएशिया आणि आल्प्स, ते दक्षिण गोवा आणि हिमालय. प्रवासवर्णन हा विभाग मिपावर कायमच समृद्ध राहिला आहे. अन्य लेखनांत लेख, कथा, कविता, पाककृती, व्यक्तिचित्रं असं सगळं आहे. यंदा विशेष विभाग नाही. विशेष विभाग होता तेव्हा "या विषयाव्यतिरिक्त तुम्ही काही घेणारच नाही का अंकात?" असं विचारणारे लोक होते, तसे विशेष विभाग नसताना "आता कशावर लिहू तेच कळत नाही" असं सांगणारेही भेटले! एकूण ‘सर्वांना सर्वकाळ समाधानी ठेवता येत नाही’ हेच खरं!
***
थोडं वैयक्तिक. मी संपादन केलेला हा सलग तिसरा अंक. आता थांबायचा निर्णय घेत आहे. अशा वेळी ‘वैयक्तिक कारणं’ किंवा ‘कार्यबाहुल्य’ वगैरे हवा करायचा प्रघात आहे. पण ते तसं नाही.
दिवाळी अंकाच्या संपादकासारखं पद ही खाजगी मालमत्ता बनून राहू नये असं वाटतं. अशा पदांवर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ राहू नये. तीन वर्षं हाही हवेतून काढलेला आकडा नाही. पहिलं वर्ष सकारात्मक बदल करायचं, नवे वारे खेळवायचं. दुसरं वर्ष घडी बसवायचं. तिसरं वर्ष उत्तराधिकारी निर्माण करायचं. या वेळेच्या सासं मंडळाने अप्रतिम योजनाबद्ध काम केलेलं आहे. ती घडी आता बसली आहे.
शिवाय, सुनील गावस्कर म्हणाला होता त्याप्रमाणे : One should quit when people ask 'Why?'; and not 'Why not?'
याचा अर्थ मी मिपाखातं बंद करून तीर्थाटनाला जातो आहे असा नाही. (‘अरेरे!’ काही आवाज आले!) दिवाळी, आणि अन्य अंकांत सहभाग असेलच. शिवाय मिपावर नियमित लिहिण्याचाही संकल्प आहे. बघू या कसं जमतंय.
***
दिवाळीच्या आधी शंभर दिवसांपासून अंकाच्या निर्मितीची गडबड सुरू होते. आपल्या उपलब्ध वेळेतला मोठा वाटा देऊन या दिवाळी अंकाच्या निर्मितीत सहभागी झालेल्यांचा मी आभारी आहे. त्यांची नावं अकारविल्हे : अभ्या.., डॉ सुहास म्हात्रे, जव्हेरगंज, नीलकांत, पद्मावति, पैलवान, प्रशांत, प्रा.डॉ. दिलीप बिरुटे, यशोधरा, सुधांशुनूलकर, स्नेहांकिता. तसंच, दिवाळी अंकासाठी आवर्जून लेखन करणार्यांचाही मी आभारी आहे.
सर्वात शेवटी, वाचकहो, तुमच्याशिवाय तर कशालाच अर्थ नाही. तुमचे आभार आणि आम्हां सर्वांतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रतिक्रिया
6 Nov 2018 - 9:39 am | गुल्लू दादा
6 Nov 2018 - 10:49 am | नूतन सावंत
कुठे आला?
6 Nov 2018 - 10:51 am | नूतन सावंत
पाहिला आत्ताच
6 Nov 2018 - 11:07 am | स्वाती दिनेश
अंक आला... आता वाचेनच सावकाश ,चव घेत..:)
संपादकीय आवडले.
स्वाती
6 Nov 2018 - 11:17 am | यशोधरा
संपादकीय आवडले!
6 Nov 2018 - 11:19 am | नूतन सावंत
अंकाची लिंक उघट का नाही,दिवाळी अंग वर टिचकी मारली असता pGe not found येते आहे, जे लेख कोणीतरी वाचलेत तरच दिसत आहेत.
6 Nov 2018 - 12:09 pm | लई भारी
संपादकीय आवडलं.
झी मराठी विषयी अगदी हेच वाटत होत. आणि भविष्यात कशाला, आताच त्यांनी एवढी झैरात केलीय कि ते करतात तीच मराठी संस्कृती असं सर्वमान्य झालंय :)
असो, त्या निमित्ताने का असेना, लोकं वाचत आहेत हे महत्वाचं!
रच्याकने, 'अंतर्नाद' चा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला आहे.
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
6 Nov 2018 - 12:25 pm | अभ्या..
वा, समतोल संपादकीय.
या निमित्ताने आदूबाळाने एक चांगला पायंडा पाडलाय त्या पायवाटेवरुन मीही वाटचाल करावी म्हणतो. मिपासोबत ग्राफिक्स करत करत पाच वर्षे झाली. आता थांबतो.
धन्यवाद मालक, संपादक, मार्गदर्शक, वाचक, मित्रमंडळ आणि हितचिंतकांनो ह्याप्पी दिवाळी सर्वांना.
6 Nov 2018 - 12:29 pm | मुक्त विहारि
संपादकीय आवडलं.
6 Nov 2018 - 12:33 pm | सस्नेह
नेमके आणि वेचक संपादकीय !
अंकाच्या सर्व शिल्पकारांचे अभिनंदन आणि आभार .
आदुबाळाचे विशेष आभार !
6 Nov 2018 - 12:39 pm | टर्मीनेटर
संपादकीय आवडलं.
शक्यतो आजच सगळा अंक वाचून काढणार.
आदूबाळ यांचे संपादक पदावरून पायउतार होण्यामागचे कारण कौतुकास्पद आहे.
6 Nov 2018 - 3:09 pm | स्वाती दिनेश
आदूबाळ यांचे संपादक पदावरून पायउतार होण्यामागचे कारण कौतुकास्पद आहे.
सहमत आहे आणि कारण बिनतोड पटलेही आहे.
स्वाती
6 Nov 2018 - 1:21 pm | मित्रहो
नेहमीप्रमाणे संपादकीय सुंदर आहे. बऱ्याच मुद्दयांचा परामर्श घेतला आहे. प्रकाशने आणि नियकालके का बंद पडताहेत याचा शोध त्यांनी स्वतःच घ्यायला हवा. लोकांना वाचायला आवडत नाही अशी नेहमीची कारणे उपयोगी पडनार नाही. अभिव्यक्तीचे मंच कमी होताहेत हे खरे आहे. ही तशी उत्सहावर्धक बाब नाही.
अगदी १००० प्रतिशत सहमती.
6 Nov 2018 - 4:30 pm | नंदन
थेट आणि नेमकं संपादकीय.
अनुक्रमणिकेतून अंकात हाताळल्या गेलेल्या विषयांच्या वैविध्याची कल्पना येते आहे; आता निवांत वाचून काढेन.
6 Nov 2018 - 6:46 pm | सविता००१
सुरेख संपादकीय.
आता सावकाश आस्वाद घेत वाचायचं
6 Nov 2018 - 8:28 pm | बोका
संपादकीय आवडलं.
वर संपादकीयात आणि पूर्वी https://www.misalpav.com/comment/1005634#comment-1005634 इथे फेसबुकवरील मराठी लेखनाचा उल्लेख आला आहे. कोणी फेसबुक प्रोफाईलच्या लिंक देउ शकेल काय ?
6 Nov 2018 - 8:52 pm | अनिंद्य
संतुलित संपादकीय.
येत्या काळात 'जालीय लेखन' ही विधा वर्धिष्णू राहणारच आहे. विषय वैविध्य जपल्यास पारंपारिक-छापील आणि मिपासारखे इ - दिवाळीअंक दोहोंना उत्तम भविष्य आहे.
आता सावकाश वाचतो सर्व लेख,
हॅपी दिवाळी !
अनिंद्य
6 Nov 2018 - 11:47 pm | नाखु
पण नेमका उजेड पाडणारं संतुलित संपादकीय.
वाचकांचीच पत्रेवाला नाखु
7 Nov 2018 - 2:32 am | वरुण मोहिते
लेखन. जियो.....
7 Nov 2018 - 2:12 pm | तिमा
उत्कृष्ट संपादकीय आणि त्यातल्या विचारांना. आता अंक चवीचवीने वाचीन म्हणतो!
7 Nov 2018 - 6:14 pm | टर्मीनेटर
खूप छान झाला आहे हा दिवाळी अंक, संपूर्ण वाचून झाला.
धन्यवाद संपादक मोहोदय.
7 Nov 2018 - 6:18 pm | प्रचेतस
नेमकं.
लेखक, वाचक, साहित्य संपादक, संपादक, मालक सर्वांचे आभार ह्या दिवाळी अंकाबद्दल.
7 Nov 2018 - 9:34 pm | कंजूस
संपादकपद आणि सोसाइटीतलं सेक्रट्री अथवा चेअरमन पदं प्रथम उत्साहाने दोनचार निवडणूक लढवतात नंतर मारूनमुटकून पदं गळ्यात मारावी लागतात.
अंक बंद पडण्याची कारणं १) इंग्रजी माध्यमातलं शिक्षण, २) फेसबुक / वाटसप ही थेट माध्यमं.
आता ज्येष्ट नागरिकही नातवंडांना सांगतात " पाचसहा तास मोबाइल बघु नये रे, चारपाच तास ठीक आहे."
8 Nov 2018 - 7:04 am | प्राची अश्विनी
संपादकीय आवडले. आणि अंक सुद्धा.
9 Nov 2018 - 8:08 am | ज्योति अळवणी
संपादकीय आवडलं. अगदी balanced आहे. अदूबाळ यांचं निर्णय घेण्याचं कारण पटलं.
10 Nov 2018 - 12:18 pm | धर्मराजमुटके
सगळं छान आहे मंडळी पण आपला नेहमीचा प्रश्न ! दिवाळी अंकाची पीडीएफ कधी ? गेले अनेक वर्ष याबाबत टोलवाटोलवी :) चालू आहे. माझ्यासारख्यांना जुना तांदूळ आणि जुने अंक दिवाळी संपल्यावर काही दिवसांनी पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतात, संग्रह करावासा वाटतो. त्यासाठी काहीतरी करा प्लीज !
10 Nov 2018 - 10:12 pm | जुइ
अतिशय नेटके आणि नेमके असे हे संपादकीय आवडले. आदूबाळ तुम्ही गेले ३ वर्ष दिवाळी अंकाच्या संपादक पदाचा भार अगदी नीट पेलला आहे. दिवाळी अंकासाठी काम करणार्यांचे आभार!
13 Nov 2018 - 9:41 pm | अभिजीत अवलिया
उत्तम संपादकीय.
18 Nov 2018 - 9:28 pm | मदनबाण
आदू-दादू हायट्रीक पूर्ण केल्या बद्धल अभिनंदन !
तुझे आणि या दिवाळी अंकात सर्व प्रकारे भाग घेणार्यांचे आणि लेखन करणार्यांचे कौतुक आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bom Diggy... (Official Music Video) :- Zack Knight x Jasmin Walia