भीमाशंकर : खांडस मार्गे [अंतीम]

हर्षद आनंदी's picture
हर्षद आनंदी in जनातलं, मनातलं
14 Apr 2009 - 5:15 am

संपुर्ण अल्बम इथे पहा

भाग १
पायवाट संपुन भीमाशंकरचा पायथा सुरु झाला. वेडे-वाकडे खड्डे, खाच खळगे, उभी चढण आणि पायाखाली सरकणारे दगड आमचा वेग मंदावू पाहत होते. बघता बघता अंधार पडला, आमच्या पुढे अथवा मागे कोणताही ग्रुप नसल्याची जाणिव नव्याने झाली, आणि भर भर पुढे जाण्याच्या नादात विखुरलेले आम्ही १४ जण खर्‍या अर्थाने एकटे पडलो. वाढण्यार्‍या अंधाराबरोबर सोबत आलेल्या नवख्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली आणि कीरणने हाका मारुन सर्वांना एकत्र आणले. आता बॅटरीची शोधाशोध सुरु झाली, आमच्या १४ जणात १ च बॅटरी, ती सुध्दा कीरणकडे !! अमावस्या जवळ होती की काय, पण चांदोमामा रूसला होता. २१व्या शतकाची देणगी ....... भ्रमणध्वनी पटापट बाहेर निघाले, किमान पायाखालचा रस्ता दाखवण्यासोबत किशोर, लताचे दर्दभरे आवाज रानवार्‍यात मिसळवु लागले.
जंगलातली वाट
संगिताच्या तालावर धुंद होत आम्ही १४ जण शिस्तित एकामागोमाग एक चालत होतो. रानवार्‍याचा घुं .... घुं करीत घुमणारा आवाज वेगळ्या विश्वात जायला भाग पाडत होता. वार्‍याच्या तालावर पावले आपोआप वाट मागे सारत होती. रोजच्या धकाधकीच्या जीवनात असे सुख अनुभवायला का मिळत नाही, हा विचार बहुतेक सर्वांना अंतर्मुख करीत असावा. आता पायथ्यापासुनची मोठी वाट थोडी बिकट होत चालली. चढणीच्या सोबतीला, दरी आली. अधुन मधुन डोके वर काढु लागली. एकमेकांना सांभाळत, चुचकारत पथ पार करायचा प्रयत्न चालला होता. बघता बघता निम्मा रस्ता पार झाला.

एक एक करीत नभागंणात तारका चमकू लागल्या, पण चंद्राविना त्या निद्रीस्त योगिनीच भासत होत्या. जरा निर्धास्त वाटु लागल्याने आमचा एक गट थोडा पुढे गेला, कीरण व उमेश एका अनपेक्षित कॉलचे निमीत्त होऊन मागे राहीले. भीमाशंकर डोंगररांगात बीएसएनएलची उत्तम सेवा आहे, याचा अनुभव थोडा दिलासा देउन गेला. चालता चालता आम्ही एका अवघड जागी येऊन पोचलो. उजव्या बाजुला काळाकभिन्न पहाड, डाव्या बाजुला खोलच खोल दरी, तिथे नजर थांबत नव्हती... अंधार असला तरी त्या दरीची भीषाणता मनाचा ठाव घेत होती. त्यात पुढे जाण्याचा मार्ग बंद झाल्यासारखा वाटत होता.. आत्ता पर्यंत न जाणवलेली भीती कुठेतरी जाणवू लागली होती. पाच-दहा मिनीटे कातळाच्या बाजुला बसुन विश्रांती घेवुन ताजे तवाने होई पर्यंत कीरण व उमेश आले, जरा धीर आला. मग कीरणने पुढे होऊन अंधारात लपलेली, जवळपास दरीला घासून जाणारी वाट दाखवली. कड्याच्या टोकावर, निसरड्या खडकातून रात्रीच्या अंधारात ती दरी पार करताना छातीचे ठोके नाशिक ढोलप्रमाणे कानात वाजत होते.

कशीबशी ती दरी पार झाली, साधारण १० मिनीटे चालल्यावर आम्ही घनदाट अरण्यात प्रवेश केला. जंगलातला प्रवास छान वाटत होता. हवेतील थंडावा आत्तापर्यंत झालेले कष्ट विसरायला भाग पाडत होता. पाला-पाचोळा तुडवत, शीळ घालत, गाणी म्हणत आम्ही मजेत चालत होतो. बघता बघता तास निघुन गेला, दीड तास झाला, पठार काही यायचे नाव घेईना. झाडी अजुन दाट झाली. वार्‍याचा आवाजाने होणारी पानाची सळसळ लांबवर कुठेतरी पाणी असल्याचा आभास निर्माण करीत होती. तेवढ्यात आमच्या डाव्या बाजुला झाडीत वेगळाच आवाज झाला. आम्ही सतर्क झालो, थांबलो मात्र नाही. आमच्या आवाजाला घाबरुन चार पायाची जनावरे शक्यतो वाटेला गेली नसती, पण रंगीत कागदाच्या मोहात पडुन दोन पायाची जनावरं घोळक्याने येऊ शकत होती. अश्या घटना पुर्वी घडल्याचे माहीत होते. थोडा वेळ आमच्या बरोबर तो आवाज होता, पण झाडीतुन बाहेर काहीच आले नाही. मग आम्ही नाद सोडला आणि दुर्लक्ष केले, काहीवेळाने आवाज आपोआप बंद झाला.

पायथा सोडल्या पासुन आम्ही गेले तीन तास अखंड चालत होतो. हळुहळु भुकेची जाणीव तीव्र झाली होती. सकाळी अकरा वाजता आम्ही नाश्ता केला होता, नंतर काहीच खाल्ले नव्हते. भीमाशंकरला रात्री १० नंतर खाण्या-पिण्याची सोय नाही. जवळचा पाण्याचा साठाही संपत आला होता. शेवटी आम्ही सर्व जण वाटेत थांबलो, कीरण व मी पुढे जाउन रस्ता शोधायला लागलो. थोड्या अंतरावर रस्त्याला दोन फाटे फुटले, उजव्या बाजुचा रस्ता चढणीचा होता, जंगलात जात होता, डाव्या बाजुचा खाली दरीत उतरत होता. चढणीच्या रस्त्यावर थोडे शोधताच आम्हाला गोवा, हॉल्स अशी रॅपर मिळाली, आणि रस्ता सापडल्याचा आनंद झाला. त्या रस्त्याने वर जाण्यासाठी आम्ही सर्व मित्रांना बोलावले. नव्या जोमाने चालणे सुरू केले, आता उमेश थोडा पुढे राहुन रस्ता बरोबर असल्याची खात्री करीत होता. रस्ता निमुळता होत चालला, डाव्या बाजुची झाडी संपत आली, त्या बाजुला दरी असल्याचे जाणवत होते. घोंघावत खालुन वर येणारा वारा अंगावर शहारे उमटवित होता. थोडे अंतर चालुन गेल्यावर एका वळणाजवळ काही ऊंचीवर असलेला लाईट बघुन आम्हाला हायसे वाटले. पंधरा-वीस मिनीटे चालुन गेल्यावर आम्ही एका पठारावर पोचलो. त्या पठारावर पुढे चालत गेल्यावर तेथे तीन रस्ते फुटले होते. पण समोर मंदीराचा कळस दीसत होता. आम्ही कळसाच्या दीशेने डोंगर उतरायला सुरवात केली. तो रस्ता वापरातला नव्हता, वाटेत येणारी झाडी हाताने बाजुला करीत आम्ही दहाच मिनीटात गावात पोहोचलो.

पुन्हा दोन गट करण्यात आले, एक गट झटपट फ्रेश होउन बसस्थानकाकडे निघाला, निदान त्यांचे जेवण होउन, पार्सल घेता येईल, असा विचार होता. बाकी आम्ही, कुणी आसरा देतय का ते पहायाला निघालो. एका घरात आसरा मिळाला, अंथरूण्-पांघरूण व २ खोल्या मिळाल्या, शेकोटी करायला जागाही दाखवली. सामान ठेवुन आम्ही पण निघालो, नशिबाने पोटभर जेवायला मिळाले. नंतर परत एकदा त्या पठारापर्यंत चक्कर मारुन आम्ही आधीच्याच वाटेने घरापाशी आलो. शेकोटी पेट्वुन, बराच वेळ टाईमपास करुन पहाटे पहाटे झोपलो.

दोन तासांची विश्रांती घेऊन, सकाळी गर्दी होण्या आधी, आम्ही आंघोळी करुन, श्री शंकराचे दर्शन घेतले. नंतर मस्त पोहे खाऊन, गुप्त भीमाशंकराचे दर्शन घेतले. तेथे छान फोटोसेशन केले. परत येउन सामान घेतले आणि बसस्थानकावर आलो. सर्वजण जेवेपर्यंत दुपारचे बारा वाजत आले होते. आता पुण्यावरुन आलेले सगळे वीर, परत कालच्याच रस्त्याने जायचे ह्या विचाराने कावरे बावरे झाले आणि आमच्या पैकी, पुण्याचे ७ व मुंबईचा १ असे एस्.टी ने निघुन गेले. आम्हाला मात्र कालचा थरार पुन्हा एकदा अनुभवायचा असल्याने, पाणी घेउन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. रात्री जो प्रवास करायला आम्हाला जवळपास ६ तास लागले, तो अवघ्या ३ तासात उतरून आम्ही दुपारी चार पर्यंत खांडस गावात आणि साडेपाचच्या सुमारास कर्जत पर्यंत आलो. कर्जतला थोडा श्रमपरिहार प्राशन करुन साडेसातच्या गाडीने पुण्यास रवाना झालो. त्यानंतर सहा-सात वेळा वेगवेगळ्या ग्रुपबरोबर, कधी मी, किरण, उमेश असे तिघेच भीमाशंकरला गेलो, पण हा प्रवास कायम लक्षात राहिला.

देशांतरअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

14 Apr 2009 - 6:11 am | प्राजु

पुढील ट्रेक साठी शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

हर्षद आनंदी's picture

14 Apr 2009 - 6:57 am | हर्षद आनंदी

पहिलाच प्रयत्न आहे...
पुढे अजुन बरेच किस्से आहेत..

स्मिता श्रीपाद's picture

14 Apr 2009 - 9:58 am | स्मिता श्रीपाद

मस्त लिहिले आहे...
फोटो अजुन मोठे असते तर अजुन मजा आली असती...

-स्मिता

हर्षद आनंदी's picture

14 Apr 2009 - 11:55 am | हर्षद आनंदी

आपल्या विनंतीला मान देउन लिंक दिली आहे.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

14 Apr 2009 - 10:10 am | घाशीराम कोतवाल १.२

छातीचे ठोके नाशिक ढोलप्रमाणे कानात वाजत होते.

काय अवस्था होते अशा वेळेस हे मला माहित आहे सिंहगड्ला एकदा मी असा अनुभव घेतला होता ५५ जणामधे आम्ही ४ जण अर्ध्या
तासात वर पोचलो होतो ...

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

धमाल मुलगा's picture

14 Apr 2009 - 1:01 pm | धमाल मुलगा

क्या बात है भावा!!!!!

मस्तच! केवळ झक्कास :)
आवडलं आपल्याला.
बाकी, ट्रेक्सची माझ्यापुरती व्याख्या अशीच आहे..जोपर्यंत पायापासून इंचभर पुढची दरी पाहून ठाक्कन गोट्या कपाळात जात नाहीत, पुढचं पाऊल टाकण्यापुर्वी टरकून पाय थरथरत नाहीत, प्रत्येक अवघड चढण पार केल्यावर पोरं "आपण अजुन जिवंत आहोत" ह्या आनंदात एकमेकांना मिठ्या मारुन जल्लोष करत नाहीत तोपर्यंत ट्रेकची मजाच नाही :)

बाकी, हा अनुभव ज ह ब ह र्‍या!!!!!
सॉल्लीड एंजॉय केलेला दिसतोय तुम्ही लोकांनी हा ट्रेक.

येऊ दे अजुनही असेच किस्से!

अवांतरः बोराट्याची नाळ करुन आला आहात का? लै लै झांटाम्याटीक आहे. नसाल गेला तर एकदा जाऊन याच!

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

तिमा's picture

18 Apr 2009 - 2:35 pm | तिमा

तुम्ही रात्रीच्या वेळी शिडी घाटाने वर गेलात हे मोठेच दिव्य म्हणावे लागेल. ग्रुपमधे जर नवशिके लोक असतील तर तुम्ही गणपती घाटाने जायला हवे होते. तो अगदी सोपा पण थोडा लांबचा मार्ग आहे. शिडी घाटात त्या वळणावरच्या खडकाला सॅक अडकून अनेक लोक दरीत पडले आहेत.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

बेसनलाडू's picture

20 Apr 2009 - 12:10 am | बेसनलाडू

सुंदर ट्रेकवर्णन! दहा-एक वर्षांपूर्वी शिडीघाट, पदरगड मार्गे केलेल्या भीमाशंकर ट्रेक् ची आठवण झाली.
(ट्रेकर् - हायकर्)बेसनलाडू

शितल's picture

20 Apr 2009 - 2:48 am | शितल

मस्त लिहिले आहे.
ट्रेक वर्णन आवडले. :)