साधारण तीन वर्षांपुर्वीची गोष्ट. पुण्यातील स्.प. महाविद्यालयाजवळ मास्टेक कंपनीचा बीपीओ होता, तिथे मी संगणक अभियंता म्हणुन कार्यरत असताना, तेथील काही हौशी तरुणांनी एकत्र येउन गिरीभ्रमण कंपू स्थापन केला. त्यांच्या पहिल्या गिरीभ्रमणाचे यश बघुन, मी सुध्दा त्यांच्या कंपुत सामील झालो. काही नवखे, काही अनुभवी असे आम्ही सह्याद्रीत भटकंती करायला सिध्द झालो. लोहगड, राजमाची असे सोपे किल्ले सुरवातीला केल्यावर जरा अवघड म्हणुन "भीमाशंकर" करायचे ठरले. आमच्या पैकी बरेच जण आधी गाडीनी जाउन आल्यामुळे तसे फार काही अवघड नसल्याच्या भ्रमात होते. त्यांचा भ्रम आमच्या पथ्यावर पडत असल्याने, आम्ही सुध्दा त्यांना वास्तवाची जाणीव करुन देण्याचे टाळले. बीपीओ असल्यामुळे, शनिवारी रात्री भीमाशंकरला मुक्काम करुन, रविवारी दुपारपर्यंत पुण्यात येण्याचे आम्ही ठरवले.
प्रवासचा दिवस उजाडला. पुण्याहुन सकाळची प्रगती पकडुन, आम्ही ९ जण साधारण १० च्या सुमारास कर्जत स्थानकावर उतरलो. सकाळी लवकर उठल्याने सडकुन भूक लागली होती. "वडाप्पाव" च्या ना-याने आणि वडयाच्या खमंग वासाने तोंडाला पाणी सुटले होते. वडापाव आणि चहा असा मस्त भरपेट नाश्ता झाल्यावर, परत स्टेशनवर आलो व मुंबैकरांची वाट पहात, कर्जतची हिरवळ नजरेखालुन घालत बसलो. विडी - चहाची अजुन एक राउंड होईस्तोपर्यंत मुंबैकरांचे आगमन झाले, मग अजुन एक वडापाव, चहाची राउंड करुन आमचा कंपु कर्जत बाजारपेठेतुन दुसर्या टोकाला निघाला. जाता जाता ब्रेड, जॅम, फरसाण, टोमॅटो, काकडी, कांदा अशी खरेदी आणि कुचाळक्या करत आम्ही एकदाचे टमटम थांब्याजवळ आलो. आता आमच्या कंपूचे नेत्रुत्व किरण व उमेश ह्यांच्याकडे असल्याने आम्ही निवांत झाडाखाली बसुन शेंगा चावत होतो व ते टमटमवाल्याला चावत होते. किरण, उमेश हे बदलापुरचे. पैकी किरण आमच्या कंपनीतला व उमेश त्याचा लंगोटी यार. दोघांनी एकत्र अनेक किल्ले, डोंगर एकत्र सर केले आहेत. भीमाशंकर हे त्यांच्या खास मर्जीचे व वारंवार भेट देण्याचे ठीकाण, म्हणुन आम्ही जास्तच निर्धास्त होतो. शेवटी एकदाची टमटम ठरली आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
दुपारी ३ च्या सुमाराला खांडस गावात पोचलो, विडी-काडीची खरेदी होउन, आम्ही पायथ्याकडे रवाना झालो. वाटेत जाताना एका विहिरीवर पाणी भरुन घेतले, आणि चालायला सुरवात केली. माथ्यावर रणरणते उन, उजाड माळरान यांनी थोड्याच वेळात वास्तवाची जाणीव करुन दिली. एसी हॉलमध्ये बसुन, ग्लासातली थोडी टेबलावर आणि बरीचशी डोक्यात गेल्यावर तावातावाने राजकारण व विकासावर बोलणारे ग्लुकॉन्डीची पाकीटे संपवत होते. तोंडाला लागलेले कुलुप व लाल चेहरा बरेच काही सांगत होता. तरी अजुन पायथा लांबच होता. दीड तासाची वणवण संपवुन एकदाचे आम्ही शिडी घाटाच्या पायथ्याशी आलो.
आता इथुन मी, किरण व उमेश परीक्षेला तयार झालो. कंपूमध्ये सह्यकड्याच्या रौद्र रूपाशी परीचित असलेले फक्त आम्हीच होतो. उमेशने सुत्र हातात घेतली आणि दोन गट बनवले. एक गट त्याच्या नेत्रुतवाखाली पुढे झाला. किरण दोन्ही गटांना मदत करण्यासाठी मधे आला आणि दुसरा गट माझ्याकडे सोपवला गेला.
५० फुटांवर पहिली शिडी : दोन खडकातील ८ ते १० फुटाची गॅप पार करण्यासाठी, २ ओंड्क्यांवर एक शिडी बसवली होती. हातापायाचा योग्य वापर करुन, पुर्वजांची आठवण ठेवत तो टप्पा पार झाला. खरे दिव्य तर पुढेच होते. शिडी पार केल्यावर छोटे वळण आणि त्या वळणावर एक गोल खडक बास!! रस्ता संपला आणि उमेशचा पत्ता नाही ! त्याच्या गटातील पोरे तिथेच उभी, ती कोकलतायत नि हा गायब !! किरणनी हाका माराल्या आणि ५ मिनिटाने उत्तर आले "आलो बे, जरा हलका होके आया". किरणच्या ठेवणीतल्या ओव्या झेलत त्याने माझ्याकडे दोर टाकला. मधल्या ७-८ फुटात उभ्या खडकात खाच पडुन रस्ता तयार झाला होता, त्यासाठी त्या खडकाकडे तोंड करुन, दोन्ही बाजुला खोबणीत हात घालुन ढांग टाकायची, आणि जेमतेम एक पाउल पुरेल एवढ्या खाचेतुन परत एकदा कड्याकडे तोंड करुन चालायचे. मागे दोर आहे ही मनाची समजुत. तो ट्प्पा पार करायला अर्धा तास लागला.
दुसरी शिडी : एका बाजुला कातळ, दुसर्या बाजुला खोल होत जाणारी दरी, परोपरी पावले घसरवणारी पाउलवाट, वाट कमी नी खळगे जास्त बघुनी सारे झाले त्रस्त.. एक एक अनुभव देत, माथेरानच्या पठाराकडे झुकत चाललेला सर्जा पहात आम्ही दुसर्या शिडीपाशी आलो. इथे फार काही अवघड नव्हते, फक्त १५ फुटाची, खिळ्खिळि झालेली शिडी, तो ट्प्पा तसा लवकर पार करुन आम्ही तिसर्या व अंतीम शिडीकडे प्रयाण केले. आता वाट थोडी सवयीची झाल्या कारणाने, गप्पा गोष्टींना उत आला होता आता काय . .. एकच शिडी मग आरामात बसायचे, दोन घोट घशाखाली सारुन निवांत पडायचे अशी चर्चा होत होती....... आणि किरणच्या चेहर्यावर स्मित झळ्कत होते.
एवढ्यात पुन्हा एकदा रस्ता संपला.... १०-१२ फुट खड्ड्यात आम्ही उभे होतो. एका बाजुला खडक, दुसर्या बाजुला कातळ, समोर छोटी गुहा ...आणि बाजुने थेंब थेंब गळणारे पाणी.. खडकांवरुन जाणे अतिशय धोकादायक आहे, कारण लगेच खोल दरी आहे. सर्वात वरचा खडक हा पहिल्या शिडीतील खडकाप्रमाणे पार करावा लागतो... आणि दरीच्या तोंडावरुन पलिकडे ढांग टाकताना प्राण कंठाशी येतात.... कीरणच्या सहकार्याने मी व अजुन दोघे खडकांच्या बाजुने वर आलो आणि वरुन दोर टाकला.. मग एक एक जण दोर पकडुन उमेशने दाखवल्याप्रमणे खाचात पाय टाकत वर आले. आता ६ वाजत आले होते, ह्ळु ह्ळु अंधार पडत होता. सर्व जण पोहोचल्याची खात्री करुन पुढच्या प्रवासाला आरंभ केला.
आता साधारण १००० फुट उंची गाठ्ल्याने, माथेरानचे पठार, कलावंतीण दुर्ग यांचे सायंप्रकाशात मनोहारी दर्शन होत होते. अंधाराचा काळसर्प दाही बाजुंनी सुर्यास गिळत होता, आणि तो तेजोनिधी आपली सत्ता सोडुन मावळतीकडे झुकला होता. तरी त्याचे हस्तक सभोवताली रंगांची उधळण करीत, नयनरम्य सौंदर्याची उधळण करीत जीवनाचा अर्थ समजावुन देण्याचा प्रयत्न करीत होते. खरोखर साध्या साध्या रोजच्या घटनातुन निसर्ग मानवाला कसे जगावे याचे अनेकानेक उत्तम धडे देत असतो, आणि मानव त्यांच्याकडे कानाडोळा करीत स्वांतसुखाय जगत असतो. बघता बघता आम्ही एका पठारावर पोहोचलो. अंधार पडत चालला असुन वस्तीच्या खुणा नाहीत हे बघताच, आमचा कंपु थोडा बावरला. समोर पसरलेला डोंगर, दाट झाडी पाहुन, नुकताच पार केलेला रस्ता आठवत होता आणि पुढे काय वाढुन ठेवले आहे याची धास्ती प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसुन येत होती. सकाळी केलेला टाईमपास प्रत्येकाला आठवत असावा, पण आता वेळ निघुन गेली होती. पठारावर थोडीशी वस्त्ती दिसताच इथेच रात्र काढुचे स्वर डोके वर काढु लागले.
तिथे असलेल्या काही झोपड्यांमधे छान गारेगार लिंबु - सरबत पित असताना रहायला काही सोय आहे का याची चौकशी सुरू झाली. उमेश व कीरण मात्र पुढे जायचे या निर्णयावर ठाम होते. तिथल्या मंडळींनी नन्नाचा पाढा वाचल्यावर सरते शेवटी पुढच्या प्रवासाची तयारी करायला लागलो. आता आमची खरी परीक्षा सुरू झाली. संधीप्रकाशाचा फायदा घेउन जास्तीत जास्त अंतर कापायच्या उद्देशाने आम्ही जोशात निघालो, "जय भवानी, जय शिवाजी", "हर हर महादेव" च्या नार्यांनी नसानसात नव चैतन्य फुंकले आणि आम्ही अक्षरशः उड्या मारीत निघालो.
क्रमशः
प्रतिक्रिया
13 Apr 2009 - 5:47 am | यन्ना _रास्कला
तल्लीन होउन वाचत होतो. क्रमश: वाचल्यावर समाधी तूटली. असे अरधेमुरधे नका बुवा लिहु.
13 Apr 2009 - 7:14 am | मदनबाण
व्वा. छान... हर्षदराव और भी आने दो. :)
(जय भवानी, जय शिवाजी)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
13 Apr 2009 - 7:20 am | दशानन
मस्तच !
आवडलं !
13 Apr 2009 - 9:48 am | सन्दिप नारायन
हे वाचुन पंधरा वर्षांपुर्वीचे दीवस आथवले.
संदीप
13 Apr 2009 - 10:22 am | सुमीत
अनुभव उत्तम लिहिला आहे, सूर्यास्ताचे वर्णन सुरेख.
अजून काही फोटो असतील तर लींक द्यावी.
13 Apr 2009 - 12:25 pm | बबलु
मी आणि माझे बाबा गेलो होतो याच मार्गाने. तेव्हा मी शाळेत होतो.
होळीची रात्र होती. भीमाशंकर वर "देवाची" होळी पेटल्यावरच खालच्या सर्व गावांमधली होळी एक एक करत पेटत गेली. आम्ही भीमाशंकरवरून त्या सगळ्या होळ्या पेटताना पाहिल्या. ते दृष्य मी कधीच विसरू शकणार नाही.
त्यानंतर परत पुण्यातल्या आमच्या एम्.आय.टी. ईंजिनीअरिंग कॉलेजमधल्या मित्रांना घेउन गेलो होतो १९९७ मध्ये. त्याची आठवण झाली.
....बबलु
13 Apr 2009 - 3:28 pm | विजय गणेश खर्डे
फारच छान लेख आहे आणि मदत करणारा लेख आहे.