पावरफुल्ल तोडी

अन्वय's picture
अन्वय in जनातलं, मनातलं
21 Oct 2009 - 1:03 am

दुसरे महायुद्ध सुरू होण्याआधी (1933) प्रख्यात शास्त्रीय गायक ओंकारनाथ ठाकूर एकदा युरोपमध्ये संगीत दौऱ्यावर गेले होते. याच दौऱ्यात त्यांना इटलीत जाण्याचा योग आला. मुसोलिनी त्यावेळी इटलीचा सर्वेसर्वा होता. त्याला भारतीय शास्त्रीय संगीत ऐकविण्याची ओंकारनाथांची इच्छा झाली. मुसोलिनीच्या सचिवामार्फत त्यांनी मुसोलिनीला गाणं ऐकविण्याची परवानगी मिळविली. पाच मिनिटात गाणं संपवायचे ही अट होती. पंडितजींनी ती मान्य करून मुसोलिनीसमोर तोडी राग गाण्यास सुरवात केली. वेळ संपत आली; पण मुसोलिनीला गायनाने भारावून गेला होता. त्यानं पंडितजींना खुणेने गात राहायला सांगितलं. तोडी सुरूच होता. या रागातील करुण स्वरांनी हुकूमशहा मुसोलिनी हेलावला. त्याचे डोळे पाण्याने डबडबले...(असं म्हणतात!) पण असं विरघळून जाणं आपल्याला परवडणारं नाही, हे त्याच्या लक्षात आल्यावर त्यांनं ओकारनाथांना गाण थांबविण्याची विनंती केली म्हणे. मुसोलिनीला निद्रानाश हा आजार होता. तोही पंडितजींचा गायनाने बरा झाला, असंही आम्ही वाचलंय.

हा किस्सा इथे देण्याचं कारण म्हणजे आम्हाला तोडी रागाचा असाच अनुभव आलाय.
परवा दिवाळी पहाट कार्यक्रमात विजय कोपरकर यांचे गायन होते. आम्ही गजर लावून साडेपाचला उठलो आणि लगबग करीत सहाच्या ठोक्‍याला कार्यक्रमस्थळी हजर झालो. कोपरकर मंचावर आले. इलेक्‍ट्रॉनिक तानपुरा झंकारला. स्वरमंडल त्यांच्या हातात होतेच. "मी आज मियॉं की तोडी सादर करणार आहे.' कोपरकरांनी उद्‌घोषणा केली. आम्ही सावरून बसलो. आमचे प्राण कानात आले होते!
गायन सुरू झालं. एकतालातला ख्याल त्यांनी सुरू केला. पाच दहा मिनिटांचा अवधी गेला असेल. आम्हाला अचानक पेंग आली. जांभाया येऊ लागल्या. म्हटलं, अरेच्चा. असं का होतय? आम्ही झोप आवरून निगुतीनं गाणं ऐकण्याचा प्रयत्न करीत होतो. जसजसं आम्ही गाणं ऐकत होतो. तसतशी पेंग वाढत होती. शेवटी आमच्या संयमाचा कडेलोट झाला. काही कळायच्या आत आम्ही खुर्चीत चक्क झोपी गेलो.
शेजारच्या बापड्यानं (बापड्याच होता तो) आम्हाला उठवलं. म्हटला, अहो झोपताय काय?
म्हटलं, "सॉरी हं'
आमची झोप काही थांबत नव्हती. पुन्हा आम्ही गुडूप झालो. खुर्चीवर झोपल्यानं बाजूला कशाचा आधार नव्हता. डुलकीमुळे आमचा तोल गेला आणि जाग आली. तेव्हा शेजारची खुर्ची मोकळी होती.
शेजारची ब्याद गेली म्हणून आम्ही आनंदाने पुन्हा डोळे झाकले. जरा वेळानं माझ्यापासून एक खुर्ची सोडून बसलेल्या एका भल्या माणसानं मला गदगदा हलवून उठवलं आणि हळूच कानात सांगितलं,
""महाराज, बराचवेळपासून आपण घोरत आहात. त्याचा इतरांना त्रास होतोय. गायनाचा आस्वाद घेता येत नाही.''
आम्ही गडबडलो. आजूबाजूला नजर टाकली. सगळ्याच नजरा दाटओठ खात माझ्याकडे पाहात आहेत, असं मला वाटलं. थोडा ओशाळलोच म्हणा.
म्हटलं, सायबा उठा आता अन निघा.
कार्यक्रमस्थळातून बाहेर आलो. गाडीला कीक मारली आणि थेट घर गाठले. उरलेल्या झोपेचा बॅकलॉग आम्ही घरी येऊन भरून काढला. दोन तासांनी उठल्यानंतर हा किस्सा घरच्यांना ऐकवला. त्यांची तर हसूनहसून पुरेवाट झाली.
आम्हाला मात्र या प्रसंगाने लाजविले होते. असं का झालं असेल, असा विचार आम्ही करू लागलो... तेव्हा आम्हाला पं. ओंकारनाथ ठाकूर आणि मुसोलिनीचा किस्सा आठवला.
म्हटलं, च्यायला बरोबर. तोडीनं झोपवलं आपल्याला!

संगीतविनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

21 Oct 2009 - 9:42 am | प्रमोद देव

अन्वयशेठ तोडलंत! ;)
गायक-वादकासहीत इतर श्रोतेगणांची काय अवस्था झाली होती? :)

अवांतर:झोप येत नसेल तर माझं गाणं ऐका. कारण मी नुसता गाण्याचा विचार जरी केला तरी मलाच शेकडो जांभया यायला लागतात...तेव्हां श्रोत्यांचं काय होत असेल ह्याची कल्पना करू शकता. :D

कुणी निंदा,कुणी वंदा!
आमचा चाली लावण्याचा छंदा!!

पाषाणभेद's picture

21 Oct 2009 - 10:38 am | पाषाणभेद

वा छानच किस्सा.

--------------------
पासानभेद
(महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)

विष्णुसूत's picture

21 Oct 2009 - 12:25 pm | विष्णुसूत

अन्वय साहेब,
तोडि नी झोप लागते हे पहिल्यांदाच ऐकले. तोडि हा राग ( थाट) पहाटे/सकाळी गायला जातो असे ऐकले होते. मला हा थाट फार आवडतो. मुसोलीनी ची गोष्ट आवडली.

आनंद's picture

21 Oct 2009 - 4:33 pm | आनंद

ह.ह.पु.वा.
तोडी ची चकती आणली पाहीजे.
बाकी निद्रानाशा वरती उपाय म्हणुन काही जालीय दिवाळी अंकाचा ही चांगला उपयोग होतो.

गणपा's picture

21 Oct 2009 - 4:52 pm | गणपा

हा हा हा.. मस्त किस्सा रे अन्वया.

--गणपा घोरी.

अन्वय's picture

23 Oct 2009 - 12:28 am | अन्वय

यापुढे आम्ही तोडी जरा जपूनच ऐकू
विशेषत: घरी असतानाच ऐकू