काल पुन्हा एक न कळणार्या भाषेतला (खरंतर भाषांतला) चित्रपट बघितला आणि पुन्हा एकदा भाषेपलिकडच्या निव्वळ भावनांचा आस्वाद घेता आला. याआधीही अनेकदा झालं आहे आणि याहिवेळी पूर्ण भारावलो आणि घरच्यांना हीच एक कथा दहादा सांगूनहि समाधान झालं नाहि. कोणाला तरी सांगावं असंच वाटत राहिलं म्हणून तडक मिपावर लिहायला बसलो.
तर मी काल बघितला २००२ चा ऑस्कर विजेता चित्रपट "निर्गेन्द्वो इन आफ्रिका". वंश, वर्ण, देश, संस्कृती यांच्या सीमा भेदणारा आणि स्वतःबरोबर प्रेक्षकाच्या मनातील कुंपणांनाहि हलवून सोडणारा हा एक चित्रपट. यात तसं बघायला गेलं तर काळीज पिळवटणार्या दु:खाचा मारा नाहि, सैनिकांची रणभूमी नाहि, आईच्या वात्सल्याने ओथंबलेले डायलॉग नाहित, पत्नी एकपतीव्रता नाहि, ज्यूवरील अत्याचार नाहित, आफ्रिकन वास्तवाचा भडीमार नाहि.. .. पण हे सगळं नाहि नाहि म्हणता म्हणता या सार्या गोष्टी आपल्याला आपसूकच कळतात.. त्यातील बर्याचशा गोष्टी समोर घडत नाहित.. पण झालेल्या जाणवतात.. आपल्या नेहमीच्या आयुष्यातहि आपण किती गोष्टी प्रत्यक्ष झालेल्या बघतो? फार कमी! मात्र आपल्याला बरंच काहि जाणवतं.. तसंच काहितरी या चित्रपटात होत असतं
टिपः यापुढील आस्वादात चित्रपटाची कथा उघड केली आहे
चित्रपट सूरू होतो तो एका आफ्रिकन मुलाच्या सायकल स्वारीने.. आणि मधेच जागाच्या दुसर्या टोकावर जर्मनीमधील एका ज्यू घरात लोक जमले असतात.. सायकलस्वार पोरगा एका डॉक्टरला घेऊन येतो कारण वाल्टर श्रेड्लिच आजारी असतो.. आणि दुसरीकडे त्याच्या बायकोला जेटेलला जर्मनीमधे पत्र मिळते की वाल्टरला आफ्रिकेतील केनिया मधे शेतीकामाचा जॉब मिळाला आहे. जर्मनीमधल्या वाढत्या नाझी अत्याचाराला कंटाळून/घाबरून तो आफ्रिकेत गेला आहे आणि आता कुटुंबालाही बोलावून घेत आहे हे एकूण वातावरणावरूनच कळते. त्यावेळचे चाललेले अत्याचार/सापत्न वागणूक न दाखवताही जाणवते हे दिग्दर्शकाचे यश. स्वतःच्या मातृभूमीला सोडावे लागल्याचे व्रण मनावर घेऊन जेटेल आपल्या मुलीला रेजिनाला घेऊन एका संपूर्ण नवख्या-अनोळखी देशांत पाऊल ठेवते. ती नैरोबीला ट्रेनमधून उतरते आणि तीच्या नजरेतून दिसलेली ती काळ्या-तपकीरी रंगात न्हालेली ती दूनिया दिग्दर्शकाने बेमालूम पकडली आहे.
जेटेल आणि रेजिनाला नवर्याच्या पत्र्याच्या झोपडीवर सोडून एक इंग्रज अधिकारी निघून जातो.. आणि छोट्या रेजिनाला "ओऽऽ मेमसाब रेजिना...." करत एक उंच काळा हसतमुख "ओवूर" कडेवर घेतो. हा ओवूर वाल्टरकडचा खानसामा - कूक. बघता बघता रेजिना या नव्या दूनियेत छान रूळून जाते मात्र जेटेलला जुळवून घेण्यास त्रास होत असतो. काहि दिवसांतच रेजिना स्थानिक "स्वाहिली" भाषा शिकते आणि तिच्या वयाचे छोटे मित्र जमवते देखील.
त्याच दरम्यान दुसरे महायुद्ध सूरू होते. आणि ब्रिटीश प्रत्येक जर्मन नागरीकाला (तो ज्यु असला तरी )अटक करतात व श्रेड्लिच कुटुंब अटकेत जाते (अर्थात अटक करून ठेवायला तुरुंगाची अनुपलब्धता असल्याने त्यांची रवानगी एका मोठ्या हॉटेलात केली जाते :) ). आपल्या कुटुंबाच्या सुटकेसाठी जेटेल एका जर्मन जाणणार्या इंग्लिश अधिकार्याबरोबर 'रात्र काढते' आणि श्रेड्लिच कुटुंब पुन्हा स्वतंत्र होते व आपल्या शेतावर परतते. आता जेटेलही नव्या भूमीत रूजू लागली असते. वाल्टर ब्रिटिशांतर्फे लढायचे ठरवतो तेव्हा ती केनियातच रहाते. या दरम्यान ती आफ्रिकेतील विविध चालीरीती, प्रश्न, सांस्कृतिक बदलांना दिसामासाने सामोरी जात असते त्याचे चित्रण अत्यंत रोचक आहे. दरम्यान रेजिनाला इंग्रजी शाळेत घातले असते व ती तिथेहि हुशार विद्यार्थीनी म्हणून नाव कमावते. तिचे मन मात्र एका केनियन मुलातच गुंतले असते.
पुढे काय होते? तिने ब्रिटिश सैनिकाशी ठेवलेला संबंध वाल्टरला कळतो का? वाल्टर युद्धावरून परत आल्यावर / युद्ध संपल्यावर ते मायदेशी जातात का? याची उत्तरे तुम्हीच चित्रपट बघुन ठरवा.
आपल्या मातृभूमीपासून वेगळ्या झालेल्या ह्या कुटुंबाला एक नवं घर, नवी माणसे, नवा समाज नुसता आपलासा करत नाहि तर एक नवी मातृभूमी मिळते. आपण आयुष्यभर जो धर्म, जात, वंश, वर्ण, भाषा आदी कुंपणांना कवटाळून बसतो ते किती व्यर्थ आहेत हे कोणत्याहि लेक्चरविना हा चित्रपट मनावर खोलवर बिंबवतो.
तांत्रिक अंगांनी बघायला गेलं तर हा चित्रपट अनेक हॉलिवूडपटांच्या तोंडात मारेल इतका भारी आहे. ओवूरचं पहिल्यांदा कडेवर घेतानाचं स्लो मोशन, वाल्टर जेनेटला पहिल्यांदा बघतो तेव्हा ती उन्हात असते तेव्हाची प्रकाश योजना, एकदा रेजिना ओवूरबरोबर बळी देताना बघते तेव्हा तिच्या डोळ्यावरून आपल्याला कळते की समोर काय चाललंय यात तिच्या अभिनयाबरोबरच उत्कृष्ट दिग्दर्शन, संपूर्ण चित्रपटात वापरलेले आफ्रिकी टोळ्यांमधे वाजणारे-किंवा नैसर्गिक आवाजांचे संगीत-ध्वनी हे आहेच. वेशभूषा, रंग, कॅमेरा इतका लोभस आहे की आफ्रिकेच्या तुम्हीदेखील नकळत प्रेमात पडत जाता. जेनेटच्या शेतावर आलेली टोळधाड इतकी भन्नाट दाखवली आहे की अंगावर अक्षरश: काटा उभा रहातो.
चित्रपट संपल्यावर ह्या कुटुंबाची कथा तितकी डोक्यात रहात नाहि, लक्षात रहातात ते त्यांचे जुळलेले आणि त्याच बरोबर आपलेही जुळलेले त्या अज्ञात दुनियेबरोबरचे ऋणानुबंध!
संधी मिळताच जरूर बघा हा चित्रपट!
प्रतिक्रिया
4 Sep 2009 - 11:18 am | अमोल केळकर
बघायला पाहिजे एकदा हा सिनेमा
अपाण दिलेल्या परिक्षणाबद्दल धन्यवाद
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
4 Sep 2009 - 11:22 am | स्वाती दिनेश
मस्त रे, छान लिहिले आहेस, उत्सुकता चाळवली गेली आहे. पहायला हवा हा चित्रपट,
स्वाती
4 Sep 2009 - 11:23 am | घाटावरचे भट
उत्तम परीक्षण आणि ओळख. ऑस्कर विजेता सिनेमा आहे हा. पाहायलाच हवा (ऑस्कर विजेता आहे म्हणून नव्हे. कारण इथे ऑस्करादि अॅवार्डांस फाट्यावर मारण्यात येते हे मला ठाऊक आहे)
- भटोबा
4 Sep 2009 - 12:09 pm | अवलिया
हेच म्हणतो.
ऑस्कर मिळण्यापुर्वीची शीडी वा डिव्हीडी मिळते का बघतो आणि पहातो.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
4 Sep 2009 - 2:43 pm | नंदन
सहमत आहे, परीक्षण आवडले.
- वा! 'ऍक्टान्वये' सारखा हा संस्कृतिसंकरितसमास मस्तच :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
4 Sep 2009 - 12:06 pm | सुबक ठेंगणी
वर्णन आणि फोटो दोन्ही वाचून अगदी मस्ट-वॉच आहे असंच वाट्टंय...
कुठे बघितलास? टोरंट लिंक आहे का?
4 Sep 2009 - 2:31 pm | ऋषिकेश
धन्यु
मी हा चित्रपट टोरेंटवरूनच घेतला होता. पण आत्ता हाफिसात असल्याने लिंक नाहि. गुगलून लिंक मिळेलच. नाहि मिळाली तर "नोवेअर इन आफ्रिका" वर सर्च मारा
--ऋषिकेश
4 Sep 2009 - 2:42 pm | दिपक
इथे एक टोरंट लिंक मिळाली. परिक्षण वाचुन लगेच पाह्यची इच्छा झाली. धन्यवाद ऋषिकेश :)
4 Sep 2009 - 12:13 pm | सहज
भारी परिक्षण. सिनेमा यादीमधे टाकला आहे.
:-)
4 Sep 2009 - 12:13 pm | विंजिनेर
उत्तम परिक्षण. बघणार जरूर...
6 Sep 2009 - 5:06 pm | विनायक प्रभू
असेच म्हणतो
8 Sep 2009 - 8:46 pm | अन्वय
असेच म्हणतो
पाह्यला हवा हा चित्रपट
4 Sep 2009 - 2:31 pm | शाल्मली
परीक्षण छान केले आहेस.
बघायला हवा हा चित्रपट..
--शाल्मली.
4 Sep 2009 - 2:39 pm | मदनबाण
मस्त परिक्षण... :)
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
4 Sep 2009 - 2:44 pm | कानडाऊ योगेशु
आपल्या मातृभूमीपासून वेगळ्या झालेल्या ह्या कुटुंबाला एक नवं घर, नवी माणसे, नवा समाज नुसता आपलासा करत नाहि तर एक नवी मातृभूमी मिळते. आपण आयुष्यभर जो धर्म, जात, वंश, वर्ण, भाषा आदी कुंपणांना कवटाळून बसतो ते किती व्यर्थ आहेत
ह्या वाक्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
उत्कृष्ठ परिक्षण.!
4 Sep 2009 - 6:57 pm | लिखाळ
चित्रपटाची ओळख छान करुन दिली आहेस.
आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे.
-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?
4 Sep 2009 - 7:37 pm | प्रभाकर पेठकर
ॠषिकेश, थोडक्यात पण अतिशय सुंदर पद्धतीत परिक्षण लिहिले आहे. उत्सुकता वाढती राहून चित्रपट पाहण्यासाठी मन उताविळ होते. भाषेचा आधार न घेता पाहिलेल्या चित्रपटातील तुला आवडलेले, मनाला भिडलेले अजून काही क्षण वर्णिले असतेस तर अजून मजा आली असती. असो.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
4 Sep 2009 - 8:20 pm | प्राजु
सुरेख चित्रपट परिक्षण..
नक्कीच बघेन मिळाला तर.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Sep 2009 - 8:03 pm | चैत्रपालवी
मी सुद्धा अलिकडेच पाहिला आणि मलाही प्रचन्ड आवडला... नक्की बघावा असा आहे!
6 Sep 2009 - 6:59 am | रेवती
चित्रपट लगेच बघायला मिळावा असं वाटतय इतकं छान परिक्षण लिहिलय. चांगला चित्रपट सुचवल्याबद्दल धन्यवाद!
रेवती
6 Sep 2009 - 9:14 am | पारंबीचा भापू
सुरेख परीक्षण. सिनेमा पहायची जबरदस्त इच्छा झाली आहे.
सिनेमाचे नाव रोमन अक्षरांत लिहलेत तर बरे होईल.
भापू
6 Sep 2009 - 12:17 pm | चतुरंग
आत्ताच यू ट्यूबवर बघितला! सलग सगळे भाग बघून झाल्याशिवाय थांबूच शकलो नाही!
ऋषिकेश अतिशय चांगले परीक्षण केले आहेस. ह्या चित्रपटाची ओअळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद! :)
इंग्रजी सबटायटल्स नसती तरीही चित्रपट कळण्यात कणाचीही अडचण आली नसती हे नक्की. मात्र, तुम्ही हा चित्रपट अतिशय काळजीपूर्वक आणी बारकाईने बघायला हवा. प्रत्येक प्रसंगच नव्हे तर प्रत्येक शॉट हा कथानकातला धागा आहे स्वतंत्र रंग, पोत असलेला. असे शेकडो धागे विणले जात जात संपूर्ण सिनेमा एखाद्या वस्त्रासारखा हळूहळू विणला जातो. सर्वसामान्य माणसे, त्यांच्या जीवनात येणारे अविभाज्य हेलकावे, ताटातूट, पुनर्मिलन, आप्तांचे दुरावणे, प्रेमाची भूक, मातृभूमीची ओढ, नवीन भूमीत स्थलांतरितांचे हळूहळू मूळ धरत जाणे, मुलांचे भावविश्व, समाजाचे विशिष्ठ चौकटींमधून प्रत्येक गोष्टीकडे पहाणे अशा असंख्य गोष्टी हा सिनेमा आपल्यासमोर उलगडत नेतो. अक्षरशः कित्येक ठिकाणी हा सिनेमा तद्दन भडक आणी बाजारु बनवू शकण्याइतका मसाला ठासून भरलेला असूनही (अरेरे कोणा हिंदी निर्मात्याची नजर अजून कशी गेली नाही इकडे? ;) )तसे होऊ न देणे हे दिग्दर्शकाचे असीम कौशल्य आहे! कोणत्याही भडक प्रसंगांचे दृश्य न दाखवतासुद्धा प्रसंगाची परिणामकारकता कशी निर्माण करायची आणी टिकवायची ह्याचा हा सिनेमा वस्तुपाठ आहे. कित्येक प्रसंगात मी आतून हाललो पण एकदाही रडलो नाही. ते प्रसंग आपल्या आयुष्याचा भागच वाटत असतात आणी आपल्याला माहीत आहे की आपण असे उठसूट रडत नाही त्यामुळे ते प्रसंग तसेच रंगवले आहेत.
कथेची ताकद आणी दिग्दर्शकाचे कौशल्य इतके जबर आहे की अभिनय हा करावा लागलेलाच नाहीये ते सगळं आपसूक येतच गेलंय. तरीही रेजीना आणी ओवूर आपल्या मनात ठाण मांडून बसतात, ते अजिबात निघून जात नाहीत.
दिगदर्शकाला संपूर्ण चित्रपट त्याच्या मनःचक्षूंसमोर आधीच दिसलेला असणार ह्यात शंका नाही! आवर्जून पहा.
(अत्यंत समाधानी)चतुरंग
7 Sep 2009 - 12:23 am | ऋषिकेश
सर्व प्रतिसादकांचे अनेक आभार!
रोमन लिपित चित्रपटाचे नावः
मुळ चित्रपटः nirgendwo in afrika
इंग्रजी: Nowhere in Africa
चतुरंग,
चित्रपट लगेच पाहून, आस्वाद इतक्या छान शब्दांत मांडल्याबद्दल विषेश आभार
-ऋषिकेश
7 Sep 2009 - 9:47 am | एकलव्य
नक्की बघेन... इतकी छान हिंट दिल्याबद्दल आभार!