ही चव कधी घेतलीत?

अनंत छंदी's picture
अनंत छंदी in जनातलं, मनातलं
3 Feb 2009 - 9:17 pm

अलिकडे आंजर्ले, हर्णै, मुरूड परिसरात सहल केल्याचा धागा मिपावर प्रकाशित करण्यात आला होता. त्यात या परिसराचे सुंदर, सचित्र वर्णन करण्यात आले आहे. परंतु या भागातील खादाडीवर फारसा प्रकाश पडल्याचे दिसत नाही. म्हणून थोडी माहिती.
शाकाहारी मंडळींना मुरूड गावातील घरगुती खाणावळीत खास उकडीचे मोदक, डाळींब्यांची उसळ, आत्ता हिवाळ्यात ओल्या पावट्यांची भरपूर खोबरे घालून केलेली उसळ या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. उन्हाळ्यात आमरस व घावन फणसाचे सांदण यांची चव घेता येते.सामीष पदार्थांचा आस्वाद घेणार्‍यांची तर केवळ चंगळ असते. त्यातही आपला जर मुक्काम असेल तर हर्णै येथे सायंकाळी होणार्‍या माशांच्या लिलावात पापलेट, सुरमई, कोळंबी,शेवंड यासारखे मासे खरेदी करून काही घरगुती खाणावळीत आणून दिल्यास आपल्या इच्छेप्रमाणे ते फ्राय किंवा त्याची करी, मसाला तयार करून देण्यात येते. या ताज्या माशांची चव एकदा घेतलीत तर पुण्यामुंबईत मिळणारे बर्फातील मासे खाण्याची आपणाला फारशी इच्छाच होणार नाही. पापलेट, सुरमई, कोळंबी, शेवंड हे खरेतर पट्टीच्या मासेखाऊचे खाद्य नव्हेच. आपण खरे दर्दी मासेखाऊ असाल तर कर्लीसारखा जास्त काटे असलेला परंतु भलताच चवदार मासा निवडाल. संध्याकाळी सोनेरी वारुणीची चव घेताना त्या सोबत चखणा म्हणून फ्राय कोलंबी खाण्यापेक्षा कुरकुरीत मांदेली किती छान लागते हे शब्दात सांगून कळणार नाही. कोलीम हा मासा तसा दुर्लक्षीत आहे पण ओला कोलीम मिळण्याच्या सिझनमध्ये त्याचे पकोडे खाणे म्हणजे स्वर्गसुख आहे. याखेरीज शिंपल्या आणि कालवे मिळाले तर त्याची पारंपारिक पाककृती हा एक खास चवदार प्रकार आहे. त्याची चव अवश्य घ्यायलाच हवी. कोकणी शेतकर्‍याचे अन्न म्हणून प्रसिद्ध असलेली सुकी कोलीम चटणी आणि सर्वाधिक लोह असलेले धान्य नाचणी यांची गरमगरम भाकरी हाही एक वेगळा जिव्हानंद आहे. सागुती आणि वडे हा कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय कोंबडीचे मटण आणि त्यासोबत खास कोकणी वडे एकदा खाल तर या डिशच्या प्रेमातच पडाल. हा आनंद या परिसरात पर्यटक म्हणून जाणार्‍या मिपाकरांनी अवश्य घ्यावा. उगाच मोठी भपकेबाज हॉटेले निवडण्यापेक्षा उतम स्वच्छ घरगुती खाणावळीत या पदार्थांचा आस्वाद घ्यावा. म्हणजे नेमकी पारंपारिक चव घेता येईल.

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

3 Feb 2009 - 11:17 pm | प्राजु

एखाद्या घरगुती खानावळीचा(तुमच्या माहितीतली) पत्ता तरी द्यायचा ना.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नाटक्या's picture

3 Feb 2009 - 11:52 pm | नाटक्या

अनंत छंदी,

लाजवाब. कर्ली/मांदेली माशाची आठवण काढलीत. नुसत्या आठवणीनेच तोंडाला पाणी सुटले. अमेरिकेत हे मासे मिळत नाही ना, काय करणार!! आता भारतात आल्यावर गणपतीपुळ्याची एक तरी चक्कर होईलच तेव्हा बघू. कोंबडी-वडे हा तर माझा जीव कि प्राण, आमच्या घरी हे मात्र नियमित होत असते. प्राजूताई म्हणतात त्या प्रमाणे एखादी घरगुती खानावळ सुचवलीत तर छानच..

- नाटक्या

लवंगी's picture

4 Feb 2009 - 1:15 am | लवंगी

सहमत..

शोनू's picture

4 Feb 2009 - 3:18 am | शोनू

कर्ली अन मांदेली ची आठवण करुन दिलीत! नुस्तंआठवून सुद्धा बरं वाटलं.
ओला कोलीम म्हणजेच ओला जवळा ना ? ( ज्याला सुकवलं की सुकट म्हणतात ?) त्याच्या पकोड्यांची कृती हवीये. अन शिंपल्यांच्या सुद्धा पारंपारिक कृती चालतील.

मी इथे क्वचित सुरमईच्या नाहीतर बांगड्याच्या कालवणात थोड्या शिंम्पल्या घालते. बाकी प्रकार करायला आवडेल.

संदीप चित्रे's picture

4 Feb 2009 - 3:56 am | संदीप चित्रे

त्या भागात जाऊन मनसोक्त मासे खाल्ले.... आता हा लेख वाचून पुन्हा एकदा जावंसं वाटतंय.
करलीबद्दल(ही) सहमत :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Feb 2009 - 7:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुरुडला गेलो तेव्हा एका घरगुती खाणावळीत जेवलो आहे. आमच्यातल्या एका जाणकाराने कोळंबी आणि काही मासे घेतले, संबधीत कुटूंबियांनी ते बनवले. जेवण होईपर्यंत त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या. तसे एकतर खार्‍या पाण्यातील माश्यांशी आमची फारकत असल्यामुळे, केवळ भूक लागलेली असल्यामुळे जेवण पोटात ढकलले. बाकीच्यांनी ते जेवण असे सुतले की विचारु नका !

-दिलीप बिरुटे

सुनील's picture

4 Feb 2009 - 7:46 am | सुनील

मस्त लेख!

या ताज्या माशांची चव एकदा घेतलीत तर पुण्यामुंबईत मिळणारे बर्फातील मासे खाण्याची आपणाला फारशी इच्छाच होणार नाही.
का जखमेवर मीट चोळताय? आता वारंवार त्या भागात जाणं जमणार आहे का? दुधाची तहान ताकावर, नाही का?

आपण खरे दर्दी मासेखाऊ असाल तर कर्लीसारखा जास्त काटे असलेला परंतु भलताच चवदार मासा निवडाल.
+१ सहमत. कर्ली, तारली, काटेरीला उभ्या जगात तोड नाही!

संध्याकाळी सोनेरी वारुणीची चव घेताना त्या सोबत चखणा म्हणून फ्राय कोलंबी खाण्यापेक्षा कुरकुरीत मांदेली किती छान लागते हे शब्दात सांगून कळणार नाही.
;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

केवळ_विशेष's picture

4 Feb 2009 - 11:23 am | केवळ_विशेष

कर्ली आणि मांदेलीच्या आठवणीने पाणी सुटलय तोंडाला... च्या य ला शर्ट भिजला की राव... सकाळी सकाळी हापिसात आल्या आल्या हा लेख वाचला... आता आज खाल्ल्याशिवाय तळीराम शांत होणे केवळ अ श क्य :)

दशानन's picture

4 Feb 2009 - 11:31 am | दशानन

मी मागे जेव्हा गेलो होतो, गोव्यावरुन सांवतवाडीच्या पुढे एक गाव आहे छोटेसे तेथे घरगुती पध्दतीचे मासाहारी जेवण मी व माझ्या उत्तर भारतीय मित्रांनी केले !

अक्षरशः ते पागल झाले होते त्या जेवणाची चव व थाट बघून !

आता पुन्हा फक्त जेवनासाठी म्हणून कोकण सहलीचा घाट घातला आहे ;)

*******

शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

अनंत छंदी's picture

4 Feb 2009 - 12:02 pm | अनंत छंदी

प्राजू, नाटक्या, लवंगी,सोनू. संदीप, बिरुटे सर, सुनील, केवळ विशेष आपण सर्वांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांबद्दल आभार!
प्राजूताई, नाटक्याजी, लवंगीताई आपल्या सूचनेप्रमाणे त्या भागातील छानशा घरगुती खाणावळींची माहिती लवकरच टाकतो
सोनूजी, करेक्ट! ओला कोलीम म्हणजेच जवळा. त्याच्या पकोड्यांची पा.कृ. ही लवकरच देतो.
बिरुटे सर, काय? आपण समुद्रातले मासे खात नाही? छ्या, म्हणजे तुमचे जीवन व्यर्थ हो.. :) केवढ्या मोठ्या जिव्हानंदाला मुकताय माहीत आहे? =))
सुनीलजी आणि केवळ विशेषजी तुमच्या मत्स्यप्रेमाला सलाम!
संदीपजी आपल्या बोंबील आख्यानाच्या आपणतर बुवा प्रेमात आहोत. :)
राजे, मजा चख लो यार! सावंतवाडी, गोव्यापेक्षा या भागातील सागरकिनारे कमी गजबजलेले, शांत आहेत जरूर भेट द्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Feb 2009 - 7:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर, काय? आपण समुद्रातले मासे खात नाही? छ्या, म्हणजे तुमचे जीवन व्यर्थ हो.. केवढ्या मोठ्या जिव्हानंदाला मुकताय माहीत आहे?

खा-या पाण्यातील माश्यांची सुरुवात केली आहे, ती पापलेट पासून. तसेच चखण्याला खेकडेही चाखून झाले आहेत (फ्राय). हळुहळु मांदेलीकडे वळू...खाण्याच्या बाबतीत कोणतीच कसर राहू नये, त्याची काळजी घेतोच.

पण, गोड्या माश्यांचे काय कवतुक सांगू साहेब ! फार अपवाद असेल की जे मासे आम्ही खाल्ले नाही. उसकी बाते फीर कभी ! :)

दवबिन्दु's picture

4 Feb 2009 - 1:40 pm | दवबिन्दु

नदितले मासे जास्त छान लागतात, चिन्गळ्या पण.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Feb 2009 - 8:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>चिन्गळ्या पण.

मस्त ! जालावर अशी गावाकडच्या शब्दांची कोणी आठवण दिली की खूप बरं वाटतं !
आम्हाला पण 'चिंगळ्या'* लै आवडतात !

शब्दार्थः *चिंगळ्या= नदीतील बारके ( लहान) मासे.

-दिलीप बिरुटे
(गावाकडचा)

चाणक्य's picture

4 Feb 2009 - 2:13 pm | चाणक्य

नुकतंच जेवण करून मि.पा. वर बसलो. हा लेख वाचला आणि पोटभर जेवण झालं असतानाही तोंडाला पाणी सुटलं. वास्तविक आमच्या घरातले सर्वजण शाकाहारी, पण मी कोकण भागात गेलो की घरगुती खाणावळीत मासे खाण्याची संधी सोडत नाही. माझ्या ईतर मासेखाऊ मित्रांकडून मिळालेल्या ऐकीव माहीतीच्या जोरावर मासे हाणतो. आणि अनंत छंदी म्हणाल्या प्रमाणे, कोकणातल्या शांत किनार्‍यांची मजा काही औरच....

ढ's picture

4 Feb 2009 - 2:32 pm |

कुडाळच्या जुन्या बसस्टँड समोरील एका गल्लीतल्या खाणावळीतील
कर्ली राईस प्लेटचा स्वाद अजुनी रेंगाळतोय जिभेवर.

अनंत छंदी साहेबांनी आठवण करून दिली.
आभार.

प्रभाकर पेठकर's picture

4 Feb 2009 - 3:02 pm | प्रभाकर पेठकर

कोकणाचा चवदार फेरफटका झाला. फार सुंदर लिहीला आहे लेख. त्यातील खालील वाक्यांना आक्षेप असला तरी लिखाणा मागील सच्च्या भावना पोहोचल्या.

पुण्यामुंबईत मिळणारे बर्फातील मासे खाण्याची आपणाला फारशी इच्छाच होणार नाही

मुंबईत ताजे मासे मिळत नाहीत. ही माहिती मलातरी नवीन आहे. आमच्या दहिसरात (मुंबई ४०० ०६८) मी तरी अजून 'बर्फातले मासे' बघितले नाही.

पापलेट, सुरमई, कोळंबी, शेवंड हे खरेतर पट्टीच्या मासेखाऊचे खाद्य नव्हेच. आपण खरे दर्दी मासेखाऊ असाल तर कर्लीसारखा जास्त काटे असलेला परंतु भलताच चवदार मासा निवडाल. संध्याकाळी सोनेरी वारुणीची चव घेताना त्या सोबत चखणा म्हणून फ्राय कोलंबी खाण्यापेक्षा कुरकुरीत मांदेली किती छान लागते हे शब्दात सांगून कळणार नाही.

चव ही व्यक्ती सापेक्ष असते. अमुक एक माशाची चव म्हणजेच 'ब्येस्ट' आणि बाकिच्या मासे खाणार्‍यांना 'चव कळलीच नाही' 'ते पट्टीचे खाणारेच नाहीत' अशा अर्थाचे वक्तव्य अन्याय कारक आहे (खाणार्‍यांवरही आणि त्या माशांवरही).

पापलेट फ्राय, सुरमई - बांङड्यांचे तिरफळे घालून केलेले झणझणीत कालवण, कोलंबी भात, बांगडा एरंगेळ, तिखलं, बोंबलाचं झणझणीत, खेकड्याचे तिखटजाळ कालवण, सुकटाची चटणी ह्या पदार्थांना चवच नाही?

कर्ली आणि मांदेळी मीही भरपूर हादडली आहे. ते मासे चविष्ट आहेत ह्यात शंकाच नाही पण म्हणून इतर 'मत्स्य प्रकारांना' गौण लेखणे मल तरी पटत नाही.

हर्णैच्या घरगुती खानावळीच्या पत्त्याच्या प्रतिक्षेत आहे. मिपाचा एक छानसा कट्टा जमवूया शनिवार-रविवार जोडून. भरपूर माझे हादडू, शनिवार रात्र 'एन्जॉय' करू. ('एन्जॉयमेन्ट्'ची व्यवस्था मी करतो.) रविवार सकाळ 'बोनस' मासे आणि चर्चासत्र (अनुपस्थितांच्या उखाळ्यापाखाळ्या) आणि संध्याकाळी रहाटगाडग्यास परत. काय म्हणता? (सखाराम्_गटण्यांकडे नांव नोंदणी सुरू आहे.)

सुनील's picture

4 Feb 2009 - 3:17 pm | सुनील

मिपाचा एक छानसा कट्टा जमवूया शनिवार-रविवार जोडून. भरपूर माझे हादडू, शनिवार रात्र 'एन्जॉय' करू.
सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

संदीप चित्रे's picture

4 Feb 2009 - 8:39 pm | संदीप चित्रे

'मासे' म्हटलं की दुजाभाव करू नये... सगळे चविष्ट असतात !!
आम्ही ऑक्टोपसही आवडीनं खातो :)

सखाराम_गटणे™'s picture

4 Feb 2009 - 3:22 pm | सखाराम_गटणे™

>>(सखाराम्_गटण्यांकडे नांव नोंदणी सुरू आहे.)
ठिक आहे. येउ द्या नावे

प्रभाकर पेठकर's picture

4 Feb 2009 - 3:25 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद गटणे साहेब. पहिलं नांव माझं.

अनंत छंदी's picture

4 Feb 2009 - 4:04 pm | अनंत छंदी

पेठकरशेठ
नमस्कार
तुम्ही फारच मनाला लावून घेता ब्वॉ! अहो
>>पट्टीच्या मासेखाऊचे खाद्य नव्हेच. आपण खरे दर्दी मासेखाऊ असाल तर कर्लीसारखा जास्त काटे असलेला परंतु भलताच चवदार मासा निवडाल.

ही वाक्ये दर्दी खवय्यांचा अवमान करण्यासाठी लिहीलेली नाहीत तर सर्वसामान्यपणे खवय्यांच्या नजरेतून सुटलेल्या गोष्टी नजरेस आणण्यासाठी लिहिलेली आहेत. असे करताना काहीशी सरस निरस तुलना करणेही आवश्यक असते. नाही का? तेव्हा रागावू नका बुवा. नाहीतर घशाखाली घास कसा उतरणार आमच्या? :))
आणि हो , दहीसरात ताजे मासे मिळत असतील कदाचित. पण त्यांच्या आणि येथील माशांच्या चवीत जरा फरक आहे. मुंबई भोवतालचा प्रदूषित समुद्र हे त्याचे कारण असावे का हा मला पडलेला प्रश्न आहे.

प्रभाकर पेठकर's picture

4 Feb 2009 - 11:16 pm | प्रभाकर पेठकर

तुम्ही फारच मनाला लावून घेता ब्वॉ!
असेलही. कारण तुम्ही 'हलकेच घ्या' असा सल्ला दिला नव्हतात. बेधडक विधाने मनाला लागतात हे बाकी खरे (मुद्दाम लावून घ्यावे लागत नाही). असो.

चव ही व्यक्ती सापेक्ष असते.
तुम्हाला कर्ली आणि मांदेळी सर्वश्रेष्ठ वाटत असेल तर माझा आक्षेप नाही. (कुणाचाच नसावा.) पण इतरांना 'खरे दर्दीच नाहीत' असे संबोधणे भावले नाही. राग नसावा.

तुमच्या सारखे 'दर्दी' आणि माझ्या सारखे 'बेदर्दी' ह्यांचा कट्टा ठरवा हर्णैत आणि ज्यांना जे हवे ते खाऊन आनंद मिळवू द्या. मी 'कर्ली' आणि 'मांदेळी' पुनःपुन: ताव मारून खाईन एवढी खात्री असू द्यावी.

दहीसरात ताजे मासे मिळत असतील कदाचित. पण त्यांच्या आणि येथील माशांच्या चवीत जरा फरक आहे. मुंबई भोवतालचा प्रदूषित समुद्र हे त्याचे कारण असावे का हा मला पडलेला प्रश्न आहे.

हे बाकी खरेच. मुंबईकरांना प्रदूषित समुद्रातील बेचव मासेही खावे लागतात आणि असे प्रदुषण विरहीत संमृद्ध कोकण सोडून मुंबईकडे धाव घेणार्‍या कोकणवासीयांच्या मनोवृत्तीचे आश्चर्यही वाटते.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

सुनील's picture

5 Feb 2009 - 9:14 am | सुनील

असे प्रदुषण विरहीत संमृद्ध कोकण सोडून मुंबईकडे धाव घेणार्‍या कोकणवासीयांच्या मनोवृत्तीचे आश्चर्यही वाटते.
हा पूर्णपणे वेगळा विषय आहे.

असो, गटण्या, माझं नावपण यादीत टाक बरं का!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गोमट्या's picture

5 Feb 2009 - 10:22 am | गोमट्या

हा पूर्णपणे वेगळा विषय आहे.
सहमत.

सखाराम_गटणे™'s picture

5 Feb 2009 - 10:26 am | सखाराम_गटणे™

>>असो, गटण्या, माझं नावपण यादीत टाक बरं का!
ड्न

लिखाळ's picture

4 Feb 2009 - 11:25 pm | लिखाळ

कोकणांत गेल्यावर घरगुती खाणावळीत मासे खाण्याचा आनंद वेगळाच. मी प्रथमच बांगडा खल्ला तो कणकवलीमध्ये. आवडला. त्यानंतर मित्रांच्या सल्ल्याने काही पदार्थ खाल्ले. बाजारातून सर्वांसाठी शिंपले/ल्या आणून त्याचा पदार्थ बनवून घेतला होता ते आठवले. बाकी माझा मत्स्याहारानुभव बेताचाच.. कोकणात गेलो असताना केलेली ही मजा आठवली..

-- लिखाळ.