माकडाची जात याची, मूढ कुठला केशवा

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
20 Feb 2008 - 12:18 am

आमची प्रेरणा प्रसाद यांची अप्रतिम गझल नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी
आणि खोडसाळ यांचे तितकेच अप्रतिम विडंबन नोकरांना खाज सुटली, घर्म फुटला शेटजी

माकडाची जात याची, मूढ कुठला केशवा
जो तुम्हाला वाटला तो हा न इथला केशवा!

एक कविता चांगली ना सोडली जालावरी
बघ विडंबन पाडण्या बाजार जमला केशवा...

का उभारू पाहतो हे शब्दवैभव , क्लिष्टता?
वेष्टने भारी जरी ही, अर्थ बुडला केशवा...

द्विपदी लाखो कशाला, चार ओळी पाडल्या
वाहवा कंपूत झाली आणि सुटला केशवा!

धन्य आहे या जगी जे वाहवा करती तुझी
होय हो त्यांनीच रे आहे चढवला केशवा!

का जुना हा माल मेल्या नेहमी हाताळतो?
एवढा का कल्पनांचा ओघ अटला केशवा?

वाचुनी रे क्षुद्र सारी तव विडंबन रोजची
नेत्र थकले, कान किटले, जीव विटला केशवा

वाचकांच्या रोज लाथा अन शिव्या ही रोजच्या
पुस्तके वाटून अपुली आज फसला केशवा

चार लाथा! आठ लाथा !! वाढवा लाथा जरा...
कार्य घरचे आज समजा आणि बुकला केशवा

- केशवसुमार

विडंबन

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

20 Feb 2008 - 1:12 am | इनोबा म्हणे

माकडाची जात याची, मूढ कुठला केशवा
जो तुम्हाला वाटला तो हा न इथला केशवा!

आहे जबरा,पण काय करु,तुम्ही आमच्या अपेक्षा इतक्या उंचावर नेऊन ठेवल्या आहेत की तुमच्याकडून तेवढ्याच उंचीचे विडंबन अपेक्षीत आहे/असते.

आपलाच,
-इनोबा

ऋषिकेश's picture

20 Feb 2008 - 1:18 am | ऋषिकेश

मस्त विडंबन आवडले
:)
बाकी
धन्य आहे या जगी जे वाहवा करती तुझी
होय हो त्यांनीच रे आहे चढवला केशवा!

हे विषेश आवडले ;)

-ऋषिकेश

बेसनलाडू's picture

20 Feb 2008 - 3:41 am | बेसनलाडू

सुमारशेठ,
रेशमाच्या बाबांनी नंतरचे तुमचे आजवरचे सर्वोत्कृष्ट विडंबन. निव्वळ झकास!!!
मजा आली.
चार लाथा! आठ लाथा !! वाढवा लाथा जरा...
कार्य घरचे आज समजा आणि बुकला केशवा
हाहाहाहा, फारच बॉ मनकवडे तुम्ही! ;)
(आस्वादक)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

20 Feb 2008 - 8:43 am | विसोबा खेचर

द्विपदी लाखो कशाला, चार ओळी पाडल्या
वाहवा कंपूत झाली आणि सुटला केशवा!

धन्य आहे या जगी जे वाहवा करती तुझी
होय हो त्यांनीच रे आहे चढवला केशवा!

सुंदर रे केशवा..:)

(वाहवा करणारा) तात्या.

चतुरंग's picture

20 Feb 2008 - 8:48 am | चतुरंग

चार लाथा! आठ लाथा !! वाढवा लाथा जरा...
कार्य घरचे आज समजा आणि बुकला केशवा

हे घरचे कार्य फारच भन्नाट! विडंबन एकदम झकास!!

चतुरंग

सहज's picture

20 Feb 2008 - 11:34 am | सहज

>>हाहाहाहा, फारच बॉ मनकवडे तुम्ही! ;)

सहमत!!

हं आता पुढे काय?

चालु द्या. :-)

सुधीर कांदळकर's picture

20 Feb 2008 - 8:12 pm | सुधीर कांदळकर

रासभसम्राट झाल्यासारखे वाटते.

वाचुनी रे क्षुद्र सारी तव विडंबन रोजची
नेत्र थकले, कान किटले, जीव विटला केशवा

वाचकांच्या रोज लाथा अन शिव्या ही रोजच्या
पुस्तके वाटून अपुली आज फसला केशवा

चार लाथा! आठ लाथा !! वाढवा लाथा जरा...
कार्य घरचे आज समजा आणि बुकला केशवा

आमचे संख्याशास्त्र एवढे मर्यादित नाही. का एवढे कृपण होता? जर कोटीत बोला की राव.

अप्रतिम. आपले 'हे' विडंबन श्रेष्ठ की 'ते' असा प्रश्न पडतो.

अशीच अगणित येऊ द्यात. शुभेच्छा.

केशवसुमार's picture

21 Feb 2008 - 12:22 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार

केशवसुमार

सर्वसाक्षी's picture

21 Feb 2008 - 10:12 pm | सर्वसाक्षी

लाथा खाऊनही लोकरंजनाचे कार्य अबाधित सुरू ठेवणार्‍या संत केशवास दोन्ही कर जोडोनी _/\_