पूर्व प्रसिद्धी - रविवार सकाळ, १९.०४. १९९८
राजा विक्रमादित्याने आपला हट्ट काही सोडला नाही. त्याने झाडावरचे प्रेत आपल्या खांद्यावर ऒढून घेतले आणि तो स्मशानाचा रस्ता चालू लागला. राजाच्या चिकाटीने प्रभावित होऊन प्रेतामधला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला आणि म्हणाला, "राजा तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतुक वाटतॆ. तुझे कष्ट थोडेफार हलके व्हावेत म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतॊ."
"फार पूर्वी या पृथ्वीतलावर प्रवृत्तिपाद आणि निवृत्तिपाद या नावाचे दोन फार मोठे राजे होऊन गेले. प्रवृत्तिपादाच्या राज्याचे नाव होते प्रवृत्तिपुर आणि निवृत्तिपादाच्या राज्याचे नाव होते निवृत्तिपुर. एका राज्यातून दूस-या राज्यात जाताना अनेक डोंगरद-या, नद्यानाले, हिंस्र श्वापदांनी भरलेली घोर अरण्ये आणि सात समुद्र पार करावे लागत. दोन्ही राजांच्या प्रजेची राहणी फारच भिन्न होती. दोन्ही राजांच्या नावाप्रमाणे एक राज्य प्रवृत्तीचे उपासक होते तर दूसरे निवृत्तीचे. निवृत्तिपुराची लोकसंख्या प्रवृत्तिपुराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त होती, तर प्रवृत्तिपुराच्या प्रजेची समृद्धी अधिक होती. राजा प्रवृत्तिपाद आपल्या प्रजेला सर्व प्रकारची ऐहिक सुखे उपभोगत यावीत म्हणून झटत असे. त्याने राज्याची भरभराट व्हावी म्हणून व्यापार, उद्योगधंदे, शिक्षण यांना उत्तेजन दिले. प्रवृत्तिपुरातील व्यापारी माती सोन्याच्या भावाने विकत, तर निवृत्तिपुरात सोने मातीच्या भावाने विकले जाई."
"प्रवृत्तिपुरातील विद्यापीठे देशोदेशींच्या विद्वानांनी गजबजून गेली होती. या विद्यापीठांचे जगभरच्या बुद्धिमान विद्यार्थ्यांमध्ये खूप आकर्षण होते. निवृत्तिपुरात मात्र वेगळी परिस्थिती होती. निवृत्तिपुराला हजारो वर्षांचा इतिहास लाभला होता. या इतिहासाचा खराखोटा अभिमान तेथील पौरजन त्यांच्या साध्यासाध्या व्यवहारांमध्ये पण लपवू शकत नसत. निवृत्तिपुरात अनेक उद्योगधंदे चालत. चालणारे चालत, न चालणारे आजारी पडत. आजारी उद्योगांना निवृत्तिपाद मोठमोठी अनुदाने देत असे. निवृत्तिपुरात पण विद्यापीठे होती. काही मोजक्या विद्यापीठातील मोजके विद्यार्थी सोडले, तर एका मोठया ईश्वरी लीलेमुळेच की काय, बाकीचे विद्यार्थी मोठमोठ्या पदव्या प्राप्त करून सुद्धा नोकरीच्या शोधात वणवण भटकत असत."
वेताळ म्हणाला, "हे मित्रा, सांगत काय होतो की जग जिंकण्याच्या ईर्ष्येने प्रवृत्तिपादाने मोठे सैन्य बाळगले होते. सैन्याला लागणारी अद्ययावत आयुधे तयार करणा-या मोठ्मोठ्या यंत्रशाळांची त्याने स्थापना केली होती. देशोदेशींचे कुशल कारागीर तेथे वेगवेगळी यंत्रे आणि आयुधे तयार करण्या साठी अहोरात्र खपत असत. प्रवृत्तीपादाच्या यंत्रशाळामध्ये तयार झालेले रथ मात्र संपूर्ण भूतलावर कीर्ती प्राप्त करून होते. याशिवाय, प्रत्यक्ष आदित्याच्या रथाशीच बरोबरी होऊ शकेल अशा "मरुत्सखा" नावाच्या रथांची निर्मिती तेथील कारागीरांनी केली होती. हे रथ वेगवान असल्यामुळे त्यांच्या जोरावर राजा प्रवृत्तिपाद अनेक युद्धे जिंकला होता. त्याच्या मांडलिकांकडून प्रवृत्तिपुरात निर्माण झालेल्या रथांना मोठी मागणी असे. साहजिकच या रथांची कीर्ती निवृत्तिपुरापर्यंत पोचली होती. अशा रथांची आपल्याला आवश्यकताच नाही या विचाराने प्रत्येकजण आपापल्या दिनचर्येत गुंतला होता."
"प्रवृत्तिपादाला मात्र त्याच्या हूशार प्रधानांनी एकदा सल्ला दिला, की राजा आपण उत्तमोत्तम रथ बनवले तरी ते चालवण्यासाठी लागणारे योग्य सारथी आपल्याकडे नाहीत." यावर राजा प्रवृत्तिपाद चमकला. त्याने प्रधानांना उपाय विचारला. तेव्हा एक प्रधान म्हणाला, "राजा, निवृत्तिपादाची प्रजा खूप मोठी आहे. याशिवाय तेथे विद्वानांची आणि पंडितांची खूप उपासमार होते, असे ऐकले आहे. तेव्हा आपले जुने रथ आपण निवृत्तिपुरात विकायला नेऊ आणि तेथे उत्तमोत्तम सारथी निर्माण करून आपल्या राज्यात आणू." यावर प्रवृत्तिपादाने संमती दर्शवली. पण सर्वाना प्रश्न पडला की निवृत्तिपादाच्या राज्यात रथ विकायचे कसे? यावर सर्व प्रधानांनी एकत्र विचार करून एक नामी शक्कल काढली. निवृत्तिपादाच्या प्रजेचे संस्कृतिप्रेम त्यांना ठाऊक होते. त्यांनी एक वावडी उठवून द्यायचे ठरवले, की मरुत्सखा या रथाची रचना निवृत्तिपुरात होऊन गेलेल्या एका ऋषींच्या ग्रंथात सापडली आहे.
"ही वावडी सात समुद्र, हिंस्र श्वापदांनी भरलेली घोर अरण्ये, डोंगरद-या, आणि नद्यानाले पार करून निवृत्तिपुरात आली तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा एकच धक्का बसला. सगळेजण हे आपल्याला माहित कसे नाही, असे एकमेकांस विचारू लागला. मरूत्सखाचे तंत्रज्ञान आपल्या नगरात विकास पावले, हे ऐकून सगळ्यांचा उर अभिमानाने भरुन आला. बौद्धिक स्वामित्वाची फार मोठी जाणीव निवृत्तिपादाच्या प्रजेला यानिमित्ताने झाली. या घटनेला उपलक्षून निवृत्तिपादाने मोठ्या दक्षिणा देऊन विद्वत्परिषदा आणि पंडितचर्चा घडवून आणल्या. सर्व चर्चा आणि परिषदांतून निवृत्तिपुराच्या प्राचीन संस्कृतीचा अभिमान जोमाने बाहेर पडला. आपल्या राज्यात एखादी कल्पना मांडली जावी आणि ती प्रवृत्तिपादाच्या राज्यात विकास पावावी, हे निवृत्तीपादाला रूचेना. त्याने वाट्टेल ती किंमत मोजून रथांची आयात करायचे ठरविले. आयात केलेले रथ चालविण्यासाठी सारथी तयार करणा-या शाळा काढल्या. या शाळातून बाहेर पडलेले सारथी प्रवृत्तिपादाच्या राज्यात जाऊन उपजीविका करू लागले. पण गमतीची गोष्ट अशी, की प्रवृत्तिपादाने मरूत्सखा सोडून सर्व प्रकारचे रथ निवृत्तीपादास विकले. पण राजा निवृत्तिपाद यामुळे खूप अस्वस्थ झाला.
त्याला चैन पडेना. त्यावर त्याच्या प्रधानांनी सल्ला दिला, "राजन, आ
पण एका संशोधन मंदिराची स्थापना करून प्रति-मरूत्सखाची निर्मिती करावी." आश्चर्य म्हणजे ही कल्पना राजाला ताबडतोब पटली. त्याने लगेच निधी मंजूर करून प्रति-मरूत्सखा संशोधन मंदिराची स्थापना करण्याच आदेश दिला. रात्रंदिवस खपून एखाद्या मयसभेप्रमाणे वाटणा-या या संशोधन मंदिराची निर्मिती केली गेली. अनेक बुद्धिमान लोकांना निवृत्तिपादाने तेथे नेमले. ही बातमी प्रवृत्तिपुरात जेव्हा पोचली तेव्हा प्रत्येक जण निवृत्तिपुरास परतण्याचे स्वप्न रंगवू लागला."
"प्रति-मरूत्सखा संशोधन मंदिरात अनेक चित्र-विचित्र कौशल्याचे कारागिर अहोरात्र खपू लागले. निवृत्तिपुराच्या इतिहासात लिहिले गेलेले सर्व ग्रंथ, पोथ्या-पुराणे अभ्यासण्यात आले. तसेच, रथाच्या निर्मिती सर्व प्रकारचे सर्व भाग आयात करण्यात आले. एका चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर प्रति-मरूत्सखाची निर्मिती करण्यात आल्याचे निवृत्तिपादाने जाहिर केले. ब्रह्मवृंदाकरवी षोडषोपचारे पूजा करून झाल्यावर प्रति-मरूत्सखा पौरजनांना दर्शनासाठी खुला केला गेला. निवृत्तिपादाच्या राजवाड्यावर प्रति-मरूत्सखा बघण्यासाठी ही मोठी गर्दी लोटली. प्रत्येकाला उत्सुकता होती, की प्रति-मरूत्सखा चालतो कसा? कल्पनेला ताण देऊन प्रत्येकजण आपापसात पैजा मारू लागला. राजाने पण आनंदाच्या भरात एका नव्या रथाच्या निर्मितीची घोषणा केली. अशाच एका चैत्र शुद्ध प्रतिपदेला विधिवत पूजा करून तो सर्वांना बघण्यासाठी खुला केला."
वेताळ पुढे म्हणाला, " ही बातमी दूतांमार्फत प्रवृत्तिपादाच्या राजवाड्यावर पोचली, तेव्हा
तो निद्राधीन झाला होता. प्रधानांना कळेना राजाला उठवून सांगावे की नाही. शेवटी एका प्रधानाने धीर करून प्रवृत्तिपादाला उठवून
प्रति-मरूत्सखा निर्मितीचे वृत्त सांगितले, पण यावर राजाने मात्र 'ठीक आहे' असे म्हणून कुस बदलली आणि तो पुन्हा घोरू लागला."
येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, "मित्रा, प्रवृत्तिपादाला ही बातमी ऐकून काहीच कसे वाटले नाही? या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असून तू दिले नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायाशी लोळू लागतील."
यावर विक्रमादित्याने आपले मौन सोडले आणि हसून तो म्हणाला, " हे बघ, निवृत्तिपादाला जग जिंकायची इच्छा कधीच नव्हती आणि
प्रति-मरूत्सखाची निर्मिती फसव्या अभिमानातून झाली, हे लक्षात घे. शिवाय तो चालतॊ कसा हे कुणीच कधी बघितले नव्हते. युद्ध जिंकण्याची गोष्ट दूरच राहू दे."
या उत्तराने वेताळ खूष झाला आणि विक्रमादित्याचा मौनभंग झाल्याने प्रेतासह झाडावर जाऊन लोंबकळू लागला.
प्रतिक्रिया
9 Sep 2009 - 9:42 am | JAGOMOHANPYARE
आयला या वेताळाच्या... याचं प्रेत काय अजून सडायला तयार नाही!
वैज्ञानिक निष्कर्ष : प्रवृत्तीपुरात फॉर्मॅलिनची फॅक्टरी पण होती !
:)
9 Sep 2009 - 9:44 am | अवलिया
परम संतोष !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
9 Sep 2009 - 9:49 am | दशानन
तुम्ही ह्या दशकामध्ये काही लिहलेले नाही काय :?
=))
****
बाय द वे, कथा आवडली व तात्पर्य देखील !
9 Sep 2009 - 10:23 am | प्रकाश घाटपांडे
सुंदर कथा. धन्यवाद युयुत्सु
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
9 Sep 2009 - 11:19 am | विसुनाना
कथा आवडली.
9 Sep 2009 - 3:31 pm | नाना बेरके
कथा आवडली.
9 Sep 2009 - 3:56 pm | लिखाळ
हा हा .. कथा छान आहे. मजेदार आहे.
१९९८ सालात लिहिलेली कथा २००९ मध्ये सुद्धा पटणारी आहे ही बाब महत्वाची. पुराणकथा असतातच थोर आणि ज्या भूमीमध्ये त्या घडल्या त्या भूमीवरील जनतासुद्धा!!
-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?
9 Sep 2009 - 5:28 pm | युयुत्सु
सर्व अभिप्रायांबद्दल मनापासून धन्यवाद!
9 Sep 2009 - 5:29 pm | युयुत्सु
सर्व अभिप्रायांबद्दल मनापासून धन्यवाद!
9 Sep 2009 - 7:47 pm | फ्रॅक्चर बंड्या
भारी कथा आहे...
भारतातले संगणक कामगार मला त्या सारथ्यांसारखे वाटले.
अमेरिका - भारत असे काहीतरी गुंता आहे असे पण वाटतय
9 Sep 2009 - 9:02 pm | गणपा
हेच बोल्तो...
(सारथी) गण्या.
9 Sep 2009 - 8:12 pm | प्राजु
मस्त आहे कथा..
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Sep 2009 - 9:55 pm | संजय अभ्यंकर
भारतातल्या अनेक क्षेत्रांना हि कथा लागू होते.
अनेक संशोधने भारतात पुराणकाळातच होउन गेली म्हणून आम्ही आमचे कुले थोपटून घेत असतो.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
10 Sep 2009 - 12:06 pm | हृषीकेश पतकी
आवडली...
आपला हृषी !!
10 Sep 2009 - 5:03 pm | नितिन थत्ते
एका उत्तम रूपक कथे बद्दल युयुत्सुंचे अभिनंदन. :) =D>
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
10 Sep 2009 - 7:46 pm | चतुरंग
येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, "मित्रा, प्रवृत्तिपादाला ही बातमी ऐकून काहीच कसे वाटले नाही? या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असून तू दिले नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायाशी लोळू लागतील."
यावर विक्रमादित्याने आपले मौन सोडले आणि हसून तो म्हणाला, " हे बघ, निवृत्तिपादाला जग जिंकायची इच्छा कधीच नव्हती आणि
प्रति-मरूत्सखाची निर्मिती फसव्या अभिमानातून झाली, हे लक्षात घे. शिवाय तो चालतॊ कसा हे कुणीच कधी बघितले नव्हते. युद्ध जिंकण्याची गोष्ट दूरच राहू दे."
हा शेवटचा अधोरेखित भाग मला संदिग्ध राहिला. त्यामुळे मला कथा नीटशी समजली नाही.
(अमेरिकन महासंगणक आणी भारतीय 'परम' अशी काही बेसलाईन ह्याला आहे का?)
(?)चतुरंग
10 Sep 2009 - 11:39 pm | मिसळभोक्ता
चतुरंगालाच फक्त रूपक कळले आहे.
उपाध्यांची ९८ मधली मनस्थिती मला माहिती होती. त्यावेळी ते एका महासंगणक निर्माण केंद्रात पाट्या टाकत होते.
-- मिसळभोक्ता
11 Sep 2009 - 8:40 am | युयुत्सु
संदिग्धता हा कोणत्याही अव्वल कलाकृतीचा सौंदर्यानुभवासाठी आवश्यक गुणधर्म असतो. जगातील सर्व कलाकृती सर्वाना समजायला हव्यात असा कोणी हट्ट धरू शकत नाही...हो आणखी एक सांगायचे राहिले अमूर्त कलाकृती मध्ये संदिग्धता जास्त प्रमाणात असते.
11 Sep 2009 - 8:58 am | चतुरंग
हा कोणत्याही अव्वल कलाकृतीबाबत सौंदर्यानुभवासाठी आवश्यक गुणधर्म असतो.
हे वाक्य तितकेसे पटले नाही. कारण कलाकृतीचा आस्वाद घेण्याकरता ती पूर्णपणे समजायला तर हवी. हां, संदिग्धता अशा बाबतीत असू शकेल की एकापेक्षा जास्त शेवटाच्या शक्यता आहेत आणी सगळ्याच शक्यता कमीअधिक प्रमाणात बरोबर आहेत. मग त्याठिकाणी वाचकाच्या अनुभवानुसार तो तो शेवट ज्याला त्याला योग्य वाटेल इ.
परंतु शेवट जर समजलाच नाही, पूर्ण गूढच राहिला तर कलाकृती अपूर्ण असल्याप्रमाणे वाटते, अशी संदिग्धता सौंदर्याला बाधक ठरते असे मला वाटते.
आणी हो, आपली अव्वल कलाकृती समजलीच पाहीजे असा आमचा हट्ट नाही...समजली तर समजली नाहीतर योग नव्हता असे म्हणेन!
चतुरंग
11 Sep 2009 - 9:08 am | नितिन थत्ते
लेखात संदिग्धता काहीच नाहीये असे माझे मत आहे. त्यांनी महासंगणकाविषयी लिहिले असेल किंवा सध्या वादात सापडलेल्या अणुस्फोटांविषयी* असेल किंवा चांद्रयान मोहिमेविषयी असेल. ते सारखेच लागू आहे.
पण 'तो चालताना कोणीच बघितलेला नाही' हे वाक्य अनावश्यक वाटले.
(*डिस्क्लेमर: अणुस्फोट - न्यूक्लिअर फ्यूजन चा- यशस्वी झाला की नाही याविषयी हे मतप्रदर्शन नाही. मी स्वतः तरी तो स्फोट यशस्वी झाला होता असेच सध्या समजतो).
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
11 Sep 2009 - 9:15 am | एकलव्य
लेखात संदिग्धता काहीच नाहीये असे माझे मत आहे.
असेच माझेही मत आहे. गोष्टीच्या नावातच सगळे कळते.
असो... प्रयत्न चांगला आहे. कीप ईट अप ;)
11 Sep 2009 - 7:32 am | युयुत्सु
ही कथा पूर्ण काल्पनिक असून त्याचा हयात अथवा मृत व्यक्ती, तसेच घटना यांचा काहीही संबंध नाही. तसा आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
11 Sep 2009 - 9:16 am | नितिन थत्ते
>>निवृत्तिपुराच्या इतिहासात लिहिले गेलेले सर्व ग्रंथ, पोथ्या-पुराणे अभ्यासण्यात आले. तसेच, रथाच्या निर्मिती सर्व प्रकारचे सर्व भाग आयात करण्यात आले.
यातील पहिल्या आणी दुसर्या भागामधला विरोधाभास लै भारी.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
31 Jan 2025 - 9:20 am | युयुत्सु
चीनने ए०आय० सार्वजनिक केल्याने भारत सरकार खडबडून जागे झाल्याने अंमळ मौज वाटली आणि २७ वर्षांपूर्वी रविवार सकाळ मध्ये मीच लिहिलेल्या या कथेची आठवण झाली.
31 Jan 2025 - 10:49 am | विवेकपटाईत
बहुतेक ही कथा दहा वर्षापूर्वीची असावी. कारण आज परिस्थिति बदलेली आहे. आज विक्रमादित्याने वेगळे उत्तर दिले असते.
31 Jan 2025 - 12:49 pm | आग्या१९९०
आज विक्रमादित्याने वेगळे उत्तर दिले असते.
डोलांड हात पिरगळून त्याला हवे ते उत्तर मिळवेल आणि भक्त
चक्रमादित्याच्या म्याव म्यावला सिंहाची डरकाळी म्हणतील.