सातारा जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे "औंध". रहाळात प्रसिध्द असणारी आणि नवरात्रात गर्दी होणारे यमाईगडावरचे यमाईचे मंदिर, गडाच्या निम्म्या उंचीवर असणारे छोटेखानी पण अप्रतिम असे म्युझियम, गावातील पंतप्रतिनिधींचा राजवाडा आणि शेजारचे यमाईचे मंदिर हे सर्व पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. मात्र यमाईगडाच्या तटबंदीवर ( हा कोणताही लढावु किल्ला नाही, फक्त मंदिराभोवती संरक्षणासाठी तटबंदी बांधलेली असल्याने त्याला यमाईगड म्हणतात ) उभारल्यास पुर्वदिशेला सभोवतालच्या टेकड्यातून एक एकुलता एक कातळकडा असलेला डोंगर लक्ष वेधून घेतो, हाच डोंगर म्हणजे शिवरायांच्या दुर्गबांधणीतून साकार झालेला "भुषणगड".
सध्या माणदेशात वहाणार्या भर्राट वार्याचा फायदा घेण्यासाठी आजुबाजुच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात पवनचक्क्यांचे जाळे उभारले आहे. यातून कातळमाथा आणि तटबंदीचे लेणे ल्यालेला भुषणगड लक्षवेधी आहे. माणदेशाचा हा परिसर एरवी तसा भकास असला तरी पावसाळ्यात थोडा सुसह्य होतो. गावकर्यंनी या गडावर वृक्षारोपण करुन अवघा डोंगर हिरवाजर्द केला आहे, त्यात पिवळ्या फुलंच्या झाडामुळे गडावर भंडारा उधळल्याचा भास होतो. तेव्हा एखादा सवडीचा दिवस पहायचा आणि या परिसरात यायचे. औंध, भुषणगड अशी छोटीशी सहल भरपुर आनंद देणारी आहे.
या गडावर जाण्यासाठी बर्याच वाटा आहेत. भूषणगड सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात येतो. दहीवडी - कराड मार्गावरील वडूज या मोठ्या गावातून भूषणगडला जाण्यासाठी बसेस आहेत. खाजगी वाहानाने भूषणगडला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत.
१) पुणे - फलटणमार्गे - भुषणगडला जाण्यासाठी :
अ) दहीवडी - कराड मार्गावर वडूज पासून २० किमी अंतरावर पुसेसावळी गाव आहे. या गावात शिरल्यावर उजव्याबाजूला जाणारा रस्ता ल्हासुर्णेमार्गे भूषणगडच्या पायथ्याशी जातो. या ५ किमी रस्त्यापैकी अर्धा रस्ता कच्चा आहे.
आ) दहीवडी - वडूज - उंबर्डेफाटा - शिरसेवाडी - होळीचेगाव - भूषणगड हा छोट्या गावांमधून जाणारा रस्ता खराब आहे. तसेच चुकण्याची शक्ययता जास्त आहे.
ई ) पुसेसावळी - दहिवडी मार्गावरील उंचीठाणे -वांझोळी मार्गे जाणारा रस्ता जवळचा आहे, पण शेवटचा काही भाग कच्चा आहे.
२) पुणे - सातारा मार्गे भुषणगडला जाण्यासाठी :
क) पुणे - सातारा - कोरेगाव - रहिमतपुर - पुसेसावळी - भुषणगड.
२) पुणे - सातारा - कोरेगाव - पुसेगाव रहिमतपुर- पुसेसावळी - रहाटणी - भुषणगड.
वडूजवरुन भुषणगडला जाणार्या बसचे वेळापत्रक
भुषणगडाकडे- ७.००, २.३०, ७.०० ( मुक्कामी) वांझोळी ९.३० ( सकाळी ) ७.०० ( संध्याकाळी )
वडूजकडे - ६.००, ८.००, ३.३०.
विलक्षण कच्च्या रस्त्यावरुन गडाच्या ओढीने आपण जात असताना, दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडचा एकमेव डोंगर आपले लांबुनच लक्ष वेधून घेतो. या डोंगरावर सुस्थितीत असलेला भूषणगडचा किल्ला व नवसाला पावणारी हरणाइ देवी, या मुलुखात प्रसिध्द आहे. गावकर्यांनी गडाला पायर्या बांधल्या आहेत व गडावर वृक्षारोपण करुन गड हिरवागार केलेला आहे. यात पिवळ्याजर्द फुलांची झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गडाला वेगळीच शोभा आली आहे. तसेच अनेक छोटे पक्षी व फुलपाखर यांनी गड गजबजून गेला आहे.
या फारश्या ज्ञात नसलेल्या किल्ल्याला ईतिहास मात्र आहे. सातारा गॅझेटियरप्रमाणे देवगिरीचा सम्राट राजा सिंघण दुसरा (१२१०-१२४७) याने हा किल्ला बांधला असा उल्लेख असला तरी तो चुकीचा आहे. हा गड शिवाजी महाराजांनी वर्धनगडाबरोबरच इ.स. १६७६ मधे बांधला असावा. सभासदाच्या बखरीत देखील तसाच उल्लेख आहे. संपुर्ण शिवकाळात हा गड मराठ्यांकडे होता. नंतरच्या काळात औरंगजेबाने किल्ले जिंकून त्याचे नाव इस्लामतारा ठेवले. पेशवेकाळात हा गढ प्रतिनिधींच्या ताब्यात होता. पुढे इ.स. १८०५ मधे रहिमतपुरच्या फत्तेसिंह मानेंनी या गडावर हल्ला केला. इ.स. १८४८ मध्ये इंग्रजांनी साता-याचे राज्य खालसा केल्यावर भुषणगडचा ताबा इंग्रजांकडे आला.
२००४ चा पावसाळा घरात बसून फारच कंटाळा आल्याने अंगावर बुरशी चढेल कि काय असे वाटु लागले. जातीवंत भटक्याला फारकाळ घरी बस्णे तसेही अशक्य असते. मात्र एकुण पाउस आणि रस्ते, वाटा याचा विचार करता, सह्याद्री परिसरातील एखाद्या गडावर जाण्यापेक्षा तुलेनेने कमी पाउस असलेल्या ठिकाणी जाणेच योग्य ठरले असते. जवळच असलेल्या आणि म्हणुनच राहिलेल्या भुषणगडाची मला आठवण झाली. ठरले तर मग, मस्तपैकी बाईकवर स्वार होउन भुषणगडच्या दिशेन गाडी दामटली.पुसेसावळी ओलांडून, येळीव तलाव मागे टाकून उंचीठाणे गावाकडे निघालो. नुकताच २००३ साली पडलेल्या दुष्काळात याच येळीव तलावाच्या परिसरात चारा छावणी होती. त्यावेळी हाडाचे सापळे झालेली जनावरे आणि बापुडवाणे झालेले त्यांच्या मालकांचे चेहरे डोळ्यासमोर तरळून गेले. यावर्षी वर्षामान चांगले असल्याने चोहोबाजुला हिरवळ होती. मधेच पावसाची सर भिजवून ओलावा शिंपत होती. वांझोळी गाव मागे टाकले आणि विलक्षण कच्चा रस्ता सुरु झाला. मात्र गडाची ओढ या अडचणीवर मात करुन गेली.
पुर्वक्षितीजावर टेकड्यांच्या गराड्यातून भुषणगड कातळकड्यामुळे आणि माचीसारख्या पुढे आलेल्या डोंगरसोंडेमुळे ठळक दिसत होता.
पायथ्याच्या गावी एका झाडाखाली गाडी लावली आणि गावकर्याला वाट नीट विचारून गडाकडे निघालो.
भूषणगडवाडीतून पायर्यांची वाट गडावर जाते. खरंतर पाउलवाटेने कोणताही डोंगर चढणे सोपे जाते. पण सोयीच्या नावाखाली पायर्या बांधून गैरसोयच केली जाते. असो, ५०० पायर्या चढण्याशिवाय पर्याय नव्हता.
पायर्यांच्या सुरुवातीला सिमेंटमध्ये बांधलेली आधुनिक कमान आहे. पायर्यांची रचना अशी केलेली आहे की, गड चढतांना गडाची तटबंदी व बुरुज सतत उजव्या बाजूस रहातात. या रचनेमुळे शत्रू कायम गडावरुन मार्याच्या टप्प्यात रहातो. हे शिवरायांनी बांधलेल्या गडाच्या दुर्गबांधणीचे ठळक वैशिष्ट्य. ह्यामागेही एक विचारआहे. शंभरातील नव्वद लोक उजव्या हाताचे तर फक्त दहा डावखुरे असतात. शत्रू सैन्यातील बहुतांश लोक आपल्या उजव्या हातात तलवार तर डाव्या हातात ढाल पकडणार. वाटेच्या समांतर असणाऱ्या वरील भागातील तटबंदीवरून शत्रू 'टप्प्यात' येतो. शत्रूवर दगड धोंड्यांचा वर्षाव करायचा. दगडांना अडविण्यास उजव्या हातातील तलवार वापरणे ही 'नैसर्गिक' प्रतिक्रिया. ह्यामुळे तलवारी बोथट, वेड्यावाकड्या आणि निकामी होणार. ह्या अर्धमेल्या शत्रूनी चुकून गडाच्या आत प्रवेश केलाच, तरी त्याचा आरामात पाडाव करणे शक्य होईल असा यामागे विचार आहे. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या कोणत्याही डोंगरी किल्ल्यावर जसे प्रतापगड, राजगड, रायगड याठिकाणी आपण हेच दुर्गवैशिष्ट्य पाहु शकतो. संपूर्ण बुरुजाला प्रदक्षिणा घालून मार्ग वरती जातो. ह्यामध्ये बुरुज सतत उजव्या बाजूला राहतो. बुरुजातील जंग्या अश्या बांधल्या आहेत, पायवाटेने येणारा जाणारा प्रत्येक जण ह्यामधून दिसेल आणि मार्यात राहिल.
गड चढायला सुरवात केल्यावर २० मिनीटात एक सपाटी लागली. इथे एक खंडोबाचं मंदिर दिसते. येथून समोर चढणारी पायर्यांची वाट गडाकडे जाते तर उजवीकडे एक पायवाट गडाला वळसा मारुन भुयारी देवीच्या मंदिराकडे जाते.
दाट, लांब मिशी, पसरलेले कान आणि वर 'गांधी टोपी' घातलेल्या खंडोबाची मूर्ती बघून थोडी गम्मत वाटली. आपल्या देव-देवतांच्या पोशाखांवर स्थानिक जीवन पद्धतीचा पगडा दिसून येतो त्याचंच हे एक उत्तम उदाहरण.
काही पायऱ्या चढल्यावर किल्ल्याचा प्रमुख दरवाजा आला. ह्याची बांधणी गोमुखी रचनेची आहे. दरवाज्यापर्यंत नेणारी वाट एकदा डावीकडे वळते आणि लगेच उजवीकडे वळते. 'z' आकाराच्या ह्या चिंचोळ्या मार्गाला तटबंदी आणि बुरुजांनी घेराव घातला आहे. प्रचंड संख्येने शत्रू आला, तरी ह्या चिंचोळ्या मार्गावर तो अडून राहणार अशी ही रचना. ह्या प्रकारच्या प्रवेशद्वाराला ‘‘गोमुखी’’पध्दतीची बांधणी म्हणतात.
गडाची प्रवेशद्वाराची कमान आज शाबूत नाही. पण त्याच्या बाजूचे बुरुज सुस्थितीत आहेत. थोडे निरखुन पाहिल्यास डावीकडच्या तटबंदीवर तोफगोळ्यांचा मारा झाल्यामुळे खड्डे पडलेले दिसतात.
प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्यांच्या देवड्या आहेत.
येथून दोन वाटा फुटतात, एक पायवाट गडाच्या पश्चिम टोकाकडील बुरुजाकडे जाते तर डावी प्रशस्त पायवाट गडमाथ्याकडे जाते. पश्चिमेकडील बुरुजाकडे जाताना एक विहीर पहायला मिळते, खरतर हि दगडाची खाण आहे, इथून खणून दगड काढून गडाच्या बांधकामाला वापरले आहेत.
तटबंदी अजून खणखणीत अवस्थेत असली तरी त्यावर उगवणार्या झाडांना वेळीच आळा घालायला हवा, अन्यथा पडझड सुरु होइल.
पश्चिम टोकाच्या बुरुजावर पोहचल्यावर खाली लांबवर पसरलेली डोंगरसोंड दिसते.या बुरुजाला तोफेसाठी जंग्या आहेत.तसेच या बुरुजावरुन गडाचा मधला उंचवटा दिसतो. मघाशी खंडोबा मंदिरापाशी सोडलेली वाट या बुरुजाच्या खाली येते. इथे आधी एक भुयार होते, त्यात भुयारी देवी होती. आता मात्र भुयार बुजवून देवीचे मंदिर नव्याने बांधले आहे.
बुरुज पाहून मधल्या उंचवट्याकडे जाताना, उजव्या हाताला एक चौकोनी विहीर लागली. लांबी रुंदी साधारण आठ बाय आठ मीटर ! सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका हा दुष्काळी भाग. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून इतक्या मोठ्या आकाराची विहीर ! किल्ल्यावरील तटबंदी आणि इतर मंदिराचे बांधकाम बघता, बांधकाम समयी पाण्याची गरज मोठी असणार हे निश्चित. या विहीरीजवळच महादेवाचे छोटे मंदीर आहे.
या मंदिरावरुन पुढे गेल्यावर किल्ल्याची अधिष्ठात्री असलेल्या हरणाइ देवीचे उत्तराभिमुख मंदिर दिसते. हि हरणाई देवी आजुबाजुच्या गावातील गावकर्यांचे श्रध्दास्थान आहे. नवरात्रात इथे विशेष गर्दी असते.
या जिर्णोध्दारीत मंदिरात हरणाई देवीची दिड फूट उंचीची मुर्ती आहे. मूर्तीवर पितळी मुखवटा बसविलेला आहे. हरणाई देवीच्या उजव्या बाजूस सिध्दनाथाची काळ्या दगडात कोरलेली मूर्ती आहे. स्थानिक अख्यायिकेनुसार औंधची यमाई आणि हि हरणाई देवी या बहिणी-बहिणी, पण त्यांच्यात भांडण झाल्यामुळे त्या वेगवेगळ्या डोंगरावर जाउन बसल्या.
गडावर मुक्काम करायची वेळ आल्यास हे हरणाई मंदिरा समोरची शेड हा एकमेव पर्याय. देउळ रात्री कुलुपबंद असते असते आणि शेडमधे जेमतेम चार- पाच जण झोपु शकतील. गडावर जेवणाची व्यवस्था नाही. एकतर आपण सोय करायची किंवा हरणाई देवीच्या पुजार्यांना आधी सांगितल्यास ते व्यवस्था करतात. ह्या मंदिराशेजारीच गणपतीचे मंदिर आहे. श्रींची मूर्ती संगमरवरात घडवलेली आहे.
मंदिरासमोर दिपमाळ व शेंदूर फासलेले दगड आहेत. मंदिराच्या समोर डेरेदार चिंचेचा वृक्ष असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे एका फांदीला चक्क तुरीच्या शेंगा लागतात.
गडाचा हा सर्वोच्च माथा ९०४ मीटर ( २९७० फुट ) उंच आहे. अर्थात पायथ्यापासून उंची जेमतेम १५० मीटर असल्याने रमतगमत देखील आपण अर्ध्या तासात गडावर पोहचु शकतो. आजुबाजुच्या परिसरात एकही मोठा डोंगर नसल्याने दुरवरचा प्रदेश अगदी सहज नजरेला पडतो. त्यामुळे अर्थातच परिसरातील गावावर नजर ठेवणे अगदी सहज शक्य होत असणार.
मंदिरासमोरील पायवाटेने उंचवटा उतरुन आपण गडाच्या उत्तर तटबंदीपाशी येतो. वाटेत गडाच्या माचीच्या मध्यभागावर एक मोठ्या आकाराचा बांधीव बुरुज आहे. या बुरुजावर ध्वजस्तंभ असून त्यावर भगवा ध्वज मोठ्या डौलाने फडकताना दिसतो.
किल्ल्याची तटबंदी चांगल्या प्रमाणात शाबूत आहे. दरवाज्याचे दोन बुरुज धरून एकूण दहा बुरुज शाबूत आहेत. काहीं ठिकाणी तटबंदी धोकादायक झालेली दिसली. तटबंदी मध्ये एक शौचकूप, पाणी साठवण्याची जागा, तोफा आणि बंदुकांसाठी साठी वेगवेगळ्या आकाराच्या जंग्या दिसल्या.
तटबंदीवरुन चालत गेल्यास देवळाच्या खालच्या बाजूस साचपाण्याचा तलाव दिसतो. याच तटबंदीवरुन आपण संपूर्ण किल्ल्याची प्रदक्षिणाकरुन पुन्हा प्रवेशद्वारापाशी येतो.
गडमाथा पाहून झाल्यानंतर मी पायवाटेने भुयारी मातेच्या दर्शनासाठी गेलो. तेथे नव्याने उभारलेल्या मंदिरातील मुर्तीचे दर्शन घेउन पायर्या उतरायला सुरवात केली. या गडफेरीला मला जवळपास दोन तास लागले. खाली उतरून पुन्हा एकदा कच्च्या रस्त्यावर डर्ट बायकिंग करुन मी पुसेसावळी -मायणी रस्त्यावरच्या ल्हासुर्णेला पोहचलो आणि गाडी मायणीकडे दामटली.
मी जरी माणदेशातील हे गड सुटेसुटे बघितले असले तरी बाहेरुन येणार्या दुर्गारोहींनी जर तीन दिवसाचा प्लॅन केला तर हे सर्व गड एकदम पाहून होतील. वर्धनगड , भूषणगड, महीमानगड,संतोषगड, वारुगड, औधंचे म्युझियम, यामाई मंदिर, गोंदवले येथील आश्रम, शिखर शिंगणापुर, फलटणमधील मंदिरे असे या परिसरात बरेच काही पहाण्यासारखे आहे. तेव्हा या पावसाळ्यात सवड काढा आणि माणदेशाच्या भटकंतीला निघा.
( तळटिपः- सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भग्रंथः-
१) सातारा जिल्हा गॅझेटियर
२ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३ ) साथ सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के. घाणेकर
४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट
६ ) https://durgwedh.blogspot.com हा ब्लॉग
७ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
प्रतिक्रिया
31 Aug 2018 - 4:00 pm | यशोधरा
आवडला लेख.
31 Aug 2018 - 6:48 pm | खिलजि
दुविसाहेब , नेहेमीप्रमाणेच छान आहे माहिती गडाबद्दल ..
1 Sep 2018 - 8:34 am | कुमार१
नेहेमीप्रमाणेच छान आहे माहिती गडाबद्दल ..
1 Sep 2018 - 9:48 am | शशिकांत ओक
... कातळमाथा आणि तटबंदीचे लेणे ल्यालेला भुषणगड लक्षवेधी आहे. माणदेशाचा हा परिसर एरवी तसा भकास असला तरी पावसाळ्यात थोडा सुसह्य होतो. गावकर्यंनी या गडावर वृक्षारोपण करुन अवघा डोंगर हिरवाजर्द केला आहे, त्यात पिवळ्या फुलंच्या झाडामुळे गडावर भंडारा उधळल्याचा भास होतो.... पायर्यांची रचना अशी केलेली आहे की, गड चढतांना गडाची तटबंदी व बुरुज सतत उजव्या बाजूस रहातात. या रचनेमुळे शत्रू कायम गडावरुन मार्याच्या टप्प्यात रहातो. हे शिवरायांनी बांधलेल्या गडाच्या दुर्गबांधणीचे ठळक वैशिष्ट्य. ह्यामागेही एक विचारआहे. शंभरातील नव्वद लोक उजव्या हाताचे तर फक्त दहा डावखुरे असतात. शत्रू सैन्यातील बहुतांश लोक आपल्या उजव्या हातात तलवार तर डाव्या हातात ढाल पकडणार. वाटेच्या समांतर असणाऱ्या वरील भागातील तटबंदीवरून शत्रू 'टप्प्यात' येतो. शत्रूवर दगड धोंड्यांचा वर्षाव करायचा. दगडांना अडविण्यास उजव्या हातातील तलवार वापरणे ही 'नैसर्गिक' प्रतिक्रिया. ह्यामुळे तलवारी बोथट, वेड्यावाकड्या आणि निकामी होणार. ह्या अर्धमेल्या शत्रूनी चुकून गडाच्या आत प्रवेश केलाच, तरी त्याचा आरामात पाडाव करणे शक्य होईल असा यामागे विचार आहे. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या कोणत्याही डोंगरी किल्ल्यावर जसे प्रतापगड, राजगड, रायगड याठिकाणी आपण हेच दुर्गवैशिष्ट्य पाहु शकतो....
आपले दुर्ग विहार पाहणीय, वाचनीय आणि मननीय असतात. पुनःप्रत्ययाचा आनंद झाला. वरील लेखात डाव्या उजव्या हाताने चालवायची शस्त्रे यावरील निरीक्षण भावले.
1 Sep 2018 - 10:52 am | लोनली प्लॅनेट
प्रत्येक वेळेस प्रतिक्रिया देत नसलो तरी सर्व वाचत आहे
तुमच्या गड किल्ले फिरण्याच्या passion ला सलाम
3 Sep 2018 - 7:20 pm | प्रचेतस
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.
एकच दुरुस्ती--ढाल पकडली जात नाही तर मनगटाला बांधली जाते, जेणेकरून शत्रूची तलवार सहज अडवता यावी.
7 Sep 2018 - 10:39 am | दुर्गविहारी
बरोबर आहे. पण उत्तर काळात ढाल बांधण्याएवजी पकडणे सोयिस्कर वाटल्याने त्याप्रकारच्या ढाली आल्या.
4 Sep 2018 - 8:27 pm | चाणक्य
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण
7 Sep 2018 - 10:44 am | दुर्गविहारी
यशोधरा ताई, खिलजी, ओक साहेब, कुमार१, लोनली प्लॅनेट, वल्लीदा, चाणाक्य साहेब आणि सर्वच वाचकांचे मनापासून आभार.