कोणतीही भाषा त्यातील स्वर व व्यंजने ह्यापासुन तयार झालेल्या शब्दांमुळे वाक्यांपर्यंत पोहोचते. भाषेत जितके जास्त शब्द तितकी तिची समृद्धी जास्त. त्यातही हे शब्द जर एक स्वतंत्र व नेमका अर्थ प्रतित करणारे असतील तर त्या भाषेचे सामर्थ्य अधिकच जाणवते. माझ्या माहितीप्रमाणे "आप" ह्या शब्दाचा अर्थ पावसाच्या थेंबाच्या ढगांपासून पृथ्वी पर्यंत पोहोचण्याच्या मधल्या स्थितीसाठी वापरला जाऊ शकतो. त्यानंतर त्याचे "पाणी" होते. हे शब्द समृद्धीचे एक ऊदाहरण. "एसोटेरिक" हा इंग्लिश शब्द "एखाद्या विषयाचे खास ज्ञान व आवड असलेल्या काही व्यक्तींचा समुह" यासाठी वापरतात. अशा नेमक्या व परिणामकारक शब्दांमुळे भाषा अत्यंत समृद्ध बनते.
अशी समृद्धी टप्प्याटप्प्यानेच येते. भाषेच्या प्रगतीत इतर भाषांमधून घेण्यात येणाऱ्या शब्दांचाही खूप मोठा वाटा असतो. इंग्लिश मधे अनेक शब्द युरोपातील अनेक भाषांमधून जसेच्यातसे अथवा संस्कार करून घेतले आहेत. फ्रेंच भाषेने इंग्लिशला अनेक शब्द बहाल केले आहेत. लॅटीन व ग्रीक भाषेच्या इंग्लिशला दिलेल्या देणग्यांबद्दल तर आपण जाणतोच.
अनेकदा आपल्याला काही शब्द जगातील बहुतांश भाषेत जवळपास सारखेच असल्याचा प्रत्यय येतो. पथ-पाथ, माता-मदर, भातृ-ब्रदर, असे काही शब्द व एक ते दहा अंकांना जगातील अनेक भाषांमधे काय म्हणतात हे पाहिल्यास खूप सारखेपणा दिसून येतो. ह्या ठिकाणी सारखेपणा म्हणजे एखादा शब्द आपल्याकडे दंत्य किंवा ओष्ठ्य अक्षरापासून सुरुवात करत असेल तर जवळपास तो त्याच प्रकारच्या शब्दांपासून इतर भाषांमधेही सुरु होतो.
असे मानले जाते की मानवाचा प्रवास दक्षिण आफ्रिकेतून जगभर झाला. अशी कल्पना करा की, सुरुवातीला त्याची जी एक भाषा असेल, ती हळुहळू एकाएका समुहाबरोबर जगभर विखूरतांना त्यातील मुळ भाषेतील शब्द जवळपास तसेच राहून स्थानिक परिस्थितीनुसार जे जे नवीन शब्द तयार झाले त्यामुळे एक भाषा दुसरीपेक्षा वेगळी झाली असेल. जे शब्द त्यांच्या मुळ भाषेतून आले ते बहूतांश तसेच राहीले व त्यामुळे आपल्याला ते सारखेच वाटत असावेत.
पुढे ज्या भाषा अधिक विकसत गेल्या त्यात महत्वाची कामगिरी त्या त्या भाषेतील तज्ञांनी केली व त्या भाषेला व्याकरण, लिपी मिळाली. हे ज्या भाषांत झाले नाही अशा कित्येक भाषा आजही फक्त बोलल्या जातात पण त्यांना लिपी नाही. ऊदा. कर्नाटकात बोलली जाणारी तुळू भाषा.
हे सगळे काहीही असले तरी प्रत्येक भाषेचा गाभा एकच- शब्द!
शब्द ज्यांनी कोणी तयार केले त्यामागे त्यांचे जे काही हेतू असतील, त्यातील सर्वात महत्वाचा हेतू हा "संभाषण" करण्यास सहाय्य करतील असे शब्द करण्याचाच असेल. त्यामुळे मानवीसमुहाचे ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे ते नवज्ञान इतरांपर्यंत जाण्यासाठी नवीन शब्दांची निर्मिती आवश्यक झाली.
नवीन शब्द तयार करणे हे एक वैशिष्ठ्यपूर्ण ज्ञान आहे. एखाद्या शब्दाची व्युत्पत्ति कशी झाली हे पाहीले असता आपल्याला एक निश्चीत सुत्र मिळते. ते सुत्र आपल्याला त्या शब्दाच्या गाभ्यापर्यंत पोहोचवते. एकदा गाभा कळाला की, त्यापासून आणखी नवे शब्द तयार करता येतात. शब्दांच्या उत्पत्तिबाबत अभ्यास करणाऱ्या शाखेला शब्द व्युत्पत्तिशास्त्र ("इटिमॉलजी" तसेच ईतर काही शाखा, ऊदा- लेक्सीकॉलजी) म्हंटले जाते. हा विषय शब्दांबद्दल खूप आवड व जिज्ञासा निर्माण करतो. ह्या जिज्ञासेमुळेच मी मराठीशब्द.कॉम हे कोजळ (वेबसाईट) तयार केले आहे.
मी मराठी भाषातज्ञ नाही व माझा मराठीचा अभ्यास १० वीच्या मराठीच्या परीक्षेनंतर पूर्णपणे थांबला. नंतरच्या २५ वर्षात मी कधीही मराठीत लिहीले नाही, त्यामुळे माझे मराठी शुद्धलेखन, माझे अक्षर (की ज्याबद्दल मला अभिमान होता) ह्याचा पूर्णपणे ऱ्हास झाला. पण मला जे मराठीचे ज्ञान आहे त्यानुसार मी हा लेख शब्दनिर्मीती बद्दल एक जाणीव व्हावी ह्या दॄष्टीने लिहीण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मराठी भाषेत नवीन शब्द निर्मीती शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावी हा एकमेव हेतू ह्या लेखामागे आहे. मी भाषातज्ञ नसल्यामुळे ह्या लेखात काही चुका अनवधानाने झाल्या असतील तर माफी असावी व आपण त्या चुका मला कळवल्यात तर मी त्याचा आनंदाने स्वीकार करीन. हा लेख वाचतांना तो एका आधुनिक सामान्य मराठी भाषकाने त्याला मराठीबद्दल काय वाटते ते विचार व्यक्त करण्यासाठी लिहीला आहे असे समजून वाचला तर माझे विचार आपणांपर्यंत योग्यरीतीने पोहोचतील असे वाटते.
v ह्या लेखाचा सारांश असा आहे:
१. शब्द म्हणजे काय? ह्याची एक चर्चा शब्दाच्या व्याख्येपासून सुरुवात करून केली आहे.
२. त्या व्याख्येबद्दल सखोल चर्चा केली आहे.
३. एखादा शब्द मराठी आहे की नाही हे त्या व्याख्येनुसार कसे ठरवता येईल त्याबाबत चर्चा केली आहे.
४. मराठी भाषेसमोरची आव्हाने कोणती हे व्यक्त केले आहे.
५. लेखाच्या शेवटी, पुढे कसे जाता येईल ह्याबाबत विचार मांडलेले आहेत.
पुढेजाण्याआधी, ज्ञात-अज्ञात अशा सर्वजणांना मी नमन करतो की ज्यांनी, नवीन मराठी शब्द निर्मीती केली आहे, करत आहेत.
खाली मी ६ व्याख्या मुद्दाम दिल्या आहेत. त्या व्याख्या क्रमाक्रमाने प्रगत करत नेल्या आहेत.
१. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने उत्पन्न झालेल्या कोणत्याही रचनेला शब्द असे म्हणता येते.
२. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने उत्पन्न झालेल्या अर्थपूर्ण रचनेला शब्द असे म्हणता येते.
३. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने उत्पन्न झालेली अशी अर्थपूर्ण रचना की जी मराठी व्याकरणाच्या नियमांना बांधिल आहे.
४. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने उत्पन्न झालेली अशी अर्थपूर्ण रचना की ज्यायोगे मराठी व्यक्ती, कुटूंब, समुह अथवा समाज एकमेकाशी संभाषण करु शकतील.
५. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने व मराठी व्याकरणांच्या नियमांना अनुसरुन उत्पन्न झालेली अशी अर्थपूर्ण रचना की ज्यायोगे मराठी व्यक्ती, कुटूंब, समुह अथवा समाज एकमेकांशी संभाषण करु शकतील.
६. मराठी स्वर व व्यंजने ह्यांच्या संयोगाने व मराठी व्याकरणांच्या नियमांना अनुसरुन उत्पन्न झालेली अशी अर्थपूर्ण रचना की ज्यायोगे मराठी व्यक्ती, कुटूंब, समुह अथवा समाज एकमेकांशी सर्व-संभाषण करु शकतील.
मराठी शब्दाची व्याख्या करणे हे तितकेसे सोपे नसले तरी मला जे म्हणायचे आहे ते ६व्या व्याख्येने बऱ्यापैकी ग्रहण केले आहे असे वाटते. [माझ्या एका अमेरीकन मित्राला जर मी ही व्याख्या समजावून सांगितली तर तो म्हणेल, "ठिस देफ़िनितिओन विल्ल च्रच्क उन्देर इत्स वोन वेइघ्त.." :-)]
६व्या व्याख्येत ठळकपणे मांडलेल्या सुत्रांबद्दल थोडे बोलुया. ही व्याख्या "मराठी स्वर व व्यंजने", "मराठी व्याकरण", "अर्थपूर्ण रचना", "सर्व-संभाषण" अशा मुख्य चार सुत्रांना गुंफते. हे प्रत्येक सुत्र खाली विस्तृत केले आहे.
"मराठी स्वर व व्यंजने"
मराठीत खालील स्वर व व्यंजने आहेत:-
स्वर:
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ऍ, ए, ऐ, ऎ ऑ, ऒ, औ, ऍं, अं, अः
व्यंजने:
क, ख, ग, घ, ङ | च, छ, ज, झ, ग, ञ | ट, फ, ठ, ड, ढ, ण | त, थ, द, ध, न, ऩ | प, फ, ब, भ, म | य, र, ल, ळ, व, | श, ष, स, ह, ज्ञ
स्वर व व्यंजने ह्याच्या संयोगाने आपण व्यंजनांची विविध रूपे निर्मितो- अक्षरे व बाराखडी. ६व्या व्याख्येत हा संदर्भ घेतला आहे. मराठी शब्द ह्या स्वर व व्यंजनांच्या विविध रूपांपासून (अक्षरे व बाराखडी) तयार होतात. [आपण देवनागरी लिपीचा वापर करुन ते लिहीतो.] म्हणजेच मराठी शब्द असा की जो मराठी स्वर व व्यंजनांनी बनलेला आहे.
मराठी व्याकरण
मराठी शब्द असा की ज्याला मराठी व्याकरणाचे सर्व नियम लागू होतात.
नाम, सर्वनाम, कर्ता, कर्म, विशेषण, क्रियाविशेषण, अव्यय, क्रियापद अशा प्रमुख प्रकारात तो मोडतो.
त्याची भूत, भविष्य, वर्तमान व ह्या काळांच्या स्थितीनुसार निर्माण होणारी रुपे आहेत.
त्याची स्त्रीलिंग, पुलिंग, नपुसकलिंग अशी रूपे आहेत.
त्याची एकवचन व अनेकवचन अशीही रूपे आहेत.
त्याची होकारार्थी व नकारार्थी रुपे आहेत.
व्याकरणाचे वरील सामान्य नियम ज्या शब्दाला लागू होतात, तो मराठी शब्द.
अर्थपूर्ण रचना
अर्थपूर्ण रचना अशी की जी शब्दातील भाव व्यक्त करु शकते.
"रद्दड" म्हंटल्यावर तो शब्द नेमके भाव आपल्यापर्यंत पोहोचवतो. कारण तो शब्द "रद्दी" ह्या मुळ शब्दापासुन तयार झालाय व आपल्याला त्याशब्दाचा स्वत:चा असा एक अर्थ माहीत आहे. "आणि त्याचा चेहरा लालीलाल झाला"... मधे "लालीलाल" चा अर्थ आपल्यासमोर आपसुक पोहोचतो.
अर्थपूर्ण रचनेचे आणखी एक विशेषण असे सांगता येईल की असा शब्द की जो एका मुळ शब्दरचनेशी निगडीत असतो. ऊदा. फांदी, पान, फळ, फूल, खोड, पानगळ, वठणे, पारंब्या, मुळ, हे शब्द "झाड" ह्या मुळ शब्दरचनेशी निगडीत आहेत. आपल्याला "पानगळ" म्हंटले की आणखी वेगळे काही सांगावे लागत नाही.
खूरपणी, मशागत, लागवड, तोडणी, म्हंटले की आपण कशाबद्दल बोलतो आहे ते "कळते". ह्या "कळवण्याच्या" सामर्थ्याला अर्थपूर्ण रचना म्हणता येईल.
मराठी शब्द जे की त्यांच्यातुन आपल्याला कळते.
सर्व-संभाषण
बोलणे, लिहिणे, ऐकणे, वाचणे, शिकणे, शिकवणे, विचारणे, ई. क्रियांतून जे घडते ते सर्व-संभाषण.
गरजेनुसार एखाद्या मराठी भाषिकाने वरील कोणत्याही संभाषण साधनांचा वापर करतांना अपेक्षित विचार पोहोचवण्यासाठी जे शब्द वापरले ते मराठी शब्द.
एखाद्या मराठी भाषिकाने एखाद्या व्यक्तीशी, समुहाशी, समाजाशी परिणामकारक संवाद साधण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला ते मराठी शब्द.
हे सुत्र समजावून घेतांना, त्याचा आधीच्या तिन्ही सुत्रांशी असलेला संबंधसुद्धा लक्षात घेतला पाहिजे.
वरील चारही सुत्रे एकमेकांत विणली तरच ६व्या व्याख्येचा अपेक्षित अर्थ आपल्याला "मराठी शब्द" कशास म्हणता येईल ते सांगतो.
आता आपण ही व्याख्या चालवुन पाहू.
मी जर "ट्रबल" हा इंग्लिश शब्द आत्ता लिहिला आहे तसा देवनागरी लिपीत लिहिला की, तो वरील चार सुत्रांची कसोटी पार करतो का पाहू. माझ्यामते हा शब्द ४ पैकी ३ कसोट्या पार करतो पण मराठी व्याकरणाची कसोटी नाही.
१. ट्रबल हा शब्द देवनागरी लिपीत लिहिला, की तो आपली पहिली कसोटी पार करतो. कारण हा शब्द मराठी स्वर व व्यंजनांनी बनला आहे.
२. ट्रबल हा शब्द वाक्यात वापरला की त्याचा अर्थ कळू शकतो. ऊदा. "अरे, तो खूप ट्रबल मधे आहे, त्याने ज्या पतपेढीत आयुष्यभराची कमाई ठेवली होती, ती पतपेढी बुडाली". ज्यांना ट्रबल ह्या मुळ इंग्लिश शब्दाचा अर्थ माहिती नसेल त्यालाही थोडीफार त्या शब्दाची जाणीव होईलच. म्हणजेच हा शब्द "अर्थपूर्ण" आहे असेच म्हणता येईल. ही कसोटीही पार झाली.
३. असे समजू की वरील संवाद दोन व्यक्तीतला होता. ज्याने हे वाक्य व ट्रबल हा शब्द ऐकला त्याला सांगणाऱ्याने त्याले जे सांगायचे होते ते परिणामकारकतेने सांगितले. म्हणजेच "सर्व-संभाषणाची" ही कसोटीही पार झाली.
४. व्याकरणाची कसोटी का पार होत नाही ते पाहुया.
"अरे, त्याच्या समोर अडचणींचा डोंगर उभा आहे." ह्या वाक्यात "अडचण" ह्याचा समानार्थी "ट्रबल" हा शब्द टाकून पाहू. "अरे, त्याच्या समोर "ट्रबलींचा" डोंगर उभा आहे." असे आपण म्हणतो का? त्याऐवजी, आपण "अरे, त्याच्या समोर खूप ट्रबल्स आहेत." असे म्हणतो. मुळ ट्रबलचे अनेकवचन करतांना आपण त्या शब्दाचे इंग्लिश अनेकवचन घेतो. म्हणजेच ही कसोटी नापार.
व्याकरणाची कसोटी पार न झाल्यामुळे मी असे म्हणू शकतो की, ट्रबल हा शब्द मराठी शब्द नाही.
आपण असेही म्हणू शकतो की, "ट्रबल" ह्या शब्दावर मराठी संस्करण न झाल्यामुळे सध्यातरी तो मराठी शब्द नाही.
हे असे म्हणायचे कारण म्हणजे, मराठी भाषेत इतर अनेक भाषांतुन अनेक शब्द आले आहेत. पर्शियन भाषेतील अनेक शब्द मोगल काळात मराठीत आले व आज मराठी भाषेत त्या शब्दांची अनेक रूपे पहावयास मिळतात. मोगलांच्या काळात मराठीवर जे परिणाम झाले, तेच आज इंग्लिश मुळे होतायेत. जो पर्यंत त्या इंग्लिश शब्दांची मराठी रूपे आपण वापरत नाही, ऊदा. डॉक्टर-डॉक्टरांचे-डॉक्टरांनी, सायकल-सायकली-सायकलींचे-सायकलींचा, तोपर्यंत आपण अशुद्ध मराठीच बोलतो आहोत असे म्हणता येईल.
मुद्दा हा की, जर एखादा परकीय शब्द आपल्याला मराठीत वापरायचा असेल तर त्याशब्दाचे मराठीकरण वरील चार सुत्रांचा वापर करून केला तर ते योग्य दिशेने टाकलेले पाऊल ठरेल.
:
मराठीला जी आव्हाने आहेत, तीच आज भारतातील किंवा इंग्लिशेतर अनेक भाषांसमोर असतील. (माझी खात्री आहे की ह्या यादीत चायनीज भाषा नसेल). ही आव्हाने म्हणजेच खालील काही मानसिक, तांत्रिक प्रश्न.
१. हा प्रश्न एखाद्या भाषेने दुसऱ्या भाषेवर केलेल्या सांस्कृतिक आक्रमणाचा नसुन, हा प्रश्न ज्या भाषेवर आक्रमण होत आहे त्याभाषिकांनी होणारे बदल तंत्रशुद्धतेने न घडवून आणल्याने भाषेचे जे एक अशुद्ध रूप निर्माण झाले आहे, त्याचा आहे. हा प्रश्न ह्याबाबतची जागरुकता नसल्याचा आहे.
२. हा प्रश्न आपण इंग्लिश शिकतांना जी काळजी घेतो तीच काळजी मराठी नीट सर्व-संभाषणासाठी न घेण्याचा आहे.
३. हा प्रश्न एखाद्या प्रसिद्ध अमराठी व्यक्तीने मराठीत एखाद-दुसरे वाक्य बोलले तरी टाळ्या-शिट्या वाजवून दाखवलेल्या मानसिक दुर्बलतेचा आहे.
४. हा प्रश्न ऊदा. एखाद्या खाणेरीत (उपहारगृहात, रेस्तराँत) गेल्यावर मराठी अभिमानाने न बोलता तोडक्यामोडक्या अशुद्ध इंग्लिश मधे बोलून मराठीपण झाकण्याचा आहे.
५. हा प्रश्न आम्ही बोलतो तीच शुद्ध मराठी व ग्रामीण मराठीला "ग्रामीण" ह्या एकाच वेष्टणात गुंडाळून सर्वात प्रथम त्या मराठी भाषाप्रवाहांशी संकर न करण्याचा आहे. कोकणी, कोल्हापुरी, सोलापुरी, मराठवाडी, विदर्भी, सातारी, खांदेशी, ई. भाषाप्रवाहातील (डायलेक्ट) अनेक सुंदर मराठी शब्दांना दूर ठेवण्याचा आहे.
६. ह्यानंतर हा प्रश्न शब्दांच्या मदतीसाठी इतर भारतिय भाषांशी संकर न करता फक्त इंग्लिशशी करण्याच्या मानसिकतेचा आहे.
एक छोटीशी घटना सांगून मी हा मुद्दा संपवतो. १९९४ ला मी पॅरीसला गेलो असतांना मला पॅरीस विमानतळाला जाण्यास ३ जणांचे रेल्वे तिकीट (मराठी संस्करण झालेला हा एक इंग्लिश शब्द) काढण्यासाठी गेलो. तिकीट देणाऱ्या महिलेला इंग्लिशमधे मी विमानतळाचे तिकीट मागितले. जाणीवपूर्वक मी माझ्या वाक्यात "चार्ल्स-द-गॉल" असा शब्द टाकला होता व बोलतांना बोटांनी मुद्दाम ३ बोटे दाखवत होतो. ती महिला ढीम्म. पुन्हा पुन्हा सांगूनही ती काहीच हालचाल करेना, तेंव्हा माझ्या मागच्या फ्रेंच महिलेच्या काय जे लक्षात यायचे होते ते आले. ती पुढे आली व मला कुठे जायचे आहे ते विचारून, फ्रेंचमधे त्या तिकीटवालीला सांगून मला तिकीट काढून दिले. ह्याप्रसंगाआधी गेल्या दोन दिवसात असे अनेक प्रसंग माझ्यावर आले होते व रस्ता विचारतांना, खरेदी करतांना, सगळीकडे इंग्लिश बोलले की प्रतिसाद अमित्र असायचा. पण एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याकडून, जिथे पर्यटन हा एक मुख्य व्यवसाय आहे, अशी वागणूक अपेक्षित नव्हती. तरीसुद्धा जे काही झाले, त्यामागे त्यांची त्यांच्या भाषेबद्दलची आग्रहाची भूमिका चांगलीच लक्षात राहिली. नुकत्याच झालेल्या बिजींग ऑलिंपीकमधे त्यांच्या अध्यक्षांनी चायनीजमधे केलेले भाषण आपण सर्वांनी ऐकले-पाहिले.
पुढे काय हे जाणण्याआधी, एक चर्चा करूया. महाराष्ट्राची जी काही लोकसंख्या आज आहे, त्यात "मराठी" भाषक किती असतील? ह्याचर्चेपुरते असे मानू की ते, लोकसंख्येच्या ६०% आहेत. ह्या ६०% पैकी, कितीजण त्यांच्या रोजच्या जगण्यासाठी अशी मराठी बोलतात की जी इंग्लिश शब्द न वापरता बोलूच शकत नाहियेत? ५%? १०%? ही संख्या कदाचित १०% च्या आसपास असेल. इतर लोक आजही त्यांची मराठी बोलून त्यांचे रोजचे व्यवहार पुरे करतायत. पण, त्यांच्यावरही बरेच आक्रमण होते आहे आणि जसजसे नवीन तंत्रज्ञान हे त्या उरलेल्या लोकांपर्यंत पोहोचेल, तसतसे त्यांची भाषा बदलायला सुरूवात होइल. ऊदा, "मोबाईल फोन" च्या वापराबरोबर येणारे "रीचार्ज", "एस.एम.एस", "डायल ट्यून" "प्लॅन" असे शब्द त्यांना वापरण्यावाचून चालणार नाही. तरीसुद्धा, बोली मराठी खऱ्याअर्थी जिवंत असेल तर ती खेड्यांमधेच- जिथे जागतीकीकरणांची झळ अजुन कमीच पोहोचली आहे. (खतांच्या आणि किटकनाशकांच्या मजेशीर नावांमुळे ते वारे पोहोचल्याचे जाणवत होते पण आता वेग वाढणार..)
मुद्दा १- नवीन शब्द निर्माण करतांना, तो शब्द कितीजण वापरणार आहेत त्याप्रमाणे त्यावरून त्याचे महत्व ठरवता येईल.
दुसरा मुद्दा आहे तो मुळ मराठीतील शब्दांचा योग्य जागी नेमका वापर करण्याचा. जर एखाद्या स्थितीसाठी शब्दच नसेल तर तो निर्माण करण्याचा. ऊदा. (कदाचित माझेच मराठीचे ज्ञान कमी असेल म्हणूनही मला असे शब्द आहेत की नाही माहित नाही. पण एक ऊदाहरण म्हणुन ह्याकडे पाहावे.)
मला जर "आवड" ह्या शब्दाचा वेगवेगळ्या स्थितीसाठी वापर करायचा असेल तो शब्द तोकडा पडतो.
"त्याला गणिताची आवड जरा कमीच आहे"
"त्याला गणित आवडते"
"त्याला गणित बरेच आवडते"
"त्याला गणित खूप आवडते"
"गणित म्हणजे त्याचा अत्यंत आवडीचा विषय."
वरील वाक्यामधे आवड ह्या शब्दाची चपखल बसतील अशी रुपे हवी आहेत की जी एखाद्याच्या आवडीच्या पातळीचा नेमका अर्थ पोहोचवतील.
हे असे असणे केवळ भाषेच्या सौंदर्यासाठीच आवश्यक नसुन काही व्यवहारीक कारणांसाठीही आवश्यक आहे. ऊदा, एखाद्या वृत्तपत्रात सरासरी ५०००० शब्द रोज छापावे लागतात. त्याऐवजी जर नेमके शब्द वापरल्यामुळे १०% जागेची बचत होत असेल तर त्याचे अनेक फायदे होऊ शकतील. जागेच्या बचतीबरोबरच मनुष्यतासांची बचतही महत्वाची असेल- लिहिणाऱ्याच्या व वाचणाऱ्याच्या.
मुद्दा २: जुन्या काही शब्दांची पुनर्बांधणी हा भाषेच्या विकासासाठी आवश्यक घटक आहे.
मध्यंतरी दै. सकाळमधे एका महोदयांनी, शाळांमधे मराठी शिकवतांना ती "साहित्याच्या" मदतीने शिकवण्याच्या एकांगी शिक्षणपद्धतीबद्दल खूप मार्मिक विचार मांडले होते. ह्यामुळे "भाषेचा" अभ्यास मागे पडून भाषेचा वापर फक्त समोर येतो पण पाया कच्चाच राहतो असे योग्य विचार मांडले होते.
एम. ए मराठीचा (एम. ए. ला मराठी शब्द का वापरत नाहीत?) अभ्यासक्रम तपासला असता त्यामधे "शब्द व्युत्पत्ति शास्त्राचा" उल्लेख दिसला नाही.
मुद्दा ३: शब्द निर्मीती हा एक आवश्यक विषय मानून त्याचा शाळांमधूनच अभ्यास सुरू झाला पाहिजे.
खरे म्हणजे ह्याविषयावर अजुन बरेच लिहिता येईल. वरील लेख ह्याविषयावरची सुरुवात आहे असे मानून येथेच थांबतो.
प्रतिक्रिया
29 Jan 2009 - 7:57 pm | शंकरराव
व्वा सदस्य कालावधी १३ मि.
अन एव्हडा मोठा लेख..... हुश्श...
वाचतो आहे सावकाश...
29 Jan 2009 - 7:57 pm | सखाराम_गटणे™
विश्यय चांगला आहे. खुप माहीती मिळाली.
असेच लेख लिहीत रहा.
रेफेरेन्स म्हणुन वापरता येयील असा लेख आहे.
30 Jan 2009 - 2:15 am | मराठी शब्द
शंकरराव व सखाराम_गटणे™,
लेख पुर्वीच लिहिला होता आणि मराठीशब्द.कॉमवर, मनोगत, उपक्रमवर प्रसिद्ध केला होता. पण मिसळपावच्या सदस्यांसाठी काल येथे दिला.
धन्यवाद,
मराठी शब्द
29 Jan 2009 - 8:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराठी शब्द यांचा हाच लेख उपक्रमवर वाचल्यासारखा वाटतो !
-दिलीप बिरुटे
(मराठी संकेतस्थळावरील वाचक)
30 Jan 2009 - 2:22 am | मराठी शब्द
डॉ. दिलीप,
उपक्रमवर लेख दिल्यानंतर असे जाणवले की, मिसळपावच्या सदस्यांसाठी येथे तोच लेख पुन्हा देणे गरजेचे आहे. काही वाचक नवीन आहेत हे आलेल्या प्रतिक्रियांवरुन दिसत आहेच, त्यांच्यापर्यंत पोहोचता आले, ह्याचे समाधान आहे.
उपक्रमवरील लेखाचा दुवा येथे दिल्याबद्दल धन्यवाद.
29 Jan 2009 - 8:43 pm | नितिन थत्ते
सगळा लेख वाचून प्रतिसाद द्यायला वेळ लागेल. सध्या
१. तुमचे मराठी शिक्षण १०वी नंतर थांबले असे वाटत नाही
२. इंग्रजी शब्द तसेच (भाषांतर न करता) वापरायला तुमची हरकत दिसत नाही. सहमत.
भाषेतील बदल हे हार्डवेअरच्या सोयीसाठी करू नयेत असे माझे मत आहे. हार्डवेअरची सोय ही सतत बदलत असते. पूर्वी सावरकरांनी अशाच हेतूने ए हे अक्षर अ वर मात्रा देऊन लिहिण्याचा उपाय काढला होता पण आता संगणक युगात तशी गरजच उरली नाही.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
29 Jan 2009 - 8:45 pm | सुचेल तसं
हुश्श!!!
दमलो बुवा लेख वाचता वाचता...
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
29 Jan 2009 - 11:28 pm | पुष्कर
असं असतं होय!!
30 Jan 2009 - 6:30 pm | विसोबा खेचर
लेख वाचता वाचताच गरगरू लागलं! :)
मराठी शब्द, आपलं खरंच कौतुक वाटतं! चालू ठेवा..!
बाकी सगळं ठीक आहे परंतु कृपया शुद्धलेखन ह्या विषयावर काही लिहू नका एचढीच विनंती. त्या विषयाला मिपावर बंदी आहे!
तात्या.
30 Jan 2009 - 6:58 pm | मराठी शब्द
शुद्धलेखन हा माझा विषय नाही, त्यामुळे त्याबद्दल निश्चिंत असावे. :-)