Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्त विहारि on Mon, 07/04/2016 - 15:16
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
माहिती
डिस्क्लेमर : ह्या लेखांत शेती कशी निवडायची आणि कमीत कमी पैशांत शेतीची राखण कशी करायची? ह्या संबंधीच चर्चा केल्यास उत्तम. पुढील भागा पासून आंबा शेती, काजू शेती, आवळा शेती, मत्स्य शेती, मधमाशा पालन असे विषयवार लेख घेवू या.जेणेकरून इतरांना विषयवार लेख शोधायला अडचण येणार नाही. ===================================== थोडे स्वतः विषयी. मी मारून मुटकून इंजिनियर झालेलो.म्हणजे ३ वर्षाचा डिप्लोमा करायला ९ वर्षे घेतलेला.(१९८१ ते १९९०)सुदैवाने डिप्लोमा झाल्यावर नौकर्‍या मिळत गेल्या आणि जसा-जसा अनुभव मिळत गेला तसा-तसा पगार पण वाढत गेला. सुदैवाने म्हणा किंवा नशीबाने म्हणा, १४-१५ वर्षे खेडेगावाच्या आसपासच नौकरीचे ठिकाण असल्याने बरेच कर्मचारी , शेती करता करता, नौकरी करत असलेले. जसे जसे त्यांच्या घरी येणे-जाणे सुरु झाले आणि मग पुढे त्यांच्या शेतातच मन रमायला लागले. त्यांच्या शेतात फुकट काम करतांना, (साधारण १९९३च्या सुमारास) जाणवले की, बाबा हेच तर आपले क्षेत्र. १९९३ पासून २००६ पर्यंत जसा वेळ मिळेल तसा विविध शेतकर्‍यांना भेटायचा शिरस्ता चालू ठेवला. १९९३ ते १९९९८ पर्यंत, वलसाडला , सतीश देसाई आणि १९९८ ते २००६ पर्यंत श्री. अण्णा पोटे (राहणार लोटे..खेड आणि चिपळूणच्या मध्ये) ह्यांच्या शेतावर पडीक असायचो. २००६ नंतर आर्थिक घडी रुळावर यायला सुरुवात झाली आणि मग शेत विकत घेण्यासाठी शेती बघणे पण सुरु झाले. त्यावेळी आलेले काही आर्थिक अनुभव. २००६ मध्ये एकरी १ लाख रुपये असलेल्या जागेची (त्यात ५ वर्षे जूनी आंब्याची आणि काजूची झाडे) (एकूण किंमत १० लाख) आजची किंमत एकरी २० लाख. २००६ मध्ये एकरी ५०,०००/- (एकही झाड नाही.पडीक जमीन.) असलेल्या जागेची आजची किंमत एकरी २५ लाख. २०१२ मध्ये मी एक जागा बघीतली, एकरी १,२०,०००/- आजची किंमत एकरी २,४०,०००/- अर्थात ह्या सगळ्या जागांना स्वतःचे पाणी असल्याने आणि वीज असल्याने आणि रस्ता लागून असल्याने किंमत वाढतीच राहणार. ज्या जागांना अशा सोई नाहीत त्यांनाही परतावा बँकेच्या व्याजापेक्षा जास्तच आहे. ह्या आर्थिक फायद्याकडे बघत असतांनाच, विदर्भातल्या शेतकर्‍यांशी पण प्रवासादरम्यान बोलणे होत होतेच.(बादवे, ११ जुलै ते १६ जुलै ह्या दरम्यान विदर्भात शेती बघायला जात आहे.) मध्यप्रदेशात शेकडो एकर शेती कसत असलेल्या एका शेतकर्‍या घरात पण ३-४ दिवस वास्तव्य झाले. गेल्या २०-२२ वर्षांच्या अनुभवाने हाती आलेली काही मुलभूत माहिती. १. स्वतः शेतात राहून शेती करत असाल तरच शेती करणे. २. काम टाळणे ही प्रवृत्ती सगळ्याच शेती आधारीत कर्मचार्‍यांमध्ये थोड्या-फार प्रमाणात असते. ३. कुटुंबाची विशेषतः जोडीदाराची साथ नसेल तर शेती करणे हा आतबट्याचा व्यवहार ठरायची शक्यता जास्त. ४. शेतकर्‍याने अजिबात कर्ज काढू नये किंवा लग्न-मुंज इत्यादी कार्यात वायफळ खर्च करू नये. ५. शेती आधारीत पुरक उद्योग किंवा ३-४ लेयर शेती उपाशी मारत नाही. ========= ३-४ लेयर शेती म्हणजे. शेत-तळ्यातले मत्स्य पालन.आंतर-पिक (आले-हळद,मिरच्या,पालेभाज्या) फलोत्पादन (नारळ,पपनस,फणस,आंबे) आणि तोंडली, दोडकी, दुधी,घोसाळे,पडवळ इ. मांडव-आधारीत फळभाज्या. शेती आधारीत पुरक उद्योग. (जे मी करायचे ठरवले आहे, कारण तेच मला शकतील.त्यामुळे, वराहपालन किंवा शेळी पालन दिलेले नाहीत.) १. कुत्रे. २. कोंबड्या. ३. देशी गाई. ४. मधमाशी पालन. ============== ६. वर्षभर विकता येईल अशी जास्तीत जास्त उत्पादने घेणे. जसे,नारळ,काजू आणि चिकू (चिकू सगळ्यात उत्तम आर्थिक फळ.नफा होवो की न होवो पण अजिबात तोटा नाही.२-३ बहार येतात आणि उन उत्तम असेल तर चिकू सुकवून ठेवता येतात.चिकू विषयीच्या लेखांत ती माहिती येईलच.) ७. कमीत-कमी ३ बाजारपेठा किंवा आठवडी बाजार जवळ असाव्यात. ८. सर्वात महत्वाची पदावली..... १-२-३-५-७-१०-१५, ही पदावली साधारण प्रत्येक व्यवहारात उपयोगी पडते मग ती शैक्षणिक असो किंवा व्यावसाइक किंवा शेती. १ ====> स्वतःच्या शेती बरोबर सुसंवाद आणि तिथल्या निसर्गाशी स्वतःला जुळवून घेणे आणि स्थानिक लोकां बरोबर संबंध स्थापित करणे आणि शेतीची पुर्व मशागत. २ ====> शेतीला आणि बाजारपेठेला अनुकुल असे वृक्ष लावणे. (मी जरी कोकणात शेती करणार असलो तरी, आंबा किंवा सुपारी न लावता, आवळा,चारोळी आणि नारळ ह्याच वृक्षांची लागवड करणार आहे.आले-हळद ह्यांचे आंतर-पीक ह्या वृक्षांत घेता येते, असा अंदाज आहे.शिवाय ह्या सगळ्यांची बाजारपेठ २०-२५ किमीच्या आसपासच आहे.) ३ ====> वृक्षांची परत एकदा निगा राखणे आणि आढावा आणि कुत्र्यांच्या पिल्लांची विक्री. ५ ====> वृक्षांची परत एकदा निगा राखणे आणि आढावा.शक्य झाल्यास गोठा आणि गाईंची संख्या वाढवणे. ७ ====> आले आणि हळद ह्याचे सुंठेत आणि हळकुंडात रुपांतर करायचा घरगूती कारखाना. १० ====> नारळच्या परताव्याला सुरुवात. १५ ====> ही शेती मुलांच्या ताब्यात देवून दुसरी शेती विकत घेवून कसायला सुरुवात करणे किंवा शेती आधारीत पुरक व्यवसायाला उपयुक्त अशी दुसरी जागा घेणे. जसे, गोठा जर उत्तम प्रकारे सांभाळत असाल तर, त्या व्यवसायाला मुख्य शेतीतून बाजूला काढणे. =========== मी ज्या ज्या मोठ्या शेतकर्‍यांना भेटलो, त्या प्रत्येक शेतकर्‍याने, जसे जमेल तसे शेती वाढवायचाच प्रयत्न केला. किंवा ताब्यात असलेली अडीक जमीन फुलवायचा प्रयत्न केला.) ९. निदान ३ वर्षे तरी सर्व कुटुंबाचे भागेल इतपत पैसा गाठीशी असावा. शेती उपाशी मारणार नाही पण निदान ३ वर्षे तरी नफ्याचे प्रमाण फार नसते. त्यामुळे आजारपणा साठी पैसा शिल्लक असावा. १०. कुंपणावर कमीत कमी खर्च करावा.निवडूंग आणि बांबू ह्यासाठी एकदम योग्य. ११. सुरुवातीला टेंपो किंवा ट्रक अशा गाड्यांवर जास्त पैसे खर्च न करता, रिक्षा घेणे. १२. शेती बाबत जितके ज्ञान मिळवाल तितके कमी आणि जितके प्रयोग कराल तितके कमी. त्यामुळे ज्यांची वडीलोपार्जित शेती नसेल त्यांनी किमान १०० शेतकर्‍यांना भेटल्या शिवाय किंवा निदान २-३ वर्षे शेतात वेळ घालवल्या शिवाय शेती करू नये.अद्याप तरी स्वतःला सर्वज्ञ समजणारा शेतकरी, मला भेटलेला नाही. १३. बर्‍याच ठिकाणी मजूर मिळत नसल्याने, जी कामे आपण स्वतः आणि आपल्या कुटुंबियांच्या मदतीने करू शकतो त्याच प्रकारची शेती करावी. उदा. नारळाची सिंगापूरी जात. एखादी शिडी लावून नारळ उतरवता येतात. १४. शेताला पाण्याचा बारमाही स्त्रोत फार महत्वाचा. सुदैवाने माझे शेत धरणाच्या बाजूला असल्याने, मला ती चिंता नाही.पण जर शेतात पाणी नसेल तर, शेत तळे किंवा विहिर हाच एक पर्याय शिल्लक राहतो आणि मग पाण्याचे नियोजन करायला वीज पण लागतेच. १५. शेतीच्या पिकाची फार अपेक्षा धरू नये किंवा पिका आधारीत आर्थिक नियोजन करू नये. चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे, ह्या प्रकारेच शेती होते. अपेक्षा आल्या की ओघा-ओघानेच अपेक्षाभंग पण व्हायची शक्यता होते आणि मग कुटुंबकलह पण सुरु होतो. त्यामुळे शेतीच्या उत्पन्नावर चैन करायच्या भानगडीत पडू नये. स्वतः बघीतलेले एक उदाहरण. मध्य प्रदेशातील एक धनाड्या शेतकरी. ३ पिढ्यांपुर्वी हजारो एकर शेती आणि त्यांच्या शेतात राबणारे असंख्य मजूर.इतके श्रीमंत की घराच्या बाहेर घोडे बांधण्याची पाग. पण प्रचंड प्रमाणात असलेली चंगी-भंगी वृत्ती आणि सरंजामी प्रवृत्ती. आज त्यांची परिस्थिती अशी आहे की, हातात जेमतेम ४०-५० एकर शेती आणि त्यांचे कालचे नौकर आज त्यांच्याच शेतीचे मालक. शेतातला पैसा हा देवाचा. त्याला पापाच्या वाटा फुटल्या की, अधोगती ही ठरलेलीच. १६. शेतीला स्वतःचा रस्ता हा हवाच. मुळात माणसाचा स्वभाव "माझे भले नाही झाले तरी हरकत नाही, पण तुझे भले होवू देणार नाही." ह्या वृत्तीचाच. त्यामुळे, शेजार्‍याची पडीक जमीन असेल आणि तुम्हाला ती तुमच्या शेतात जायच्या वाटेवर असेल तरी तुमचा शेजारी ती तुम्हाला अजिबात विकणार नाही. ========================== ही मुलभूत माहिती देणार्‍या असंख्य शेतकरी बांधवांची मदत झाली.त्यापैकी काही जणांचा उल्लेख करणे भाग आहे. १. श्री. रानडे (अमरावतीत शेती.शेतीतले तोटे फार उत्तम रित्या समजावले.स्वतः शेती करण्याशिवाय पर्याय नाही, हे अनुभवलेला शेतकरी.) २. स्व. अणा पोटे (पाटाच्या पाण्यावरची शेती आणि मजूरांच्या अनुपस्थितीत स्वतः शेतात राबणारे.नौकरी करता-करता पडीक जमीनीचे नंदनवनांत रुपांतर केले.) ३. श्री. गद्रे (टिमार्णी, मध्यप्रदेश.दहावीच्या मेरीट लिस्ट मध्ये आलेले.आई-वडील दोघेही डॉ. १२वीत उत्तम मार्क्स मिळवून देखील पुढील शिक्षण न घेता शेतीत रमणारे.मजूरा आधारीत आणि निसर्गा आधारीत शेती असल्याने, त्यातील तोटे फार उत्तम रित्या समजले.) ४. श्री. मारूती तिडके (नाशीक जवळील एका गावात आवळ्याची शेती.आवळ्याच्या शेतातले फायदे समजले.पुर्णवेळ मजूर लागत नसल्याने, मी आवळ्याची शेती करायची ठरवली आहे.) ५. सौ.निशिगंधा केळूस्कर (ह्या ठाण्याला राहतात.गेली काही वर्षे विविध शेतकर्‍यांना भेटून , शेतकर्‍यांना नैस्र्गिक शेती करायची माहिती देतात. ह्यांच्याकडे झिरो बजेट शेती विषयी माहिती मिळाली.) ६. श्री. राजू भट (हे बदलापूरला राहतात.केवळ ५ एकर शेती मध्ये विविध पिके घेणारे आणि शेती विषयक तज्ञ.) ७. श्री. विजय केळकर (हे खेरशेत, आरवली, चिपळूण-संगमेश्र्वर रोडवर, राहतात.नविन पिढीतले शेतकरी.स्वतःची राईसमिल असणारे.निव्वळ केळकर पिता-पुत्रच नाही, तर त्यांचे सर्व कुटुंबच शेती कामात व्यस्त असतात.) ८. श्री. श्रीकृष्ण जोशी (रत्नागिरी-गणपती पुळे रोडवर बसणी गावात शेती करतात.वय वर्षे ७५.पण अद्याप रोज रत्नागिरी ते बसणी प्रवास करतात आणि स्वतः शेतीत रमतात.) ९. स्व.सतीश देसाई (मी मगोध-मंदिर, वलसाड इथे रहात असतांना मला त्यांनी त्यांच्या शेतात प्रवेश पण दिला आणि आंबा व्यवसायाची तोंड-ओळख पण करून दिली.) १०. श्री. व सौ.कामत (मुक्काम लांजे, गेली १५-२० वर्षे सात-साडेसात एकर शेती करतात.झोपडी ते बंगला असा आर्थिक प्रवास स्वतः शेतात राबून केलेले कुटुंब.भयंकर हरहून्नरी.व्हॅक्यूम-क्लीनरचा वापर करून घराचे रंगकाम स्वतः केले.काजूच्या अर्थकारणाची माहिती करून दिली.) ११. श्री व सौ. पटवर्धन (नागाव, अलिबाग इथे शेत असल्याने, कोकणातील भाजी-पाला ह्याविषयी माहिती दिली.शेती उपाशी मारत नाही, हे स्वतः अनुभवलेले.) १२. श्री. चिकूवाले.(२००३ मध्ये ह्यांना भेटलो होतो आणि ह्यांचे नांव आता विसरलो.चिपळूण ते कराड ह्या रस्त्यावर रहात होते.धाकटा मुलगा जुगारी आणि इतर २ही मुलांना शेती करण्यात रस नाही.पण त्यांच्या वयाच्या ७०व्या वर्षी देखील एकदम टुणटूणीत.चिकूची बाग, आंबा, नारळ आणि गाई-म्हशींचा गोठा असे सगळे एक-हाती सांभाळणारा.सुकलेले चिकू करणारा आणि ते स्वतः रस्त्यावर फतकल मारून विकणारा करोडपती.शेतकर्‍याने माल विकतांना लाजू नये, हे शिकवणारा.त्या दिवशी मी पण त्यांच्या जोडीने रस्त्यावर उभा राहिलो.फुकटात आयुष्यभराची शिकवण मिळाली.) १३. नाशिकला जातांना प्रवासात एक, आई-वडील नसलेला, तरूण भेटला.१२वी नंतर इंजिनियरिंगचे शिक्षण काकांच्या शेतात राबून आणि गाई-गुरांना सांभाळून पुर्ण करत असलेला.पाठीवरच्या बहीणींच्या लग्नासाठी एक-एक पैसा जमवत असलेला. त्याने द्राक्षाच्या शेताचे अर्थकारण समजावून सांगीतले. आता ह्या तरूणाला पोरके तरी कसे म्हणायचे? काही मिपाकर...... १४. सुरंगी (आता ह्यांच्याविषयी काय बोलणार? जिथे-जिथे मला त्यांच्या सल्ल्याची गरज पडली, त्या-त्या प्रत्येक वेळी त्यांनी व्यवस्थित सल्ला दिला.) १५. नाखू काकांचे शेतीविषयक लेख. १६. पैसा (कधीही आणि केंव्हाही फोन केला तरी, काजू पिका विषयी पूर्ण माहिती दिली.) १७. जेपी (नवा आय.डी. काय असेल तो असेल.लातूर विभागात चालणार्‍या फसवणूकीची माहिती दिली.) आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे, ह्यापैकी कुठल्याही व्यक्तीने एकही पैसा न घेता, किंवा कुठल्याही प्रकारे परतफेडीची अपेक्षा न धरता, भरपूर ज्ञान दिले आणि शेती घेण्याच्या आत्मविश्वास पण दिला. सांगायला अतिशय आनंद वाटतो की, भारतातील शेतकरी असेल त्या परिस्थितीत, आदरातिथ्य करतो.अद्यापतरी मला किंवा माझ्या बायकोला, कुठल्याही शेतकर्‍याने उपाशीपोटी ठेवले नाही.
  • Log in or register to post comments
  • 44304 views

प्रतिक्रिया

Submitted by रघुनाथ.केरकर on गुरुवार, 07/07/2016 - 10:27

Permalink

या नीमीत्ताने मिपा चे सुद्धा आभार.

धागा आणी येउ घातलेली मालीका खुपच उपयुक्त ठरणारी आहे. या साठी मुवी यांचे खुप खुप आभार. कपिलमुनी, बापुसाहब, नाखु, खेडुत, सुरंगी यांचे पण खुप धन्यवाद. यानीमीत्ताने मिपा चे सुद्धा आभार. एकंदरच ही मालीका सुधा वाचनीय होणार,
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 07/07/2016 - 11:31

Permalink

मस्त

लेख. वाचनखूण साठवली आहे. उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on गुरुवार, 07/07/2016 - 13:13

Permalink

छान माहीती.

छान माहीती. पुढच्या वाट्चालिसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 07/07/2016 - 13:45

In reply to छान माहीती. by जागु

Permalink

ताई...

तुमचे पण अनुभव सांगीतलेत तर फार उत्तम. (मला वाटते की, मध्यंतरी "माबो" वर विहिरीवर एक लेख आला होता. http://www.maayboli.com/node/30374 तो तुमचाच का?)
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on गुरुवार, 07/07/2016 - 14:59

In reply to ताई... by मुक्त विहारि

Permalink

हो. विहीरीवरचा लेख माझाच.

हो. विहीरीवरचा लेख माझाच. माझा एक लेख आहे बीज अंकुरे अंकुरे त्यात मी पूर्ण शेती ची प्रक्रिया लिहीली आहे. तुम्ही वर लिहिलयत ते तंतोतंत बरोबर आहे. जर घरातील माणूस शेती पहाणार असेल तरच शेतीत रस घ्यावा. दुसर्‍यावर अवलंबून चालत नाही. माझ्या माहेरी शेती होती ५ एकर. तेव्हा आई-वडील जातीने लक्श घालायचे. पण नंतर मजूर, खते न परवडणारी झाली. कारण आमच्याकडे ओ.एन.जी.सी. प्रकल्प आहे. त्यात सगळे मजूर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर कामाला लागले. त्यामुळे त्यांची मजूरी कंपनीप्रमाणे आकारायचे. शिवाय एक दोनदा हवामानाने दगा दिला. त्यानंतर वडीलांनी शेती करण सोडून दिल. पण मी जी लहानपणी शेती अनुभवली ती माझ्यासाठी अजुनही खुप आनंददायी आठवणींची पुंजी आहे. मी तुम्हाला लिंक शोधून देते किंवा माझ्या ब्लॉगचा अ‍ॅडरेस देते.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on गुरुवार, 07/07/2016 - 14:02

Permalink

जस्ट ग्रेट. अत्यंत

जस्ट ग्रेट. अत्यंत प्रेरणादायी लेख. असा कलंदरपणा हवा. नाहीतर 'मी रिटायरमेंट नंतर एक रिसोर्ट काढणार आहे' वगैरे वाक्ये ऐकून अगदी उबग आलाय. शुभेच्छा. 'ला़ख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे'.
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on गुरुवार, 07/07/2016 - 15:13

Permalink

बीज अंकुरे अंकुरे http://www

बीज अंकुरे अंकुरे http://www.misalpav.com/node/28089 माझा ब्लॉग http://prajaktamhatretarangmaniche.blogspot.in/
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 07/07/2016 - 15:56

Permalink

निव्वळ अप्रतिम ! धाग्याचे

निव्वळ अप्रतिम ! धाग्याचे एवाचनखुण साठवत आहे ! मुवी तुम्ही म्हणजे एकदम रोल मॉडेल आहात आमच्या शेतीप्रेमींसाठी! अवांतर : तशी माझीही शेती आहे ४० -४४ गुंठे ! मी गहु मका गाजर उस नीळ कापुस भोपळा इत्यादी पिके घेतो . १० गायी आहेत , १० डुकरांचे फार्म आहे , १८ कोंबड्या आहेत. १० मेंढ्या पाळायला सुरुवात केली आहे पण ते गणित जरा नीट जमत नाहीये. बाकी छोटे मोठ्ठे कारखाने १ डेअरी, १ उस गाळप यंत्र , शिवण यंत्र, केक ओव्हन आहेत. नुकतेच शेतावर एक रीट्रीव्हर कुत्रे पाळले आहे. बघु पुढे मागे एक दोन घोडे घ्यायचाही मानस आहे ! मध्यंतरी घरी इन्टर्नेट नसल्याने हे डे खेळताच येत नव्हते , २८व्या लेव्हल वर अडकलो होतो, आता परत प्रगती सुरु आहे :))))
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 07/07/2016 - 16:35

In reply to निव्वळ अप्रतिम ! धाग्याचे by प्रसाद गोडबोले

Permalink

४० -४४ गुंठे !

आणि त्यातच गहु,मका,गाजर,उस,नीळ,कापुस,भोपळा, इत्यादी पिके अधिक गुरे. मस्तच. तुमचे शेत बघायला कधी येवू?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 07/07/2016 - 21:48

In reply to ४० -४४ गुंठे ! by मुक्त विहारि

Permalink

हेहेहे

हेहेहे मुविकाका तुम्ही नुसते एक पार्टि आयोजित करा, ते सगळे शेत लॅपटोपात घेऊन येतील दाखवायला. त्यांचा सातबारा फक्त मागू नका. मातीची नाही तर टायमाची माती करणारी शेती हाय ती.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 07/08/2016 - 08:36

In reply to हेहेहे by अभ्या..

Permalink

ह्या सगळ्यावर

देखरेख+नियंत्रण ठेवायला एक मुख्यमंत्री (महिला) पण नेमण्यात आली आहे आणि सध्या मुख्यालय चिंचवडला आहे. दैनीक मिपा पिंचि वार्तापत्रसाठी मोरया गोसावी मंदीराजवळून कॅमेरामन वल्लींसह नाखु.
  • Log in or register to post comments

Submitted by रघुनाथ.केरकर on Fri, 07/08/2016 - 10:17

In reply to हेहेहे by अभ्या..

Permalink

"मातीची नाही तर टायमाची माती करणारी शेती हाय ती."

हा हा हा खरय
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 07/07/2016 - 21:04

Permalink

वा वा! अभिनंदन मुवि!

शेती करायला चिकाटी हवी, डोळे आणि कान उघडे हवेतच. मातीचे खरे प्रेम असल्याशिवाय शेतीत उतरुच नये.. माझे दोन वर्गमित्र त्यांच्या नोकर्‍या सांभाळून शेती करतात. पैकी एकाची वडिलोपार्जित आहे. त्याच्या एकट्याच्या वाट्याचीच ४०-५० एकर असेल. परंतु माज न करता त्याने अतिशय मन लावून शेती जपली आणि फुलवली आहे. ऊस, गहू पिकं घेतो. घरचं दूध दुभतं आहे. आठवड्यातून किमान एकदा शेतीवर प्रत्यक्ष जातोच. बाकी रोजचे अपडेट्स असतातच. नांगरणीसकट सगळी कामे त्याला स्वतःला येतात. एकदम डाऊन टु अर्थ माणूस. शिवाय अतिशय घट्ट नेटवर्क आहे. दुसर्‍याची वडिलोपार्जित नाही. नुकताच शेतकरी झालाय. हा देखील नोकरी सांभाळून रोज शेतावर चक्कर मारतोच. एकेक एकर करत आता ४ एकरापर्यंत पोचलाय. केळी पिकवतो. मागल्या भारतवारीत दोघांच्याही शेतावर भेट देऊन त्यांचा पाहुणचार घेऊन आलो! दोघांचंही फर कौतुक वाटतं. :) (शेतीप्रेमी)रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 07/07/2016 - 21:24

In reply to वा वा! अभिनंदन मुवि! by चतुरंग

Permalink

मातीचे खरे प्रेम असल्याशिवाय शेतीत उतरुच नये......

+ १
  • Log in or register to post comments

Submitted by नूतन सावंत on Fri, 07/08/2016 - 10:00

In reply to मातीचे खरे प्रेम असल्याशिवाय शेतीत उतरुच नये...... by मुक्त विहारि

Permalink

सगळी कामे स्वत: करता आली

सगळी कामे स्वत: करता आली पाहिजेत हेही खरंच.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Fri, 07/08/2016 - 09:09

Permalink

मितानच्या प्रतिसादाच्या

मितानच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.मराठवाड्यात मोठी शेती सांभाळून आहेत.शिवाय प्रयोगशील. वेळ मिळेल तेव्हा नक्की लिही मितान.
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Fri, 07/08/2016 - 10:12

In reply to मितानच्या प्रतिसादाच्या by अजया

Permalink

छोटी शेती सांभाळून करत आहोत !

छोटी शेती सांभाळून करत आहोत ! पेरण्या चालू आहेत त्यामुळं आत्ता वेळ नई. वेळ मिळाला की नक्की लिहिते. बाकी परवाच्या पावसानं शेततळं किमान ओलं तरी झालंय. मे मध्ये बांधलेल्या बंधार्यामुळे पाणी जिरत आहे ही एक छान बातमी.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 07/09/2016 - 08:12

In reply to छोटी शेती सांभाळून करत आहोत ! by मितान

Permalink

तुमचे अनूभव वाचण्यासाठी उत्सुक आहोत.

(अज्ञानी) मुवि
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Fri, 07/08/2016 - 10:19

Permalink

:)

:) आमच्या बागेपेक्षा मोठी म्हणजे खूप मोठीच ;) बंधार्याबद्दल पण लिही.लिहिशील तेव्हा.
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Fri, 07/08/2016 - 11:32

Permalink

मातीचे खरे प्रेम असल्याशिवाय

मातीचे खरे प्रेम असल्याशिवाय शेतीत उतरुच नये. अगदी मितान तुमच्या लिखाणाच्या प्रतिक्षेत. मुक्ता विहारी तुमच्याकडे गाय आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 07/09/2016 - 07:58

In reply to मातीचे खरे प्रेम असल्याशिवाय by जागु

Permalink

तुमच्याकडे गाय आहे का?

गाय नाही आहे पण.... भाकड असली तरी गाय नक्कीच घेणार. झिरो बजेट शेतीसाठी, गोमूत्र आणि गोमय, ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by जावई on Sat, 07/09/2016 - 18:30

Permalink

काका..कांदा या पिकाबाबत...

दोन एकर कांदा लागवड करायची आहे.भाव वाढेल का कांद्याचा.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 07/10/2016 - 00:03

In reply to काका..कांदा या पिकाबाबत... by जावई

Permalink

साधारण पणे

कांद्याचा भाव. लसूणची भाव आणि आंब्याचे उत्पन्न, एक वर्षा आड येते. कांदा लागवड ३ ते ५ वर्षे करा. आतबट्याचा व्यवहार करा. (कांदा, लसूण, आंबा, काजू एकदम बेभरवशी.भरपूर पैसा, विशेषतः बापजाद्यांचा, असेल तर हा जुगार खेळावा. एकतर करोडपती किंवा निदान कर्जबाजारी तर नक्कीच नाही इतपतच खेळावा. ह्या आणि इतर बर्‍याच पिकांसाठी आधी पोट आणि मग जुगार, हेच धोरण ठेवावे.) बाजाराचा अंदाज घ्या. आणि मग ठरवा. कांदा, आंबे, काजू, लसूण, संत्री, डाळिंबे, ई. पिके देवाची. तर, हळद, मिरची, मिरे, लवंगा, दालचिनी, जायफळ, चिंच, आवळा, कोकम, नारळ इ. ही मनापासून आणि स्व-कष्टाने शेती करणार्‍यांची. साग हा सरकारी नौकरांसाठी.उरलाच तर आपल्यासाठी. असे माझे मत.
  • Log in or register to post comments

Submitted by इनिगोय on Sat, 07/09/2016 - 20:57

Permalink

मस्त मालिका मुवि. जरूर वाचणार

मस्त मालिका मुवि. जरूर वाचणार. >>शेती बाबत जितके ज्ञान मिळवाल तितके कमी आणि जितके प्रयोग कराल तितके कमी.>>> अगदी खरं. या धाग्यांमधून ते मिळवायला उत्सूक..
  • Log in or register to post comments

Submitted by आगाऊ म्हादया...... on Mon, 04/09/2018 - 15:23

Permalink

उशिरानेच कळले...

पण आता पुढील भाग वाचतो.
  • Log in or register to post comments

Submitted by Ram ram on Tue, 04/10/2018 - 15:23

Permalink

मुवि तुम्ही तुमच्या ढ

मुवि तुम्ही तुमच्या ढ असण्याची कबुली दिलीत हे आवडलं.म्हणजे माणूस नावडत्या क्षेत्रात ढ असु शकतो पण तोच माणूस आवडत्या क्षेत्रात कितीही उंच भरारी घेतो. एक कृषि पदवीधर म्हणून शेतकरी नातेवाईक, गावकरी जादुगारासारखी अपेक्षा ठेवताना बघतो आहे. निसर्गविरोधी शेती न आवडल्यानं स्वांतसुखाय शेती सुरू आहे. जमीन व जनावरांचे Exploitation बघवत नाही. जमीन पाणी हवा नासत आहे. शेतकरी राजा जागा हो.
  • Log in or register to post comments

Submitted by Ram ram on Tue, 04/10/2018 - 15:26

Permalink

सोन्याबापू ते कैलासवासी पहिले

सोन्याबापू ते कैलासवासी पहिले काढून टाका.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com