✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी अस्मिता, आपण आणि राजकारण

व
वेल्लाभट यांनी
Tue, 10/28/2014 - 11:45  ·  लेख
लेख
"नाही यार नाही. हा नाही. अरे तो ठीक आहे पंतप्रधान म्हणून. महाराष्ट्रात हा नाही पाहिजे. अरे तो मराठी माणसाचा, आपला, असा पक्ष नाहीये मित्रा.... तो महाराष्ट्रात मराठी माणसाला पोरकं करेल, अरे मारून टाकेल तो आपल्या अस्मितेला...." अगदी कळकळीने काल रस्त्यावर एक माणूस दुस-या माणसाला सांगत होता. या सगळ्या विचारांत काहीसं तथ्य असलं जरी, तरी बरचसं नाही आहे. मुंबईतला एक मुख्य पक्ष हा पहिल्यापासून मराठी माणसाचा पक्ष राहिलेला आहे. मराठी माणसाला मुंबईत कधीच पोरकं केलं गेलं असतं. पण त्याला बळ दिलं, त्याचा दरारा प्रस्थापित केला तो या पक्षाने. दंगलींच्या वेळी मराठी माणसाला मुंबईत आधार होता तो याच पक्षाचा. या आणि अशा अनेक गोष्टी अगदी ख-या आणि महत्वाच्या आहेत. पण मला त्या माणसाच्या बोलण्यातला एकच मुद्दा खटकला. अस्मितेचा. मराठी अस्मिता ! मराठी अस्मिता !.... कधी बंगळुरू मधे कन्नडी अस्मिता ! असं कुणी बोंब मारताना ऐकलंय का? मी तरी नाही. चेन्नईत मल्ल्याली अस्मितेच्या नावाने कुणी ओरडत नाही की बंगाल मधे बंगाली अस्मितेच्या नावाने नाही. पण ही अस्मिता त्यांच्या रोजच्या, सततच्या वागण्यातून दिसते. बंगळुरू मधे रिक्षावाले ठासून नो इंग्लिश नो हिंदी म्हणतात. ओनली कन्नडा. मग तिथे रहायला गेलेली मराठी मंडळी घरी आल्यावर मी थोडं थोडं कन्नड शिकलोय म्हणतात, त्यांना घरचेही अरे वा ! मस्त म्हणून शाबासकी देतात. इथे अस्मिता कुणाची श्रेष्ठ ठरली? लोकल ट्रेन मधे आपण प्रवास करतो. अगदी सहजपणे आपण हिंदीत संवाद साधत असतो. उदा. 'भाईसाब जरा बाजू होना', 'कौनसा स्टेशन गया?', 'आपको कहां उतरना है?'. किंवा अगदीच फस्ट क्लास किंवा एसी बस मधे असू किंवा जरा टापटीप माणूस/बाई दिसली की आपण थेट इंग्रजी सुरू करतो. उदा. 'एक्स्क्यूज मी, डज धिस बस गो टू चेंबूर'. का? आपल्याला कुणी प्रतिबंध करत नाही 'नो हिंदी नो इंग्लिश' म्हणायला. शिरजोर पणे 'हिंदी मे बोल यार' म्हणणारी अमराठी मंडळी अनेकांनी कार्यालयात बघितली असतील कदाचित. त्यांच्यासमोर आपली अस्मिता मूग गिळून का बसते? इंग्रजी शाळांवरचं प्रेम, इंग्रजी सण, आपले मराठी सणही साजरे करायच्या इंग्रजी पद्धती, या आणि अशा बाबतीत 'आपलीच' मराठी अस्मिता दाखवण्यात आपल्याला वाटणारा कमीपणा किंवा कालबाह्यतेची भावना अशा अनेक गोष्टींद्वारे आपण आपली ही अस्मिता मारतच असतो की. 'जीते जी' म्हणतात तसं. हे असं असताना निवडणुका आल्या की कुण्या पक्षाची आणि लगोलग आपलीही अस्मिता मात्र जागी होते. मग आपल्याला पुळका येतो; भाषेचा, आणि ती भाषा, तिचा अभिमान बाळगणा-या अशा पक्षांचा. आता वास्तविक हा असा प्रकार कालबाह्य झाला आहे. पक्षांसाठी भाषिक मुद्द्यावर निवडणुका लढवणं योग्य राहिलेलं नाही आणि लोकांनी कुण्या राजकीय पक्षावर 'आपल्या' भाषेची अस्मिता जपण्याकरिता अवलंबून रहाणं योग्य राहिलेलं नाही. पुढे गेलंय सगळं आता. दोन दशकांपूर्वी जेंव्हा एका पक्षाने मराठी माणसाचं सबलीकरण केलं, तेंव्हा त्यासाठी तो काळ योग्य होता. पण आता जेंव्हा इतर पक्ष विकासाची कास धरत आहेत, ती लोकांच्या बुद्धीला पटत आहे, तेंव्हाही हे योग्य ठरेल ही शक्यता कमीच. मराठी भाषा, तिची अस्मिता जपायला हवी, तर ती प्रत्येकाने कृतीतून, वागण्यातून जपायला हवी. जिथे तिथे मराठीचा पुरस्कार व्हायला हवा. छोट्या छोट्या गोष्टीतून मराठीचा, मराठी असल्याचा अभिमान दिसायला हवा. बंगळुरूच्या रिक्षावाल्यापासून ते जरीकाठी लुंगी घालून फिरणा-या भारताच्या माजी अर्थमंत्र्यांच्या वागण्यातून दिसतो तसा. एक पक्ष येईल, मराठी अस्मिता जपेल असं म्हणणं म्हणजे कुणीतरी येईल, वाढून देईल म्हणण्यासारखं आहे. आपण आपल्या बाजूने अस्मिता वा-यावर सोडायची, आणि एखादा राजकीय पक्ष ती जपेल म्हणत त्याला मत द्यायचं म्हणजे खुळेपणा आहे. क्रांतिवीर चित्रपटातला 'आज मै तुम्हे बचाऊंगा, कल कौन आयेगा?' वाला संवाद इथे आठवतो. सुजाणांनी त्यातून बोध घ्यावा. एक मराठी म्हणून प्रत्येक माणसाला अभिमान जरी असला, तरी तोच राजकारणाच्या अग्रस्थानी ठेवण्यावर संबंधित पक्षांनी, मतदारांनी विचार करायला हवा. कारण याच्यामुळेच कदाचित आपण जे खरोखर गरजेचे मुद्दे आहेत, जो आपल्या हक्काचा विकास आहे, त्याच्यापासून दूर राहिले असू. तेंव्हा आज खरं तर विकासासारख्या महत्वाच्या मुद्द्याला प्राधान्य दिलं पाहिजे. लढाई विकासाची असली पाहिजे. मराठी आहेच; आणि राहील. आजच्या काळात गरज मराठीच्या तलवारीला धार लावण्याची नसून विकासाच्या तलवारीला मराठीची मूठ बसविण्याची आहे. आणि त्या मुठीला इथल्या मराठी माणसांची एकत्रित ताकद मिळाली पाहिजे. मग अटकेपार झेंडे रोवण्यापासून मराठीला मराठी माणसाला कुणीही अडवू शकणार नाही. एकत्रित ताकद मिळाली नाही तर मात्र भविष्यात अल्पसंख्यांकतेची ढाल करायची वेळ आपल्यावर येईल हे नक्की. - अपूर्व ओक
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
लेख
मत

प्रतिक्रिया द्या
34920 वाचन

💬 प्रतिसाद (132)

प्रतिक्रिया

नरेंद्र मोदी / भाजपा आता

सौंदाळा
गुरुवार, 10/30/2014 - 18:22 नवीन
नरेंद्र मोदी / भाजपा आता संधीसाधुपणा म्हणा, माज म्हणा, आत्मविश्वास म्हणा दाखवतायत. पण ५ वर्षात एक्स्ट्रा-ऑर्डीनरी काम केले नाही तर २०१९ ला परत याच पक्षांची मदत घ्यावी लागेल आणि तेव्हा संधीसाधुपणा, माज वगैरे करायची या पक्षांची वेळ असेल. काळच ठरवेल पुढे काय होतय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अाय.आय.एम. मधल्या शिक्षणाचा

बोका-ए-आझम
गुरुवार, 10/30/2014 - 10:28 नवीन
अाय.आय.एम. मधल्या शिक्षणाचा दर्जा चांगलाच आहे अजूनही. आणि तुम्ही जेव्हा अाय.अाय.एम. म्हणता तेव्हा नक्की कुठली अाय.आय.एम.? कारण १३ आय.आय.एम. सध्या आपल्या देशात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

आझमशेठ !!

सुहास..
गुरुवार, 10/30/2014 - 17:58 नवीन
आझमशेठ !! बाकी राहिली संधी साधु म्हणण्याची, भाजपा आहेच संधी-साधु आणि दुटप्पी चेहर्‍याचा पक्ष हे तुम्ही ही मान्य करताय , सो फॉर दॅट मॅटर " Party with difference " ची जाहीरात बंद करा !! (संपादित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

सायबा - दुसर्‍या पार्टीने काय

प्रसाद१९७१
गुरुवार, 10/30/2014 - 18:17 नवीन
सायबा - दुसर्‍या पार्टीने काय करावे ते सोडुन द्या. त्यांनी काय करावे हा विचार तुम्ही करत बसलात तर तुमच्या मनसेला काही फायदा होणार नाही. उलट चुका करत असतील तर करु द्यात. लोक मूर्ख नाहीत, चुका केल्या तर पुढच्या निवड्णुकीत लाथ बसेल. तुम्ही तुमच्या पार्टीकडे लक्ष द्या. तिची लोकात प्रतिमा कशी बरी होईल ह्या कडे बघा. दुसर्‍यांना नावे न ठेवता तुम्ही निवडुन याल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

तुम्ही तुमच्या पार्टीकडे लक्ष

सुहास..
गुरुवार, 10/30/2014 - 18:24 नवीन
तुम्ही तुमच्या पार्टीकडे लक्ष द्या. तिची लोकात प्रतिमा कशी बरी होईल ह्या कडे बघा. दुसर्‍यांना नावे न ठेवता तुम्ही निवडुन याल >> :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

भाजपने पण ५० वर्ष कॉग्रेस कशी

प्रसाद१९७१
गुरुवार, 10/30/2014 - 18:50 नवीन
भाजपने पण ५० वर्ष कॉग्रेस कशी वाईट आहे हे बोलण्यात वाया घालवली. त्या ऐवजी आम्ही कॉग्रेस ला समर्थ पर्याय आहोत हे दाखवून दिले असते तर फार आधीच भाजपची सत्ता आली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

५० वर्षे?

प्रदीप
गुरुवार, 10/30/2014 - 18:55 नवीन
भाजपचे अस्तित्व एव्हढे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

भाजप म्हणजे जनसंघ्+भाजप.

प्रसाद१९७१
गुरुवार, 10/30/2014 - 19:00 नवीन
भाजप म्हणजे जनसंघ्+भाजप. जनसंघ पन्नासच्या दशका पासुन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

बरोबर

प्रदीप
गुरुवार, 10/30/2014 - 19:34 नवीन
जनसंघाला तत्कालिन राजकारणात हिंदूत्वाच्या अ‍ॅजेंडावर फारसा लोकाश्रय नव्हता. जनता दलाच्या कडबोळ्यात कुणाचाच पायपोस कुणाच्याही पायात नसल्याने, त्याचे लवकरच व्हायचे ते झाले. अटल बिहारी बाजपेयींच्या नेतृत्वाखाली भाजपने ९० च्या दशकाच्या शेवटाला केंद्रात सरकार चालवले होते, तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या नावाने शंख करण्यात वेळ दवडला, असे म्हणणे धार्ष्ट्याचे ठराव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

बाजपाईंचे कसले ते भाजपचे

प्रसाद१९७१
गुरुवार, 10/30/2014 - 20:18 नवीन
बाजपाईंचे कसले ते भाजपचे सरकार? ते कॉग्रेस्चे सरकारच होते. त्याचे मुखीया प्र.महाजन म्हणजे भाजप मधले शरद पवार. ते चालवले ते सुद्धा कॉग्रेस सारखे. टेलिकॉम आणि कोळसा घॉटाळ्याची मुळे ह्याच सरकार कडे होती. बाजपायींची मानलेली कन्या आणी जावई आणि एक IAS ऑफिसर धुमाकुळ घालत होते. नरसिंह रावांकडुन सोनिया कडे कॉग्रेस जाई पर्यंत कॉग्रेसला निवडणुक जिंकता येइल असे वातावरण निर्माण करायचे एकमेव काम बाजपाईंनी केले. आणि तेंव्हा भाजपला २०० जागा मिळाल्या होत्या त्यासुद्धा बर्‍याच ठीकाणी युती करुन. तेंव्हाच जर मोदीसारखा माणुस असता तर पूर्ण बहुमत मिळाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

सुहाससाहेब, मी काय करावं आणि

बोका-ए-आझम
गुरुवार, 10/30/2014 - 20:49 नवीन
सुहाससाहेब, मी काय करावं आणि काय नाही हे सांगणारे तुम्ही कोण?तुमच्या पक्षाला विधानसभेत जागा किती? तुम्ही बोलता किती? तुमच्या सारख्या लोकांवरुनच ' मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली ' ही म्हण आली असावी अशी मला रास्त शंका येते आहे. तुमच्या पक्षाने टोलचा मुद्दा आणला पण नंतर ते आंदोलन का गुंडाळलं? कितीचं तोडपाणी केलं? राजसाहेब म्हणाले मी निवडणूक लढवणार, नंतर त्यांनी म्हणलं माझा जेनेटिक प्राॅब्लेम आहे. हा तुम्हाला भंपकपणा वाटत नसेल तर भंपकपणा ओशाळेल. आणि अजून एक - आम्ही मतदार आहोत. कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणाचं पोतेरं करायचं ते तुम्ही आम्हाला सांगू नये. आमच्यामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळेच आम्ही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

सुहाससाहेब, मी काय करावं आणि

सुहास..
गुरुवार, 10/30/2014 - 22:07 नवीन
सुहाससाहेब, मी काय करावं आणि काय नाही हे सांगणारे तुम्ही कोण? >>> साहेब नाही, फक्त सुहास ( आडनाव लावत नाही आणि विचारत नाही ) तुमच्या पक्षाला विधानसभेत जागा किती? >>> १ तुम्ही बोलता किती? >> बोलत नाही लिहितो आहे ! तुमच्या सारख्या लोकांवरुनच ' मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली ' ही म्हण आली असावी >> मराठी भाषा माझ्या पक्षस्थापनेपेक्षा खुप जुनी आहे. अशी मला रास्त शंका येते आहे. तुमच्या पक्षाने टोलचा मुद्दा आणला पण नंतर ते आंदोलन का गुंडाळलं? >> कायदा आडवा आला, दोन दिवस शिक्षा झाली. ठेकेदारांनी आणि केद्रं सरकारच्या करारासमोर हात टेकवावे लागले, मनसे,कोल्हापुर टोल विरोधी समीती, सेना आणि राज्य सरकार हे चौघे असुन ही टोलप्रश्नी ठेकेदारांपुढे सुप्रीम कोर्टात केस हारलो. ( या विषया वर डिट्टेलवारी लिहितो आहे, तुम्ही बसुन रहा, आरोप करत रहा, केसेस आम्ही घेत राहु, पोलीसांचे दांडके खात राहु, कामाला लागायच्या वेळेला, बॅक-ग्राउंड व्हेरिफिकेशन साठी कमिश्नर ऑफीसात पैसै खर्च करत जावु ) http://timesofindia.indiatimes.com/india/Maharashtra-CM-agrees-to-shut-22-toll-plazas-Raj-Thackeray-keeps-up-threat/articleshow/30370142.cms ( यादी आरटीआय खाली मागवुन घेणे ) किमान इतके तरी करु शकलो याचा आनंद आहेच .....बाकीच्यांनी शष्प काही केले असल्यास जरूर सांगावे !! वागळेंच्या कार्यक्रमात बडबडीशिवाय कितीचं तोडपाणी केलं?>> एक रुपयाच ही नाही ! ( राज ठाकरेंच्या भाषेत सांगायच तर, राज ला खरेदी करणारा अजुन जन्माला यायचाय ) राजसाहेब म्हणाले मी निवडणूक लढवणार, नंतर त्यांनी म्हणलं माझा जेनेटिक प्राॅब्लेम आहे.>>> जेनेटिक प्रॉब्लेम ? हे कधी म्हणाले, रक्तात नाही आणि प्रॉब्लेम याला संमातर शब्द नाही, पुर्ण महाराष्ट्रच माझा मतदारसंघ आहे म्हणाले. हा तुम्हाला भंपकपणा वाटत नसेल तर भंपकपणा ओशाळेल. >> भंपकपणाला काय वाटते आणि त्याने कशामुळे ओशाळावे याच्याशी आमचा काही ही संबध नाही, ३ अब्ज कर्जात बुडालेल्या महाराष्ट्रात वानखेडे वर सोहळा आम्ही केलेला नाही किंवा पंचतारांकित व्यक्तींचा सहभाग असलेला, पंचतारांकित इस्पितळाच, पंच तारांकित उद्घाटन तर अजिबात केलेले नाही. आणि अजून एक - आम्ही मतदार आहोत. >> मी ही आहे ,पाच वर्षातुन एकदा, पण इलेक्ट्रॉनिक मिडीया च एकुन, सत्यता पडताळल्या शिवाय, मी माझी मत बदलत नाही. कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणाचं पोतेरं करायचं ते तुम्ही आम्हाला सांगू नये. >>> तेव्हढाच हक्क आम्हालाही आहे. आमच्यामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळेच आम्ही नाही. >>> हेच वाक्य तुम्हालाही लागु आहे. धन्यवाद ! फुकटात येव्ह्ढेच ज्ञान मिळेल !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

फुकटात न मागता ज्ञान

बोका-ए-आझम
Fri, 10/31/2014 - 00:00 नवीन
फुकटात न मागता ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद!तसंही तुमच्यासारख्या लोकांवर खर्च करायला आमच्याकडे थोडाच कोहिनूर मिल मधून मिळालेला पैसा आहे? आमचा आमच्या कष्टानेा मिळवलेला पैसा आहे. बरं, ती सुप्रीम कोर्टातली कुठली केस? नाही, कारण राज साहेबांवर इतक्या केसेस आहेत, नक्की कुठली केस हरलात? आणि ती डायरेक्ट सुप्रीम कोर्टात बरी फाइल केलीत? का पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनला केस म्हणल्यावर कोणीही विश्वास ठेवेल असं वाटलं? त्या भरलेल्या केसबद्दल मीडियात छापून आलं असेलच. ती लिंक बघायला मिळेल काय जरा? आणि एक - मी इलेक्ट्रॉनिक मीडियावरुन मत बनवत नाही कारण मी स्वतः एकेकाळी तिथे कार्यरत होतो. त्यामुळे तिथे बातम्या कशा बनवतात आणि फिरवतात ते मला माहीत आहे. पण आम्ही पक्षीय झापडं लावूनही हिंडत नाही. म्हणूनच गेल्या निवडणुकीत नितीन सरदेसाईंसारख्या उमद्या माणसाला मत दिलं होतं आणि याही निवडणुकीत तेच केलं आणि ते निवडून आले नाहीत त्यामुळे वाईटही वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

म्हणूनच गेल्या निवडणुकीत

काळा पहाड
Fri, 10/31/2014 - 00:27 नवीन
म्हणूनच गेल्या निवडणुकीत नितीन सरदेसाईंसारख्या उमद्या माणसाला मत दिलं होतं आणि याही निवडणुकीत तेच केलं आणि ते निवडून आले नाहीत त्यामुळे वाईटही वाटलं.
सुहासभाऊ, घ्या.. घालवलात आणखी एक मतदार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अरे सुहास लोग क्या बोल रहे है, तुम क्या बोल रहे हो ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/31/2014 - 10:19 नवीन
सुहास, माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून तुम्ही नसत्या गोष्टीचं दळण तुम्ही दळत आहात असं नै वाटत ये का तुम्हाला ? आम्ही तुमच्याइतके उत्तम पक्षाचे कार्यकर्ते नसू पण पेप्र बिप्र आम्ही वाचतो आणि महाराष्ट्रात कशाला किती खर्च लागतोय कुठे भ्रष्टाचार होतोय, कोण किती बाता मारत होतं, निवड्णुकीनंतर त्यांचे काय हाल झाले ते आम्हाला समजतंय, तुम्हाला मनसेनं जे स्वत:चे बेक्कार हाल केले त्याबद्दल काही बोलता येईल का ? इतकंच सांगा. तुमचा त्रास मला पाहवल्या जात नै ये. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

सुहास, माझ्यासकट आत्तापर्यंत

श्रीगुरुजी
Fri, 10/31/2014 - 11:25 नवीन
सुहास, माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून तुम्ही नसत्या गोष्टीचं दळण तुम्ही दळत आहात असं नै वाटत ये का तुम्हाला ? मनसेच्या पानिपताची कारणे अगदी उघड आहेत. नुसतीच बडबड आणि कृती शून्य असे फार काळ चालत नाही. सेना-भाजप युती तुटल्यावर राज ठाकरे प्रचारात सांगत होते की भाजपने सेनेचा विश्वासघात केला. लगेच लोकांच्या मनात विचार आला की तू तेच केलंस ना शिवसेनेतून फुटुन निघताना. तू करतोस तो स्वाभिमान आणि भाजपने युती तोडली तर तो विश्वासघात! शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष आतून मिळालेले आहेत असेही राज बोलत होता. तू तरी वेगळं काय केलंस? नाशिकमध्ये आधी भाजपचा आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतलास. नंतर भुजबळ, राणे पिता-पुत्रांविरूद्ध मनसेने उमेदवार दिले नव्हते. तुझंच काँग्रेस्-राष्ट्रवादी साटंलोटं होतं. हे जनतेच्या लक्षात आलं म्हणूनच जनतेने मनसेला जोरदार लाथ घातली. मनसे आता कोमात आहे आणि लवकरच मनसेचा कारभार आटोपेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

क्लिंटन
Fri, 10/31/2014 - 14:03 नवीन
माझ्यासकट आत्तापर्यंत पन्नास सदस्यांनी मनसेचं इतकं पनिपत झालेलं असतांना त्या पनिपताची पटण्याची कारण द्यायचं सोडून...
इतर ४९ सदस्यांच्या मतांविषयी कल्पना नाही पण मनसे या गुंड आणि राडेबाज पक्षाचा धुव्वा उडाला याचा मला तरी आनंदच झाला.२००८-०९ मध्येही माझ्या ओळखीत अनेक लोक 'राजसाहेब' म्हणून वाहवून चालले होते त्यावेळेपासून किंबहुना त्याही पूर्वीपासून माझा मनसे या प्रकाराला अगदी कडाडून विरोधच होता. आता त्यातले बरेचसे मित्र आता त्या प्रकारापासून दूर गेले आहेत याचे समाधान आहे. आणि हो. मी मनसेचा धुव्वा उडाला असे म्हणत आहे. पानिपत हा शब्द मुद्दामून वापरत नाही.कारण आपल्या कोणाचा जोरदार पराभव झाला तर ते पानिपत. हे मनसेवाले राडेबाज लोक मला स्वतःला तरी कोणत्याही अ‍ॅन्गलने आपले वाटत नाहीत. त्यामुळे मनसेचे पानिपत झाले असे मी तरी नक्कीच म्हणणार नाही. असो. म्हणे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू-प्रिंट प्रसिध्द केली यांनी. अमक्याचे तंगड तोडू, तमक्याच्या नरडीचा घोट घेऊ याशिवाय कोणतीही भाषा बोलू न शकणारे आणि कधीच कसलीच विधायक भूमिका न मांडणारे मनसेवाले अभ्यासपूर्ण ब्लू-प्रिंट प्रसिध्द कशी करू शकतात हा प्रश्न फारसा कोणालाच कसा पडला नाही याचेच आश्चर्य वाटत आहे. म्हणे महाराष्ट्राला स्वायत्तता देणार. आपल्या राज्यघटनेप्रमाणे अशी राज्यांना परस्पर स्वायत्तता जाहिर करता येत नाही याचा पत्ता यांना आहे की नाही? मनसे म्हणजे भारतीय राजकारणात जे काही वाईट आहे त्या सगळ्याचा अर्क आहे. अशा पक्षांचा कायमचा नायनाट व्हायला हवा. त्या दृष्टीने महाराष्ट्रातील सुजाण मतदारांनी पाऊल उचलले आहे त्याचा नक्कीच आनंद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे सुहास लोग क्या बोल रहे है

बॅटमॅन
Fri, 10/31/2014 - 14:42 नवीन
अरे सुहास लोग क्या बोल रहे है, तुम क्या बोल रहे हो ?
अगदी अगदी..कशाचा कशाला संबंध नाही, नुस्तं आपलं श्वानं युवानं मघवानमाह चाललंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.

hitesh
Fri, 10/31/2014 - 18:34 नवीन
संबंध नाही कसा ? श्वान युवा मधवान ( इंद्र) तिघेही कामातुर असतात. तसे अस्मितेच्या नावाने ओरडणारे सेना मनसे सत्तातुर असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा हा. तसे तर मग जगातला

बॅटमॅन
Fri, 10/31/2014 - 19:30 नवीन
हा हा हा. तसे तर मग जगातला प्रत्येक पुरुष अन प्रत्येक स्त्री (दोहोंपैकी काही तुरळक अपवाद वगळता) कधी ना कधी कामातुर असतेच. त्या हिशेबाने कसाही संबंध लावता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

>>> अरे रे ! अतिशय बायस्ड ,

श्रीगुरुजी
गुरुवार, 10/30/2014 - 18:46 नवीन
>>> अरे रे ! अतिशय बायस्ड , मुद्दे राहिलेत बाजुला , २५ सभा , ब्रॅन्ड मोदी, खर्च, विकासाच्या गप्पा करणारे विकासचे पप्पा !! ...येव्हढ काही ही नसताना जर उध्दव इतके सीट्स आणु शकला हेच त्याचे यश आहे ...मनसे च तर सोडुनच दे !! उद्धवकडे काही नव्हतं तर कशाला १५१ जागांच्या गमजा मारत होता? आणि १५१ जागा हव्या त्या भाजपच्या जीवावर? स्वतःला फक्त ६३ जागा निवडून आणत्या आल्या? आधीच्या निवडणुकात तर भाजपची मदत घेऊन भाजपपेक्षा जास्त जागा दांडगाई करून लढवून भाजपपेक्षा कमी जागा मिळत होत्या, तरी आम्हीच मोठे भाऊ हा तोरा कायम! जशी शिवसेना एकटी निवडणुक लढलेली आहे, तसा भाजप आणि इतर पक्षही एकटेच लढलेले आहेत. पण त्यापैकी कोणीच स्वतःचे एवढे कौतुक करत नाहीय्ये. >>> बाळासाहेबांच्या गोष्टी तुम्ही भाजपाप्रेमी करुच शकत नाही , आणि आम्ही करु देणार ही नाही , मी च काय कुठलाही मराठी करु देणार नव्हताच , म्हणुन तर बाळासाहेंबाविषयी चकार काढता आला नाही मोदींना ...उपकार केलेत बाळासांहेबानी येव्हढे !! आणि सोळा जागांसाठी भाजपाने आपला संधी-साधु पणा दाखविला असेच होते ना .... बाळासाहेब म्हणजे काय सगळ्या टीकेच्या पलिकडे होते काय? मोदींचे ५ ऑक्टोबरचे भाषण नीट ऐका. ते बाळासाहेबांबद्दल अजिबात बोलणार नाही असे म्हणाले नव्हते (या निवडणुकीत बाळासाहेब हा मुद्दाच नव्हता). बाळासाहेबांच्या आदरासाठी शिवसेनेवर टीका करणार नाही असे म्हणाले होते. आणि बाळासाहेबांनी काय उपकार केलेत भाजपवर? उलट भाजपनेच कमी जागा लढवून इतके दिवस शिवसेनेवर उपकार केलेत. मुंबई-ठाण्याच्या पलिकडे अस्तित्व नसलेला पक्ष भाजपमुळेच महाराष्ट्रात पोहोचला. हे भाजपचे शिवसेनेवर उपकार आहेत. १९८० मध्ये सेनेचे शून्य आमदार होते व १९८५ मध्ये फक्त १. तीच संख्या १९९० मध्ये ५२ वर पोचली ती भाजपच्या उपकारांमुळे. १९६६ मध्ये स्थापना होऊन सेनेला आपला पहिला खासदार निवडून आणायला २३ वर्षे लागली आणि ते सुद्धा भाजपच्या मदतीने. १९७९ मध्ये इंदिरा काँग्रेसबरोबर युती असून व इंदिरा गांधींची प्रचंड लाट असूनसुद्धा सेनेला एकही खासदार निवडून आणता आला नव्हता. भाजपबरोबर युती केली नसती तर शिवसेना २-४ आमदारांच्या पलिकडे गेली नसती. आपली ताकद किती आणि फुसका आव आणायचा किती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

जशी शिवसेना एकटी निवडणुक

प्रसाद१९७१
गुरुवार, 10/30/2014 - 19:01 नवीन
जशी शिवसेना एकटी निवडणुक लढलेली आहे, तसा भाजप आणि इतर पक्षही एकटेच लढलेले आहेत. पण त्यापैकी कोणीच स्वतःचे एवढे कौतुक करत नाहीय्ये.>>>>>>>>>> गुरुजी ते कौतुक नापास होईल असे वाटलेला मुलगा काठावर पास झाला तरी त्याचे जसे होते तश्या प्रकारचे कौतुक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

या परिच्छेदातून प्रस्तुत

विजुभाऊ
गुरुवार, 10/30/2014 - 10:43 नवीन
या परिच्छेदातून प्रस्तुत प्रतिसाद देणार्‍यास नक्की काय म्हणायचे म्हणायचे आहे हे कोणी समजावून सांगितल्यास त्या मिपाकराला माझ्याकडून एक व्हेज लार्ज पिझ्झा आणि पेप्सीची पार्टी नक्की. पण त्यासाठी त्या मिपाकराला माझ्याकडे यावे लागेल Smile
मी येतो. तुम्हाला ते समजावून साम्गण्याचा प्रगत्न करतो. तुम्हाला समजले नाही तर? ( .... अर्धा पिझ्झा आणि अर्धी पेप्सी हे तरी अ‍ॅशुअर करा क्लिन्टन शेठ उगाच सगळं ऐकून नंतर समजलं नाही म्हंटला तर गेले किनई आमचा अर्धा दिवस + लोकलचे .रीक्षाचे भाडे वाया ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

जरूर

क्लिंटन
गुरुवार, 10/30/2014 - 10:55 नवीन
जरूर. त्या निमित्ताने तरी विजूभाऊ माझ्याकडे आले तर चांगलेच आहे म्हणा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

+१

आजानुकर्ण
Tue, 10/28/2014 - 18:38 नवीन
सहमत! उत्क्रांतीच्या काळात माणूस कंदमुळं खायचा. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्यामुळं कंदमुळांची खाद्यसंस्कृती नष्टच झाली की! तेच थालीपीठ, मांडे, पुरणपोळ्यांचं होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

अगदी हेच लिहिणार होतो.

सतिश गावडे
Tue, 10/28/2014 - 21:12 नवीन
अगदी हेच लिहिणार होतो. अन्नाचा उद्देश शरीराला त्याची कामे करण्यासाठी ऊर्जा पुरवणे हा आहे. त्याला संस्कृती वगैरे बनवणे ही माणसाच्या सुपिक मेंदूची करामत आहे. तेच भाषेचं. संवाद महत्वाचा. भाषा नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

तसा तुम्ही जिल्बी टाकुनपण

टवाळ कार्टा
Tue, 10/28/2014 - 19:10 नवीन
तसा तुम्ही जिल्बी टाकुनपण काही शष्प फरक पडत नाहीच की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

नाही दिसले हे पदार्थ, तर काय

विजुभाऊ
Tue, 10/28/2014 - 19:38 नवीन
नाही दिसले हे पदार्थ, तर काय फरक पडतो.
तुम्ही फक्त खाण्याचेच पदार्थ पाहिले. सण, रीती नाही पाहिल्या. असो. अर्थात मी नसल्यावर भाषा किंवा संस्कृती किंवा हा देश किंवा पृथ्वी सुद्धा असली काय नसला काय राहिली की कसलाच फरक पडत नाही. तुमच्या प्रतिसादाला उत्तर देणे हे देखील तितकेच खरे व्यर्थ टंकणश्रम. त्यामुळे भाषेला कसलाच फरक पडणार नाहिय्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

आयला वीजूभाऊ - तुम्ही तर महान

प्रसाद१९७१
Wed, 10/29/2014 - 09:56 नवीन
आयला वीजूभाऊ - तुम्ही तर महान भारतीय संस्क्रुतीतील अस्पृष्यता, सती जाणे, हूंडा, बालविवाह ह्या सर्व रीतींना सॉलीड मिस करत असाल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अवांतर-

यसवायजी
Tue, 10/28/2014 - 18:16 नवीन
अवांतर- बाकीचे पदार्थ खाल्लेत. हे "म्हाद्या" काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

"म्हाद्या " ही भरपूर कांदा

विजुभाऊ
Tue, 10/28/2014 - 19:41 नवीन
"म्हाद्या " ही भरपूर कांदा घालून केलेली शेम्गदाण्याची भाजी किंवा भरपूर शेम्गदाणे घालून केलेली कांद्याची भाजी असते. खासकरून सातारा भागात ही गावरान भाजी एकदम फेमस आहे. उसाची वारी केलेल्या अन नावालाच सातारचे सांगणाराना हे माहीतच नसेल. अर्थात त्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

रेसीपी टाका हो.

काळा पहाड
Wed, 10/29/2014 - 12:46 नवीन
रेसीपी टाका हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अनिल अवचट यांचं ' छंदांविषयी

बोका-ए-आझम
Wed, 10/29/2014 - 07:23 नवीन
अनिल अवचट यांचं ' छंदांविषयी ' नावाचं पुस्तक आहे. त्यात स्वयंपाकाविषयी जे प्रकरण आहे त्यात त्यांनी महाद्याची कृती दिलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

जरा इच्चार करीसन फेका दादा.

आनंदी गोपाळ
Tue, 10/28/2014 - 20:48 नवीन
अपल्याला माहीतही नसलेल्या अनेक आदिवासी भाषा आज आस्तित्वातच नाहीत उदा : पावरी ,वाडवली , अहिराणी , वडारी , ज्या भाषा नष्ट झाल्या त्या भाषीक लोकांची संस्कृती नष्ट झाली.
बठ्ठा खानदेश आहिरानामा बात करंस, पावरी आठे सातपुडामां पावरा लोके बोलतंस. वड्डर लोकेस्नी भासा बी तितलीच जित्ती शे. आन तुम्ही आठे सोंस्कृतीना बाता करी र्‍हायनात? १. उदाहरणे नीट द्या. २. आधी संस्कृती नष्ट होते. नंतर भाषा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हे आणखी एक. तिथलंच.

आनंदी गोपाळ
Tue, 10/28/2014 - 20:50 नवीन
उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील.
पोवाडा नावाचा सांस्कृतीक सण?? डब्लू टी एफ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

हा हा हा, अगदी अगदी

बॅटमॅन
Wed, 10/29/2014 - 11:03 नवीन
हा हा हा, अगदी अगदी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

भाषेची निर्मिती का झाली ?

पिंपातला उंदीर
Tue, 10/28/2014 - 13:39 नवीन
भाषेची निर्मिती का झाली ? तर संवाद साधण्यासाठी . मग तो संवाद कसा होतो हे महत्वाचे . तो कुठल्या भाषेतून होतो ते फारसे महत्वाचे नाही . मराठी वर प्रेम असणे वेगळे आणि तिची अस्मिता वैगेरे ठोकळेबाज कल्पनांच्या आहारी जाण वेगळ . शेवटी भाषा (फ़क़्त संवादाच माध्यम म्हणून ) महत्वाची कि ती वापरणारा माणूस जास्त महत्वाचा हा preference नक्की झाला तर भाषेमुळे नसलेले प्रश्न उकरून काढून स्वतहाच्या पोळ्या भाजणार्या लोकांची दुकान बंद होतील
  • Log in or register to post comments

मला वाटले होते की माझ्या

प्रसाद१९७१
Tue, 10/28/2014 - 13:44 नवीन
मला वाटले होते की माझ्या प्रतिसादामुळे एकदम अस्मिताखोरांचा हल्ला होइल माझ्यावर, पण पिंउ आणी बोएआ ह्यांच्या प्रतिक्रीया वाचुन बरे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

अरेरे.... तसं सुचवायचं होतंत

वेल्लाभट
Tue, 10/28/2014 - 15:27 नवीन
अरेरे.... तसं सुचवायचं होतंत :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

मराठी अस्मिता हे एक भोंगळ

विजुभाऊ
Tue, 10/28/2014 - 13:40 नवीन
मराठी अस्मिता हे एक भोंगळ प्रतीक आहे. बीहारी / युपी च्या लोकांची दादागिरी हसत खेळत सहन करणे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? उगाचच हिन्दी भाषेला राष्ट्रभाषा म्हणवत हिन्दी पखवडा साजरा करणे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? कर्नाटक सरकारने / तामिळनाडू सरकारने भाषेची सक्ती केली तर त्या विरुद्ध कोणीच काही बोलायचे नाही मात्र मराठीचा आग्रह धरला तर मात्र तो राष्ट्रदोह मानायचा म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? मराठीला इंग्रजी पेक्षाही हिन्दी भाषेकडून गिळंकृत होण्याचा धोका आहे हे स्पष्ट दिसत असूनही ते मान्य करायचे नाही म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? "गर्व " हा शब्द हिन्दी भाषेतील अर्थाप्रमाणे मात्र मराठीत चुकीच्या अर्थाने वापरायचे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? ( उदा: "गर्वाचे घर खाली" )
  • Log in or register to post comments

मराठीचे हिंदीचं आक्रमण होतंय

बोका-ए-आझम
Tue, 10/28/2014 - 14:37 नवीन
मराठीचे हिंदीचं आक्रमण होतंय तसं हिंदीवरही मराठीचं होतंय की! जिला मुंबैया हिंदी म्हणतात ती ऐकलीय तुम्ही? कोणत्याही अस्सल हिंदीभाषिकाचा नक्षा उतरतो ती ऐकली की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

हिंदी पखवाडा

अन्या दातार
Fri, 10/31/2014 - 14:57 नवीन
हिंदी पंधरवड्याच्या बाबतीत तुमची माहिती थोडी कमी असावी कदाचित असे दिसत आहे. भारत सरकारच्या धोरणानुसार सर्व केंद्रसरकारी खाती, बँका, महामंडळे, कंपन्या (पीएसयु) यांना हिंदी भाषेच्या प्रसारार्थ काही अ‍ॅक्टीव्हिटीज चालवणे बंधनकारक असते. त्याचा तिमाही, सहामाही व वार्षिक अहवालही देणे बंधनकारक आहे. या सर्वाचा मराठी अस्मितेशी संबंध जोडणे सर्वथा चूक आहे. महाराष्ट्र सरकारला अथवा कोणत्याही राजकीय, बिगर राजकीय पक्षाला त्यात काहीही बदल करता येत नाही. अजून एकः महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतील कंपन्या, महामंडळे, खाती, यांना वरील गोष्टी लागू नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

अस्मितावाद्यांनी जरा हा लेख वाचावा!

बोका-ए-आझम
Tue, 10/28/2014 - 14:34 नवीन
http://m.loksatta.com/lokrang-news/youth-voters-not-interested-in-identity-politics-1034904/?SocialMedia
  • Log in or register to post comments

वाचला. उत्तम आहे.

वेल्लाभट
Tue, 10/28/2014 - 15:19 नवीन
ही लिंक देणा-यांनी धागा नीट वाचलेला दिसत नाही. धाग्यातील सूर लेखातील सुरापेक्षा फार वेगळा नाही आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

धागा अस्मितेचा पुरस्कार करतोय

बोका-ए-आझम
Tue, 10/28/2014 - 15:30 नवीन
धागा अस्मितेचा पुरस्कार करतोय आणि लेख अस्मितेचं राजकारण संपुष्टात आलंय असं म्हणतोय. दोन पूर्ण वेगवेगळे मुद्दे आहेत. फारसा फरक नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

यातून आणि इतर मुद्द्यांतून जे म्हणायचंय ते कळलं नसेल तर....

वेल्लाभट
Tue, 10/28/2014 - 15:55 नवीन
आता वास्तविक हा असा प्रकार कालबाह्य झाला आहे. पक्षांसाठी भाषिक मुद्द्यावर निवडणुका लढवणं योग्य राहिलेलं नाही आणि लोकांनी कुण्या राजकीय पक्षावर 'आपल्या' भाषेची अस्मिता जपण्याकरिता अवलंबून रहाणं योग्य राहिलेलं नाही. पुढे गेलंय सगळं आता. दोन दशकांपूर्वी जेंव्हा एका पक्षाने मराठी माणसाचं सबलीकरण केलं, तेंव्हा त्यासाठी तो काळ योग्य होता. पण आता जेंव्हा इतर पक्ष विकासाची कास धरत आहेत, ती लोकांच्या बुद्धीला पटत आहे, तेंव्हाही हे योग्य ठरेल ही शक्यता कमीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अस्मितावाद्यांनी जरा हा लेख वाचावा!

बोका-ए-आझम
Tue, 10/28/2014 - 14:34 नवीन
http://m.loksatta.com/lokrang-news/youth-voters-not-interested-in-identity-politics-1034904/?SocialMedia
  • Log in or register to post comments

मराठी

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 10/28/2014 - 15:03 नवीन
बस स्टॉपवर उभे राहून स्पष्ट मराठी बोलणे ठीक आहे पण त्यापेक्षा मुंबईतल्या,राज्यातल्या मराठी ग्रंथसंग्रहालयांची काय अवस्था आहे? शाळांची काय अस्वस्था आहे?स्वतःची अस्मिता जपण्यासाठी दुसर्यांचा मत्सर करावाच लागतो का? मराठी अस्मितेच्या नावाने राजकारण करणार्यांनी स्वतःची मुले मात्र डॉन बॉस्को,बॉम्बे स्कॉटिशला घातली.किती मराठी चांगल्या कादंबर्यांची ईतर भाषांत भाषंतरे झाली? नरेण्द्रने गुजरातमध्येही गुजराती अस्मिता चेतवली पण आर्थिक्,पर्यटनाच्या माध्यमातून.देशभरात त्याचे स्वागत झाले. आता नविन सरकारातले लोक काय करतात ते पाहू.
  • Log in or register to post comments

अगदी बरोबर.

वेल्लाभट
Tue, 10/28/2014 - 15:20 नवीन
अगदी बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

चेन्नैतील मल्याळी अस्मिता ही

असंका
Tue, 10/28/2014 - 15:21 नवीन
चेन्नैतील मल्याळी अस्मिता ही काय भानगड आहे?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा