१९४५ मध्ये लाहोरच्या एका सुसंस्कृत कुटुंबात एका मुलाचा जन्म होतो . वडील डॉक्टर, प्रेमळ आई ,—घरात एक आनंदी वातावरण होतं. पण १९४७ च्या फाळणीनंतर सगळंच बदललं. चहुकडे रक्ताची होळी खेळली जात होती. अशाच एका रात्री, आपल्या वडिलांची भरभराटीची प्रॅक्टिस, ते वैभव आणि लाहोरची ती माया सोडून ते कुटुंब रक्ताळलेल्या वाटेवरून भारताकडे निघालं, खरं तर निघालं नव्हतं तर निघावं लागल होत.
फाळणीच्या काळात एका 'निर्वासितांच्या' ट्रेनमध्ये तो मुलगा , त्यांची बहीण आणि आई प्रवास करत होते. ती ट्रेन म्हणजे केवळ लोखंडाचा डबा नव्हती, तर ते मृत्यूचं साक्षात रूप होतं. वाटेत दंगलखोरांनी ट्रेन रोखली. सपासप माणसं कापली जात होती आणि माणसांच्या किंकाळ्यांनी आकाश फाटत होतं.त्या क्षणी त्या मुलाच्या आईने, शील कांता यांनी, जे केलं ते कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा महान होतं. आपल्या लहानग्या मुलाला आणि त्याच्या बहिणीला वाचवण्यासाठी त्यांनी एक भयानक पण धाडसी निर्णय घेतला .आजूबाजूला माणसं कापली जात असताना, शील कांता यांनी आपल्या दोन्ही मुलांना स्वतःच्या शरीराखाली दाबून धरलं आणि त्या रक्ताळलेल्या जमिनीवर शांत पडून राहिल्या, जणू काही त्या मृत आहेत. दंगलखोर आले, त्यांनी प्रेतांच्या ढिगाऱ्यात तपासलं, पण या मातेच्या श्वास रोखून धरलेल्या धैर्याने काळाला सुद्धा चकवा दिला .काही तास ते लहानगे जीव त्या अंधारात, आपल्या आईच्या शरीराखाली गुदमरलेल्या अवस्थेत मृत्यूची टांगती तलवार अनुभवत होते. अखेर, ती वेळ टळली आणि 'जिवंत प्रेतांच्या' त्या ढिगाऱ्यातून ते कुटुंब भारताच्या सीमेत दाखल झालं.
भारतात आल्यावर त्यांचं आयुष्य शून्यातून सुरू झालं. शिमला आणि नंतर दिल्लीच्या गल्ल्यांमध्ये तो मुलगा लहानाचा मोठा झाला . वडिलांनी पुन्हा प्रॅक्टिस सुरू केली, पण त्या कोवळ्या मुलाच्च्य मनात त्या रेल्वे प्रवासाच्या आठवणी कायमच्या कोरल्या गेल्या होत्या.पुढे त्या मुलाचा शिक्षणाचा प्रवास फारच शिस्तबद्ध पण अनपेक्षित वळणांनी भरलेला होता. त्या मुलाचं शालेय शिक्षण दिल्लीतील प्रसिद्ध 'मॉडर्न स्कूल' मधून झालं.हि शाळा म्हणजे त्या काळातील दिल्लीतील उच्चभ्रू आणि बुद्धिजीवी कुटुंबांची पहिली पसंती होती.इथेच त्याच्या अष्टपैलू गुणांना वाव मिळाला. तो अभ्यासात हुशार होतेच, पण त्यासोबतच त्याला कला आणि क्रीडा क्षेत्रातही रस होता.शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातील प्रसिद्ध 'सेंट स्टीफन्स कॉलेज' (St. Stephen's College, Delhi) मध्ये प्रवेश घेतला. येथून त्यांनी अर्थशास्त्र (Economics) विषयात आपली पदवी पूर्ण केली. या कॉलेजच्या वातावरणाने त्यांच्या विचारांना एक जागतिक प्रगल्भता दिली.
पदवी पूर्ण केल्यावर, त्या कालानुरूप बापाच्या अपेक्षांचं ओझं घेऊन आणि मनातल्या महत्वकांक्षा विसरून त्या मुलाने CA होण्याचा निर्णय घेतला. पण हे शिक्षण त्याने भारतात नाही, तर लंडन (London) मध्ये जाऊन पूर्ण केलं.वयाच्या २२ व्या वर्षी लंडनमध्ये CA ची पदवी मिळवली.
पुढे लंडनमध्ये अनेक वर्षं एक यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम केलं. तिथल्या कॉर्पोरेट जगात तो खूप यशस्वी होता आणि त्यांचा पगारही जास्त होता.
सत्तरचं दशक होतं. लंडनच्या थंड हवेत, सुटाबुटात एक तरुण चार्टर्ड अकाउंटंट फाईल्समध्ये डोकं खुपसून बसला होता. आयुष्य सेट होतं, पगार मोठा होता, पण काळजाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक आग धगधगत होती. त्याला आकड्यांच्या जगात नाही, तर माणसांच्या भावनांच्या जगात रमायचं होतं,त्याने ती फाईल बंद केली आणि स्वतःलाच विचारलं, "मी हेच करण्यासाठी जन्माला आलोय का?" मनातून उत्तर आल ते 'नाही' अस होतं. तो तरुण तसाच नोकरी सोडून ,लंडन सोडून भारतात परतला. हातात काहीच नव्हतं, पण डोळ्यात एक स्वप्न होतं . 'CA' ची पदवी बाजूला सारून त्या तरुणाने भारतात परतण्याचा आणि वेगळा पर्याय चाचपण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आणि पुढे इतिहास घडवला .
ही कथा आहे एका अशा माणसाची, ज्याच्या डोळ्यांनी फक्त स्वप्नंच पाहिली नाहीत, तर त्या स्वप्नांना जागतिक रूप दिलं. हा प्रवास आहे CA ते ऑस्करपर्यंत पोहोचलेल्या एका किमयागाराची — शेखर कपूर.
भारतात आल्यावर त्यांना पहिला आधार मिळाला तो त्यांचे मामा, सदाबहार अभिनेते देव आनंद यांच्याकडून. देव आनंद यांनी त्यांना 'इश्क इश्क इश्क' (१९७४) या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. सुरुवातीला त्यांनी कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कळलं की, त्यांचा खरा आत्मा कॅमेऱ्याच्या मागे दडला आहे.सुरुवातीची काही वर्षं त्यांनी मॉडेलिंग केलं, जाहिराती केल्या आणि काही चित्रपटांत छोट्या भूमिका केल्या. पण त्यांना मोठी संधी मिळत नव्हती.त्यांना खुणावत होती ती कॅमेऱ्यामागे असलेली दिग्दर्शकाची खुर्ची.
अखेर १९८२-८३ मध्ये त्यांना दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाचं बजेट कमी होतं, पण शेखर यांनी त्यात आपलं सर्वस्व पणाला लावलं. त्यांनी लंडनमध्ये शिकलेलं 'मॅनेजमेंट' आणि भारतात उपजत असलेली 'संवेदनशीलता' यांचा मेळ घातला आणि भारतीय चित्रपटसृष्टीतला एक मास्टरपीस तयार झाला- 'मासूम'
नात्यांची गुंतागुंत, एका निष्पाप मुलाचा संघर्ष आणि 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' सारखं गाणं... काळाच्या पुढचा सिनेमा होता , त्या वेळच्या पठडीतल्या चित्रपटांपेक्षा वेगळा . या चित्रपटाने भारतीय सिनेमाची व्याख्या बदलली. शेखर कपूर नावाचा एक नवा 'व्हिजनरी' जन्माला आला होता.'मासूम' हा केवळ चित्रपट नव्हता, तर ते एका दिग्दर्शकाच्या काळजातून उमटलेलं गाणं होतं. पण 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' हे गाणं म्हणजे या चित्रपटाचा आत्मा आहे. हे गाणं पडद्यावर जितकं हळुवार दिसतं, त्यामागे शेखर कपूर यांची एक खूप मोठी भावनिक गुंतवणूक होती.
गुलझार यांनी जेव्हा हे शब्द लिहिले— "जीने के लिए, सोचा ही नहीं, दर्द सँभालने होंगे..."—तेव्हा ते शब्द शेखर कपूर यांच्या स्वतःच्या आयुष्याशी कुठेतरी जोडले गेले होते. फाळणीचा चटका सोसलेला आणि लंडनमध्ये एकटेपण अनुभवलेला तो तरुण 'सीए', आता या ओळींमध्ये स्वतःला शोधत होता.शेखर कपूर यांना या गाण्यासाठी कोणताही 'सेट' नको होता. त्यांना हवा होता नैसर्गिक प्रकाश आणि चेहऱ्यावरील खरे भाव.गाण्याच्या चित्रीकरणावेळी नसीरुद्दीन शाह (जे चित्रपटात 'डीके'ची भूमिका साकारत होते) थोडे साशंक होते. एका वडिलांचा अपराधीपणा आणि मुलाप्रती असलेली माया एकाच वेळी कशी दाखवायची?
तेव्हा शेखर कपूर यांनी त्यांना सांगितलं : "नासीर , तू अभिनय करू नकोस. फक्त त्या लहान मुलाच्या (जुगल हंसराज) डोळ्यात बघ. त्या मुलाला माहीत नाही की त्याचे वडील कोण आहेत, पण तुला माहीत आहे की तू त्याचा बाप आहेस. हा जो 'गुन्हा' आणि 'प्रेम' यांचा खेळ आहे, तो फक्त तुझ्या डोळ्यांतून दिसू दे."
या गाण्याचं चित्रीकरण सुरू असताना सेटवर कमालीची शांतता होती. शेखर कपूर मॉनिटरवर पाहत होते. जेव्हा आर डी बर्मन यांचा तो सुमधुर संगीत आणि अनुप गोषाल (Anup Ghoshal) यांचा आवाज घुमला, तेव्हा सेटवरील अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं.लहानगा जुगल हंसराज जेव्हा नसीरुद्दीन शाह यांच्या खांद्यावर डोकं ठेवतो, तो शॉट घेताना शेखर कपूर इतके भावूक झाले होते की त्यांनी 'कट' म्हणायला उशीर केला. त्यांना तो क्षण संपूच द्यायचा नव्हता.
शेखर कपूर यांनी या गाण्यात घराच्या खिडक्या, पडदे आणि दारातून येणारा प्रकाश यांचा वापर केला. त्यांना हे दाखवायचं होतं की, घर तेच असतं, माणसं तीच असतात, पण एका सत्यामुळे नात्यांमधील प्रकाश कसा बदलतो.या चित्रपटाने शेखर कपूर यांना बॉलिवूडच्या 'मसाला' चित्रपटांपासून वेगळं केलं.शेखर कपूर एका मुलाखतीत म्हणतात, "मासूम बनवताना मी दिग्दर्शक नव्हतो, तर मी त्या कुटुंबाचा एक भाग होतो."
शेखर कपूर यांनी ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यातील संघर्षाला कलेचं रूप दिलं, तसंच त्यांच्या 'मिस्टर इंडिया' मधील 'मोगॅम्बो' या पात्रामागेही एक वेगळीच विचारप्रक्रिया होती.मोगॅम्बो... हा शब्द उच्चारला तरी आजही लोकांच्या अंगावर काटा येतो. पण तुम्हाला माहीत आहे का, की शेखर कपूर यांच्या डोक्यात हा खलनायक केवळ एक कॉमिक बुक व्हिलन नव्हता. फाळणीचं दुःख आणि जागतिक राजकारणाचा अभ्यास असलेल्या शेखर यांनी 'मोगॅम्बो'ला एका 'आधुनिक हुकूमशहाचं' रूप दिलं होतं.जेव्हा शेखर कपूर 'मिस्टर इंडिया'ची पटकथा लिहित होते, तेव्हा त्यांना असा खलनायक हवा होता जो केवळ गुंड नसेल, तर ज्याला 'सत्तेची नशा' असेल. मोगॅम्बोच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांनी छुप्या पद्धतीने अडॉल्फ हिटलरची छाप सोडली होती.तो भव्य सेट, मोगॅम्बोचं ते अवाढव्य साम्राज्य, रिमोट कंट्रोलने चालणारे दरवाजे आणि उंचावर बसून खाली बघण्याची त्याची पद्धत—हे सर्व एका हुकूमशहाच्या मानसिकतेचं प्रतीक होतं.
मोगॅम्बोचे कपडे पाहिले तर ते लष्करी गणवेशासारखे वाटतात. त्याला साधी माणसं आवडत नसत, त्याला केवळ आज्ञाधारक गुलाम हवे होते.सुरुवातीला या भूमिकेसाठी इतर काही नावांचा विचार झाला होता, पण जेव्हा शेखर यांनी अमरीश पुरी यांना पाहिलं, तेव्हा त्यांना त्यांचा 'मोगॅम्बो' मिळाला. शेखर यांनी अमरीशजींना फक्त एकच ब्रीफ दिला होता: "असं समजा की तुम्ही जगातील सर्वात मोठे शेक्सपिअरन अभिनेते आहात आणि तुम्ही हे पात्र रंगवत आहात."
अमरीश पुरी यांनी त्या भूमिकेत असा जीव ओतला की, त्यांच्या एका कटाक्षाने लोक थरथरायला लागले.
"मोगॅम्बो खुश हुआ!" – एक अघोरी आनंद,हे वाक्य आज विनोदाने वापरलं जातं, पण शेखर कपूर यांच्या दृष्टीने हे अतिशय 'डार्क' वाक्य होतं.विनाशातला आनंद,मोगॅम्बो तेव्हाच खुश व्हायचा जेव्हा काहीतरी उद्ध्वस्त व्हायचं किंवा कोणीतरी मरत असायचं.त्याच्या साम्राज्यात असलेला तो 'ऍसिडचा तलाव' हे शेखर कपूर यांच्या कल्पनाशक्तीचं टोक होतं. फाळणीच्या वेळी त्यांनी पाहिलेली क्रूरता आणि माणसाचा अमानवी स्वभाव त्यांनी या पात्राद्वारे एका काल्पनिक, पण भीतीदायक रूपात मांडला.'मिस्टर इंडिया' हा मुलांचा चित्रपट वाटत असला, तरी शेखर कपूर यांनी यात एक खोल संदेश दिला होता. एकीकडे निरागस मुलं आणि दुसरीकडे जगाचा विनाश करू पाहणारा मोगॅम्बो. हा लढा 'निरागसता विरुद्ध क्रूरता' असा होता.
शेखर कपूर यांनी एका बाजूला 'मोगॅम्बो'सारखा हिंसक खलनायक दिला, तर दुसरीकडे 'मासूम' मध्ये मानवी नात्यांचा अत्यंत हळुवार कोपरा उलगडला.एका आईने मृत्यूचा अभिनय केला, म्हणून आज जगाला एक महान दिग्दर्शक मिळाला.
'बँडिट क्वीन' -जेव्हा शेखर कपूर फूलन देवीची कथा पडद्यावर मांडत होते, तेव्हा ते केवळ एक 'चरित्र' रंगवत नव्हते, तर ते स्वतःच्या अस्वस्थ आठवणींना वाट करून देत होते. हे दोन्ही अनुभव एकमेकांशी कसे जोडले गेले आहेत, ते खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होतं. फाळणीच्या वेळी ट्रेनमध्ये आईच्या खाली दबलेले असताना, लहानग्या शेखरने अनुभवलेली ती 'अगतिकता' त्यांनी फूलन देवीच्या पात्रात ओतली. फूलनवर जेव्हा अन्याय होतो, तेव्हा कॅमेरा तिच्या चेहऱ्यावरील ती असहायता टिपतो जी शेखरने १९४७ च्या त्या रात्री अनुभवली होती.ज्याप्रमाणे फाळणीच्या वेळी एका रात्रीत माणसं 'निर्वासित' झाली आणि व्यवस्थेने त्यांना वाऱ्यावर सोडलं, तसंच काहीसं फूलन देवीसोबत घडलं होतं. समाजाच्या आणि कायद्याच्या अन्यायाविरुद्धचा जो 'आक्रोश' या चित्रपटात दिसतो, तो प्रत्यक्षात शेखर कपूर यांचा फाळणीच्या क्रूरतेविरुद्ध असलेला मूक संताप आहे.'बँडिट क्वीन'मधील हिंसाचार प्रेक्षकांना अस्वस्थ करतो. शेखर कपूर म्हणतात की, "मी हिंसाचार पाहिला आहे, त्यामुळे मी तो पडद्यावर खोटा दाखवू शकत नाही." फाळणीच्या रेल्वेमध्ये प्रेतांच्या ढिगाऱ्यात राहिल्यामुळे त्यांना मृत्यूचं जे भान आलं, तेच त्यांनी बेहमई हत्याकांडाच्या सीनमध्ये अत्यंत ताकदीने मांडलं.
शेखर कपूर म्हणतात:"दिग्दर्शन म्हणजे कॅमेरा कोठे ठेवायचा हे ठरवणं नव्हे, तर तुमच्या आतल्या जखमांना पडद्यावर प्रामाणिकपणे मांडणं होय."
शेखर कपूर यांचा हा प्रवास लाहोरच्या फाळणीपासून सुरू होऊन लंडनच्या रेड कार्पेटपर्यंत पोहोचला आणि एक वर्तुळ पूर्ण झालं.१९९८ मध्ये शेखर कपूर दिग्दर्शित एलिझाबेथ ची घोडदौड ऑस्कर नॉमिनेशन पर्यंत पोचली पण त्या वेळेस इतर नॉमिनेशन्स सुद्धा तितकेच तगडे चित्रपट होते - सेविंग प्रायव्हेट रायन ,लाईफ इज ब्युटीफुल ,शेक्सपिअर इन लव्ह. लंडन मध्ये एक करिअर संपवून लंडन येथेच दुसऱ्या करिअर मध्ये अत्युच्य शिखर गाठणारा हा अवलिया म्हणजे एक वेगळच रसायन होतं .
शेखर कपूर यांच्या बद्दलची ही रंजक सफर तुम्हाला आवडली असेल अशी आशा करतो .
प्रतिक्रिया
2 Jan 2026 - 9:15 pm | गामा पैलवान
दुसरा चांदोबा,
शेखर कपूर यांच्यावरील परिचयपर लेख उत्कट जमून आलाय. त्यांचं नाव पाहिलं की कलाकृती अस्सल असणार हेच जाणवतं.
शेखर कपूरांनी जेव्हा मासूम दिग्दर्शित केला तेव्हा ते त्याचा एक भागंच बनून गेले होते. हे तथ्य फार समर्पक आहे. खरंतर हे त्यांच्या सगळ्यांच चित्रपटांत दिसून येत असावं. 'एलिझाबेथ' पाहिल्यावर चित्रपटाने पकड घेतली होती. संपल्यावर श्रेयावली पाहिली तर दिग्दर्शक म्हणून त्यांचं नाव चकित करून गेलं. मी चित्रपटांच्या बाबतीत फार बथ्थड आहे. एखादं इंग्लिश नाव अभिप्रेत होतं. भारतीय दिग्दर्शकाने मध्ययुगीन इंग्लिश वातावरण उभं करणं विस्मयकारक होतं. तेव्हापासून हे नाव डोक्यांत घट्ट बसलं आहे.
'एलिझाबेथ' पाहिला तेव्हा त्या वातावरणांत अतिशय रमून जायला झालं होतं. त्यामागील कार्यकारणभाव हा लेख वाचून उलगडला. शेखर कपूर केवळ स्वत:च नाही तर प्रेक्षकांनाही त्या चित्रपटाचा भाग बनवतात. त्यामुळे प्रेक्षक चित्रपट घेऊन घरी परततो.
आ.न.,
-गा.पै.
3 Jan 2026 - 9:53 pm | विजुभाऊ
छान लिहीलंय हो