✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ट्रू एअर स्पीड, ग्राऊंड स्पीड, सर्किट वगैरे...

ग
गवि यांनी
Mon, 09/26/2011 - 17:34  ·  लेख
लेख
: विमानाच्या वेगाबाबतीत एक फंडा क्लिअर करुन घेऊ. विमानाचा वेग म्हणजे त्याच्या कॉकपिटात दाखवला जाणारा वेग. हा वेग हवेशी रिलेटिव्ह असतो. विमान हवेला मागे ढकलून पुढे जातं.. जमिनीला नव्हे.. त्यामुळे मागे जाणार्‍या हवेचा स्पीड म्हणा किंवा हवेच्या तुलनेत पुढे सरकणार्‍या विमानाचा स्पीड म्हणा, हाच विमानाचा स्पीड असतो. त्याला ट्रू एअरस्पीड म्हणतात. पण आपल्याला प्रवास तर जमिनीवरच्या ठिकाणांमधे करायचा असतो. त्यामुळे आपल्याला विमानाचा ग्राउंड स्पीड, अर्थात जमिनीशी रिलेटेड स्पीड काढणं भाग असतं. समजा मुंबई गोवा एरियल अंतर ६०० किलोमीटर असेल. आणि समजा विमानाचा ट्रू एअर स्पीड ३०० किलोमीटर प्रतितास असेल. अशा वेळी वारा साफ बंद असेल, तर विमान दोन तासात गोव्याला पोहोचेल. म्हणजे एअरस्पीड आणि ग्राउंड स्पीड एकच असेल. जर समोरुन शंभर किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारा असेल तर ग्राउंड स्पीड (३०० उणे १००) २०० किलोमीटर प्रतितास इतका कमी होईल आणि विमानाला पोचायला तीन तास लागतील. जर पाठीकडून असाच वारा असेल तर विमान ४०० किमी प्रतितास अशा वाढीव ग्राउंडस्पीडने दीड तासातच गोव्याला पोहोचेल. तसं वर दिलेलं गणित साधंच आहे. प्रत्यक्षात पायलटला प्रत्यक्ष वार्‍याचा वेग आणि दिशा बघून बरंच गणित करावं लागतं. वारा बरोब्बर समोरुन किंवा पाठीकडून नसतोच. त्याचा विरोध किती होईल त्याप्रमाणे वेग आणि उडण्याचे अँगल बदलले जातात. विमान वर उचललं जातं ते पंखांवर तयार होणार्‍या हवेच्या "लिफ्ट"मुळे, एवढं सगळ्यांनाच माहीत असतं. पंख जोरात हवेतून पुढे जातो तेव्हा त्याच्या एरोफॉईल आकारामुळे त्याच्या खालून हवा वर दाब देते. हा दाब विमानाला हवेत उचलून धरण्याएवढा जोरदार हवा असेल तर पंख हा किमान एका वेगाने हवेतून सरकत राहिला पाहिजे. या वेगापेक्षा कमी वेग झाला की लिफ्ट पुरेशी मिळणार नाही आणि पंख (अर्थात विमान) खाली कोसळणार. म्हणजेच "स्टॉल" होणार. या विमान हवेत राहण्यासाठी आवश्यक अशा किमान वेगाला "स्टॉलिंग स्पीड" म्हणतात. समजा तुमच्या विमानाचा स्टॉलिंग स्पीड दोनशे किलोमीटर प्रतितास आहे, तर फ्लाईटच्या कोणत्याही स्टेजमधे (जमिनीवरील चालणे वगळून) तुम्हाला २०० पेक्षा कमी स्पीड करता येणार नाही. अर्थात स्टॉलिंग स्पीड हा ट्रू एअरस्पीड असतो. ग्राउंड स्पीड नव्हे. तात्विकदृष्ट्या तुम्ही शून्य ग्राउंडस्पीडमधे आकाशात टिकू शकाल (विमानाच्या एअरस्पीडइतकाच वारा समोरुन येत असेल तर) पण ट्रू एअरस्पीड स्टॉलिंग स्पीडच्या जराही खाली गेला की कपाळमोक्षच. त्यामुळे विमान फास्ट चालवू नको रे म्हणण्याऐवजी "स्लो नको रे चालवू. मरायचंय का?" असं म्हणावं लागतं. रनवेच्या भोवती विमान ज्या मार्गाने उडतं त्याला सर्किट पॅटर्न म्हणतात. सर्किट पॅटर्न हा सर्व एअरपोर्टसमधे जवळजवळ सारखाच असतो. एखाद्या एअरपोर्टच्या रनवेची दिशा ठरवताना त्या जागी वारा कसा वाहतो याचं अनेक वर्षांचं रेकॉर्ड पाहतात. विमानाचा टेकऑफ आणि लँडिंग, दोन्हीही वार्‍याच्या विरुद्ध दिशेत केलं जातं. कारण.. ? वर म्हटल्याप्रमाणे विमानाचे सर्व स्पीड हे हवेशी रिलेटिव्ह असतात. टेक ऑफसाठी आवश्यक स्पीडसुद्धा.. रनवेची लांबी अर्थातच मर्यादित असते. त्यामुळे वारा समोरुन येत असला तर ट्रू एअरस्पीडच्या मानाने ग्राउंड स्पीड कमी राहतो आणि रनवेवरची कमी लांबी खर्च होऊन लवकर टेकऑफ होतो. एरवी विमान रनवेच्या दुसर्‍या टोकाशी जाऊन कदाचित ठोकरग्रस्त झालं असतं. लँडिंगही याच, पक्षी वार्‍याच्या विरुद्ध दिशेत केलं जातं, कारण समोरुन येणार्‍या वार्‍याने लँडिंग झाल्यावर ग्राउंड स्पीड कमी होतो आणि विमान कमी अंतरात थांबतं.. रनवे जरी वार्‍याच्या हिस्टॉरिक दिशेवरुन बांधत असले, तरी वार्‍याची दिशा बदलत राहतेच. विशेषतः हवामान खूप बदललं की वार्‍याची दिशा उलटही होते. अशावेळी रनवे तर हलवता येत नाही.. मग टेकॉफ आणि लँडिंगची दिशा उलटी केली जाते. मुंबईवासी विमानप्रवाशांनी किंवा नागरिकांनी खूपदा पाहिलं असेल की बर्‍याचवेळा घाटकोपरकडून लँडिंग करणारी आणि टेकॉफनंतर जुहू चौपाटीवर वर चढताना दिसणारी विमानं अचानक दिशा बदलून चौपाटीच्या दिशेने उलट लँडिंग करायला खाली येऊ लागतात. आणि टेकॉफनंतर ती जुहू ऐवजी घाटकोपर कुर्ल्यावर दिसतात. यालाच रनवे बदलला असं म्हणतात. मुंबई कंट्रोल टॉवर सर्व विमानांना "रनवे इन यूज" अशा नावाखाली नेहमीच याक्षणी कोणत्या बाजूने रनवे वापरात आहे हे सांगत असते. आता सर्किट पॅटर्न पाहू.. इथे मी लेफ्ट साईडेड सर्किट पॅटर्न दाखवला आहे. २७ आणि ०९ हे रनवे नंबर्स आहेत. रनवे नंबर म्हणजे त्या रनवेचं तोंड ज्या बाजूला आहे ती दिशा. २७० डिग्री म्हणजे पश्चिम दिशा. त्यातलं शेवटचं शून्य काढून पहिले दोन आकडे वापरले जातात. त्याचप्रमाणे ०९ म्हणजे ९० डिग्री, अर्थात पूर्व दिशा. या सर्किट पॅटर्नमधे आपण ०९ रनवे वापरुन सर्किट पॅटर्न दाखवला आहे. पूर्वेला तोंड करुन टेकऑफ घेतला जातो. टेकॉफनंतर नाकासमोर वर चढत जाण्याच्या भागाला अपविंड लेग म्हणतात. अपविंड लेगमधून सरळ नाकासमोर एक्झिट घेऊन ठराविक उंची गाठायची आणि मग आपल्या गन्तव्यस्थानाची दिशा सेट करुन तिकडे तोंड वळवायचं, अशी एक एक्झिटची पद्धत आहे. किंवा मग काही ठिकाणी वर चढताचढताच डावीकडे वळून क्रॉसविंड लेग ही रेषा जॉईन केली जाते. क्रॉसविंड लेगमधून डावीकडे ४५ डिग्रीत एक्झिट घेण्याचा आणखी एक प्रकार आहे. आता एक पूर्ण सर्किट करुन पाहूया.. अशी एकामागून एक सर्किट्स उड्डाण शिकताना केली जातात. त्यामुळे टेकॉफ आणि लँडिंगसहित सर्वच प्रकारची उत्तम प्रॅक्टिस होते. टेकऑफ घेतला.. अपविंडमधे एक हजार फुटापर्यंत वर चढत गेलो. मग काटकोनात पण स्मूथ असं डावीकडे वळण घेतलं. क्रॉसविंड जॉईन केला.. दोन हजार फुटांची उंची गाठली. पुन्हा डावं वळण घेऊन रनवेला समांतर पण उलट दिशेत प्रवास सुरु केला. दोन हजार फुटांवर इंजिन पॉवर अ‍ॅड्जस्ट करुन विमान स्थिर केलं. आता रनवे आपल्या डाव्या हाताला दिसतोय. इथे आपण कंट्रोल टॉवरला रेडिओवर सांगतो. उदा. "पुणे, व्हिक्टर किलो अल्फा ऑन लेफ्ट डाउनविंड जीरो नाईन.." म्हणजेच अहो पुणे टॉवरवाले काका, मी रनवे ०९ च्या डाव्या डाउनविंड लेगमधे आहे. टॉवर आपल्याला सांगतो:" व्हि़क्टर किलो अल्फा, पुणे... रिपोर्ट ऑन फायनल्स.." म्हणजे जेव्हा फायनल लेगला पोचाल तेव्हा सांगा. डाउनविंड लेगमधे आपण रनवे पार करुन थोडे पुढे गेलो की साधारण आपल्याला रनवेचं ०९ टोक "एट ओ क्लॉक" पोझिशनमधे दिसायला लागतं, असा एक पॉईंट येतो. या ठिकाणी पुन्हा स्मूथली डावं वळण घ्यायचं. याच सुमारास इंजिन पॉवर आयडल किंवा बंद करायची. त्यामुळे विमान खाली उतरायला लागतं. उतरत उतरत आणि वळत वळत क्रॉसविंडच्या उलट दिशेत असलेल्या "बेस लेग" नावाच्या रेषेला जॉईन व्हायचं. बेस लेगला काटकोनात असलेला लेग म्हणजे फायनल लेग. उतरणं चालूच आहे. फायनल लेगमधे आलात की दूर रनवे तुमच्या नाकासमोर दिसेल. रनवेच्या सेंटरलाईनशी विमानाचं नाक लावून धरत उतरणं चालू ठेवायचं. गरजेनुसार उतरण्याचा रेट वाढवायचा. रनवेचा आकडा हे आपलं टचडाऊन करण्याचं टारगेट असलं पाहिजे. त्याच्या आधी टच केलं तर अंडरशूट झालात, म्हणजे दगडधोंड्यात थेट घुसलात.. त्या टार्गेटच्या पुढे गेलात तर ओव्हरशूट..मग टचडाऊन झाल्यावर रनवेची उरलेली लांबी तुम्हाला पुरणार नाही. अशा दोन्ही वेळी लँडिंग म्हणजे क्रॅशच.. (मेंगलोर क्रॅश ओव्हरशूटमुळे झाला होता..) फायनलवर आल्यावर पुन्हा टॉवरला सांगायचं की मी फायनलवर आहे. मग तो तुम्हाला लँडिंग क्लियरन्स देईल आणि लँडिंगसाठी उपयोगी आकडेरुपी माहितीही देईल.. टचडाऊन केलंत की थोडं पुढे जाऊन टॅक्सीवेवर विमान वळवा आणि एप्रनमधे पार्क करा, किंवा परत सलग टेकऑफ घेऊन आणखी सर्किट करा. जर बाहेरुन प्रवास करुन या विमानतळावर येत असलात तर जनरली डाउनविंड लेगमधे ४५ डिग्रीमधे जॉईन व्हायचं असतं. बाकी पुढे तसंच. रनवेची दिशा बदलली की लेफ्ट साईडेड पॅटर्न राईट बनू शकतो... .................... ओव्हर..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
देशांतर
जीवनमान
तंत्र
भूगोल
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
18717 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

एक शंका. वारा २०० किमी वेगाने

विजुभाऊ
Mon, 09/26/2011 - 17:44 नवीन
एक शंका. वारा २०० किमी वेगाने वहात असेल . विमानाचा वेग २०० किमी असेल तर विमान एकाच जागेवर स्थिर राहील का? ( गुरुत्वाकर्षण हा फॅक्टर तात्पुरता नाही /नगण्य आहे असे गृहीत धरू) मिग २९ च्या बाबतीत डिस्कव्हरीवर एक फिल्म पाहिली होती त्यात मिग २९ उलटे होऊन उलट दिशेला जाताना दाखवले होते तसेच उभे राहून आडव्या दिशेत उडत होते अशावेळेस गतीचे कोणते नियम लागु होताना नक्की काय घडते?
  • Log in or register to post comments

शंकेची उत्तरे

Nile
Mon, 09/26/2011 - 22:45 नवीन
>>वारा २०० किमी वेगाने वहात असेल . विमानाचा वेग २०० किमी असेल तर विमान एकाच जागेवर स्थिर राहील का? ( गुरुत्वाकर्षण हा फॅक्टर तात्पुरता नाही /नगण्य आहे असे गृहीत धरू) वारा आणि विमान यांच्यामध्ये रिलेटीव्ह स्पीड(दोघांची दिशा वेगळी हवी, वेगळी म्हणजे परस्पर विरुद्धच नाही.) असेल तर हे शक्य आहे. (अर्थात अजून इतर फॅक्टर्स आहेत.) पण वारा आणी विमान एकाच दिशेला एकाच वेगाने असतील तर ते शक्य नाही. थोडक्यात, गविंनी वरती लिहल्याप्रमाणे, विमानाचे पंख वार्‍याच्या आणि विमानाच्या रिलेटेव्ह स्पिडमुळे विमानाच्या वर आणि खाली वेगवेगळे प्रेशर निर्माण करतात. खाली प्रेशर जास्त असते जे विमानाला उचलते. जर रिलेटिव्ह स्पिड शुन्य झाला तर हे शक्य नाही. अर्थात रिलेटीव्ह स्पीड शुन्य नसला तरी तो विमानाला तरंगत ठेवण्याइतका हवाच अन्यथा विमान पडेल. >>मिग २९ च्या बाबतीत डिस्कव्हरीवर एक फिल्म पाहिली होती त्यात मिग २९ उलटे होऊन उलट दिशेला जाताना दाखवले होते तसेच उभे राहून आडव्या दिशेत उडत होते अशावेळेस गतीचे कोणते नियम लागु होताना नक्की काय घडते? बर्‍याच फायटर विमानांमध्ये हाय स्पीड जेट नोझल्स असतात, हे थोडक्यात तुमच्या घरातमध्ये बागेला पाणी देणारा स्प्रिंकलर असतो तसे असते. स्प्रिंकलर गोल फिरतो कारण बाहेर पडणारे पाणी त्यावर विरुद्ध दिशेने बल लावते (न्युटनचा नियम) तसेच ह्या जेट्स मुळे विमान एका दिशेला जाईल इतका फोर्स निर्माण केला जातो, अर्थात ते तरंगेल इतका वेग किंवा तरंगत ठेवेल इतके बल असलेला/ले जेट्स हवेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

Nile

गवि
Mon, 09/26/2011 - 20:40 नवीन
Nile धन्यवाद.. विजुभाऊ,तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर "हो" आहे. Head on समोरुन येणारा वारा 200 kmphअसेल तर कोणी त्यात विमान उडवणार नाही हा logical भाग सोडला तर तात्विकदृष्ट्या शक्य आहे. साधं चपखल उदाहरण.तुम्ही ट्रेडमिलवर पळता तेव्हा पट्टा आणि तुम्ही यात 7kmph स्पीड असेल आणि तुम्ही 7kmphनेच पुढे पावले टाकलीत तर तुमचा जमिनीशी स्पीड 0 असेल आणि पट्ट्याशी स्पीड 7.म्हणून तुम्ही जागीच रहाल.आपण इथेही ग्राउंड स्पीडविषयीच बोलतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मला ऑफिसच्या पार्किंग मध्ये

५० फक्त
Mon, 09/26/2011 - 17:56 नवीन
मला ऑफिसच्या पार्किंग मध्ये दोन पिवळ्या रेघात टु व्हिलर नीट लावता येत नाही, हे वर लिहिलंय ते वाचुनच गरगरायला लागलंय, भर चौकात उजवीकडचा टर्न इंडिकेटर चालु ठेवुन डावीकडे वळुन भांडणं होतात, त्यात हे एवढे इंडिकेटर, रनवेचे आकडे अन ते कंट्रोल टावर वाला काय सांगतोय याकडं लक्ष ठेवुन विमान चालवणं आणि अपघात न होता व्यवस्थित उतरवणं ही एक महाकठिण कला आहे, उगा वडापच्या डायवर सारखं नाही, जगातल्या सगळ्या वैमानिकांना प्रणाम. या पेक्षा माझं क्षेत्र फार सोपं आहे अशी आजपुरती समजुत करुन घेतो, उद्या पुन्हा बसायचं आहे दोन ट्रान्स्फॉर्मर आणि सर्किट ब्रेकर घेउन, तिच्यायला १८ दिवस झाले लोडला स्टँडच होत नाहीये.
  • Log in or register to post comments

अरे राम! तुझा हा प्रतिसाद

मी ऋचा
Mon, 09/26/2011 - 18:07 नवीन
अरे राम! तुझा हा प्रतिसाद वाचायच्या आधीच मी माझा खालचा प्रतिसाद दिला. चुकला ना आता तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आवडत आहे.

विसुनाना
Mon, 09/26/2011 - 18:03 नवीन
लेखांक आवडला. मालिका उत्तम आहे. जर लँडिंग योग्य नसेल (ओव्हरशूट) तर टचडाऊन झाल्यावर / थ्रस्ट रिव्हर्सल मोडमध्ये असताना विमान परत हवेत उडवणे शक्य असते का?
  • Log in or register to post comments

पुस्तकी

Nile
Mon, 09/26/2011 - 20:29 नवीन
पुस्तकी ज्ञानानुसार, वास्तवात लँडींग जमणार नसेल तर थ्रस्ट रिव्हर्सल केलेच जाणार नाही असे वाटते. रिव्हर्सल बर्‍याच उशीरा, लँडिंग नंतर, केले जाते. तात्त्विक दृष्ट्या रिव्हर्सल म्हणजे ब्रेकच. इतक्या उशीरा पुन्हा टेकऑफ करता येणार नाही कारण 'टेक ऑफ स्पीड'ला पोहोचण्याकरता आवश्यक रनवे असेलच असे नाही. काही चुकले असेल तर गवि दुरुस्त करतीलच. गविं, मालिका आवडली. इन्स्ट्रुमेंट लँडिग सीस्टम (आयएलएस) वरही एखादा लेख लिहा. खरं तर थोडक्यात लिफ्ट, अँगल ऑफ अटॅक, ड्रॅग वगैरेवरही लिहा, एकदा विमानाचे फिजिक्स थोडेफार कळले तर कळायला सोपे जाईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

याही भागात एकदम इण्टरेस्टिंग

मी ऋचा
Mon, 09/26/2011 - 18:04 नवीन
याही भागात एकदम इण्टरेस्टिंग माहीती दिलीत..मस्तच. तुमच्या दोन तीन अश्या माहितीपूर्ण लेखांनंतर बहुतेक सगळे मिपाकर लाईसन्स्ड पायलट्स व्हायला पात्र होतील ;)
  • Log in or register to post comments

हा प्रतिसाद ना चुकलाच, हा

५० फक्त
Mon, 09/26/2011 - 19:09 नवीन
हा प्रतिसाद ना चुकलाच, हा खरंतर इथं शोभतच नाही मु़ळी, ह्या प्रतिसादाची योग्य जागा आहे, श्री नाटक्या किंवा श्री. सोकात्रि यांचे धागे. इथुन पुढं हा प्रतिसाद तिथं कॉपि पेस्ट करत चला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

सोप्पय एकदम. च्यायला उगाच

मृत्युन्जय
Mon, 09/26/2011 - 18:22 नवीन
सोप्पय एकदम. च्यायला उगाच त्या पायलटांना एवढाले पगार देतात. पुण्याच्या रस्त्यांवर पीएमटी च्या बशी चालवुन दाखवा म्हणाव ;)
  • Log in or register to post comments

ओ गविभाऊ,

मिसळपाव
Mon, 09/26/2011 - 18:51 नवीन
अशी एकदम दोन चॉकोलेटं देऊन मग पंधरा दिवस काहिच नाहि असं नका हां करू! दर सोमवारी एक भाग टाकाल का? "च्यायला ऑफिस सुरू" असं डोक्यात येण्याऐवजी " व्वा, सोमवार म्हणजे गविवार" अशा विचाराने आराम वाटेल आम्हा बर्‍याच जणाना. तळटिपः हा लेख ३ ऑक्टोबरला वाचणारे :-)
  • Log in or register to post comments

सोमवार म्हणजे गविवार मस्त

गणेशा
Mon, 09/26/2011 - 20:04 नवीन
सोमवार म्हणजे गविवार मस्त वाटले वाचुन ... ----------- गवि लिहित रहा.. वाचत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

नेहमीच्या घाईने लेख वाचला...

भडकमकर मास्तर
Mon, 09/26/2011 - 18:52 नवीन
नेहमीच्या घाईने लेख वाचला... मग चार ओळी समजल्या नाहीत ... त्या महत्त्वाच्या असल्याने पुढच्या चार ओळी समजल्या नाहीत ... आणि मग आपले विमान पडणार अशी भयंकर भीती वाटली आणि मागे येऊन पुन्हा पुन्हा ओळी वाचल्या... हे सालं भयंकर आहे...
  • Log in or register to post comments

आवडले

स्मिता.
Mon, 09/26/2011 - 18:55 नवीन
हा ही भाग मस्तच! एकंदरीत कुतूहल वाढत आहे. आता विमानात बसले की कोणत्या वेळी वैमानिक काय करत असेल याचे अंदाज करून समोरच्यावर इंप्रेशन मारता येईल ;)
  • Log in or register to post comments

+१

ऋषिकेश
Tue, 09/27/2011 - 17:29 नवीन
+१ थोडा बदल करून असेच म्हणतो :) आता विमानात बसलो की कोणत्या वेळी वैमानिक काय करत असेल याचे अंदाज करून समोरच्याशेजारची वर इंप्रेशन मारता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

आता विमानात बसलो की कोणत्या

वपाडाव
Fri, 09/30/2011 - 15:31 नवीन
आता विमानात बसलो की कोणत्या वेळी वैमानिक काय करत असेल याचे अंदाज करून शेजारची वर इंप्रेशन मारता येईल
वरील वाक्यावरुन हा प्रतिसाद ऋषिकेश चिंदरकरांनी दिल्या सारखा वाटतो..... - कम्युनिस्ट (वपाडाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

मस्त लेखन! भारी वाटलं. कधीकधी

रेवती
Mon, 09/26/2011 - 19:20 नवीन
मस्त लेखन! भारी वाटलं.:) कधीकधी अज्ञानात सूख असतं हो गवि!;) आता मी खिडकीला नाक लावून बसणार विमानात.;)
  • Log in or register to post comments

कॉपीड

अर्धवट
Mon, 09/26/2011 - 19:48 नवीन
कॉपीड
  • Log in or register to post comments

मस्त लेख

योगी९००
Mon, 09/26/2011 - 20:03 नवीन
गवि.. तुमचे विमानावरचे लेख खरच आमच्या डोक्याचे छप्पर उडवून जातात. विमान चालवताना या गोष्टीचा कधीच विचार नाही हो..आजवर बरीच विमाने चालवली. F18, F22, MIG, passenger विमान पण चालवले. (संगणक खेळात हो..प्रत्यक्ष नाही). मस्त माहिती मिळाली. आभारी आहे. एक गोष्ट तितकीशी कळली नाही.. विमानाचा टेकऑफ आणि लँडिंग, दोन्हीही वार्‍याच्या विरुद्ध दिशेत केलं जातं. हे मुंबईच्या विमानतळाबाबत ठिक आहे हो जेथे विमान ज्या दिशेने उतरते त्याच दिशेच्या विरूद्ध बाजूला टेकऑफ करते...म्हणजे समजा वारा जुहूकडून घाटकोपरकडे वहात असेल तर विमान घाटकोपरकडून उतरते पण जूहूकडे टेकऑफ करते. म्हणजे टेकऑफ आणि लँडिंग, दोन्हीही वार्‍याच्या विरुद्ध दिशेत केलं जातं. पण भारतातील इतर बर्‍याच विमानतळांवर ज्या बाजूने विमान उतरते त्याच दिशेला टेकऑफ पण करते. म्हणजे मी समजा चेन्नाईला उतरत असलो आणि माझे विमान गिंडीकडून उतरले तर ते किंवा दुसरे कोणतेही विमान गिंडीच्या विरूद्ध म्हणजे तांबरम कडे टेकऑफ करायला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. विमान चेन्नाईला पण गिंडीकडेच उडते. हे कसे काय? १०-१५ मिनिटात वार्‍याचा वेग उलटा होईल काय?
  • Log in or register to post comments

तुम्ही म्हणता त्यामधे

गवि
Tue, 09/27/2011 - 10:39 नवीन
तुम्ही म्हणता त्यामधे चेन्नईच्या दोन वेगवेगळ्या रनवेजचं ( २५ / ०७ आणि १२/३०) कारण असू शकेल. त्यातल्या २५/०७ चे तोंड बरोब्बर गिंडीकडे आहे. वारा अचानक बदलल्यामुळे किंवा मधल्या दिशेने असल्याने ट्रॅफिकचा समन्वय साधण्यासाठी दोन्ही रनवेजवरुन एकामागोमाग एक अशा टेकऑफना परवानगी देत असतील. कारण हे रनवे अगदी टोकाशी जोडलेले आहेत. लँडिंग आणि टेकॉफ एकमेकांच्या विरुद्ध दिशेत एकाच वेळी होऊच शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

>>लँडिंग आणि टेकॉफ

नितिन थत्ते
Tue, 09/27/2011 - 11:12 नवीन
>>लँडिंग आणि टेकॉफ एकमेकांच्या विरुद्ध दिशेत एकाच वेळी होऊच शकत नाहीत. सहमत आहे. अन्यथा टेक ऑफ करणारे विमान लॅण्डिंगच्या तयारीत असलेल्या विमानावर धडकेल. अगदी छोट्या विमानतळावरही विमानाची धावपट्टीवरची धाव लॅण्डिंग आणि टेक ऑफ साठी एकाच दिशेने असते. सध्या मुंबई विमानतळावर एक विमान लॅण्डिंग करून धावपट्टी सोडते तेव्हा दुसरे विमान टेक ऑफ साठी धावू लागते. आणि ते टेक ऑफ करेपर्यंत तिसरे विमान लॅण्डिंग करण्यासाठी पोचलेले असते. एकूणच हा प्रकार भीतीदायक वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मी मुंबई विमानतळावर फ्लाईट

गवि
Tue, 09/27/2011 - 11:21 नवीन
मी मुंबई विमानतळावर फ्लाईट डिस्पॅचमधे काम करत असताना (२००० च्या सुमारास) सात आठ विमाने स्टार्टअप करुन रांगेत उभी असायची. इंजिन सुरु केल्यापासून आणि रोलआउटपासून प्रत्यक्ष डिपार्चरला अर्धा-पाऊण तासही लागायचा. मिनिटामिनिटाला नुसता उभ्याउभ्या इंजिन जाळून हजारोंचा धूर होत असायचा. काही प्रसंगी वाट बघून बघून फ्युएल लेव्हल इतकी कमी झाली की परत इंधन भरावं लागलं असंही घडलेलं आहे. हल्लीचं माहीत नाही. डीले होत नसावेत बहुधा.. काय मॅनेजमेंट केलीय कोण जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

पाऊण तास एकदाच डिले झालेला

रेवती
Fri, 09/30/2011 - 21:28 नवीन
पाऊण तास एकदाच डिले झालेला आठवतोय. नंतर मात्र १५ मिनिटे ते ३० मिनिटे अनेकवेळा इतरही विमानतळांवर झालेला आहे. नुकतेच बॉस्टनहून शिकागोला येताना दोन तासांच्या प्रवासाला चार तास लागले. म्हणजे प्रवास २ तासातच झाला बाकीवेळ आम्ही दोन्ही विमानताळांवर हजारोंचा धूर काढत उभे होतो. माझ्या मनात एक (बावळट) शंका आहे ती म्हणजे आपले मोबईल फोन्स बंद करावे लागत असताना एकदा आम्ही बॉस्टनला विमानात बसल्याबसल्या पाच मिनिटात झोपलो ते फ्रांकफूर्टलाच जागे झालो. दोघांचेही फोन्स चालू अवस्थेतच राहिले. त्याने विमानाला सिग्नल मिळताना काही प्रश्न आला असेल का हे बरेच दिवसांपासून तुम्हाला विचारायचे होते. (हुश्श्य! शंका तरी विचारली.....उत्तर वेळ असेल तेंव्हा द्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मोबाईल सिग्नलमुळे तसा काही

गवि
Fri, 09/30/2011 - 23:01 नवीन
मोबाईल सिग्नलमुळे तसा काही इंटरफेरन्स होत नाही हो खरं म्हणजे. तसं कधी सिद्धही झालेलं नाही. पण एक शक्यता गृहीत धरुन प्रिकॉशन म्हणून तो नियम केलाय. आता फ्लाईटमधे मोबाईल वापरु द्यावा अशा विचाराचा जोर इंडस्ट्रीत वाढतोय. होईल लवकर तेही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

उत्तराबद्दल धन्यवाद!

रेवती
Sat, 10/01/2011 - 01:52 नवीन
उत्तराबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अद्भूत....

प्रभाकर पेठकर
Mon, 09/26/2011 - 20:30 नवीन
विमान चालकाच्या अद्भूत विश्वातील गणिते वाचताना मनस्वी थरार जाणवतो. आज पर्यंत अनेक विमानप्रवास घडले, पण एवढी गणिते त्यात असतात हे ठाऊक नव्हते. मला वाटायचे दिसला एअरपोर्ट की उतरव विमान इतके सोपे असेल. (अर्थात नियंत्रण मनोर्‍याशी संवाद साधूनच). अजून भरपूर लेख येऊ द्या. उत्सुकतेने वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Mon, 09/26/2011 - 21:01 नवीन
बरीच नवी माहिती मिळतेय. ओव्हर!
  • Log in or register to post comments

गविभौ,

प्रास
Mon, 09/26/2011 - 21:24 नवीन
हा लेखांचा डब्बल बार ठासून भरलाय राव आज! लेख काहीसा तान्त्रिक असल्याने घाईघाईने वाचून समजणारा नाहीए. पण तेवढाच माहितीपूर्ण आहे. आवडला. वरचा सोमवार हा गविवार कॉन्सेप्ट छान आहे. होऊन जाऊदे तसंच!!! तुमचा फ्याण :-)
  • Log in or register to post comments

प्रतिसादास

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 09/26/2011 - 21:25 नवीन
निट वाचून प्रतिसादास जागा राखून ठेवतो...
  • Log in or register to post comments

मस्त

नितिन थत्ते
Mon, 09/26/2011 - 21:42 नवीन
दोन्ही भाग मस्त. दोन भागांत थोडी गॅप असावी असं वाटतं.
  • Log in or register to post comments

आम्हाला नविन माहीती मिळाली.

शिल्पा ब
Mon, 09/26/2011 - 22:02 नवीन
आम्हाला नविन माहीती मिळाली. छान. गणित, विज्ञान प्रकार डोक्याबाहेरुनच सर्कीट करुन गेले पण बाकी छान.
  • Log in or register to post comments

आनखीन येउद्यात !!!

जगड्या
Mon, 09/26/2011 - 22:18 नवीन
आनखीन येउद्यात !!!
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण लेखमालिका! बहुतेक

पिवळा डांबिस
Mon, 09/26/2011 - 22:38 नवीन
माहितीपूर्ण लेखमालिका! बहुतेक माहिती मला नवी असल्याने आवडली. गवि, पुढील भागांसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा!!!! (बाकी त्या खट्याळ नायल्याला ह्या धाग्यापुरता का होईना पण अभ्यासू नायल्या केल्याबद्दल अनेक धन्यवाद!!!!;))
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

पाषाणभेद
Tue, 09/27/2011 - 01:24 नवीन
सहमत आहे. ओव्हर अँड आउट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

+२

नंदन
Tue, 09/27/2011 - 01:32 नवीन
माहितीपूर्ण लेखमालिका! बहुतेक माहिती मला नवी असल्याने आवडली. गवि, पुढील भागांसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा!!!! (बाकी त्या खट्याळ नायल्याला ह्या धाग्यापुरता का होईना पण अभ्यासू नायल्या केल्याबद्दल अनेक धन्यवाद!!!!)
असेच म्हणतो :). लेख आवडला, गवि. सोबत दिलेली आकृती आणि छोट्या, सुटसुटीत वाक्यांमुळे समजायला सोपा वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

+३

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/27/2011 - 08:11 नवीन
सहमत आहे. नायल्याला अभ्यासू बनवण्याबद्दल गविंना लष्कर-ए-खरडातर्फे विमानरत्न हा पुरस्कार देण्यात येत आहे. गविवारचा फंडाही आवडला. गवि, हा ही लेख मस्तच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सहीच आहे... वाचुन हिथ्रो

अंतु बर्वा
Mon, 09/26/2011 - 22:46 नवीन
सहीच आहे... वाचुन हिथ्रो एअरपोर्टचा हा विडीओ आठवला.. http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=GLNbYqraTgE
  • Log in or register to post comments

थरारक माहीती मिळाली

शिल्पा ब
Tue, 09/27/2011 - 00:28 नवीन
थरारक माहीती मिळाली व्हीडीओतुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा

विमानांची कमी वेळातली उड्डाणे

रेवती
Tue, 09/27/2011 - 01:32 नवीन
विमानांची कमी वेळातली उड्डाणे थरारक आहेत. एकूणच व्हिडीओ आवडला. धन्यवाद! एरवी पेंगलेले पॅसेंजर्स या कश्याचीही दखल न घेता हजारो मैल प्रवास करत असतात. हिथ्रोवरून तीन चार वेळा जायचा योग आला पण हा विचार मनात आला नव्हता. त्यांच्याकडे बांधकाम मात्र सतत चालू असायचे म्हणून वैताग यायचा.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा

आयला असं आहे होय??

जे.पी.मॉर्गन
Fri, 09/30/2011 - 17:16 नवीन
हाउन्स्लोला असताना मिनिटागणिक एक विमान उतरताना दिसायचं... अहो म्हणजे ती विमानं त्यांचा "स्टॅक" सोडून "बेस लेग" पूर्ण करून "फायनल लेग" ला येऊन "टचडाऊन" ला लाईनअप व्हायची हो ... बाकी काहीच नाही ;) आता काय कौतुक त्याचं? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा

लेखांक आवडला

धनंजय
Tue, 09/27/2011 - 00:53 नवीन
लेखांक आवडला
  • Log in or register to post comments

अप्रतीम...

आत्मशून्य
Tue, 09/27/2011 - 03:02 नवीन
बाकी तूमचं लीखाण वाचून उद्याच एखादा अ‍ॅक्शनपॅक्ड फ्लाइट सिम्यूलेटर गेम इंन्स्टाल करायची खूमखूमी आली आहेच, पण दूधाची तहान ताकावर म्हणून आताच गूगल अर्थ लोडवलय व त्यातला फ्लाइट सिम्यूलेटर वापरून प्रत्यक्ष जगाची व्हर्चूअल सफर सूरू केलि आहे.... कंट्रोलींग थोडं किचकट आहे (टेक ऑफलाच क्रॅशतोय) पण हळू हळू मजा येतेय.... डोगराच्या कड्यावरून समोरील दरीत वार्‍याच्या झोतावर मस्त स्वार होऊन पंख पसरून एकाच जागी स्थीर राहणारा पक्षी (जणू ध्यान करतोय)बघून जाम भारी वाटतं पण यामागच शास्त्र/कला माणसाला अवगत करणे खरोखरच कसरत :) पूलेशू.
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण लेखमालिका !

रामदास
Tue, 09/27/2011 - 08:21 नवीन
गगनविहारी करून टाकलं तुम्ही आम्हाला. तांत्रीक माहीतीसोबत थोडसं ते हवाई सुंदर्‍यांबद्दलही चार शब्द लिहावे असे म्हणून बघतो.
  • Log in or register to post comments

+१००

मदनबाण
Tue, 09/27/2011 - 09:26 नवीन
तांत्रीक माहीतीसोबत थोडसं ते हवाई सुंदर्‍यांबद्दलही चार शब्द लिहावे असे म्हणून बघतो. खी खी खी ;) अगदी अगदी ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

हवाई सुंदर्‍यांबद्दलही चार

माझीही शॅम्पेन
Sat, 10/01/2011 - 09:30 नवीन
हवाई सुंदर्‍यांबद्दलही चार शब्द लिहावे असे म्हणून बघतो.
काका आत्ता ट्यूब पेटली की एयर इंडिया मध्ये मध्यमवयिन (किवा ओल्ड वाइन) हवाईसुन्दरीना का निवृत्त करत नाहीत ते :) (उड्डाण प्रेमी) शॅम्पेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

मस्त !!!

मनराव
Tue, 09/27/2011 - 14:49 नवीन
मस्त !!!
  • Log in or register to post comments

मस्त!

मन१
Tue, 09/27/2011 - 15:42 नवीन
प्रचंड आवडलं.
  • Log in or register to post comments

स्टॉलिंग स्पीड

इष्टुर फाकडा
Tue, 09/27/2011 - 19:13 नवीन
लढाऊ विमाने आणि वाहतुकीची विमाने यांच्या स्टॉलिंग स्पीड चे जरा आकडे द्याना गवि.... कारण साधारणपणे लढाऊ विमाने हि जास्त स्पीडी असतात असे वाटते...म्हणूनच या स्टॉलिंग स्पीड चा त्यांच्या लढाऊ कार्यक्षमतेशी संबंध असावा असे वाटते...जरा प्रकाश टाकावा. बाकी तुमचे सगळेच लेख आवडतात, हा तर तुमच्या नावालाच जगणारा लेख आहे :)
  • Log in or register to post comments

एक शंका : पूर्व दिशेला ९०

बिपिन कार्यकर्ते
Fri, 09/30/2011 - 14:52 नवीन
एक शंका : पूर्व दिशेला ९० ऐवजी ०९ का म्हणतात?
  • Log in or register to post comments

०००, ०९०, १८०, २७० असे तीन

गवि
Fri, 09/30/2011 - 14:57 नवीन
०००, ०९०, १८०, २७० असे तीन डिजिटमधे दिशेचे आकडे सांगतात आणि संक्षिप्तपणासाठी पहिले दोन आकडेच घेतात. (दहा डिग्री राऊंडेड अप)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा