उजळती दीप स्वप्नांचे अलवार क्षणांच्या भेटी
बहरात गंध प्रणयाचा, त्या बकुळफुलांच्या भेटी
भिरभिरता अवखळ वारा, सरसरत्या श्रावणधारा
नखशिखांत भिजल्या हिरव्या पाऊसखुणांच्या भेटी
उलगडली कितिक रहस्ये, गीतांत भाव अवतरले
शरदात चांदण्या रात्री हळुवार सुरांच्या भेटी
सुकलेल्या गजर्यामधल्या गंधाचा अत्तरफाया
रुसव्याचे फसवे नखरे, हसर्या अधरांच्या भेटी
तळव्यावरच्या मेंदीच्या नक्षीत रंगली प्रीती
सुकुमार कंठि गुंफियल्या रेशमी करांच्या भेटी
विसरून भान काळाचे रंगल्या किती गुजगोष्टी
जणु पुस्तकात दडलेल्या मृदु मोरपिसाच्या भेटी
अलगद टिपले तार्यांनी हृदयाशी मधुर क्षणांना
अन् चंद्रानेही जपल्या अंतरी मनांच्या भेटी
प्रतिक्रिया
27 Aug 2009 - 2:22 pm | हृषीकेश पतकी
शृंगार रसात अगदी चिंब भिजवलंस !!
उत्तम जमलीये..
:)
आपला हृषी !!
27 Aug 2009 - 3:18 pm | ऋषिकेश
वा छान भेटी! :)
कविता आवडली
ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ३ वाजून १८ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक कविता "प्रेमा तुझा रंग कसा...."
27 Aug 2009 - 4:46 pm | दत्ता काळे
विसरून भान काळाचे रंगल्या किती गुजगोष्टी
जणु पुस्तकात दडलेल्या मृदु मोरपिसाच्या भेटी
. . . आवडले
27 Aug 2009 - 4:50 pm | मदनबाण
विसरून भान काळाचे रंगल्या किती गुजगोष्टी
जणु पुस्तकात दडलेल्या मृदु मोरपिसाच्या भेटी
मस्तच... :)
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
27 Aug 2009 - 6:22 pm | मनीषा
सुंदर कविता...
भिरभिरता अवखळ वारा, सरसरत्या श्रावणधारा
नखशिखांत भिजल्या हिरव्या पाऊसखुणांच्या भेटी
विसरून भान काळाचे रंगल्या किती गुजगोष्टी
जणु पुस्तकात दडलेल्या मृदु मोरपिसाच्या भेटी
लय आणि शब्द ... अप्रतिम !!
27 Aug 2009 - 7:06 pm | प्राजु
सुकलेल्या गजर्यामधल्या गंधाचा अत्तरफाया
रुसव्याचे फसवे नखरे, हसर्या अधरांच्या भेटी
तळव्यावरच्या मेंदीच्या नक्षीत रंगली प्रीती
सुकुमार कंठि गुंफियल्या रेशमी करांच्या भेटी
अफाट!!
अप्रतिम!! प्रत्येक कडवं सुंदर!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/