=============================
कधी एक काळी असा काळ होता, जिथे स्वप्न सारे पुरे व्हायचे..
मनातून वारा तरारून येता कसे फूल प्रत्येक नाचायचे !
कधी ते पहाटे दिशाकोन सारेच आदित्य रंगात रंगायचे
कधी रात्रीचे गोड अंधार सारे सुखाच्याच स्वप्नात संपायचे !
असो भोवतालात गर्दी कितीही, तुझे चोरटे नेत्र भेटायचे
मनाचे मनी गूज यावे कळोनी, असे काहीसे छान बोलायचे !
कधी एकदा नीट एकांत येता, हातामधे हात गुंफायचे..
असा स्पर्श स्पर्शास स्पर्शून जाता, रोमांच रोमांच फुलवायचे !
कधी शांतता खूप बोलायची ..अन कधी शब्द सारे मुके व्हायचे,
कधी पावसाळाच डोळ्यात येता, चारी दिशांना धुके व्हायचे..
कधी एवढा काळ भांडायचो की, आकाश सारे सुने व्हायचे..
कधी खूप मोठ्या चुका व्हायच्या अन, कधी खूप छोटे गुन्हे व्हायचे !
कधी मत्सराचे धनी व्हायचो अन कधी आपलेही हसे व्हायचे...
कधी प्रेम ’कंसात’ बोलायचे की- "भविष्यात माझे कसे व्हायचे?"
.
.
.
.
स्मृतींचे तुझ्या मेघ दाटून येता, बिचा-या मनाने कुठे जायचे?
’उजाडेल’ ही एक आशा धरूनी किती रात्रीचे काळ कंठायचे??
असे गूढ, अज्ञातसे दु:ख माझे कुणाला किती काळ सांगायचे?
मुक्यानेच आयुष्य कंठायचे हे, मुक्यानेच तू गीत हे गायचे.....
.... कधी एक काळी,
असा काळ होता,
जिथे स्वप्न सारे पुरे व्हायचे !!!
-ज्ञानेश.
===============================
प्रतिक्रिया
24 Jul 2009 - 11:26 pm | प्रशांत उदय मनोहर
:?
आधी थोडं तांत्रिक बाबींबद्दल लिहितो - B)
कडवे क्र. ४, ५ व ६ वगळल्यास सुमंदारमालेत सुरेख रचना जमली आहे. =D>
उपरोक्त कडव्यांमध्ये शब्द थोडेसे बदलून त्या ओळी सुमंदारमालेत गुंफता आल्या तर आणखी मजा येईल.
बाकी कविता मस्त जमली आहे.
शेवटची दोन कडवी रडवून गेली. :''( :( :<
25 Jul 2009 - 12:18 am | बेसनलाडू
(आस्वादक)बेसनलाडू