जास्वंद

वडापाव's picture
वडापाव in जे न देखे रवी...
13 May 2009 - 1:29 pm

पानापानांवरती आला शहारा
कोमल भासला बोचरा वारा !
शाखेवरच अडल्या जलधारा
फुलला पिसारा !!

जीवनाचा प्रवास झाला सुरू
लाडके असे ते माझे लेंकरू !
छेडितसे तयां दुष्ट पांखरू
कसे सहन करु?

पाचुंसाठी त्या देठ वधारला
सुर्याने प्रकाश दिधला त्याला !
प्रार्थना करितो हीच देवाला
उमलूदे त्याला !!

कळी म्हणते जग हे मोठाले
चहूदिशांनी मनासि वेधिले !
म्हणूनच पाचूला मी छेदिले
दुनियेला भेटले !!

तुझ्यासाठी सोसेन सारे कष्ट
जल शोषून जरी भेदले हे ओष्ठ !
मजवरि कधी न होता रूष्ठ
होशिल तू धष्टपुष्ठ !!

रक्तरत्न फुलले बाहेर
पाचुच्या शेराला सव्वाशेर !
लाल पाकळ्या डोई मोहोर
जणु नाचतो मोर !!

डोळे दिपले दिसता ते दृश्य
सदा छळतसे वारा अदृश्य !
कोमल पाकळ्या व्हाव्या अस्पृश्य
जग हे सदृश !!

नीतिने केला हाय अपघात
मायबापच बसले पहात !
त्राणच उरले नाही अंगात
उगवली रात !!

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

सागर's picture

13 May 2009 - 2:24 pm | सागर

कवितेत शब्द सामर्थ्य दिसून येते
यमक जुळवण्यासाठी छान शब्द वापरले आहेत

पण कविता भरकटलेली वाटते. आशयपूर्ण नाही वाटली...
उदा:

शाखेवरच अडल्या जलधारा
फुलला पिसारा !!

या ओळींनंतर

जीवनाचा प्रवास झाला सुरू
लाडके असे ते माझे लेंकरू !
छेडितसे तयां दुष्ट पांखरू
कसे सहन करु?

असे सगळीकडे दिसते आहे. निसर्गकविता आहे की अजून कशावर आहे हे नीटसे कळाले नाही
माफ करा तुमच्यात प्रतिभा दिसली म्हणून स्पष्टपणे प्रतिक्रिया देत आहे. कृपया राग मानू नका...
एक कविता म्हणून छानच आहे तुमची कविता... पण जास्त अर्थपूर्ण नाही वाटली. ""जास्वंद" बद्दल चित्र एकदम स्पष्ट नाही झाले.
त्यात सलगता आली तर अधिक सुंदर होईन...

अवांतरः वडापाव हे नाव आवडले... माझ्या आवडीचा पदार्थ :)

वडापाव's picture

13 May 2009 - 2:05 pm | वडापाव

माझे नाव आपल्याला आवडले हे ऐकून बरे वाटले. तसा मी जुना मिपाकर आहे, पण काही महिने मी ब्रेक घेतला होता.

कविता लिहून झाल्यावर प्रकाशित करण्यापूर्वी मलाही अशीच शंका होती, की दोन कडव्यांमध्ये संबंध अशक्त आहे. तुम्ही स्पष्टपणे सांगून टाकल्याने मला माझ्या चूका पूर्णपणे लक्षात येत आहेत.
धन्यवाद !!
आपला नम्र,
वडापाव

सागर's picture

13 May 2009 - 2:25 pm | सागर

एकदम मोकळ्या आणि मोठ्या मनाने माझी प्रतिक्रिया घेतल्याबद्दल धन्यवाद :)
- सागर

क्रान्ति's picture

13 May 2009 - 8:14 pm | क्रान्ति

रक्तरत्न फुलले बाहेर
पाचुच्या शेराला सव्वाशेर !
लाल पाकळ्या डोई मोहोर
जणु नाचतो मोर !!

जास्वंदाचं सही वर्णन!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***