मला सायकल चालवायला जाम आवडतं. सायकल असली, की उगीचच पैसे आणि इंधन न जाळता आपल्या सोई नुसार हवं तीथं वेळेत पोचता येतं. सायकलवर एखादा घाट चढताना जाम दमून घाटमाथ्यावर पोचण्याचा आनंद वेगळाच असतो. मग हँडल वरचे हात सोडून घाट उतरण्याचा रोमांच तर भारीच (हा प्रकार करताना लहानपणी एकदा जाम वाईट आपटलो होतो... त्याच्या खुणा अजूनपण कपाळावर आणि गुढघ्यावर आहेत...).
तर गेल्या पावसात एका weekend ला आराम करायचा बेत होता. मग शनीवार काहीतरी वाचण्यात आणि टेकडीवर भटकण्यात घालवला. उद्या कुठंतरी भटकायला जायला पाहीजे असं शनीवारी रात्री वाटायला लागलं. पानशेतच्या जवळ एका डोंगरावर नीळकंठेश्वराचं मंदिर पाहण्या सारखं आहे, असं ऐंकून होतो. मग रविवारी सायकलवर एकटच नीळकंठेश्वरला जायचा प्लान ठरवून टाकला. नीळकंठेश्वरा बद्दल पुरेशी महीती नव्हती, पण भटकायचं तर होतंच आणि एकटाच होतो; मग नीळकंठेश्वरला न पोचता भलतीकडेच कुठेही पोचलो तरी चालण्या सारखं होतं.
रविवारी सकाळी सगळं आवरल्यावर पाण्याची बाटली आणि १-२ बिस्कीटाचे पुडे दप्तरात टाकले आणि दप्तर पाठीवर अडकवून सायकल वर सुटलो. नेहमीच्या टपरीवर एक उपीट आणि चहा घेतला आणि सिंहगड-रोडला लागलो. सकाळची वेळ असल्यामुळं नेहमीची गर्दी नव्हती. बारीक पावसामुळं रस्ता मस्त ओला झाला होता. जरा निवांतपणे रमत-गमतच खडकवासला धरणा जवळ पोचलो. मग धरणाच्या काठानं जात डोणजे फाटा गाठला. फाट्यावर पानशेतला जाणारा उजव्या हाताचा रस्ता धरला. मी पहील्यांदाच ह्या रस्त्यावरुन चाल्लो होतो. आता रस्त्यावर क्वचीतच कोणी दिसत होतं. डाव्या हाताला सिंहगड धुक्यातून अधून-मधून डोकावत होता. हिरव्यागार झाडीतून चढ, उतार आणि वळणं घेत मी पुढं सरकत होतो. कसलीच घाई नव्हती, उगीचच बडबड करणारं कोणी नव्हतं आणि जरा थांब आराम करुयात अस म्हणणारं पण कोणी नव्हतं. एकटं फिरण्याचा हा फायदा असतो.
डोणजे फाट्याहून १०-१२ km पुढं आल्यावर उजव्या हाताला एक घर आणि दुकान लागलं. तीथं पाणी प्यायलो आणि नीळकंठेश्वरा बद्दल चौकशी करुन पुढच्या वाटेला लागलो. अधून-मधून पाऊस पडत होता आणि डोक्यावर घोंगडी घेऊन गावकरी रस्त्याच्या कडेनं शेतात चाल्ले होते. आता रस्ता मुठा नदीला समांतर जात होता. नदीचं पात्र गढूळ पाण्यानं तुडूंब भरुन वाहत होतं आणि नदीचे किनारे मस्त हिरवेगार होते. पानशेत फक्त ५-६ km च उरलं होतं. नदीच्या दुसऱ्या बाजूला नीळकंठेश्वराचा डोंगर दिसत होता, पण नदी कशी ओलांडायची हे कळत नव्हतं. तितक्यात एक गावकरी शेतातून येताना दिसला....
मी: राम-राम काका...
गावकरी: राम-राम... ह्या पावसात सायकलवर कुणी कडं निघालात...
मी: मला नीळकंठेश्वरला जायचयं तर नदी ओलांडून त्या बाजूला जाता येतं का?
गावकरी: हो... तर काय...जाता येतं की...
मी: पण कुठून?
गावकरी: मागं फिरा आणि मागच्या गावात पोचा... तिथून होडीनं दुसऱ्या बाजूला जाता येतं... तुमची सायकल पण जाईल होडीतून... पुण्याहून आलात का?
मी: हो.. जातो मग मागच्या गावात...
गावकरी: जपून जारं बाबा...
मी: हो.. येतो मग...
वळलो आणि लगेचच गावात पोचलो. नदी रस्त्यापासून बऱ्यापैकी आत होती आणि तिथं पोचायला नीट वाट नव्हती. मस्त लाल चिखल तुडवत सायकल खेचत मी चालायला सुरुवात केली. थोड्या वेळानंतर सायकल चिखलातून हलेच ना, मग सायकल उचलून खांद्यावर घेतली आणि होडी जवळ पोचलो. दोनजण होडीत बसले होते, मी पण सायकल सकट होडीत बसलो. होडी एका काठा वरुन दुसऱ्या काठा वर न्ह्यायची idea भारी होती. एक मजबुत दोर ह्या काठा पासून त्या काठा पर्यंत बांधला होता. मी होडीत बसल्यावर होडीच्या मालकानं दोराच्या मदतीनं होडी ओढत-ओढत दुसऱ्या काठावर पोचवली.
(होडी आणि होडीचा मालक )
त्याला ३ रुपये देऊन मी सायकल घेऊन खाली उतरलो. परत चिखलातून वाट काढत जरा कच्च्या पण बऱ्या रस्त्यावर पोचलो. थोडं पुढं गेल्यावर डाव्या हाताला नीळकंठेश्वरावर जाणारी वाट लागली. चढ बराच होता. मग पायडलवर उभं राहून सायकल चढवायला सुरुवात केली आणि दगडातून वाट काढत एका लहानश्या गावात पोचलो. सायलक गावातच लावली आणि पायी चढायला सुरुवात केली.
पायवाटेच्या दोन्ही बाजूला मस्त घाणेरी फुलली होती. मला घाणेरीची फुलं जाम आवडतात. इंद्रधनुष्याला लाजवतील इतकी रंगीत ही फुलं असतात. घाणेरीच्या हिरव्यागार झुडपावर रंगी-बेरंगी बारीक-बारीक फुलांचा गुच्छ बघूनतर वेडच लागतं. इतक्या सुंदर फुलाचं नाव 'घाणेरी' ठेवावं असं कोणाला सुचलं असेल ते देव जाणो.
तळात हिरवीगार शेतं वाऱ्यावर मस्त डुलत होती. काय तो हिरवा रंग! एक वेगळंच चैतन्य आणि वेगळाच जीवंतपणा असतो ह्या पावसातल्या हिरव्या रंगाला. किती निरागस भाव असतात ह्या हिरव्या रंगाचे. मन अगदी भरुन येतं आणि आपल्या नकळतच देवाचे (निसर्गाचे) आभार मानायला लागतं.
हे सगळं अनूभवत अर्ध्या तासात मी नीळकंठेश्वराच्या देवळात पोचलो. देऊळ बऱ्यापैकी जुनं आणि फारच मोठ्ठं आहे. नीळकंठेश्वराचं दर्शन घेऊन मी देवळाच्या मागच्या बाजूला आलो. देवळाच्या परीसरात बरेच पौराणीक देखावे उभे केले आहेत. सगळ्या मूर्त्या सिमेंटच्या असल्यामुळं पावसापाण्याचा काही त्रास नाही. देवळाच्या परीसरातले हे भव्य देखावे बघून गणपतीतल्या देखाव्यांची आठवण होते.
(अल्हाददायक वातावरणामुळं हा इंद्र दरबार खरंच स्वर्गलोकी भरल्या सारखं वाटत होतं...)
(कोसळणारा पाऊस...जोराचा वारा...विजांचा कडकडाट आणि धुकं...ह्यामुळं समुद्रमंथनाचा हा देखावा जिवंत झाला होता...)
मस्त पाऊस कोसळत होता. त्यातच जोराचा वारा आणि धुक्यामुळं वातावरण एकदम भारावून गेलं होतं. ह्या कोसळणाऱ्या पावसात डोंगराच्या कड्यावर बसून मी तळ न्याहाळत होतो. वरुन पानशेत आणि वरसगाव धरणं आणि त्यांना वेगळं करणारी दोंगररांग मस्त दिसत होती.
(पानशेत आणि वरसगाव धरण)
पावसात भिजतच पूर्ण डोंगर भटकून घेतला. इतक्या वेळ भटकून झाल्यावर करण्या सारखं काही नव्हतं. मग जरा भूक लागल्याची जाणीव झाली. मग जवळ होतं ते खाऊन घेतलं आणि डोंगर उतरायला सुरुवात केली. रोजच्या सवयी प्रमाणं गडगडतच डोंगराच्या पायथ्याशी पोचलो. गावात जरा चौकशी केल्यावर कळलं की परत पानशेतला न जाता डाव्या हाताचा रस्ता धरला तर वार्ज्यातून पुण्याला पोचता येतं. आलेल्या वाटेनं परत न जाता नविन वाट बघायला मिळणार म्हणून जाम खुष होतो. मग गावातून सायकल घेतली आणि उतारावर सुसाट सुटलो. हा रस्ता फार कमी वापरातला आणि अरुंद होता.
(माझी सायकल)
रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतात पेरणीची कामं चालु होती. रस्त्यावर कोणीच नव्हतं. मी एकटाच निवांत चाल्लो होतो. बघावं तिथं ओला हीरवा रंग आणि भिजलेल्या मातीचा काळा रंग मनाला वेड लावत होता. चिमण्या, बुलबूल, सुर्यपक्षी, वटवट्या, मैना, सुभग अश्या बऱ्याच पक्ष्यांचा चिवचीवाट ऐकत मी पुढं सरकत होतो. पेरणीच्या हंगामातली गाणी गुणगुणत शेतकऱ्यांची कामं चालू होती. एकदा वाट विचारुन घ्यावी म्हणून मी एका काकूंशी बोलायला लागलो....
मी: ही वाट वार्ज्याला जाते ना?
काकू: वार्ज्याला????... नाय...
मी: मग?...
काकू: ह्या वाटंनं तुम्ही पीरंगुटला पोचणार....
मी: पीरंगुटला?...हरकत नाही... (पीरंगुटहून चांदणी चौक आणि मग कोथरुड गाठायचं असा विचार डोक्यात सुरु झाला...)...किती वेळ लागेल पीरंगुटला पोचायला?..
काकू: सायकल वर दोन तास तरी लागत्याल... मोठ्ठा घाट हाये... सायकल ढकलतच न्ह्यावी लागंल...काय झालं तर मदतपण नाय मिळणार...माझं ऐका...माघारी जावा अन् डाव्या हाताला वळा...म्हंजी वार्ज्याच्या वाटंला लागाल....
मी: (च्याआयला...घाटात काय झालं म्हणजे पंच्याईत... त्यात परत संध्याकाळ व्हायची वेळ झाली होती... वार्ज्याच्या वाटेनं गेलेलच बरं...)...बरं...वार्ज्याच्या वाटेनंच जातो...
मग वळून ५-६ km मागं आल्यावर डाव्या हाताला वार्ज्याची वाट लागली. थोडं पुढं गेल्यावर NDA चा परीसर लागला आणि मग खडकवासला धरण. सायकल रस्त्याच्या कडेला लावून मी धरणाच्या काठावर जावून थोडा वेळ बसलो. धरणाच्या पलीकडच्या काठावर प्रचंड गर्दी जाणवत होती, मात्र ह्या काठाला मी एकटाच होतो. अश्या एकांतात एखाद्या पाणवठ्याकाठी मन किती बोलकं आणि डोकं किती हलकं होतं... असेच एकांत काठ आयुष्यात पुढेपण येतील अश्या आशेने सायकलवर वार्ज्याच्या दिशेनं निघालो. मग एक ट्रक झपकन् सायकलला घासून गेला...मग हाँर्नचे आवाज...दुचाकींची गर्दी...लोकांची आरडाओरड... ह्यामुळं शहरात पोचल्याची जाणीव झाली.
घरी पोचल्यावर मस्तपैकी गरम पाण्यानं आंघोळ केली आणि उरलेला दिवस गो.नी.दां. चा माचीवरला बुधा वाचण्यात घालवला...
प्रतिक्रिया
31 Jul 2009 - 12:12 pm | नंदन
सायकलप्रवासाचं वर्णन आणि छायाचित्रे मस्तच.
>>> उरलेला दिवस गो.नी.दां. चा माचीवरला बुधा वाचण्यात घालवला
-- क्या बात है!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
31 Jul 2009 - 1:12 pm | घाटावरचे भट
असेच म्हणतो.
1 Aug 2009 - 5:54 am | आकाशी नीळा
सहीच...
31 Jul 2009 - 12:18 pm | विसोबा खेचर
शब्द नाहीत....!
31 Jul 2009 - 12:48 pm | विशाल कुलकर्णी
असेच म्हणतो. सुरेख वर्णन !
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
31 Jul 2009 - 12:29 pm | mamuvinod
तिथ प्रसाद म्हणून मिळणारा गरमागरम डाळ्-भात नाहि खाल्ला वाट्त
खुप छान चवीचा
सरजेमामाच काम खरच कोतुकास्पद
31 Jul 2009 - 12:36 pm | जे.पी.मॉर्गन
ह्या वीकएंडचा प्लॅन नक्की झाला ;)
31 Jul 2009 - 12:42 pm | प्रसन्न केसकर
वा विमुक्त भैय्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या केल्यात.
मी जन्मलो खडकवासल्यात त्यामुळे त्या भागात लहानपणापासुन फिरलोय (खरेतर हुंदडलोय). या दिवसात रुळे म्हणजे मज्जाच की. खरेतर उद्याच मी तिकडे जायचा विचार करतोय.
रुळ्याच्या निळकंठेश्वराबाबत कथा अशी:
फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सर्ज्यामामा नावाचे एक शिवभक्त कामाला होते. त्यांना रुळ्याच्या डोंगरावर जंगलात एक बाण सापडला तेच निळकंठेश्वराचे स्थान.
हा शोध लागल्यावर सर्ज्यामामांचे आयुष्यच बदलले. त्यांनी नोकरी सोडुन शिवआराधना केली अन त्यांना म्हणे एक सिद्धी मिळाली. त्यांनी मंत्रुन दिलेले पाणी पीले की लोकांची व्यसने सुटु लागली. सर्जेमामा डोणज्यात रहात असल्याने हे ऐकुन लोकांची डोणज्यात रीघ लागली अन बर्याच जणांची व्यसने खरीच सुटली पण. (याला कारण सर्जेमामांची पॉवर असेल किंवा त्या श्रद्धेमुळे जागृत झालेली व्यसनींची विलपॉवर.) मग अश्या लोकांनी सर्जेमामांना देणग्या देवु केल्या. त्या पैश्यातुनच सर्जेमामांनी मग निलकंठेश्वरचा विकास केला. हे सर्व गेल्या तीस-चाळीस वर्षातले. श्रद्धेचा वापर समाजहिताकरता कसा होऊ शकतो याचे उदाहरण म्हणुन यावर मी आणि माझ्या एका मित्राने एका स्विस मॅगेझिनमध्ये या विषयावर १९९३ मधे लिहिले होते.
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
31 Jul 2009 - 9:10 pm | विमुक्त
तुमचा लेख वाचायला आवडेल...छान माहीती दिलीत...
31 Jul 2009 - 12:42 pm | टारझन
शब्द आहेत ... पण व्यक्त कसे करावेत हे समजत नाही !!
जियो .. सायकलस्वारी जबरा :) फोटोही क्लासिक !! अजुन येउन द्या
31 Jul 2009 - 12:43 pm | सहज
सायकलने असा आडवा तिडवा प्रवास, भटकंती, त्याच छानसं सचित्र वर्णन उतरवणे वगैरे.. खरच कौतुक वाटते.
धन्यु!
31 Jul 2009 - 12:45 pm | पाषाणभेद
खरच छान . मला पण सायकल वर भटकायला आवडते. (मी फक्त गावात भटकतो.)
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
31 Jul 2009 - 12:45 pm | निखिल देशपांडे
विमुक्त भाउ... मस्त वर्णन केले आहे...
फोटो मस्तच आहेत
निखिल
================================
31 Jul 2009 - 12:45 pm | ज्ञानेश...
सुंदर प्रवासवर्णन आणि फोटो.
इंद्राचा दरबार मस्तच.
"Great Power Comes With Great Responsibilities"
31 Jul 2009 - 12:50 pm | परिकथेतील राजकुमार
अ प्र ती म !
काय सुंदर वर्णन आणी फोटु आहेत रे ! साल अस वाटल की आपण त्या परिसरातच उभे आहोत आणी ही हिरवाई आजुबाजुला पसरली आहे.
वर्णनाबरहुकुम एकदा ही सहल केलीच पाहिजे !
सायकलवाला
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
31 Jul 2009 - 1:01 pm | वेताळ
खुपच छान, अजुन येवु द्या.
वेताळ
31 Jul 2009 - 1:04 pm | प्रमोद देव
सहजसुंदर शैली, उत्तम छायाचित्रण.
लेखन मनाला भावले.
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
31 Jul 2009 - 1:06 pm | ब्रिटिश टिंग्या
खल्लास रे!
31 Jul 2009 - 1:27 pm | बिपिन कार्यकर्ते
विमुक्त... फारच सुंदर भटकंती आणि फोटोही. सायकलवर भटकण्याची मजा वेगळीच. लहानपणी आरेकॉलनीच्या जंगलात (हो तेव्हा तिथे नैसर्गिक जंगल होते) सकाळी सकाळी भटकल्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
गेले ते दिन गेले...
बिपिन कार्यकर्ते
31 Jul 2009 - 1:36 pm | विजुभाऊ
मस्त रे..........बरेच दिवसात सायकल हातात घेतली नाही.
मजा आला वाचून. आता सातार्याला गेलो की मस्त सायकल घेऊन मनसोक्त हुंदडणार
31 Jul 2009 - 4:22 pm | विमुक्त
सातारा म्हणजेतर भन्नाटच..... सातार्याच्या जवळचे सगळे डोंगर भटकुन झालेत... यवतेश्वर...कास तर वेडच लावतं पावसात....
31 Jul 2009 - 1:38 pm | शाल्मली
सायकलस्वारी आणि छायाचित्र दोन्ही फारच छान!
आम्ही काही मित्र-मैत्रिणी २-३ वर्षांपूर्वी नीळकंठेश्वरला गेलो होतो त्याची आठवण झाली. तिथले वेगवेगळ्या प्रसंगांचे अगदी पुतना मावशी, घटोत्कच ते द्रोणाचार्य आणि अगदी इंद्रदरबार असे सगळे पुतळे शेजारी शेजारी नांदताना पाहून मजा वाटते.
त्या पुतळ्यांच्या मागच्या बाजूने खोल दिसणारे पानशेत आणि वरसगाव धरण तर जबराच!!
--शाल्मली.
31 Jul 2009 - 1:44 pm | संताजी धनाजी
सुंदर लिहीले आहेस. फार आनंद वाटला.
- संताजी धनाजी
31 Jul 2009 - 1:51 pm | कानडाऊ योगेशु
तुम्हाला "भटक्या विमुक्त" म्हणायला काही हरकत नसावी. #:S
तुडुंब भरलेली नदी पाहीली कि उचंबळुन येते..!!
31 Jul 2009 - 2:25 pm | फ्रॅक्चर बंड्या
मस्तच
31 Jul 2009 - 2:42 pm | क्रान्ति
लेख आणि फोटो सगळंच सुरेख! इंद्रदरबार अगदी जीवंत वाटतोय आणि समुद्रमंथन सुद्धा. धरणाचा धुक्यातला फोटो खास.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
31 Jul 2009 - 4:29 pm | विमुक्त
आणि हो.... मागच्य वर्षी मी पुण्याहून सातार्याला सायकलवर गेलो होतो...मस्त पावसात....
31 Jul 2009 - 7:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुरेख वर्णन, सुरेख चित्रं !
सायकलवाल्याचा फोटो कुठे तरी टाकायला पाहिजे होता. :)
-दिलीप बिरुटे
31 Jul 2009 - 7:48 pm | बाकरवडी
अप्रतिम !!!!! :)
सायकलने आणि तेही एकट्याने प्रवास म्हणजे खरे साहस !!
जबराट!!!
मस्तच!!!
:B :B :B बाकरवडी :B :B :B
31 Jul 2009 - 9:36 pm | बहुगुणी
उत्तम सहल-वर्णन!
'मन किती बोलकं आणि डोकं किती हलकं होतं...' अगदी असा अनुभव केवळ तुमचा लेख वाचून आला, प्रत्यक्षात तर किती मोकळं वाटलं असेल? आम्हालाही तुमच्या सहलीत सामील करून घेतल्याबद्दल, आणि बर्याच आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद!
31 Jul 2009 - 9:47 pm | तर्री
बावनकशी अनुभव आणि ओघवती लेखनशैली .
विमुक्त ,सुरेख ..
एवढेच म्हणतो .
31 Jul 2009 - 11:53 pm | ऋषिकेश
वा मस्त! खूपच छान!
हे लै आवडलं.. असं एकटं(कधी दुकटं) निर्हेतुक भटकंती ज्या वाटा दाखवते जो आनंद देते तो मिनीट अन मिनीट प्लान्ड "टुर्स" नाहित
अजून येऊदे सायकलस्वार्या
(एका सायकलचा मालक)ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ५७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."
1 Aug 2009 - 3:32 am | मृदुला
लेख आवडला. हिरवाईची, भातशेतांची चित्रे फारच सुंदर. सहल ठरवण्याची, प्रत्यक्ष भटकण्याची आणि वर्णनाची सहजता विशेष. कौतुक वाटले.
1 Aug 2009 - 4:45 am | एकलव्य
वर्णन! सहज शैली... मस्त रे!!
सातारा, वरंधा घाट, शिवथरघळ, रायगड अशी सायकलवर केलेली भटकंती आठवली.
वरसगावातील एक फोटो डकवितो आहे. तुम्हाला (आणि पुनेरीलापण) हा परिसर आवडत असेल तर श्रावण-भाद्रपदात भेटता येईल...
2 Aug 2009 - 2:47 pm | प्रसन्न केसकर
तो भाग माझा आवडता आहे. मी जन्मलो खडकवासल्यात अन तिथेच दहावीपर्यंत राहिलो. त्या भागातल्या बर्याच लोकांच्या माझ्या वडिलांशी ओळखी असल्याने मी त्या भागात खूप फिरलो आहे. एकतर निसर्गरम्य असा तो परिसर आहे अन महत्वाचे म्हणजे शहराजवळ असुनही खोड्याळ, उडाणटप्पु पर्यटकांमुळे जो त्रास होतो (सिंहगड्ला नेहमी असा त्रास होतो.) तो तिकडे होत नाही. मजा येते तिकडे. कालच मी सहकुटुंब तिकडे फिरायला गेलो होतो.
थोडेसे मार्गाविषयी: निळकंठेश्वरला जायला बरेच मार्ग आहेत. एकतर पानशेत रस्त्यावर रुळे नावाचे गाव आहे तिथुन बोटीने मुठा नदी ओलांडुन जाता येते (विमुक्त जाताना बहुधा त्या रस्त्याने गेले.)
दुसरा मार्गः वारजे, एनडीए गेट, पिकॉकबे, मांडवी मार्गे जांभळी असा आहे. (जरी अनेकदा त्या जागेला रुळ्याचा नीळकंठेश्वर म्हणत असले तरी तो भाग जांभळी गावाच्या हद्दीत येतो.) हा मार्गही धरणाच्या कडेने जातो अन पानशेत रस्त्यापेक्षा त्यावर रहदारी खूप कमी (जवळपास नाहीच). हाच रस्त्या पुढे पिरंगुटला किंवा घुसळखांब-काळे कॉलनीमार्गे लोणावळ्याला जायला वापरला जाऊ शकतो.
तिसरा मार्गः पानशेतला जायचे पण एसटी स्टँडकडे डावीकडे न वळता सरळ बोटींग क्लब कडे जायचे. मुठा नदीचा पुल ओलांडल्यावर डावीकडे कुरण बुद्रुक गावातुन जाणारा रस्ता आहे त्याने सरळ. हा मार्ग बर्यापैकी बिकट आहे अन निर्मनुष्यही.
चौथा मार्गः खानापुर ओलांडल्यावर शांतिवन रिसॉर्ट लागतो. त्याच्या मागे बर्याचदा नदी ओलांडायला वल्हवायची नाव असते ती वापरुन मांडवी ला जायचे अन तिथुन दोन क्रमांकाचा मार्ग वापरुन पुढे जायचे.
हे सर्व मार्ग मी पुर्वी वापरले आहेत पण गेल्या काही वर्षात शक्यतो पहिलाच मार्ग वापरतो.
--
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
1 Aug 2009 - 5:05 am | शाहरुख
भावा तू जिकलास !!
1 Aug 2009 - 6:43 pm | लिखाळ
वा ! तुमच्या प्रवासाचे वर्णन आवडले. नीळकंठेश्वरवर मी आणि माझा एक मित्र असेच अचानक बेत करुन गेलो होतो ते आठवले. पावसाळ्याचेच दिवस होते. वरती रात्री मुक्काम केला होता. मजा आली होती. :)
वा .. पक्षी निरीक्षणपण करता वाटते. छान. सुभगाचे नाव अनेक महिन्यांनी ऐकले.
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
2 Aug 2009 - 9:56 pm | विमुक्त
थोडं फार पक्षी निरीक्षण करतो...पण फारच कमी पक्षी ओलखता येतात....:-)
3 Aug 2009 - 5:12 pm | मदनबाण
सुंदर प्रवास वर्णन आणि फोटो सुद्धा फारच सुरेख आले आहेत.
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
18 Apr 2014 - 12:57 pm | प्रमोद देर्देकर
मला सायकल प्रवास खुप आवडतो. म्हणुन अतिशय सुंदर सायकल प्रवासाचा धागा वर काढतोय. सगळे फोटो आणी प्रवास वर्णन सुंदर आहे आणि ते सुध्दा विमुक्तभाईंनी एकट्याने केलेलं.
सायकलने आणि तेही एकट्याने प्रवास म्हणजे खरे साहस होय. जबरी विमुक्त भाई.
मी माझ्या मुलासाठी उद्याच सायकल घेतोय. तेव्हा मी ही त्याच्या बरोबर सायकल भटकंती करणार.
उद्यापासुन सायकल भटकंती करणारा (पम्या)
18 Apr 2014 - 7:20 pm | शुचि
सगळे फोटो आणी प्रवास वर्णन सुंदर आहे आणि ते सुध्दा विमुक्तभाईंनी एकट्याने केलेलं.
18 Apr 2014 - 8:21 pm | आशु जोग
विमुक्तराव,
तुम्ही एकूणच हा एक अध्यात्मिक अनुभव घेतलात...
18 Apr 2014 - 8:24 pm | भ ट क्या खे ड वा ला
घाणेरी या नावा बाबत आपल्या मताशी ११० % सहमत. मी त्याला गांधारी असेच म्हणतो.
18 Apr 2014 - 8:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
एकांड्या सायकलस्वाराची भन्नाट सहल !
18 Apr 2014 - 9:17 pm | पिंगू
सध्या हा विमुक्त माहित नाही कुठे गायबलाय.. त्याच्यासोबत सायकल राईड करायची म्हणतो..
18 Apr 2014 - 9:22 pm | आतिवास
एखाद्या निरुद्देश संध्याकाळी आवडती कविता निवांत गुणगुणत बसावं - तसं वाटलं लेख वाचताना.
सुंदर.
19 Apr 2014 - 12:07 am | अत्रुप्त आत्मा
सफर तर मस्तच. पण![http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif](http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif)
@घरी पोचल्यावर मस्तपैकी गरम पाण्यानं आंघोळ केली आणि उरलेला दिवस गो.नी.दां. चा माचीवरला बुधा वाचण्यात घालवला...>>> इस ह्याप्पी येंडींग को... क्या केहेने!?
19 Apr 2014 - 5:03 pm | स्पंदना
मस्त हो विमुक्त भौ!
काय वर्णन काय फोटो! अन आजकाल सगळे मोटार फिटारच्या बाता करताना काय ती सायकलची हौस!
धन्यु!
20 Apr 2014 - 1:04 am | फास्टरफेणे
मलाही आधी टणटणीची फुले आवडायची...पण हे वाचा!
गाजर गवताइतकीच (काँग्रेस गवत) टणटणी स्थानिक/देशी झाडांसाठी धोकादायक आहे.
20 Apr 2014 - 1:12 am | फास्टरफेणे
"पायवाटेच्या दोन्ही बाजूला मस्त घाणेरी फुलली होती" ऐवजी "पायवाटेच्या दोन्ही बाजूला घाणेरीने अतिक्रमण केले होते" म्हणणे जास्त योग्य ठरेल. :)
बाकी लेख मस्त!