परिस्थितीचे चटके माणसाला शहाणं करतात की नाही, माहीत नाही. पण जनावरं मात्र या अनुभवांतून खूप काही शिकतात. परिस्थितीशी जुळवून घेतात आणि त्यावर मातही करून स्वत:चे जगणे सोपे करून घेतात.
गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एका दिवशी हा नवखा देखणा, बोलक्या डोळ्यांचा कुत्रा अचानक कुठून तरी आमच्या गल्लीत आला. चुकून आला, की घरात नकोसा झाला म्हणून कुणी आणून सोडला, माहीत नाही.
काही लोक हौस म्हणून कुत्रे पाळतात, मग कालांतराने त्यामुळे होणाऱ्या गैरसोयी जाणवू लागल्या की त्यांना बेवारस स्थितीत लांब कुठेतरी सोडून देतात. घराच्या सावलीची सवय झालेली ही कुत्री रस्त्यावर आली की बावरतात. कावरीबावरी होतात. काही काळाकरिता त्यांचा माणसावरचा विश्वासही बहुधा उडून जातो, आणि ती माणसाला जवळही येऊ देत नाहीत. एकीकडे रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांचे भय आणि दुसरीकडे, माणसांचं दुरावलेलं प्रेम या कोंडीत ही कुत्री अधिकच केविलवाणी होतात...
... गेल्या वर्षी जुलै महिन्यात हा आमच्या गल्लीत आला तेव्हा काहीसा असाच, केविलवाणा, कावराबावरा होता. फूटपाथवर अंग चोरून बसायचा. प्रत्येक माणसाकडे अविश्वासाच्या नजरेनं बघत स्वत:ला माणसापासून लांब ठेवण्यासाठी धडपडायचा...
पण तो आमच्या गल्लीत आला हे त्याचे नशीब. त्याआधी कुणीतरी आमच्याच गल्लीत आणून सोडलेल्या एका कनवाळू कुत्र्याला इथे नवे पालक मिळाले होते, तर कुठून तरी जबर मार खाऊन पळून आलेल्या कुत्रीला माझ्या मुलीने मालाडच्या अहिंसाच्या केंद्रात दाखल केले. लागोपाठ आलेल्या या तिसऱ्या पाहुण्याने गल्लीतच फूटपाथवर तळ ठोकला, पण माणसांपासून मात्र फटकून वागू लागला.
... हीच परिस्थिती त्याला शहाणपण शिकवून गेली. भूक आणि भय यांपासून संरक्षणासाठी माणसाच्या सोबतीने रहावेच लागेल हे त्याला कळले, आणि एका सकाळी आमच्या स्नोईला घेऊन मी उतरलो असता लांबूनच आम्हाला पाहून त्याने शेपूट हलविले...
त्याच्या नजरेतील अविश्वासही संपला होता!
त्या दिवशी मी त्याला आपुलकीने थोपटले, आणि आमच्या स्नोईचा तो दोस्त झाला.
मग आम्ही त्याला नाव दिले... ‘फ्रेंड!’
हा फ्रेंड खूपच मायाळू होता. ज्या घरातून तो आला तिथेही त्याने माणसांवर निरपेक्ष प्रेम केले असणार हे त्याच्या समजुतदार वागण्यातून कळून येऊ लागले. पुढे तो गल्लीतल्या अनेकांच्या ओळखीचा झाला. बाजूच्याच शाॅपिगमधील दुकानदारांशीही त्याची मैत्री झाली. एटीएमच्या सिक्युरिटीवाल्यांचा तर तो सच्चा साथीदारच झाला.
... आणि आमच्या स्नोई, शेरूसारख्या अनेकांचा ‘फ्रेंड’!
गेल्या वर्षभरात त्याने खूप लळा लावला. स्नोईच्या जेवणासोबत त्याचंही जेवण बाजूला काढलं जाऊ लागलं. एटीएमच्या वाॅचमनच्या टिफीनमधे दोन चपात्या त्याच्याचसाठी जादा येऊ लागल्या, आणि सकाळी वाॅकला जाताना सोबत रस्तोरस्तीच्या कुत्र्यांकरिता चिकन विकत घेऊन वाटत जाणाऱ्या एका श्वानप्रेमीला तर या फ्रेंडने प्रेमाने पुरते जिंकले!
गेले वर्षभर गल्लीतल्या लोकांनीही त्याला माया दिली. जवळपास प्रत्येकाशी त्याची ओळखही झाली होती. नेहमी आसपास दिसणारी माणसं दिसली, की शेपूट हलकेसे हलवून तो ती ओळख दाखवायचा...
महिनाभरापूर्वी अचानक त्याची तब्येत पार बिघडली. त्याच्या नजरेतलं बोलकेपण विझून गेलं. कमालीच्या अशक्तपणामुळे त्याची हालचालही थंडावली. लोकांनी आणून दिलेलं खाणं मलूलपणे हुंगून तो मान फिरवू लागला, आणि अनेकजणांना त्याची काळजी वाटू लागली. माझ्या मुलींनी त्याला डाॅ. पेठेंकडे नेलं. सलाईन, इंजेक्शन्स सुरू झाली. ठरलेल्या वेळी औषधंही सुरू झाली.सगळ्या टेस्टस करून घेतल्या, आणि हळुहळू तो सावरू लागला. त्याला मरणाच्या दारातून बाहेर काढण्यासाठी माझ्या मुलींनी- विदिशा आणि सलोनीने- केलेल्या प्रयत्नांची कृतज्ञता तो व्यक्त करायचा. त्या दिसल्या कीत्याच्या अशक्त पायांनी धडपडून उठत तो जवळ यायचा...
तेव्हा त्याच्या नजरेतले भाव वाचता यायचे!
तो बरा होत होता, आणि त्याच्यावर माया करणाऱ्या प्रत्येकाला त्याचा आनंद वाटत होता.
गेल्या आठवड्यात मात्र, तो दिसलाच नाही. बाजूच्याच काॅंप्लेक्समधे आत कुठेतरी असेल असे सगळ्यांनाच वाटत होते.
... आणि एका संध्याकाळी एका कोपऱ्यात त्याचा निश्चल देह आढळला.
कितीतरी माणसांवर माया उधळणारा आमच्या फ्रेंडने जगाचा निरोप घेतला!..
आज तिथून येजा करताना आमचा स्नोईही थोडासा थबकतो. त्याला शोधतो...
कुठूनतरी येऊन तो प्रेमानं जवळ थांबेल, शेपटी हलवत पायाशी झुकेल असं उगीचच वाटू लागतं.
काही महिन्यांपूर्वी एक पिल्लू चुकून गल्लीत आलं, आणि फ्रेंडने त्यालाही माया दिली. फ्रेंडसोबत ते वाढू लागलं!
... आता ते कुठेतरी कोपऱ्यात शून्यपणे बसलेले दिसते.
फ्रेंडसोबतच्या आठवणीत गरफटल्यासारखे... एकटेच!
प्रतिक्रिया
5 Oct 2018 - 8:21 pm | उगा काहितरीच
:'(
6 Oct 2018 - 2:13 am | ज्योति अळवणी
अरेरे
6 Oct 2018 - 11:21 am | लोनली प्लॅनेट
खूपच छान लिहिलय पण शेवट दुःखद
भटकी कुत्री सुद्धा खूप हुशार असतात त्यांना काही खाऊ घातलं कि ते आपली कृतज्ञता व्यक्त करतात च मी विनाकारण त्यांना दगड मारणाऱ्या टारगट पोरांना मी अनेक वेळा चोप दिलेला आहे आणि भांडणे ओढवून घेतलेली आहेत
6 Oct 2018 - 5:10 pm | ट्रम्प
खरं आहे पाळीव कुत्र्यांपेक्षा भटकी कुत्री ज्यास्त प्रेमभाव दाखवतात , त्यांना एकदा खायला घातले तर महिनाभर तुम्हाला पाहून शेपूट हलवतील .
पाळीव कुत्री आणि पालकांचा डस्टबीन करणारी मुलं एकसारखी असतात .
7 Oct 2018 - 2:58 pm | प्रकाश घाटपांडे
फ्रेन्ड भुभुला श्रद्धान्जली