‘कालान्तर’ : समाजातल्या व्यापक पडझडीचे वास्तवदर्शन

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
22 Sep 2025 - 8:07 am

ok

गेल्या 50-60 वर्षांत आपल्या समाजात झालेल्या पडझडीचे चित्रण करणारा 43 लेखांचा हा संग्रह. हे लेख मुळात लोकमत दैनिकाच्या मंथन पुरवणीसाठी लिहिलेले होते. स्वातंत्र्याच्या कालखंडात आपण काय कमावले आणि काय गमावले यांचा हा ताळेबंद. त्यातून लक्षात येते की, कमावण्याच्या बाजूला थोडेच असून गमावण्याच्या बाजूला मात्र भरपूर आढळले आहे. काही स्वागतार्ह बदलांपेक्षा पडझड मात्र कितीतरी अधिक व चिंताजनक आहे. याचे चित्रण करताना शिक्षण, व्यवसाय, समाजकारण, राजकारण, व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवन अशा विविध प्रांतांचा कानोसा घेतला आहे.

सुरुवातीच्या तब्बल 13 लेखांतून शिक्षण पद्धतीत झालेले बदल टिपले आहेत. त्यात पाठांतर, शुद्धलेखन, उच्चार आणि हस्ताक्षरापासून ते संस्कार, गुरु-शिष्य नाते आणि विद्यापीठातील शिक्षणापर्यंतचे मुद्दे हाताळले आहेत. एकेकाळी शिक्षक हे मुलांचे शाळेतील पालकच असत आणि त्यांना मुलांच्या वर्तणुकीनुसार त्यांना शिक्षा करण्याचा पूर्ण अधिकार होता. या गोष्टीला पालकांचा देखील पाठिंबा होता. परंतु आता या परिस्थितीत आमूलाग्र बदलला झालेला असून आता शाळेच्या वर्गात शिक्षकाला एखाद्या विद्यार्थ्याला शाब्दिक टोमणा देखील मारायची पंचाइत झालेली आहे. विद्यापीठ पातळीवर प्राध्यापकांनी इंटरनेटच्या राक्षसाची मदत घेऊन बेगडी संशोधनाचे कारखाने कसे उघडलेत यावरही टिप्पणी केली आहे.

आपल्यावरील दीर्घकालीन ब्रिटिश राजवटीमुळे पडलेला प्रभाव आणि जागतिकीकरणानंतर पडलेला अमेरिकी प्रभाव आणि त्यातून झालेला संस्कृतीसंगम यांचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे. ब्रिटिश आणि भारतीय संस्कृतींच्या नीतीसंहितेत बरीच साम्यस्थळे होती. त्यापैकी एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरावेत. हेच तत्त्व ब्रिटिशांच्या ‘लिव्ह विदिन द मीन्स’मध्ये दिसून येते. या उलट अमेरिकी संस्कृती ‘ऋणं कृत्वा घृतं पिबेत’(कर्ज काढून तूपरोटी खावी) या तत्वाला महत्त्व देणारी असून EMI हे तिचे दर्शनी रूप आहे आणि त्याचा आपल्यावर जबरदस्त परिणाम झालेला दिसतो. मात्र अमेरिकी संस्कृतीतील शारीरिक श्रमालाही प्रतिष्ठा देणारे तत्त्व मात्र आपल्यापासून अजून बरेच दूर आहे.

पुस्तकात सार्वजनिक शिष्टाचारासंबंधी तीन-चार प्रकरणे असून त्यामध्ये केलेली युरोपीय संस्कृती आणि आपली तुलना महत्त्वाची आहे. 16 व्या शतकात युरोपात प्रसिद्ध झालेल्या Galateo या सामाजिक शिष्टाचारासंबंधी पुस्तकाचा संपूर्ण युरोपवर चांगला प्रभाव पडला. (Galateoसंबंधीची काही जालावर वाचलेली माहिती खाली पहिल्या प्रतिसादात देत आहे). या उलट भारतात त्यासंबंधी एकंदरीत उदासीनताच दिसून आली. महाराष्ट्रात श्रीधर शामराव हणमंते यांनी देखील ‘व्यवहार आणि शिष्टाचार’ हे पुस्तक लिहिले होते परंतु त्याचा प्रचार आणि प्रसार फारच अपुरा पडला. या संदर्भात अलीकडील काळातील काही प्रयत्न स्तुत्य आहेत. इतरांचा विचार करण्याची सवय सर्व समाजघटकांना लावता येण्याच्या दृष्टीने ‘मानव अभिमुखता शास्त्र’ या शाखेचा उगम झालेला आहे. त्या संदर्भात अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. शंकर मोडक हे चांगले काम करीत असून त्यांनी या विषयावरील छोटे पुस्तकही लिहिले आहे. दैनंदिन जीवनातील चिडचिड, गोंधळ आणि अपमान टाळण्याच्या दृष्टिकोनातून त्या पुस्तकात काही उपयुक्त सूचना केलेल्या आहेत. हे वाचल्यावर या पुस्तकाबद्दल उत्सुकता वाढली.

कौटुंबिक पातळीवरील महत्त्वाचे स्थित्यंतर म्हणजे आकाराने आक्रसत गेलेली कुटुंबे. अविभक्त कुटुंबापासून ते आता (निदान शहरी भागात) फक्त दोन व्यक्तींच्या कुटुंबापर्यंत समाजाने मजल मारलेली दिसते. त्याचे अधिकउणे परिणाम आपणा सर्वांसमोर आहेतच. दोन पिढ्यांमधील बदललेले नातेसंबंध, खंडित झालेली बौद्धिक आणि वैचारिक परंपरा आणि सचोटी-प्रामाणिकपणा-मेहनत या गुणांना आपण दिलेली तिलांजली आणि फोफावलेला भ्रष्टाचार यासंबंधीचे विवेचन चिंतनीय आहे.

शिक्षणाचा प्रसार होऊन देखील लोकांत धर्मभावना कमी होण्याऐवजी वाढीस लागली; धर्म रस्त्यावर आला आणि त्याला राजकारणाचे अधिष्ठानसुद्धा मिळाले. राहणीमान आणि पोशाखात आधुनिक असलेला समाज विचारात मात्र कालविसंगत राहिला. मग तो आधुनिक कसा, हा प्रश्न पुस्तकात उपस्थित केलेला आहे. औद्योगिक क्रांतीची फळे आपण जरूर चाखली, मात्र तिचा वैचारिक परिणाम आपल्यावर झालेला दिसत नाही. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली अनेक बाबतीत कर्मठपणा मुरलेला दिसून येतो. समाजधुरिणांचे असे जबाबदारी विसरलेले व्यक्तीस्वातंत्र्य समाजाला आधुनिकतेच्या दिशेने नेत नाही.

सुदृढ समाज जीवनासाठी आपल्यासमोर काही आदर्शांची सतत गरज असते. स्वातंत्र्यपूर्व काळातील काही थोर लोक त्यांच्या मृत्यूनंतर देखील आख्यायिकेच्या रूपाने राहिले आहेत. त्यामध्ये लोकमान्य टिळक आणि न्यायमूर्ती रानडे यांची उदाहरणे दिली आहेत. परंतु या पुढच्या काळात कोणाचीही आख्यायिका बनणे असंभव वाटल्याचे लेखक लिहितात. त्याचे कारण म्हणजे आता आपला समाज जातीय, प्रादेशिक आणि धार्मिक अस्मितांच्या संघर्षात अडकून पडलेला दिसतो.

समाजाची आर्थिक प्रगती आणि गरिबी श्रीमंती यावरही काही चिंतन केलेले आहे. एकंदरीत मध्यमवर्गाची आर्थिक उन्नती चांगली होऊन तो उच्च मध्यम आणि काही प्रमाणात श्रीमंत देखील झाला. लेखक श्रीमंतीचे दोन प्रकार सांगतात - मुरलेली आणि बटबटीत. मुरलेली श्रीमंती दिलदार असून दातृत्व हा तिचा स्थायीभाव असतो. या उलट बटबटीत श्रीमंतीत अभिरुचीचा दिखाऊ खोटेपणा असतो. सांस्कृतिक प्रगल्भता आणण्यासाठी समाजातील धनिकांनी दानशूर असायला हवे हा धडा अजून आपल्या नवपिढ्यांनी शिकण्याची गरज आहे.

या वास्तव दर्शनानंतर महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो म्हणजे समाजातील हा सार्वत्रिक काळोख जाऊन नवी पहाट कधी उजाडणार? त्यासाठी प्रयत्नांचे पहिले पाऊल कोण टाकेल हा तर यक्षप्रश्न. लेखकाच्या मते ती सुरुवात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांकडूनच होईल. आज सर्वच व्यवसाय भ्रष्टाचारात अडकले असताना थोडाफार आदर्शवाद फक्त याच वर्गात शिल्लक असल्याचे ते म्हणतात. म्हणून या वर्गाला पाठबळ मिळावे अशी आशा व्यक्त केलेली आहे.

एकंदरीत विचारप्रवर्तक आणि आत्मपरीक्षण करायला लावणारे हे लेखन. दररोज दोन लेख या संथ गतीनेच ते वाचले आणि समजावून घ्यायचा प्रयत्न केला. काही लेखांचे पुनर्वाचन नक्कीच करावेसे वाटते. पुस्तकाचा पूर्वार्ध बराच वाचनीय आणि रोचक वाटला तर उत्तरार्धात केलेले चिंतन मात्र काही वेळा जरा बोजड झालेले आहे. अर्थात मूलगामी चिंतन या दिशेने जाणे स्वाभाविक असते. पुस्तकाच्या शीर्षकात (कां असा) अनुस्वार न वापरता ‘न्त’ असे जोडाक्षर वापरणे हे देखील उल्लेखनीय ! मुखपृष्ठ शेखर गोडबोले व राजू देशपांडे या द्वयीचे असून ते साधे, सरळ आणि लक्षवेधी आहे. सवंग मनोरंजन आणि ढासळत्या वाचनसंस्कृतीच्या काळात अशा वैचारिक पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघालेली पाहून समाधान वाटले.
*************************************************************************************
कालान्तर - अरुण टिकेकर
रोहन प्रकाशन
दुसरी आवृत्ती, 2017

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

22 Sep 2025 - 8:09 am | कुमार१

Giovanni della Casa या 16 व्या शतकातील प्रसिद्ध इटालिय कवी, धर्मोपदेशक आणि मुत्सद्याने हे 100 पानी पुस्तक लिहिले होते. ते त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1558 साली प्रसिद्ध झाले. Galateoचा अर्थ ‘द रूल्स ऑफ पोलाइट बिहेवियर’ अर्थात, समाजात कसे वागावे आणि वागू नये. या पुस्तकात नागरिकांकडून सभ्य आणि सौजन्यपूर्ण वागणुकीची अपेक्षा केलेली आहे.
मुळात पुस्तकाचे नाव हे त्यांच्या एका जिवलग मित्राचे नाव होते. हे पुस्तक युरोपात प्रचंड लोकप्रिय झाले व त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली. युरोपातील प्रबोधनपर्वात या पुस्तकाचा प्रभाव संपूर्ण युरोपीय संस्कृतीवर पडला आणि त्यातूनच तिथे शिष्टाचाराला महत्त्व प्राप्त झाले. कालान्तराने त्या पुस्तकाचे विशेषनाम असलेले शीर्षक इटालिय भाषेत शिष्टाचारसंहिता या अर्थाने सामान्यनाम बनले. चालू शतकातही त्या पुस्तकाच्या आवृत्त्या निघत असतात.

पुस्तकाची पीडीएफ जालावर उपलब्ध असल्याने दोन-चार पाने वाचण्याचा प्रयत्न केला परंतु ते प्राचीन इंग्लिश (की युरोपीय भाषा मिश्रण?) झेपले नाही.

या पुस्तकात नागरिकांकडून सभ्य आणि सौजन्यपूर्ण वागणुकीची अपेक्षा केलेली आहे.

वस्तूस्थिती अशी आहे की सभ्यपणा हा आता कमकुवतपणा समजला जातो. नखं दाखवल्याशिवाय मान राखला जात नाही.

कंजूस's picture

22 Sep 2025 - 7:42 pm | कंजूस

या पुस्तकात लेख आहेत. विषयवार आहेत. ठीक आहे.

सुरुवातीच्या तब्बल 13 लेखांतून शिक्षण पद्धतीत झालेले बदल टिपले आहेत. त्यात पाठांतर, शुद्धलेखन, उच्चार आणि हस्ताक्षरापासून ते संस्कार, गुरु-शिष्य नाते आणि विद्यापीठातील शिक्षणापर्यंतचे मुद्दे हाताळले आहेत. .......

- खरं म्हणजे समाज घडवणे आपलीच जबाबदारी आहे हे शिक्षकांनी उगाचच अंगावर घेतलेले काम ठरले.

आपल्यावरील दीर्घकालीन ब्रिटिश राजवटीमुळे पडलेला प्रभाव आणि जागतिकीकरणानंतर पडलेला अमेरिकी प्रभाव आणि त्यातून झालेला संस्कृतीसंगम यांचे विवेचन .....

- जगात ब्रिटिश लोकांची कामाची पद्धत आणि संस्कृती हीच बरोबर अशी धारणा करून देण्यात आली. जर्मन जपान दूरच राहिले.

सुदृढ समाज जीवनासाठी आपल्यासमोर काही आदर्शांची सतत गरज असते. .....

यासाठी गेल आम्लेट हिचे बे-गमपुरा पुस्तक वाचायला हवे. समाज जीवन खरंच बदलले होते का? किंवा प्रयत्न,तरी होत होते का?

पुस्तकात सार्वजनिक शिष्टाचारासंबंधी तीन-चार प्रकरणे असून त्यामध्ये केलेली युरोपीय संस्कृती आणि आपली तुलना महत्त्वाची आहे. ........

आपल्या संरक्षण दलात अजून ब्रिटिश शिष्टाचारच पाळले जातात.
"Chasing the Olive Dream" refers to the memoir by Shivani Oka Jagtap, ( याचे सांपल) किंडलवर सापडेल.

कालान्तर वाचले नाही पण..
मला सुचले ते लिहिले.
.

कुमार१'s picture

23 Sep 2025 - 7:21 am | कुमार१

जन्माने अमेरिकी असलेल्या या बाईंनी महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाशी लग्न केले आणि नंतर शेवटपर्यंत भारतीय नागरिक म्हणून राहिल्या ही माहिती वाचली.

त्यांचे दलित उद्धाराचे कार्य प्रशंसनीय आहे !
/-\

गामा पैलवान's picture

22 Sep 2025 - 8:26 pm | गामा पैलवान

आम्लेट नाही हो ऑमवेट म्हणा.
-गा.पै.

ऑमवेट च
आटोकरेक्शन झाले.

आपल्यावरील दीर्घकालीन ब्रिटिश राजवटीमुळे पडलेला प्रभाव आणि जागतिकीकरणानंतर पडलेला अमेरिकी प्रभाव आणि त्यातून झालेला संस्कृतीसंगम यांचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे.

ब्रिटिश काळात आधुनिकीकरण बरोबर अनेक न्यूनगंड भारताला जखडले असे म्हटले जाते.ब्रिटिशांना अनुकूल व्यवस्थेत अनेक मूळ संस्कृती लयाला गेली.
चांगल्या विषयावर हे पुस्तक आहे.

कुमार१'s picture

22 Sep 2025 - 9:13 pm | कुमार१

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल.
सुचवलेले संदर्भ सवडीने पाहतो.

आज सर्वच व्यवसाय भ्रष्टाचारात अडकले असताना थोडाफार आदर्शवाद फक्त याच वर्गात शिल्लक असल्याचे ते म्हणतात....... स्वप्नाळू आहेत हे विचार. शहरात पैशामागे पळतात पण काही तत्वनिष्ठ असतील. ग्रामीण भागात परिस्थिती भयाण आहे.