घर पहावं रंगवून!

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
2 Jun 2009 - 4:25 pm

घरात रंगकाम काढलं की सामानाची हलवाहलवी, झाकाझाकी, धूळ, आवाज आणि नंतरची आवराआवरी.. सगळं घर ढवळून निघतं अगदी. बर्‍याच हरवलेल्या वस्तू ह्या आवराआवरीत सापडतात तर कित्येक वस्तू आपण का जमवल्यात? असा प्रश्न पडतो. पण त्या फेकून देण्याऐवजी "असू दे, लागेल केव्हा तरी, होईल कशाला तरी.. " असं म्हणून जुने पत्र्याचे, प्लास्टिकचे डबे, प्लास्टिकचे चमचे, बशा, जुने कपडे परत खोकाबंद करून अडगवायला सज्ज होतात. ह्या सगळ्याचा धसका म्हणून की काय, जर्मनीत आल्यापासून 'घर रंगवणे' आतापर्यंत इतकी वर्षे यशस्वीपणे टाळले होते, पण आता मात्र आमच्या घरातील एक खोली अगदी रंगवायला हवीच होती. टाळाटाळ करून अजिबात चालण्यासारखे नव्हते.

शाळेत असताना दिलेल्या चित्रकलेच्या परीक्षांच्या वेळी काय हातात ब्रश धरला असेल तेवढा! याउप्पर रंगवण्याचा आणि माझा स्वप्ने रंगवणे सोडून गेल्या कित्येक वर्षात संबंध आलेला नव्हता आणि दिनेशने कॉलेजात असताना घराचे रंगकाम चाललेले असताना हौशीने रंगार्‍यांमध्ये जी लिंबूटिंबू लुडबुड केली होती. एवढ्या भांडवलावर आम्ही रंगकाम करणे म्हणजे खोलीची आहे ती अवस्था बरी म्हणायची वेळ नको यायला.. असे म्हणून रंगार्‍यांना काम द्यायचे ठरवले आणि त्या दृष्टीने शोध सुरू केला. रंगापेक्षा रंगार्‍यांचे पैसे दुप्पट होतील हे समजल्यावर तो बेत रहित करून आम्हीच हातात ब्रश घ्यायचे ठरवले.

'बाऊ मार्केट' म्हणजे घराच्या बांधकामासाठी, सुतारकामासाठी, रंगकामासाठी आणि सजावटीसाठी लागणारे साहित्य मिळणार्‍या दुकानातून फिरून रंगकामासाठी लागणार्‍या खरेदीची पूर्वतयारी सुरू केली. रंगाच्या ब्रशाला पिंझेल म्हणतात आणि फार्ब म्हणजे रंग ह्या ज्ञानावर चालण्यासारखे नव्हते. त्यासाठीच्या वेगळ्या संज्ञा माहित असणे जरुरीचे होते, त्यामुळे मग दिवसचे दिवस बाउमार्केटात फिरुन कुठे काय मिळते? आणि कशाला काय म्हणतात? ह्याची माहिती गोळा करून नोंद केली. एकदा हातात माहिती आल्यावर दिनेश आणि मी दोघांनी परत दुकानात जाऊन रंगसाहित्याची पाहणी केली. रंगकामासाठी लागणार्‍या वेगवेगळ्या आकारांच्या ब्रशांचा ढिग पाहून कोणते ब्रश आपल्याला लागतील ह्याचा अंदाज येईना. तेथे मदतीसाठी असलेल्या काउंटरवर जाऊन विचारणा केली. साधा रंगाचा ब्रश,भिंतीचे कोपरे रंगवायचा वेगळा ४५अंशाचा कोन केलेला ब्रश,रेडिएटर रंगवायचा आणखी वेगळा ब्रश आणि रंग, वॉर्निशिंगसाठीचा ब्रश, रोलर आणि त्या,त्या कामासाठीचे रंग खरीदले. लासुअर म्हणजे वॉर्निश असे घोकून गेले होते. ते कुठे मिळेल ते ही विचारून घेतले.तर तिथे बर्‍याच रंगांचे डबे दिसले . रंगहीन लासुअरचा म्हणजे वॉर्निशचा डबा शोधून घेतला. दारांच्या फ्रेमा रंगवायला वेगळा रंग घेतला. घराला रंग कोणता द्यायचा? ह्या प्रश्नावर मतभेद व्हायला वावच नव्हता कारण पांढरा रंगच द्यायला त्यातल्या त्यात सोपा असल्याने 'मेरावाला पिंक' शोधण्याची भानगड नव्हती.

इंटरनेटवर गुगल चॅटवर 'बिझी, डू नॉट पिंग'चा टॅग लावून गप्पांचा मोह टाळत गुगलबाबावर रंगकामविषयक शोध सुरू केला आणि चक्क अभ्यास करावा तशा नोटस काढल्या. दिनेशनेही कचेरीत जसा वेळ मिळेल तसे रंगकामविषयक वाचन सुरू केले आणि स्प्रे-मशिनचा शोध लागला.गाड्यांचेच स्प्रे पेंटिंग आतापर्यंत माहिती होते, पाहिले होते पण घराचे रंगकाम स्प्रे पेंटिंग मशिनद्वारे ही कल्पनाच आमच्यासाठी वेगळी होती, नवीन होती. लग्गेचच बाऊमार्केटात जाऊन चौकशी केली. तेथल्या कामगारांनी आम्हाला वेड्यातच काढले. एका खोलीसाठी मशिनमध्ये कसले पैसे वाया घालवता? त्यात रंग भरणे आणि नंतर साफ करणे ह्यात एवढा वेळ जाईल की तुमच्या दोन खोल्या तेवढ्या वेळात रंगवून होतील. असा सल्ला ऐकून यंत्र खरेदी न करताच घरी परतलो पण डोक्यातून मात्र ते मशीन जात नव्हते. त्यावरची अधिकाधिक माहिती मिळवताना एक फिल्मही सापडली, ती पाहिल्यावर तर मशीन घ्यायचा विचार पक्का झाला. कारण त्यात मशिनद्वारे रंगकाम म्हणजे अगदीच किरकोळ काम वाटत होते. छान कपडे घालून, मेकप करून मशीनचा काँप्रेसर खांद्यावर धरून त्यातील तरुणी भिंत रंगवत होती. कहर म्हणजे भिंत पूर्ण रंगवल्यावर एका कोपर्‍यात फुलांचे नक्षी कामही तिने केले आणि ह्या यंत्राने रंगकाम करणे म्हणजे कसा आल्हाददायक अनुभव आहे हे पापण्या फडफडवत सांगितले, ते पाहून आम्हीही भुललो आणि शेवटी आपण स्वतः रंगकाम करणार आहोत,रंगार्‍यांचे पैसे तर वाचले आहेत ना? मग मशिनमध्ये पैसे घालवायला काय हरकत आहे? आणि 'हे पैसे वेस्ट करत नसून इन्व्हेस्ट करत आहोत' या उदात्त हेतूने तातडीने यंत्रखरेदी करुनच टाकली.

ज्या खोलीचा कायापालट करायचा होता ती रिकामी करून, घरातल्या इतर खोल्यांना अडगळीच्या खोल्यांचे रुपडे देऊन, आता उद्या रंगकाम सुरू करायचे ह्या विचारात स्वप्ने रंगवत झोपी गेलो. सकाळी ठेवणीतले जुने कपडे घालून, शॉवरकॅपने डोकी झाकून आम्ही दोघे रंगकामासाठी सज्ज झालो. त्या जाहिरातीतल्या बाईसारखे नवे कपडे आणि मेक अप करून रंगकाम करण्याचा आणि जमलं तर ते करत असताना फिल्मवण्याचाही एकदा माझा विचार होता पण क्काय बावळट आहे? जाहिरात आणि रिऍलिटीमधला फरक कळत नाही? असा चेहरा करून दिनेशने तो हाणून पाडला. मशिनबरोबर दिलेल्या सूचनांप्रमाणे आधी रंगात थोडे पाणी घालून पातळ केला आणि एका फिरकीने लस्सीसाठी ब्लेंडरने फेटावे तसा रंग घुसळला.रंगाचा डबा उघडल्याबरोबर तो नवेपणाचा ,कोरेपणाचा वास आला..आणि त्याचबरोबर उत्साहही.. शाळा सुरू व्हायच्या आधी खरेदी केलेल्या वह्या,पुस्तकांच्या कोरेपणाच्या वासाची आठवण झाली एकदम! भरकटलेल्या मनाला परत फ्रांकफुर्टात आणून तयार केलेला रंग यंत्राच्या डब्यात भरला आणि डबा बंद करून मोटरला जोडला. एका भिंतीवर थोडा रंग स्प्रे करून श्रीगणेशा केला आणि तो भाग उजळला की, पण थोड्याच वेळाने रंग बाहेर येतो आहे असे काही लक्षण दिसेना. उलट रंगात गुठळ्या आहेत असे वाटू लागले. रंग अगदी घट्ट नको, १०% पाणी घाला अशी सूचना वाचून परत रंग डब्यात ओतला आणि एका मोठ्या चाळणीतून चक्क रंग गाळून घेतला. परत लस्सीसारखे घुसळले आणि आता जरा पहिल्यापेक्षा पातळ रंग भरून स्प्रे सुरू केला. आता मात्र सरसर एकसंध असा रंग पाझरू लागला. मग काय? वॉशिंग्टनच्या कुर्‍हाडीसारखे आमचे रंगयंत्र दिसेल ती भिंत रंगवू लागले.चारही भिंती त्यामानाने खूपच लवकर रंगवून झाल्या पण छत रंगवायला मात्र अपेक्षेपेक्षाही जास्त वेळ लागला.

रात्री ११ पर्यंत आम्ही,आम्ही म्हणण्यापेक्षा दिनेशनेच चारही भिंती आणि छत पूर्ण केले. दिनेशचे हात,खांदे भरून आले होते पण मनही पूर्ण भरलं होतं. आम्ही रंगकाम करू शकतो हा विश्वास निर्माण झाला होता, त्या आनंदातच पाठ टेकली. अजून रेडिएटर, दारांच्या फ्रेम्स, वॉर्निशिंग बाकी होते. दुसर्‍या दिवशी रविवार असल्याने आवाज करणारी यंत्रे वापरता येणार नव्हती. कसले हे ह्यांचे नियम? असे मनात चडफडत ब्रश हातात घेतला. दारांच्या फ्रेमा तैलरंगाने रंगवायच्या असल्याने काळजी घेणे आवश्यक होते, नाहीतर निळ्या कोल्ह्यासारखा आपला श्वेतकोल्हा व्हायचा ह्या विचाराने आणि जमिनीवर रंगनक्षी नको म्हणून आधी खालची जमीन कागदाने झाकून चिकटपट्टी लावली आणि दारांच्या फ्रेमा शुभ्र रंगात रंगल्या तर लाकडी दारांना वार्निश फासून झाले. भारतात असते तर हाताबरोबर अगदी ट्रंका जरी नाहीत तरी गेला बाजार पत्र्यांचे डबे, लोखंडी खाटा तरी रंगवून घेतल्याच असत्या पण इथे आम्हीच रंगारी असल्याने अगदीच आवश्यक वस्तू रंगवण्याकडे आमचा कल होता. तरी मानफ्रेडच्या टेबलाचे पाय वाकुल्या दाखवू लागल्याने उदार मनाने त्यांना रंगवून काढले. आता खरे किचकट काम रेडिएटर रंगवण्याचे होते. एकेक पाते रंगवायला फारच वेळ लागला, लिटरभर रंग आणि एक पूर्ण दिवस रेडिएटरने खाल्ला.

आधी जुनीपुराणी, गरीब बिच्चारी वाटणारी खोली आता अगदी नवी दिसू लागली, त्याहीपेक्षा ती आम्ही स्वतः नवी केली ह्याचा आनंद जास्त आहे. इतर खोल्या आता तिच्यापुढे गरीब बिच्चार्‍या आणि जुन्या वाटत आहेत पण सध्या तरी आम्ही तिकडे लक्ष देणार नाही आहोत. कदाचित स्वतः रंगकाम करणार्‍यांच्या दृष्टीने 'ह्यात काय विशेष?' असे असेलही .. पण हा आमचा पहिलाच रंगानुभव आम्हाला समृद्ध करून गेला हे मात्र खरं!

राहणीअनुभव

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jun 2009 - 4:34 pm | परिकथेतील राजकुमार

वाह वाह ! एकदम रंगीला लेख हो.

ओघवत्या शैलीमुळे आम्हीपण तुमच्या बरोबर रंगकामाचा आनंद लुटुन घेतला. त्याच बरोबर राजेंच्या या महान प्रयोगाची आठवण देखील ताजी झाली.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

धमाल मुलगा's picture

2 Jun 2009 - 5:37 pm | धमाल मुलगा

स्वातीताई म्हणजे क्काय समजलात काय तुम्ही?? अरेऽऽ क्काय वाट्टेल ते करुन दाखवू शकेल ती :)

बाकी, रंगकामाच्या तुमच्या खेळात आम्हालाही हे असं सहभागी करुन घेतल्याबद्दल ...यू आर वेलकम हां. :)

अवांतरः स्वातीताई, राजेंनी खोली रंगवण्याचा केलेला पराक्रम पाहिलास काय??

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

साक्षी's picture

2 Jun 2009 - 4:34 pm | साक्षी

सुंदर लेख.
लिखाणाची शैली देखील छान आहे.

~साक्षी

रेवती's picture

2 Jun 2009 - 4:37 pm | रेवती

अनुभवाचे चांगले वर्णन केले आहे.
नंतर नंतर तर 'रंग नको पण पसारा आवर' अशी अवस्था होते.
अंग नंतर दोन दिवस दुखत राहते.
आत्ता बाकीच्या खोल्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात ते बरच आहे.
काही दिवसांनी पुन्हा उत्साह आला की एक खोली रंगवायची!;)

रेवती

दशानन's picture

2 Jun 2009 - 4:38 pm | दशानन
नंदन's picture

2 Jun 2009 - 4:41 pm | नंदन

खोली यशस्वीपणे रंगविल्याबद्दल अभिनंदन! अनुभवाचे वर्णनही आवडले.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jun 2009 - 5:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>खोली यशस्वीपणे रंगविल्याबद्दल अभिनंदन! अनुभवाचे वर्णनही आवडले.

रंगकामाचे फोटो लेखात पाहिजेच होते ! :)

-दिलीप बिरुटे

छोटा डॉन's picture

2 Jun 2009 - 4:46 pm | छोटा डॉन

एकदम खुसखुषीत झाला आहे लेख, मज्जा आली वाचुन.
भारी प्रकार आहे रंगकामाचा ...!!!

>>.. पण हा आमचा पहिलाच रंगानुभव आम्हाला समृद्ध करून गेला हे मात्र खरं!
ते तर आहेच, मज्जा आले असेल आणि सुख ही लाभले असेल ...

खुद के साथ बाता : मी स्वतःच फ्रँफुत असतो तर घर रंगवायला मदत करायला डीडींनी येऊ दिले असते का ? का रंगकाम नको पण पसारा आवर ह्या सबबीखाली मला टांग मारली असती ?
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

मस्त कलंदर's picture

2 Jun 2009 - 4:48 pm | मस्त कलंदर

काम पूर्ण केल्याबद्द्ल अभिनंदन!!!

मी बर्‍यापैकी आरंभशूर आहे.. त्यामुळे होता होईलतो कशाचा आरंभच करत नाही.. ;)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

शाल्मली's picture

2 Jun 2009 - 4:48 pm | शाल्मली

वा!
झालं का एकदाचं घर रंगवून?
वर्णन मस्त झालं आहे.

आता तुम्ही दोघांनी खोली कशी रंगवली आहेत हे बघायला यायला पाहिजे लवकरच.. :)

--शाल्मली.

लिखाळ's picture

3 Jun 2009 - 9:12 pm | लिखाळ

वा!
झालं का एकदाचं घर रंगवून?
वर्णन मस्त झालं आहे.
आता तुम्ही दोघांनी खोली कशी रंगवली आहेत हे बघायला यायला पाहिजे लवकरच.. :)

असेच म्हणतो..

रंगानुभव छानच रंगवला आहेस :)

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

शार्दुल's picture

2 Jun 2009 - 4:56 pm | शार्दुल

लेख एकदम भारीच,,,,,

त्याच बरोबर राजेंच्या या महान प्रयोगाची आठवण देखील ताजी झाली.
राजेनी भिंती वर रंगाची तलवार चालविली,,,,,,, आणि स्वातीने रंगाची "मशीन",,, :d

नेहा

अभिज्ञ's picture

2 Jun 2009 - 5:12 pm | अभिज्ञ

एकदम हलकाफुलका व खुसखुशीत लेख.
पण फोटो कुठे आहेत?
मशीनने घराला रंग लावतानाचा एखादा फोटो टाकायला हवा होता.
कळले तरी असते कि हा काय प्रकार असतो ते.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

अनामिक's picture

2 Jun 2009 - 5:17 pm | अनामिक

अनुभव छान 'रंगवला' आहे.

भारतातही स्प्रे पेंटींग नवीन नाही... आमच्या घराच्या भिंतींना स्प्रे पेंटींगच करतो... त्यामुळे (म्हणे) ब्रशचे वळ दिसत नाहीत.

-अनामिक

अवलिया's picture

2 Jun 2009 - 5:18 pm | अवलिया

वा! मस्त !!

--अवलिया

सहज's picture

2 Jun 2009 - 5:31 pm | सहज

खरचं मोठे काम केले की.

'हे पैसे वेस्ट करत नसून इन्व्हेस्ट करत आहोत' या उदात्त हेतूने ..

हा हा हे सहीच!

प्रा. डॉ. म्हणाले तसे एखादा फोटो हवा होता. :-)

तुमचा अनुभव फारच छान लिहिलाय..... :)
अभिनंदन!
common sense is not common

कुंदन's picture

2 Jun 2009 - 5:46 pm | कुंदन

आणि घराचे रंगकामही अगदी व्यावसायिक रंगार्‍याप्रमाणे झाले आहे.

>>'हे पैसे वेस्ट करत नसून इन्व्हेस्ट करत आहोत'
हा उदात्त हेतु आवडला.

मेघना भुस्कुटे's picture

2 Jun 2009 - 7:10 pm | मेघना भुस्कुटे

हाहाहा! मस्त आहे लेख...

नाना बेरके's picture

2 Jun 2009 - 7:37 pm | नाना बेरके

रंगाचा डबा उघडल्याबरोबर तो नवेपणाचा ,कोरेपणाचा वास आला..आणि त्याचबरोबर उत्साहही.. शाळा सुरू व्हायच्या आधी खरेदी केलेल्या वह्या,पुस्तकांच्या कोरेपणाच्या वासाची आठवण झाली एकदम!

.. आम्हालाही तशीच आठवण करून दिलीत. व्वा ! मस्त लेख.

क्रान्ति's picture

2 Jun 2009 - 8:12 pm | क्रान्ति

नेहमीप्रमाणेच खुसखुशित लेख! रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा!
:) क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा

प्राजु's picture

2 Jun 2009 - 8:22 pm | प्राजु

हलका फुलका.. रंगबहार लेख.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

2 Jun 2009 - 8:30 pm | चतुरंग

खोलीचा फोटू का नाही टाकला? गेला बाजार रंगाचा डबा, आणि रंगयंत्राचा तरी टाकायचात की.
'मेरा वाला पिंक' आणि 'इनवेस्टमेंट' छानच! ;)
आपणच आपल्या घरात काम करायची हौस दांडगी असते आणि अतिशय समाधान वाटते. पुढच्या खोल्यांसाठी शुभेच्छा! :)
(खुद के साथ बातां : घरातल्या सर्व कामाचा लोकांनी 'बाऊ' करावा ह्या हेतूने तर जर्मन मार्केटचे नाव 'बाऊ मार्केट' नसेल ना? :? )

(बहुरंगी)चतुरंग

केशवसुमार's picture

3 Jun 2009 - 12:11 pm | केशवसुमार

स्वातीताई,
मस्त रंगीत लेखन आवडले!
खोलीचा फोटू का नाही टाकला? गेला बाजार रंगाचा डबा, आणि रंगयंत्राचा तरी टाकायचात की.
तुमच्या पाककृतीत असतात तसे प्रत्येक टप्याचे फोटो द्यायचे ...रंगवण्या आधीची खोली, रंग कालवताना..रंग देताना.. रंगकाम पुर्ण झालेली खोली.. समाधानाने कौतुकाने आपण केलेले रंगकाम बघणारे रंगारी.....
केशवसुमार

चित्रा's picture

2 Jun 2009 - 9:16 pm | चित्रा

छान लेख. फोटो टाकायला हवे होते.
"हे पैसे वेस्ट करत नसून इन्व्हेस्ट करत आहोत" - :)!

मी लहानपणी घराचे मायनर रंगकाम करण्यात लुडबुड करीत असे - गेटला रंग देणे, खिडक्यांना रंग देणे, एखाद्या ठिकाणी लांबी भरणे वगैरे. इथे आल्यानंतर एका मांडणीला तेवढा रंग दिला आहे.. आता हे वाचून काहीतरी काम काढायला हवे असे वाटायला लागले आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jun 2009 - 9:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हाहाहा मस्तच... मी एकदा पंखा रंगवला होता हौस म्हणून. मज्जा आली होती! अर्थात पसारा वगैरे फार न झाल्यामुळे फारसा फरक पडला नाही.

म्हणजे आजूबाजूला आपसूकच स्प्रे पेंटिंग होऊन पसारा झाला असता! ;)

चतुरंग

=)) =)) =)) =))

बाकि स्वातिताई मला आमचे घर रंगवण्याचे पराक्रम आठवले. रंग भिंतीला कमी आणी अंगावर जास्त अस भूत झाल होत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jun 2009 - 9:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रंग ओला आहे हे माहित असताना ती पाती मोटरला लावणार कोण, आणि पंंखा वर चढवणार कोण? ऍबसेंट माईंडेड आहे हे मान्य, पण येवढीही काही मी 'ही' नाही आहे.

असा काही पसारा केलाच असता तर आमच्या पिताश्रींनी शांतपणे इकडे तिकडे पाहिलं असतं आणि म्हणाले असते, "कधी नव्हे ते चित्रकला फार मनावर घेतली आहेस."

सुबक ठेंगणी's picture

3 Jun 2009 - 10:00 am | सुबक ठेंगणी

माझ्या घराच्या भिंती कागदाच्या आहेत हे किती बरं...
आता विविध प्रकारे कागद फाडून तो चिकटवण्याचा सराव सुरू केला पाहिजे... :?

छोटा डॉन's picture

3 Jun 2009 - 9:15 pm | छोटा डॉन

कागदाच्या भिंती ?
म्हणजे काय आणि कसे असते बॉ ?

------
( "दगडी चाळीत" राहणारा ) छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

मस्त कलंदर's picture

4 Jun 2009 - 1:24 am | मस्त कलंदर

शाळेत नाही का शिकलो, जपानमध्ये पुठ्ठ्याची घरे म्हणून.. भूकंप आला.. कि घर पडायची वाट न बघता आपणच घर पाडून बाहेर जायचे!!! आहे की नाही मज्जा??? ;)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

घाटावरचे भट's picture

3 Jun 2009 - 10:11 am | घाटावरचे भट

छान!

ऋषिकेश's picture

3 Jun 2009 - 12:31 pm | ऋषिकेश

हा हा मस्त! रंगून गेलो हे सगळं वाचताना

(रंगारी)ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

यशोधरा's picture

3 Jun 2009 - 12:50 pm | यशोधरा

नेहमीप्रमाणे रंग(त)दार लेख! :)
मजा आली स्वातीताई!

अमोल केळकर's picture

3 Jun 2009 - 3:40 pm | अमोल केळकर

मस्त लेख
'अवघा रंग एक झाला '
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

श्रावण मोडक's picture

3 Jun 2009 - 4:05 pm | श्रावण मोडक

जाग्या झाल्या. पूर्वी दर एका वर्षाआड घर रंगवणे हे एक काम असायचे. एक तर गणपती किंवा दिवाळीच्या आधी. सहसा दिवाळीच्या आधीच. त्यासाठी आमच्या मित्रमंडळींमध्ये एकमेका साह्य करू अशी पद्धत होती. ही साधारण वाडा संस्कृती. रात्री जागवून रंगकाम केलं जायचं. मझ्या घरासाठी माझे इतर मित्र यायचे, मी त्यांच्याकडे जायचो असा प्रकार. काही वेळा लिंपालिंपीही करावी लागायची. रंग बनवणे हा एक उद्योग असायचा. तेव्हा या तयार रंगांची इतकी फॅशन नव्हती. कोरड्या पावडरी आणायच्या. पाणी आणि डिंक घालून त्याचा पातळ रंग बनवायचा. ब्रशने उभा हात आणि आडवा हात असा दोनदा रंग दिला जायचा. काही वेळेस बांधकामाच्या प्रतीनुसार आधी व्हाईट वॉश असायचा. तंबाखूसोबतचा चुना घेऊन भिंतीतील भोके वगैरे बुजवली जायची. एकूण रंगकाम हा एक सांघिक कामाचा आविष्कारही असायचा. इतरही गोष्टी त्यात होत्या.
स्वातीताईच्या या चांगल्या लेखासोबत छायाचित्रे हवीच होती - १. रंगवलेल्या खोलीचे आधीचे आणि नंतरचे. २. स्वाती आणि दिनेश यांची रंगकाम सुरू करण्याआधीची आणि रंगकाम होतानाची किंवा झाल्यानंतरची. या दोन्ही तुलनांतून मी नक्की सांगितलं असतं सराईतपणा यायला किती काळ लागेल ते.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Jun 2009 - 11:31 pm | बिपिन कार्यकर्ते

फर्मास... खोली रंगवायचा मस्तच भन्नाट अनुभव... फोटो टाकायलाच हवा होता मात्र.

बिपिन कार्यकर्ते

स्वाती दिनेश's picture

5 Jun 2009 - 2:10 pm | स्वाती दिनेश

सर्वांना मनापासून धन्यवाद,
रंगवण्यात इतके रंगलो होतो की फोटूंची आठवण झाली नाही, सबब फोटू नाहीत, :(
स्वाती

सुनील's picture

5 Jun 2009 - 9:09 pm | सुनील

खुशखुशीत लेख पण फोटो असता तर अधिक "रंगतदार" झाला असता!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

6 Jun 2009 - 2:25 pm | विसोबा खेचर

स्वाती, मस्त लेख..

खुशखुशीत लेख पण फोटो असता तर अधिक "रंगतदार" झाला असता!

हेच म्हणतो..

तात्या.

वेताळ's picture

7 Jun 2009 - 10:12 am | वेताळ

घर रंगवायचे काम सोप्पे नाही. तुम्ही अगदी ते सोप्पे करुन दाखवले. बाकी आता ते रंगफवारायंत्र भाड्याने देता का? :))

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

स्वाती दिनेश's picture

8 Jun 2009 - 5:00 pm | स्वाती दिनेश

सुनील,तात्या,वेताळ
धन्यवाद,
स्वाती