चमकणारे आभास निळे

निनाद's picture
निनाद in जे न देखे रवी...
14 Sep 2025 - 2:06 pm

जागं मन हे, अर्धवट मिटल्या डोळ्यांत
देकार्तेच्या का शंकेचा पोकळ गोंधळ.
'मी विचार करतो, म्हणून मी आहे'?
पण हे विचार कुणाचे?
एका ॲपच्या नोटिफिकेशनचे?

अस्सल आरसा असूनही
पडझडलेल्या प्रतिमेचा भुगा
रात्री बेरात्री चिवडत बसणे
जसा नित्शेच्या 'माणसाच्या'
अशक्यप्राय स्वप्नाचा उपहास.

मोबाईलच्या काळोख्या स्क्रीनवर
मेलेली बोटं नाचतात,
एक अदृश्य तारांगण,
पण त्यात ना चंद्र, ना प्लॅटोच्या गुहेतून
बाहेर पडण्याचा मार्ग.

हेच वास्तव आहे का, की
हे फक्त सोफिस्ट लोकांचं कालबाह्य फॅड?
रस्त्यावर धावणाऱ्या कार्सच्या
जशा निरर्थक नंबर प्लेट्स
एकाच वेळी जगणं आणि
त्यातूनच अदृश्य होणं,
हेच आहे का
कामुच्या 'अस्तित्वा'चं
अस्वस्थ वास्तपुस्त?

नाचत फिरतो आपण
हेगेलच्या 'आत्म्याच्या' बेपर्वा चाकावर,
पण आतून एक रिकामी किंकाळी
सार्त्रच्या 'रिक्ततेसारखी'
कर्कशपणे मनावर
आदळत राहते.

जीवनात अती झालेल्या सा़खरेची
ही थुलथुलीत प्रतारणा
प्रत्येक क्लिकमध्ये आहे,
प्रत्येक शेअरमध्ये आहे.
आणि हे ऑनलाईन नातं
आपलं स्वतःच्याच अस्तित्वाशी
रिकाम्या हिंगाच्या डबीसारखं
रिकामंच आहे.

पण हे माहीत असूनही
आपण हसतो, टाळ्या वाजवतो
आणि म्हणतो, 'काय गंमत आहे!'
कारण,
अजाणतेपणातच सुख आहे,
कारण जागरूकतेचं ओझं,
आपण सोसूच शकत नाही.

prayogकविता

प्रतिक्रिया

अनन्त्_यात्री's picture

14 Sep 2025 - 4:15 pm | अनन्त्_यात्री

One who has a why to live can bear almost any how.

--Nietzsche

'कारण' माहीत असणं हे एक पाऊल आहे, पण 'कसं' जगायचं हे प्रत्यक्ष कृतीवर अवलंबून असतं. कारण, नुसतं 'why' माहीत असलं म्हणून आयुष्य सोपं होत नाही. आयुष्य हे फक्त 'why' वर नाही, तर दररोजच्या 'how' वर चालतं...