पैशाची कहाणी भाग ४: फियाट मनी आणि बाजारातील तरलता

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
6 Apr 2009 - 12:53 pm
गाभा: 

यापूर्वीचे लेखन

पैशाची कहाणी भाग १: वस्तूविनिमय पध्दती
पैशाची कहाणी भाग २: कमोडिटी मनी
पैशाची कहाणी भाग ३: रेप्रेझेन्टेटिव्ह मनी

पैशाची कहाणी भाग ४: फियाट मनी आणि बाजारातील तरलता

मागील भागात आपण रेप्रेझेन्टेटिव्ह मनी म्हणजे काय ते बघितले.तसेच १९७१ मध्ये अमेरिकेने गोल्ड स्टॅंडर्ड रद्द केल्यानंतर सर्व जगातील चलन हे ’फियाट मनी’ या स्वरूपात आले.रेप्रेझेन्टेटिव्ह मनी मध्ये छापलेल्या नॊटांमागे सोन्याचा आधार असे.म्हणजे १९४४ मध्ये जेव्हा अमेरिकेने १ औंस सोन्यामागे ३५ डॉलर हा दर ठरविला तेव्हा ३५ डॉलर मोजल्यास १ औंस सोने सरकारकडून घेता येऊ शकत होते.पण नंतरच्या काळात सोने आणि छापल्या जात असलेल्या नोटा यात काहीही संबंध राहिला नाही.

फियाट मनीमध्ये आणि कमोडिटी/रेप्रेझेन्टेटिव्ह मनीमध्ये एक मूलभूत फरक आहे.फियाट मनीसाठी वापरलेल्या माध्यमाला (कागदाला) स्वत:ची काहीही किंमत नाही.बाजारात शंभर रुपयाची नोट वापरली जाते त्या कागदाला स्वत:ची काय किंमत असते?काहीच नाही.इतकेच नव्हे तर उद्या कोणी अमेरिकेची शंभर डॉलरची नोट भारतात आणली तर त्या नोटेला बाजारात (रुपयांमध्ये बदलले नाही तर) तशी काहीच किंमत नाही.तेव्हा भारतात भारतीय रिझर्व्ह बॅंकेने काढलेल्या नोटांनाच किंमत आहे. फियाट या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे ’Let it be done' किंवा असे होऊ दे. तेव्हा ’असे होऊ दे’ म्हणजेच आम्ही छापलेल्या नोटांना किंमत असू दे आणि त्यांचा व्यवहारात वापर होऊ दे अशा स्वरूपाचा आदेश (decree) रिझर्व्ह बॅंकेने काढला आहे.भारत देशात भारतीय रिझर्व्ह बॅंकेचा आदेश चालतो म्हणून त्या कागदाच्या कपट्याला भारतात व्यवहारात मान आहे.शंभर रुपयाच्या प्रत्येक नोटेवर ’I promise to pay the bearer a sum of hundred rupees' असे रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरच्या सहिने लिहिलेले असते.हे वचन म्हणजे देशात रिझर्व्ह बॅंकेचा आदेश चालतो याचेच द्योतक आहे.पूर्वी हजाराच्या नोटा चलनात होत्या.जनता पक्षाचे सरकार आल्यावर त्या नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्या.तेव्हा त्या कागदाच्या कपट्यांमागील रिझर्व्ह बॅंकेचे पाठबळ गेले आणि त्या नोटा वापरातून हद्दपार झाल्या.तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे रिझर्व्ह बॅंकेचा आदेश आणि मान्यता कागदाच्या क्षुल्लक दिसत असलेल्या तुकड्यांना चलनाचा दर्जा प्राप्त करून देते.फियाट मनीमागील तत्व हे आहे.

कमोडिटी मनीमध्ये बाजारातील सोन्याचे प्रमाण हाच बाजारातील पैशाचा पुरवठा होता.रेप्रेझेन्टेटिव्ह मनीमध्ये सरकार आपल्याकडे असलेल्या सोन्याच्या प्रमाणात नॊटा बाजारात आणत असे.मनात येतील तितक्या नोटा बाजारात आणल्या जात नव्हत्या.पण फियाट मनीमध्ये असे कोणतेही बंधन नसल्यामुळे बाजारात किती पैसा खेळवावा याविषयीचे धोरण, ’मोनेटरी पॉलिसी’ अधिक महत्वाचे झाले.या धोरणात घोळ घातला तर दरमहा ५००% महागाई वाढीचा दर अशी झिंम्बाब्वेमध्ये झाली तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

बाजारातील पैशाचा पुरवठा नियंत्रित कसा करतात हे समजून घेण्यापूर्वी बाजारातील पैशाचा पुरवठा मोजतात कसा हे समजून घ्यायला हवे.चलनातील नोटा आणि नाणी यांचा समावेश बाजारातील पैशाच्या पुरवठ्यात होतो हे तर उघडच आहे.याला करन्सी (C) म्हणतात.लोक आपल्या बॅंक खात्यात पैसे ठेवतात ते रोख रकमेत कधीही बदलून घेतले जाऊ शकतात.तेव्हा एका परिने त्याचाही समावेश पैशाच्या पुरवठ्यात व्हायला हवा.करन्सी अधिक बॅंकेतील रोख रकमेत कधीही बदलता येणारी रक्कम यास ’M1' असे म्हणतात. बँकेत ठेवलेली सगळी रक्कम ताबडतोब रोख रकमेत बदलून घेता येईल अशी नसते.काही रक्कम मुदतबंद ठेवींमध्ये अडकवलेली असते.तरीही ती रक्कम रोख रकमेत बदलून काही काळाने घेता येतेच.तेव्हा M1 अधिक अशा रकमेला M2 असे म्हणतात. बाजारातील पैशाचा पुरवठा मोजायचे हे काही प्रकार आहेत.M1किंवा M2 याव्दारे बाजारातील पैशाचा पुरवठा सामान्यपणे मोजला जातो.

अर्थशास्त्रात एक मूलभूत 'Quantity Equation' आहे. त्या समीकरणानुसार

पैसा X गती = किंमत X वारंवारता

अर्थव्यवस्थेत कोट्यावधी लहानमोठे व्यवहार होत असतात.वर्षभरात आपण समजा भाजीवाल्याकडून ५० वेळा फळे आणली आणि प्रत्येक व्यवहारात सरासरी ६० रुपयांची फळे घेतली तर आपण वर्षात एकूण ३००० रुपयांचा फळाचा व्यवहार केला (५० गुणिले ६०).अशा पध्दतीने अर्थव्यवस्थेत होणार सगळे व्यवहार विचारात घेतले तर अर्थव्यवस्थेत एकूण पैशाची किती उलाढाल होत आहे ते कळेल.अनेकदा पैसे एकापेक्षा अधिक वेळा आपले मालक बदलतो.म्हणजे समजा मी १०० रुपयांची वस्तू एखाद्या दुकानदाराकडून घेतली.दुकानदार त्याच १०० रुपयांतून घाऊक बाजारातून नवी खरेदी करेल.घाऊक बाजारातील समजा त्याच १०० रुपयांतून आपल्या दुकानाला नवा रंग लावून घेईल.रंगवाला त्याच १०० रुपयांचा वापर करून नवा रंग खरेदी करेल.अशाप्रकारे तेच पैसे एकाकडून दुसर्‍या मालकाकडे हस्तांतरीत होतील.म्हणजे अर्थव्यवस्थेत एकूण पैसा 'M' इतका असेल तर सगळे व्यवहार मिळून एकूण उलाढाल त्यापेक्षा जास्त असेल.एकूण उलाढाल भागिले M यातून आपल्याला पैशाची ’गती’ मिळेल.पैशाची गती ही अर्थव्यवस्थेतील तरलता दर्शविते.अधिक गती म्हणजे अधिक तरलता.बाजारात पैशाची तरलता जास्त असेल तर ती अर्थव्यवस्था अधिक खेळती असते.या सगळ्याचा उल्लेख मोहन,सागर आणि बामनाचं पोर यांनी माझ्या सबप्राईम क्रायसिस---पुढे काय? या चर्चेच्या प्रस्तावात केलाच आहे.त्याबद्द्ल या तीनही मिपाकरांचे आभार.

वर १०० रुपयांचे उदाहरण घेऊन आपण बघितलेच की त्याच पैशातून दुकानदार, घाऊक दुकानदार,रंगवाला,रंग कंपनी यासारखे अनेक व्यवसाय चालतात.पण मंदीच्या काळात सध्या लोक जास्त खर्च करायला तयार नाहीत.म्हणजे मुळातील १०० रुपयेच खर्च केले जाणार नसतील तर त्यापुढील सगळी साखळी काम करणार नाही आणि त्या सर्व व्यवसायांची मागणी घटेल.तेव्हा पैशाची गती हा एक मोठा महत्वाचा घटक आहे.

अर्थशास्त्रातील मूलभूत 'Quantity Equation' वर दिले आहे. पण त्यात व्यवहाराची वारंवारता मोजणे कठिण गोष्ट आहे. त्यामुळे 'Quantity Equation' एका वेगळ्या स्वरूपात मांडता येऊ शकेल.

पैसा X गती = किंमत X Output (मराठी शब्द?)

उजवी बाजू किंमत X Output हे सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) च्या स्वरूपात मांडता येईल. Output हे वस्तूंच्या स्वरूपात असेल म्हणजे अर्थव्यवस्थेत उत्पादन झालेल्या सर्व गोष्टींची संख्या. उदाहरणार्थ दोन लाख गाड्या, १५ कोटी खिळे वगैरे सारख्या वस्तू आणि संगणक प्रणाली,वैद्यकिय सेवा यासारख्या सेवा.

अर्थशास्त्रातील सिध्दांताप्रमाणे ’शॉर्ट टर्म’ मध्ये पैशाची गती कायम असते.सरकारने नव्या नोटा छापल्या म्हणून मिसळपावच्या सभासदांनी नव्या वस्तू खरेदी करायचा सपाटा लावला असे तर होणार नाही.तसेच Output हे अर्थव्यवस्थेतील कुशल/अकुशल कामगारांची संख्या,उपलब्ध तंत्रज्ञान यासारख्या गोष्टींवर अवलंबून असते.त्यातही ’शॉर्ट टर्म’ मध्ये बदल व्हायची शक्यता नाही. म्हणजे वरील समीकरणातील डाव्या बाजूकडील पैशाची गती आणि उजव्या बाजूकडील Output या गोष्टी स्थिर आहेत.याचाच अर्थ हा की अर्थव्यवस्थेतील पैसा वाढवला तर नजीकच्या भविष्यकाळात महागाई वाढेल.याउलट अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा न वाढवता भविष्यकाळात उत्पादन वाढवायला गरजेच्या गोष्टी (यंत्रसामुग्री,कामगारांचे प्रशिक्षण वगैरे) म्हणजेच कॅपिटल मध्ये पैसा गुंतवला तर भविष्यात Output वाढेल.कॅपिटलमध्ये पैशाचा अंतर्भाव नसतो कारण नुसता पैसा भविष्यकाळातील उत्पादन वाढवू शकत नाही. वरील समीकरणात असे दिसून येईल की Output वाढले की पैशाची गती वाढेल. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या की लोक अधिकाधिक पैसा खर्च करतील आणि सगळ्या व्यवसायांमध्ये मागणी वाढेल.

झिंम्बाब्वेमध्ये कॅपिटल न वाढवता नुसताच पैशाचा पुरवठा वाढला आणि त्यातूनच महाप्रचंड प्रमाणात महागाई वाढली.

असो. बाजारातील तरलता कशी मोजतात हा प्रश्न माझ्या सबप्राईम क्रायसिस---पुढे काय? या चर्चेच्या प्रस्तावात उभा राहिला.त्याचे उत्तर शोधायला पहिल्यांदा पैसा म्हणजे काय या मूलभूत प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे होते.त्यातूनच या लेखमालेची कल्पना सुचली. लेखमालेच्या चौथ्या भागास आवश्यक असलेली माहिती गेल्या दोन दिवसात संदर्भात उल्लेख केलेल्या पुस्तकातील तिसरे आणि चौथे प्रकरण वाचून गोळा केली. हा सर्व भाग माझ्यासाठी नवीन असल्यामुळे त्याचे आकलन व्हायला वेळ लागला.

अविनाश कुलकर्णी यांना चलनाच्या अवमूल्यनाविषयी माहिती हवी आहे. त्यासाठी अजून वाचन करून पुरेशी माहिती जमली की लेख लिहिनच.मी गेल्या काही महिन्यात अर्थशास्त्रावरील काही पुस्तके डाऊनलोड केली आहेत.तसेच विविध विद्यापीठांमधील अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांच्या संकेतस्थळांवरही फार खोलात न जाता वरवरची तोंडओळख करून घ्यायची असेल तर पुरेशी माहिती उपलब्ध असते.या सगळ्यांचा वापर करून आणि परस्पर चर्चतून सगळेच नव्या गोष्टी शिकू.

या लेखमालेचे चांगले स्वागत झाले त्याबद्दल सर्वांचाच आभारी आहे.

(अर्थशास्त्राचा विद्यार्थी) विल्यम जेफरसन क्लिंटन

संदर्भ

१) Macroeconomics हे ग्रेगरी मॅनकिव या हावर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांचे पुस्तक.

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

6 Apr 2009 - 12:56 pm | पाषाणभेद

फारच अभ्यासपुर्ण लेख. क्लिंटन साहेबांचे अभिनंदन.
- पाषाणभेद

अनिल हटेला's picture

6 Apr 2009 - 3:28 pm | अनिल हटेला

सहमत !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

नरेश_'s picture

6 Apr 2009 - 1:19 pm | नरेश_

असेच म्हणतो.
अर्थशास्त्रातील मुलभूत गोष्टी (क्लिंटनसाहेब) तुमच्यामुळे आम्हाला अगदी सोप्या भाषेत समजल्या.
धन्यवाद.

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

मराठी_माणूस's picture

6 Apr 2009 - 1:31 pm | मराठी_माणूस

सामान्याना कळेल अशा भाषेत लीहण्यासाठी आणि त्या साठी घेतलेल्या श्रमा साठी धन्यवाद.

सुनील's picture

6 Apr 2009 - 1:54 pm | सुनील

लेखमाला अतिशय उत्तम. किचकट विषय खूपच सोप्या शब्दात मांडला आहे.

एक शंका कागदी चलनाविषयी -भारतातील चलनी नोटा ह्या एका अर्थाने रिझर्व बँकेच्या प्रॉमिसरी नोटांसारख्या असतात ( ही नोट धारण करणार्‍या व्यक्तीस मी अमुक इतके रुपये देण्याचे वचन देतो) आणि त्याखाली रिझर्व बँकेच्या गवर्नरची सही असते. परंतु एक रुपयाच्या नोटेवर असे वचन नसते वा सहीदेखिल अर्थखात्याच्या सचिवाची असते. तेव्हा एक रुपयाची नोट ही अन्य नोटांच्या तुलनेत वेगळी असते. ती का?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नरेश_'s picture

6 Apr 2009 - 2:16 pm | नरेश_

नाण्यांवर "मैं धारक को... " असे कोणतेही वचन नसते.
कोणी प्रकाश टाकू शकेल का ?

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

नितिन थत्ते's picture

6 Apr 2009 - 6:08 pm | नितिन थत्ते

सर्व नाणी आणि एक रुपयाची नोट हे खरे चलन आहे. तर बाकी नोटा ह्या तितके रुपये (म्हणजे नाणी किंवा एक रुपयांच्या नोटा) देण्याचे वचन आहे. ५ रु चे नाणे आणि ५ रुपयांची नोट यांचे परस्पर नाते काय हे माहित नाही. जे खरे चलन असते त्याची बाजारातील साधारण व्हॅल्यू तेवढी असते. म्हणजे १ रु च्या नाण्याच्या धातूची तेवढी किंमत असते (कन्व्हर्शन कॉस्ट सहित). त्यामुळे काळानुरुप नाणी छोटी करावी लागतात नाहीतर ती चलनातून बाहेर पळवली जाण्याचा धोका असतो.

खराटा
(रंग माझा वेगळा)

सुनील's picture

6 Apr 2009 - 6:17 pm | सुनील

काळानुरुप नाणी छोटी करावी लागतात नाहीतर ती चलनातून बाहेर पळवली जाण्याचा धोका असतो.

जड नाणी चलनातून बाद होतात हे तत्व कुठल्याश्या अर्थतज्ञाने कुठल्याश्या ब्रिटिश महाराणीला (बहुधा व्हिक्टोरिया) समजावून सांगितला असे मी कुठल्याश्या पुस्तकात वाचले होते. महाराणीला ते कितपत कळले कुणास ठाऊक, पण त्याचे तत्वदेखिल हेच असावे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नरेश_'s picture

6 Apr 2009 - 7:38 pm | नरेश_

काळानुरुप नाणी छोटी करावी लागतात नाहीतर ती चलनातून बाहेर पळवली जाण्याचा धोका असतो.
धिरुभाई अंबानी यांनी हेच केले होते, कुठेतरी वाचल्याचे स्मरते.

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

सुनील's picture

7 Apr 2009 - 11:56 am | सुनील

धिरुभाईंनी नेमके काय केले होते? नाणी पळवली होती?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सातारकर's picture

6 Apr 2009 - 3:03 pm | सातारकर

अतिशय चांगला लेख
-----
Education... has produced a vast population able to read but unable to distinguish what is worth reading.
G. M. Trevelyan

अभिषेक पटवर्धन's picture

6 Apr 2009 - 3:40 pm | अभिषेक पटवर्धन

अगदी बरोबर...नाणी आणि एक रुपयाची नोट यावर अस काहीही लिहिलेलं नसतं, कारण फक्त नाणि आणि एक रुपयाची नोट हे खरे पैसे असत्तत...पैसे देण्याच वचन नाही. म्हणजे...समजा तुमी १०० ची नोट घेउन आर. बी. आय. च्या गवर्नर कडे गेलात तर तो तुमाला त्याच्या वचनाच्या बदल्यात १ रु. ची १०० नाणि किंवा १ रु च्या १०० नोटा देइल. आर. बी.आय. ने दिलेले वचन हे भारत सरकार च्या गॅरंटी च पाठबळ असेलल असत. नोट नीट पहाल तर त्यावर 'भारत सरकार द्वारा प्रत्याभुत' अस लिहिलेल असत.

क्लिंटन's picture

6 Apr 2009 - 3:49 pm | क्लिंटन

धन्यवाद अभिषेक पटवर्धन,

मला ही गोष्ट आधी माहित नव्हती आणि आपल्या प्रतिसादामुळे माहितीत नवी भर पडली.तसेच सुनील आणि नरेश यांच्या प्रश्नाला उत्तर मिळाले त्याबद्दल धन्यवाद.

आपल्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळेच ही लेखमाला पूर्ण होऊन एक चांगली चर्चा घडून आली.सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही पण सगळे प्रतिसाद मी वाचले आहेत आणि त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आता पुढच्या लेखासाठी लागणारी माहिती गोळा करायच्या मागे लागत आहे.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

अभिषेक पटवर्धन's picture

6 Apr 2009 - 4:10 pm | अभिषेक पटवर्धन

यात अजुनही काही लक्शात घेण्याजोग्या कायदेशीर बाबी आहेत. उदा: नोट ही नीगोशीएबल बाय डीलीवरी इंस्ट्रुमेंट आहे...म्हणजे नोटेची किंमत एका कडुन दुसर्याकडे नुसत्या हस्तांतरणाने देता येते...या उलट चेक किंवा इतर इंस्ट्रुमेंट (भाडेकरार वेगेरे) हे नॉन नीगोशीएबल असतात. (भाडेकरारावर 'नॉन नीगोशीएबल लिहिलेलं तुमी वाचलं असेल). एकुण काय तर आर.बी.आय च्या गवर्नेरानं मला दिलेल वचन मी बेमालुम पणे दुसर्या कोणाला तरी चिकटवतो आणि तो पुढे अजुन तीसर्यालाच. कायद्यानुसार कोणालाही नोट नाकारता येत नाही...ती कशीहि अस्ली तरी. जो पर्यंत त्यावर आर.बी.आय च वचन आणि भारत सरकारची गॅरेंटी आहे तो पर्यंत ती नोट कुणीही नाकारु शकत नाही. इथे दुबई मधे नोट नाकारली तर पोलिसात तक्रार करता येउ शकते, आणि असे कीस्से झाले देखिल आहेत.

अभिषेक पटवर्धन's picture

6 Apr 2009 - 4:23 pm | अभिषेक पटवर्धन

यात अजुनही काही लक्शात घेण्याजोग्या कायदेशीर बाबी आहेत. उदा: नोट ही नीगोशीएबल बाय डीलीवरी इंस्ट्रुमेंट आहे...म्हणजे नोटेची किंमत एका कडुन दुसर्याकडे नुसत्या हस्तांतरणाने देता येते...या उलट चेक किंवा इतर इंस्ट्रुमेंट (भाडेकरार वेगेरे) हे नॉन नीगोशीएबल असतात. (भाडेकरारावर 'नॉन नीगोशीएबल लिहिलेलं तुमी वाचलं असेल). एकुण काय तर आर.बी.आय च्या गवर्नेरानं मला दिलेल वचन मी बेमालुम पणे दुसर्या कोणाला तरी चिकटवतो आणि तो पुढे अजुन तीसर्यालाच. कायद्यानुसार कोणालाही नोट नाकारता येत नाही...ती कशीहि अस्ली तरी. जो पर्यंत त्यावर आर.बी.आय च वचन आणि भारत सरकारची गॅरेंटी आहे तो पर्यंत ती नोट कुणीही नाकारु शकत नाही. इथे दुबई मधे नोट नाकारली तर पोलिसात तक्रार करता येउ शकते, आणि असे कीस्से झाले देखिल आहेत.

chipatakhdumdum's picture

6 Apr 2009 - 8:38 pm | chipatakhdumdum

कोणताही चेक हा निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट असतो.

सुनील's picture

7 Apr 2009 - 3:53 am | सुनील

कोणताही चेक हा निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट असतो.
बरोबर आहे. एकाने दुसर्‍याला दिलेला चेक हा दुसर्‍याला "एन्डॉर्स" करून तिसर्‍याला देता येतो. तसा तो देता येऊ नये अशी इच्छा असेल तर, चेकवर "नॉन निगोशिएबल" असे स्पष्टपणे लिहावे.

अवांतर - भारतात जसे एखाद्याच्या खात्यावर चेक देताना तो "क्रॉस" करायची पद्धत आहे, तशी ती युरोप्/अमेरिकेत नाही. हे सुरुवातीला ठाऊक नसल्याने थोडे गोंधळायला होते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गुळांबा's picture

14 Apr 2009 - 3:31 pm | गुळांबा

जो पर्यंत त्यावर आर.बी.आय च वचन आणि भारत सरकारची गॅरेंटी आहे तो पर्यंत ती नोट कुणीही नाकारु शकत नाही.

एका दुकानात लक्ष्मीला नाकारणे हा गुन्हा आहे अशी एक पाटी वाचल्याचे स्मरते. त्याचा थोडक्यात अर्थ दुकानदार देईल ती नोट घ्या असा असतो. खानदेशात प्लास्टिकच्या पिवशीत घातलेल्या
मळलेल्या, तुकडे पडलेल्या, फाटलेल्या नोटा चलनात चालतात. असो.
सुरस आणि सुगम लेखमाला. अजुन येऊ दे. मी पण अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे.

नितिन थत्ते's picture

6 Apr 2009 - 6:20 pm | नितिन थत्ते

एकुण काय तर आर.बी.आय च्या गवर्नेरानं मला दिलेल वचन मी बेमालुम पणे दुसर्या कोणाला तरी चिकटवतो आणि तो पुढे अजुन तीसर्यालाच.

याचे कारण ही 'प्रॉमिसरी नोट पेएबल टु बेअरर' असते. अशी प्रोमिसरी नोट काढण्याचा अधिकार फक्त रिझर्व बँकेला आहे. बाकी च्या प्रॉमिसरी नोटा या विशिष्ट व्यक्तीलाच देय असू शकतात.

दुसरा फरक म्हणजे १ रु च्या नोटेवर "भारत सरकार्"चे लेटरहेड (?) असते तर इतर नोटांवर रिझर्व बँकेचे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

शितल's picture

6 Apr 2009 - 6:21 pm | शितल

क्लिंटन,
तुमचे लेख नेहमी अभ्यासपुर्ण असतात नविन नविन माहिती मिळते आम्हाला.
ही लेखमाला ही खुप छान आहे, अगदी साध्या सोप्या शब्दात तुम्ही आम्हाला खुप छान माहिती सांगितली आहेत.
तुमच्या ह्या लेखमाले बद्दल तुमचे आभार. :)

लिखाळ's picture

6 Apr 2009 - 7:53 pm | लिखाळ

चारही भाग वाचले.
उत्तम लेखमाला.
फार चांगली माहिती लेखांतून मिळाली. प्रतिसादसुद्धा माहितीपूर्ण आणि चांगले आहेत.
अजून या विषयवार लिहा. वाचायला आणि माहिती करुन घ्यायला आवडेल.
पुलेशु
-- लिखाळ.

मदनबाण's picture

6 Apr 2009 - 7:58 pm | मदनबाण

क्लिंटनराव अवं तुमी एकदम झ्याक लिवता बघा... च्या मारी आमच्या मास्तुर्‍यान असं काय सोप करुनशान अर्थशास्त्र शिकवल असतं, तरं परिक्सेला १५ मार्काचा अर्थशास्त्राचा भाग ऑप्शनला टाकायची येळ आली नसती बघा...
शाळेचे दिसं आठवले.
खरंच तुम्ही अगदी सोप्या पद्धतीत समजवुन सांगितला !!! सॉलिइइइइट्ट.

अवांतर :-- शाळेवरुनश्यान आठवलं आमचे एक गणिताचे मास्तर होते, जरासे वयस्क, गोरा रंग, घारे डोळे... नाव बापट.ते गणित शिकवायचे अन् काय बी चुकलं ना की मजबुत कान पिळायचे !!!
आम्ही पोरं नेहमी म्हणायचो... बापट लयं तापट !!!
(नेहमीच इध्यारती)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

क्लिंटन's picture

6 Apr 2009 - 10:23 pm | क्लिंटन

नमस्कार मंडळी,

माझी लेखमाला आपल्याला चांगली आणि उपयुक्त वाटली हे वाचून समाधान वाटले.आता पुढील लेख ३-४ दिवसांत चलनाच्या अवमूल्यन्यावर.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

व्जीर's picture

14 Apr 2009 - 3:46 pm | व्जीर

झिंम्बाब्वेमध्ये कॅपिटल न वाढवता नुसताच पैशाचा पुरवठा वाढला आणि त्यातूनच महाप्रचंड प्रमाणात महागाई वाढली. हे क्से काय होते ते क्ळ्ले नाही कॄप्या स्प्श्ट क्रा, बाकी लेख अतीश्य माहितिपुर्न. आप्ले अभीन्न्दन.

क्लिंटन's picture

14 Apr 2009 - 5:28 pm | क्लिंटन

उत्पादनासाठी लागणार्‍या गोष्टी तीन: जमिन, मनुष्यबळ आणि कॅपिटल. कॅपिटल म्हणजे उत्पादनासाठी वापरता येऊ शकणार्‍या गोष्टी (जमिन आणि मनुष्यबळ सोडून).म्हणजे यंत्रसामुग्रीचा आणि मनुष्यबळाच्या ज्ञानाचा समावेश समावेश मुख्यत्वे त्यात होतो.पैशाने यंत्रसामुग्री कॅपिटल घेऊन ते उत्पादनासाठी वापरता येऊ शकेल पण पैशाचा ’डायरेक्टली’ त्यासाठी उपयोग नाही. म्हणजे पैसा खर्च करून कामगारांना नवीन कौशल्ये शिकविणे किंवा नवी यंत्रसामुग्री विकत घेणे असे करता येईल आणि त्यायोगे उत्पादन वाढवता येऊ शकेल पण पैशाच्या नोटांचा ’डायरेक्टली’ त्यासाठी उपयोग नाही.म्हणून पैशाचा (दुसर्‍या शब्दात नोटांचा) समावेश कॅपिटलमध्ये नाही.

लेखात लिहिलेले दुसरे समीकरण पुढीलप्रमाणे आहे.
पैसा X गती = किंमत X Output

तसेच नजिकच्या काळात पैशाची गती आणि आऊटपुट या दोन्ही गोष्टी स्थिर असतात. सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले म्हणून लोक लगेचच भरमसाठ खरेदी करत नाहीत.तसेच आऊट्पुट हे जवळ असलेली यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळाची कुशलता या गोष्टींवर अवलंबून असते.म्हणजेच ते कॅपिटलवर अवलंबून असते. नजिकच्या काळात ते ही स्थिरच असते.

आता सरकारने भरमसाठ नोटा छापून बाजारात आणल्या तर वरील समीकरणानुसार किंमत वाढणार आहे.कारण पैशाची गती आणि आऊटपुट या दोन गोष्टी स्थिर आहेत.झिंबाब्वेमध्ये सरकारने प्रचंड प्रमाणावर नोटा छापल्या.त्यातून किंमती वाढल्या.मागच्या वर्षी असलेली हजार झिंबाब्वियन डॉलरची नोट मागच्या वर्षी समजा १००० युनिट वस्तू विकत घेऊ शकत असेल.पण या वर्षी किंमती वाढल्याने १००० पेक्षा कमी युनिट विकत घेता येऊ शकतील.यावर सरकारचा उपाय म्हणजे आणखी नोटा छापणे! त्यातून अजून महागाई वाढली.या दुष्टचक्रातून हजार डॉलरच्या नोटेची काही किंमत राहिली नाही.महागाई वाढल्यामुळे भारतातही आज पंचवीस पैशाच्या नाण्यात काहीच विकत घेता येत नाही आणि ते वापरातून जवळपास हद्दपार झाले आहे.तशीच काहीशी गोष्ट झिंबाब्वेतील हजाराच्या नोटेबाबत झाली.पण ती घडामोड प्रचंड वेगाने घडली. त्यातून उपाय निघाला दहा हजार डॉलरची नोट छापणे. त्याचीही गत काही महिन्यांनी हजार डॉलरच्या नोटेसारखीच झाली.मग त्यापुढील टप्पा पंचवीस हजार डॉलरची नोट छापणे! असे करत करत सरकारला मागच्या वर्षी एक कोटी डॉलरची नोट छापावी लागली.

म्हणजेच नुसत्या नोटा छापून प्रश्न मिटत असता तर जगात कोणी गरीब राहिलेच नसते.छापा नोटा आणि द्या प्रत्येक गरीबाला असे केले तर गरीब लोक आज एका रुपयाची झुणका भाकर घ्यायला किंमतीत घासाघीस करतात तेच उद्या दोन रुपयाची झुणकाभाकर विनातक्रार घेतील. म्हणजे झाले काय? किंमती वाढल्या पण गरीबांची क्रयशक्ती वाढली का?त्यांच्या दिवसाच्या उत्पन्नातून पूर्वी १० झुणका भाकर प्लेट परवडत असतील तर आजही १० च परवडतील.म्हणजे उत्पादन न वाढवता नुसत्या नोटा भराभर छापून बाजारात आणल्या तर महागाई वाढेल. तेव्हा अर्थशास्त्राप्रमाणे कोणाचीही संपत्ती मोजायचा मापदंड त्याच्याकडे किती पैसे आहेत असा नसून तो त्या पैशातून किती वस्तू विकत घेऊ शकतो हा आहे.जास्त वस्तू विकत घेता येत असतील तर तो जास्त श्रीमंत.

लेखमालेच्या दुसर्‍या भागात पाणी चलन म्हणून वापरले तर काय होईल ते लिहिले आहे.नेमके तसेच प्रचंड प्रमाणावर नोटा छापून बाजारात आणल्या तर होईल आणि झिम्बाब्वेमध्ये तसेच झाले.

याउलट कामगारांना प्रशिक्षण देऊन किंवा नवी यंत्रसामुग्री विकत घेऊन नवे कॅपिटल निर्माण करून उत्पादनाला चालना दिली तर लोकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील आणि ते अधिक खरेदी करू शकतील.त्यातूनच वस्तूंची मागणी वाढेल आणि काही प्रमाणात महागाई वाढली तरी लोकांची क्रयशक्ती पण वाढेल.तेव्हा मंदीच्या काळात उपाय रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे आहे नुसत्या नोटा छापणे नाही.मंदीच्या काळात नवे प्रकल्प कोणताही उद्योगधंदा हाती घेणार नाही.कारण नवीन उत्पादन केलेल्या वस्तू विकत कोण घेणार? तेव्हा अशावेळी सरकारची भूमिका महत्वाची असते.सरकारने अशावेळी पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक करावी असे अपेक्षित असते. समजा सरकारने रस्ते बांधणीचा मोठा प्रकल्प हाती घेतला तर त्यामुळे अनेक लोकांना रोजगार तर मिळेलच.तसेच रस्ताबांधणीवर अवलंबून असलेल्या सिमेंट, स्टील यासारख्या उद्योगांची मागणी वाढेल आणि तिथे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.अशा लोकांच्या हातात पैसा खेळू लागला की ते जास्त खरेदी करतील.त्यातूनच मग कपडे, संगणक, गाड्या,पर्यटन अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये मागणी वाढेल. वाहन उद्योगावर इतर अनेक उद्योग (रबर, केमिकल, वाहनांचे सुटे भाग वगैरे) अवलंबून असतात. अशा सगळ्या उद्योगांमध्ये मागणी वाढेल. जॉन मेनार्ड किनेस या अर्थशास्त्रज्ञाच्या सिध्दांताप्रमाणे मंदीच्या वेळी सरकारची भूमिका महत्वाची असते.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

नितिन थत्ते's picture

14 Apr 2009 - 8:14 pm | नितिन थत्ते

एकदम चपखल विश्लेषण.

म्हणूनच बाजारातील पैशाची उपलब्धता योग्य प्रमाणात नियंत्रित करणे हे जिकिरीचे आणि जोखमीचे काम असते.
एकूण महागाई आणि मंदी यांमधली तारेवरची कसरत करावी लागते.
मंदी कमी करण्यासाठी तरलता वाढवली तर हळूहळू महागाईपण वाढू लागते. त्यामुळे सरकारला पुन्हा योग्यवेळी हात आखडता घ्यावा लागतो आणि महागाई नियंत्रणात आली की पुन्हा सैल सोडावा लागतो.

खराटा
(रंग माझा वेगळा)

ऍडीजोशी's picture

14 Apr 2009 - 2:44 pm | ऍडीजोशी (not verified)

हा गहन विषय आम्हाला समजेल अशा भाषेत लिहिल्याबद्दल क्लिंटन चे मनापासून आभार

प्रमोद देव's picture

14 Apr 2009 - 3:19 pm | प्रमोद देव

क्लींटन चारही लेख एकदमच वाचले.
अतिशय सोप्या भाषेत हा गुंतागुंतीचा विषय मांडण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात.
आपल्या ह्या यशस्वीतेबद्दल हार्दिक अभिनंदन.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

मिलिंद's picture

14 Apr 2009 - 8:39 pm | मिलिंद

चारही लेख एकाच बैठकित पुन्हा वाचले क्षणभर अर्थशास्त्री झाल्याचा भास झाला!?...
मध्ये एकदा मुणगेकर सरांचे मिटकॉनमध्ये भाषण ऐकण्याची संधी मिळाली अर्धेअधिक वरुनच गेले. पण आपला लेख उत्तमच.

संदीप चित्रे's picture

14 Apr 2009 - 8:44 pm | संदीप चित्रे

सर्वात प्रथम म्हणजे क्लिष्ट विषय सोप्या मराठीत, योग्य उदाहरणांसहित, समजावून दिल्याबद्दल धन्यवाद.
च्यामारी.... असं कुणी बी. कॉम्.ला असताना शिकवलं असतं तर अर्थशास्त्र अनर्थशास्त्र तरी वाटलं नसतं :)

आय.आय.एमच्या वाटेने तुझं भविष्य उज्ज्वल होईल याची खात्री आहे.

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

धनंजय's picture

14 Apr 2009 - 9:41 pm | धनंजय

धन्यवाद.
- - -

फियाट चलनातील दोन प्रकार (चलन आणि प्रतिज्ञापत्रे) यांची चर्चा वर झालेलीच आहे.

पूर्वी सर्व कागदी नोटा प्रतिज्ञापत्रे होती. म्हणजे नोट छापण्यापूर्वी त्या किमतीचे रिप्रेझेंटिटिव्ह चलन (म्हणजे सोने, चांदी, वगैरे) सरकारी तिजोरीत जमा व्हावे लागायचे. (१ डॉलरचे अमुक सोने १९४४ मध्ये द्यावे लागे, हा उल्लेख क्लिंटन यांनी केलेलाच आहे.) या प्रकाराला नेगोशिएबल रिप्रेझेंटेटिव्ह चलन, असेच म्हणावे लागेल. आजही सोने-बाजारात जे लोक पैसा गुंतवून दररोज उलाढाल करतात, ते एकमेकांना सोन्याची नाणी देत नाहीत. सोन्याची नाणी ठेवलेल्या आगराची कागदपत्रेच हस्तांतरित करतात.

१९६४च्या आजूबाजूला यू.एस.अमेरिकेने म्हटले की "आमची नोट हीच चलन - त्याच्या बदल्यात काहीही द्यायचे आमचे वचन नाही" - येथपासून खरे "फियाट" चलन.

भारताची एक रुपयाची कागदी नोट बोलून आणि चालून "फियाट" आहे. मोठ्या नोटा प्रत्यक्ष वापरात (चालून) फियाटच आहेत, पण रेप्रेझेंटेटिव्ह असल्याचे ("आय प्रॉमिस" बोलून) नाटक करतात.

नितिन थत्ते's picture

26 Dec 2017 - 9:22 pm | नितिन थत्ते

हा धागा जुना आहे परंतु गॅरी ट्रूमन यांनी "बिटकॉईन" या करन्सीबाबत काही प्रकाश या धाग्यावर टाकावा अशी विनंती !!