फार फार वर्षांपूर्वी कोणे एके काळी घरपोच फक्त पत्र आणि बिलं यायची. मग डॉमिनोज आणि पिझ्झा हट मुळे अर्ध्या तासात घरी पिझ्झा यायला लागला. फ्लिपकार्ट वरून पुस्तकं आणि मग एक एक करत सगळंच यायला लागलं. झोमॅटो, स्विगी यावरून जेवण मागवणं आता फार जुनी गोष्ट झाली. प्रत्येक लोकप्रिय हॉटेल बाहेर बघितलं तर या डिलिव्हरी वाल्यांची येजा सुरु असते.
पण आता गेल्या २-४ वर्षात आणखी एक प्रकार सुरु झाला तो म्हणजे "क्विक कॉमर्स". किराणा भुसार दुकानात मिळतात अशा सर्व पॅक वाल्या गोष्टी, परफ्युम, साबण आणि तत्सम कॉस्मेटिक गोष्टी असं बरंच काही यांच्या ऍपवरून काहीही मागवलं कि सहसा १० मिनिटाच्या आत घरात एवढी भारी हि सोय आहे. झेपटो, ब्लिंकिट, स्विगी इंस्टामार्ट आणि तत्सम "क्विक कॉमर्स" या श्रेणीत मोडल्या जाणाऱ्या सेवा आता पुणे मुंबई आणि भारतातल्या बऱ्याच मोठ्या शहरात नित्याच्या झाल्या आहेत.
आता घराबाहेर पडलं कि सोसायटीच्या गेटवर जाईपर्यंत बऱ्याचदा या सगळ्या सेवांपैकी कोणत्या तरी एकाचा शर्ट घातलेला डिलिव्हरी बॉय गेटमधुन काहीतरी घेऊन येत असतो किंवा काही तरी देऊन परत निघालेला असतो. इतकं हे सगळ्यांच्या अंगवळणी पडलेलं आहे.
मी स्वतः कित्येकदा अशा ऑर्डर्स केलेल्या आहेत. कधी घाईच्या वेळेत म्हणुन, कधी काही कुपन कोड किंवा सवलत आहे म्हणुन, सुरुवातीला तर खरंच हे ५-७ मिनिटात येतात कि काय हे बघायला गंमत म्हणुन. बऱ्याचदा त्यांची अमुक एक रकमेच्या वर बिल झालं तर डिलिव्हरी फ्री अशा कारणामुळे एखाद दुसरी वस्तु आत्ता गरज नसली तरी काही दिवसात वापरात येईलच अशा गोष्टी शोधुन त्या कार्ट मध्ये टाकणं असे सुद्धा प्रकार केलेले आहेत. त्यामुळे मी आता या पोस्ट मध्ये जे काही म्हणतोय ते "सौ चुहे खाके बिल्ली चली हज" अशातला प्रकार आहे.
या सगळ्या प्रकारांबद्दल इकडून तिकडून आणि स्वतःच्या विचारातून काही नकारात्मक मुद्दे लक्षात आले, ते इथे मांडतोय.
या कंपन्यांमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला अशी चर्चा होत असते. पण त्याबरोबरच त्या डिलिव्हरी बॉईजची परिस्थिती बिकट असते, फार वेगात त्यांना सतत डिलिव्हरीचे टार्गेट डोळ्यासमोर ठेवून पळत राहावं लागतं. ऊन पावसात ते काम करतातच, पण त्या नादात ट्रॅफिकचे सुरक्षेचे नियमही दुर्लक्षित होतात असंही समजतं. आणि दुसरं म्हणजे हा कुठला नव्याने निर्माण झालेला रोजगार नाही तर आहे त्या किराणा भुसार आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम करणारा, त्यांच्या जागी आलेला रोजगार आहे. ह्यात काय चांगलं काय वाईट ठरवणं अवघड आहे, हा थोडा मोठा व्यापक विषय आहे.
दुसरा मुद्दा आला तो म्हणजे व्यायाम, जीवनशैली आणि आपल्या सवयीचा. आपण एक एक करत आपलं बाहेर पडण्याचं कारण कमी करत चाललेलो आहोत. प्रत्येक गोष्ट घर बसल्या आली तर आपण फक्त मॉर्निंग वॉक, ट्रेडमिलचा वॉक असे मुद्दाम ठरवून केलेले वॉक सोडले तर इतर कुठल्याही कारणामुळे जे नैसर्गिक रित्या आपसूक चालणं फिरणं होतं ते कमी कमी होत चाललंय. यामुळे आज उद्या पाच पाच मिनिटात गोष्टी मिळुन वेळ वाचत असला तरी दीर्घकालीन नुकसान आपलंच आहे.
आपण मुळात hunter gatherer होतो म्हणतात. म्हणजे एक तर शिकार करायला किंवा फळं कंदमूळं गोळा करायला भटकणं हीच आपली मुळ जीवनशैली होती. आपली जी काही संस्कृती, प्रगती आहे ती हळु हळु प्रकृतीच्या विपरीत दिशेने जात जातच आपण इथवर आलोय, पण आपल्याच प्रकृतीवर त्याचा परिणाम व्हायची आता वेळ आलेली आहे. आजवर इतके शोध लागले, अवजारं आणि यंत्र बनवली तरी आपण फिरणं पूर्ण बंद केलेलं नव्हतं. आणि आता फिरण्याची जी काही मोजकी कारणं शिल्लक राहत आहेत ती आपण टिकवली पाहिजेत. चालण्यासाठी फिरण्यासाठी ठरवावं लागतं, निमित्त शोधावं लागतं हि आजची वस्तुस्थिती आहे.
पुढचा मुद्दा येतो पर्यावरणाचा. क्विक कॉमर्सवाले डिलिव्हरी बॉईज त्यांच्या ठराविक नेमून दिलेल्या विभागात सतत १०-१० मिनिटांच्या डिलिव्हरीज करत फिरत असतात. ते ज्या गोष्टी पुरवतात त्यातल्या बहुतांश गोष्टी त्याच गल्ल्यांमध्ये सहज उपलब्ध असतात. तरीही त्या गोष्टी घरी पोचवण्यासाठी हा दिवसभर गाड्यांचा, म्हणजेच पेट्रोलचा वापर कितपत योग्य आहे? पेट्रोल डिझेल चा साठा भरपूर असला तरी मर्यादित आहे हे आपण शाळेपासून शिकतो, पण ते वापरताना विसरतो. प्रदुषण आणि ट्रॅफिक होतं तेही आहेच.
आपण दूरदूरच्या ठिकाणी जाण्यासाठी गाड्या वापरतो, जवळपास न मिळणाऱ्या गोष्टी ऑर्डर करतो इतपर्यंत ठीक आहे. ज्या गोष्टी आणायला आपण एरवीही गाडी काढूच त्या गोष्टी मागवणंही ठीक आहे, पण अगदी आपल्याच गल्लीत मिळणाऱ्या गोष्टी पेट्रोल जाळून घरी मागवणं म्हणजे आपला ऐदीपणा वाढायला लागलाय असं वाटतंय. अक्षरशः काही रुपये आणि काही मिनिटं वाचवायला आपण बिनदिक्कत एवढं पेट्रोल जाळलं तर कदाचित उद्या आपलीच पोरं ग्रेटा थनबर्ग सारखी आपल्या पिढीला जाब विचारतील तुम्ही आमच्यासाठी काहीच शिल्लक नाही ठेवलं म्हणुन!
एखादी गोष्ट दुकानात १०० रुपयांना मिळत असेल आणि ती घरबसल्याही तेवढ्याच किमतीत (किंवा प्रसंगी त्याहूनही कमी) मिळत असेल तर घरबसल्याच आकर्षक पर्याय वाटणार हे साहजिक आहे. पण हि गोष्ट एवढी सोपी नाही. किंमत पैशात जरी भारी वाटत असली तरी आपण इतर नुकसान विचारात घेत नाही. प्रत्येक गोष्ट पैशात मोजण्याचा हा तोटा आहे.
तुमच्या अजुन लक्षात आलं नसेल तर पुढच्यावेळी काही ऑर्डर करताना लक्षपूर्वक बिल बघा. सगळ्याच कंपन्या आता मार्केटप्लेस फी, प्लॅटफॉर्म फी, हँडलिंग फी अशा वेगेगळ्या नावाने ५ रुपये, १० रुपये असं शुल्क गुपचुप आकारायला लागलेल्या आहेत. आपल्याला त्या सेवेची सवय लागेपर्यंतचे लाड होते सगळे. त्यांना सुरुवातीला इन्व्हेस्टरकडून मिळालेला पैसा संपला कि हि किंमत आपल्याला कधी न कधी मोजावी लागणार तर होतीच. शेवटी त्यांना सुद्धा रोहित शर्माला सपत्नीक घेऊन जाहिरात करायची तर त्याचा पैसा कुठून येणार? आपल्याकडूनच.
काहीही ऑनलाईन मागवणं सरसकट बंद करावं असं माझं म्हणणं नक्कीच नाही. मला स्वतःला ते जमणार नाही. पण थोडं विचारपूर्वक करायला हवं हे नक्की. जी गोष्ट जवळपास मिळत नाही, किमतीत फार फरक आहे, फक्त ऑनलाईन उपलब्ध आहे अशा गोष्टींना पर्याय नाही. पण ह्या क्विक कॉमर्स पेक्षा क्विक वॉक केव्हाही बरा. चलते रहोगे तो लंबा चलोगे ;-)
प्रतिक्रिया
21 Jul 2025 - 1:56 pm | विवेकपटाईत
बहुधा स्वस्त मिळत नाही. या शिवाय आवश्यक वस्तु सोडल्यास बाकी किमान 35% नफे देणार्यांच्या वस्तु विकतात. भाज्या तर महाग आणि शिळ्या मिळतात. बाकी नवी पिढी आळशी झाली आहे.
21 Jul 2025 - 2:11 pm | गवि
कोणतीही नवीन पद्धत रूढ होऊ लागली की अशा प्रकाराचे विचार आणि आक्षेप येत असतात. साहजिकच आहे ते.
फेरीवाले, किराणा दुकान, किराणा दुकानाची होम डिलिव्हरी, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणारी लहान दुकाने. मग त्यांच्या मोठाल्या शोरुम, तिथे जाऊन डिस्काउंट मधे खरेदी करण्याची क्रेझ, मॉल कल्चर, मग अमेझॉन ऑनलाईन, आणखी सवलत.. थेट घरपोच सामान, न आवडल्यास आठवड्याभरात वस्तू परत करता येण्याची सोय.
आता दहा मिनिटांत बसल्याजागी वस्तू.
या प्रत्येक टप्प्यावर आधीचे दुकानदार रडले. नवीन आलेल्या पद्धतीने आम्हाला संपवले, खाऊन टाकले वगैरे तक्रारी केल्या.
पण चक्र चालूच राहते.
21 Jul 2025 - 2:28 pm | आकाश खोत
बरोबर आहे.
नवनवीन यंत्रे आली तेव्हा मजुरांना नकोसं वाटलं असेल. संगणक आले तेव्हा बँका आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ते शिकणं नकोसं वाटलं असेल. आता एआय आलं तेव्हा आयटीवाल्यांना आणि काही काही क्षेत्रात लोकांना आपल्या रोजगाराला धोका वाटतो आहे.
सगळ्या बदलांचं असं होतंच. त्यामुळे मी त्या मुद्दयांवर फक्त वाचनात आलं तेवढाच उल्लेख केला.
मला स्वतःला चालणं फिरणं, व्यायाम आणि पेट्रोलचा अपव्यय टाळणं या मुद्द्यांमुळे जास्त वाटतं कि शक्य असेल तेव्हा किरकोळ खरेदी पायी जाऊन केलेली बरी.
शेवटी बदल तर होतच राहतील, पण जे आपल्यासाठी चांगलं वाटतं ते राबवावं.
21 Jul 2025 - 2:53 pm | गवि
यातून होणारं दीर्घकालीन नुकसान किंवा अपाय हा वास्तव आहे.
बटण दाबलं की वाट्टेल ती गोष्ट घडून यावी इथवर "प्रगती" होत आली की नुसते तोंडी हुकूम सोडून बटण देखील प्रत्यक्ष न दाबता कार्यवाही व्हावी असे तंत्र येते. मग तोंडाने आज्ञा तरी कशाला द्यायची? मनात विचार आला की तिकडे बटण दाबले जाईल असे पुढचे तंत्र. मग त्यानंतर मनात विचार देखील येण्याच्या आत, तुमच्या सवयींचा अभ्यास करून तुमच्या मनात नेमका कधी तो विचार येणार याचे आधीच भाकीत करून बटण दाबून टाकणारे तंत्र...
22 Jul 2025 - 1:17 am | हणमंतअण्णा शंकर...
कुण्या शहाण्या माणसांना कळते की आपण सिम्युलेशन मधे राहत आहोत. समजा नसलो राहत तर: माणसाला हे भाकीत करता येत इथवर कमी काळात (उणी पुरी काही हजार वर्षे) पोचता येत असेल तर मिलियन वर्षे किंवा बिलियन वर्षे अस्तित्वात असलेल्या सूपर इंटेलिजन्स नी आपल्यासाठी सिम्युलेशन बनवली नसतील कशा वरून.
या ही पुढची पायरी-. तुमचा उपयोग काय? सध्या मुलं जन्माला घालणे सोपे आहे एखादा सोफेस्टिकेटेड बायो केमिकल रोबोट बनवण्या पेक्षा म्हणून तुम्हाला जन्माला घालणे.
त्या पुढे, ते ही नाही. तुमचे सिंथेटिक वर्जन्स तयार करणे. एखादी टाइप २ संस्कृती बनवणे.
त्या पुढे, बाहेर पडणे. सूर्यमालेतून.
21 Jul 2025 - 2:40 pm | स्वधर्म
सगळ्यांना समजतंय पण... सुखासीनतेची चटक लागली आहे. मी ४ थ्या मजल्यावर राहतो. तिथे चढत जाणं मला सहज शक्य आहे, जे मी बर्याचदा करतोही, पण कधी कधी लिप्ट वापरतो. समोर सोय आहे म्हटल्यावर ती टाळायला मानसिक श्रम पडतातच. पहिल्या मजल्यावर लिप्टने जाणारे धडधाकट महाभाग आहेत. त्यामुळे आपण कसं जगायचं ते ज्यानं त्यानं ठरवायचं हेच खरं.
21 Jul 2025 - 8:51 pm | आकाश खोत
एक वेळ चढताना देखील ठीक आहे पण पहिल्या मजल्यावरून लिफ्टने उतरताना लोक पाहिले कि फारच आश्चर्य वाटतं.
21 Jul 2025 - 5:28 pm | अभ्या..
अगदीच ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी उत्तम सुविधा आहे, काही कमी स्कील वाल्यांसाठी रोजगार मिळत्ओय ते खरंच पण आपण ग्राहक म्हणून काय काय मूल्य देतोय ह्याच विचार करायला हवा.
नुसतेच वस्तूंचे पैसे की आपली सगळी खाजगी माहिती?
डिलिव्हरी बॉईज हे फक्त साधन आहेत. तुमची सगळी माहीती अगदी तुम्हाला काय, कीती, कोणत्यावेळी लागते, तुम्ही पे कसे करता, तुमच्याकडे कोणते मोबाईल, लॅपटॉप, वाहने आहेत हे सगळे ऑनलाईन सेवा पुरवणार्या कंपन्यांकडे सेव्ह होत आहे. एआय च्या माध्यमातून त्याचे विश्लेषण होत आहे. त्यातून तुमचे, तुमच्या घराचे पूर्ण अॅनालिसिस उपलब्ध होत आहे. आर्थिक, शारिरिक, बौद्ध्दिक, मानसिक अगदी सगळे डिटेल्स. मग ह्या माहितीचा उपयोग तुमच्यासाठीच केला जाणार आहे. तेंव्हा बघा.
राहता रहिलं अशा कंपन्यांना स्पर्धात्मक डिलिव्हरी वेळेची मर्यादा घालण्यापासून रोखणे गरजेचे आहे. डेडलाईनसाठी जीवाचा आकांत करीत, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत धावणार्या ह्या डिलिव्हरी बॉइज ना आत्ताच आळा घातला गेला पाहिजे.
21 Jul 2025 - 8:53 pm | आकाश खोत
हा एक आणखी वेगळाच आणि सखोल दृष्टिकोन आहे. असा विचारही चटकन मनात येत नाही. याचेही परिणाम भयावह असु शकतात.
23 Jul 2025 - 1:03 pm | राजेंद्र मेहेंदळे
बहुतेक वेळा आपण फुकटातली अॅप डाउन्लोड करताना अनेक प्रकारचे अॅक्सेस देत असतो. त्यात काँटॅक्ट लिस्ट, कॅमेरा, मायक्रोफोन, गूगल लोकेशन असे अनेक असतात. त्या अॅप च्या वापरासाठी ते सगळे अॅक्सेस खरेच आवश्यक आहेत का? हा विचार आपण करत नाही.
यातुनच पुढे आयडेंटीटी थेफ्ट, डिजिटल अरेस्ट असे गंभीर किवा गेलाबाजार नकोसे मार्केटिंग कॉल्स, कायप्पा फॉरवर्ड्स असे प्रकार होउ शकतात. आजही तुम्ही एखाद्या विषयावर चर्चा केलीत तर तूनळीवर त्याचे व्हिडिओ दिसु लागतात. म्हणजे तुम्ही २४ तास तुमच्या फोनच्या निगराणीखाली आहात. अगदी झोपेत सुद्धा. आणि त्या साठलेल्या डेटाचे अॅनालिसिस करायला ए आय आहेच.
त्यामुळे तुम्ही किती वाजता, कुठल्या रस्त्याने, कुठे जाता, काय खाता पिता,काय बोलता, कुठले कपडे घालता ,किती कॅलरी जाळता, तुमच्या आवडी निवडी,तुमचे रोग, त्यावरची औषधे, घरात माणसे किती, त्यांची माहिती वगैरे सगळे गूगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल,अॅमेझोन कडे आहे. त्याचा वापर कसा करायचा हाच काय तो मुद्दा आहे.
यापुढे जाउन काही उदाहरणे --
ईटलीचे सरकार मस्कच्या स्टारलिंक शी इंटरनेट बॅकबोन सेवा घेण्याबद्दल करार करणार होते. पण ईतक्यात त्यांना समजले की अमुक तमुक देशाची ईंटरनेट सेवा, अमेरिकन सरकारच्या सांगण्यावरुन स्टारलिंकने खंडीत केली. तेव्हा हा धोका वेळीच ओळखुन त्यांनी करार रद्द केला. उद्या गूगलने जी पे, जी मॅप, जी मेल, तूनळी वगैरे भारतासाठी बंद केले किवा मायक्रोसॉफ्ट ने कायप्पा बंद केले तर आपल्यापुढे काय पर्याय आहेत हे बघायला पाहीजे.
21 Jul 2025 - 6:03 pm | श्वेता व्यास
काय मागवावं आणि काय नाही याचं खरंच तारतम्य पाहिजे.
लेख वाचून ही शॉर्ट फिल्म आठवली.
बाकी पेट्रोलच्या मुद्याबाबत, मागच्या गल्लीत जाण्यासाठी सुद्धा स्कुटर वापरणारे लोक पाहीले आहेत, घरातही आहेत :)
21 Jul 2025 - 6:06 pm | कर्नलतपस्वी
पटतयं, परंतू आजच्या तरूणाईची रॅट रेस बघता ही खरोखरच एक सोय आहे असे वाटते. सोमवार ते रविवार अखंड बिझी असलेल्यांना हे एक वरदानच म्हणावे लागेल. अर्थात मुंबई पुण्या सारख्या ठिकाणी. इतर ठिकाणी हे प्रकार अजून सुरू झाले नसावेत.
आमच्या सारखी रिकामटेकडी जुनी खोडं आजही चार पावले दुर जाऊन काही ताजं,स्वस्तात मिळतयं का हे शोधत असते. पण आजून थोडे दिवस गेले की आम्हांला पण सोय होणार आहे.
21 Jul 2025 - 9:03 pm | आकाश खोत
वयस्कर लोक अगदी एकटेच राहत असतील आणि चालणं फिरणं बंद झालेलं असेल तर खरंच चांगली सोय आहे.
नाही तर वयस्कर लोकांसाठी सुद्धा फेरफटका मारणं, खाली चार लोकांशी बोलणं हा चांगला विरंगुळा असतो. मी एका कुटुंबाला ओळखतो, त्यातला मुलगा सर्व सोयी वापरू शकतो, वापरतो. त्याचे बाबा मात्र रोज ठराविक वेळी भाजी आणि फुलं आणायला एक चक्कर मारतात म्हणजे मारतातच.
आपण हिंडू फिरू शकतो, छोटी मोठी कामं करू शकतो याने सुद्धा आत्मविश्वास आणि उभारी मिळते.
माझे आजोबा ७५ वर्षांपर्यंत सकाळ संध्याकाळ मस्त फिरायचे. नंतर एक दोन दुखण्यांनी फिरणं कमी झालं आणि मग झपाट्याने कमी होत बंदच झालं. त्यामुळे जोपर्यंत जमतंय तोपर्यंत फिरावंच.
21 Jul 2025 - 7:38 pm | Bhakti
खरंय,मी ऑनलाईन जास्त मागवत नाही.पण जवळ जायला देखील स्कुटी वापरते.जे मला आणखीन आळशी करत आहे हे जाणवते.मी आधी असं करत नसे, कदाचित मी वयस्कर व्हायला लागली आहे ;)
22 Jul 2025 - 7:59 am | कंजूस
वाचतोय.
22 Jul 2025 - 2:57 pm | कर्नलतपस्वी
खाजगी माहिती वेगवेगळ्या मार्गाने चव्हाट्यावर येत आहे. आगदी सुलभ शौचालयाचे शुल्क देताना यु पी आय मार्गे सुद्धा
इथे मला तुकोबाराय यांचा अभंग आठवतो.
संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:ख लेश।। धृ ।।
तेथे मी राहीन होऊनी याचक। धालितील भीक तेचि मज।। 1 ।।
पंताचिये गावी माहितीचा सुकाळ.|.नाही पळवाट लेशमात्र ||
रहावे लागेल मांजर होऊन| दावतील भिती तेच मज||
या चक्रव्यूहातून सुटका नाही.
सारेच अभिमन्यू इथे नाही कोणी अर्जुन
22 Jul 2025 - 5:02 pm | चंद्रसूर्यकुमार
लेख आवडला.
याविषयी साशंक आहे. कारण झेप्टो आणि इतर कंपन्यांचे डिलिव्हरी देणारे लोक कुठून तरी एखादी वस्तू विकत घेऊन आपल्याला आणून देतात. त्या वस्तू ते कुठून आणतात? मला वाटते किराणा- छोटे व्यापारी आणि आपण यात घरी डिलीव्हरी देणारे ही आणखी एक पायरी आली आहे. ते डिलीव्हरी वाले त्या छोट्या व्यापार्यांकडूनच वस्तू विकत घेतात आणि आपल्याला आणून देतात. त्यामुळे झेप्टो आणि इतर कंपन्यांमुळे छोट्या व्यापार्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असेल असे वाटत नाही. २०१८-१९ मध्ये स्विगी-झोमॅटोचा वापर वाढल्यावर एक व्हॉट्सअॅप फॉरवर्ड फिरत होता की बघा केवढी मंदी आली आहे. पूर्वी कोणत्याही हॉटेलमध्ये गर्दी दिसायची पण आता नाही. याचा अर्थ लोकांना अधिक खर्च करणे परवडत नाहीये वगैरे वगैरे. मात्र होत असे होते की हॉटेलांचा धंदा बसला नव्हता- फक्त विक्रीचे स्वरूप बदलले होते. पूर्वी जे लोक तिथे जाऊन खायचे ते आता स्विगी-झोमॅटोवर ऑर्डर देऊन घरी बसून वेबसिरीज बघत खायला लागले.