✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून!

ग
गंगाधर मुटे यांनी
Sat, 11/15/2014 - 21:48  ·  लेख
लेख
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून!


        यंदाचा दुष्काळ "न भूतो न भविष्यति" असाच म्हणावा लागेल. विदर्भात तर आतापासून चटके बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्र उघडलं की, शेतकरी आत्महत्त्येच्या संदर्भातील निदान एकतरी बातमी दिसलीच समजायची. आता असा एकही दिवस जात नाही की, शेतकरी आत्महत्त्येची बातमी कानावर येऊन आदळत नाही. मात्र तरीही कोणत्याच पातळीवर काहीही हालचाल होताना दिसत नाही. "रोजचे मढे त्याला कोण रडे" अशी एक म्हण आहे. भारतीय मानसिकता अधोरेखित करण्यासाठी ही एकच म्हण पुरेशी ठरावी.

जेवढे झुलायचे फ़ास लाऊन
तेवढे झुलत बसा
खायचे तितके जहर तुम्ही
खुशाल खात बसा

दहा-पाच करा किंवा शेकड्यांनी करा
हजारोंनी करा किंवा लाखोंनी करा
आम्ही सारे ढिम्म, आम्हाला काय त्याचे?
शेतामध्ये मरा नाहीतर घरामध्ये मरा

शिक्षित, सुजाण, वकील, डॉक्टर
नेता, तज्ज्ञ, सेवक, मास्तर
यांना तरीही ज्या देशामध्ये
निवांत झोप लागू शकते!
शासन-प्रशासन, पुजार्‍यांना
रंभा-परीचे स्वप्न पडू शकते!!
त्या देशाच्या पोशिंद्यांनो
एवढे तरी ध्यानी घ्या की;
हे फ़क्त इंडियातच घडू शकते!!!

संवेदनाशीलता मेली काय?

        माणूस संवेदनाक्षम वगैरे खरंच असतो काय, याबद्दल मला फार पूर्वीपासून संशय होता;  पण तो केवळ संशय होता. आता मात्र माझ्या मनातला कालचा संशय हळूहळू दृढतेत बदलायला लागला आहे. आता मनुष्याच्या संवेदनक्षमतेविषयी मी एवढेच म्हणू शकतो की माणसाच्या संवेदनशीलते मागे त्याचा निहित स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले असतात. स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसेल तर सभोवताली कितीही लाजिरवाण्या, क्रूर अथवा अमानुष घटना घडल्या तरीही मनुष्यप्राणी कळवळत नाही, हळहळत नाही आणि काळजाचे पाणी होण्याइतपत द्रवतही नाही. तो निगरगट्ट, ढिम्मच्या ढिम्म आणि निर्विकारच असतो.

        आतापर्यंत लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या झाल्यातरी मख्ख असणारा समाज दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून झाल्याबरोबर रस्त्यावर उतरतो, मेणबत्त्या पाजळतो, सर्वत्र हाहाकार माजेल इतपत निदर्शने करतो, प्रसारमाध्यमातही रात्रंदिवस एवढ्याच एका मुद्द्याभवती रेंगाळत बसण्याची जणूकाही चढाओढ लागते; तेव्हा त्यामागे सुजाण आणि सुशिक्षित समाजाची संवेदनाशीलता नसते. असते ती केवळ त्यांच्या मनात निर्माण झालेली भिती. जी घटना आज त्या मुली संदर्भात घडली तीच घटना आपल्याही मुलीवर ओढवू शकते, या भितीपोटी उडालेला थरकाप!

        शेतकरी आत्महत्यांशी सुजाण आणि सुशिक्षित समाजाचे दूरान्वयानेही स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसतात. आज आत्महत्या करण्याची वेळ त्या शेतकर्‍यावर आली, उद्या माझ्यावरही येऊ शकते, अशी भिती उत्पन्न व्हायचेही कारण नसते. त्यामुळे शेतकरी कितीही आत्महत्या करोत, सहा लाख शेतकरी आत्महत्या करोत की साठ लाख शेतकरी आत्महत्या करोत; हळहळण्याचे कारणच संपुष्टात आलेले असते.

        हुश्श! एका मुलीच्या हत्त्येवर आकाश-पाताळ एक करणारा सुजाण आणि सुशिक्षित समाज शेतकरी आत्महत्यांवर गप्प का बसतो? हा प्रश्न अनेक दिवसांपासून मनात दबा धरून बसला होता. आता मात्र हळूहळू उत्तरावरील धुकं हटायला लागलं आहे. समाजाची संवेदनाशीलता मेली काय? असा प्रश्न उपस्थित करण्याचे औचित्य दिसतच नाही कारण सामूहिक समाजमन संवेदनक्षम असते, हेच मुळात थोतांड आहे, अशी खात्री व्हायला लागली आहे.

बिनपाण्याने हजामत

        या विषयावर उहापोह करण्याचे कारण असे की, मला समोर भयाण वास्तव दिसत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय कमी दाबाचा पट्टा निर्माण व्हायला लागला की जशी पाऊस पडण्याची शक्यता बळावत जाते तद्वतच शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ होऊ शकेल अशी अनुकूल स्थिती शेतकर्‍यांच्या अवतीभवती निर्माण व्हायला लागली आहे. वेळीच शासकीय स्तरावर वेगवान हालचाली होऊन युद्धस्तरावर उपाययोजना झाली नाही तर येणारे सहा-सात महिने अत्यंत वाईट बातम्या घेऊन येतील, हे अगदी सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट दिसायला लागले आहे.

        यंदा विदर्भात नापिकीने कहर केला आहे. कापसाचे एकरी उत्पादन गत दोन वर्षाच्या तुलनेने फक्त ३०-३५ टक्केच होईल, असा अंदाज आहे. सोयाबीनची स्थिती तर सर्वाधिक खराब आहे. जिथे एकरी ९-१० क्विंटल सोयाबीन व्हावे तिथे १ ते २ क्विंटल होत आहे. अनेक शेतात तर एकरी १ क्विंटलापेक्षा कमी उत्पादन होण्याची शक्यता असल्याने व सोयाबीन कापणीसाठी लागणारा खर्चसुद्धा भरून निघण्याची शक्यता नसल्याने शेतकर्‍यांनी उभ्या पिकातच नांगरट सुरू केली आहे किंवा गुरे चरायला सोडली आहेत. यात जिरायती आणि बागायती असासुद्धा भेदाभेद करायला कारण नाही आहे, कारण एकाची पाणी लावून तर दुसर्‍याची बिनपाण्याने हजामत होत आहे. एकीकडे उत्पादनात आलेली प्रचंड घट आणि दुसरीकडे शेतमालाचे पडलेले बाजारभाव अशा दुहेरी जात्यात शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे.

राजा! ही तुझी बदमाषी आहे

        विदर्भातलाच शेतकरी जास्त प्रमाणात आत्महत्या का करतो, या प्रश्नाचे उत्तरही कठीण नाही. कापसाच्या एकाधिकार खरेदीचा कायदा महाराष्ट्र सरकारने १९७१ साली मंजूर केला. पण महाराष्ट्र शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेअंतर्गत 'भारतीय कापूस महामंडळा' च्या धर्तीवर बाजारभावाप्रमाणे किंवा बाजारभावापेक्षा जास्त चढ्या दराने कापूस खरेदीचे धोरण राबविण्यात आले नाही. तुरळक अपवाद वगळले तर अन्य प्रांतातील शेतकर्‍यांना खुल्या बाजारपेठेत जेवढे भाव कापसाला मिळालेत त्यापेक्षा कायमच कमी भाव एकाधिकाराच्या नावाखाली महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पदरात टाकले गेले. अन्य प्रांतात चांगले भाव असूनही त्याचा फायदा राज्यातील शेतकर्‍यांना घेता आला नाही कारण प्रांतबंदी लादून अन्य राज्यामध्ये कापूस विक्रीस नेण्यास राज्यातील कापूस उत्पादकांना कायदेशीर मज्जाव करण्यात आला आणि "आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना" अशी गत खुद्द शासनानेच राज्यातील कापूस उत्पादकांची करून टाकली. कापूस एकाधिकाराच्या गोंडस नावाखाली कापूस उत्पादकांचे जवळजवळ ३०-३५ वर्षे "कायदेशीर शोषण" झाल्याने राज्यातला कापूस उत्पादक आर्थिक स्थितीने एवढा नेस्तनाबूत झाला की त्याला पुन्हा डोके वर काढताच आले नाही.

        मध्यंतरी खुल्या अर्थव्यवस्थेच्या प्रारंभालाच चांगली संधी आली होती. कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू शकेल एवढी तेजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आली होती. तेव्हा शासनाने फक्त गप्प बसण्याची गरज होती. मामला व्यापारी आणि शेतकरी यांच्यामधला होता. सरकारवर आर्थिक भारही पडणार नव्हता. याउलट कापसाच्या निर्यातीतून परकीय चलनाची गंगाजळी शासकीय तिजोरीत येऊन साठणार होती पण; कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू देईल तर ते ’मायबाप’ सरकार कसलं? कापूस गिरणी मालकांच्या दबावाखाली येऊन सरकारने तातडीने सूत्रे हालवली. कापसावर निर्यातबंदी लादली आणि देशांतर्गत बाजारपेठेत प्रति क्विंटल ९०००/- सहज मिळू शकणारे भाव प्रति क्विंटल ५०००/- पेक्षाही कमी आले.
जेव्हा चांगलं पिकलं व बाजारभावही चांगले मिळून कापूस उत्पादकांची आर्थिकबाजू सावरायची शक्यता निर्माण झाली तेव्हा शेतकर्‍यांची लूट करायला कोणी व्यापारी आला नाही, दलाल आला नाही, चोर आला नाही किंवा दरोडेखोरसुद्धा आला नाही. कापूस उत्पादकांना सरकारने लुटलं, राजरोजसपणे लुटलं, कायदेशीरपणे लुटलं. कापूस उत्पादकांच्या अधोगतीला शासनाची बदमाषीच कारणीभूत आहे.

आत्महत्या नव्हे, शासकीय खून!

        ज्या वर्षी शेतीत उत्पादन कमी येते आणि शेतमालाचे भावही पडतात, त्या-त्या वर्षी शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत जातो. शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी येते ती त्याने आळशीपणा दाखवला म्हणून नव्हे, त्याने कर्तव्यात कसूर केला होता म्हणून नव्हे, त्याच्या व्यसनाधीनतेमुळे तर नव्हेच नव्हे! शेतमालाचे भाव ठरविण्याचे, त्यावर निर्बंध लादण्याचे, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण ठरविण्याचे सर्वाधिकार शासनाकडेच असल्याने शेतीक्षेत्रातील सर्व बर्‍याबाईट परिणामांसाठी व प्रगती-अधोगतीसाठी थेट सरकारच जबाबदार ठरते. शासनाच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणांमुळे आज शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या ह्या आत्महत्या नसून ह्या आत्महत्यांना "शेतकर्‍यांचा शासकीय खून" असेच संबोधावे लागेल.

- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
अर्थकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
85459 वाचन

💬 प्रतिसाद (246)

प्रतिक्रिया

अहो मी तुम्हाला टिमकी वाजवताय

जयंत कुलकर्णी
Wed, 11/19/2014 - 18:31 नवीन
अहो मी तुम्हाला टिमकी वाजवताय असे म्हटले नाही...... लक्षात घ्या. तुमच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर देता येईल पण देत नाही कारण मी काहीच करु शकत नाही. एक मत टाक्ण्याशिवाय. आणि शेतकर्‍याला सुखाचे दिवस यावेत असे मला ही वाटतेच. त्याबद्दल शंका नको. पण शेतकर्‍यांच्या विचारसरणीतच फरक पडलाय तो त्यांच्यासाठी घातक आहे.....असो. या विषयावरील माझी मते जगजाहीर आहेत. फक्त ती काही बड्या शेतकर्‍यांमुळे थोडे कडवी बनली आहेत एवढेच.....
↩ प्रतिसाद: हाडक्या

आणि मला कोणालाही दुखवाय्चे

जयंत कुलकर्णी
Wed, 11/19/2014 - 18:33 नवीन
आणि मला कोणालाही दुखवाय्चे नाही तुम्हाला तर नाहीच नाही. तरीही आपण दुखावला गेला असलात तर आपली क्षमा मागतो.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

///तुम्ही धरणग्रस्तांचे

जयंत कुलकर्णी
Wed, 11/19/2014 - 18:48 नवीन
///तुम्ही धरणग्रस्तांचे म्हणालात, आता तुम्ही सांगा पुण्या-मुंबईला, उद्योगांना त्याच धरणातून पाणी मिळते म्हणून कोणी धरणग्रस्तांना उद्योगांत हिस्सा वाटून देता का ? रहायला तुमच्या सोसायटीत सरकार भावाने का होईना फ्लॅट देता का ? हो, शेतकरी देतो. सरकार-भावाने जमिनी ताब्यात घेऊन गावे वसवली जातात, त्यांना सामाजिकदृष्ट्या सामावून घ्यायचा प्रयत्न होतो, तो कुठे नोंद होत नाही. त्याची बातमी होत नाही. (बरेच धरणग्रस्त अजून आहेत पण तो वेगळा प्रश्), इथे अवांतर हो////// यावर परत एकदा विचार व्हावा.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

आणि शेवटचे. टुमचे भावनिक

जयंत कुलकर्णी
Wed, 11/19/2014 - 18:52 नवीन
आणि शेवटचे. टुमचे भावनिक मुद्दे मला मान्य आहेतच पण शेतकर्‍यांच्या पुढार्‍यांनीच भारताचे "इंडिया'' आणि भारत असे दोन तुकडे केले आहेत. तोपर्यंत आम्हाला तुम्हाला हे माहितही नव्हते. त्याच पुढार्‍यांनी आम्हालाही शहाणे केले.... :-)
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

हे खरेच.

हाडक्या
Wed, 11/19/2014 - 20:17 नवीन
हे खरेच. बाकी क्षमा वगैरे नको म्हणायला काका.. तुम्ही लाजवताय असे म्हणून. तुम्ही मोठे आणि ज्ञानी आहात त्याबद्दल आदर वाटतो आणि इथे प्रतिसाद एकांगी वाटला म्हणून आवर्जून इतके लिहिलं, बस्स. आणि हो माझे मुद्दे भावनिक अजिबात नाहीत, आणि परवडणार नसेल तर मी कधीही भावनिक होवून शेती करायच्या फंदातही पडणार नाही.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

"इंडिया'' आणि "भारत"

गंगाधर मुटे
Fri, 11/28/2014 - 08:08 नवीन
"इंडिया'' आणि "भारत" म्हणजे शोषण करणारा इंडिया आणि ज्याचे शोषण होते तो भारत. खेडी विरुद्ध शहर, ग्रामीण विरुद्ध शहरी अशी येरीगबाळी व्याख्या नाही आहे ती!
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

शेतकरी आणि बिगर शेतकरी

गंगाधर मुटे
Fri, 11/28/2014 - 08:10 नवीन
"इंडिया'' आणि "भारत" म्हणजे शेतकरी आणि बिगर शेतकरी अशी व्याख्या तर नाहीच नाही.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

शेतकरी समस्या.

प्रभाकर पेठकर
Wed, 11/19/2014 - 20:33 नवीन
>>>>प्रथमतः शहरी वि. शेतकरी ही मांडणी मला मान्य नाही हेच तर मलाही म्हणायचे आहे. पण अशी मांडणी 'मसिहा'नेच नेहमीच (आधीच्या लेखांमधूनही) केली आहे. साहजिकच ज्यांनी भरलेल्या करातून ६५ हजार कोटींचे पॅकेज दिले जाते, शेती मालावर कर आकारला जात नाही, वीज मोफत किंवा अत्यल्प दराने दिली जाते (हे आम्ही पेपरमध्ये वाचतो, टिव्हीच्या बातम्यांमध्ये पाहतो) त्यांनाच उदासीन, संवेदनाहीन म्हंटल्यावर वाईट वाटणार नाही? मुटे साहेब शेतकर्‍यांचे भले करण्यापेक्षा भरडलेला शेतकरी आणि असंवेदनशील शहरी अशी विभागणी करून शेतकर्‍यांच्या प्रश्नाचे नुकसानच करीत आहेत. आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे की, 'सरकार योग्य किंमत आणि शेतकर्‍यांच्या हाती निर्णय क्षमता देत नाही' ह्या वस्तुस्थितीने आलेल्या वैफल्यावर असंघटीत शहरी जनतेला दूषणे लावीत आपले वैफल्य गोंजारायचे आहे? सर्वांना सोबत घेऊन सरकार विरुद्ध लढा दिला तरच ते शेतकर्‍यांचे खरे 'मसिहा' होऊ शकतील. शहरात धान्य-डाळींच्या भाववाढीविरोधात होणारी आंदोलने शतप्रतिशत सामान्य जनतेने उभारलेली नसतात तर राजकारण्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी हे मुद्दे चिघळवू दिलेले असतात. जसा शहरी माणूस शेतमालावर अवलंबून असतो तसाच शेतकरीही शहरी उत्पादनांवर, शिक्षण सुविधांवर अवलंबून असतो. >>>>ही वाक्ये खूपच वेदनादायी आणि सरसकटीकरण करणारी आहेत. अशीच वेदनादायी वाक्ये 'संवेदनाहीन शहरी सुशिक्षित समाज' वापरून विषयाची सुरुवात केली इतरांनाही त्रास होतो. >>>>या अशा भुमिकांमुळेच कदाचित मग तथाकथित शहरी समाज स्वतःला या प्रश्नांना एका 'इतर समाजाचे प्रश्न' अशा भावनेतून बघतोय असे ध्वनित होते. नव्हे. विषयाची मांडणी, समाजात दोन वर्ग निर्माण करूनच केली जाते आहे. ते थांबविल्यास 'इतर' समाजाचा दृष्टीकोनही बदलेल. शिवाय, शहरी माणूस प्रत्येक शेतकर्‍याला भेटून, मुलाखती घेऊन त्यातील खर्‍याखोट्याची छाननी करून आपली मतं बनवू शकत नाही. त्यासाठी त्याला आपला नोकरीधंदा आणि मुलाबाळांना वार्‍यावर सोडून खेडोपाडी हिंडत बसावे लागेल. तरीही त्याच्या पदरी किती सत्य येईल हे सांगता येत नाही. ह्या कामांसाठी वर्तमानपत्र, दूरदर्शन बातम्या आदी मार्ग त्याला अवलंबावे लागतात. क्वचित कोणाला त्याच्या गावच्या शेतकर्‍यांचा प्रत्यक्ष अनुभव असतो. तिथून मिळणार्‍या ज्ञानावरच इथे मुद्दे मांडले जातात. >>>> समजा, उद्या जर ज्वारीच्या (अथवा इतर तत्सम धान्याच्या) व्हिस्कीची निर्मिती सुरु झाली आणि शेतकरी तिथे ज्वारी घालू लागला आणि बाजारात ज्वारीची किंमत खूपच वाढू लागली तर इतरांनी त्याबद्दल शेतकर्‍यास दोष देता कामा नये. पाहा चुका अशा होतात. तुमच्या वरील विधानावरून 'शेतकर्‍यांना आपले धान्य चढ्या भावाने दारू कारखान्यांना विकून श्रीमंत होण्यासाठी नियंत्रण मुक्त धोरणे हवी आहेत' असा (तुम्हाला अभिप्रेत नसलेला) अर्थ मी काढला तर मी दोषी असेन का? उदाहरण म्हणूनही ज्वारी किंवा तत्सम धान्य 'योग्य' दराने 'अन्न' म्हणून विकण्यासाठी नियंत्रण मुक्त धोरणे राबवावीत असा मुद्दा घेतला तर वाचणार्‍यालाही त्यात कांही गैर वाटत नाही. >>>>शेतकरी म्हणजे संत-समुदाय नव्हे. अगदी खरं आहे. शहरी समुदाय सुद्धा संत समुदाय नाही. आणि कोणीही तसे भासविण्याचा प्रयत्न करू नये. >>>>" इथेच तुम्ही त्यांना सामान्य जनतेपेक्षा 'इतर कोणी' असे गृहित धरून चूक करत आहात. बिगर शेतकरी शहरी माणसाला शेतजमीनी खरेदी करण्याचा हक्क नाही. ह्या सरकारी धोरणानेच शेतकर्‍यांना इतर समाजापासून वेगळे काढले आहे. आणि ते आपल्या फायद्याचे असल्याकारणाने शेतकरी वर्गानेही कधी ह्या धोरणाविरुद्ध आवाज उठविल्याचे ऐकिवात/वाचण्यात आले नाही. >>>>त्याचे थोडे प्रश्न आपल्या समाजातले प्रश्न म्हणून लक्षात घेतलेत तरी फार झाले. तात्विकदृष्ट्या मान्य आहेच. पण प्रश्न लक्षात घ्यायचे म्हणजे नक्की काय करायचे? शेतकर्‍यांच्या प्रत्येक आंदोलनात शहरी माणसाने सदेह सहभाग घ्यायचा? शहरातील निम्न उत्पन्नगटातील समाजाचे प्रश्नही आपलेसुद्धा आहेत हे लक्षात घ्यायला शेतकरी समाज काय करतो? शहरात १०x१२ च्या रुममध्ये, चाळींमधून राहणार्‍या समाजाच्या समस्या शेतकरी वर्गाने कधी जाणून घेतल्या आहेत? मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांना चांगले दिवस दिसावेत म्हणून भोकाभोकांचा गंजीफ्रॉक घालून अनेक आजारपणं अंगावर काढणार्‍या, फाटक्या साडीत आपली लाज झाकणार्‍या 'शहरी' 'गृहलक्ष्मी'चा विचार कधी शेतकरी समाजाने केला आहे? अहो ते शक्य नसतं. प्रत्येकाला आपल्या समस्या स्वतःच सोडवायला लागतात. >>>> पॅकेज पद्धत तर पार वाईट. त्याने रास्त मागण्या पण दाबून टाकल्या जातात. उर्वरित जनता आणि पॅकेज जाहीर झालेली जनता (मिळालेली नव्हे) यात फूट पाडली जाते. हो, खरं आहे. पण त्यावेळी शेतकरीसमाजाने ह्या 'पॅकेज' विरुद्ध आवाज उठविला नाही. तेंव्हा तर पॅकेज स्विकारलं. आणि मग इतरांना सहानुभूती वाटावी अशी अपेक्षा कशी? एकदा, अगदी एकदा तरी, शहरी कर्जबाजारी कमी उत्पन्न गटाला कर्जमाफी करा नं. हाडक्यासाहेब, मुळात विषयाची मांडणी (मुटे साहेबांची) चुकीची आणि वैफल्यग्रस्त भावनेतून आहे. त्रयस्थाचा दृष्टीकोन नाही त्यात. शिवाय ज्या समाजाला आपण (चुकीच्या पद्धतीने) असंवेदनशील म्हणून संबोधितो आहोत त्याने शेतकर्‍यांच्या प्रश्नावर प्रत्यक्षात काय करावे? पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले, धान्य-भाज्यांचे भाव वाढले, दूधाचे भाव वाढले, शाळेच्या फिया आणि देणग्यांचे भाव वाढले असे अनेक भाव वाढतच जात आहेत आणि जातील. शहरी माणूस शेवटी (नाईलाजाने) सर्व भाववाढ स्विकारतो. तसेच, शेत मालाचेही वाढीव भाव सहन करेल. ह्याहून वेगळे काय करायचे? शहरी आणि सुशिक्षित समाजाला धारेवर धरण्याऐवजी शेतकरी संघटनांनी आपले लक्ष सरकारवर केंद्रित करावे, त्यांच्यावर शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी दबाव निर्माण करावा. (नुसती दरवर्षी आंदोलनं करून नाही तर उत्पादन थांबवून), वेगळी पिके, वेगळे व्यवसाय हाताळून पाहावेत. आपल्या 'पद्धती' बदलून पाहाव्यात (इतर राज्यातील शेतकरी कसा फायद्यातील शेती करतो ते अभ्यासावे). शेतकरी समाजाबद्दल शहरी माणसालाही कणव आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या शहरी माणसालाही दुखावून जातात. त्यामुळे, शहरी समाजाला शाब्दीक लाथा घालणं शेतकरी नेत्यांनी बंद करावं, एव्हढीच विनंती आहे.
↩ प्रतिसाद: हाडक्या

आपण बर्‍याच गोष्टी सारख्याच

हाडक्या
Wed, 11/19/2014 - 21:53 नवीन
आपण बर्‍याच गोष्टी सारख्याच मांडतो आहोत ..
मुळात विषयाची मांडणी (मुटे साहेबांची) चुकीची आणि वैफल्यग्रस्त भावनेतून आहे. त्रयस्थाचा दृष्टीकोन नाही त्यात. शिवाय ज्या समाजाला आपण (चुकीच्या पद्धतीने) असंवेदनशील म्हणून संबोधितो आहोत त्याने शेतकर्‍यांच्या प्रश्नावर प्रत्यक्षात काय करावे? पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले, धान्य-भाज्यांचे भाव वाढले, दूधाचे भाव वाढले, शाळेच्या फिया आणि देणग्यांचे भाव वाढले असे अनेक भाव वाढतच जात आहेत आणि जातील. शहरी माणूस शेवटी (नाईलाजाने) सर्व भाववाढ स्विकारतो. तसेच, शेत मालाचेही वाढीव भाव सहन करेल. ह्याहून वेगळे काय करायचे? शहरी आणि सुशिक्षित समाजाला धारेवर धरण्याऐवजी शेतकरी संघटनांनी आपले लक्ष सरकारवर केंद्रित करावे, त्यांच्यावर शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी दबाव निर्माण करावा. (नुसती दरवर्षी आंदोलनं करून नाही तर उत्पादन थांबवून), वेगळी पिके, वेगळे व्यवसाय हाताळून पाहावेत. आपल्या 'पद्धती' बदलून पाहाव्यात (इतर राज्यातील शेतकरी कसा फायद्यातील शेती करतो ते अभ्यासावे).
याबद्दल सहमत. याच कारणाने सगळे शेतकरी देखील या संघटना आणि आंदोलनांना पाठिंबा देत नाहीत. पण शहरी समाज (ज्यात आता मी ही येतोच) मात्र शेतकरी ही एक नवी जातच असल्यासारखा सरसकटीकरणदेखील करु शकत नाही हे ही तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा. पेट्रोल आणि इतर वस्तू (अन्न-धान्य) शेतकरी पण विकत घेतो आणि तो देखील वाढीव भाव सहन करतोच की. फक्त त्याला हेच करायला बंदी लादली जाते ते चूक आहे. उत्पादन बंद करून संप ही तेवढी व्यवहारीक संकल्पना नाही हे आपल्याला ठाऊक असेलच आणि ज्याना शक्य नाही ते शेती सोडून पडिक ठेवतातच की.
पाहा चुका अशा होतात. तुमच्या वरील विधानावरून 'शेतकर्‍यांना आपले धान्य चढ्या भावाने दारू कारखान्यांना विकून श्रीमंत होण्यासाठी नियंत्रण मुक्त धोरणे हवी आहेत' असा (तुम्हाला अभिप्रेत नसलेला) अर्थ मी काढला तर मी दोषी असेन का? उदाहरण म्हणूनही ज्वारी किंवा तत्सम धान्य 'योग्य' दराने 'अन्न' म्हणून विकण्यासाठी नियंत्रण मुक्त धोरणे राबवावीत असा मुद्दा घेतला तर वाचणार्‍यालाही त्यात कांही गैर वाटत नाही.
मला अभिप्रेत नसलेला अर्थ जरी घेतलात तरी एक प्रश्न 'का शेतकर्‍याने श्रीमंत होऊच नये का ?' असा ही उभा राहीलच की. वादाकरता तरी पण फक्त 'अन्न' म्हणूनच विकण्यासाठी नियंत्रण मुक्त धोरणे राबवावीत हे पटत नाही. मग समाजाकडून शेतकर्‍याने अपेक्षा केली तर काय चुकले ? ही मांडणीच मुळात मान्य नाही की कोणी शेती लोकांना 'अन्न' मिळावे म्हणून करावी.. तो उद्योग आहे, उद्योग म्हणून करावा. सरकारने इतर उद्योगांप्रमाणे त्याला कर तसेच सवलती आणि इतर नियमावली लावावी. सिंपल्स.
शेतकरी समाजाबद्दल शहरी माणसालाही कणव आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या शहरी माणसालाही दुखावून जातात. त्यामुळे, शहरी समाजाला शाब्दीक लाथा घालणं शेतकरी नेत्यांनी बंद करावं, एव्हढीच विनंती आहे
याबद्दल १००% सहमत. लोकांना फोडून या फोडणार्‍यांव्यतिरिक्त कोणाचेही भले होत नाही.
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मसिहा

सतिश गावडे
Wed, 11/19/2014 - 22:58 नवीन
मसिहा
नेमका शब्द आहे हा धागाकर्त्यासाठी. *lol* माझ्या हापिसात एक गुजराती पोरगं आहे. तो त्याचं एक वाक्य मला नेहमी ऐकवत असतो "भाई, काम नही किया तो चलेगा लेकिन काम की बाते करना आना चाहिये."
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

तिसाद उडवलेला दिसत आहे.

गंगाधर मुटे
Sat, 11/29/2014 - 17:33 नवीन
माझा इथला प्रतिसाद उडवलेला दिसत आहे. :) कारण कळेल काय?
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

उत्तम प्रतिसाद हाडक्या

स्पा
Fri, 11/21/2014 - 15:55 नवीन
उत्तम प्रतिसाद हाडक्या
↩ प्रतिसाद: हाडक्या

धन्यवाद, पण खासकरून

हाडक्या
Fri, 11/21/2014 - 16:01 नवीन
धन्यवाद, पण खासकरून धागकर्त्याने आणि त्यांचा (क्वचित उपहासपूर्वक) प्रतिवाद करणार्‍यानी इथे मांडलेल्या वस्तुनिष्ठ मुद्द्यांना ignore मारलेले आहे असे दिसतेय. कदाचित त्यांची त्यास (मूक) सहमती असेल असे गृहित धरतो. :)
↩ प्रतिसाद: स्पा

तसे काही नाही

गंगाधर मुटे
Fri, 11/28/2014 - 08:22 नवीन
तसे काही नाही. जसा वेळ मिळाला तसा प्रतिसद देत असतो. :)
↩ प्रतिसाद: हाडक्या

तसे काही नाही. जसा वेळ मिळाला

हाडक्या
Fri, 11/28/2014 - 15:51 नवीन
तसे काही नाही. जसा वेळ मिळाला तसा प्रतिसद देत असतो
हो मुटे साहेब, देता प्रतिसाद, पण कुणाला ? ज्यांचे प्रतिसाद तुम्हाला खटकले त्यांना. म्हणजे जे मुद्देसूद बोलतील, तुम्हाला निरुपद्रवी कदाचित तुमच्याशी सहमतीचे पण थोडे वेगळॅ (भले कितीही योग्य असेल) असे बोलतील त्यावर तुम्ही कुठे काय बोलताय? इथे अतिशय निम्न पातळीवरचे प्रतिसाद देऊन तुम्ही कोणाचे हित साधताय की कोणाचे मतपरिवर्तन करताय ? (त्यात तुमचा अहंकार कुरवाळण्याचाच भाग जास्त) मात्र शेतकर्‍यांची बाजू घेऊन बोलल्याचा दावा केल्याने त्या बाजूचेच नुकसान जास्त करताय. कोणी 'मी किती मोठा आणि मलाच कसे सगळे माहित' असे म्हणून सगळ्यांना झोडपायचे आणि मग 'सारी दुनिया मेरी दुश्मन' असे म्हणत लढवय्याचा आव आणायचा यात काय अर्थ आहे ? मग ते अध्यात्म (तिकडे पण एक्जण आहेतच) असो की शेतकर्‍यांचे प्रश्न, शेवटी तुमच्यासाठी तो फक्त स्वतःच्या 'मी' चा मुद्दा बनून राहतोय असे वाटतेय. असो, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा चाललीये असे वाटून इथे आलो होतो, पण बहुतेक नेहमी जे शेतकर्‍यांच्या आंदोलन आणि संघटनांचं होतं तेच इथे ही होत चाललेलं पाहून आम्ही रजा घेतो आता. बाकी चालू द्या..
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

प्रतिसाद पटला...

सतिश गावडे
Fri, 11/28/2014 - 17:26 नवीन
अगदी हेच म्हणणं बर्‍याच जणांचं आहे. इथे शेतकर्‍यांना कुणीच झोडपत नाही. अन्नदात्याला झोडपण्याचा फालतूपणा कुणीही करणार नाही. शिवाय बराचसा शेतकरी वर्ग तितकासा सज्ञान नसल्यामुळे जे आपल्याला बहुश्रुततेमुळे पटतंय ते त्याला पटेलच असे नाही. बहुतेक जणांचा आक्षेप आहे तो मुटे साहेब ज्यापद्धतीने हा प्रश्न मांडत आहेत त्याला.
↩ प्रतिसाद: हाडक्या

अन्नदात्याला झोडपण्याचा

प्रसाद१९७१
Fri, 11/28/2014 - 18:19 नवीन
अन्नदात्याला झोडपण्याचा फालतूपणा कुणीही करणार नाही. >>>>>> गावडे साहेब, अन्नदाता वगैरे सोडा. जे शेतकर्‍यांकडुन धान्य विकत घेतात त्यांना शेतकरी अन्नदाता म्हणतात का? कापड तयार करणार्‍याला "वस्त्रदाता" म्हणायचे का? नका पिकवू शेती, काही अडत नाही.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

नका पिकवू शेती, काही अडत नाही

सतिश गावडे
Fri, 11/28/2014 - 19:35 नवीन
नका पिकवू शेती, काही अडत नाही.
हे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी केले तर काही अडणार नाही. दुसर्‍या राज्यातून धान्य, भाजीपाला आणता येईल. हे भारतातील शेतकर्‍यांनी केले तर काही अडणार नाही. दुसर्‍या देशातून धान्य, भाजीपाला आयात करता येईल. पण जर जगातील सार्‍या शेतकर्‍यांनी शेती केली नाही तर? तर मात्र नक्की अडेल. हो की नाही? की तुमच्याकडे यालाही काही पर्याय आहे?
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

+सहमत

नाखु
Sat, 11/29/2014 - 09:13 नवीन
मूळ धाग्यात आणि धागाकर्त्याच्या प्रतीवादात शहरी लोक संवेदनाहीन आहेत आणि शेतकर्यांच्या आत्महत्येला जबाब्दार्/उत्तरदायी आहेत असा उघड सूर आहे.शहरी पांढरपेशा समाजाचा शेतकर्याशी प्रत्यक्ष्/अप्रत्यक्ष (अन्न-वस्त्र्-निवारा )संबध येतोच आणि तोही काही आकाशातून पडलेला नाही त्याचे पुर्वज्/आप्त्/स्नेही शेतकरी आहेतच त्यामूळे त्याचा शेतकर्यांशी काहीच वाद्-वैर नाही. पण याचा मतितार्थ शेतकरी संघटनेच्या एका जबाबदार (?) नेत्याने सतत या पांढरपेशा समाजाची हेटाळणी आणि अपमान करावा असा नाही.पेठकर काकांबद्दल वापरलेली भाषा आणि विखार हे कशाचे द्योतक आहे. खरेच शेतकरी संघटनांनी/त्यांच्या "जाणत्या राजांनी (पिलावळी सहीत)" आत्मपरिक्षण करण्याची गरज नाही का? धरणग्रस्त्/आपत्तीग्रस्त लोकांच्या पुनर्वसनासाठी वरील श्रेष्ठांनी नक्की काय पाठपुरावा केला आणि फलनिशप्ती काय? कोण कुणाच्या भावनांशी खेळते ते माळीणचा तिढा इथे पहा. पण येता-जाता शहरी नोकरदार्-व्यवसायी समाजावर तोंडसुख घेण्याकरिता मिपा रंगमंचाचा वापर करू नका ही कळकळीची विनंती कारण इतर राजकारणी आणि तुमच्यात काडीमात्र फरक नसेल.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

याच धर्तीवर असेही म्हणता येईल

गंगाधर मुटे
Sat, 11/29/2014 - 15:40 नवीन
नका पिकवू शेती, काही अडत नाही. <<<<<<<<<<< याच धर्तीवर असेही म्हणता येईल की तुम्ही (तुम्ही हा शब्द एकवचनी समजावा) सुद्धा नका खाऊ अन्न, शेतकर्‍यांचेही काही अडत नाही. अन्न सोडून काय-काय खायचे तेही खा, शेतकर्‍यांनाही काही फरक पडत नाही.
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

नका पिकवू शेती, काही अडत नाही

गंगाधर मुटे
Sat, 11/29/2014 - 15:43 नवीन
नका पिकवू शेती, काही अडत नाही.
याच धर्तीवर असेही म्हणता येईल की तुम्ही (तुम्ही हा शब्द एकवचनी समजावा) सुद्धा नका खाऊ अन्न, शेतकर्‍यांचेही काही अडत नाही. अन्न सोडून काय-काय खायचे तेही खा, शेतकर्‍यांनाही काही फरक पडत नाही.
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

क्रमवार प्रतिसादांना उत्तर

गंगाधर मुटे
Sat, 11/29/2014 - 14:42 नवीन
ज्यांचे प्रतिसाद तुम्हाला खटकले त्यांना. म्हणजे जे मुद्देसूद बोलतील, तुम्हाला निरुपद्रवी कदाचित तुमच्याशी सहमतीचे पण थोडे वेगळॅ (भले कितीही योग्य असेल) असे बोलतील त्यावर तुम्ही कुठे काय बोलताय? >>>>>>>> एकदा बघून घ्या. या धाग्यावर मी प्रतिसादांना क्रमवार उत्तर देत आलेलो आहे. शेवटी मलाही काही वेळेच्या मर्यादा असू शकतात. सर्वांना एकाच वेळी उत्तरे देणे शक्य होत नाही. एवढेच. :)
↩ प्रतिसाद: हाडक्या

टेक्नीक आणि शेती तंत्र

गंगाधर मुटे
Fri, 11/28/2014 - 07:44 नवीन
आधुनिक शेती तंत्र वापरण्यामध्ये शेतकरी खूप पुढे आहे. उपलब्ध असलेले सर्व तंत्रज्ञान शेतकरी वापरतच आहेत. शेतीमध्ये आणखी काही नवीन तंत्र वापरण्याची शेतकर्‍यांची इच्छा आहे पण सरकारच परवानगी देत नाही. मग शेतकर्‍यांनी काय करावे?
↩ प्रतिसाद: vikramaditya

मुटेंनी आज मिपाकरांनी दिवसभर

सतिश गावडे
Tue, 11/18/2014 - 23:10 नवीन
मुटेंनी आज मिपाकरांनी दिवसभर विचारलेल्या प्रश्नांना, आक्षेपांना उत्तर न देता फक्त आपल्याला सोयीच्या असणार्‍या एका प्रतिसादाला तासाभरापूर्वी उत्तर दिले आहे. इतरांकडून संवेदनशीलतेची अपेक्षा करणार्‍या मुटेंचा हा स्वतःचा प्रतिसाद मात्र अतिशय उथळ आहे.

+१ .. हे मान्य सगा.

हाडक्या
Tue, 11/18/2014 - 23:52 नवीन
+१ .. हे मान्य सगा.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

का हा निव्वळ "योगायोग"

नाखु
Sat, 11/29/2014 - 14:48 नवीन
एकमेकां साह्य करू सूज्ञास आधिक सांगणे न लगे!
↩ प्रतिसाद: हाडक्या

निदान बेरीज तरी शिकून घ्या हो!

गंगाधर मुटे
Sat, 11/29/2014 - 14:49 नवीन
मुटेंनी आज मिपाकरांनी दिवसभर विचारलेल्या प्रश्नांना, आक्षेपांना उत्तर न देता फक्त आपल्याला सोयीच्या असणार्‍या एका प्रतिसादाला तासाभरापूर्वी उत्तर दिले आहे. >>>>>>>> 18/11/2014 पर्यंत मी ८/९ प्रतिसादांना उत्तर दिलेले आहे. निदान बेरीज तरी धड करायाला शिका हो भाऊ...! इतरांकडून संवेदनशीलतेची अपेक्षा करणार्‍या मुटेंचा हा स्वतःचा प्रतिसाद मात्र अतिशय उथळ आहे. कशाला काय म्हणावे हे तुमच्या मर्जीवरच अवलंबून आहे.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

काल भुसारी कॉलनी मधे एका

प्रसाद१९७१
Wed, 11/19/2014 - 09:20 नवीन
काल भुसारी कॉलनी मधे एका रिटायर्ड बँक कर्मचार्‍यानी कर्जबाजारी पणा मुळे आत्महत्या केली. त्याने नोकरी सोडल्यावर जिम काढण्यासाठी कर्ज घेतले होते. ही बातमी विदर्भातल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येसारखी फ्रंटपेज ची का होत नाही? अश्या बातम्या मधुन मधुन येतच असतात.

आमच्या ओळखीतला पोष्टातुन

सौंदाळा
Wed, 11/19/2014 - 11:56 नवीन
आमच्या ओळखीतला पोष्टातुन रिटायर्ड झालेला माणुस (नारायणगावचा) ३ एकर जमीन पडीक ठेवली आहे. पोष्टाची पेन्शन, मुलांचे पगार यावर उत्तम गुजराण होते. तरी हे महाशय दरवर्षी शेती दाखवुन शेतीसाठी कर्ज घेतात पन्नास हजार/ एक लाख पर्यंत, साधारण याच दिवसात. कमी व्याजदराने कर्ज मिळते. नंतर ही रक्कम सहकारी बँकातुन ६/९ महिन्या साठी फिक्स्ड डीपोझिट्मधे गुंतवतात आणि मस्त कमाई करतात. वरुन निर्लज्जपणे सांगतात की यावेळी दुष्काळ पडला पाहिजे म्हणजे कर्ज माफ होईल. सध्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातुन पुण्यात आलेल्या आणि आय्.टी, मेकॅनिकल क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यात काम करणार्‍या माझ्या बर्‍याच 'शेतकरी' मित्रांनी पुणे/पिंपरी चिंचवड महापालिकांजवळ कमी पैशात पडीक शेतजमीन घेतली आहे जी आज ना उद्या निवासी जमीनीत रुपांतरीत होईल. मला आणी माझ्यासारख्या अनेक शहरी लोकांना मात्र पैसे असुन पण अशी जमीन घेता येत नाही कारण आम्ही शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र आमच्याकडे नाही

माझ्या बर्‍याच 'शेतकरी' मित्रांनी

कपिलमुनी
Wed, 11/19/2014 - 17:45 नवीन
आय्.टी, मेकॅनिकल क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यात काम करणार्‍या माझ्या बर्‍याच 'शेतकरी' मित्रांनी पुणे/पिंपरी चिंचवड महापालिकांजवळ कमी पैशात पडीक शेतजमीन घेतली आहे
ती शेतीच्या पैशा मधून घेतली आहे का ? तुम्ही पण घ्या ना !
↩ प्रतिसाद: सौंदाळा

वर लिहिल्याप्रमाणेशेतकरी

सौंदाळा
Wed, 11/19/2014 - 18:05 नवीन
वर लिहिल्याप्रमाणे
शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र आमच्याकडे नाही
त्याशिवाय शेतजमीन विकत घेता येत नाही.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

येते हो

कपिलमुनी
गुरुवार, 11/20/2014 - 11:41 नवीन
अधिक माहितीसाठी व्यनि करा
↩ प्रतिसाद: सौंदाळा

इथेच द्या की....

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 11/20/2014 - 13:08 नवीन
कपिलमुनी, इथेच माहिती दिलीत तर सर्वांनाच उपयोगी पडेल.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

नक्कीच ! खरोखर इथे तो उपाय

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 11/21/2014 - 23:19 नवीन
नक्कीच ! खरोखर इथे तो उपाय लिहील्यास बरे होईल. शेतकरी नसलेल्या व्यक्तीस शेतजमीन विकत घेता येण्यासाठी असलेला वैध मार्ग इथे अनेक जणांना तो माहित करून घेण्याची इच्छा असेल... मीही त्यातलाच एक !
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

ऐकिव माहिती...

प्रभाकर पेठकर
Sat, 11/22/2014 - 01:19 नवीन
तो उपाय असा असतो की दुसर्‍या एखाद्या राज्यात, जीथे निर्बंध नाहीत, शेतजमीन विकत घ्यायची आणि त्या ७/१२च्या आधारे महाराष्ट्रात शेतजमीन घ्यायची. अशी पद्धत मी ऐकली आहे. कांही हजार खर्च करून जमीन घेतली जाते पण ती कधी कसली जात नाही की कधी त्यावर आपला मालकी हक्कही दाखविला जात नाही.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/23/2014 - 12:56 नवीन
"शेतकरी असल्याशिवाय शेतजमीन घेता येत नाही" हा नियम सर्व राज्यांत नाही हे नविनच कळले !
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

ते कोणता उपाय सांगतात ते

सौंदाळा
Tue, 11/25/2014 - 18:53 नवीन
ते कोणता उपाय सांगतात ते माहित नाही पण तलाठ्याला पैसे (१५-२० हजार मी ऐकलेला आकडा) चारुन शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र बिनदिक्कीतपणे मिळते
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

या अशा लोकांची संख्या पूर्वी

जयंत कुलकर्णी
Wed, 11/19/2014 - 12:34 नवीन
या अशा लोकांची संख्या पूर्वी फार कमी असायची ती आता लक्षणीय झाली आहे. आपण प्रामाणिक करदात्यांचा पैसा खातोय हे यांना माहीत आहे. (पूर्वी माहीत नसायचे). तेवढे सुशिक्षीत माणसे आज त्यांच्या घरात आहेत. पण फुकटेपणा वाढलाय......

फारच पराकोटीचे गैरसमज

गंगाधर मुटे
Sat, 11/29/2014 - 15:02 नवीन
आपण प्रामाणिक करदात्यांचा पैसा खातोय >>>> फारच पराकोटीचे गैरसमज कुरवाळत बसलात राव तुम्ही! किती टॅक्स भरताय हो तुम्ही? आणि हा टॅक्स भरायला पैसा कुठून आणताय? माझ्यासारखे अनेक लोक स्वतः कष्ट करून टॅक्स भरतात. मी स्वतः सात प्रकारचा टॅक्स भरतोय. मी भरलेल्या टॅक्स मधला ७० टक्के भाग कर्मचार्‍यांच्या वेतनाकडे आणि ३० टक्के भाग अन्य कारणाकडे वळता होतो. या देशातला प्रत्येक मनुष्य अप्रत्यक्ष कर भरतच असतो.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

मी पण शेतकरी आहे

कपिलमुनी
Wed, 11/19/2014 - 17:55 नवीन
१. मला २४ तास वीज द्या . मी औद्यिगिक भावाने घ्यायला तयार आहे. २. मला पाणी द्या , ते पण मी औद्योगिक भावाने घ्यायला तयार आहे. ३. मला माझ्या मालाची किमत ठरवू द्या ! आयात / निर्यात / रीटेल / होलसेल ! ४. एम आय डी सी प्रमाणे शेती उद्योगाला चालना / प्राधान्य द्या ( कारण नाशवंत माल हा बर्‍याच ठिकाणी कळीचा मुद्दा आहे) यानंतर survival-of-the-fittest या न्यायाने जे वाचतील ते वाचतील . नाहीतर आपण इंपोर्ट करून खाउ .

अरेच्चा,

जयंत कुलकर्णी
Wed, 11/19/2014 - 18:35 नवीन
अरेच्चा, १ २४ तास कोणालाच वीज मिळत नाही. २ पाणीही नाही ३ मालाची किंमत बाजार ठरवतो तुम्ही आम्ही नाही. ४ मान्य.....ते अप्रत्यक्ष चालूच आहे....

इंडस्ट्रीज

कपिलमुनी
Wed, 11/19/2014 - 18:55 नवीन
अरेच्चा, १ २४ तास कोणालाच वीज मिळत नाही. >> एम आय डी सी मधे मिळते आठवड्याचे ६ दिवस २ पाणीही नाही >> तेही मिळते . तळेगाव , पिं चि एम आयडीसी , हिंजवाडी येथे मिळते ३ मालाची किंमत बाजार ठरवतो तुम्ही आम्ही नाही. >> बंधने काढली पाहिजेत आणि कांदा महागला की सरकार हस्तक्षेप करता तसाच मोबाईलचा नेट पॅक महागला की करत नाही. ४ मान्य.....ते अप्रत्यक्ष चालूच आहे.... >> अप्रत्यक्ष ? त्यावर अवलंबून असलेलाज रोजगार , आणि उत्पादन यांच्या तुलनेत नगण्य !
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

अण्णासाहेब शिंदे नावाचे एक

जयंत कुलकर्णी
Wed, 11/19/2014 - 19:12 नवीन
अण्णासाहेब शिंदे नावाचे एक शेतीतज्ञ होते. त्यांनी या विषयावर सकाळमधे एक भला मोठा लेख लिहिला होता. त्यात त्यांनी या विचारांचा उहापोह केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की उद्योगाची वीज पाणी काढून शेतीला दिले तर स्गळ्यांनाच उपाशी मरायची वेळ येईल. कारण जगाच्या पाठीवर शेतीवर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था चालण्याचे उदाहरण नाही. इतर उत्पन्न वाढले तरच शेतकर्‍यांचे प्रश्न सुटू शकतील असे त्यांचे म्हणणे होते. ते मला पटते. काही वर्षांनी जेवणाच्या टॅबलेट्स निघाल्यातर आश्चर्य वाटणार नाही. :-)

इतर उत्पन्न वाढले तरच शेतकर्

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 11/19/2014 - 19:33 नवीन
इतर उत्पन्न वाढले तरच शेतकर्‍यांचे प्रश्न सुटू शकतील असे त्यांचे म्हणणे होते. +१००० अण्णासाहेब शिंदे यांच्याबद्दल अगोदर माहिती नव्हती. पण ते केवळ शेतीतज्ञच नव्हे तर पूर्ण अर्थतज्ञ होते असेच म्हणावे लागेल. सर्वसाधारण जनतेची आर्थिक ताकद वाढवणार्‍या उद्योगधंद्याना मदत केल्यावरच शेतमालाची (किंबहुना सर्वच आवश्यक उत्पन्नांची) सबसिडीमुक्त किंमत देऊन जनता तो माल खरेदी करू शकेल. म्हणजेच पर्यायाने शेतकर्‍यालाही योग्य आर्थिक उत्पन्न मिळेल. सर्वसाधारणपणे सबसिडी ही केवळ तात्कालीक सेतूयोजना (ब्रिजिंग सोल्युशन) म्हणून वापरली जाते... तिला कायमस्वरुपी योजना बनवण्याने शेतकर्‍याला (किंवा इतर कोणत्याही उत्पादकाला) सतत परावलंबी ठेवण्यापलिकडे काहीच साधले जाणार नाही हे शेतकरी (आणि इतर सर्व उत्पादक) समजतील तोच सुदिन.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

+१

हाडक्या
Wed, 11/19/2014 - 20:23 नवीन
सर्वसाधारणपणे सबसिडी ही केवळ तात्कालीक सेतूयोजना (ब्रिजिंग सोल्युशन) म्हणून वापरली जाते... तिला कायमस्वरुपी योजना बनवण्याने शेतकर्‍याला (किंवा इतर कोणत्याही उत्पादकाला) सतत परावलंबी ठेवण्यापलिकडे काहीच साधले जाणार नाही हे शेतकरी (आणि इतर सर्व उत्पादक) समजतील तोच सुदिन.
अगदी अगदी.. त्याचबरोबर शेतीसंदर्भातला समाजवादी दृष्टीकोनपण बदलायला हवा.. शेतीस व्यापक उद्योजकतेची जोड देण्यास ज्या प्रचंड आडकाठ्या आहेत (ज्या सबसिड्याही देतात म्हणून ठेवल्यात) त्या ही कमी व्हायला हव्यात.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

उदाहरण

कपिलमुनी
गुरुवार, 11/20/2014 - 11:46 नवीन
जगाच्या पाठीवर शेतीवर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था चालण्याचे उदाहरण नाही
औद्योगिकरणाची २०० वर्षे सोडली तर पूर्वी सर्व देशांची अर्थव्यवस्था शेतीवरच चालायची .
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

बरोबर आहे. मी अलिकडील

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 11/20/2014 - 12:07 नवीन
बरोबर आहे. मी अलिकडील काळाबद्दल बोलत होतो...किंवा ते बोलत होते असे म्हणुयात....आपण म्हणता तसे त्याही अगोदर होते....शिवाय आपल्या येथे रोमन साम्राज्याशी व्यापार चालायचा त्यात कुठेही धान्य निर्यात केल्याचा उल्लेख नाही. इतरच वस्तू असत.....माझा मुद्दा लक्षात आला असावा....शेतीवर म्हणजे अ‍ॅग्रोबेसड उत्पादनांवर नाही....तुम्हाला असे वाटते का की शिवाजीच्या मोहिमांचा खर्च फक्त शेतसार्‍यातून चालायचा ?
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

कोणी जिरायती, बागायती आणि

सतिश गावडे
Wed, 11/19/2014 - 22:49 नवीन
कोणी जिरायती, बागायती आणि कोरडवाहू हे शेतीचे प्रकार समजावून सांगेल काय? कोकणातील भातशेती यातल्या कुठल्या प्रकारात बसते?

भूगोलच नक्की पण यत्ता सहावी,

प्यारे१
Wed, 11/19/2014 - 23:13 नवीन
भूगोलच नक्की पण यत्ता सहावी, सातवी का आठवी ते पण आता आठवत नाही. जिरायती म्हणजेच कोरडवाहू, पाण्याचा कमी वापर अथवा पावसावर अवलंबून असलेली. ज्वारी, हरभरा, मका, बाजरी, (कापूस पण असावा) इ. जिरायती पिकं म्हणून घेतली जातात. ह्यांना कमी पाणी पुरतं. बागायत म्हणजे शेतात/ जवळ पाण्याची व्यवस्था असलेलं शेत. बोअर, विहीर, जवळ वाहणारा कालवा अथवा नदी इ. ऊस, फळांचं उत्पादन (?)वगैरे बागायती. (जिरायती आणि कोरडवाहू मध्ये काही सूक्ष्म फरक आहे का ह्या प्रश्नात अजूनही)
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

धन्यवाद.

सतिश गावडे
Wed, 11/19/2014 - 23:23 नवीन
धन्यवाद.
↩ प्रतिसाद: प्यारे१
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा