Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विकास on Tue, 09/30/2014 - 00:07
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिक्रिया
बातमी
अनुभव
Modi in America
सा रम्या नगरी महान्सनृपतिः सामन्तचक्रं च तत् । पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ॥ उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः .... कालाय तस्मै नमः ।
आज, वरील सुभाषित, वर्तमानाचे भान ठेवत काही शब्द बदलून, मराठीत, "ते रम्य शहर, ते पंतप्रधान, ते मंत्री आणि लोकप्रतिनिधी, पार्श्वभूमीवर ती विद्वानांची सभा, त्या चन्द्रमुखी युवती, तो तरूणांचा घोळका, ते भाटचारण तसेच माध्यम प्रतिनिधी आणि त्यांच्या कथा, हे सर्व पहात असताना परत परत कालाय तस्मै नमः," असे म्हणावेसे वाटत आहे. २८ सप्टेंबर २०१४ - न्यूयॉर्क आणि एकूणच अमेरीकेतील अनिवासी भारतीयांसाठी एक आठवणीत राहील असा दिवस ठरला आहे. बास्केट बॉल, आईस-हॉकी, महम्मद अली सारखे बॉक्सर्स, ब्रुस स्प्रिंगस्टीन सारख्यांच्या कॉन्सर्ट्स यांनी भरून जाणारे हे स्टेडीयम काल (२८ सप्टेंबरला) भारतीयांनी भरून गेले होते. ह्या स्टेडीयमच्या इतिहासात नक्कीच पण किंबहूना एकंदरीतच अमेरीकेत एखाद्या बाहेरील राष्ट्रप्रमुखाचे त्याच्या देशातील मूळ रहीवाशांनी केलेल्या एव्हढ्या मोठ्या स्वागताचा हा पहीलाच प्रसंग असावा. एकूण ४०८ विविध भारतीय संस्थांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे तिकीट मोफत होते. पण त्यासाठी आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आणि कुठल्या संस्थेकडून करत आहात हे सांगणे गरजेचे होते. रजिस्ट्रेशन नंतर प्रत्येक नावाची खात्री केली गेली आणि नंतर प्रिंटेड तिकीट दिले गेले. Ticket सगळ्यांना न्यूयॉर्कला येणे शक्य नव्हते, विशेष करून विद्यार्थ्यांना त्यामुळे १९ राज्यांमधल्या ४५ विद्यापिठांमधल्या भारतीय विद्यार्थी संघटनांनी थेटप्रक्षेपणा एकत्रित पहाण्याची विशेष व्यवस्था केली होती. तुमच्यातल्या अनेकांनी देखील हा कार्यक्रम इंटरनेटद्वारा पाहीलेला असू शकतो. पहाटे चार वाजता बॉस्टनहून निघालो आणि पार्कींग वगैरे मिळून सव्वा आठच्या दरम्यान मॅडीसन स्क्वेअर गार्डनच्या बाहेरच्या आवारात पोचलो तर मैलभर किंवा त्याहूनही मोठी रांग! सुरवातीस मोठी रांग पाहून सुरक्षेतून वगैरे वेळेत पोचू का अशी शंका होती पण व्यवस्था चांगली होती हे अनुभव आल्यावर समजले! Line १८,००० जागांचे हे स्टेडीयम भरले होते. त्यात अक्षरशः अबालवृद्ध, विविध भाषिक भारतीय, विविध धर्मिय, पंथीय दिसले. भारतात असताना भाजपाचे पारंपारीक समर्थक असलेले जसे यात होते तसे अगदी भाजपाचे पारंपारीक समर्थक नसलेले देखील होते. पण यातील प्रत्येकाला मोदींमुळे काही चांगले बदल घडतील अशी आशा किंबहूना खात्रीच आहे असे जाणवत होते. Crowd Crowd आत प्रवेश केल्यावर प्रत्येक तिकीटास एक अशा पध्दतीने एक टिशर्ट देण्यात आला. लहानसे अमेरीकन आणि भारतीय झेंडे पण वाटणे चालले होते. त्या झेंड्यांमध्ये काठी/काडी नव्हती. का? तर सुरक्षा म्हणून! याची अंमळ गंमत वाटली! मोदी ११:३० ला येणार होते. त्या आधी आत बसलेल्या मोठ्या जनसमुदायास खिळवून ठेवण्यासाठी स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम झाले. नंतर कविता कृष्णमुर्ती यांनी काही गाणी म्हणली. ह्यातील एका गाण्याच्या वेळेस एक अमेरीकन चित्रकाराने रंगाचे फराटे मारत ज्या पद्धतीने मोदींचे चित्र काढले ते प्रत्यक्ष बघताना खूपच आवडले. जनतेने त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. मिस अमेरीका २०१४४ निना दावुलूरी आणि अमेरीकेतील पब्लीक ब्रॉडकास्टींग स्टेशनचा वृत्त निवेदक हरी श्रीनिवासन हे कार्यक्रमाचे संयोजन करत होते. वातावरणात प्रचंड उत्साह दिसत होता. potrait मनोरंजनाचे कार्यक्रम झाल्यावर स्टेजवर अमेरीकन राजकीय नेत्यांना बोलावण्यात आले. त्यात जवळपास ३० सिनेटर्स, काँग्रेसमेन आणि साउथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर (भारतीय वंशाच्या) निकी हिली असे सर्व स्टेजवर आले. त्यांच्या उपस्थित मग मोदींचे स्वागत झाले! Welcome नंतर अमेरीकन आणि भारतीय राष्ट्रगीताने अधिकृत कार्यक्रमाची सुरवात झाली. Welcome National Anthem National Anthem मोदींच्या भाषणात एकाच वेळेस भारतीय, अनिवासी भारतीय आणि अमेरीकन राज्यकर्ते, धोरणकर्ते तसेच उद्योजक यांच्याशी संवाद करण्याचे कौशल्य जाणवले. भाषण केवळ गोडगोड नव्हते तर देश घडवण्यासाठी प्रत्येकाकडून सहकार्य मिळवण्याचे आवाहन त्यात होते. भाषण पूर्णपणे हिंदीत झाले. पण क्षणार्धात भाषांतर करून ते स्क्रीन वर सबटायटल म्हणून दाखवले जात होते. तसेच, स्वतः मोदी जनतेला भावेल अशा शब्दात बोलत असताना देखील त्यांच्या कौतूकाने ओतप्रोत भरलेल्या प्रसंगात देखील पाय जमिनीवरच ठेवून होते असे त्यांच्या हालचालींवरून समजू शकत होते. Thank you! कार्यक्रमानंतर अनेकांशी संवाद झाला तसेच फेसबूक अपडेट्स पाहीले. यातील अनेक जण हे कधीच भाजपाचे नव्हते, मोदींचे असण्याचा प्रश्नच नाही... पण तरी देखील यातील प्रत्येकास/प्रत्येकीस देशाला नेतॄत्व मिळाले असे वाटत होते. मोदींच्या खांद्यावर अपेक्षांचे मोठे ओझे आहे. त्यांच्या बोलण्यातून आणि जे काही बातम्यातून वाचले जात आहे त्यातून सतत काहीतरी वेगळा विचार आणि त्याबरोबर सक्रीयता दिसत आहे. जर हा आलेख सकारात्मक वाढत राहीला तर जनता केवळ मोदींवरच खुश होईल असे नाही तर जो काही राज्यकर्ते, सरकार या बद्दलचा भ्रमनिरास झालेला आहे, भारतीय व्यवस्थेबद्दल नैराश्य आले आहे, त्यातून बाहेर पडू शकेल असे वाटते. ते तसेच व्हावे अशी मनोमन प्रार्थना! माझ्या दृष्टीने स्टेजवर झालेले मोदींचे स्वागत, हे कार्यक्रमाचे एकाअर्थी शिखर होते. Welcome ज्या माणसाला मुळच्या त्याच्याच देशातील असलेल्या व्यक्तींनी राक्षस ठरवण्याचा प्रयत्न केला आणि अमेरीकेतील कधिही न वापरल्या गेलेल्या एका कायद्याचा वापर करत अमेरीकन सरकारला असलेला व्हिसा रद्द करायला लावला आणि जे अमेरीकन सरकारने देखील ऐकले, त्या माणसास आज त्याच्याच देशातील जनतेनी निर्विवाद बहुमताने निवडून दिल्यावर अमेरीकन राज्यकर्ते केवळ व्हिसाच देण्यास उभे नव्हते तर स्वागतासाठी एका कम्यिनिटी इव्हेंटमधे हजेरी लावत होते! ह्यात मोदींची प्रतिमा जशी स्पष्ट दिसत होती तशीच "मोदी भक्त" नाही तर मोदींनी घेतलेल्या आव्हानाचे आणि कार्याचे समर्थक असलेल्या अनिवासी भारतीयांचे अमेरीकेतील राजकीय सामर्थ्य देखील दिसू शकले. हे केवळ "कालाय तस्मै नमः" आहे, का बारा वर्षे आतून बाहेरून सर्व निंदानालस्ती मुकाट्याने सहन करून, "अधिष्ठान, अहंकार, तशी विविध साधने, वेगळ्याला क्रिया नाना" आचरून, "पाचवे असलेले दैव" स्वकर्तुत्वाने मिळवले? हा एक चर्चचा मुद्दा होऊ शकतो. यात मोदी समर्थक अथवा विरोधक हा मुद्दा नाही. त्यांचे पंतप्रधान म्हणून कार्य जोखणे चालूच राहील आणि राहीले पाहीजे देखील! त्यांचे काही निर्णय आवडतील अथवा काही पटणार नाहीत... ते सर्व येणार काळ ठरवेल... पण एक माणूस सर्व जग विरुद्ध असताना देखील त्या अंगावर येणार्‍या लाटेवर कसा स्वार होऊ शकतो याचे निरीक्षण करण्याचा हा मुद्दा आहे आणि त्यातून आपल्या सर्वांनाच आपापल्या ठिकाणी बरेच काही शिकण्यासारखे आणि स्फुर्ती घेण्यासारखे आहे!
  • Log in or register to post comments
  • 28621 views

प्रतिक्रिया

Submitted by स्रुजा on Wed, 10/01/2014 - 02:23

In reply to निरीक्षणे by विकास

Permalink

अजून एक गोष्ट जाणवली:

अजून एक गोष्ट जाणवली: अनेकांसाठी मोदींचा हा कार्यक्रम म्हणजे जुन्या कडवटपणाला आलेले एक प्रकारचे closure होते. अमेरीकास्थित डाव्या विचारवंत आणि चळवळ्या व्यक्तींनी गुजरात दंगलीचा गैरवापर करून केवळ मोदींनाच बदनाम केले नव्हते तर इथल्या सामान्य जनतेला जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंदू संघटनांशी संलग्न असतील त्यांना देखील बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता (guilt by association). जर मोदींना व्हिसा न मिळणे हे ह्या (मूळच्या भारतीय) डाव्यांसाठी विजय होता तर मोदींचे जिंकणे, सन्मानाने इकडे येणे हे इथल्या तमाम भारतीय जनतेसाठी वर म्हणल्याप्रमाणे closure होते. विविध क्षेत्रातील आणि आचार-विचारांच्या भारतीयांच्या ४०८ संघटना जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा आत्तापर्यंत फुटीचे समाजकारण करणार्‍या येथील (मूळच्या भारतीय) डाव्यांना मिळालेले सकारात्मक उत्तर होते.
+१००
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Wed, 10/01/2014 - 08:22

In reply to निरीक्षणे by विकास

Permalink

आक्षेप

"अमेरीकास्थित डाव्या विचारवंत आणि चळवळ्या व्यक्तींनी गुजरात दंगलीचा गैरवापर करून..." हे "अमेरीकास्थित डाव्या विचारवंत आणि चळवळ्या व्यक्तींनी गुजरात दंगलीचा गैरवापर करून..." असे असावे.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 10/01/2014 - 01:50

In reply to वा! थोडक्यात परंतु नेमके मुद्दे विचारात घेणारा वृत्तांत. by चतुरंग

Permalink

धन्यवाद +

अमेरिकास्थित भारतीयांच्या मदतीने मोदींनी त्यांचा ब्रँड अगदी ताकदीने सादर केला. आजकालच्या मार्केटिंगच्या जमान्यात तुमचा छाप उमटेल अशा पद्धतीने तुम्ही सादरीकरण करणे गरजेचे झाले आहे त्याचे भान मोदींनी ठेवले. जिथे स्वतःच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत मोदींच्या व्हिसाकडे दुर्लक्ष करणारा ओबामापण, भले तोंड देखले असेल, पण स्वागत करताना मोदींना "केम छो" असे म्हणला तेथे मला नाही वाटत की, मोदींना ब्रँडींग आणि त्यात देखील अनिवासी भारतियांकडून करून घेण्याची गरज असावी. किंबहूना मोदींच्या राजकीय विरोधकांनी स्वतःचे इतके वाईट ब्रँडींग करून टाकले होते की मोदींचे काम सोपे झाले असावे! बाकी राजकीय ब्रँडींगची गरज ही कालातीत असावी असे रामदासांनी जेंव्हा संभाजीस पत्रामधून, "शिवरायाचे कैसे बोलणे । शिवरायाचे कैसे चालणे । शिवरायाचे सलगी देणे । कैसे असे । " असे समजावले, त्यातून समजते! :)
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Tue, 09/30/2014 - 20:02

Permalink

मी ही भाषण दूरदर्शन वर बघितले

मी ही भाषण दूरदर्शन वर बघितले होते. मोदींच्या भाषण मुळे दिल्लीच्या एका प्रसिद्ध रामलीला मैदान त्या दिवशी रिकामे राहिले. काही ठिकाणी रामलीला थांबवून मोदींचे भाषण दाखविले, आणि नंतर रामलीला. बाकी राजदीप सरदेसाई यांना पत्रकार म्हणावे कि नाही या बाबत अनेक शंका आहेत. त्यांच्या इतिहास बघा कसे ते पत्रकार बनले, सरकार दरबारात मान मिळविला. (....श्री ) पुरस्कार ही त्यांना मिळाला. खालेल्या मिठाला जगावेच लागेल न. आता मोदींचा दौरा फसला, हे दाखविणे शक्य नव्हते. मग मोदी प्रशंसक दुष्ट लोक आहेत, हे दाखविण्या साठी काही जुगाड करायचा होता. त्यांनी केला.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 10/01/2014 - 08:42

In reply to मी ही भाषण दूरदर्शन वर बघितले by विवेकपटाईत

Permalink

जाहीर विनंती...

पटाईत साहेब आणि ईतर.मान्यवरांस राजदीप सरदेसाई हे फड्तूस आणि पीत्+(भाडोत्री) पत्रकारिता करीत असले तरी त्यबद्दल मिपा-विचारवंत अवाक्षर काढणार नाहीत. याच राज्दीपची भलामण करणारा प्रतिसाद ब्लु प्रिंट धाग्यावर दिमाखात आहे यातच सारे काही आले.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 09/30/2014 - 20:15

Permalink

धन्यवाद...

सर्व वाचक-प्रतिसादकांचे आभार. खाली काही समान गोष्टींसाठी एकत्रित प्रतिक्रीया देण्याचा प्रयत्न करतो. सर्व प्रथम, माझे अभिनंदन करण्यासारखे काहीच नाही! :) १८,००० तला मी एक होतो. आधी जाणे जर अवघड होते म्हणून जाणार नव्हतो पण नंतर कार्यक्रमाची उत्सुकता वाढत गेली म्हणून नाव नोंदवले आणि लॉटरी सिस्टीम मध्ये तिकीट मिळाले! वरती स्टेडीयमच्या बाहेर झालेल्या (का मुद्दामून घडवून आणलेल्या?) तमाशाबद्दल चर्चा आलेली आहे. ती होणे साहजीकच आहे. पण माझ्या लेखी त्याकडे दुर्लक्ष केलेले उत्तम. असो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 09/30/2014 - 20:46

Permalink

मोदींनी भारत पूर्ण पाहिला आहे

मोदींनी भारत पूर्ण पाहिला आहे, वाचला आहे, अनुभवला आहे. बाळसेदार होण्यासाठी महागडे व्हेंटिलेटरात शिक्षण घेतलेले नाही. चायवाल्याशी टक्कर देण्यासाठी काहीजण आपापल्या पक्षात कोणी दूधवाला मिळतो का पाहताहेत त्यांची फारच कीव वाटते. लेखाच्या सुरवातीच्या काळ्या फळ्याचा उद्देश नाही कळला.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 09/30/2014 - 21:19

In reply to मोदींनी भारत पूर्ण पाहिला आहे by कंजूस

Permalink

काळा फळा नाही

काळा फळा नाही! तेथे स्टेडीयमचा पॅनॉरॉमिक फोटो आहे. दिसत नाही आहे का? मग बघावे लागेल...
  • Log in or register to post comments

Submitted by सखी on Tue, 09/30/2014 - 21:55

Permalink

लाईव वृत्तांत छानच लिहला आहे,

लाईव वृत्तांत छानच लिहला आहे, तुमचा नंबर लॉटरीत आल्याबद्दल अभिनंदन. पहीला पॅनॉरॉमिक फोटो मला तरी दिसतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 10/01/2014 - 03:40

In reply to लाईव वृत्तांत छानच लिहला आहे, by सखी

Permalink

दिसतोय .चुकलं.

दिसतोय .चुकलं.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 09/30/2014 - 21:58

Permalink

सुरेख वर्णन!

भाषण टीव्हीवर प्रत्यक्ष पाहिले. मोदी उत्तम वक्ते आहेत यात काही संशय नाहीच. इतर लोकांनी आता त्यांना शांतपणे काम करू द्यावे एवढीच अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Tue, 09/30/2014 - 22:38

Permalink

कविता मॅडम चा आवाज आणि

कविता मॅडम चा आवाज आणि वाइयोलिन बरोबरची तथा-कथित जुगलबंदी ही टीवीवर अत्यंत भेसूर वाटत होती (त्या आवाजात जन गण मन इतक ऐकायला बेक्कार वाटत होत) बर "वैश्णव जनतो भजन" जे काही वाईट री-मिक्स केल यव रे यॅव , मॅडमचा आवाज सहन केला असता पण नवरा आणि मुलाला त्यात घुसवून एकंदरीतच गाल-बोट लावले
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 09/30/2014 - 23:00

In reply to कविता मॅडम चा आवाज आणि by माझीही शॅम्पेन

Permalink

बाप रे! नवरा आणि मुलालाही

बाप रे! नवरा आणि मुलालाही घुसवले हे पाहिले नाही. संपूर्ण १ मिनिट कविताबाईंचे गाणे ऐकले. इतका वाईट आवाज ऐकवत नव्हता. बरे झाले पुढे पाहिले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Wed, 10/01/2014 - 09:48

In reply to बाप रे! नवरा आणि मुलालाही by रेवती

Permalink

मोदींचे राजकारण हे नव्या

मोदींचे राजकारण हे नव्या धाटणीचे आहेत , त्यांच्या सभा त्यांच्या समर्थकांची त्यांच्यासाठी केलेला निवडणुकीत आखीव रेखीव प्रचार हे आजवर भारतीयांनी प्रथमच अनुभवले. मनोरंजनाचे कार्यक्रम व मग भाषण हा फंडा आपल्या सर्वांसाठी नवीन आहे , व तो अनेकांना प्रथमदर्शनी आवडला नाही, मनोरंजनाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी भारतातून सुद्धा आल्या. माझ्यासाठी अमेरिकन अनिवासी भारतीयांनी त्यांच्या तर्फे प्रथमच एखाद्या भारतीय नेत्यासाठी जगाला थक्क करेल असे नितांत सुंदर आयोजन केले त्या बद्दल त्यांचे कौतुक वाटले , पुढच्या वेळीस अजून सुधारणेस नक्कीच वाव आहे. अमेरिकन महाराष्ट्र मंडळांचा ह्या कार्यक्रमात सहभाग होता का. तेथे काही वर्षापूर्वी गायन स्पर्धा त्यांच्या तर्फे घेण्यात आली होती पुढच्या खेपेस जेव्हा मोदी येतील तेव्हा स्थानिक अमेरिकन अनिवासी भारतीयांच्या कडून गाणे गायले गेले मोदींची हि अमेरिकन वारी खरे तर संयुक्त राष्ट्र संघात भाषण देण्यासाठी होती. ओबामा ह्यांनी त्यांच्याशी भेट घेण्याचे ठरवले व त्यास मोदी ह्यांनी रुकार दिला. जेव्हा काही वर्षाने मोदी फक्त अमेरिकेत पांढऱ्या घरात मुख्य अतिथी म्हणून येतील. तेव्हा अमेरिकन दोन्ही सभागृहात त्यांचे भाषण असेल तेव्हा त्यांचे अजून चांगल्या अनिवासी भारतीयांच्या सोबत कार्यक्रम करता येतील.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Wed, 10/01/2014 - 10:23

In reply to बाप रे! नवरा आणि मुलालाही by रेवती

Permalink

ज्याचे त्याचे मत

मला कविता कृष्णमूर्तींनी गायिलेले 'जन गण मन' अतिशय आवडले, त्यांजबरोबर श्री. सुब्रमण्यम ह्यांनी त्यांना केलेली साथही आवडली. एक नाविन्यपूर्ण व चांगला, जमून आलेला प्रयोग. जाता जाता, ती 'जुगलबंदी' आहे असे कशावरून ठरवले?
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 10/01/2014 - 18:23

In reply to ज्याचे त्याचे मत by प्रदीप

Permalink

मी नाही ठरवले.

मी नाही ठरवले.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Wed, 10/01/2014 - 19:57

In reply to मी नाही ठरवले. by रेवती

Permalink

बरोबर

तो प्रश्न 'माझीही शॅंपेन' ह्यांना उद्देशून होता.
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Sun, 10/05/2014 - 13:27

In reply to बरोबर by प्रदीप

Permalink

"जुगलबंदी" हा शब्द कदाचित

"जुगलबंदी" हा शब्द कदाचित चुकला असु शकतो , एखाद्या लाइव कार्यक्रमात जेव्हा गाण गातात त्या-वेळी सर्व सपोर्टिंग वाद्य-वादक हजर असतात , पण बाकी सर्व वाद्य-वादक हजर नसताना फक्त गायिका आणि वाइयोलिन वादक (मॅडमचे पती आणि मुलगा) वाजवित होते , ते जवळपास नुसतीच साथ न वाटता जुगलबंदी सारख भासले...
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 09/30/2014 - 23:25

In reply to कविता मॅडम चा आवाज आणि by माझीही शॅम्पेन

Permalink

अनेकांनी

अनेकांनी त्याबद्दल नापसंती दर्शवली. किंबहूना बहुतांशी लोकं हे केवळ मोदींना ऐकायला आलेले होते. त्यामुळे, मोठ्या रांगेतून आणि सुरक्षा व्यवस्थेतून आत गेल्यावर अचानक करमणुकीचे कार्यक्रम चालू असलेले बघून आवाक झाले होते. काहींना हा कार्यक्रम "मस्त झाला" असे देखील वाटले. ज्याची त्याची आवड, झालं! ;) माझ्यापुरते बोलाल तर मी एकूणच बाकीचे निरीक्षण करण्यात आणि लोकांशी बोलण्यात व्यस्त होतो. फक्त चित्रकाराचे चित्र काढणे चालू असताना मात्र पहावेसे वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Wed, 10/01/2014 - 01:57

In reply to कविता मॅडम चा आवाज आणि by माझीही शॅम्पेन

Permalink

घुसवले?

कविता कृष्णमूर्ती यांचे यजमान एल सुब्रमण्यम व्हायोलिनवादक हे कर्नाटक संगीतातील आदराने घेतले जाणारे नाव आहे. चित्रपटातील चार गाणी गाणाऱ्या कविताबैंच्या तुलनेत नक्कीच जास्त. http://en.wikipedia.org/wiki/L._Subramaniam बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Sun, 10/05/2014 - 13:30

In reply to घुसवले? by आजानुकर्ण

Permalink

तुम्ही म्हणता ते 100% खर आहे

तुम्ही म्हणता ते 100% खर आहे अस मी मानूनही जे काही पॅकेज प्रेज़ेंट केले गेले (सादर केले गेले) ते अगदी कर्ण-कर्कश्य होत..
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Wed, 10/01/2014 - 00:44

Permalink

वृत्तांत खूप आवडला. आम्ही

वृत्तांत खूप आवडला. आम्ही पण सकाळपासून times now वर सगळा लाईव बघत होतो. जे टीव्ही वर बघायला नाही मिळालं ते तुमच्या वृत्तान्ता मुळे कळलं . उत्साह बघून च फार छान वाटत होतं . अचानक काही तरी खूप छान होतंय असं सगळ्यांनाच फिलिंग आलं होतं. फक्त राष्ट्रगीत चालू असताना देखील आपल्यासमोर कॅमेरा आलाय म्हणून काही लोक हात हलवत होते ते अजिबात नाही आवडलं . मोदींनी ज्या पद्धतीने आपल्या ताकदीचं प्रदर्शन केलं ते पण फार आवडलं. एका समर्थ आणि महत्त्वाच्या देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसानी जसं वागायला, बोलायला हवं तसंच ते वागले बोलले. हसून खेळून यजमानांना त्यांच्याच पद्धतीचे (witty ) टोले लगावत आपल्या माणसांना "या आता परत" असं म्हणलं तर प्रत्यक्ष म्हणलं तर अप्रत्यक्षपणे सुचवून त्यांनी नांदी त च पुढच्या नाटकाची झलक दाखवली. भारताला आता किती गांभीर्याने बघायची गरज आहे हे या शक्ती प्रदर्शनातून फार छान मांडलं गेलं. आणि यात मोदींबरोबर आपल्या लोकांचं पण करावं तेवढं कौतुक कमी . भारतीय आपल्या देशाबद्दल किंवा राजकारणाबद्दल निरुत्साही असतात हा समज आपण खास करून अमेरिकेतल्या भारतीयांनी खोडून काढला. खुल्या दिलाने परत जायची पण तयारी दाखवली. यातले दहा टक्के पण कदाचित परत जाणार नाहीत पण ही उचंबळून येणारी भावना कमी महत्त्वाची नाही . आणि त्यांनी आपल्याबरोबर जो एक आखीव रेखीव कार्यक्रम बनवून आणलाय त्यात त्यांचं उद्दिष्ट सहज दिसून येतंय. CEO बरोबर भेटी गाठी , अनेक महत्त्वाच्या आणि काही अपारंपरिक फोरम्स चा जो काही सुरेख वापर करून घेतलाय त्या बद्दल त्यांचं , त्यांच्या PR टीम चं कौतुक च आहे ! आजच्या काळाच्या मागण्या आहेत या. आपल्या मेडिया चं पण काही अपवाद वगळता मला कौतुक वाटलं. आपल्याबद्दल असलेल्या उत्सुकतेचा आणि आपल्याला नकळत थर्ड वर्ल्ड म्हणून शेलक्या विशेषणात संबोधणार्या लोकांचा पण अत्यंत कौशल्याने वापर करून घेतला काही प्रोग्राम्स नी. त्या फोरम चा, त्यांच्याच मुद्द्यांचा वापर करून भारतातला नागरिक किती सजग आहे, आम्ही आमच्या साध्या आणि महत्त्वाच्या विषयांवर पण जागरूक पणे मत बाळगून आहोत आणि तुम्ही असाल अमेरिका पण बरोबरीने वागवणार असाल तर ठीक अन्यथा राम राम असा एकूण सूर प्रचंड भावला मला ! आज च्या आता व्हाईट हाउस मधल्या मीटिंग मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांनी मोदींना VIP च्या ही पलीकडची आणि नियमाबाहेर जाऊन आस्थेवाईक वागणूक दिली आहे . मार्टिन लुथर किंग मेमोरिअल मधली त्यांची क्लीप हे सरळ दाखवते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Wed, 10/01/2014 - 01:59

In reply to वृत्तांत खूप आवडला. आम्ही by स्रुजा

Permalink

+१

आम्ही आमच्या साध्या आणि महत्त्वाच्या विषयांवर पण जागरूक पणे मत बाळगून आहोत आणि तुम्ही असाल अमेरिका पण बरोबरीने वागवणार असाल तर ठीक अन्यथा राम राम असा एकूण सूर प्रचंड भावला मला !
असेच.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 10/01/2014 - 06:47

In reply to वृत्तांत खूप आवडला. आम्ही by स्रुजा

Permalink

+१ स्रुजा

सारा प्रतिसादच माझ्या मनातुनच आला आहे अस वाटल. आपण कोणासमोर उभे आहोत, त्यांचे ज्वलंत प्रश्न कोणते याची जाणिव, त्यांना तुम्ही स्वतःच्या पोटासाठी भटकताय अस न म्हणता, तुमच्यामुळे भारतिय ओळख वाढतेय अस सांगण. त्यांच्याकडुन सहकार्याची, सहभागाची अपेक्षा करण हे सगळच आपली भारतिय नाळ जपणार्‍या लोकांना भावणार होतं. लोकशाहीची भलावण करताना ते व्यवस्थीत स्पष्टीकरण देतात की ही लोक्जशाहीच आहे जिच्यामुळे मी एक महत्वाच स्थान मिळवु शकलो. भाषण आवडल नाही आवडल यापेक्षा या किंवा इतर कोणत्याही त्यांच्या भाषणाने किंवा इंटरव्ह्यु ने मनात काही आपल्याला झेपणारे विचार उमटत रहातात हे मला त्यांच यश वाटत.
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on Mon, 10/06/2014 - 23:02

In reply to +१ स्रुजा by स्पंदना

Permalink

भाषण आवडल नाही आवडल यापेक्षा

भाषण आवडल नाही आवडल यापेक्षा या किंवा इतर कोणत्याही त्यांच्या भाषणाने किंवा इंटरव्ह्यु ने मनात काही आपल्याला झेपणारे विचार उमटत रहातात हे मला त्यांच यश वाटत
अगदी नेमकेपणाने मांडलंस !!
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 10/01/2014 - 08:40

In reply to वृत्तांत खूप आवडला. आम्ही by स्रुजा

Permalink

अमेरिकन राष्ट्रपती भारतात

अमेरिकन राष्ट्रपती भारतात आल्यावर जशी मिडीयात हलचल असते तशीच व तितक्याच ताकदीची हलचल मोदींनी तिथे निर्माण केली ही बाब नक्कीच दुर्लक्षिण्यायोग्य नाही. त्याबद्द्ल त्यांचे कौतुक आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 10/01/2014 - 09:11

In reply to अमेरिकन राष्ट्रपती भारतात by ऋषिकेश

Permalink

वास्तववीक

जरी मला सहमत असे म्हणायला आवडले असते ;) तरी देखील या संदर्भात तसे म्हणावेसे वाटत नाही. एकंदरीतच अमेरीकन माध्यमे बाहेरच्यांना डोक्यावर घेत नाहीत (अनलेस तो त्यांना डोकेदुखी असला तर! :) ). तरी देखील भारतीय माध्यमांइतके नसले तरी इतर परराष्ट्रीय नेत्यांना मिळणार्‍या (अमेरीकेतील) प्रसिद्धीच्या तुलनेत अधिक प्रतिसाद मिळाला असे नक्की वाटते. पण ओबामा-मोदी भेटीच्या बातम्या तितक्याशा ठळक दिसल्या नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 10/01/2014 - 10:33

In reply to वास्तववीक by विकास

Permalink

ओबामा-मोदी भेटीच्या बातम्या

ओबामा-मोदी भेटीच्या बातम्या तितक्याशा ठळक दिसल्या नाहीत.
त्या भारतातही नाहियेत कारण या भेटीत काहि विशेष वेगळे असे घडल्यासारखे वाटले नाही. नेहमीचेच प्रोटोकॉल्स, नेहमीची भाषा. बरेचसे "सरकरी सपक"! ;) मिडीयासाठी "केम छो" वगळता काही मसाला नव्हता ;)
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Wed, 10/01/2014 - 16:03

In reply to ओबामा-मोदी भेटीच्या बातम्या by ऋषिकेश

Permalink

माझ्यामते गेल्या दहा वर्षात

माझ्यामते गेल्या दहा वर्षात दोन्ही देशात जी कटुता ,अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले होते ते दूर होणे गरजेचे होते म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघात भाषण देण्यात येणाऱ्या समस्त देशाच्या नेत्यांच्या मधून ओबामाने मोदी ह्यांना भेटीस बोलावले. खरे सांगायचे तर बुश प्रशासनाची चूक सुधारण्याची ओबामा प्रशासनाला नितांत गरज वाटत होती, म्हणूनच जपान ,भूतान , नेपाल किंवा चीन शी जसे मोदी ह्यांनी द्विपक्षीय चर्चा केली तशी अमेरिकेशी करण्याचा धीर ओबामा ह्यांच्याकडे नव्हता कारण आधी चीन व अमेरिकेतून गेल्यावर भारतात पुतीन येणार आहेत. म्हणूनच अमेरिकेने ही चर्चा सुरु केली , त्यांचे प्रमुख मंत्री हे ह्या आधी भारतात येउन मोदी ह्यांच्याशी नक्कीच हवापाण्याच्या गोष्टी केल्या नाहीत व जगभरातील प्रमुख अमेरिकेन कंपन्यांच्या प्रमुखांची मोदींनी साडी डिप्लोमसी केली नाही , भारतात १०० दिवसात १० वर्षाचे खरकटे निस्तरणे कठीण आहे अनेक राज्यात जेथे उद्योग धंदे होऊ शकतात तेथे भ्रष्ट नेते राज्यकर्ते आहेत त्यांना त्यांच्या खर्या घरात पाठवणे व उद्योगासाठी पोषक वातावरण तयार करणे ह्या साठी थोडा अवधी हवा पण पेरणी करण्या अगोदर जशी जमिनीची मशागत जरुरी असते, त्या प्रमाणे आपण देशात करत असलेली मशागत ह्या निमित्ताने अमेरिकेत मोदी ह्यांनी सादर केली. सध्या भारतात एक मॉम मंगळावर गेली तर एक तुरुंगात आता स्वामी म्हणतात तशी अजून एक मॉम नाताळ पर्यंत तुरुंगात जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 10/01/2014 - 16:35

In reply to माझ्यामते गेल्या दहा वर्षात by निनाद मुक्काम …

Permalink

सध्या भारतात एक मॉम मंगळावर

सध्या भारतात एक मॉम मंगळावर गेली तर एक तुरुंगात आता स्वामी म्हणतात तशी अजून एक मॉम नाताळ पर्यंत तुरुंगात जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही. मॉम ? हॅहॅहॅ... देश माता आहेत त्या ! ;) अधिक इकडे :- National Herald Case: HC to Hear Plea of Sonia, Rahul on November 3 The last gasp of National Herald, by Subramanian Swamy

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Wed, 10/01/2014 - 12:47

In reply to वृत्तांत खूप आवडला. आम्ही by स्रुजा

Permalink

मलापण

फक्त राष्ट्रगीत चालू असताना देखील आपल्यासमोर कॅमेरा आलाय म्हणून काही लोक हात हलवत होते ते अजिबात नाही आवडलं . मला पण नाही आवडले , रादर , चीड आली . क्यामेर्‍यासमोर येण्याची ही कसली लाजिरवाणी हौस ? क्रिकेट्च्या म्याचच्यावेळी देखील लोक असेच करतात. अरे , तुम्हाला बघतोय का ? क्यामेरामन ने सहज क्यामेरा फिरवला त्यात तुमचे काय कर्तृत्व? मूर्खांनो हात कसले हालवताय ? कार्यक्रमाला तुम्ही आलात म्हणजे काय ग्रेट आहात का ? आणखी एक खटकलेली गोष्ट - सार्‍या जगात बॉलीवूड प्रचंड आवडते ! अश्या कार्यक्रमाच्यावेळी तथाकथित देशभक्तिपर गाणी त्या कार्यक्रमाच्या उंचीची नव्हती असे खेदाने म्हणावेसे वाटले. बॉलीवूड वाल्यांनी अपवादानेच देशभक्तीपर गाणी / संगीत बनविले आहे. त्या दिशेने काही जाणिव पूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. ज्या पद्धतीचे चित्रपट आपण बनवतो ( ९९% लव्ह / सेक्स / गुन्हेगारी / आणि एकूणच भडकपणा ) ते काही भारतीय संस्कृतीचे खरे चित्रण नव्हे ! पूर्वी साप - गारुड्यांचा देश अशी ओळख होती , आता एखाद्याला भारतात लोक बागेत झाडांना आणि बायकांना मिठ्या मारतात किंवा एकमेकांना रक्तबंबाळ होईपर्यन्त मारतात .. असा गैरसमज झाला तर आश्चर्य वाटायला नको ! वास्तविक भारतीयांचा शृन्गार फार तरल आणि अतीव संवेदनाशील असतो, ते एक काव्य आहे. पण आ़ज बॉलीवूड मधले चित्रिकरण पाहीले तर त्रयस्थ माणसाचे काय मत होईल? असो खूपच विषयांतर झाले , कार्यक्रम फारच देखणा झाला , भारतीय म्हणून अभिमान वाटला.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Wed, 10/01/2014 - 16:26

In reply to मलापण by विटेकर

Permalink

जर हॉलीवूड चे सिनेमे पाहून

जर हॉलीवूड चे सिनेमे पाहून तुमची अमेरिकन समाजाविषयी अतिरंजित मत झाली असतील तर त्या न्यायाने तुमचे वरील विधान संयुक्तिक आहे, राजदीप सारखे अनिवासी भारतीयांच्या चुका काढण्यापेक्ष्या जरा मोठे व्हा , आज अमेरिकेत यहुदी समाजानंतर भारतीयांची मोठी लॉबी आहे.व भारत अमेरिका अणू करार असो किंवा इतर विषयात ह्या समाजाची मोठी भूमिका आहे. मोदी पर्वत अनिवासी व भारतामधील मुळात भक्कम असलेले संबंध एका नव्या उंचीवर जाणार आहेत. माझ्या मते युके ,मध्ये मोदी ह्यांचे असेच भव्य स्वागत तेथील अनिवासी समूहाकडे होईल ते भारतीयांच्या दृष्टीने एका वेगळ्या अर्थाने महत्त्वाचा आहे कारण भारतीय व पाकिस्तानी समाज राजकीय दृष्ट्या येथे अमेरिकेपेक्षाही जास्त सक्रिय आहे , विशेषतः अनेक पाकिस्तानी नेते व लष्करी अधिकारी ह्यांचे आर्थिक व इतर संबंध युके मध्ये आहेत तेथे मोदींचे भव्य स्वागत व तेवढाच प्रखर विरोध सुद्धा होईल थोडक्यात मस्त राडा होईल. पण मोदी ह्यांची युके व युरोप भेट नक्कीच महत्त्वाची आहे , त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 10/01/2014 - 11:13

Permalink

वा

वृत्तांत आवडला. ह्या आधी कुठल्या पंतप्रधानाला असा अतिभव्य प्रतिसाद मिळाला नसेल्.असो. आता भारत्-अमेरिका संबंध अधिक व्रुद्धिंगत झालेले बघाय्ला आवडतील्.तुमचा तो एच्-वन का एल्-वन व्हिसा मान्य होत नाही अशी ओरड नॅसकॉमसारख्या संघ्टना करीत असतात. अमेरिकन कंपन्यांना येथे व्यापार करणे फायदेशीर वाटते पण आपल्या सरकारचे आर्थिक निर्बंध जरा जास्तच असतात असे त्यांचे म्हणणे.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Wed, 10/01/2014 - 16:32

In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

आधी कुठल्या पंतप्रधानाला असा

आधी कुठल्या पंतप्रधानाला असा अतिभव्य प्रतिसाद मिळाला नसेल्.असो. वा माई क्या बात हे बाकी तुमचा मुद्दा योग्य आहे आपण आयटी चा तर अमेरिका डब्लू टी ओ चा मुद्दा काढणार. त्यांच्याकडे रिटेल चा भारतात प्रवेश व अण्वस्त्र करारारातील अमेरिकन कंपनींना दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारण्याची हमी घेण्याची सक्ती जी भाजपने आग्रहाने यु पी ए ला करार करतांना घ्यायला लावली टी उठवणे अश्या अनेक मागण्या आहे , माझ्या मते जगभरात अशी हमी इतरत्र कुठल्याही कंपन्या घेत नाहीत मग अमेरिकन कंपन्यांच्या वर हा अन्याय का असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 10/01/2014 - 17:22

In reply to आधी कुठल्या पंतप्रधानाला असा by निनाद मुक्काम …

Permalink

भोपाळ

भोपाळ दुर्घटनेच्या अनुभवामुळे असेल. हमी घेउन अपघात टाळता येणार नाहित पण सर्वोच्च काळजी घेण्याची हमी पाळली जाईल ( कारवाईच्या भितीने).
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Wed, 10/01/2014 - 17:28

In reply to भोपाळ by कपिलमुनी

Permalink

भोपाळ दुर्घटने साठी कुठल्या

भोपाळ दुर्घटने साठी कुठल्या भारतीयाला शिक्षा झाली सांगु शकाल का? युनियन कार्बाईड चे भारतीय पार्टनर पण होते आणि उच्च व्यवस्थापन पण भारतीय होते, एकाला तरी शिक्षा झाली का? एक अमेरिकन पळुन गेला, पण जर भारत भारतीयांनाच शिक्षा देवू शकत नसेल तर त्याच्या पळुन जाण्याबद्दल तक्रार करण्याला काय अर्थ आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Wed, 10/01/2014 - 11:51

Permalink

हिप्नॉटिस्ट

मोदींनी या देशाचे भले केले तर ते सर्वांना हवेच आहे. पण त्यांची प्रतिमा 'लार्जर दॅन लाईफ' होत चालली आहे असे वाटते. ते एक उत्कृष्ट वक्ते आहेत याच शंकाच नाही पण ते एक चांगले 'हिप्नॉटिस्ट' ही वाटतात.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 10/01/2014 - 11:59

Permalink

एक भारतिय म्हणून अभिमान

एक भारतिय म्हणून अभिमान वाटावा आणि छाती 56 इंच व्हावी अशी परदेश यात्रा !
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 10/01/2014 - 13:03

Permalink

विकास,

विकास, सविस्तर वृत्तांताबद्दल धन्यवाद! तुम्हाला मोदींचे भाषण प्रत्यक्ष ऐकावयास व बघावयास मिळाले याचा हेवा वाटतो. मोदींनी गेल्या ४ महिन्यात खूपच आशादायक सुरूवात केली आहे. पंतप्रधान झाल्याच्या भरात किंवा ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अजूनतरी कर्जमाफी, वीजबिल माफी, सवलती अशा कोणत्याही सवंग घोषणा केलेल्या नाहीत. ते एकंदरीत दीर्घकालीन फायदा होईल अशा योजना सुरू करण्याच्या मागे आहेत असं दिसतंय. त्यामुळे कोठे आहेत 'अच्छे दिन', 'महागाई कमी करणार होता त्याचं काय झालं?', लोकांना खोटी आश्वासने देऊन व स्वप्ने दाखवून मोदींनी फसविले अशा तर्‍हेची टीका विनाकारण विरोधी पक्ष करीत आहेत. मोदींच्या दुर्दैवाने यावर्षी पाऊस खूप उशीरा सुरू झाला (१५ जुलै नंतर). त्यामुळे तोपर्यंत बर्‍यापैकी भाव वाढले. एकदा वाढलेले भाव चटकन खाली येत नाहीत. तरीसुद्धा पेट्रोलचे भाव १६ मे नंतर जवळपास प्रतिलिटर रू. ६ ने कमी झाले आहेत. काश्मिरमध्ये आलेल्या अभूतपूर्व पूरपरिस्थितीत मोदींनी आपली 'आपत्ती व्यवस्थापन' या विषयातील कुशलता दाखवून दिली. परराष्ट्र धोरणात अमेरिका व जपान भेटीनंतर व चीनच्या भारत भेटीनंतर बराच सकारात्मक बदल झालेला दिसतोय. पाकिस्तानला मोदींनी आपल्या 'गाजर व काठी' या धोरणाने भानावर आणलेले दिसत आहे. अर्थव्यवस्था हलायला सुरूवात झाली आहे. एकंदरीत ४ महिन्यात खूपच आश्वासक सुरूवात झाली आहे. अर्थात या सर्व गोष्टींचे दृश्य परीणाम दिसण्यास २-३ वर्षे तरी लागतील. तोपर्यंत तरी जनतेने संयम बाळगावा अशी इच्छा व अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 10/01/2014 - 13:28

Permalink

आपल्या अनुभवचा हा वॄत्तांत

आपल्या अनुभवचा हा वॄत्तांत आवडला ! :) चित्रकाराने ते चित्र पहिल्यांदा उलटे काढुन नंतर सरळ करुन पूर्ण केले... :) अमेरिका स्थित हिंदूस्थानी नागरिकांचा आनंद,उत्साह तो सुद्धा आपल्या पंतप्रधानांसाठी आहे,व त्यांच्यासाठी ते इतकी गर्दी करु शकतात हे पाहुन मला स्वतःला फार आनंद वाटला. :) अमेरिका स्थित हिंदूस्थानी नागरिकांनी एका प्रकारे आपल्या पंतप्रधानांवर प्रेम आणि विश्वास प्रकट केला आणि त्यांच्या आपल्या पंतप्रधानांकडुन असलेल्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील हा विश्वास देखील प्रकट केला. पंतप्रधानांनी देखील मोकळेपणाने लोकांशी बोलले आणि भेटले देखील ! हा अनुभव अमेरिकास्थित हिंदूस्थानी नागरिकांसाठी अविस्मरणिय ठरला आहे. :) देवयानी खोब्रागडे प्रकरण झाल्यावर ताणले गेलेले संबंध नीट करण्यास अमेरिका देखील तितकाच पुढाकार घेत आहे हे या भेटीतुन जाणवले. दोन्ही देशांनी आपापले मुद्दे स्पष्टपणे मांडले आणि आपल्या पंतप्रधानांनी हिंदूस्थानची बाजु आणि त्याची गरज स्पष्ट केली,मग ते न्युक्लीअर डील असो, डिफेन्स कॉलॅबरेशन असो वा फुड सिक्युरिटी. देशाचे पंतप्रधान {काम सुरु केल्यापासुन} झाल्या पासुन मी १५ मिनीटांचा सुद्धा वेकेशन घेतला नाही हे मोदींचे सांगणे अनेक तरुणांना भावले. :) मोदींकडुन देशातील आणि परदेशातील लोकांच्या किती अपेक्षा आहेत हे मोदींना ठावुक आहे आणि त्यांच्यावर त्या पूर्ण करण्याची जवाबदारी सुद्धा आहे.भुतानपासुन अमेरिके पर्यंत प्रवास करुन सातत्याने गुंतवणुकीचा ओघ आपल्या देशाकडे ओढुन आणण्यात ते नक्कीच यशस्वी झाले आहेत. गुंतवणुकीचे करार /मदत इं झाले असले तरी लगेच कोणी चेक फाडुन पैसे वाटणार नाही, तर त्या मदती बद्धल / गुंतवणुकी बद्धल फायदा देखील मिळेल हे अर्थातच पाहिले जाइल, पण या घटनांनमुळे आधीच्या गुंतवणुकींना आणि होणार्‍या गुंतवणुकांना चालना मात्र मिळेल येव्हढे मात्र निश्चित सांगता येइल. आपले प्रंतप्रधान सातत्याने सकारात्मक बोलत आहेत,आणि त्यांची आता पर्यंतची कार्यशैली सकारात्मकच दिसुन येते. हे आपल्या देशासाठी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे,कारण महागाई / भ्रष्टाचार आणि आर्थिक अस्थिरते मधे अडकलेल्या आपल्या देशाला आणि देशातल्या नागरिकांना नकारात्मक मानसिकेतुन आणि विचारातुन बाहेर पडण्यास नक्कीच प्रेरणा मिळेल. हिंदुस्थानी मिडीयाने या घटनेचे जे काही कव्हरेज केले आहे त्यासाठी त्यांचे कौतुकच करायला पाहिजे,आजच्या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या युगात आपल्या देशाची बाजु आणि आपल्या पंतप्रधांची योग्य प्रतिमा उंचावण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले आहे. टाईम्स नाउ च्या अर्णब गोस्वामीचे विशेष कव्हरेज मनाला भावणारे आणि या घटनेचा अनेक दॄष्टीकोनातुन विचार करण्यास उद्युक्त करणारे ठरले. आता वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या बातम्या आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कशी केली जाते ते पाहणे आणि अनुभवणे रोचक ठरणार आहे, त्याची सुरुवात झाली आहे. Microsoft to set up 3 data centres in India by 2015 जाता जाता :- मोदींच्या भाषेतच सांगायच झालं तर... कोई चले या ना चले लैकिन देश चल पडा है ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games
  • Log in or register to post comments

Submitted by विनोद१८ on Wed, 10/01/2014 - 14:23

Permalink

....सहमत.....!!!!!!

एव्हढा समजुतदारपणा अजून तरी ना विरोधी पक्ष दाखवित आहेत ना त्या मिडीयाकडे दिसत आहे. दिसते ती केवळ आणि केवळ त्यांची मोदींबद्दलची असुया, मोदींचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे त्यांना आकलन झाले आहे का ?? याबद्दल मला शंका आहे. माझ्या मते 'एकटा मोदी' या सर्वांना ( तथाकथित बलहीन व भाकड विरोधक ) पुरून उरेल हे नक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Wed, 10/01/2014 - 17:10

Permalink

मोदी हे निओ-लिबरलांचे

मोदी हे निओ-लिबरलांचे अवतारपुरुष आहेत आणि ज्यांच्यावर काही काळाने रडण्याची वेळ येऊ शकते असे भारतवासीही त्यांच्या भजनात (फालतू धार्मिक अथवा राष्ट्रीय अस्मितेची अफू खाऊन) दंग आहेत. अमेरिकेत राहूनही अमेरिकेचं जहाज का डळमळतंय हे न कळणार्‍या आणि निरंतर डोळे दिपलेल्या अवस्थेत वावरणार्‍या भारतीयांबद्दल तर काय बोलायचं? तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 10/01/2014 - 17:22

In reply to मोदी हे निओ-लिबरलांचे by नगरीनिरंजन

Permalink

अमेरिकेत राहूनही अमेरिकेचं

अमेरिकेत राहूनही अमेरिकेचं जहाज का डळमळतंय हे न कळणार्‍या आणि निरंतर डोळे दिपलेल्या अवस्थेत वावरणार्‍या भारतीयांबद्दल तर काय बोलायचं? मी काय म्हणतो... याच्यावर सरळ एक वेगळा धागाच काढा ना ! तेव्हढीच आमच्या माहितीत नव्याने भर पडेल. अमेरिकेची सध्याची ही अवस्था आहे :- National debt is now $17.6T and the debt per citizen is over $55k. शिवाय चीन सुद्धा आता ओरडतोय म्हणे ! :- Debt risk, market turmoil threaten financial crisis

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Wed, 10/01/2014 - 18:16

In reply to मोदी हे निओ-लिबरलांचे by नगरीनिरंजन

Permalink

+१

मस्त प्रतिसाद. मोदींच्या आता पूर्णपणे कह्यात असलेल्या भारतीय प्रसारमाध्यमांनी या भेटीचा उदोउदो करणे आणि अमेरिकेतील माध्यमांमध्ये कुठेतरी कोपऱ्यात बातम्या येणे याच्या मध्ये कुठेतरी या भेटीचे योग्य श्रेय असावे. बाकी मोदींचे मार्केटिंग निर्विवादपणे चांगले आहे यात काहीच शंका नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विनोद१८ on गुरुवार, 10/02/2014 - 01:17

In reply to मोदी हे निओ-लिबरलांचे by नगरीनिरंजन

Permalink

........मोदी हे निओ-लिबरलांचे................

मोदी हे निओ-लिबरलांचे अवतारपुरुष आहेत आणि ज्यांच्यावर काही काळाने रडण्याची वेळ येऊ शकते असे भारतवासीही त्यांच्या भजनात (फालतू धार्मिक अथवा राष्ट्रीय अस्मितेची अफू खाऊन) दंग आहेत. हे कसे जरा अधिक स्पष्ट करा ?? अमेरिकेत राहूनही अमेरिकेचं जहाज का डळमळतंय हे न कळणार्‍या आणि निरंतर डोळे दिपलेल्या अवस्थेत वावरणार्‍या भारतीयांबद्दल तर काय बोलायचं? सध्या अमेरिकन अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर कोणत्या पातळीवर आहे ?? अगदी रसातळाला गेली आहे काय ?? "निरंतर डोळे दिपलेल्या अवस्थेत वावरणे" हि अमेरिकेत स्थायिक होण्यासाठीची पात्रता आहे का ??
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on गुरुवार, 10/02/2014 - 05:06

In reply to ........मोदी हे निओ-लिबरलांचे................ by विनोद१८

Permalink

रसातळाला गेली आहे काय ??

रसातळाला गेली आहे काय ??
छे छे, उलट अमेरिकन अर्थव्यवस्था २००८ पासून "रिकव्हरीच्या पाथवर" आहे आणि नवीन फ्रॅकिंग बूममुळे तर "एनर्जी इंडिपेंडंट" होणार आहे. आता तोच चमत्कार भारतातही मोदी घडवून आणणार आहेत.
अमेरिकेत स्थायिक होण्यासाठीची पात्रता आहे का ??
हाहाहा, कुठेही स्थायिक होण्यासाठी माणसाला पात्रता वगैरे असावी लागत नाही, लागू नये. पण अमेरिकेतल्या काही (डोळे दिपलेल्या वगैरे) भारतीयांना मात्र तसे वाटते. फक्त त्याच लोकांबद्दल ते वाक्य आहे. अमेरिकेतले सगळे भारतीय तसेच आहेत असे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 10/02/2014 - 07:43

In reply to रसातळाला गेली आहे काय ?? by नगरीनिरंजन

Permalink

मग त्यात काय बिघडलं?

जगाच्या इतिहासात प्रत्येक शक्तीशाली देशाचे आर्थीक वासे पोकळच होते, अजुनही असतात. त्यात चुकीचं काहिच नाहि. डॉलर अजुनही मजबूत आहे व कितीही चुका केल्या तरी अमेरीकेचं आजही कुणि काहि वाकडं करु शकत नाहि. त्यांचं ते निस्तरायला समर्थ आहेत कि. मोदिंना चमत्काराचे आव्हान देण्यापुर्वी देशाचं थोडं सिंहावलोकन करावं. गाळात रुतलेली अर्थव्यवस्था, घरबंध नसलेली लोकशाही, फसलेला समाजवाद, भरकटलेली(तशी कधि नव्हती म्हणा) लालशाहि, दलदलीत मनोरे बांधणार्‍या सो कॉल्ड एन.जी.ओं चा उच्छाद, गणराज्याला गणंगराज्य बदवायला तत्पत अशी राज्य सरकारे, लोकशाहिला खुशाल घराणेशाहीची दासी बनवणारे राज्यकर्ते... एक ना दोन, हजार फुकटच्या कटकटी तंगड्या मोडताय देशाच्या. जरा कुठे स्थिर सरकार येऊन ते काहि वेगळे प्रयोग करायला निघाले कि लगेच फु(क)टपट्ट्या घेऊन टिमक्या वाजवायला जनता तयार. रोचक आहे हा सगळा प्रकार.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on गुरुवार, 10/02/2014 - 17:46

In reply to मग त्यात काय बिघडलं? by अर्धवटराव

Permalink

मग त्यात काय बिघडलं?

मग त्यात काय बिघडलं?
काहीच नाही. बिघडण्याची वाट पाहू नये एवढंच. पण हिस्टेरिया झालेल्या लोकांना क्वचितच भौतिक वास्तवाचं भान असतं, त्यामुळे चालू द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on गुरुवार, 10/02/2014 - 18:20

In reply to मग त्यात काय बिघडलं? by नगरीनिरंजन

Permalink

+१

वास्तवाचं भान ठेवणं खरच गरजेचं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बंडा मामा on Wed, 10/01/2014 - 22:07

Permalink

मोदीजीन्चे भाषण कसे झाले हे

मोदीजीन्चे भाषण कसे झाले हे सगळ्यांनीच पाहिले. समर्थकाना आवडले, विरोधकांनही फारसे खुपले नाही ह्यातच सगळे आले. मला मात्र तिथे आलेले डाळ-ढोकळा छाप लोक आणि करमणु़कीच्या कार्यक्रमाच्या नावाखाली दाखवलेला भडक चीप प्रकार प्रचंड खटकला. भारतीय वन्शाचे अनेक सुप्रसिद्ध लोक असताना (जसे की सत्या नडेला, संजय गुप्ता, इन्द्रा नुयी, अतुल गावंडे, फरिद झकेरिया इ.इ.) इथे मिस अमेरिका बोलावुन हे हुल्लडबाजी करणारे, कॅमेरा दिसला की हावरटा सारखे हात हलवणारे हे लोक गोळा करुन एकंदरितच ह्या सो कॉल्ड 'एनाराय' कम्युनिटी विषयी मला हेच का ते हुशार लोक भारत सोडून गेलेले असा प्रश्न वेळोवेळी पडला. Image removed.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com