लांडगे आले रे .... आणि परत गेले

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
27 Jul 2009 - 8:42 am

बावीस जुलैला सूर्याला लागलेले खग्रास ग्रहण शंभर वर्षातले सर्वात मोठे होते, तसेच चोवीस जुलैला मुंबईच्या समुद्राला शंभर वर्षातली सर्वात मोठी भरती आली होती असे त्या त्या विषयांमधले तज्ज्ञ सांगतात. या दोन्ही गोष्टी आपल्या छोट्या आयुष्यात आपल्याला पहायला मिळाव्यात हे आपले केवढे मोठे भाग्य? असे वाटण्याची शक्यता आहे. त्यांच्यासंबंधीच्या बातम्या, लेख आणि चर्चा वगैरे गोष्टी गेल्या तीन चार महिन्यांपासून सर्व प्रसारमाध्यमांवर येऊ लागल्या होत्या. हळू हळू त्यांची संख्या वाढत गेली आणि तमाम जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल उत्कंठा निर्माण करून ती पध्दतशीरपणे वाढवत नेली गेली. निसर्गातल्या त्या अद्भुत घटना प्रत्यक्ष घडत असतांना तर अनेक वाहिन्यांवरून त्यांचे थेट प्रक्षेपण चालले होते. एका चॅनेलवर 'जल, थल और आकाश' यामधून सूर्यग्रहण कसे दिसते ते पहाण्यासाठी तीन जागी कॅमेरे लावले होते तर भारतातल्या आणि परदेशातल्या अनेक ठिकाणांवरून दिसणार्‍या ग्रहणाचे दर्शन इतर कांही चॅनेलवर घडवले जात होते. त्याचा 'आँखो देखा हाल' सांगत असतांना अशा प्रकारच्या वेगळ्या विषयावर काय नवे बोलावे असा प्रश्न निवेदकांना पडत असावा. त्यामुळे पुन्हा पुन्हा तीच तीच चित्रे दाखवून तीच तीच वाक्ये बोलली जात होती. आपण कांही तरी अचाट, अघटित, अविस्मरणीय असे पहात आहोत असा भास निवेदकांच्या बोलण्यातून केला जात होता, पण चित्रे पाहतांना तसे वाटत नव्हते. त्याला कंटाळलेले प्रेक्षक तर मध्ये मध्ये कमर्शियल ब्रेक आल्यामुळे सुखावत होतेच, वैतागलेल्या निवेदकांनासुध्दा हायसे वाटत असेल. "अमक्या सेलफोनवर बोलता बोलता चालत रहाण्यात मिळालेल्या व्यायामामुळे सगळे रोगी बरे होऊन गेले आणि डॉक्टरला माशा मारत बसावे लागले." अशा प्रकारच्या 'आयडिया' पाहून मनोरंजन होत होते.

हे खग्रास सूर्यग्रहण सर्वात मोठे कशामुळे म्हणायचे तर त्याचा सहा मिनिटांहून जास्त असलेला कालावधी मोठा होता, पण भारतापासून चीनपर्यंतच्या जमीनीवरून तरी कुठूनही तो तेवढा दिसला नाही. पॅसिफिक महासागरातल्या कुठल्या तरी बिंदूवर असला तर कदाचित असेल. टीव्हीवर जेवढा दिसला तो जेमतेम दोन मिनिटांचा असेल, आणि तो जास्त असला तरी काय फरक पडणार होता? खंडाळ्याच्या घाटातून पहिला प्रवास करतांना पहिल्या बोगद्यात आगगाडी शिरते तेंव्हा अंगावर रोमांच उभे राहतात, पण त्या बोगद्याची लांबी जितकी जास्त असेल तेवढे ते जास्त नसतात. एकदा मिट्ट काळोख झाला की त्यातून बाहेर यावेसे वायते. ग्रहण लागल्यापासून ते संपू्र्ण खग्रास होतांना पाहण्यातल्या मजेत संपूर्ण काळोख होण्यापूर्वीचा एक क्षण सर्वात मोलाचा असतो, त्याचप्रमाणे काळोखातून प्रगट होणारी सूर्याच्या किरणांची पहिली तिरीप भन्नाट असते. या दोन्ही क्षणांना आकाशात 'हि-याची अंगठी' दिसू शकते. पण या दोन क्षणांच्या मध्ये असलेला अंधार किती मिनिटे टिकतो याला महत्व कशासाठी द्यायचे ते कांही कळत नाही. मला तरी हे 'शतकांतले सर्वात मोठे ग्रहण' यापूर्वी पडद्यावर पाहिलेल्या कोणत्याही खग्रास ग्रहणांपेक्षा वेगळे वाटले नाही. भारतातल्या बहुतेक भागात त्या दिवशी आकाश काळ्या ढगांनी आच्छादलेले असल्यामुळे किंवा पाऊस पडत असल्यामुळे सूर्याचे दर्शनच झाले नाही. त्यामुळे त्याला लागणारे ग्रहण पाहण्यासाठी लक्षावधी लोकांनी घेतलेली मेहनत वाया गेली. त्यांच्या मानाने टीव्हीवर पाहणारे अधिक सुदैवी होते. वाराणशी आणि चीनमध्ये ग्रहण लागतांना ते त्यांना पहायला मिळाले.

विज्ञानातले कांही धागे उचलून अज्ञान पसरवण्याचा उद्योग करणार्‍या कांही उपटसुंभ 'वैज्ञानिक' लोकांनी यावेळी कांही अफवा उठवल्या होत्या. खग्रास ग्रहणाच्या वेळी सूर्य आणि चंद्र हे दोघे एका रेषेत आल्यामुळे समुद्राच्या पाण्याबरोबर जमीन आणि डोंगरसुध्दा त्यांच्याकडे ओढले जातील आणि त्यामुळे महाभयानक धरणीकंप, ज्वालामुखीचे स्फोट, सुनामी वगैरे येणार असल्याचे 'शास्त्रीय' भाकित कांही लोकांनी केले होते, तर ग्रहणाचा काळ अत्यंत अशुभ असल्यामुळे या वेळी जगात अनेक प्रकारचे उत्पात होण्याचे भविष्य पोंगापंडितांनी वर्तवले होते. त्यामुळे अनेकांची घाबरगुंडी उडाली होती. ग्रहणाचा काळ जसजसा जवळ येत होता तसतशी कांही लोकांच्या मनातली उत्कंठा, कांही जणांच्या मनातली भीती आणि कांही महाभागांच्या मनातल्या तर दोन्ही भावना शिगेला पोचल्या होत्या.

त्यानंतर दोन दिवसांनी चोवीस तारखेला 'शतकांतली सर्वात मोठी' भरती येणार असल्याच्या बातमीने तर प्रसारमाध्यमांच्या जगातल्या मुंबईत नुसती दाणादाण उडाली होती. सव्वीस जुलैच्या प्रलयाची आठवण ताजी असल्यामुळे यावेळी त्याहूनही भयंकर असे कांही तरी घडणार असल्याची आशंका घेतली जात होती. सरकार आणि महापालिका कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याच्या अधिकृत घोषणा होत असल्या तरी त्यावर कोणाचाही फारसा विश्वास दिसत नव्हता. उलट पूरनियंत्रणासाठी करण्याच्या किती योजना अपूर्ण आहेत याच्याच सविस्तर बातम्या रोज प्रसारमाध्यमातून येत होत्या. भरतीच्या दिवशी दाखवण्यात येणारे 'थेट प्रक्षेपण' तर केविलवाणे होते. गेटवे ऑफ इंडिया, वरळी आणि वरसोवा या तीन ठिकाणी समुद्रात उसळत असलेल्या लाटा आणि त्या पहायला जमलेला माणसांचा महापूर आलटून पालटून दाखवत होते. नेमके काय होऊ शकेल याचा अंदाज नसल्यामुळे सावधानतेचा उपाय म्हणून उत्साही बघ्यांना समुद्राच्या जवळपास फिरकू दिले जात नव्हते. पावसाळ्यातल्या सामान्य भरतीच्या वेळीसुध्दा मरीन ड्राइव्ह आणि वरळी सी फेसच्या कठड्यावर कांही ठिकाणी समुद्रातल्या लाटांचे पाणी उडून फुटपाथवर पडते. त्यातले शिंतोडे मी अनेक वेळा अंगावर घेतलेले आहेत, कधी कधी अचानक आलेल्या उंच लाटेमुळे त्यात सचैल स्नानदेखील झाले आहे. या वेळीसुध्दा त्याच प्रकाराने पाणी उडत होते. निदान टीव्हीच्या पडद्यावर तरी मला समुद्रातल्या लाटांचे रूप कांही फारसे अजस्र दिसले नाही. ठरलेल्या वेळी भरती आली, तशी ती रोज येतेच. त्यात कांही मोठ्या लाटा येत होत्या त्यासुध्दा नेहमीच येत असतात. जेंव्हा भरतीच्या सोबतीला तुफानी वादळवारा येतो, तेंव्हा खवळलेल्या समुद्राचे जे अक्राळ विक्राळ रूप पहायला मिळते तसे कांही मला या वेळी दिसत नव्हते. या भरतीच्या वेळीच आभाळही कोसळून मुसळधार पावसाची संततधार लागली असती तर कदाचित मुंबई जलमय झाली असती. सुदैवाने तसले कांही झाले नाही. शंभर वर्षात कधीतरी पडणारा असामान्य जोराचा पाऊस सांगून येत नाही, त्यामुळे दाणादाण उडते. ही मोठी भरती येणार असल्याचे आधीपासून कळले असल्यामुळे त्याचा अनुभव घेण्यासाठी अनेक लोक आतुरतेने तिची वाट पहात होते. त्यांच्या पदरात फारसे कांही पडले असे दिसले नाही.

'लांडगा आला रे आला' या गोष्टीतला एक खट्याळ मुलगा गांवकर्‍यांची थट्टा करण्याच्या उद्देशाने लांडगा आल्याची खोटीच आंवई उठवतो. या वेळी ग्रहण आणि भरती हे दोन बुभुक्षित लांडगे एकानंतर एक येणार असल्याचा गाजावाजा सगळ्या प्रसारमाध्यमांनी आधीपासून सुरू केला होता. आपण या लांडग्यांना कांहीही करू शकत नाही हे ठाऊक असल्यामुळे भित्रे ससे बिळात लपून बसले होते तर कांही उत्साही प्राणी त्यांना पाहण्यासाठी कुतूहलाने उंच झाडांवर चढून बसले होते. अपेक्षेप्रमाणे 'ते' आले. त्यांनी सर्वांना आपले दर्शन दिले आणि 'ते' जसे आले तसे चालले गेले. पण 'ते दोघे' मुळात लांडगे नव्हतेच. ते होते सुंदर आणि दिमाखदार काळवीट!

मौजमजालेख

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

27 Jul 2009 - 9:49 am | प्रकाश घाटपांडे

माध्यमातुन गाजावाजा झाला तर त्यामुळे तरी लोक या खगोलशास्त्रीय अविष्काराकडे पहाण्याची संधी गमावणार नाहीत असा हेतुतः केलेल्या वैज्ञानिकांच्या "खेळी"चा हा भाग आहे. अजुनही ग्रहण या प्रकाराकडे अंधश्रद्ध नजरेने पहाणा-या लोकांपर्यंत लोकप्रिय माध्यमा द्वारे पोचण्याचा हा प्रयत्न आहे. मग त्यासाठी 'ग्लॅम' देणे 'गाजावाजा' करणे हे ओघाने आलेच. आता १५ जानेवारी २०१० च्या कंकणाकृती सूर्यग्रहणालाही असाच प्रकार होईल हे भाकीत आम्ही वर्तवतो.
( हे भाकीत वर्तवायला ज्योतिषी कशाला पाहिजे?)
ज्योतिर्दुषण प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विसोबा खेचर's picture

27 Jul 2009 - 9:14 am | विसोबा खेचर

या वेळी ग्रहण आणि भरती हे दोन बुभुक्षित लांडगे एकानंतर एक येणार असल्याचा गाजावाजा सगळ्या प्रसारमाध्यमांनी आधीपासून सुरू केला होता. आपण या लांडग्यांना कांहीही करू शकत नाही हे ठाऊक असल्यामुळे भित्रे ससे बिळात लपून बसले होते तर कांही उत्साही प्राणी त्यांना पाहण्यासाठी कुतूहलाने उंच झाडांवर चढून बसले होते. अपेक्षेप्रमाणे 'ते' आले. त्यांनी सर्वांना आपले दर्शन दिले आणि 'ते' जसे आले तसे चालले गेले. पण 'ते दोघे' मुळात लांडगे नव्हतेच. ते होते सुंदर आणि दिमाखदार काळवीट!

हा हा हा! मस्त लेख... :)

पण घारेसाहेब, एक गोष्ट मात्र मान्य केली पाहिजे ती अशी की त्या दिवशी भरती निश्चितपणे अधिक आली असणार कारण आमच्या ठाण्याच्या खाडीच्या आसपास जी लोकवस्ती आहे त्या वस्तीत भरतीचं पाणी शिरलेलं मी पाहिलं आहे, जे एरवी कधीच कुठल्याही भरतीच्या वेळी शिरत नाही..

आपण म्हणता त्या प्रमाणे दर्याच्या लाटांचं काही फारसं अक्राळविक्राळ रूप पाहायला मिळालं नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी वरील बाबतीत आपण काय खुलासा करू शकाल?

आपला,
(दर्याप्रेमी) तात्या.

आनंद घारे's picture

27 Jul 2009 - 9:26 am | आनंद घारे

अमुक इतके मीटर उंच भरती असा जो अंदाज वर्तवला जातो त्याचा अर्थ समुद्राच्या पातळीची त्या वेळची उंची सरासरी पातळीपेक्षा (मीन सी लेव्हलपेक्षा) तितके मीटर उंच असा होतो. त्यामुळे त्यापेक्षा सखल भागत पाणी घुसणे शक्य आहे. याच कारणामुळे सखल भागात राहणार्‍या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता, कांही लोकांना तात्पुरते सुरक्षित अशा ठिकाणी हलवण्यात आले असले तर ते योग्यच होते. पण शतकातली सर्वात मोठी भरती आणि तशाच प्रकारचा मुसळधार पाऊस या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडण्याची शक्यता अत्यल्प असल्यामुळे या वेळी महाप्रलय होईल अशी भीती मला तरी वाटली नव्हती.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

Nile's picture

27 Jul 2009 - 9:30 am | Nile

हा हा हा! बिचारे गावकरी. ;)

एक शंका, भरती ओहोटी मोजणारी काही व्यवस्था आहे का? असल्यास खरंच कीती भरती होती ते कळेलच.

पण मला ही, ग्रहण आणि भरती यामध्ये नक्की इतकं काय ग्रेट आहे (सर्वसामान्यकरता) हे कळलेलं नाही, त्यामुळे मी ना ती भरतीची बातमी वाचली ना ग्रहण टीव्हीवर पाहीले.
-अभागी(?) ;)

आनंद घारे's picture

27 Jul 2009 - 9:44 am | आनंद घारे

आपल्याला ग्रेट वाटोत व न वाटोत, ती जरूर पाहण्यासारखी असतात असे मला वाटते. मरुभूमी, निबिड अरण्ये, मुसळधार पाऊस, हिमाच्छादित पर्वतशिखरे, अथांग पसरलेला दर्या या सगळ्या गोष्टी मला सुखावतात इतकेच नव्हे तर अंतर्मुख करतात.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

27 Jul 2009 - 11:52 am | विसोबा खेचर

इतकेच नव्हे तर अंतर्मुख करतात.

क्या बात है..!

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Jul 2009 - 12:22 pm | प्रकाश घाटपांडे

हेच म्हणतो
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुनील's picture

27 Jul 2009 - 10:53 am | सुनील

मरुभूमी, निबिड अरण्ये, मुसळधार पाऊस, हिमाच्छादित पर्वतशिखरे, अथांग पसरलेला दर्या या सगळ्या गोष्टी मला सुखावतात इतकेच नव्हे तर अंतर्मुख करतात.
सहमत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील's picture

27 Jul 2009 - 10:58 am | सुनील

ग्रहणाला दिले गेलेले ग्लॅमर समजू शकते, नव्हे भारतासारख्या देशात जिथे अद्यापही कित्येक जण ग्रहण काळात खाणे, पिणे, फिरणे टाळतात तेथे लोकांनी ग्रहण हे एक खगोलशास्त्रीय घटनाच असून त्याचा (योग्य ती काळजी घेऊन) आस्वाद घ्यावा, यासाठी योग्यदेखिल आहे.

शतकातील सर्वात मोठी भरती वगैरे प्रकार म्हणजे टीआर्पी वाढवण्याचाच प्रकार वाटला!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.