✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर !

ज
जॅक डनियल्स यांनी
Fri, 10/04/2013 - 09:57  ·  लेख
लेख
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे ! एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग. एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य ! एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी ! मनातलं एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार ! आपल्या मध्ये जसे (जाती-)जमाती प्रकार असतो,तसाच सापांमध्ये पण असतो. (अजून साप आपल्या एवढे प्रगत नाही म्हणून त्यांच्या मध्ये जाती नसतात.) नेपाळी गुरखा म्हणले की कसे "शलाम साब" डोळ्यासमोर उभे राहते, अंबानी म्हणले की "बिजिनेस" ऐकू येते आणि "गांधी" ऐकले की "राजकारण" दिसते, तसेच सापांचे पण असते. नाग हा "येलापिडे (Elapidae)" या ("सौथ इंडियन अण्णा") कुटुंबातील असतो, यामध्ये चष्मा नाग, राज नाग (किंग कोब्रा) ते आफ्रिकन मंबा आणि शेवटी मण्यार पर्यंत अनेक विषारी साप येतात. या सर्व बंधू भावांची वर्तणूक, त्यांचे विषाचे परिणाम साधारण पणे सारखेच असतात. पुण्यात जसे "घराच्या पत्त्यावरून" त्या कुटुंबाच्या स्वभावाचा किंवा वर्तनाचा अंदाज लावता येतो तसेच एकदा का 'येलापिडे' सापडला की पुढचे अंदाज बांधता येतात. म्हणूनच आधीच्या दोन्ही लेखात मी नाग आणि मण्यारची ओळख करून दिली आहे. त्याच प्रमाणे घोणस आणि फुरसे हे एकाच कुटुंबातील जत्रेत हरवलेले करन- अर्जुन आहेत (जमात: व्हायपरीडे-Viperidae) त्यामुळे त्यांचे दोघांचे स्वभाव,(हो सापांना पण स्वभाव असतात.) त्यांच्या दंश करण्याच्या पद्धती, लुक्स जवळपास सारखेच असते.
त्यातला घोणस म्हणजे सैन्यातील "स्नायपर" !(enemy at the gates मधला व्हासिली आठवा.)
घोणस (विषारी): सोनेरी-बदामी रंगावर काळपट ठिपक्यांची वेलबुट्टी, जसा काही पैठणीचा पदर काठ. तळपता बाण डोक्यावर रेखलेला आणि कॉलेज मधल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारे हार्ट-शेप डोके. घोणस घोणसाला, एका स्कॉटिश फिरंग संशोधकाने शोधून काढले म्हणून त्याला त्याचे नाव 'रसेल व्हायपर' (Patrick रसेल) दिले गेले. हा साप म्हणजे "अमेरिकन अपाची" हेलिकॉप्टर सारखा..सगळ्या अस्त्रांनी सज्ज आणि लपून राहण्यात पटाईत. खात्या पित्या घरचा साप, ग्राईप वाटर च्या जाहिरातीमधल्या बाळासारखा गुटगुटीत असतो. उगाचच झाडावर चढ,छपरात घूस असे उरफाटे प्रकार हा करत नाही. आपला गप गवतात लपून राहतो आणि डब्बा उडवायला कोणी आला की 'इस्टोप' करून टाकतो. अंगावरील नक्षी ही त्याला निसर्गाने दिलेले बर्थडे गिफ्ट आहे, त्यामुळे पिवळ्या पडलेल्या गवतामध्ये असला तर कधी कधी पाय पडे पर्यंत दिसत नाही. हा साप नागासारखा जंटलमन असल्याने, आधी वार्निंग द्यायला प्रेशर कुकर च्या शिट्टी सारखा खर्जातला सूर लावतो. त्या सुरात इतकी बेक्कार वार्निग असते की, जो तो सूर ऐकतो त्याला डायरेक्ट ए.मे.सी.बी च्या ट्रान्सफोर्मार वरची कवटी दिसते. "माझ्या सुरवातीच्या काळात, एका बांधकामाच्या कामचलाऊ गोदामात दोन घोणस असल्याचा कॉल होता. राजाभाऊंनी एक घोणस पकडून पिशवीत टाकला होता आणि मी दुसरा शोधात होतो. प्रेशर कुकर च्या शिट्टी सारखा आवाज येत होता आणि इतक्यात कोणीतरी गोदामाच्या छताचा सांधा हलवला आणि आख्खे छत खाली आले. धुराळा उठला, त्याच अंधारात मी टारझन सारखे दोन्ही हाताने छत पकडले. त्या धुराळ्यात तो प्रेशर कुकर चा आवाज येत होता पण मला काहीच दिसत नव्हते. तेंव्हा भीती वाटून पण उपयोग नव्हता, त्यांमुळे त्या आवाजाचा मी आध्यात्मिकपातळीवर ;) आनंद घेतला. नंतर तो आवाज हळू हळू कमी होत गेला, मग माणसे आली, छत उचलले वगैरे. पुढे आयुष्यात असे (घोणस बरोबरचे)एकांतातील क्षण फार कमी आले.(भाग ४) " इंजेक्शनच्या सुई सारखे पोकळ, १६ एम.एम. चे दोन विषाचे दात हे घोणसाचे मुख्य अस्त्र ! हे दात हायपो-डर्मिक सुई सारखे पोकळ असून विष ग्रंथिना जोडलेले असतात. (मोसादच्या) बेरेत्ता पिस्तुलातील म्यागझीन सारख्या याच्या जबड्यात ५-६ दाताच्या जोड्या असतात, एक फायर झाली की दुसरा तयार. त्यातून ते दात फोल्डिंग चे असतात, म्हणजे छत्रीत गुप्ती ठेवतो ना तसे...काम तमाम झाले की गुप्ती छत्रीच्या दांड्यात ! पहिला फोटो घोणसाचे विष काढतानाचा आणि दुसरा त्याच्या डोक्याची रचना दाखवणारा.  दात ! दाताची रचना. नाग हा फण्याच्या समोरच्या बाजूला म्हणजे साधारण पणे १८० अंशात हल्ला करू शकतो तर घोणस ३६० अंशात कुठे पण हल्ला करू शकतो....म्हणजे दिवाळी मध्ये भुईनाळा फेल गेला ही कसा फिरतो, तसाच हल्ला करताना घोणस फिरतो. त्यामुळे तुम्ही पहिले असेल तर, नागांचे चुंबन घेणारे खूप लोकं असतात पण घोणसाच्या वाटेला जात नाही.(जगात चुंबन घ्यायला एवढ्या सुंदर गोष्टी असताना, लोकं इंटर-स्पेसियल रिलेशन मध्ये का पडतात कोण जाणे?) गारुडी, थाईलंडवाले सापवाले पण घोणसाच्या खेळापासून जास्त करून दूरच राहतात. डोळ्याची पापणी लवते न लवते तो पर्यंत जीवा महाला ५ हातावरचे लिंबू पट्ट्याने उडवून जागेवर यायचा,याच कुळीतला घोणस असतो. १/३ सेकंदात: "तोंड उघडून -विषदंत बाहेर काढून -दंश करून -विष सोडून - दात मिटून -परत जागेवर".. या सगळ्या क्रिया होतात.( मला हे वाक्य लिहायला पण ३० सेकंद लागली.) हा व्हिटेकर सर्पतज्ञांचा व्हिडिओ बघा: घोणसाचा हल्ला. .हाय-स्पीड कॅमेरा मध्ये त्यांनी घोणसाचा हल्ला चित्रित केला आहे. ) वरती लिहिल्याप्रमाणे या जमातीचे विषपण नागापेक्षा वेगळ्या प्रकारचे म्हणजे हिमो-टोक्सिक असते. साधरण पणे १३० ml तो २५० ml म्हणजे पाउण ते आख्या (कुकिंग) कप एवढे विष टोचू शकतात, त्यातले माणसाला पाव कप विष ढगात पोचवायला पुरेसे असते. हे विष मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर (तर नागाचे मज्जासंस्थेवर) हल्ला करते, थोडक्यात म्हणजे रक्ताचे पाणी करते. रक्ताची गुठळ्या करायची क्षमता गंडल्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते,नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते...रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी फेल होऊन रुग्ण दगावतो. अमेरिकन झोंबी हा (हिडीस) प्रकार पहिल्या वर मला घोणस चावलेला आणि अगदी शेवटच्या स्टेज मध्ये असलेला माणूस आठवला होता.
ज्यांना हा साप चावला आहे त्यांच्या भाषेत,"उकळते तेल शरीराच्या आत मध्ये इंजेक्शन ने टोचायचे- म्हणजे घोणसाचा चावा !"
माणूस वाचला तरी, ज्या जागी घोणस चावतो तिकडचे टिशू जळून जातात. अशी घोणसाची कृपा झाली की त्याची परिणीती हाता-पायाची बोटं किंवा हात-पाय गमावण्यात होते. लान्सेत या मेडिकल जर्नलच्या मते जी कोणी माणसे घोणस चावून वाचतात, त्यातील २६% लोकांची पिटूटरी ग्यांडची वाट लागते आणि मग त्यांचा हार्मोनल-लोचा होतो. घोणस चावून वाचलेला माणूस जर कधी पहिला पहिला तर हे डिस्कवरी प्रेरित सर्पमित्र कधी सापाशी खेळ करायची हिम्मत करणार नाहीत. हा व्हिडिओ बघा: विषाचे रक्तावर परिणाम "कूच डाग भी अच्छे होते है!" याच चालीवर हे घोणसाचे विष मेडिकल क्षेत्रात खूप ठिकाणी वापरले जाते. "Dilute Russell's viper venom time (dRVVT)" ही पद्धत हॉस्पिटल मध्ये वापरून रक्ताची गुठळ्या करण्याची क्षमता तपासली जाते. २००५ सालची एक सकाळ...मी सर्पोद्यान मध्ये एक स्नेक-पिट साफ करत होतो, इतक्यात एक माणूस पळत आला, त्याने डोक्यावर दोन्ही हाताने साप पकडला होता (लावणीवाली बाई पदर पकडते तसा !)..."अहो अजगराचे पिल्लू पकडून आणले आहे, कुठे सोडू ?" मी दृश्य बघताच, हादरलो...३ फुटी चकचकीत घोणस त्याने हातात डोक्याजवळ पकडला होता, चावला असता तर औषध द्यायला पण वेळ मिळाला नसता. मी आधी त्याच्या पासून लांब झालो आणि त्याला, जमिनीवर त्या अजगराला (घोणसाला!) टाकायला सांगितले. (नंतर स्नेक स्टिक ने नीट उचलून त्याला घोणसाच्या पिट मध्ये टाकले.)..."काय हो, तुम्ही एवढे सर्पोद्यान चे असून अजगराला घाबरता , बारामती ला एसटी मध्ये चढलो या बेन्याला (अजगराला) घेऊन, मध्ये मध्ये पोत्यांमधून डोके काढायचा ...की द्यायचो एक टप्पू ठेवून, असाच आणला याला इकडे स्वारगेट वरून .... मी काहीच बोललो नाही,मला फक्त राजाभाऊंचे (मूळ वाक्य:जिम कार्बेट) वाक्य आठवले "अज्ञानात नेहमीच सुख असते ! " पुढच्या लेखात फुरसे ... (या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून आणि चिराग रॉय कडून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)

Book traversal links for एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर !

  • ‹ एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार !
  • Up
  • एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका ! ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
तंत्र
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव
माहिती

प्रतिक्रिया द्या
69715 वाचन

💬 प्रतिसाद (110)

प्रतिक्रिया

मस्त मस्त मस्त

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 10/04/2013 - 10:10 नवीन
शेवटचा प्रसंग आणि त्या वरची कॉमेंट "अज्ञानात नेहमीच सुख असते ! " बेहद्द आवडली. संपुर्ण लेख नेहमी प्रमाणे चटपटीत खुसखुशीत आणि तरीही पौष्टीक झाला आहे.
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच मस्त लेख

सौंदाळा
Fri, 10/04/2013 - 10:13 नवीन
नेहमीप्रमाणेच मस्त लेख
  • Log in or register to post comments

बापरे... लेख वाचताना अंगावर

Mrunalini
Fri, 10/04/2013 - 10:27 नवीन
बापरे... लेख वाचताना अंगावर अगदी काटा आला. खरच मानले तुम्हाला. मी साधी पाल बघुन पन तिच्या पासुन ४ हात लांब पळते तर साप तर ह्या जन्मात शक्यच नाही. :D
  • Log in or register to post comments

जबरा, अन्गावर काटा आला.....

खटपट्या
Fri, 10/04/2013 - 10:30 नवीन
जबरा, अन्गावर काटा आला.....
  • Log in or register to post comments

मस्त.

गवि
Fri, 10/04/2013 - 10:32 नवीन
तुमची लेखनाची पद्धत एकदम भारी आहे. आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छांसहित : Image removed.
  • Log in or register to post comments

धन्यवाद ! चोकोलेट खाऊन टल्ली

जॅक डनियल्स
Fri, 10/04/2013 - 20:52 नवीन
धन्यवाद ! चोकोलेट खाऊन टल्ली झालो आहे...;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

दे दणादण लेख छान!

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/04/2013 - 10:47 नवीन
दे दणादण लेख छान! आम्ही झालो ज्याक डि फ्यान!!! :)
  • Log in or register to post comments

लहानपणी गावात (बेळगाव-कारवार

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 10/04/2013 - 10:49 नवीन
लहानपणी गावात (बेळगाव-कारवार भाग) गवतात भरपूर खेळत असू (म्हणजे सुकलेल्या गवताच्या गंजीत). परवाच गेलो असताना सगळीकडे (रानात वगैरे) बिनधास्त फिरलो होतो. पण आता हे वाचून तंतरल्या गेली आहे (दातखीळ बसल्याची स्मायली)
  • Log in or register to post comments

मस्त!!

nishant
Fri, 10/04/2013 - 11:27 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments

जबरा..

मुक्त विहारि
Fri, 10/04/2013 - 11:32 नवीन
वाचत आहे..
  • Log in or register to post comments

नेहमी प्रमाणे

अनिरुद्ध प
Fri, 10/04/2013 - 11:39 नवीन
अप्रतीम!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

लय भारी

प्रसाद गोडबोले
Fri, 10/04/2013 - 11:40 नवीन
शेवटच्या प्रसंगाने तर काटा आला अंगावर !!
  • Log in or register to post comments

नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात

सुबोध खरे
Fri, 10/04/2013 - 12:43 नवीन
नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात काम करीत असताना आमच्याकडे एक कारंजा(उरण च्या बाजूला) नौदलाच्या तळावरून एका कमांडोला साप चावला म्हणून आणले होते. त्याच्या लक्षणांवरून त्याला घोणस चावल्याचे जाणवत होते. जखमेतून रक्तस्त्राव होत होत. पाय सुजला होता आणि भयंकर आग होत होती असे तो म्हणत होता( ज्याअर्थी कमांडो म्हणत होता त्याअर्थी ती खरच भयंकर असणार) त्याचे रक्त काढून त्याचा गोठण्याचा वेळ तपासण्यासाठी( सर्व साधारण माणसाचे रक्त ४-५ मिनिटात गोठते) प्रयोगशाळेत पाठवले आणि त्याचा रिपोर्ट येईपर्यंत थांबलो होतो पाऊण तास झाला तरी निकाल येत का नाही म्हणून फोन केला तर लैब मधून त्याचे रक्त गोठतच नाही असा रिपोर्ट आला. त्याला ताबडतोब सर्प विष प्रतीबंधकाचे इंजेक्शन चालू केले. एकशे चाळीस बाटल्या देऊनही त्याचे रक्त गोठेच ना. आमच्या एका सहकार्याला फक्त बाटलीचे धातूचे बुच तोडून त्यात १० मिली सलाईन घालायला उभा केला होता. त्याने विचारले कि सर किती बाटल्या हव्या आहेत. तर सर म्हणाले कि तुला कंटाळा येईपर्यंत बाटल्यांची बुचे तोडून त्यात सलाईन भरत राहा. दुसर्याला त्यात विरघळलेले विषप्रतिबंधक ५० मिली च्या सिरींज मध्ये काढून सलाईन च्या बाटलीत भरण्याचे काम दिले होते. थोड्या वेळाने त्याच्या रक्ताचा गोठण्याचा वेळ चाळीस मिनिटे आला).अजून साठ सत्तर बाटल्या दिल्या. अश्विनीतील औषध संपले. ताबडतोब हाफकिनला फोन करून अजून बाटल्या मागवल्या आणि पुण्याच्या कमांड रुग्णालयाल फोन करून आणखी साठा तयार ठेवायला सांगितला.नौदलाच्या कुंजाली या हेलिकोप्टर तळाला एक हेलिकोप्टर पुण्याला जाण्यासाठी तयार ठेवायला सांगितले होते. शेवटी त्या कमांडोला जवळ जवळ तीनशे बाटल्या सर्पविष प्रतिबंधक औषध द्यायला लागले होते. हा कमांडो केवळ मुंबईच्या जवळ होता म्हणून वाचला. बहुधा सापाने विष त्याच्या शिरेतच इन्जेक्ट केले असावे.त्याच्या पायाला लाल रक्ताने भरलेले फोड आले होते आणि पाय दुप्पट सुजला होता.त्या कमांडो ला पुढे सहा महिने ते श्राद्ध पुरवले त्याच्या दोन प्लास्टिक सर्जरी झाल्या आणि दुसर्या मांडीची त्वचा काढून इकडे लावावी लागली. तेंव्हा पासून मी घोणस या सापाला फार घाबरतो. जे डी साहेब आपली सर्प मला फारच रोचक आणि माहितीपूर्ण आहे आणि मला माझ्या जुन्या दिवसांना उजाळा दिल्याबद्दल आपले शतशः आभार
  • Log in or register to post comments

बापरे! वाचूनच भीती वाटली!

यशोधरा
Fri, 10/04/2013 - 13:14 नवीन
बापरे! वाचूनच भीती वाटली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माझे अनुभव काहीच नाही, असा हा

जॅक डनियल्स
Fri, 10/04/2013 - 21:00 नवीन
माझे अनुभव काहीच नाही, असा हा अनुभव आहे...त्या कमांडो ला पहिल्यांदा सलाम ! आणि नंतर त्याला वाचवणाऱ्या तुम्हाला सलाम !! साधरण पणे ६० बाटल्या मी ससून ला दिलेल्या मी पहिल्या आहेत, त्या देऊन पण किती वाट लागते याची कल्पना आहे...३०० बाटल्या म्हणजे तो कमांडो खरच सुपर -कमांडो होता !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जे डी साहेब,

सुबोध खरे
Sat, 10/05/2013 - 11:43 नवीन
जे डी साहेब, सर्प विष प्रतिबंधक औषध दिल्यावर प्रथम त्याच्या रक्ताच्या गोठण्याची क्रिया सामान्य होते पण काही काळाने परत शरीरात उती मध्ये आलेले पण रक्तात न उतरलेले विष परत रक्तात शोषले जाते आणि सुरुवातीला गोठ्णारे रक्त पातळ होऊ लागते. हे जर लक्षात घेतले नाही तर तो रुग्ण सुरुवातीला ठीक झाला असे वाटते आणि नंतर परत अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने एक आठवड्यापर्यंत रुग्ण दगावू शकतो. त्या कमांडोला जवळजवळ तीन दिवस पर्यंत असे प्रतिविष द्यायला लागले होते(म्हणून हा आकडा एवढा जास्त झाला होता अन्यथा सर्वसामान्यपणे चाळीस ते पन्नास बाटल्या द्यायला लागतात) आणि त्यानंतर त्याच्या शरीरातील स्नायू सडल्याने त्याची शल्यक्रिया करावी लागली होती. आता शल्यक्रिया करताना परत त्याचे रक्त पातळ होऊन चालत नाही शिवाय जितका जास्त चाकू चालवाल तितकि जास्त इजा आणि सूज येते. हे म्हणजे एकाच वेळी ब्रेक आणि अक्सिलरेटर वर पाय ठेवून मोटार चालवण्यासारखे आहे. आम्हाला एक शंका होती कि कमांडो जास्त शूरपणा दाखवायला गेला असावा आणि साप त्याला दोनतीनदा किंवा कडकडून चावला असावा आणि भरपूर विष आत सोडले असावे. अर्थात याची खात्री करणे शक्य नव्हते. दुसरी शक्यता अशी पण आहे कि त्याची रक्त किंवा शरीर जास्त संवेदनशील असावे त्यामुळे विषाच्या कमी मात्रेने सुद्धा त्याच्यावर इतका प्रभाव झाला होता. या सर्व गोष्टी म्हणजे केवळ तर्क आहे वैद्यकीय शास्त्रात तुम्हाला जितका जास्त अनुभव येतो तितके तुम्हाला आपल्याला किती कमी ज्ञान आहे आणि आपण किती तोकडे आहोत याची जाणीव होत राहते. असो सापाशी खेळ करू नये हे तो कमांडो (तोच काय आम्ही सर्व जण) फार छान पणे शिकला असावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

खरच थरारक अनुभव ! एक शंका आहे

उगा काहितरीच
Sat, 10/05/2013 - 14:26 नवीन
खरच थरारक अनुभव ! एक शंका आहे सर , जर त्या कमांडो च्या जागी दुसरी कुनी व्यक्ती असली असती तर उपचाराचा किती खर्च आला असता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

साहेब,

सुबोध खरे
Sat, 10/05/2013 - 20:04 नवीन
साहेब, सर्प विष प्रतिबंधक औषध सरकारी रुग्णालयात फुकट मिळते पण जर आपल्या पायाला गैन्गरीन झाला तर त्याच्या प्लास्टिक सर्जरीचा खर्च काही लाख रुपयापर्यंत जाऊ शकतो. म्हणूनच म्हणतात कि साप म्हणू नये धाकला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

धन्यवाद, उपयुक्त माहिती.

उगा काहितरीच
Sun, 10/06/2013 - 17:20 नवीन
धन्यवाद, उपयुक्त माहिती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खूप मस्त माहिती दिली आहे

जॅक डनियल्स
Mon, 10/07/2013 - 21:44 नवीन
खूप मस्त माहिती दिली आहे,
वैद्यकीय शास्त्रात तुम्हाला जितका जास्त अनुभव येतो तितके तुम्हाला आपल्याला किती कमी ज्ञान आहे आणि आपण किती तोकडे आहोत याची जाणीव होत राहते
हे तर वाक्य तर लाखमोलाचे आहे आणि ते सगळ्या क्षेत्रांना लागू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मस्त लेख - नेहमीप्रमाणेच!

आतिवास
Fri, 10/04/2013 - 12:59 नवीन
मस्त लेख - नेहमीप्रमाणेच!
  • Log in or register to post comments

खुपच छान माहिती

कपिलमुनी
Fri, 10/04/2013 - 13:01 नवीन
तुमच्या लेखमाले मुळे ज्ञानात भरपूर भर पडली !! आणि आजवर चप्पल घालून बिन्दास्त केलेले ट्रेक आठवले की अजून जिवंत आहे याबद्दल आश्चर्य वाटते ..आमच्या मावळामध्ये सर्व डोंगरावर गुडघ्याइतके गवत वाढते ..त्यातून आम्ही निवांत चालायचो , "अज्ञानात नेहमीच सुख असते ! " हेच खरे
  • Log in or register to post comments

अफलातून आहे ही पूर्ण लेखमाला.

क्रेझी
Fri, 10/04/2013 - 13:06 नवीन
अफलातून आहे ही पूर्ण लेखमाला. खूप छान वाटत आहे वाचतांना पण वाचून झाल्यावर भितीपण वाटते :) ह्या लेखामधे शेवटी नमूद केलेला प्रसंग आणि सुबोधजींनी सांगितलेला प्रसंग वाचून तर अंगावर सरकन काटा आला *shok*
  • Log in or register to post comments

मस्त लेख आणी माहिती.......

नन्दादीप
Fri, 10/04/2013 - 13:08 नवीन
मस्त लेख आणी माहिती.......
  • Log in or register to post comments

मस्त लेखनशैली आणि उदंड माहिती

यशोधरा
Fri, 10/04/2013 - 13:14 नवीन
मस्त लेखनशैली आणि उदंड माहिती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लै खास!

संजय क्षीरसागर
Fri, 10/04/2013 - 13:18 नवीन
लगे रहो.
  • Log in or register to post comments

_/\_

गणपा
Fri, 10/04/2013 - 14:08 नवीन
जॅक डी तुझी ही लेखमाला संपुच नये असं वाटतय.
  • Log in or register to post comments

केवळ आणि केवळ

अर्धवटराव
Fri, 10/04/2013 - 14:25 नवीन
एक्सलण्ट !!!
  • Log in or register to post comments

नागाचा फुत्कारही ऐकलाय आणि

झकासराव
Fri, 10/04/2013 - 14:36 नवीन
नागाचा फुत्कारही ऐकलाय आणि घोणसची शिट्टी पण. ड्यान्जर म्हणजे काय ते तेव्हा चांगलच कळालं होतं. :) पोत्यांमधून डोके काढायचा ...की द्यायचो एक टप्पू ठेवून>>> बाबौ!!!!!!!!!!!!!! खरच अज्ञानात सुख असतं. लैच चपळ प्रकरण आहे हे. बारामती ते हिकडं येताना शांत कसं काय बसलेलं काय माहिती.
  • Log in or register to post comments

त्या स्नेक पिट मध्ये थांबून

अद्द्या
Fri, 10/04/2013 - 14:43 नवीन
त्या स्नेक पिट मध्ये थांबून जर त्या माणसाला त्याच्या हातातला "तो" नसून "ती" आहे सांगितलं असतं . त्याची कुठून कुठून कसला कसला स्त्राव झाला असता याचाच विचार करतोय . लई जबराट लेख जेडी
  • Log in or register to post comments

लैच भारी लिखाण.

अभ्या..
Fri, 10/04/2013 - 14:45 नवीन
लैच भारी लिखाण.
  • Log in or register to post comments

अगायो बाबव वाचताना पण खुर्चीत

इष्टुर फाकडा
Fri, 10/04/2013 - 14:52 नवीन
अगायो बाबव वाचताना पण खुर्चीत पाय वर घेऊन ढुंगण आखडून बसलो होतो. लेख संपल्यावर जाणीव झाली आणि रगात पातळ होईपर्यंत हसलो :)
  • Log in or register to post comments

:)) :))

स्पंदना
Tue, 10/08/2013 - 04:59 नवीन
:)) :)) :)) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

बेस्ट लेख

भडकमकर मास्तर
Fri, 10/04/2013 - 14:57 नवीन
डोक्यावर दोन्ही हाताने साप पकडला होता (लावणीवाली बाई पदर पकडते तसा !).... .>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> अरे काय या उपमा... ;) भयंकर प्रसंग... हा माणूस एष्टीत बसून घोणसाला वरचेवर टप्पू देत होता... अग्गागागा
  • Log in or register to post comments

वाचतोय लेखमाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/04/2013 - 20:06 नवीन
डोक्यावर दोन्ही हाताने साप पकडला होता (लावणीवाली बाई पदर पकडते तसा !).... आणि भयंकर प्रसंग... हा माणूस एष्टीत बसून घोणसाला वरचेवर टप्पू देत होता... अग्गागागा डोळ्यासमोर चित्र उभं राहीलं. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

बेस्ट लेख +१

अनिता
Sat, 10/05/2013 - 01:51 नवीन
बाकी बारामतीहुन एष्टी आली मह्न्जे साहेबा॑नीच हुकुम दिला असावा सापाला ...सर्पोद्यन पर्यन्त गडबड नको अशी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

ह्या ह्या ह्या !! प्रतिक्रिया

शिल्पा ब
Sat, 10/05/2013 - 07:17 नवीन
ह्या ह्या ह्या !! प्रतिक्रिया आवडेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिता

नेहमीप्रमाणेच सुरेख लेख.

प्रचेतस
Fri, 10/04/2013 - 15:01 नवीन
नेहमीप्रमाणेच सुरेख लेख. हा घोणसच काय? सांदण दरीत वाटेतल्या एका खडकावर निवांतपणे पहुडला होता. Image removed.
  • Log in or register to post comments

हा घोणस नाही, माझ्या मते,

जॅक डनियल्स
Fri, 10/04/2013 - 20:44 नवीन
हा घोणस नाही, माझ्या मते, व्हेरीगेतेड कुकरी (variegated kukri) साप आहे. हा बिनविषारी साप असून, महाराष्ट्रात सगळी कडे सापडतो. खूप वेगवेगळ्या रंगामध्ये हा सापडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्स जेडी.

प्रचेतस
Fri, 10/04/2013 - 20:48 नवीन
धन्स जेडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

डुरक्या घोणस नावाचा एक प्रकार

बाळ सप्रे
Fri, 10/04/2013 - 15:35 नवीन
डुरक्या घोणस नावाचा एक प्रकार ऐकलाय.. तो कसा वेगळा असतो ??
  • Log in or register to post comments

तो बिनविषारी साप असून, खूप

जॅक डनियल्स
Fri, 10/04/2013 - 20:47 नवीन
तो बिनविषारी साप असून, खूप शांत असतो. खडकाळ आणि भुसभुशीत जमिनीत राहणारा तो साप आहे. शांत असल्याने खूप वेळा गारुड्याकडे आढळतो. त्याच्या शेपटीला खवले असतात, ते तो जमीन उकरायला वापरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

(जगात चुंबन घ्यायला एवढ्या

मदनबाण
Fri, 10/04/2013 - 16:05 नवीन
(जगात चुंबन घ्यायला एवढ्या सुंदर गोष्टी असताना, लोकं इंटर-स्पेसियल रिलेशन मध्ये का पडतात कोण जाणे?) हेच म्हणतो की वो मी ! जिकडे इंटरेस्ट दाखवायचा तिकडे जाणार नाहीत,नको तिकडे चुंबा-चुंबी करायला जातात आणि मग डंख बसतो ! ;) बाकी लिखाण मस्तच ! :)
  • Log in or register to post comments

जेडी लेख तर भारीच आहे . (परत

अद्द्या
Fri, 10/04/2013 - 17:14 नवीन
जेडी लेख तर भारीच आहे . (परत एकदा वाचून परत एकदा सांगतोय) पण . ज्या काही उपमा दिल्या आहेत . आहाहाहा . . सक्काळी सक्काळी टिळक रोड वरल्या तिलक चा उपमा खाल्ल्यासारखं वाटत . मधेच मिरची . मधेच गोड . . मस्त मस्त .
  • Log in or register to post comments

अर्रर्र...तिलक ची आठवण करून

जॅक डनियल्स
Fri, 10/04/2013 - 21:04 नवीन
अर्रर्र...तिलक ची आठवण करून दिली...ब्रेड प्याटीस...डिसेंबर मध्ये ते माझ्या हिट-लिस्ट वर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

लै भारी लेका! कं लिवलंय कं

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/04/2013 - 19:27 नवीन
लै भारी लेका! कं लिवलंय कं लिवलंय!
  • Log in or register to post comments

बाप्रे! हा प्रकार त्या

रेवती
Fri, 10/04/2013 - 20:36 नवीन
बाप्रे! हा प्रकार त्या मनुष्याने बारामतीपासून आणला म्हणजे कमाल झाली.
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 10/04/2013 - 20:41 नवीन
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि खूसखुशित अलंकारीक शैलीतला लेख ! मजा येतेय वाचायला !
  • Log in or register to post comments

वाचून हस हस हसतेय...

पिशी अबोली
Fri, 10/04/2013 - 21:05 नवीन
वाचून हस हस हसतेय... =)) याची शिट्टी ऐकलिये. आमच्या कॉलेजजवळ हाच आला होता. आणि आमचे महान मुलांच्या हॉस्टेलवरचे लोक त्याला छोट्याशा काठीने मारायला निघाले होते, तेही रात्री. आम्ही मैत्रिणींनी या लोकांसोबतचं वैर वगैरे विसरुन जायचं ठरवलं होतं तेव्हा कारण उद्या दिसतील की नाही काय माहीत! कुरुप दिसतो हा पण. खूपच ओबड-धोबड प्रकार वाटतो. अर्थात खरोखर कसा ते बघायला त्याच्याजवळ जायची जन्मात टाप नाही लागणार म्हणा... तुम्ही धन्य आहात जेडी.. ___/\___
  • Log in or register to post comments

तो यष्टीतून साप आणण्याचा आणि

आनन्दिता
Fri, 10/04/2013 - 21:29 नवीन
तो यष्टीतून साप आणण्याचा आणि त्याला घेऊन लावणी करायचा प्रकार वाचुन.. भलीमोठी किंकाळी फोडुन पळतच सुटले... लैच डेंजर लिवलंय ब
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा