मेड इन चायना-एक समिक्षण

रम्या's picture
रम्या in जनातलं, मनातलं
30 Mar 2009 - 3:45 pm

"मेड इन चायना" बद्दल बरेच एकून होतो. म्हणून काल हा सिनेमा पाहिला.

एस. ई. झेड. आणि त्या भोवती चालणारी राजकिय चाके हि मध्यवर्ती कल्पना सिनेमा मध्ये वापरली आहे.

आप्पासाहेब जगदाळे हे राजकिय वर्तूळात दबदबा असणारं व्यक्तिमत्व. गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळी चाकं पुण्यातील पिंपळगाव मधील आपल्या वाड्यात बसून चालवणारी व्यक्ती. त्यांचा पुतण्या मोहीत जगदाळे हा इस्रायल मध्ये जाऊन शेती संबधी उच्च शिक्षण घेऊन आलेला. परदेशी शिक्षण घेऊन परत आल्या नंतर जगदाळे घराण्याची कित्येक एकर जमीनीचा वापर तुला पाहिजे तसा कर असा सल्ला आप्पासाहेब मोहितला देतात. मोहित जोमाने कामाला लागतो आणि बारा वर्षात एक अत्याधुनिक गोठा उभा करतो. शेतीचे नवनवीन प्रयोग करून निर्यातक्षम शेती उत्पन्न मिळवतो. इतर शेतकरी सुद्धा मोहितच्या सल्ल्याने आपापली शेती सांभाळत असतात. सगळे सुखाने चालू असते. आणि अचानक एस. ई. झेड चं वारं सुटतं. मुंबई पुण्याचं शांघाय बीजींग करण्याची टुम निघते. थडानी या उद्योग पतीच्या सांगण्यावरून पुणे पिंपळगाव जवळील पंचेचाळीस हजार एकर जमीन ताब्यात घेण्याचं फर्मान निघतं. आप्पासाहेबांसकट सर्व आपमतलबी राजकारण्यांची सोडून इतर जमीनीचं सर्वेक्षण सुरू होते.
आपली बारा वर्षाची मेहनत वाया जातानाच हजारो कुटुंब उद्ध्वस्त होताहेत हे पाहून मोहित आपल्या काकांविरुद्ध बंड करून उठतो. शिंदे हा सुद्धा गावातील तरूणांवर बर्‍यापैकी वजन असणारा राजकारणी. त्याची माणसं सर्व्हे करण्यार्‍या अधिकार्‍याना बेदम चोपून हाकलवून देतात. पण मोहितचे आप्पासाहेबांशी असणारे रक्ताचे संबध पाहता शिंदे त्याला साथ देत नाही. दोघेही आपापल्या परीने जमिनी वाचवण्यासाठी स्वतंत्र पणे हलचाल करत राहतात. मग दडपशाही राबवली जाते. शिंदे आणि त्यांच्या माणसांना तुरुंगात कोंडण्यात येतं.
परिस्थिती चिघळत जाते.
आणि एक दिवशी एका मॉलच्या उद्घाटनाच्या वेळेस आप्पासाहेबांवर गोळ्या झाडण्यात येतात. आप्पासाहेबांवर गोळ्या कोण झाडतं हे मी सांगत नाही, पिक्चर बघा किंवा एवढ्या सांगितलेल्या कथेवरून अंदाज बांधा!

सिनेमाच्या एकूण कथानकावरून सिनेमात दाखवण्यासारखं बरंच काही असेल हे कुणालाही समजेल. सामाजिक, राजकिय, वैचारिक, शेतकरी, आपमतलबी राजकारणी, एकमेकांचा उपयोग करून घेणारी राजकारणी आणि उद्योगपती असं बरंच खाद्य सिनेमासाठी होतं.

पण खेदानं सांगावसं वाटतं एका चांगल्या कथानकाचा दिग्दर्शकाला उपयोग करता आला नाही.

एक राजकिय सिनेमा आप्पासाहेबांच्या मॄत्यनंतर "खुनी कोण" असा थिल्लर थरारपट होतो. खुनाच्या केसचा शोध करण्यासाठी उगीचच एक महिला इन्स्पेक्टर घुसवण्यात आली आहे. पोलिस स्टेशनातल्या हवालदारांच्या छातीपेक्षाही कमी उंचीची रडक्या चेहर्‍याची ए.सी.पी पाहून हसू येतं. तिच्या चेहर्‍यावरचे ओढून ताणून आणलेले गंभीर भाव पाहून खरं तर रसभंग होतो.

आप्पासाहेबांचा बाहेर ख्याली, उनाड आणि नेतॄत्व क्षमता नसलेला मुलगा मिलिंद गुणाजीने साकारलाय. काहीही म्हणा उंची आणि व्यक्तिमत्वात उजवा असलेला मिलिंद गु़णाजी अभिनयात पार गेला आहे. लक्षात रहण्यासारखा एकही प्रसंग याला साकारता आला नाही. त्याची संवादफेक, चेहर्‍यावरचे हावभाव अगदीच बालिश वाटतात. मिलिंद गुणाजीची बायको मॄणाल कुलकर्णीने साकारली आहे. पण बाहेरख्याली नवर्‍याची पत्नी म्हणुन रडूबाई म्हणून दाखवून दिग्दर्शकाने तिलाही वाया घालवली आहे. "माझ्या संसाराचं वाटोळं झालं" असं धायमोकलून, डोक्यावर हात बडवत रडताना पाहून आपल्यालाच कपाळावर हात मारून घेण्याची पाळी आल्यासारखं वाटेल.

आप्पासाहेबांची भुमिका केलेल्या नटाचं नाव माहीत नाही. ही व्यक्तिरेखा खुप चांगली नाही पण ठिक म्हणता येईल.
पण "भिमा, सत्कार कर साहेबांचा" असं म्हणणार्‍या यंशवंत दत्त किंवा "नातवाने बाया नाचवाव्या, हवालदाराच्या थोबाडीत मारावी आनी आजाने करंगळीवर निभावून न्यावं.." असं खुर्चीवर बसल्याबसल्या फक्त मानेच्या वरील अवयवाची हलचाल करून बोलणार्‍या निळू फुलेंसमोर आप्पासाहेब पालापाचोळ्यासारखा उडुन जाईल.
वास्तविक अशी तुलना करू नये पण राजकिय विषयावर आधारलेला सिनेमा म्हटल्यावर "सरकारनामा" प्रमाण म्हाणून डोळ्यासमोर होता. आणि आधीच येऊन गेलेल्या सिनेमावरून काहीतरी शिकावं म्हणून हि तुलना करावीशी वाटली.

पण संदीप कुलकर्णीने साकारलेला मोहीत खरोखरच लाजवाब. हा एक खरोखरच कसलेला अभिनेता आहे. "उद्योगच नको असं नाही पण ते आधीच एक्स्पोर्ट क्वालिटी पिकं देणार्‍या जमिनीवर कशाला? विदर्भातील पडीक जमिनीवर काढा, बुडालेल्या प्रकल्पातील सरकारी जमीनीवर काढा" असं पोट तिडकिने सांगणारा मोहीत प्रामाणिक वाटतो.

बाकी सिनेमातल्या गाण्याबद्दल काय बोलावं? आप्पा साहेबांचा मुलगा एका बारमध्ये आसतो. इथं एक आयटम साँग. एका जुन्या गाण्याचं रिमिक्स आहे...

'आता कशाला उद्याची बात'.(बॅकग्राऊंड वर इलेक्ट्रीक ड्रम वाजताहेत. ढिक् चॅक ढिक् चॅक)
'बघ उडून चालली रात'.(परत बॅकग्राऊंड वर संगीत सुरूच ढिक् चॅक ढिक् चॅक धडाड धुडूम ठाक ठूक, खळ् खळ्) || धॄ||

आपण तर लघुशंकेच्या निमित्ताने उठूनच गेलो राव. गाणं संपेपर्यंत चांगली पाच मिनटं लघुशंका केली.

सगळीच पात्र आणि त्यांच्यावरील प्रसंग खुन कोणी बरं केला असेल असा प्रश्न निर्माण करण्यासाठीच सिनेमात घुसडण्यात आली असावीत असं वाटतंय.

पण सिनेमा काही अगदी टाकाऊ आहे असं नक्कीच नाही. तीन तास आपण सहज एका जागी बसून तरी नक्कीच राहू शकतो. सिनेमा बघा पण सिडी किंवा डिव्हिडीवर त्यापेक्षा जास्त त्रास घेण्याची गरज नाही.

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Mar 2009 - 3:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बरी वेळेत वॉर्निंग दिलीत! फार जास्त अपेक्षा न ठेवताच (पाहिला तर) हा चित्रपट पाहीन.

एक सांगू, फडतूस चित्रपट हुच्च समीक्षणवजा लेखाची जननी आहे, पण तुम्ही हा चित्रपट अंमळ वाया घालवलात. काही विनोद मात्र आवडले (ह.घ्या हे वे. सां. न ल.)

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

रम्या's picture

30 Mar 2009 - 5:04 pm | रम्या

तरी बरं भारतमाता मध्ये पाहिला हा सिनेमा. फक्त ५० रु. चं नुकसान झालं!
आम्ही येथे पडीक असतो!

प्राजु's picture

30 Mar 2009 - 8:17 pm | प्राजु

बघायला हरकत नसेल.. तर बघू.
बाकी आपलं परिक्षण मात्र आवडलं. वॉर्न केलंत ते बरं झालं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

फारएन्ड's picture

31 Mar 2009 - 5:31 am | फारएन्ड

आवडले परीक्षण. बरीच जाहिरात झाली आहे याची. एवढा भारी नसला तरी एकदा पाहायला हरकत नाही असे हे वाचून वाटते.