नर्सरी

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
1 Apr 2009 - 2:59 pm

कालच माझ्या मुलीचा नर्सरीतील निरोप समारंभाचा सोहळा पार पडला. ह्या सोहळ्याच्या निमित्ताने नर्सरीच्या शिक्षकांनी मिळून मुलांचे काही नाच, कविता, गाणी बोलण्याचे कार्यक्रम ठेवले होते. नाच शिक्षकांनीच मुलांकडून बसवून घेतले होते. रितसर मुलांना खाऊ दिला. काही उत्सुक पालकांनी सगळ्या पालकांकडून पैसे जमा करून शाळे करीता भेट वस्तू देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या संचालक शिक्षिकेने आम्हा पालकांना काही मनोगत व्यक्त करायचे असेल तर करायला सांगितले. सगळ्या पालकांच्या वतिने मी बोलण्याचे ठरविले आणि फक्त त्यांचे आभार मानले. पण मनात थोडी खंत राहीली की अजुन मी माझे नर्सरी बद्दल मत मांडायला हवे होते. ते मी इथे व्यक्त करत आहे.

काही पालक आपल्या मुलांना नर्सरी मध्ये घालत नाहीत. ज्युनियर मध्ये जाउन पण तोच अभ्यास करायचा आहे, मग कशाला उगाच मुलांना आत्तापासुन ओझ टाकायच हा किंवा पालकांनाही ने आण करण्याचा त्रास लवकर चालू होतो किंवा आर्थिक परिस्थिती हा त्या मागचा उद्देश असतो. पण अस करून आपण आपल्या मुलांचे काही मोलाचे क्षण गमावतो. माझी मुलगी ज्या नर्सरीमध्ये जात होती त्यात मुले जमल्यावर पहिला जन गण मन मुलांकडून बोलुन घेतात मग अभ्यास, पोएम, खेळ, खाऊचा डब्बा खाताना वदनी कवळ घेता, आणि शेवटी मुलांना सोडताना त्यांच्या कडून वंदे मातरम बोलुन घेतात. खरच आपल्याला घरी ह्या सगळया गोष्टी करायला वेळ मिळेल का ? आणि इथेच त्यांना मित्र मैत्रीणी भेटतात. शाळेच स्वरूप कळत. शिस्त काय असत ते समजत.

अ‍ॅडमिशनची फी घेउन फक्त शिकवण्याचे काम शिक्षक करत नसतात. त्यांना अनेक प्रसंगांना सामोर जायच असत. ४०-५० मुलांची जबाबदारी घ्यायची असते. नर्सरीचे सुरवातीचे काही दिवस तर मुलांना आत घेतात आणि कसे एवढ्या मुलांचा रडण्याचा आरडा ओरडा त्या सहन करु शकतात हे त्यांनाच माहीत. आतली मुले अक्षरश: दार आपटत असतात रडून रडून. एखाद महिन्यात शिक्षक त्यावर कंट्रोल करतात आणि गाडी जरा रुळावर येते. तरी वर्षभर मुलांचे वेगवेगळे प्रॉब्लेम चालुच असतात. काही मुले खुप हट्टी असतात, मस्ती खोर असतात त्यांना कंट्रोल करावा लागतो. मध्येच कुणाला शी येते सु येते कुणी उलटी करतात, त्यासाठीही येथील ठेवलेली आया सज्ज असते. कुणाला मध्येच पोटात दुखायला लागत, अजुन कसला त्रास होतो अशा वेळी शिक्षिका आपल्या परीने प्रसंग निभावण्याचा प्रयत्न करतात अथवा ह्या मुलांच्या घरी फोन करुन त्यांना बोलावून घेतात.

अभ्यासाच्या बाबतीत बोलायच झाल तर आईच्या मायेने ह्याना मुलांना मांडीवर बसवून ए.बी.सि.डी. मुलांकडून गिरऊन घ्यायला लागते. डब्बा खाताना काही मुले डबा खात नाहीत अशा मुलांना भरवावे लागते. त्यामुळे मुलांनाही त्यांच्या बद्दल आपुलकी निर्माण होते. तसेच होळी, दिवाळी सारखे सणही साजरे केले जातात. मुलांचे वाढदिवस साजरे केले जातात त्यामुळे मुलांमध्येही उत्साह निर्माण होतो. फॅन्सी ड्रेस चा कार्यक्रम घेतला जातो, त्यामागचा त्यांचा उद्देश पुढे जाउन ही मुले स्टेज वर घाबरू नयेत हा असतो. मुलांच्या करमणूकीसाठी पिकनिकही काढली जाते. त्यात भेळ केली जाते. हे काही मोलाचे क्षण मुलांच्या आठवणीत राहतात.

काल माझ्या मुलीनेही डान्स मध्ये भाग घेतला होता, म्हणजे तिच्या मॅडमनेच तो बसवला होता. तिच्यात खुप कॉनफिडन्स आला आहे. ती आम्ही घरी शिकवलेले गाणेही माईक समोर न घाबरता बोलली. डान्स बसवत असताना ती खुप वेळा गेली नव्हती. पण मॅडमने कसे तिला कव्हर केले ते त्यांनाच माहीत.

खरच नर्सरी म्हणजे मुलांच्या शालेय शिक्षणाचा, संस्कारांचा, मैत्रीचा, शिस्तिचा पाया असतो. ह्या सगळ्याची सुरुवात इथेच होते. म्हणून जे पालक आपल्या पाल्याला नर्सरी मध्ये घालत नाहीत त्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या मुलाचे नर्सरीतले मोलाचे १ वर्ष फुकट घालवू नका. आर्थीक परिस्थितीची बाब असेल तर गोष्ट वेगळी.

एक पालक.

समाजमत