आपल्यापैकी बर्याच जणांना, आयुष्यात कधीतरी, जवळून मृत्यु दर्शन झाले असेल. मलाही ते बर्याच वेळा झाले आहे. निव्वळ, दोरी बळकट, म्हणून त्या प्रसंगांतून सहीसलामत सुटलो आहे. त्यातील पांच ठळक घटना, अगदी नुकत्या घडलेल्या गोष्टीप्रमाणे लख्ख आठवतात.
लहान असतानाची गोष्ट आहे. आमच्या घरापासून मालाडजवळचा मार्वे किनारा, २-३ किलोमीटरवर होता. एका संध्याकाळी, आम्ही आणि शेजारचे एक कुटुंब, तिथे पायीच जायला निघालो. मार्वे रोडला लागल्यावर, थोड्याच वेळांत, मागच्या बस स्टॉपवर एक बस येताना दिसली. आई आणि शेजारच्या बाईंना चालायचे नव्हते, म्हणून माझ्या वडिलांना सांगून त्या बसपर्यंत धावत गेल्या. त्या गेल्या बघितल्यावर, मलाही जावेसे वाटले. वडील म्हणाले, "पळ लवकर आणि गाठ त्यांना."
पडत्या फळाची आज्ञा घेऊन, मी ही धावत सुटलो. त्यावेळेस, मालाड मुंबईबाहेर होते. तिथे खाजगी बसेस असायच्या. त्या पिवळ्या रंगाच्या, नाक फेंदारलेल्या बसेसना, कधी मागे दरवाजा असायचा वा कधी ड्रायव्हरच्या समोरच्या बाजूला पुढे! मी बसशी पोचेपर्यंत, शेजारच्या बाई आंत चढल्या होत्या आणि आई चुकून मागच्या बाजूला गेली होती. बस थांबलेलीच होती. अचानक, पाय अडखळून मी बसच्या पुढे, डावीकडच्या चाकाला लागून पडलो. ड्रायव्हरला मी दिसणे शक्य नव्हते. भीतीने घाबरल्यामुळे, मला उठताही येत नव्हते. मी ओरडायचे वा रडायचेही विसरलो. तेवढ्यांत आई पुढच्या दरवाजाशी आली आणि तिने मला बघितले. क्षणार्धात, तिने मला उचलले आणि बसमधे प्रवेश केला. आंत बसल्यावर, माझ्यापेक्षा आईच जास्त घाबरली होती. ती फक्त मला कवटाळून रडत होती.
पुढे, राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेत शिकायला असताना, काही दिवस मामांच्या घरी, पुण्याला रहात होतो. तिथून जवळच, एस. पी. चा तरणतलाव असल्याने, मी रोज पोहायला जायचो. नेहमीच्या राऊंडस मारुन झाल्या की थोडावेळ, खोल पाण्याच्या भागात उड्या मारुन, काठाला डुंबत असे. एक दिवस, काठाच्या पन्हळीला धरुन असताना, अचानक, समोरच्या बाजूने एका मुलाने उडी मारलेली बघितली. वर आल्यावर त्याला पोहता येत नव्हते. तो गटांगळ्या खाऊ लागला. कुणाचे लक्ष जाण्यापूर्वीच मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला मागून धरण्याचा प्रयत्न केला. पण, तो अचानक गोल फिरला आणि त्याने मला गळामिठीच मारली. (कारणाशिवाय, तेंव्हा कोणी उगाचच गळामिठी मारत नसत.) ती सोडवायच्या प्रयत्नांत. आम्ही दोघेही तळाला गेलो. मला तर, तोपर्यंतच्या सगळ्या जीवनाचा चित्रपटच दिसला. तळाला पाय टेकताक्षणी, मी पायाने जोरदार उशी घेतली आणि सगळी ताकद लावून ती मगरमिठी सोडवली. त्याक्षणी, मनांत हाच विचार आला की, आता या मुलाचे काही होवो, आपण वाचलंच पाहिजे. सुदैवाने आम्ही दोघेही वर आलो आणि त्या मुलाला कोणीतरी हात दिला. मी मुक्काट्याने घरी आलो. मामांना काही सांगितले नाही, नाहीतर माझे पोहणे बंद झाले असते.
पुण्याला असतानाच, स्कूटरवरुन मुंबईला जाण्याची खुमखुमी फार होती. बर्याच वेळा, एकट्यानेच जुन्या मुंबई-पुणे रत्याने प्रवास करायचो. असंच एकदा, सकाळी लवकर पुण्याहून निघालो. लॅम्ब्रेटा स्कूटर होती. कारण व्हेस्पाचा नंबर लागायला, त्याकाळी दहा वर्षे लागायची! घाट सुरु झाल्यावर अगदी सांभाळून चालवत होतो. नुकताच, पुढे एक दुधाचा टँकर गेला असावा, कारण तो दूध सांडत गेला होता.(तेंव्हा दूध रस्त्यावर ओतण्याची पद्धत नव्हती.) शक्यतो त्या ओघळाला चुकवत होतो. पण एकाक्षणी स्कूटर घसरती आहे असे वाटून ब्रेक जरा जास्त दाबला. आणि दुसर्याच क्षणी, स्कूटर १८० डिग्रीच्या कोनात फिरुन, तिचे तोंड पुण्याच्या दिशेने झाले. निव्वळ, माझ्या उंचीमुळे, माझे पाय टेकत असल्याने स्कूटर पडली नाही. स्पीड फारसा नव्हता आणि वेळ आली नव्हती.
नोकरीच्या काळात, एका छोट्या कंपनीत 'शोध आणि विस्तार' विभागाचा मुख्य होतो. कंपनीच्या दोन बिल्डिंग्ज् होत्या. दोन्हींत, पहिल्या मजल्यावर काम चालू असायचे. दिवसभरांत, माझ्या दोन्ही ठिकाणी, बर्याच फेर्या व्हायच्या. एकेक पायर्या गाळत, धावत जिना चढण्याची संवय झाली होती. सकाळीच एका ठिकाणचे काम सुरु करुन मी दुसर्या बिल्डिंगकडे निघालो. मधे थोडे अंतर होते. दुसर्या बिल्डिंगशी आल्यावर , कामाच्या विचारांत गुंतलो होतो. पायर्या चढायला सुरवात केली त्याक्षणी, माझ्या पायापुढे काही हालचाल जाणवली. खाली पाहिले तर, माझ्या पुढे एक ७-८ फुटांचा पिवळा धम्मक सर्पराज जिना चढत होता. माझा पाय हवेतच थबकला. मागच्या मागे, उलट्या पायर्या उतरुन खाली आलो आणि तिथल्याच एका कामगाराला हांक मारली. तोपर्यंत, साप अर्थ्या जिन्यातल्या लँडिंगवर पोचला होता. जिना सरळच होता. कामगार तिथलाच गांववाला असल्याने, त्याने सहजपणे त्या सापाला मारले. शेपटीला धरुन त्याने तो खाली आणला तेंव्हा तो काळा पडला होता, पिवळ्या रंगाचा मागमूसही नव्हता. जनावर विषारी असल्याचे त्यानेच सांगितले. 'काढता पाय घेणे' चा अर्थ त्यादिवशी बरोबर समजला.
सुट्टीच्या दिवसांत, सहकुटुंब राजस्थानात फिरायला गेलो होतो. त्याच वेळेला अडवानींना रथयात्रा काढण्याची बुद्धी झाल्यामुळे, आम्ही फक्त, उदयपूरच पाहू शकलो. जयपूरला आल्यावर, दंगली सुरु झाल्याने, हॉटेलातच दोन दिवस काढावे लागले. कारण मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, वॉल्ड सिटीत गेलात तर जिवंत परत येणार नाही, अशी परिस्थिती होती. परतीचे रेल्वे तिकीट जयपूरहूनच होते. गाडीच्या वेळेच्या बर्याच आधी आम्ही स्टेशन गांठले. गाडी प्लॅटफॉर्मला लागेपर्यंत, बाकी सगळे बाकांवर बसले होते. तिथे प्लॅटफॉर्म इतके बुटके होते, की सहजच रुळांत उतरता येत होते. समोर एक शंटिंग चालले होते, ते पहायला मी दोन रुळ ओलांडून पुढे गेलो. त्याच्या पुढचे ट्रॅक्स यार्डातले असल्याने गाडी येण्याची भीति नव्हती. त्यांतल्या एका ट्रॅकवर उभा राहून मी लांबचे शंटिंग पहात होतो. अचानक, मला माझ्या डावीकडे हालचाल जाणवली. डावीकडे पाहिले असता, एक, मागे फुली मारलेला डबा, माझ्याच दिशेने, आवाज न करता येत होता आणि माझ्यापासून केवळ ५-७ फुटांवर पोचला होता. मी टुणकन मागे उडी मारली. इंजिनने ढकलून दिलेले ते दोन डबे उजवीकडे घरंगळत गेले आणि काही अंतरावर थांबले. माझे हृदयसुद्धा थोडे सेकंद थांबले असावे. मी निमुटपणे परत फलाटावर गेलो आणि काही झालेच नाही असे दाखवून, बाकीच्यांच्या गप्पांत मिसळलो.
या व्यतिरिक्त, लोकलच्या दारांत उभं राहून प्रवास करणे, विजेचे किरकोळ झटके बसणे, डोंबिवलीला असताना, संपूर्ण बिल्डिंगलाच शॉक बसायला लागणे, हे आणि असे, अनेक किरकोळ अनुभव आहेत, पण ते खचितच, जीवघेणे नाहीत.
प्रतिक्रिया
23 Jul 2018 - 4:38 pm | योगी९००
थरारक अनुभव आहेत...तुम्ही सही सलामत वाचलात हे महत्वाचे...!!
देव तुमच्या पाठीशी आहे हेच प्रतित होते.
23 Jul 2018 - 5:08 pm | टवाळ कार्टा
बाब्बो
23 Jul 2018 - 5:30 pm | गामा पैलवान
तिमा,
जीव वाचल्याबद्दल पंचवार अभिनंदन. बाकी, ते पूर्ण बिल्डींगीस शॉक लागायचा प्रकार काय होता? उत्सुकता चाळवली गेलीये.
आ.न.,
-गा.पै.
23 Jul 2018 - 8:13 pm | तिमा
डोंबिवलीला आमच्या चाळीला जे विजेचे कनेकशन दिले होते तो एका साईडला वळलेला पाईप उलटा लावला होता . परिणामी, पावसाळ्यात तो पाईप पाण्याने भरला आणि शॉर्ट होऊन, सकाळी सगळ्याच बायकांना कणकेत हात घातला तरी शॉक बसायला लागला . ओल आलेल्या भिंतींनाही शॉक बसू लागला . नंतर मराविम ने ते दुरुस्त केलं .
25 Jul 2018 - 11:59 am | गामा पैलवान
ऐकावं ते नवलंच !
-गा.पै.
23 Jul 2018 - 6:21 pm | सोमनाथ खांदवे
तुमची आयुश्याची दोरी खूपच बळकट असणार !!! तुमच्या बरोबर प्रवास करणारे सुद्धा तुमच्या बरोबर प्रत्येकवेळी वाचणार !! कधी नव्हे ते असल्या घटना वाचल्यावर विधिलिखित वर विश्वास बसायला लागतो .
24 Jul 2018 - 10:18 am | तिमा
तुमची आयुश्याची दोरी खूपच बळकट असणार
दोरी ? चांगला दोरखंड असणार! म्हणून तर अन्ननलिकेला भोक पडल्यावर देखील वाचलो! माझा डॉक्टरही म्हणत होता की एवढ्या गंभीर प्रसंगात तुम्ही हंसताय कसे ?
23 Jul 2018 - 7:04 pm | उगा काहितरीच
माफ करा , पण उगाचच finale destination आठवलं ;-)
23 Jul 2018 - 7:54 pm | सोमनाथ खांदवे
मी सुध्दा बराच वेळ त्या सिनेमा च्या सिरीज चे नाव आठवण्याचा प्रयत्न करत होतो पण नेहमीप्रमाणे स्मरणशक्ती ने दगा दिला .
23 Jul 2018 - 8:40 pm | ट्रम्प
काय राव कशाला म्हाताऱ्या माणसांना घाबरवता ?
24 Jul 2018 - 2:49 pm | ज्योति अळवणी
बापरे! भलतेच अनुभव!
24 Jul 2018 - 2:49 pm | ज्योति अळवणी
बापरे! भलतेच अनुभव!
25 Jul 2018 - 8:50 am | सिरुसेरि
थरारक अनुभव . देव तारी त्याला कोण मारी .
25 Jul 2018 - 12:04 pm | यशोधरा
बापरे!
26 Jul 2018 - 2:31 pm | राघव
बाब्बौ!!
माझा स्वतःचा असला अनुभव अजून नसला तरी माझ्या काकांचा एक अनुभव त्यांनी सांगीतला तसा आहे, फक्त मला आता ते कुठून कोणत्या गावी चालले होतेत ते आठवत नाही :-
काक एस.टी.नं चालले होतेत. उजव्याबाजूला ड्रायव्हरच्या मागे ४-५ रांगा सोडून बसलेले. जास्त गर्दी नव्हतीच, त्यात मधे कुठेतरी बस थांबली तेव्हा बरीच लोक उतरलीत. डाव्या बाजूला जागा मोकळी झाली. काकांना काय वाटले कुणास ठाऊक ते डाव्या बाजूच्या रिकाम्या सीट्वर जाऊन बसले. पाचच मिनिटात बसला भीषण अपघात झाला. बाजूनं उलट दिशेनं येणार्या एका ट्रक मधून एक मोठी सळाख बाहेर आडवी आलेली होती. ड्रायव्हरच्या बाजूचे सर्व लोक ड्रायव्हर सकट बसल्याजागी कापल्या गेले. केवळ दोरी मजबूत म्हणून डावीकडचे लोक वाचले. काका अकोल्याला घरी परत आले तेव्हा शर्ट [इतरांच्या] रक्तानं माखलेला होता. अजूनही आठवलं की अंगावर काटा येतो. :-(
2 Aug 2018 - 4:03 pm | पप्पुपेजर
This was from Akot to Akola evening bus in 1992 most probably one of best friend of my father was traveling and he got dead he was routine updown traveler from akola akot .
My dad was working with SBI akot at that time.
13 Aug 2018 - 6:14 pm | राघव
:-(