घडलंय असं आज...
आॅफिसला जाण्याची सकाळची गडबड. लवकर कसं पोहचू? ट्रेन उशीर तर करणार नाहीत ना? आजचं काम व्यवस्थित होईल का? असे सगळे प्रश्न डोक्यात ठेवून आपण धावत सुटतो, अगदी आजूबाजूचं जग विसरून. इतकं की आपल्या सभोवती घटणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींकडेही आपलं लक्ष जात नाही इतके आपण यांत्रिकपणे पळत सुटलोय. पण आज समोर घटणाऱ्या दोन घटनांनी या यांत्रिक आयुष्यातून किंचितही का होईना मला बाहेर पडण्यास मदत झाली.
सकाळी स्टेशनला आत शिरताना बाहेर ठाणं मांडून बसलेल्या विक्रेत्यांचा अडसर हा रोजचाच. या अनधिकृत विक्रेत्यांसोबत बेशिस्त रिक्षावाले, रस्त्यावरच फतकल मारून बसलेले अनेक भिकारी तुम्हाला दिव्यत्वाची पावलोपावली प्रचिती देत असतातच. पण ते एक असोच. आज मात्र या सगळ्यातून एक गोष्ट पटकन नजरेत भरली आणि थोडंसं भानावर आलो. बाहेर बसलेल्या विक्रेत्यांच्या रांगेत एक 'आई' बसली होती. समोर खाद्यपदार्थांची पाकिटे भरलेला प्लास्टिकचा ट्रे गिऱ्हाईकांची वाट बघत होता. मांडीवर झोपलेले तान्हे बाळ पदराखाली त्याची भूक शमवत होते. आणि या सगळ्याच्या पलीकडे असलेली ती 'आई' कम विक्रेता मस्तपैकी एकीकडे मांडी हलवून बाळाला जोजवत होती तर दुसरीकडे हातात असलेल्या अॅन्ड्राॅईड मोबाईलवर कार रेसिंगचा गेम खेळून तिच्या पद्धतीने तिचं आयुष्य जगू पाहत होती. जे काही दृश्य डोळ्यांनी पाह्यलं ते जितकं मजेदार होतं, एकदम भारी होतं, तितकंच नकळतपणे जगण्याची नवी उमेदही शिकवून गेलं. गिऱ्हाईके मिळतील का? माल संपेल का? बाळ व्यवस्थित झोपेल का? या सगळ्या चिंता पाठी टाकून तिला मिळालेला तो क्षण तिच्या पद्धतीने मस्तपैकी जगत होती आणि हीच गोष्ट मला प्रचंड आवडली.
दुसरा अनुभव संध्याकाळचा. कामं उरकलं आणि आवरून आॅफिसच्या 'कम्फर्ट' वातावरणातून बाहेर पडत त्यावेळी जाणवलेल्या दमट आणि उकडणाऱ्या वातावरणाला शिव्या घालत गेटमधून बाहेर पडलो. अगदी शंभर पावलेही चाललो नसेल तोच एक लहानसा मुलगा, अगदी सहा-सात वर्षांचा, हातातल्या पेनाने इलेक्ट्रीक डिबीवर पेस्ट केलेल्या कुठल्याश्या 'लोन चाहिये, हमारे पास आईये' टाईप जाहिरातीच्या कागदावर काहीतरी करण्यात मग्न झाला होता. दुरुन पाहताना असं वाटलं कि त्याच्या बालसुलभ वयानुारा पेनाने उगाच रेघोट्या मारून मस्ती करत असावा. पण जेव्हा बाजूला जावून नीट निरखून पाह्यलं तेव्हा कळालं, हा पठ्ठ्या हातातल्या पेनाने त्या समोर आलेल्या कागदावर अंक गिरवत होता. त्याच्या बाजूला त्याच्यापेक्षा किंचित वयाने मोठी असलेली त्याची ताईही जाहिरातीवरची काळी अक्षरे वाचण्याचा प्रयत्न करत होती आणि तिच्याही बाजूला त्या दोघांची आई सर्वात लहान मुलाला मांडीवर जोजवून झोपवत होती.
लहानपणी पैसे नसायचे तेव्हा आधीच्या वर्षी वह्या गोळा करून त्यांची उरलेली पाने व्यवस्थित बाजूला काढायचो आणि त्या बाजूला काढलेल्या पानांना एकत्र करून त्याच्यावर बाईंडिंग करून पुन्हा वापरायचो. पहिल्या सहामाहीपर्यंत निश्चितच चालायच्या, त्या बाईंडिंग केलेल्या वह्या. आज त्या लहानग्याला बघितल्यानंतर या गोष्टीची प्रकर्षाने आठवण झाली आणि ते दृश्य बघून न बघितल्या सारखे करत पुढे दहा पावले गेलेलो मी काही विचार करून पुन्हा पाठी आलो.
आधी त्या लहान मुलाला विचारलं “नोटबूक चाहीये क्या लिखनेके लिए?"
गडी काहीच बोलेना. तेव्हा पुन्हा एकवार विचारलं “नोटबूक लाके दे दू क्या?"
यावेळी त्याची आई बोलली “दादा, नोटबूक नही पैसा दे दो, मै बादके लेके दुंगी."
“नही. अभी पैसा दुंगा तो आप बूक नही लोगे. पैसा एेसेही वेस्ट करोगे और वो फिर किसी पेस्ट किए हुए कागज पर लिखेगा."
तिच्या तीनही मुलांकडे आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहून आधी पैसे देवून टाकावे आणि निघावे असा विचार केला. पण नंतर क्षणातच तो विचार झटकत बाजूच्या स्टेशनरी दुकानातून एक साधेसे नोटबूक घेऊन त्या मुलाच्या हातात दिलं आणि काही पुढे काहीही न बोलता त्या चौघांकडेही पाठ करून मी मेट्रोच्या दिशेने चालू लागलो. सकाळच्या घटनेचा संध्याकाळच्या घटनेशी एक अदृश्य आणि घट्ट धागा जोडला गेला होता. मी फक्त निमित्तमात्र होतो.!!
प्रतिक्रिया
मस्त रे किसनदेवा. वेलकम बॅक.
मस्त देवा
मस्तय
११० टक्के मार्क!
आवडलं!!
किसना
किती योग्य जागी शुद्धता
सुरेख.
साधच लिहीलंय पण मस्त लिहीलंय.
किसण्देव धी ग्रेट
वेलकम ब्याक देवा...
मस्तच
मस्तच
अरे बस कर पगले...
सुंदर अनुभव कथन. खूप आवडलं.
चांगलं लिहिलं आहे.
मस्तं लिहिलंय.
+1
लेखन आवडलं.
भावदर्शी लेखन आवडले.
साधं सुटसुटीत मस्त
मस्त!
मस्त लिहिलंय. आवडलं
खूप छान! पैसे देण्याऐवजी
लेखकाने थांबू नये, पॉजु पण नये