✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

‘विक्रांत’

प
पराग१२२६३ यांनी
Sat, 12/04/2021 - 16:09  ·  लेख
लेख
आज नौदल दिन. 50 वर्षांपूर्वी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात म्हणजेच बांगलादेश मुक्तिसंग्रामात 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदलाने गाजवलेल्या पराक्रमाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 4 डिसेंबरला भारतात नौदल दिन साजरा केला जातो. त्या युद्धात पराक्रम गाजवलेल्या आणि सेवानिवृत्तीनंतर संग्रहालय म्हणून नावारुपाला आलेल्या, अल्पावधीतच मुंबईतील एक आकर्षण ठरलेल्या, पण आता इतिहासजमा झालेल्या ‘विक्रांत’वरील त्याच संग्रहालयाविषयी... ‘विक्रांत’ने गाजवलेल्या पराक्रमाची भावी पिढीला ओळख व्हावी या हेतूने त्यावर नौदलाने एक तात्पुरते पण आकर्षक संग्रहालय उभारले होते. त्यामधून विमानवाहू जहाजावरील नौसैनिकांच्या जीवनाची ओळख करून देण्यात आलेली होती. ते संग्रहालय मुंबईतील नाविकतळावर सर्वांना पाहण्यासाठी दरवर्षी नौदल सप्ताहात खुले ठेवले जात होते. ते पाहण्यासाठी बरीच गर्दीही होत असे. भारतीय नौदलाच्या सेवेतून 31 जानेवारी 1997 ला ‘विक्रांत’ निवृत्त झाले. ते भारतीय नौदलाचे पहिले विमानवाहू जहाज होते. ‘विक्रांत’ भारतीय नौदलात 4 मार्च 1961 ला सामील झाले. ‘विक्रांत’चे संग्रहालयात रुपांतर केल्यावर त्यावरील डेकच्या धावपट्टीखालील दोन मजले आणि नियंत्रण कक्षातील एक मजला दर्शकांसाठी खुले करण्यात आले होते. त्यातील प्रत्येक कक्षात देखाव्यांच्या माध्यमातून संबंधित कक्षात चालणाऱ्या कामकाजाची ओळख करून दिली गेली होती. तिथे ठेवण्यात आलेले पुतळे अतिशय सुबक आणि सजीवच भासावेत असे होते. मी आणि माझा मित्र सागरने या संग्रहालयात प्रवेश केल्यावर समोरच सॅल्युट करणाऱ्या नौसैनिकांचे दोन पुतळे दिसले. ते पाहून आम्ही फसलो होतो. आम्हाला प्रत्यक्ष नौसैनिकच आपल्याला सॅल्युट करत आहेत असे वाटले होते. ‘विक्रांत’वरच्या संग्रहालयात प्रवेश केल्याकेल्या तिथे ‘विक्रांत’ची आणि त्यावेळी भारतीय नौदलात कार्यरत असलेल्या काही युद्धनौकांच्या प्रतिकृती ठेवलेल्या होत्या. ‘विक्रांत’चा इतिहासही तेथे मांडण्यात आला होता. पुढे ‘विक्रांत’च्या पुढील भागाकडे गेल्यावर त्याच्या नांगरांचे भलेमोठे साखळदंड पाहून डोळे विस्फारले. तेथून पुढे गेल्यावर ‘विक्रांत’च्या धावपट्टीखाली असलेल्या हँगरमध्ये पोहचलो. तिथे ‘विक्रांत’वरून सेवा बजावलेली विमाने, हेलिकॉप्टर्स आणि विविध प्रकारची शस्त्रास्त्रे ठेवण्यात आली होती. हँगरमध्ये मांडण्यात आलेल्या सर्व गोष्टी पाहून झाल्यावर आम्ही डेकवरच्या धावपट्टीवर गेलो. त्या धावपट्टीवर गेल्यावर खरंच रोमांचित व्हायला झाले. कारण याच धावपट्टीवरून 1971 च्या युद्धात नौदलाच्या लढाऊ विमानांनी पूर्व पाकिस्तानवर निर्णायक हल्ले चढवले होते. धावपट्टीवर असलेल्या नौदलाच्या गाईडनेसुद्धा ही माहिती सांगितली. त्या धावपट्टीवर ‘विक्रांत’वर सेवा वजावून निवृत्त झालेले सी किंग हेलिकॉप्टर ठेवण्यात आले होते. धावपट्टीवरून पुढे ‘विक्रांत’वरचे युद्ध कक्ष, नियंत्रण कक्ष, नौसैनिकांचे भोजनालय, स्वयंपाकघर, रुग्णालय, साधनसामग्रीचा कक्ष इत्यादी कक्षही पाहायला मिळाले आणि शिवाय तिथे उभारलेल्या देखाव्यांमुळे त्या कक्षांमध्ये कशा प्रकारे कामकाज चालत होते याचीही कल्पना आली. या कक्षांकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूने विविध प्रसंगी नौदल कर्मचारी वापरत असलेले विविध प्रकारचे गणवेश, विविध प्रकारचे शौर्य पुरस्कार यांची माहिती करून दिलेली होती. इथून पुढे ‘विक्रांत’ला गती देणाऱ्या इंजिन रुममध्ये पोहचलो. तिथे गेल्यावर भल्यामोठ्या पाईप, पंप, चक्रे पाहायला मिळाली. सगळ्याच वस्तू इथे अजस्त्र वाटत होत्या. त्याच ठिकाणी या सर्व यंत्रणांवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षही होता. इथून पुढचा मार्ग या प्रदर्शनाच्या बाहेरच्या दाराकडे जात होता. मात्र जाताना वाटेत तो कँटिन आणि भेटवस्तूंच्या दुकानांवरून जात होता. मी आणि माझा मित्र सागर तिथून काही भेटवस्तू खरेदी करून ‘विक्रांत’वरून खाली उतरलो. खूप छान झाली होती ती संग्रहालयरुपी ‘विक्रांत’ची भेट. Link https://avateebhavatee.blogspot.com/2021/12/blog-post_4.html
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
इतिहास
मुक्तक
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख

प्रतिक्रिया द्या
1983 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

छान!

Nitin Palkar
Sat, 12/04/2021 - 18:58 नवीन
खूप छान माहिती.
  • Log in or register to post comments

रोचक माहिती. धन्यवाद !

चौथा कोनाडा
Sat, 12/04/2021 - 21:42 नवीन
रोचक माहिती. धन्यवाद !
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा