दाल पकवान हा एक सिंधी लोकांचा खाण्याचा प्रकार आहे.
साहित्य:
दाल साठी:
२५० ग्रॅम हरभरा डाळ
१ टी.स्पून जीरा
६-७ हिरव्या मिरच्या (मधे चिरलेल्या)
१ चिमुट तिखट
१/२ च.हळ्द
३ वाट्या पाणी
३-४ टे.स्पून तेल
मीठ चवीनुसार
२ टे.स्पून. कोथिंबीर चिरलेली
चिमुट्भर आमचुर पावडर
पकवान साठी:
३००ग्रॅम मैदा
१/२ ती.स्पून जीरा
३टे.स्पून तेल
तळण्यासाठी तेल
मीठ चवीनुसार
१.प्रथम डाल धुवून २ तास भिजवून ठेवावी.
२.प्रेशरकुकर मध्ये ३ टे.स्पून तेल घालून जीरे, हिरव्या मिरच्या घालून फ्राय करावे.
३.पाणी न काढता भिजवलेली डाळ, हळद आणि मीठ घालून डाळ बोटचेपी होईपर्यंत शिजवावी ( साधारण १०/१५ मिनिटे)
पकवासाठी: १.मैदा चाळून त्यात जीरा, तेल आणि मीठ घालून पाण्याने मळावे. जास्त घट्ट पण नाही जास्त सैल पण नाही असे पीठ मळावे.
२.त्याचे छोटे छोटे गोळे करून चपाती सारखे लाटावे. जास्त जाड नाही जास्त पातळ नाही. त्यावर फोर्क ने टोचे मारावेत म्हणजे ते तळल्यावर पुरी सारखे
फुगणार नाहीत.
३.कढईत तेल घेऊन ते तापले की त्यात वरील तयार केलेली चपाती टाकावी व मंद आचेवर दोन्ही बाजूने तळावी.
आणि दाल बरोबर सर्व्ह करावी.
दाल सर्व्ह करताना: त्यात थोडे तिखट. आमचुर पावडर, कोथिंबीर आणि थोडे गरम तेल घालून द्यावी.
सोबत आंब्याचे लोणचे द्यावे.
प्रतिक्रिया
3 Feb 2008 - 8:26 pm | प्राजु
सही आणि सोपा आहे हा प्रकार. आजच करते संध्याकाळचा मेनू म्हणून.
- प्राजु
आवाम्तर : स्वाती, अशीच एक पंजाबी लंगरवाली दाल म्हणून असते. गुरुद्वारामध्ये लंगर असते ना तिथे करतात. खूप मस्त लागते चविला. मी देईन त्याची रेसिपी इथे.
4 Feb 2008 - 7:28 am | विसोबा खेचर
स्वाती, अशीच एक पंजाबी लंगरवाली दाल म्हणून असते. गुरुद्वारामध्ये लंगर असते ना तिथे करतात. खूप मस्त लागते चविला. मी देईन त्याची रेसिपी इथे.
सहमत आहे.. मी ही दाल ठाण्यातील शिखांच्या एका लंगरमध्येच खाल्लेली आहे..
प्राजू, तुझीही पाककृती येऊ दे लवकरच..
स्वातीजी, आपलीही पाककृती नेहमीप्रमाणेच झकास.. और भी आने दो...!
तात्या.
3 Feb 2008 - 8:39 pm | स्वाती राजेश
लवकरात लवकर दे.
मला विविध प्रकारच्या रेसिपी करायला आणि खिलवायला आवडतात.
"खायला घालून नवर्याचे वजन कसे वाढवायचे" या चा मी अभ्यास करते असा आरोप माझा नवरा करतो.:)))))))))))
4 Feb 2008 - 12:43 am | पिवळा डांबिस
"खायला घालून नवर्याचे वजन कसे वाढवायचे" या चा मी अभ्यास करते असा आरोप माझा नवरा करतो.:)))))))))))
ही केवळ चेष्टाच ना! नाही, म्हणजे तो खरंच असं म्हणत असेल तर स्वातीताई तुमचा नवरा अगदी जगावेगळा आहे!!:)
बायको सुगरण असल्याबद्दल तक्रार करणारा नवरा आमच्यातरी पहाण्यात आलेला नाही!! वजन गेलं तेल लावत!!!:)
उलट ज्यांच्या बायका सुगरण नाहीत अशा आपल्या मित्रांना आपल्या घरी जेवायला बोलावून त्यांची जळवण्यात किती मज्जा असते!! अशा मित्रांनी तुमच्या बायकोच्या स्वयंपाकाची स्तुती केली की तिथेच हजर असणारया त्यांच्या बायकांचे उतरत जाणारे चेहरे बघण्यात एक आसुरी आनंद असतो, आता हे जोडपं स्वतःच्या घरी गेल्यावर तिथे काय घडणार आहे हा कल्पनाविस्तार फारच रम्य असतो (युध्द्स्य कथा रम्या!!) हा, हा, हा!!!:))
आपला,
(आसुरी रावण) पिवळा डांबिस
4 Feb 2008 - 5:28 am | सुनील
महाराष्ट्रात आमटी म्हणून सहसा तूर अथवा मूग डाळीचाच जास्त वापर होतो. पुरणासाठी अर्थातच चणा डाळच लागते शिवाय बेसनाचा उपयोगही आपण भरपूर करतो. पण हरभरा / चणा डाळ सहसा (आमटीसाठी) वापरली जात नाही.अन्य प्रांतात, विशेषतः बंगालमध्ये चणाडाळीचा वापर खूप.
एक वेगळी पाककृती दिल्याबद्दल आभार! परंतु सध्या आम्ही मैद्याला "बहिष्कृत" केले असल्यामुळे करून काही बघता येणार नाही!
("मैद्याचे पोते" होणे टाळणारा) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Feb 2008 - 12:55 am | पिवळा डांबिस
महाराष्ट्रात...हरभरा / चणा डाळ सहसा (आमटीसाठी) वापरली जात नाही
खरं आहे सुनिलबाबू.
पण "जेंव्हा ती चणा डाळ पुरणपोळीबरोबरच्या आमटीच्या 'कटा'त सामील होते, तेंव्हा कधीकधी ती पोळीच्या तोंडात मारून जाते" (पु. ल. - माझे खाद्यजीवन) आम्हाला पटतं, तुमचं काय मत?
परंतु सध्या आम्ही मैद्याला "बहिष्कृत" केले असल्यामुळे करून काही बघता येणार नाही!
("मैद्याचे पोते" होणे टाळणारा) सुनील
अरे तुम्ही एव्हढी तरूण तरूण मुलं 'डायटं' कसली करता रे? उद्या पहाटे ये डांबिसकाका बरोबर व्यायाम करायला!:) रोज सकाळी पाच वाजता उठून तासभर वजनं मारली ना की काही 'मैद्याचं पोतं व्हायला होत नाही. अगदी वाटेल ते खाल्लं तरी. :))
(व्यायामप्रेमी) डांबिसकाका
5 Feb 2008 - 2:13 am | चतुरंग
पुरणपोळी च्या तुमच्या 'कटा'ला माझे अनुमोदन! (छे, छे नुसत्या आठवणीनेही कासावीस झालो!)
आणि डायटिंग बद्द्ल म्हणाल तर तेही मान्य. भरपूर खायचे आणि मस्त पैकी १ तासाची 'स्पिनिंग'ची रपेट मारायची (१६ मैल सायकलिंग एवढे अंतर!) घामाची आंघोळ झाली पाहिजे!
कशाला मैद्याचं पोतं होतंय! डायटिंगमुळे चविष्ट पदार्थांना मुकण्यासारखं वाईट काही नाही, हे आपलं माझं मत.
चतुरंग